Tuesday, January 8, 2013

शेतक-यांनी आत्महत्या केल्या...आता शेतीचीच हत्या!


(प्रश्नोपनिषद-२)


आज सुमारे चाळीस टक्के शेतक-यांना शेती करण्यात रस राहिलेला नाही. ते उपजीविकेसाठी शेतीव्यतिरिक्तच्या पर्यायांच्या शोधात आहेत, पण ते उपलब्ध मात्र नाहीत. महाराष्ट्र कशात आघाडीवर नसला तरी शेतक-यांच्या आत्महत्यांच्या बाबतीत मात्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. पासष्ट टक्के जनसंख्या आज शेतीवर अवलंबून आहे. शेती हा एक पुरातन उद्योग असून भारताची अर्थव्यवस्था एकुणातच कृषिप्रधान राहिलेली आहे स्वातंत्र्योत्तर काळातही या परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. किंबहूना शेतीलाही आधुनिकतेच्या दाय-यात आणण्यासाठी सक्षम धोरणे आखावीत व त्यांची अंमलबजावणी करावी याकडे संपुर्ण दुर्लक्ष झालेले दिसते. संकरीत बियाण्यांमुळे अन्नधान्याचे उत्पादन वाढून त्याबाबतीत स्वयंपुर्ण झालो याचा आपल्याला अभिमान वाटत असला तरी त्यामुळे शेतक-यांच्या अर्थरचनेत विकास न होता उलट त्याची स्थिती मात्र खालावतच गेलेली दिसते. त्याचीच अपरिहार्य परिणती म्हणजे शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे व अनेकजण आत्महत्यांचा मार्ग चोखाळु लागले आहेत.

२००६ साली सर्वाधिक म्हणजे ४४५३ आत्महत्या झाल्या. शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी  केंद्र सरकारने प्यकेजेस घोषित केली खरी पण तरीही आत्महत्यांच्या संख्येत विशेष फरक पडला नाही. यामागील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे ज्यांच्यासाठी मदतनिधी द्यायचा होता त्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत, गरजा आहेत याचा विचारच केला गेला नव्हता. जुन्या योजनांचेच एकत्रीकरण करुन फक्त अधिकचा निधी देण्यात आला. एकही नवी कार्यक्षम योजना आखली गेली नाही. आहे त्या योजनांचाही बोजवारा उडाला. शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचे हे सर्वत्र दिसणारे ठळक वैशिष्ट्य. म्हणजे एखाद्या शेतक-याला बैलजोडी घ्यायचीय आणि हे देणार पंपसेट.

त्यात महाराष्ट्र सरकारने कहर केला तो हा कि आत्महत्या करणा-या शेतक-यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत घोषित केली. आर्थिक दु:ष्चक्रात अडकलेल्या अनेक शेतक-यांनी कुटुंबिय तरी कर्जमुक्त होतील म्हणुन आत्महत्या सुरु केल्या. अशा प्रकारे आत्महत्यांना अप्रत्यक्ष उत्तेजन देणारे महाराष्ट्र हे जगातील एकमेव राज्य असावे.

मुळात शेती रसातळाला का जात आहे, मूळ समस्या काय आहे त्याकडे लक्ष न देता उगवतील त्या नव्या समस्यांवर माफ्या, मदत प्यकेजेस, हमीभाव वाढ अशा मलमपट्ट्या करत करत शेती फक्त असंख्य ब्यंडेजेसने वेढली गेली पण मुळ उपायांकडॆ जायचे नांव कोणी घेतलेले दिसत नाही.  महाराष्ट्र हा कोकण विदर्भ वगळता निमपावसाळी राज्य आहे हे आपल्याला गेली हजारो वर्ष माहित आहे. लोकसंखेचा होत जाणारा विस्फोट काय नवी आव्हाने उभी करणार आहे हे योजनाकारांना समजले नाही असे म्हनणे कदाचित भाबडेपणाचे ठरेल...पण वस्तुस्थिती पाहता तेच खरे ठरते. महाराष्ट्राचे समग्र आणि प्रदेशनिहाय स्वतंत्र धोरण आखत त्यांची कठोर अंमलबजावणी का केली गेली नाही हा प्रश्न या निमित्ताने उठतो. दिर्घकालीन धोरणाच्या अभावामुळे व समस्यांच्या आकलनांच्या अभावामुळे आजार एक औषध भलतेच असे प्रकार महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून करत आले आहे...त्याची परिणती महाराष्ट्रातील शेतीवर अत्यंत विपरीत पद्धतीने झालेला आहे. महाराष्ट्रात सरासरी तीन वर्षांनी एकदा दु:ष्काळाचे चक्र येते हा पुरातन अनुभव गाठीशी असुनही जुनमद्धेच पाऊस सुरु होणार व तो सरासरी गाठणार या विश्वासावर देशाचे कृषिमंत्री ते येथील जलसंपदा मंत्रीही कसे राहतात व राज्यवासीही त्यांच्यावर कोणत्या खुळचट भरवशावर राहतात हाही एक अनुत्तरीत प्रश्न आहे. यंदा हिवाळ्यातच दु:ष्काळामुळे प्यायला पाणी नाही तेथे शेतीला कोठुन देणार? शेतकरी कोठुन उत्पादन काढणार? केंद्राकडे अधिकाधिक मदत मागण्याची भिकारी परंपरा यंदाही जपली जातेय.

उसामुळे पश्चिम महाराष्ट्राचे भले झाले असे मानण्याचा एक प्रघात आहे. पण उस हे सर्वाधिक पाणी शोषनारे पीक आहे, जे खरे तर महाराष्ट्रातील एकंदरीत पर्जन्यमानाच्या विरोधात जाते. महाराष्ट्रातील शेतीला जेवढे पाणी पुरवले जाते त्यापैकी सरासरी ७०% पाणी उसालाच जाते. जलवितरणातील हा अतिरेकी असअमतोल अन्य पीकक्षेत्रांवर अन्याय करत आहे याचे भान शुगर लोबीला व त्याधारीत राजकारण करणा-यांना व म्हणुन समाजालाही आलेले नाही. तरीही आजमितीला २०० साखर कारखाने सहकारी व खाजगी) आहेत व जवळपास ७८ कारखाने मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत. याचाच अर्थ असा कि उर्वरीत पीकांना पाणी मिळुच द्यायचे नाही असा चंग बांधला गेलाय. खरे तर महाराष्ट्र निमपावसाळी क्षेत्रात येतो हे माहित असतांनाही उसक्षेत्र विशिष्ट मर्यादेबाहेर वाढु न देणे ही शासकीय जबाबदारी नव्हती व नाही काय? यामुळे सिंचन क्षेत्र आपसूक कमी व मर्यादित राहते व अन्य भागांना, जेथे पाणी पोहोचवता येणे शक्य आहे तेथवर पाणी जातच नाही आणि म्हणुन शक्य असुनही पाणी न देता आल्याने या भागातील शेतक-यांचे आर्थिक अहित होते आहे हे कधी शासनाच्या वा योजनाकर्त्यांच्या लक्षात आले नाही काय?

बरे एवढे करुनही उस उत्पादकांना जवळपास दरवर्षी भावासाठी आंदोलने करावी लागतच आहेत. लोक मरतच आहेत. उसाचा प्रतिटन उतारा कमी होतोच आहे. खरे तर आता उस उत्पादन ना शेतक-यांना परवडत ना साखरकारखान्यांना साखर उत्पादन परवडत. असे असुनही उसाची हाव सुटत नाही. कारण महाराष्ट्राचेच राजकारण जर शुगर लोबीभोवती फिरते राहिले असेल तर दुसरे काय होणार?

परंतू दुर्दैवाने महाराष्ट्रातील साखर उद्योगच जनतेच्या नव्हे तर राजकीय हितासाठी हेतुपुरस्सर जोपासला गेला असे मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाच्या माला ललवानी अभ्यासांती त्यांच्या प्रबंधात म्हणतात. त्यामुळे अर्थशास्त्राचेही मुलभुत जनमागणी हे तत्व न वापरता लादण्याचे तत्व वापरले गेले आणि त्यामुळेच हा उद्योग आता मरणोन्मुख अवस्थेत पोहोचला असला तरी विव्ध प्यकेजेस द्वारे तो जीवंत ठेवला जातोय. थोडक्यात उसक्षेत्र कमी केले असते तर उर्वरील पाणी व्यापक क्षेत्रासाठी वापरता आले असते. ते होत नाही म्हणुन जल-आपत्तीचा सामना महाराष्ट्राला करावा लागतोय. ही निसर्गाची अवकृपा नव्हे तर निमंत्रीत केलेली आपत्ती आहे.

उसशेतीला अतिरिक्त पाण्याची गरज असल्याने व वर्षानुवर्षे खतांचा मारा होत असल्याने खारवट होत चाललेल्या जमीनी हे एक नवे संकट आपल्या पुढे उभे ठाकलेले आहे. एकट्या सांगली जिल्ह्यात २०१० साली पासष्ट हजार हेक्टर जमीन यामुळे पुरती नापीक बनली. असेच होत राहिले तर महाराष्ट्राचे वाळवंट होनार याबाबत शंका बाळगण्याचे कारण नाही. तरीही उसाचा हव्यास सुटत नाही. कोण मरणार आहे यात? शेवटी शेतकरी आणि शेतीच ना?

 विदर्भाचीही गत वेगळी नाही. हा भाग प्रसिद्ध आहे संत्र्यांसाठी. हेही फलोत्पादन मोठे जलशोषक आहे. अमरावती जुइल्ह्यातील शाश्वत शेतीचा प्रयोग करणा-या वसंतराव व करुणाताई फुटाणे हे दांपत्य सांगते कि विदर्भातील अतिरेकी संत्रा उत्पादनामुळे भुजल पातळी खालावली आहे. त्यात ४०% संत्री प्रक्रिया उद्योगांच्या अभावात वाया जातात. संत्र्यांऐवजी कमी जलशोषक असनारी फळे मोठ्या प्रमाणावर घेतली गेली तर पाण्याचे मोठे दुर्भिक्ष आपोआप कमी होईल. परंतू असे काही ऐकायला सरकारचे कान नेहमी बहिरटलेले असतात.

थोडक्यात, महाराष्ट्रात पाणी कमी पडतेय असे नाही, किंवा दु:ष्काळ आलाय म्हणुन दुर्भिक्ष झालेय असे म्हनणे अर्धसत्य असून पाण्याचेच अतिरेकी शोषण करणारी पीकपद्धती आम्ही हट्टाने जीवंत ठेवलीय म्हणुन!

कोणत्याही उत्पादन क्षेत्रात संभाव्य मागणीचा व आवश्यक संसाधन उपलब्धतेचा अंदाज घेत उत्पादन नियोजित केले जात असते. शेतीच्या बाबतीत जर पाणी हे मुलभूत संसाधन असेल तर त्याला अनुकूल असे पीकधोरण ठरवायला नको होते काय? त्यातच शेतक-यांचे व्यापक हित झाले नसते काय? धरणे वाढवा म्हणणे व ती होणे काळाची गरज आहे हे खरे आहे. पण ती वाढुन जर सारे अशा चुकीच्या जलशोषक पीकांकडेच शेती वळवली जाणार असेल तर कितीही धरणे बांधली तरी ती कमीच पडतील हे आपण कधी लक्षात घेणार आहोत?  पाण्याच्या वितरणाचे गरजाधारीत शास्त्र आपल्याला समजावून घेत पीकपद्धतेचेच आगाउ नियोजन करता आले नाही व ते शेतक-यांचेही प्रबोधन करत पसरवता आले नाही तर आजवर शेतकरी आत्महत्या करत होते...पण आता शेतीचीच हत्या केली जाईल.

अजुनही वेळ गेलेली नाही. सर्वप्रथम पाण्याच्या उपलब्धतेनुसार महाराष्ट्राचे पीक नियोजन करायला हवे. जलशोषक पीके मर्यादित केली जायला पाहिजेत. तरच पाण्याचे सुयोग्य वितरण होत अधिकाधिक क्षेत्र पाण्याखाली येवू शकेल व भूजल पातळीही वाढण्यात मदत होईल. धरणे वाढुनही सिंचन क्षेत्रात त्या प्रमाणात का वाढ होत नाही यामागे अतिरेकी भ्रष्टाचार जसा कारणीभुत आहे तेवढाच जलशोषक पीकपद्धतीही कारणीभुत आहे हे शासनाने व शेतक-यांनीही समजावून घ्यावे लागणार आहे. अन्यथा पाण्याची समस्या सुटणे अशक्यप्राय आहे. यंदा ज्याप्रमाणे हजारो गांवांत प्यायलाही पाणी नाही तशीच स्थिती भविष्यातही राहील. किंबहुना अधिकाधिक भीषण होत जाईल. अर्थात शेतकरी समस्येचा हा एक पैलू झाला. आपल्याला अनेक पैलुंवर चर्चा करायची आहे ती पुढील भागांत.

 (क्रमश:)

-संजय सोनवणी
९८६०९९१२०५

15 comments:

  1. संजय ,
    आपला अभ्यासपूर्ण लेख वाचला.फार छान आहे.

    शेतकऱ्या ला सामाजिक बांधीलकी असते का नाही ? असतेच असे म्हटले तर चूक ठरणार नाही !
    बिल्डर सामाजिक बांधिलकीचा आव आणत असतो,
    पण शेती हा माणसाच्या उत्क्रांतीतला एक महत्वपूर्ण घटक आहे. तिथे अशी सोंगे वठवण्याचे प्रयोजन नसते.
    झटपट श्रीमंती हा एक भाग वेगळा त्यासाठी स्वतंत्र चर्चा होऊ शकेल.
    मूळ मुद्दा असा आहे की खाण मालक निर्घृणतेने जमिनीची लाज काढत जमिनीची अब्रू वेशीवर टांगत त्यातून पैसे मिळवतो-
    ती जमीन त्याला मूळ रुपात कधीही परत मिळत नाही.स्वतः च्या आईला विकल्याचे पातक तो करत असतो.

    तसेच खताचा प्रचंड मारा करणारे आणि बेलगाम पाण्याचा वापर करून पैसा खुर्ची आणि सत्ता अशा दुष्ट चक्रात सापडणारे शेतकरी फार उशीरा जागे होतात !अशा निकामी खारवट जमिनी मी स्वतः पाहिल्या आहेत.अशा जमिनीत ट्रकने उपरी लाल माती लोचटपणे बाहेरून मागवून परत तसेच नगदी पिक घेण्याचा अट्टाहास करणारे मी पाहिले आहेत.
    कडवट शब्द वापरण्याचा दोष पत्करून असे म्हणावेसे वाटते की हा हावरेपणा म्हणजे निर्लज्जपणे आपल्या आईला धंद्याला बसवण्यासारखेच नव्हे का ?
    कोणताही कृषि तज्ञ असा सल्ला देणार नाही.इतके त्या जमिनीचे शोषण होत असते की दुसरी साधी उपमाच सापडत नाही.
    आत्महत्या करणारा शेतकरी हा कालव्यावर शेती करणारा नसल्यामुळे,तो एक वेगळाच वर्ग धरला जातो.
    पावसावर सर्व अर्थकारण असलेला शेतकरी वर्ग हा कायमच मिंधा असतो.
    निसर्ग,मनुष्यबळ ,सरकारी सबसिडी,असा सगळी कडून तो परतंत्र असतो !अशा महाभागाला अर्थ कारणात ,सत्तेच्या साठमारीत काहीच स्थान नसते !
    पैसा व्याजामुळे वाढतो - तसे जमिनीच्या आकारमानाबद्दल म्हणता येत नाही .ती आहे तितकीच राहाते.
    भाऊबंदकीत तिचे तुकडे होतात , खाणारी तोंडे वाढत असतात ! सावकारी पाश आणि घरातील जबाबदाऱ्या ! आणि एक दिवस तो
    जीवतोड मेहेनत करून जमीन कसणारा शेतकरी "भूमीहीन शेतकरी " या वर्गात जाऊन बसतो !
    आत्महत्या हा स्वतःची सुटका करून घेणाचा त्याला सुचलेला पर्याय असतो.
    तो आपल्या सर्वांचा पराभव असतो.
    आपल्याला आपण खुनी आहोत असे वाटले पाहिजे !

    ReplyDelete
  2. Sugarcane is lobby IS aware of the fact that they are doing unjustice to other farmers. The point is that THEY DONT CARE.

    ReplyDelete
  3. श्री संजय ,

    आपण दुसऱ्या दिशेने जाण्याचा प्रयोग करून बघू या !

    साखर लॉबी - त्यांनी जे केले ते देशाच्या भल्यासाठीच केले - शेतकरी वर्गासाठी केले.एकुणात देशाची सेवाच केली.
    कस वाटत ?सामना चित्रपटातील निळू फुलेच आठवतो ना ? पाणी अडवलं - कालवे आले. नद्या अडवल्या - धरणे बांधली .
    त्यांच्यात सहकार वाढवला. उसाला हमी भाव दिला. बाय प्रोडक्ट सुरु केले.घरे गोठे फुलले - शाळा दवाखाने झाले.
    सगळ चित्र कस रंगीत आणि छान वाटू लागत !
    आम्ही केल !आम्ही केल ! आता याचं रक्षण आम्हीच करणार ! तुम्हाला काही काळात नाही.आम्हालाच सर्व समजते.
    आता ते एक झालं ! आपण विचार करू.

    दुसऱ्या बाजूने !- सहकार आला .सहकारी बँका आल्या , पतपेढ्या आल्या.नवीन वेगवान योजना,पैसा जमा करणाऱ्या योजना -

    तिसऱ्या बाजूने - हाहाः कार झाला -बँका बुडाल्या - पतपेढ्या झोपल्या -नवीन वेगवान योजनांनी प्रचंड पैसा खर्च झाला -आडाखे चुकले असे म्हटले गेले !
    जनतेने आम्हाला समजून घ्यावे असे म्हटले गेले. प्रांताची अर्थ व्यवस्था बिघडली ! शेतकरी प्रश्न विचारू लागले .हे कधी होत नव्हते !
    शेतकऱ्याला कामगार वर्गासारखे रस्त्यावर उतरावे लागले. ( त्यानंतर शिक्षकांना आणि गुरुजनाना ) एके ठिकाणी शिवण उसवली आणि उसवतच गेली -
    तो नेत्तृत्वाचा दोष का शेतकरी वर्गाच्या अवाजवी आकांक्षा ? नेते मंडळीच त्यांनीच बांधलेल्या यंत्रणेचे बळी ठरले.

    या सर्व उलाढालीतून खूप लांब परंपरागत शेती करणारा शेतकरी हा तर वेगळाच !
    त्याच्या वाट्याला कालवे आले नाहीत,योजना आल्या नाहीत-तो पिढ्यांन पिढ्या आकाशाकडे डोळे लावूनच बसणारा.!
    त्याच्या वाट्याला त्याचे कौतुक करणारे नेतेही आले नाहीत - दिवस कोरडा रात्र कोरडी ,त्याचे बालपण तरुणपण सदासर्वदा दुष्काळाने शुष्क झालेले!
    उरलेसुरले सावकारांनी लुबाडलेले - असा त्याचा संसार - त्याला हिरवळ कधी दिसलीच नाही.
    बैलांची खिल्लारी जोडी आणि गळ्यातली घुंगरांची किणकिण , दाराशी तुळशी वृंदावन ,हे फक्त मराठी चित्रपटात त्याला दिसले - ते त्याच्या वाट्याला कधी आलेच नाही !
    शेताचे तुकडे होत गेले - खाणारी तोंडे वाढत गेली - आयुष्याचे दान चुकीचेच पडत गेले असे म्हणत तो दैवाला दोष देत झुरत राहिला.
    आता संजय साहेब- माझा मुद्दा असा आहे की हा जो दैवाला दोष देणारा शेतकरी आहे त्याचे काय चुकले ? त्याचा गुन्हा काय ?
    आज महात्मा फुले असते तर त्यानी या कालवे बहाद्दर शेतकऱ्यांना या दुर्दैवी शेतकऱ्यांचे गुन्हेगारच मानले असते न ?
    या चरबी वाढलेल्या सहकारी शेतकऱ्यालाच या दुर्दैवी शेतकऱ्यांच्या अश्रू साठी जबाबदार धरले पाहिजे नाही का ?
    फक्त स्वतःच्या पोळीवर तूप ओढून डोळ्यावर झापडे ओढायची ही वृत्ती कुणी शिकवली ?
    सहकाराने ?
    संजयजी तुम्हाला काय वाटते ?

    ReplyDelete
  4. शेती हिरवीगार असते.
    शेती दिसायला छान दिसते.
    डोलणारी पिके आपल्यालापण डोलायला लावतात .
    शेतातल्या झाडाच्या सावलीला खाल्लेली झुणका भाकर,वाऱ्याच्या झुळके बरोबर
    शेतात काम करणाऱ्या बायकांची ऐकू येणारी कुजबुज,
    हे विचार किती रम्य वाटतात.
    आणि वास्तव ?वास्तव किती भीषण आहे !
    शहरी जीवनात ,नागरी जीवनात खेड्यांच्या बाबत एकप्रचंड कुतूहल असते.

    खेड्यामधले घर कौलारू ,
    आयुष्याच्या पाउल वाटा किती तुडविल्या येता जाता ,
    परी आईची आठवण येता मनी वादळे होती सुरु ,
    खेड्यामधले घर कौलारू
    अशा अद्भुत ओळीनी तर खेड्यांबद्दल आकर्षणच निर्माण केले होते,
    पण हे दूरचे डोंगर जवळून फारच वेगळे दिसू लागतात .
    तिथेपण स्वार्थ आणि सत्तेचे खेळ चालतात ते पाहिल्यावर सगळे स्वप्नच भंगल्यासारखे होते !
    जवळ जाताच दिसणारा कर्ज बाजारीपणा ,जातपात,अंधश्रद्धा ,रोगराई,यांनी मन हेलावून जाते.
    का या लोकांनी असे स्वप्नवत असलेल्या खेड्यांची वात लावली ?
    कुणी दिला त्यांना हा अधिकार ?
    या सत्तेच्या भाऊगर्दीत कुणालाच या शेतकऱ्यांचे चार शब्द ऐकू येत नाहीत का ?



    ReplyDelete
  5. स्वरदा म्याडम ,
    आपण सर्वांनी स्वप्नाळूपणा सोडून प्रत्यक्ष संकट समजावून घेऊया का ?
    उरलेल्या शेतकरी वर्गाला शेती सोडून द्यावी असे का वाटत असेल ?
    सहकाराचा भस्मासुर आता त्याच्या जीवावर उठला आहे का ?
    सहकार हे वरदान ठरण्यापेक्षा शाप ठरत आहे का ?
    वाढते नागरीकरण , त्यातून गगनाला गवसणी घालणारे जमिनीचे भाव - शेतमालाच्या उत्पादनातील वाढती
    हुकुमशाही,केंद्रीकरण आणि छोट्या शेतकऱ्याच्या विषयीची अनास्था. अशा संमिश्र उदासीन वातावरणामुळे
    शहरालगतच्या शेतकरी वर्गाचा ओढा
    जमिनी विकण्याकडे असणे शक्य आहे.
    नवीन पिढीचा पोशाखी जीवन शैलीकडे असलेला कल काळजी वाढवणारा आहे.
    बिल्डर लॉबी हे पण बाळबोध आकर्षण ठरते आहे !

    ReplyDelete
  6. नम्र विनंती ,
    सर्वानी मराठीत लिहावे.
    सर्वांनाच वाचनाचा आनंद घेता .येईल
    दुसरी गोष्ट अशी की जे रोमन लिपी वापरतात त्यांच्या लिखाणात प्रचंड दोष निर्माण होतो.
    संजयजी,
    आपण सर्वाना सोपे जाईल अशी काहीतरी मराठीत सहभाग करण्याची युक्ती लवकर लवकर सांगा- प्लीज !
    गुगल मध्ये सेटिंग मध्ये जाऊन हे बदल समजावून सांगता येतील ! दुसरी भाषा वापरण्याचा पर्याय आहे तिथे
    जाऊन मराठी असा खुलासा केल्यास मराठीत लिहिता येते.अगदी शेवटी आउट गोइंग मेसेज एनकोडिंग या पर्यायाला निवडून पुढे जावे.
    मलातरी तुमच्या ब्लोग वर इथे कुणाचेच इंग्लिश चांगले वाचण्या इतपत भारदस्त वाटले नाही.सगळा धेड गुजरी प्रकार ! त्यापेक्षा मराठी काय वाईट ?
    मांडणी आणि व्याकरण ,लेखनात चुका करून इंग्रजी लिहिण्यापेक्षा मराठी लिहावे.
    मातृभाषेचे प्रेमपण साजरे करता येईल.
    नव बौद्ध - त्यांचा धर्माभिमान जागृत ठेवण्यासाठी त्यांच्या सोयीसाठी त्यांनी पाली किंवा अर्धमागधी मध्ये लिहावे.असे सुचले म्हणून सांगते.
    तसा पर्याय देण्यास गुगलला भाग पडावे.त्यांना तुमची ताकद काय आहे त्याची झलक दाखवावी .
    ब्राह्मणांना ठेचलेच आहे.
    मराठा तर आपलेच आहेत.
    गुगलला सरळ करायला काय ? कीस झाडकी पत्ती !

    ReplyDelete
  7. संजयराव ,
    तुमच्या ब्लोगवर कुणीच काही लिहित नाही.शेरेबाजी पण करत नाही .
    तुम्ही बाजूला फेकले गेलेले वाटता !
    आज सर्वत्र खेडेकर आणि अनिता पाटील यांचा गौरव होतो आहे !
    मुंबईत त्यांची कामगिरी प्रचंड महान दिसते आहे .
    सर्व जण घरात निवड टिपण ,करणाऱ्या गृहिणी वाटतात .
    तुमच्यावर अशी वेळ का आली , तुमच्या नावावर इतकी पुस्तके आहेत तर ब्लोगला वाचकवर्ग का नाही ?

    जरा विचार करा .तुम्ही चांगली सांगत सोडली आणि जानव्यांची सांगत धरली .
    आता तुमचा ब्लोग कुणीच वाचत नाही.
    आता कितीही विषय बदला . तुमचे रहस्य सर्वाना कळले आहे !
    आता हे सगळे बंद करा.आपला गाशा गुंडाळा .


    ReplyDelete
  8. सर,
    आपल्या लेखनाचा सर्व थरातील लोकांना वैचारिक फायदाच होत राहतो.निरोगी समाज मनासाठी आपण एक अभ्यास जाहीर करावा.आपण सुचवता तसे जन नागरण कसे करायचे ?
    आपण म्हणता तसे पीक नियोजन करण्यासाठी जनजागृती आवश्यक असेल पण ते काम कायद्याने करावे लागेल अशीच जर परिस्थिती असेल तर तो कायदा कोण करणार ? केंद्र का राज्य ?
    अशा कायद्याला सरकार उद्युक्त होईल का ?लोकायुक्त बिलाचे काय झाले ?त्यामुळे आपण सुचवता तसे जलशोषक पीक किती प्रमाणात लावायचे हे कसे शेतकरी वर्गाच्या गळी उतरवणार ?
    आजच्या नेते मंडळींच्या आपण किती जवळ गेला आहात ते मला माहीत नाही. नेते ही आता एक जात झाली आहे.त्यांच्या सारखा उद्धट वर्ग माझ्या पहाण्यात नाही.

    पक्ष कोणताही असो,त्यांना प्रचंड माज असतो,त्यांना फक्त हायकमांड माहीत असते.इतर बाबतीत ते स्वतःच्या मस्तीतच असतात हा माझा अनुभव आहे.अशा लोकांच्या तोंडात लोक कल्याण , समाजहित ,
    समाजाभिमुख निर्णय प्रक्रिया वगैरे शब्द निवडणुका तोंडावर आल्यावर घोळू लागतात .आणि सत्ता आल्यावर - निवडून आल्यावर हवेत विरून जातात.

    आपल्याकडे लोक प्रतिनिधीना कसलाच धाक नाही.त्यांचे काम पसंत नसेल तर त्यांना परत बोलावण्याची सोय नाही.त्यांच्या विरोधातले कायदे ते कधीच करणे शक्य नाही .आणि बागाईत दार शेतकरी वर्गाची कातडी गेंड्याची असल्यामुळे ,ते हाय कमांडचे पण ऐकणार नाहीत.अशा वेळी आपण मांडता तो विचार नुसताच आकर्षक राहील - चर्चेसाठी गोंडस राहील - तो जरी संपूर्णपणे लोकहिताचा असला तरी त्याला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात अहमहमिका लागेल ! स्व.जयप्रकाशजी यांची संपूर्ण क्रांतीची भाषा करणारे लालू आणि मुलायम सध्या काय वागतात. - मायावती काय वागते ? तोच प्रकार बाबा आणि आबा यांचा आहे. प्रत्येकाची चरायची कुरणे ठरलेली आहेत व. जंगल राज प्रमाणे ,माफिया राज प्रमाणे एकाने दुसऱ्याच्या हद्दीत घुसायचे नाही.हेच आजचे यशस्वीपणे सत्ता राबवण्याचे एकमेव सूत्र आहे. समाज प्रबोधन ,सामाजिक व्यवधान असे अनेक शब्द ही हलकट नेते मंडळी सरसकट कबुतराना दाणे टाकावेत तसे आपल्यापुढे मुक्त हस्ताने रिते करत असतात !

    भारताइतकी लोकशाहीची खिल्ली कुणीही कुठेही उडवली नसेल ! आपले स्वात्र्यंतच असे टेबलावर बसून मिळालंय ! तलवारी म्यान ठेवण्याच्या अटीवर मिळालंय !

    आपण नेहमी जात पात या विषयावर लिहीत असता ते सर्व आम्ही आवडीने वाचतो.पण आपल्यातच ह्या ज्या नवीन जाती पडल्या आहेत त्या मात्र कदापि नष्ट न होणाऱ्या आहेत ! आर्थिक वर्गीकरणामुळे कामगार , शेतमजूर , शहरातील असंघटीत फ्लोटिंग पोप्युलेशन ,अर्धशिक्षित अकुशल वर्ग- त्यात खेड्यातून शहरात आलेला अकुशल तरुणवर्ग पण येतो.हा सर्व एका बाजूला आणि
    उत्तम उच्च शिक्षित तरुण मध्यम वर्ग,आय टी लेबर ,बँक कर्मचारी ,डॉक्टर,इंजिनियर , कन्सलटट हा उच्च मध्यम वर्ग आणि त्यापुढील सिनियर एक्झीक्युटीव्ह आणि सी.ई .ओ.आणि तत्सम वर्ग-मालकवर्ग आणि बिल्डर,सधन बागाईतदार ,श्रीमंत सहकार महर्षी अशी सरळ सरळ दोन तीन मुख्य गटात समाजाची विभागणी दिसून येते.

    भारतात कधीच क्रांती होणार नाही असे मी आपल्या ब्लोगवर कुणीतरी लिहिलेले वाचलेले स्मरते ते अगदी १०० % खरे आहे .
    यादवांची द्वारका श्रीकृष्णाला चक्क बुडवावी लागली हे रूपकात्मक अर्थानेसुद्धा आता भारतात घडणार नाही.आजचा भारत नको तितक्या प्रमाणातल्या अहिंसक तत्वज्ञानातून जन्माला आला आहे
    त्याला कणाच नाही.आत्मसन्मान तर कधीच नव्हता, भुक्कड संस्थानिकांच्या फौजा इंग्रजांनी पोसल्या होत्या त्यांचे क्षात्र तेज कधीच विकले गेले होते.त्या तलवारी कधीच म्यान झाल्या आहेत म्हणून तर असे हे पोळ मोकाट हिंडून देशभर लुटीचे राजकरण करत आहेत !त्याला सहकार चळवळ असे गोंडस नाव देत आहेत ! धन्य तो भारत देश !

    ReplyDelete
  9. Sanjay Sir ,
    After all the hectic research of this week I have arrived at the best solution to stop the downfall of our great maratha state and culture.
    the mantra is
    " LET US DIVIDE OURSELVES BEFORE DELHI DIVIDES AND RULES US ! "

    i think everyone knows the problem and the solutions.
    our leaders are pragmatic people and they must be thinking in the same way.
    hi daDA bABA AND aABA !
    maharashtra should be divided in three parts
    konkan , south western maharashtra and vidharbh plus marathwada.
    and should be named as
    AmraRashtra , SharkaraKhand, and Atmahatyanchal.
    Narayan Rane CM for AmraRashtra, AjitDada CM for SharkaraKhand
    Anyone from marathawada as CM for Atmahatyanchal.we are or were never ever interested in that part of the state.
    So there wo'nt be any problem.
    IS THIS NOT A SWEET SOLUTION FOR THE FARMERS OF SHARKARAKHAND ?

    ReplyDelete
  10. अश्या पोरकट सूचना कृपा करून करू नयेत ही विनंती.
    हा कुत्सित विनोद करण्याचा विषय होऊ शकत नाही,
    हा शेतकरी बांधवांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे.
    आपण २४ तास अन्न पाण्याशिवाय काढून बघा,म्हणजे आपणास जीवनाचा अर्थ कळेल कदाचित !

    ReplyDelete
  11. संजय सर ,
    आमचा सर्वांचा सरांच्या लिखाणाला भरघोस पाठींबा आहे !आपण आत्मपरीक्षण करायला सांगता आहात ते मात्र पटले नाही.
    शेतीला इंडस्ट्री चा दर्जा दिला गेला असेल तर ?
    तर मग तिथे सामाजिक बंधनांचा प्रश्न येतो कुठे ?
    खाजगी क्षेत्राकडून किती अपेक्षा असणार आहेत समाजाच्या ?
    अधिक गुंतवणूक , जास्तीत जास्त आधुनिक तंत्र आणि अधिक उत्पादन हीच त्रिसूत्री उत्पादनांचा तुटवडा कमी करेल !
    सरकारचे कर्तव्य आहे की पाण्याचा सुयोग्य वापर करण्याच्या
    नवीन पद्धतींच्या बाबत जागृती आणावी ! ठिबक सिंचन लोकांमध्ये लोकप्रिय करावे.
    यापुढे सरकारकडून रामराज्याच्या अपेक्षा करण्यात अर्थ नाही.सरकार हे भ्रष्टच आहे.याबाबत दुमत नाही.
    पुढच्या निवडडणुकीत त्यांना घरी बसवणे तुमच्या हातात असते - पण विरोधी पक्ष फक्त नागरी भागात स्थिर आहे !
    आणि शरद पवार सत्तेपासून दूर राहणार नाहीत .

    ReplyDelete
  12. सर
    आपण श्री विठ्ठलाच्या बाबत असे सारांशाने लिहिले आहे की विठ्ठल हा विष्णुरूप नसून,
    शिवरूप आहे.साधारणपणे अशा प्रकारचा आपला आशय आहे.
    आता समजा कुणीतरी ब्रिटीश लेखकाने जर सुरुवात केली -
    शिव छत्रपतींचे खरे वडील अमुक तमुक आहेत आणि सर्व मराठे रास्तपणे पेटून उठले ,
    त्या प्रकाराशी आपण हे आपले वागणे जुळवून बघा.

    वारकरी संप्रदायाने पांडुरंगाला ज्या रुपात पूजले आहे त्या रूपातच त्यांना तो आनंद घेऊ दे !
    जर दादोजीला शिवाजीचा बाप ठरवणे हे पाप असेल तर,
    आपणही पाप करत आहात .वारकरी तुमच्या कडे दुर्लक्ष तरी करतील किंवा
    तुम्हाला क्षमा तरी करतील तरीही तुमचे पाप दुर्लक्षिले जाऊ शकत नाही.
    आपण सर्व वाचकांची क्षमा मागितली पाहिजे.

    ReplyDelete
  13. युगे अठ्ठावीस विटेवरी उभा
    वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा
    पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा
    चरणी वाहे भीमा उद्धरी जागा

    ReplyDelete
  14. येई गे विठ्ठले माझे माउली ये
    माझे माउली ये
    निढळा वरी कर ठेउनी वाट मी पाहे

    आलीया गेलीया हाती धाडी निरोप
    पंढरपुरी आहे माझा मायबाप

    पिवळा पितांबर जैसा गगनी झळकला
    गरुडावरी बैसुनी माझा कैवारी आला

    विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी
    विष्णुदास नामा जय जय भावे ओवाळी

    ReplyDelete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...