Sunday, January 13, 2013

धोरणांचा दुष्काळ म्हणूनच पाण्याचा दुष्काळ!


प्रश्नोपनिषद (३)

चुकीच्या पीकपद्धतीमुळे महाराष्ट्रातील पाण्याची अवास्तव उधळपट्टी कशी होते आहे हे आपण गेल्या लेखात पाहिले. जेंव्हा आपण आपल्या अधोगतीसाठी शासनाला दोष देतो तेंव्हा आपणही कोठे चुकतो आहोत यावरही तेवढ्याच गांभिर्याने विचार केला पाहिजे. महाराष्ट्रात लोकांच्या स्मरणातुन आजही न गेलेला दुष्काळ म्हणजे १९७२ चा दुष्काळ. या काळात रोजगार हमी योजने अंतर्गत हजारो पाझर तलाव बांधून घेण्यात आले. सरकारी कामांतील भ्रष्टाचार व असंख्य लोकांनी फक्त हजे-या नोंदवत घेतलेला फुकटचा पगार (त्यावेळी तो सात रुपये रोज होता. सोबत सुकडीही मिळायची.) यामुळे पाझर तलावांचा दर्जा हीणकस झाला असला तरी पाझर तलावांत साठणा-या पाण्यामुळे भूजल पातळी वाढण्यात मदत झाली होती हेही नाकारता येत नाही. विहिरींच्या जलपातळ्या वाढल्या होत्या व तलावाआसपासच्या जमीनींत काही प्रमाणात बागायतही होवू लागली होती. पण पुढे जसे पावसाचे प्रमाण वाढले, दुष्काळ हटला, हे पाझर तलाव दुर्लक्षीत झाले ते झालेच. इतके कि आज असंख्य पाझर-तलाव अस्तित्वहीण झाले आहेत. या पाझरतलावांची देखभाल व सुरक्षितता पाहण्याची शेतक-यांची जबाबदारी नव्हती काय? प्रत्येक गांवाला आपपले जलधोरण ठरवता येत नव्हते काय?

उदा. हिवरे बाजारच्या लोकांनी गांवच्या बहात्तरला बांधलेल्या पाझर तलावाचे १९८२ साली पुनरुज्जीवन केले...तसा आदर्श अपवादात्मक गांवे वगळता कोणीही घेतला नाही. त्यात वाढ करण्याची बाब तर दुरच राहिली. पुरातन बारवा, ज्या पिण्याच्या व दैनंदिन वापराच्या पाण्याचे हक्काचे साधन होत्या त्या मात्र पद्धतशीरपणे नष्ट करुन टाकल्या. अनेक बुजवल्या गेल्या तर बाकी दुर्लक्षामुळे वापर-योग्य राहिल्याच नाहीत. त्यामुळे स्थानिक जलसंधारण दुर्बळ होत गेले व त्याउलट धरणांच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची प्रवृत्ती बळावत गेली. नळाचे पाणी आले म्हणताच पुर्वीच्या विहिरीही गायब केल्या जावू लागल्या.

महात्मा गांधींनी श्रम प्रतिष्ठेला अपार महत्व दिले. पण आमचा ग्रामस्थ शेतकरी मात्र कायमच्या दुखण्यावर सोपे उपाय शोधत बसला. श्रम हे शेतक-याचे प्रमूख वैशिष्ट्य...पण नव-संस्कृतीची लागण झाल्याने आपल्याच हक्काचे जलस्त्रोत तो हरपून बसला. याचा फटका असा बसला कि छोटी-मोठी धरणे वगळता उर्वरीत क्षेत्रांतील पाणी वाहून जायला लागले. प्रत्येक गांवाने "पाणी अडवा-पाणी जिरवा" हे धोरण राबवले असते तर कदाचित महाराष्ट्राची आजची परिस्थिती निर्माण झाली नसती. उलट आदर्श गांव योजनांचा गैरफायदा तर घेतला गेला पण त्यातुन हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच गांवे निर्माण झाली. म्हणजेच हा जल-प्रश्न आपण हातानेच निर्माण केला कि नाही? याला फक्त शासनच जबाबदार आहे काय?

पुढा-यांना हे माहित नाही काय? पण "आम्ही खातो-तुम्हीही खा...फक्त मते आम्हाला द्या..." या समाजविघातक प्रवृत्तीमुळे प्रश्न हे कायमस्वरुपी सोडवण्यासाठी असतात याचे भान ना लोकांना राहिले ना शासनाला. प्रश्नांच्या जंजाळात दिवसेंदिवस आपण एवढे अडकत चाललो आहोत हे समजत असुनही एकही प्रश्न सोडवायचाच नाही असा निर्धार जसा शासनकर्त्यांनी केलाय तसाच तो लोकांनीही केला आहे. मग इकडॆ पाणी नाही...तिकडुन सोडा...सोडत कसे नाही...कालवे फोडू...आमच्या धरणातून कसे पाणी सोडता...पाहून घेऊ...ट्यंकर पाठवा...पाठवत कसे नाही...या संघर्षाने उग्र रूप धारण करायला सुरुवात केली आहे. यावरुन दंगली होण्याचा दिवस फार दुरचा नाही. येत्या काही महिन्यांतच त्याची चुणूक दिसेल अशी रास्त शंका येते.

पाण्याची गरज काहे फक्त शेतीलाच नाही. शहरांना पिण्यासाठी तर उद्योगांना आपापल्या प्रक्रियांसाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज असते. आता शहरांनी स्वत:च्या पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र धरणे बांधावित असे जलपुरवठा मंत्रीच वावदूक सल्ले देत आहेत. अहो, शहरे प्रमाणाबाहेर वाढू कोणी दिली? शहरे वाढतील तर पाण्याची गरजही वाढणार हे न समजण्याएवढे नियोजन खात्याचे लोक बिनडोक होते कि काय? नवीन गांवे महानगरपालिकांच्या हद्दीत आणतांना व बांधकामांना धडाधड परवानग्या देतांना त्यांनाही पाणी पुरवावे लागेल...ते आणायचे कसे आणि कोठुन हा प्रश्न का नाही पडला? नवी धरणे बांधायची म्हणता, तर त्यसाठी जागा आणनार कोठून? समजा आणली तर लगेच पर्यावरण वाद्यांपासून ते प्रकल्पग्रस्त आंदोलने करत उभे ठाकतील...दहा वर्षात होणारे काम पन्नास वर्षांत होवू देणार नाहीत हे काय यांना माहित नाही कि काय? नर्मदा प्रकल्पाचे उदाहरण डोळ्यासमोर आहेच ना?

गरज होती ती सुरुवाती पासून विकेंद्रीकरणाचे धोरण राबवण्याची. ठराविक शहरेच फोफावू दिल्याने गुन्हेगारीपासून ते बकालीकरणाच्या सर्वच समस्या पुढे ठाकल्यात...पण महत्वाची अहे ती पाणी समस्या. एकटे पुणे शहर गेल्या अवघ्या दहा वर्षांत २५.३०% वाढले आहे...त्यात नवी २८ गांवे महानगरपालिकेच्या हद्दीत घेण्यात आली आहेत. आणि खडकवासला धरणातून जादा पाणी सोडता येणार नाही असे अजित पवार म्हणतात! यावरून शहरेही पाणीसंकटांच्या दाय-यात येत आहेत हे स्पष्ट दिसते. अशा स्थितीत अजुनही कोणत्याही शहराची कमाल वाढ निश्चित करुन त्यावर एक इंचही बांधकाम करता येणार नाही हे धोरण कठोरपणे राबवण्याची वेळ जरी कधीच टळली असली तरी, किमान आतातरी तातडीने धोरण ठरवून ते राबवलेच पाहिजे. अन्यथा जी दशा आज ग्रामीण महाराष्ट्राची आहे तीच शहरांची होणार यात शंका बाळगण्याचे कारण नाही.

हीच बाब उद्योगधंद्यांनाही लागू पडते. आज महाराष्ट्रातील पाण्याच्या दुर्भिक्षामुळे अधिक पाणी लागणारे उद्योग महाराष्ट्र टाळत आहेत. जे आहेत ते "जय महाराष्ट्र" करण्याची शक्यता आहे. उद्योगधंद्यांचेच केंद्रीकरण झाल्याने जलस्त्रोतांवर अवाढव्य ताण आधीच पडला आहे. पश्चिम महाराष्ट्र व नागपुरचा परिसर काही प्रमाणात सोडला तर अन्यत्र उद्योगांचा दुष्काळ आहे. हा दुष्काळ हटवण्यासाठी शासनाकडे कसलीही योजना नाही.

 यंदा दुष्काळ आहे हे अर्धसत्य आहे. पावसाने ७०-७५% ची सरासरी गाठलेलीच आहे. ही कमी असली तरी एवढी कमी नाही कि ज्यामुळे अवघा महाराष्ट्र दु:ष्काळात होरपळू लागावा. तरीही गेल्या पन्नास वर्षांतील हा सर्वधिक भिषण दुष्काळ आहे हे जेंव्हा केंद्रीय कृषिमंत्रीच सांगुन मानवनिर्मित पापाचे खापर निसर्गावर फोडतात तेंव्हा आश्चर्य वाटते. आपण जलसंधारणात पुरते फसलो आहोत हे कबूल करत जुन्या चुका सुधारणार कोण? धोरणांचा व ती राबवण्याचा दु:ष्काळ ज्यांनी निर्माण केला तेच आजच्या दु:ष्काळाला जबाबदार नाहीत काय? थोड पाउस कमी पडला कि केंद्र सरकारकडुन दु:ष्काळी प्यकेजेस मंजूर करून आणायची आणि येथे मिरवायचे हे धंदे कसे थांबणार?

नव्या धरणांच्या कामांत प्रचंड प्रमाणावर भ्रष्टाचार झाला हे सर्वांना माहितच आहे. तो अक्षम्य आहे हेही खरे आहे. भ्रष्टाचा-यांना तुरुंगांत डांबले गेले पाहिजे हा जनक्षोभही रास्त आहे. ही धरणे पुर्ण व्हायची तेंव्हा होतील पण धरणे आली रे आली, कालव्यांतुन पाणी यायला लागले कि लागले, बव्हंशी शेतकरी उस-द्राक्षादिंचेच उत्पादन घ्यायला लागणार आणि बहुतेक शेतकरी वर्ग पुन्हा कोरडवाहू शेतीलाच जुंपलेला राहणार हीसुद्धा काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणजेच या धरणांमुळे पुन्हा या जलशोषक उत्पादनांचा विस्फोट होईल आणि पुन्हा पाण्याच्या शोधात दाही दिशा आहेतच! असे न होवू देण्यासाठी काय धोरण आहे आपल्याकडे?

यासाठी मान्सून सुरू होण्याआधीच पीकवितरण धोरण जाहीर करुन पीकक्षेत्र निश्चिती करुन त्या-त्या क्षेत्रात तीच पीके कशी घेणे बंधनकारक राहील याबाबत कायदे करावे लागतील. पण यासाठी सरकारची मानसिक तयारी आहे काय? नसेल तर पुर्वीच म्हटल्याप्रमाने कितीही धरणे बांधली तरी पाणी समस्या सुटनार नाही. तशी अपेक्षाही करता येत नाही. त्यासाठी सर्वप्रथम पाण्याचे जुने स्त्रोत जीवंत केले गेले पाहिजेत. बुजलेले पाझर तलाव ते बारवा लघू पातळीवरचे जलसाठे पुन्हा कसे बनवता येतील हे पाहिले पाहिजे. पीकपद्धतीत कायदे करुनच संतुलन साधले गेले पाहिजे. निसर्गत: येथील भुवैशिष्ट्यांना योग्य अशी महाराष्ट्राला जी पीकवरदाने दिलेली आहेत त्यातच सम्म्रुद्धी कशी आणता येईल यावरही भर दिला गेला पाहिजे. शहरांच्या वाढीची अंतिम मर्यादा ठरवत लोकसंख्येचे वितरण महाराष्ट्रभर संतुलित करायला पाहिजे.

पाणी ही मुलभूत गरज आहे. त्यासाठी आपण सर्वस्वी निसर्गावर अवलंबून आहोत. १६३० च्या महाराष्ट्रातील भिषण दुष्काळात अवघा महाराष्ट्र उजाड बनला होता...माणुस अन्नाअभावी मेलेल्या प्राण्यांना आणि जर तेही नाही मिळाले तर मेलेल्या माणसालाही खाऊ लागला होता....निसर्गाच्या प्रकोपाचा प्रहार कोणत्याही वर्षी पडु शकतो व होत्याचे नव्हते करू शकतो. दरवर्षी जूनमद्ध्ये पाऊस पडॆलच या आशेवर नेते-लोकप्रतिनिधी जगतात...लोकांनाही जगायला भाग पाडतात...! निसर्गाच्या भरवशावर जगण्याची आमची आदिमानवाची रीत आम्ही एकविसाव्या शतकात प्रवेशुनही सोडायला तयार नसू तर आम्ही खरेच प्रागतिक झालो आहोत असे म्हनण्याचा आपल्याला अधिकार काय?

नेते तर जागे होणार नाहीत...पण आम्हालाच जागे व्हायला कोणी अडवले आहे काय?

(क्रमश:)

-संजय सोनवणी
९८६०९९१२०५

24 comments:

  1. संजय जी, मी आपल्या लेख मालेचा नियमित वाचक आहे एकाच वर्णन करू शकतो अतिशय सुंदर नेटक्या शब्द मध्ये आपण विविध विषयांवर लिहिता, सखोल अभ्यास असतोच असतो, समतोल असतो, आणि मुद्दे थेट भिडतात. दुख एका गोष्टीचे वाटते कि आपल्या सारखे लोक कमी आहेत समज मध्ये. राज्यकर्ते असे आहेत, कि त्यांचे त्यांना माहित नाही. जनतेला कशाची काही पडलेली नाही. दर ५ वर्षांनी मताचा जोगवा मागायचा आणि मग पुढे धु धु धूत बसायचे . इतकी अनागोंदी, निराशाजनक परिस्थिती समज मध्ये का आहे असा वेळोवेळी प्रश्न पडतो ? आपण भारतीय तसेच आहोत कि खरोखर समाजाला ग्लानी आली आहे ? ओवेसी , ब्रिगेड, स्त्रियांवरचे अत्यचार, कटियार तोगडिया , आणि इतर स्वार्थी राजकारणी बघितले तर आशादायक का दिसत नाही बाहेर ? ह्या सगळ्या गोष्टी ला काय कारणीभूत असेल ? खरा सांगायचा तर माझा गोंधळ उडाला आहे/

    ReplyDelete
  2. श्री संजय जी ,
    आपण आघाडीचे ब्लोग चालवणारे लेखक आहात !
    आपण अतिशय योग्य वेळी योग्य विषय निवडला आहे.
    कारण सध्या जानेवारी - २-३ महिन्यानी पाण्यासाठी दाही दिशा असे आपण सांगता त्याप्रमाणे सुरु होईल.
    पुण्यासारख्या ३-३ धरणांची पार्श्भूमी असलेल्या शहरातून यापूर्वीच पाणी ट्यानकर ने पुरवण्याचा धंदा सुरु झाला आहे !
    चांगला प्रस्थापित झाला आहे.त्याचे एक भागीदारीचे वाटप शास्त्र बनले आहे.- कुणाचे किती ते ठरले आहे.
    शेतकरी वर्गाचे पुण्यासारख्या शहरातून हितसंबंध निर्माण झाले असल्याने सर्व विकास आराखडे सुद्धा या लॉबीच्या
    प्राधान्याप्रमाणेच ठरत असतात ! त्यात पाणीवाटप सुद्धा आलेच !
    हे असे चालणारच - कारण शेवटी हा जातीसंघार्ष नसून - वर्ग संघर्ष आहे.
    आहेरे आणि नाहीरे असे ते रूप आहे.पाणी हि संपत्ती बनली आहे.हे जर लक्षात आले तर सर्व समजेल.इथे प्रश्न सोडविण्याचा फक्त आव आणायचा आहे.
    हा प्रश्न कधीच हाताबाहेर गेलेला आहे.
    एका वाक्यात सांगायचे म्हणजे प्रश्न निर्माण करणारेच कसे काय प्रश्न सोडवणार ?त्यांचे हितसंबंधच जर त्यात
    गुंतले आहेत तर ते अरेरावी करणारच !.

    पाणी अडवा पाणी जिरवा वगैरे मोहिमा हा यापुर्वी कृतीशील राजकारणाचा भाग होता .आता ते इतिहासजमा झाले आहे.
    बारामतीकर आता पुण्याचे घाशीराम कोतवाल झाले आहेत .
    असाच काहीसा आराखडा सर्व शहरे आणि परिसराला ;अगु होतो आहे.
    पूर्वे किल्ले हे सत्तेचे केंद्र असत.आता पाणी स्त्रोत हे सत्तेचे केंद्रबिंदू ठरणार आहेत .
    सत्तेत असलेल्यांची समन्वयाची भूमिका असणेच शक्य नाही त्यामुळे आअपन अधोरेखित केल्याप्रमाणे
    पाणी या विषयावरून दंगली आणि सत्ताबदल सुद्धा होऊ शकतो.

    ReplyDelete
  3. सत्ताधारी जणूकाही फक्त हातात गुडगुडी आणि हुक्का घेऊन किल्ल्यातून बसून देश चालवतात असा भ्रम करून घेणे हे पण चुकीचे आहे.
    एक प्रवाह असा दिसतो आहे की जे काय पाण्याच्या बाबतीत घडते आहे त्याला सरकारच जबाबदार आहे.
    ते कीतपत खरे आहे.? आताच आपण सर्वपक्षीय सर्वेक्षण घेतले आणि प्रत्यक्ष पाणीसाठे आणि त्यांचे सोडले जाणारे प्रमाण समजावून घेतले तर ?
    २४ तास चालणाऱ्या बातम्यांच्या च्यानल वरून सरकारी पी आर ओ नी आणि विविध संबंधीत खात्यांनी जर सर्वपक्षीय सर्वेक्षण आत्ताच दाखवायला सुरवात केली तर विरोधी पक्षांची तोंडे आत्तापासूनच बंद राहतील
    उन्हाळा सुरु झाल्यावर तोंडाला कोरड पडणारी आकडेवारी जाहीर केली जाते आणि त्यामुळे जे प्रक्षोभक जनमत तयार होते त्या सर्व कटू प्रसंगाला टाळण्यासाठी,
    यामध्ये आताच सरकारने पुढाकार घ्यावा .कारण आजकाल मिडिया हे एक प्रभावी माध्यम धरले जाते.
    ते दुधारीशस्त्र आहे !
    सत्तेच्या राजकारणात त्याचा फटका दोन्ही बाजूना बसू शकतो !
    प्रश्न पाण्याचा आहे का सत्तेचा ते आधी ठरवायला पाहिजे .
    आपल्यासारख्या जागृत समाजमनाचा वसा घेतलेल्या विचारवंतानी - आहे त्या पाणीसाठ्याचे तत्काळ रक्षण करण्याची मागणी केली पाहिजे. त्या साठ्यांच्या येत्या ४ महिन्यातील वाटपाची रूपरेषा पारदर्शकता राखत सर्वांसमोर ठेवली पाहिजे.पेपरातून हा मुद्दा आकडेवारी सकट सर्वदा लोकांसमोर आला तर गैरसमज कमी होतील.
    आत्ता नागरी विरुद्ध ग्रामीण असे जे स्वरूप दिले जात आहे त्याचा खुलासा केला गेला तर संघर्ष सौम्य होत जाइल असे वाटते.
    सध्या जे सरसकट बागायती शेतीवर पाणी वापरातील उत्श्रुंखलतेचे खापर फोडले जाते त्याबद्दल पण थोडे लिहावेसे वाटते.
    ठिबक सिंचन पद्धती ही अनिवार्य केली पाहिजे.पिकांची निवड पण त्याला साजेशी केली पाहिजे.
    शहरांमधून होणारी पाणी गळती थांबवली पाहिजे.त्याला साधारणपणे स्थानिक पाजाकीय कार्यकर्त्यांचा अभयहस्त असतो हे उघड सत्य आहे !
    सर्व पक्षांनी ,सर्व जातींनी जमातींच्या प्रवक्त्यांनी सजगपणे प्रतिबंध केला पाहिजे !

    ReplyDelete
  4. तुमचा लेख चांगला असला तरी आमच्या अनिता इतका ग्रेट अजिबात नाही.
    तिच्या लेखनात जो एक वेगळेपणा बेधडकपणा आहे तो तुमच्यात नाही ,
    शेती हा तुमचा एरिया नाही . कशाला त्रास करून घेताय ?
    तुमची ती वेद आणि ब्राह्मणांची रेकार्ड वाजवत बस .छान असते.
    हे पिकापान्याच आमच्यावर सोडा
    जात पात आणि धर्मावर लेखन करून दमल्यावर आता तुम्हाला हे सुचते काय ?
    त्या वाघ्याचे काय झाले ?
    तुम्ही भटात राहून भट झाला आहात असे दिसते.
    सोडा हा धंदा !
    ते तुम्हाला कधी टांग मारतील ते समजणारही नाही तुम्हाला , वेळीच सावध व्हा !

    ReplyDelete
    Replies
    1. tuza area kay ? bhik magne ? kontya area madhe ?

      Delete
    2. मी तिथच हाय वरल्या अंगाला
      ह.मो.मराठे च्या घरापाशी काळेशार पाणी पीत पीत भिक मागतोय .खरच की ! समोर दिसतंय ते तुमीच हाय ना व ?
      अवो मग वळखतो कि आपण येकमेकांला , कसला एरिया नि कसलं काय ! अवो आपण उगाच कशापायी टणाटण उड्या मारायच्या
      गप गुमान बसू की ! तुमीबी खुस नी आमीबी .सगळ्यांना मिळतंय सगळ .!थोड माग पुढ होतच की हो बगा .
      ती पुण्याकडची माणस मह्णतात न - एकमेकान साह्य करू नि अवघे धरू सुपंथ .
      आता रागाऊ नगा तिळगुळ घ्या नि ग्वाड बोल बगू .

      Delete
    3. संजयजी वर जळायाच बंद करा....

      Delete
  5. संपूर्ण महाराष्ट्र आपला आभारी आहे !

    ReplyDelete
  6. संजयजी
    मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
    आपण आणि आपले अनंत हितचिंतक आणि
    या ब्लॉगच्या निमित्ताने एकमेकांना अप्रत्यक्ष माहित झालेल्या सर्व वाचकवर्गाला
    मनापासून शुभेच्छा !

    ReplyDelete
  7. संजयजी,
    आणि
    सर्व वाचकवर्ग,
    यांना ही मकरसंक्रांत नवीन यश किर्ती घेऊन येवो.
    तिळगुळ घ्या गोड बोल.

    ReplyDelete
  8. संजय सर ,
    आज मकरसंक्रमण !
    सर्वाना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !
    आपल्या ब्लोगवरील सुविचारानी एक अत्यंत तरल विचारविश्व आम्हाला लाभले आहे
    त्याबद्दल आम्ही आपण आणि आपला सूज्ञ वाचकवर्ग यांची अत्यंत आभारी आहोत !
    आजकाल दोन पिढ्यांमधील दरी भरून निघायला हे असे सण नक्कीच उपयोगी पडतील असे मला वाटते.
    विचारातील मतभेद काही काळापुरते बाजूला ठेवत
    प्रत्येक देशाच्या विभागातून वेगवेगळे सण आपण साजरे करत असतो.
    कुठे पोंगल तर कुठे संक्रांत - भाव एकच असतात.
    कधी होळी तर कधी रंगपंचमी .
    कधी नवरात्र तर कुठे दशहरा. माणसाला जन्मतः ओढ सत्शीलतेची असते.
    जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते आपल्याला प्रिय असते.
    आज आपण सार्वजण आपल्या बोलण्यातून , लिखाणातून आणि विचारातून असेच विचार मांडूया की
    आपल्या भारताची मान अजून ताठ होईल .

    ReplyDelete
  9. संजय सर ,
    मकरसंक्रांतीच्या निमित्त
    तिळगुळ घ्या
    गोड बोला

    ReplyDelete
  10. सर
    आपण श्री विठ्ठलाच्या बाबत असे सारांशाने लिहिले आहे की विठ्ठल हा विष्णुरूप नसून,
    शिवरूप आहे.साधारणपणे अशा प्रकारचा आपला आशय आहे.
    आता समज कुणीतरी ब्रिटीश लेखकाने जर सुरुवात केली -
    छत्रपतींचे खरे वडील अमुक तमुक आहेत आणि सर्व मराठे पेटून उठले ,
    त्या प्रकाराशी आपण हे आपले वागणे जुळवून बघा.

    वारकरी संप्रदायाने पांडुरंगाला ज्या रुपात पूजले आहे त्या रूपातच त्यांना तो आमम्द घेऊ दे !
    जर दादोजीला शिवाजीचा बाप ठरवणे हे पाप असेल तर,
    आपण पाप करत आहात .वारकरी तुमच्या कडे दुर्लक्ष तरी करतील किंवा
    तुम्हाला क्षमा तरी करतील तरीही तुमचे पाप शकले जात नाही.
    आपण सर्व वाचकांची क्षमा मागितली पाहिजे.

    ReplyDelete
  11. युगे अठ्ठावीस विटेवरी उभा
    वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा
    पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा
    चरणी वाहे भीमा उद्धरी जागा

    ReplyDelete
  12. येई गे विठ्ठले माझे माउली ये
    माझे माउली ये
    निढळा वरी कर ठेउनी वाट मी पाहे

    आलीया गेलीया हाती धाडी निरोप
    पंढरपुरी आहे माझा मायबाप

    पिवळा पितांबर जैसा गगनी झळकला
    गरुडावरी बैसुनी माझा कैवारी आला

    विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी
    विष्णुदास नामा जय जय भावे ओवाळी

    ReplyDelete
  13. Dear Sanjayji,
    To blame government completely is not really correct for this matter. Where were we in this matter? We also woke-up in 2013. Don't you think we are also responsible for this situation? To blame someone is easiest job.
    What we as responsible citizen of this country doing for it. Lets stop this blame-game and lets us come together find the solution for it.
    Thanks and regards

    ReplyDelete
  14. अनोनिमास ,
    आपल्या चांगुलपणाची कीव करावीशी वाटते !पाण्याच्या प्रश्नावर आपण कुठे होतो ?
    " आपण २०१३ मध्ये जागे झालो ! तुम्हाला वाटत नाही का की आपणपण या परिस्थितीला तितकेच जबाबदार आहोत ? दुसऱ्याला दोष देणे फार सोपे असते ."
    आणि बरेच असेच निरर्थक आणि आचरट !. हे मत व्यक्त करणारी व्यक्ती मूर्खच असली पाहिजे .किंवा भोळी भाबडी !
    तुम्ही आणि संजय सोनवणी यांनी जन्मभर जरी अशी चर्चा केली तरी त्यातून भोपळाच निघेल.
    आत्तापर्यंत अशा चर्चा स्वतःची लिहिण्याची हौस भागवण्या व्यतिरीक्त काहीही परिणाम करत नाहीत.
    सरकारच्या कोणत्याही विभागाने अशा चर्चांची दखल घेतलेली मला अजूनतरी आढळलेली नाही.म्हणूनच अशा लोकांनी जात धर्म पुराणे वेद अशा विषयांवर लिहावे .
    अधून मधून कविता करावी.परशुराम ,वामन कोण होता त्या कथा आजीबाईच्या प्रामाणिकपणे सांगाव्या.पण सद्य परिस्थितीवर उगीच अक्कल पाजळू नये !
    कारण तुमच्या सारख्याना रान मोकळ मिळते .म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काल सोकावतो - त्याचे वाईट वाटते.

    ReplyDelete
  15. hi anonymous ,

    just donot pass remarks asking for any basic changes in the style of presentation.

    sanjay is doing a fine job.

    we must forward our support to his approach .

    he is a master in handling these kind of studies.please donot give unwarrented advice .

    ReplyDelete
  16. कोण हे अतिशाहणं आहे जे संजय सरांना सवाल करतेय की
    फक्त सरकारला दोष देत बसू नये !
    म्हणजे या घोटाळ्यावर श्वेत पत्रिका काढावी लागली ,
    सरकारची अब्रू गेली,त्या विषयावर तुम्हीच आम्हाला विचारणार का की तहान लागल्यावर विहीर खणण्यापेक्षा
    तुम्ही आधीच का हा प्रश्न उठवला नाही !
    छान , अगदी काँग्रेस च्या पठडीतले उत्तर झाले हे.
    अहो तुम्हाला जनाची नाही तरी , मनाची तरी लाज आहे की नाही ?
    इतकी छान चर्चा रंगली आहे , निदान तुमचे तोंड तरी बंद ठेवा ना !
    एकदम चिडीचूप !

    ReplyDelete
  17. Dear All,
    To blame government "completely" is not really correct for this matter. Please do not exaggerate.

    ReplyDelete
  18. शांत व्हा,
    सगळ्यानी आपापल्या जागेवर बसा.
    प्रार्थना झाली ? म्हणा - डॉ .आम्बेद्करनचा विजय होवो !
    म.फुल्यांचा विजय होवो !
    शाहू महाराजांचा विजय होवो !
    सगळ्यांचे विजय झाले न नक्की ते बघा बर !
    चला तर -
    मुलानो ,मला एकेक करून सांगा बर .
    आपल्या देशात शेतकरी किती टक्के आहेत ?- - - अगदी बरोब्बर .शाब्बास !
    आता धरणे कोण बांधते ! - - - सरकार. शाब्बास अगदी बरोब्बर .शाब्बास !
    आता आपण नुसतीच साखर घेतो दाबेच्या डबे का अजून पण काही घेतो ताटात ?
    आणि त्या बरोबर काय काय जेवणात खातो ?
    ज्वारी बाजरी गुळ ,तेलबिया,तूप ,भात वरण ,आमटी ,भाज्या , अस बरच .
    म्हणजे आपल्याला महत्वाचे काय ?- - - - शाब्बास ! साखरेचा नंबर शेवटी !.पहिलातर नक्कीच नाही !
    हे कोण आले.सहकार महर्षी ! ते काय म्हणतात ?साखरेपासून काय काय बनते .?
    दारू ? नको रे बाबा .! आम्हाला साखर पण नको आणि दारूपण नको !.
    आणि त्यांना म्हणाव तुमचे हे धंदे बंद करा .जनतेच्या नावाखाली स्वतःचे खिसे भरणे थांबवा आता.
    आता पाणी सगळ्यात जास्त कशाला लागत ?- - - शाब्बास ! आता उसा ऐवजी काही दिवस आपण दुसर काहीतरी पिकवू या किरे माझ्या लेकरानो. ?
    वाचल की पाणी. !
    इथे आपल्याला आणि गुराढोराना प्यायला पाणी नाही अन या उसाची इतकी मिजास कशाला हवी आहे ?.
    आणि ते धरणं बांधताना पैसे कोण र खातय ? काही लाजलज्जा,शरम ?

    ReplyDelete
  19. संजय सर
    सध्याच्या अतिशय ज्वलंत विषयाची चर्चा घडवून आणल्याबद्दल
    मनापासून आपले अभिनंदन !
    ज्यांना सामाजिक जाण आहे त्यांना आपल्या लेखनाने अजूनच प्रोत्साहन मिळेल.
    आता फक्त जागृती इथपर्यंत न थांबता आपण कृती बद्दल पण मार्ग दर्शन करावे.
    आता ती जबाबदारी आपण घ्यावीत असे असंख्य वाचकांना वाटत असेल !
    आपण पुण्याच्या बाल गंधर्व किंवा दुसरीकडे आपले स्नेह्संवादाचे भाषण आखावे .परीसंवाद !
    त्यामुळे आम्हास त्यात भाग घेता येईल.

    ReplyDelete
  20. संजय सोनवणी,
    आपल्या लेखनाला कुणाची दृष्ट लागू नये हि सदिच्छा !
    आपण खूप कष्ट घेऊन लेख लिहिता त्याचे कौतुक करावे तितके थोडेच !
    आपण आपल्या लेखन कक्षेत तज्ञ आणि प्रतिष्ठित त्या विषयातील मान्यवर लोकांची साखळी तयार करावी
    आणि त्यांचा सल्ला आपण लेख लिहिण्यापूर्वी घ्यावा असे सुचवावेसे वाटते !
    आज ६५ वर्षे झाल्यावरसुद्धा म.फुले आंबेडकर ,वगैरे समाजसुधारकांच्या नावाचा नुसताच जल्लोष करत त्यांच्या नावाचे राजकारण केले जाते
    हे बघून वाईट तर वाटतेच पण भारतीय मनोवृत्तीचेपण आश्चर्य वाटते.

    लेखनाचा उद्देश काय असतो ?
    लेखनाचा आनंद, समाज प्रबोधन , सामाजिक वा राजकीय महत्वाकांक्षा ,नेतृत्व करण्याची मनीषा ?
    किंवा जातीयवाद, धर्म सहिष्णुता , समाजवाद किंवा कोणतेतरी तत्वज्ञान सांगण्याचा मंच ?

    प्रत्येकास समाजाच्या सर्व थरातून मान्यता लाभावी असे वाटत असते.
    आपली नोंद घेतली जाण्याचा आनंद वेगळाच असतो.
    तो प्रत्येकाने कधीना कधी शालेय जीवनापासून अनुभवलेला असतोच !
    ज्याला इलाईट क्लास म्हणतात त्यांच्या कडून आपले कौतुक होणे महत्वाचे आहे.
    त्यांची जात धर्म काय आहे याला महत्व नाही पण असा क्लास असतो हे मान्य करावेच लागते !
    ते अजून म्हणावे तितके होत नाही हे आमचे दुःख आहे.
    काही गोष्टी सध्या समाजात औट ऑफ प्रपोर्शन प्रदर्शित केल्या जातात .
    डॉ .आंबेडकर यांचा असा वापर होतो आहे - हे आपण कुठेतरी मांडले पाहिजे.

    ReplyDelete
  21. सर ,
    आम्ही आपल्याकडून परशुराम ,शैव जैन सांख्य असे बरेच काही वाचले .
    आता गोपालकृष्ण या विषयावर आपण लिहावे असे विनावावेसे वाटते आहे.

    ReplyDelete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...