Monday, April 22, 2013

बलात्कार: सामाजिक जबाबदारीचे काय?
निर्भया ते गुडिया...पाशवी बलात्कारांचा सिलसिला सुरुच आहे. चंद्रपुरच्या तीन आदिवासी मुलींवर बलात्कार  झाला...त्यांना ठार मारले गेले...अजून आरोपींचा तपास नाही. जनप्रक्षोभ होतो. लाखो मेणबत्त्या पेटतात...लोक लोकप्रतिनिधींच्या घरांवर धडका देतात...कठोरातील कठोर कायद्यांची मागणी होते...जनदडपणाखाली घाईत कायदे पारितही केले गेले...पण म्हणुन बलात्कारांची संख्या कमी होण्याचे नांव घेत नाही. रोज शरम...रोज निषेध...! आपण या प्रश्नाकडे अधिक व्यापक दृष्टीने पाहणार आहोत कि नाही?

कायद्यांमुळे गुन्हे कमी होतात हा एक भ्रम आहे. जेवढे कायदे अधिक तेवढ्याच प्रमाणात कोणत्या ना कोणत्या प्रकारचे गुन्हे वाढतांनाच दिसतात. बलात्कार हा स्त्रीयांविरुद्धचा सर्वात पाशवी गुन्हा आहे हे अमान्य करण्याचे कारणच नाही. परंतू प्रश्न असा आहे कि कठोरातील कठोर कायदे करुनही बलात्कार का होतात? कायद्याची भिती बलात्का-यांना नसते असा अर्थ त्यातून घ्यायचा कि काय?

आपल्याकडे समाजशास्त्र आणि मानसशास्त्र याचा पाया खुपच संकुचित राहिलेला आहे. जागतिकीकरणापुर्वी भारतीय मानसिकतेवर देव-धर्म आणि धर्माज्ञांचा पगडा मोठा होता. "पाप" या संकल्पनेची भिती कायद्यापेक्षा मोठी होती. तेंव्हा स्त्रीयांवर अत्याचार होत नव्हते असे नाही, परंतू पाशवीपणाला काही प्रमानात एक स्व-नियंत्रीत मर्यादा होती. जागतीक बलात्कारांचा इतिहास (A natural History of Rape) या क्रेग पामर लिखित ग्रंथात बलात्कारांची ऐतिहासिकता व त्याचे वर्तमान संदर्भातील घटनांचे समाजशास्त्रीय अंगाने विश्लेशन केले आहे. समाजातील धार्मिक व सामाजिक नीतिमुल्यांचा आणि बलात्कारांचा अन्वयार्थ त्यात काही प्रकरणांत लावण्यात आला आहे. भारतीय परिप्रेक्षात पाहिले तर बलात्कारांचा इतिहास मानवी संस्कृती इतकाच पुरातन आहे, परंतू त्याला "बलात्कार" समजले जात नसे एवढेच! परंतू वर्तमान युगात ज्या पद्धतीने पाशवीपणाची हद्द गाठली जाते तसे होत नसे एवढे मात्र निश्चयाने म्हणता येते.

आधुनिक युगात अपरिहार्यपणे धर्म व धार्मिक नीतिमुल्यांची पीछेहाट झाली आहे. नवीन काळाला सुसंगत अशी नवी नीतिमुल्ये संस्थापित करण्यात विचारवंतांना घोर अपयश आले आहे. जागतिकीकरणाच्या लाटेमुळे समाज एका नव्या संक्रमणातून जात आहे. या संक्रमनशील काळात घोर नैराश्य येणारे व त्यामुळे सामाजिक सुडभावना जतन करणारे कामपिपासा अधिक असनारे आपल्या नैराश्याला सोपे बळी शोधत असतात आणि ते बळी म्हणजे प्रतिकार करू न शकणा-या स्त्रीया-मुली असतात. दंगली होतात तेंव्हा स्त्रीयांवरील बलात्कारही वाढतात याचे कारण पुरुषाच्या लैंगिक आक्रमकतेत आहे असे समाजशास्त्रज्ञ म्हणतात. असे पुरुष मुळात मानसिक आजारी असतातच असे नाही. वर्चस्वाची संधी मिळण्याचीच काय ती बाब असते. आणि वाढत्या शहरीकरणांनी, बकालतेने, आणि वर्गविग्रहाची गती वाढल्याने जो एक मानसिक असंतोष उद्रेकत आहे त्याची परिणती अन्य हिंसक घतनांत जशी होते तशीच ती बलात्कारांतही होवू शकते.

बलात्कार म्हणजे अन्य काही नसून ती लैंगिक हिंसेची एक विकृत अभिव्यक्ती आहे हे लक्षात घ्यायला हवे.

चित्रपट अथवा पोर्न भलात्कारांना जबाबदार असतात असे काही समाज विचारकांचे म्हन्णे आहे. त्यात मुळीच तथ्य नाही असे नाही. लैंगिक विकृतींना खतपाणी घालण्याचे कार्य पोर्नोग्राफी करत असते. त्यातून तसेच वास्तव जीवनात करुन पहावे असे कोणाला वातत नसेल असे समजायचे कारण नाही. सभ्य व कायद्याच्या कचाट्यान न सापडनारे तशा पद्धतीचे बलात्कार पत्नी अथवा वेश्यांवर करत असतात हे अनेक सर्वेक्षणांतून समोर आले आहे. असे बलात्कार कायद्यापर्यंत सहसा कधी पोहोचत नाही...पोहोचले तरी त्यांचे गांभिर्य विशेष मानले जात नाही हेही एक वास्तव आहे.

पुरुषी अहंकार, वर्चस्ववादी प्रवृत्ती, अनैसर्गिक भोगेच्छा, जुलुमी वृत्ती आणि स्त्रीयांबद्दलची तुच्छता आणि व्यवस्थेबद्दलचे नैराश्य या सर्वांच्या एकत्रीततेतुन बलात्कारी मानसिकतेचा जन्म होतो. बलात्कारी प्रवृत्तीत अशा रितीने मानसशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय पैलू एकत्र आलेले असतात. समाजशास्त्र आणि मानसशास्त्र हे विषय आपल्याकडे फारसे अभ्यासले जात नाहीत. त्यामुळे त्यानुसार मग मुलांची व म्हणुण सर्वच समाजाची निरोगी जडन-घडन करण्याची बाब तर दुरच राहिली. मुलांची मानसशास्त्रीय वाढ पारंपारिक पुरुषप्रधानतेच्या जोखडाखाली होत आली आहे. स्त्रीयांबद्दलच्या विकृत्या कामभावनेला विधीवत मार्गांच्या व्यवस्थांच्या अभावातुनही वाढत जातात. संध्या मिळाल्या कि कोणीही बलात्कारी बनु शकतो हे आपल्या समाजाचे वास्तव आहे. नोकरी-धंद्यात जे लैंगिक शोषण होते तो बलात्कार नसतो काय?

मानसशास्त्रज्ञांच्या मते बलात्कार करणारा मनोविकृतच असतो असे नाही. साधारण माणसेही बलात्कार करू शकतात. स्वत:च्या मुली अथवा बहिणीही बलात्कारांच्या शिकार होत असल्याचे आपण वृत्तपत्रांतून अधुन मधुन वाचत असतो. प्रकट न होणा-या असंख्य घटना असू शकतील. त्यामुळे जी प्रकरणे उजेडात येतात त्याबद्दल फक्त आक्रोश करुन उपयोग नाही तर बलात्कार ही आपल्या आजच्या वर्तमान व्यवस्थेतील अपरिहार्य दोषांची अपरिहार्य परिणती आहे हे समजून दीर्घकालीन उपायांची आखणी करावी लागणार आहे. केवळ कठोर कायदे करून सोपे उत्तर शोधायचा हव्यास उपयोगाचा नाही तर मुळात असे घडणार नाही यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

पुरोगाम्यांना धर्म-मुल्यांबद्दल सहसा आदर नसतो हे खरे आहे. दुषित तत्वे...म्हणजे स्त्रीयांना दुय्यम स्थान व त्यांप्रती असनारी तुच्छता हा सर्वच धर्मांचा विकृत पाया आहे हे अमान्य करण्यात काहीच अर्थ नाही. आध्यात्मिक गुरु ते थोर साहित्यिकही अशा आरोपांत येतात तेंव्हा तर ते अधिकच खरे वाटू लागणे स्वाभाविक आहे. पण म्हणून मुल्यांकडे सर्वस्वी दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही. काही मुल्ये अशीही आहेत जी पाशवीपणाला (स्व-समाजांतर्गत तरी) आळा घालू शकत होती. धर्मतत्वे नाकारली तर मग जी नवीन मुल्यव्यवस्था निर्माण व्हायला हवी होती तशी तीही करता आलेली नाही. नीतिशास्त्रे त्यात सर्वस्वी अपेशी ठरली आहेत. "नीतिशास्त्रे ही नीतिविदांची बौद्धिक मनोरंजने करणारी साधने बनली आहेत..." असे नीतिविद जी. ई. मूर म्हणाले होते ते खरेच आहे. आजची अर्थव्यवस्था ही मुळात मानवी स्वातंत्र्याचा संकोच करत असून मुलभूत प्रेरणांना रोखण्याचे कार्य करत आहे. त्यातून निर्माण होत असनारी मानसिक कुंठा ही मानवी आदिम हिंसेला प्रवृत्त करत असते हे समाज-मानसशास्त्र समजावून घ्यावे लागणार आहे.

त्यासाठी समाजशास्त्र आणि मानसशास्त्राचाच आता आपल्याला आधार घ्यावा लागणार आहे. बलात्काराचे (आणि हिंसेचेही) मानसशास्त्र आपल्या वर्तमान समाजशास्त्रात/व्यवस्थेत दडलेले आहे. मानसिक कुंठेचे ते मानसशास्त्र शास्त्रीय पद्धतीने, व्यापक प्रमानात समजावुन घेत प्रतिबंधक योजना आखल्या गेल्या पाहिजेत. स्त्रीयांप्रतीचा दृष्टीकोन बदलण्यासाठी शालेय जीवनापासुनच विशेष प्रयत्न करायला हवेत. मानसशास्त्रीय समुपदेशन करणा-यांचीही संख्या वाढवत संभाव्य बलात्कारी (गुन्हेगारही) तयार होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे.

पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे समाजधुरीणांनी नवव्यवस्थेला हितकर ठरेल अशा नव्या मुल्यांचा नेटकेपणे शोध घेत त्या समाजात कशा रुजवल्या जातील हे पाहिले पाहिजे. त्यात काही धार्मिक मुल्ये आली म्हणुन काहीएक बिघडत नाही. पुरोगाम्यांनी आजवर जर नवी मुल्यव्यवस्था दिली नसेल तर ती स्वत:च शोधण्याचे स्वातंत्र्य मानवी समाजाला आहे. पण ती शोधली पाहिजेत आणि हरप्रकारे ती समाजमनात रुजवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत.

माध्यमांवरील जबाबदारी या परिप्रेक्षात खूप मोठी आहे. समाजात सर्वत्र वाईटच चालले आहे असा आभास निर्माण व्हावा...नव्हे तेच सत्य वाटू लागावे अशी परिस्थिती आहे. आपली शिक्षणव्यवस्था ही अतिरेकी स्पर्धेचे एक कारण बनली आहे. मुल्यशिक्षण हाही एक शिक्षणाचा गाभा असतो हे आपण पार विसरून गेलो आहोत. खरे तर आपण एक समाज म्हणून जगायला नालायक आहोत हे आपणच वारंवार सिद्ध करत असतो. व्यक्तीकेंद्री समाज कधीही बनू शकत नाही. किंबहुना तसे होणे हे समाजव्यवस्थेचे एक अपयश मानले पाहिजे. समाजकेंद्री व्यक्तीस्वातंत्र्य देनारा समाज ख-या अर्थाने अभिप्रेत असायला हवा.

बलात्कार ही समाजाच्या नैतीक जाणीवांची एक पराकोटीची अध:पतीत अवस्था आहे. बलात्कार कोणा एका विकृताने केला म्हणुन समाजाची जबाबदारी टळत नाही...किंबहुना ती वाढत असते याचे भान आम्हाला यायला हवे. आमच्यातुनच एक बलात्कारी निपजावा याची शरम स्वत:लाच वाटायला हवी. सामाजिक जबाबदारीचे भान आम्हा सर्व नागरिकांना येत नाही तोवर कितीही कडक कायदे केले तरी बलात्काराच्या घटना थांबणार नाहीत. एक दिवस आपण एवढे बधीर होऊन जावू कि बलात्काराच्या बातम्यांना आपण सोडा...माध्यमेही कच-याची पेटी दाखवतील एवढ्या त्या घटना वाढलेल्या असतील!

-संजय सोनवणी
९८६०९९१२०५

6 comments:

 1. बलात्काराच्या सर्व अंगाचा यात समावेश झाला आहे असे वाटत नाहि. लैंगिक इच्च्या तृप्त करण्याची इच्च्या नसताना बदला घेण्यासाठी, फूस लावून बलात्कार? आमिष दाखवून बलात्कार? ४-५ वर्ष संमतीने संभोग ठेवून नंतर भांडणे झाले कि लग्नाचे आमिष दाखवून बालात्क्राची केस ,या स्वरुप्त्ल्या पण अस्तात. इथे संमतीने संभोग असे का होत नाहि. पण उलट अर्थी जर ४-५ वर्ष संभोग ठेवून मुलगी सोडून गेली तर मुलाला तो आरोप मुलीवर करता येत नाही, मुलगी करू शक्ते.

  आमिष दाखवून बलात्कार: मी ५०० रुपयाचे आमिष दाखवून संभोग केला आणि ५०० रुपये दिले तर तो बलात्कार ठरेल का? आणि संभोग करून पैसे न देताच पळून गेला तर बलात्कार ठरेल कि फसवणूक?
  हेच न्यायाने मी जर लग्न करतो म्हणून संभोग केला आणि लग्न केले तर बलात्कार ठरत नाही आणि नाही केले तर बलात्कार हे कसले लॉजिक? म्हणजे इथे काही स्त्रिया स्त्री असण्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता पण अस्तेच.

  ReplyDelete
 2. कायदा जोपर्यंत नीट राबवला जात नाही आणि शिक्षा सतत होत नाहीत तोपर्यंत हे असेच चालू राहणार. मुळात कोणालाही भीतीच राहिली नाहीये कायद्याची. पोलिसाला पैसे देवून विकत घेता येते. कोर्टात कधी निकाल लागेल ह्याची खात्री नाही. सध्या नगरसेवकापासून ते खास्दारापर्यंत सगळे सरंजाम झाले आहेत. ह्यांना कधी शिक्षा होत नाही. झाल्या तर लगेच छातीत दुखते आणि इस्पितळात आराम करायला मिळतो. मग संजूबाबा सारख्यांना एक वर एक संधी मिळतात आणि सुटका होते. मग बाकीच्यांनी काय घोडे मारले आहे? जोपर्यंत आपण चूक केली की पकडले जाऊ ह्याची भीती बसत नाही तोपर्यंत हे असेच चालू राहणार. बाकी ते मानसिक विक्रुती वगैरे ह्यावर फार काही उपाय नाही. निदान मला तरी हेच चित्र इंग्लंड वास्त्याव्यात दिसले. तिथेही हे असेच चालते पण शिक्षा सह ते एक वर्षांच्या कळत झालेल्या पहिल्या आहेत. एकाही पोलिसाला कधीही लाच घेताना बघितले नाहीये. १-२ केसेस मध्ये पोलिसाने लाच घेतली म्हणून ५ वर्ष शिक्षा झाल्याची बातमी पण वाचली आहे. नुकतेच एका मंत्र्याने त्याची गाडी जोरात चालवली म्हणून शिक्षा झाल्याची आणि त्याला संसदेतून पायउतार व्हावे लागल्याची बातमी वाचली. जोपर्यंत खरोखर कायद्या समोर सगळे समान हे असले घीसिपिटे वाक्य सोडून खरोखर तसे घडताना दिसत नाही तोपर्यंत हे असेच चालू राहणार. काहीही उपाय नाही.

  ReplyDelete
 3. लग्न केले तर बलात्कार ठरत नाही आणि नाही केले तर बलात्कार हे कसले लॉजिक? संभोग हा दोघांच्याही संमतिने आणि आनंद प्राप्तीसाठी केला गेलेला असतो कुणालाही त्रास किंवा दुःख देण्याच्या उद्देशाला बलात्कार म्हणता येईल असे हे लॉजिक आहे.

  ReplyDelete
 4. "सामाजिक जबाबदारी" हा शब्द आपण वापरतो तेंव्हा ती स्त्री-पुरुषांची संयुक्त जबाबदारी आहे हे ओघाने आलेच. उलट आता जे कायदे बनले आहेत ते एवढे भयंकर आहेत कि खालावलेल्या मानसिकतेच्या स्त्रीया त्यांचा गैरफायदा सहज घेवू शकतात. त्यामुळे कायदे हवेत कि सामाजिक जबाबदारीचे भान अधिक हवे यावर आपल्याला विचार करावा लागणार आहे.

  ReplyDelete
  Replies
  1. आपल्या लेखाशी मी सहमत आहे ! उलट फाशीची शिक्षा देऊन 'बलात्कार' थांबणार नाहीत!
   कारण सदर 'कायद्याचा सर्रास' 'गैरवापर' केला जाईल आणि खरोखर एखाद्या 'अडल्या-नडल्या' स्त्रीला जर एखादया ''पुरषानी' मदत करायचे ठरवले तर तो 'पुरुष' ती मदत करायला नक्कीच धजावणार नाही, उलट भविष्यात हाच कायदा त्या 'स्त्रीला' मदतीपासून 'वंचित' ठेवेल!
   _ संजय लंके

   Delete
 5. आपल्या देशात कायद्यांची संख्याच मोठी आहे, अंमलबजावणीच्या नावाने आनंदच आहे. जे कायदे करतात तेच ते पायदळी तुडवायला पुढे असतात. आणि नुकताच पारित केलेला बलात्कार विरोधी कायदा तर जे काही प्रामाणिक पुरुष कधी तरी अडचणीतील महिलेला निस्वार्थीपणे मदत करायला तयार असतात, ते सुद्धा आता विचार करतील, एवढी ढिली व्याख्या आहे विनंयभंगाची.

  ReplyDelete