Thursday, July 18, 2013

मी तुरुंगात होतो ते दिवस...
सांगली येथील कारागृह नदीकाठीच आहे. याच कारागृहातुन वसंतराव पाटील यांनी कसे पलायन केले व नदी ओलांडुन पायात गोळी घुसुनही कसा इंग्रजांच्या हाती धत्तुरा दिला ही कथा मला आधीच माहित होती. आता मला याच तुरुंगात यावे लागेल व एक नाही दोन नाही तब्बल ४१ दिवस काढावे लागतील याची मला कल्पना नव्हती.

माझ्यासोबत माझा अनेक कंपन्यांपैकी एका कंपनीत स्टाफ असलेला आणि अत्यंत दुर्दैवाने या स्थितीत अडकलेला मुकुंद मुळे होता. माझा भाऊ विनोद मला जेलपर्यंत सोडायला आलेला होता. खालच्या कोर्टाने आमचा जामीन नाकारला होता. "मी व मुळे हे गुंड प्रव्रुत्तीचे असल्याने साक्षीदारांवर दडपण आणतील..." असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला होता आणि तो कोर्टाने ग्राह्य धरला होता. जामीन नाकारला होता त्यामागची गोम आम्हाला आधीच माहित असल्याने आश्चर्यही वाटलेले नव्हते. जेलकडे जातांना सोबत मुल्ला नांवाचा पोलिस शिपाई होता. वाटेत विनोद उद्याच सेशन कोर्टातुन जामीन करुन आणतो याचा विश्वास देत होता. माझ्या मनात तोवर कादंब-या वाचुन तुरुंगाविषयी अनेक भ्रामक कल्पना होत्या. म्हणजे आरोप सिद्ध शिक्षा न झालेल्या कैद्यांसाठी स्वतंत्र आणि चांगली व्यवस्था असेल अशी आशा वाटत होती. कच्च्या कैद्यांसाठी तुरुंगात वेगळी व्यवस्था असते का हा माझा प्रश्न मुल्ला अगदी ठामपणे उडवत म्हनत होता...साहेब, उद्या संध्याकाळी तुम्ही बाहेर...खालचा जज विकला गेला म्हणुन तुमच्यावर ही वेळ आली.

मुल्लावर विश्वास बसत होता कारण कस्टडीत असतांना त्यानेच मला घरुन चादर आणुन दिली होती. मच्छर चावतात म्हणुन ओडोमास तोच आणुन द्यायचा, अगदी सणाची पुरणपोळी त्यानेच डब्यातुन आणुन खावू घातलेली. मला सिगारेट प्यायची तल्लफ आली कि स्वत:हुन गजांजवळ येवुन विचारायचा..."साहेब...आलीय का?" (इतर कैदी लोकांना वाटायचे मला संडासला जायचे आहे.) मी हो म्हटलो कि तो ते कोठडीचे दार उघडायचा आणि मला बाजुच्या कोप-यात मनसोक्त सिगारेट पिवू द्यायचा.
   
पण आता एक रात्र का होईना जेलमद्धे काढावी लागणार यामुळे मी फारच अस्वस्थ झालो होतो. आता आपण खरेच एक क्रिमिनल आहोत यावर विश्वास बसु लागला होता. खरे तर आजचा दिवस सणाचा होता. जामीन झाला असता तर आम्ही दोघे घरी उशीरा रात्री का होईना पण पोहोचुन कुटुंबियांसह घालवु शकलो असतो...पण ते होणे नव्हते.

जेलचे द्वार अवाढव्य. ते पाहुनच उर दडपला. मुळे तर पार हबकुन गेला. गडी आधीच सुकडा आणि घाबरट...तोवर म्यजिस्ट्रेट कोठडी म्हनजे एखादा सभ्य प्रकार असेल असाच माझा आणि त्याचाही समज. पण काय, शिक्षा झालेल्या कैद्याप्रमाणे आत पहिल्या गेटात तपासणी. नागडेच केले नाही कारण मुल्ला! पैसे नाहीत...खिशातील सिगारेट नाहीत...खिशात गर्द वगैरे असे अंमली पदार्थ नाहीत वा ब्लेडादि शस्त्र नाही याची खात्री करुन घेत त्यांनी आम्हाला पहिल्या गेटमधुन आत सोडले. विनोद आणि मुल्ला वळुन पाहता दिसनार नाहीत कारण ते महाद्वार बंद झालेले. नंतर दुसरे झाडी ओलांडत आम्ही दुसरे महाद्वारही ओलांडले...परत तेही बंद झाले आणि मुक्त जगाशी असलेला काही तासांचा संबध तुटला. तत्पुर्वी आम्ही १० दिवस पोलिस कोठडीत बंदच होतो. त्या आमच्या सोबती जेलगार्डने दिलेली ओशट वास मारणारी एक कांबळ घेत मधल्या आमराईतुन वाट काढत अजुन एक दार ओलांडले आणि सांगली जेलचे दर्शन  घडले. बराकींतुन येणारा उजेड सोडला तर बाहेर कोणाही जीवंत माणसांचे चिन्ह नव्हते. विनोद मागे पडला होता. ओळखीचे जग मागे पडले होते. हे एक वेगळेच अद्न्यात आणि अद्भुत जग होते. समोर डाव्या-उजव्या बाजुला दोन दुमजली इमारती आणि समोर एकमजली इमारत होती. गार्डने आम्हाला डावीकडील इमारतीत नेले. तो आमच्या एकही प्रश्नाचे उत्तर देत नव्हता त्यामुळे अद्न्याताचे भय वाढतच चालले होते.

गार्डचे नांव साठे आहे एवढेच त्या प्रवासात समजले होते. त्याने डावीकडील दुमजली इमारतीत नेले. चाव्यांनी ते बंद अवजड भरभक्कम गजाड दार उघडले. १०० फूट लांब आणि ३० फूट रुंद...( हे मी नंतर खुप दिवस रहावे लागल्याने पावलांनी अंदाज घेत मोजले) असा तो हाल. त्यात जवळपास १२५-१३० कैदी. दुस-या टोकाला टी.व्ही. (ब्ल्याक व्हाइट) आणि त्या परिसरात मात्र बरेच अंतर मोकळे आणि मर्यादित कैदी कोंडाळे करुन बसलेले. इतरत्र मात्र एवढी दाटी कि सांगता सोय नाही. साठेने आम्हाला मधल्या प्यसेजमद्धे झोपलेल्या कैद्यांना अक्षरश: लाथाडत त्या टोकाला नेले. तोवर टी. व्ही. बघण्यात मग्न असलेले त्या बराकीतील सर्वश्रेष्ठ कैदी जरा सावधान झाले. एक जण उठुन उभा झाला. तो या बराकीचा नेता, वार्डन,  हे लगेच लक्षात आले. उंच-धिप्पाड आणि येशु ख्रिस्तासारखा दाढीधारी चेहरा. साठेने सांगितले, "यांची व्यवस्था लाव मुजा..." आणि तो निघुन गेला.

मी बावचळल्या अवस्थेत आता काय करायचे, या विचारांत तसाच उभा राहिलो. मुळे तर पार गळाठुन गेला होता. सर्वत्र एक कोंदट वास भरला होता. तो एकत्रीत वास बीड्या-गांजा आणि गर्दचा असतो हे नंतर कळाले.... सवयच झाली तेंव्हा. खिडक्यांवर नासके कपडे काय आणि साठवुन ठेवलेले अन्न काय...सर्वत्र सर्वांचा वास...येथे आम्हाला रहावे लागेल? होय...रहावेच लागेल. मी कोणत्याही परिस्थितीला सहज अडजस्ट होणारा...पण या बिचा-या मुळेचे काय? त्याला किती हाल-अपेष्टा सहन करु द्यायच्या?

एप्रील २००३. उन्हाळा कडक होता. जेलमद्ध्ये पंखे असण्याचे कारण नव्हते. ते लाड कोण पुरवणार? मला आता शिक्षा झालेल्या कैद्यासारखे वाटु लागले होते. संताप उमदळत होता. पण आलेले भोग भोगण्याखेरीज गत्यंतरही नव्हते...

एकाच दिवसाचा तर प्रश्न होता ना?
   
मुजा (त्याचे पुर्ण नांव मी येथे देत नाही.) मला म्हनाला..."बैठो भाईसाब...ये चद्दर छोडिओ...आपको बढिया देता..."

हे भाईसाब हे नांव मला जे चिकटले ते चिकटलेच. बसलो. मला वाटले मुजा आम्ही का कशासाठी जेलमद्धे आलो यावर वायफळ प्रश्न विचारेल आणि उत्तरे देण्यात आपल्याला आपला जी विचार करायची गरज वाटतेय ते काही होणार  नाही. पण तो जास्तच सुज्ञ निघाला. त्याने काही प्रश्न विचारलाच नाही. त्याने हुकुम सोडला आणि काही वेळातच अंथरायला, पांघरायलाच काय उशालाही घेता येतील एवढ्या चादरी (कांबळी) आमच्याजवळ जमा झाल्या.

तुरुंगाबद्दल माझ्या समजुती वेगळ्या होत्या. तुमच्याही असतील. त्या सर्वच कोसळल्या हेही खरे. कोणच्याही वाट्याला असे दुर्दैव येवू नये. दुर्दैवातील सुख आणि तुरुंगवासीयांची माणुसकी काय असते हेच मला येथे सांगायचे आहे.

त्या रात्री झोपेपर्यंत ते माझ्याशी आणि मुळेशी सहज संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. मी त्यांच्या खाण्याच्या आग्रहाला नकार देत होतो. आश्चर्य म्हनजे त्यांना माझे नांव माहित होते. आमच्यावर काय आरोप होते हेही माझ्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने माहित होते...वर्तमानपत्रेच ती..कशाला कसर ठेवतील? मला वर्तमानपत्रे वाचायला मिळाली नसली तरी तुरुंगात वर्तमानपत्रे येतातच की हे मी विसरलोच होतो!. माझी एवढी प्रसिद्धी (?) वर्तमानपत्रांनी केलेली होती कि मी आज ना उद्या येथे येणारच हे या तुरुंगवासियांना माहितच होते...,मुजाने ते खात्रीशीरपने सांगितल्यावर आणि नंतर अनेक त्याच तुरुंगातील कैद्यांशी भेट झाल्यावर लक्षात आले...कि माझा संशय निराधार नव्हता,...अत्यंत सुडबुद्धीने कायदेप्रणाली राबवत माझा विनाश करण्याचा हा कट होता...आणि मी त्याचा एकटाच बळी नव्हतो...

असो. दुसरा दिवस उजाडला. सकाळी सहा वाजता सर्वांना उठवले गेले. मग सर्वांना जोडी-जोडीने एका रांगेत बसवण्यात येवुन गार्डने गिनती केली. रात्रीच्या गिनतीशी ती बरोबर म्यच झाल्यावर मग दार उघडले. आम्ही बाहेर पडलो.
    
उगवत्या उन्हातील जेलचे द्रुष्य रात्रीपेक्षा आल्हाददायक होते. दोन दुमजली बराकींच्या मधोमध एक पाण्याचा विशाल सिमेंट-कोंक्रीटचा ट्यांक होता व नळावर कैदी बांधव स्नान करत होते.  खाली मैदानावर एकीकडे काही तरुण कैदी वोलीबाल खेळत होते तर डाव्या बाजुला एक काळाकुट्ट मध्यमवयीन माणुस कैद्यांकडुन व्यायाम करुन घेत होता. आम्हीही त्यात सामील व्हावे नाहीतर शिक्षा होईल असे एका कैद्याने म्हटल्यावर मग आम्ही दोघेही त्या व्यायामकर्त्या कैद्यांच्या रांगेत आलो आणि जमेतील तसे हातवारे करत व्यायाम शिकु लागलो. ते झाल्यावर मग साने गुरुजींचे "खरा तो एकची धर्म...जगाला प्रेम अर्पावे..."
    मला मी दहिगांव (संत) येथे पहिलीत असतांनाचे दृष्य आठवले. आमचे आनंदा मास्तर हेच गीत डोळ्यांत अश्रु आणत आम्हाला पाठोपाठ म्हणायला लावायचे. गुरुजी भावूक होवून रडतात म्हणुन आमच्याही डोळ्यांत पाणी यायचे. येथेही डोळ्यांत अश्रु आले खरे, पण येथील परिस्थिती वेगळी होती. माणुसकीचे धिंडवडे निघाल्याचे पहावे लागल्यानंतर ही प्रार्थना म्हनावी लागणे हे त्या प्रार्थनेचेच एकार्थाने धिंडवडे होते. बाजुला वोलिबाल खेलणारे त्यांच्या नादात होते...त्यांचा नेम चुकला कि तो बाल इकडे येवुन आदळे. पण त्या कंडक्टर ओफ़ प्रार्थना सेरेमोनीची हिम्मत नव्हती कि त्यांना थांबवावे.
    प्रार्थना संपली. मी व मुळे परत आमच्या बराकीकडे निघालो. वाटेत मुजा भेटला..."भाईसाब...कहां थे आप?"
    मी त्याला सांगितले...तो म्हणाला, "आज के बाद कभी मत जाना...कोई जरुरत नहीं"
    मी सुटकेचा निश्वास सोडला. मला कोठे हौस होती आणि मुजा हा काही जेलर नव्हता हे खरे... आणि मी अजुन जेलरला पाहिलेच कोठे होते?
    पण एक संरक्षक कवच मिळाल्याचा आनंद होताच. कारण या नव्य जगात आम्ही तसे जगू शकण्याची सुतराम शक्यता नव्हती हेही खरे.
    तेवढ्या वेळात दोन्ही इमारतींच्या वरांढयांत भलीथोरली पातेली घेवुन चहावाटप सोहोळा सुरु होता. हातात पाट घेवून कैद्यांची रांग लागली होती. पाट म्हनजे अल्युमिनियमचे भांडे. त्यात मिळेल तेवढा चहा घेतला जात होता. मुजाने आम्हाला चहापानासाठी बोलावले. त्या रांगेत उभे राहणे मला शक्यच नव्हते. मी तसे म्हणाल्यावर तो हसला...म्हणाला "भाईसाब...आप अंदर आवो...आपको कौन बोल रहा हैं कतार में खडा होने को?..."
    मी आत गेलो. पहातो तर काय एक छोटी विटांची चुल पेटलेली होती आणि त्यावर चहा-पुनर्प्रक्रिया उद्योग सुरु होता. चहाची अधिकची पत्ती आणि त्यात साखर घालुन नव्याने चहा बनवला जात होता. आम्ही तरीही "नाही" म्हणत होतो. पण मुजाने तो चहा पाजलाच. तो दिव्य चहा केवळ आग्रहाने प्यायलो हेही खरे. नंतर सवयच झाली.
    त्याचे आभार मानून आम्ही परत बाहेर आलो.
    जेलमद्धे ही चहापत्ती आणि साखर कशी आली हा प्रश्न मला सतावत होताच!
    त्याची उत्तरेही पुढे  मिळाली...आणि असा चहापान आपचा दैनंदिन कार्यक्रम बनला हे मात्र खरे.
    अन्य कैदी मात्र त्या जेलचा चहा...खरे तर त्याला चहा म्हनण्यापेक्षा गढुळलेले रंगीत पाणी यापेक्षा दुसरा शब्द वापरता येत नाही, तोच पित असत.
    मला सिगारेटची प्रचंड तल्लफ आली होती. माझ्याकडे पैसे नव्हते. असते तरी तेथे  कोणतेही दुकान नव्हते. मुळे मस्त निर्व्यसनी. पण त्याला माझी सवय माहित. पण तो आधीच एवढा गोंधळलेला...बावरलेला तो त्या या नव्य भयकारी व्युहात काय करनार?
    मी आपला "काही तासांचा तर प्रश्न आहे..." अशी समजूत घालत वेळ कसा पुढे जात नाहीहे याचीच चिंता करण्यात मन रमवू लागलो. 
    आणि माझ्या कानावर हाक पडली..."सोनवणीसाब..."
    मी बघीतले तर काय तर तात्या! एक वृद्ध गृहस्थ. मी इस्लामपुरच्या कोठडीत असतांना तेथे थंड फरशीवर झोपावे लागल्याने माझी पाठ दुखायला लागली होती. तेंव्हा हा तात्याही त्याच कोठडीत बुटलेगिंगच्या आरोपात (?) होता. त्यानेच रुपयाचा एक तेलाचा पाउच आणुन माझ्या पाठीची मस्त मालिश केलेली. त्याचे पोलीस कस्टडीतील असने हे पोलिसांच्या आपराधिक गणपुर्तीचे एक साधन.
    पण तो येथे कसा? या जेलमद्धे? मला प्रश्न पडले...कारण काही गुन्ह्यांचा कोरम भरुन पोलिस अशा नेहमीच्या आरोपींना जामीन मिळू देतात असे मला तोच म्हणाला होता.
    माझ्याकडे विचारायला खुप प्रश्न होते. पण माझ्यापेक्षा अधिक त्या नि:ष्पाप माणसाच्या विझत्या डोळ्यांत होते. तो उठला...अत्यंत दयनीय स्वरात म्हणाला..."सायेब...त्यांनी माझा जामीन केला नाही...फुकट लटकवले मला..."
    मला महित होते कि बोगस केस केल्या कि आपली क्राइम रजिस्टरची आकडेवारी सिद्ध करत मग बुटलेगर्सना सोडुन द्यायचे  ही खास पोलीसी रीत. पण तात्याच्या बाबतीत अघटीत झाले होते. त्याचा जामीन झालाच नव्हता. तो आमच्याप्रमानेच येथे एक कैदी म्हणुन आला होता.
    तो पुढे आपले गा-हाने अधिक गाणार हे मला माहित होते आणि त्यात वावगे काही नव्हते. पण तो मला चकित करत  म्हणाला..."साहेब, सिगारेट नाही?"
    मी म्हटलो..."नाही..."
    त्याने विचारले..."साहेब...काही पैसे आहेत तुमच्याकडे?’
    मी म्हणालो "नाही."
   
    खरे तर पाणी माझ्या डोळ्यांत तरळायला हवे होते...पण तोच रडु लागला. त्याचे रडने कसे आवरावे हेच मला कळेना. मुळे त्याच्या पाठीवर हात फिरवत त्याला शांत करायचा प्रयत्न करु लागला. पण एकाएकी तो सावरला...मला म्हणाला..."साहेब...थांबा...मी आलोच..."
    आणि तो गेलाही.

    आम्ही त्या जेलमधील प्रात:कालीन गोंधळाचे, भांडनांचे अलिप्त साक्षीदार होत तात्याची वाट पहात होतो. आज सायंकाळी आम्ही या जेलमद्धे नसणार हा दिलासाच किती आश्वस्त करनारा होता...मी कधीतरी हे अनुभव कथा कादंब-यांत वापरणार होतो...लिहिलेच कदाचित तर आत्मचरित्रातही. एका अर्थाने जशी इस्लामपुरची कोठडी, माझी निघालेली धिंड हे थ्रिल मी अलिप्तपणे अनुभवले होते तसेच हेही एक थ्रिल होते. मी निरपवाद मनाने हे सारे न्याहाळत होतो.
    तात्या आला.
    त्याच्या हातात दोन छोट्या विल्स सिगारेट होत्या.  डोळ्यांत पाणी होते. म्हणाला...
    "साहेब...माझ्या कशात मी दडवुन दोन रुपये आनले होते...आणि तेवढ्यात एवढेच मिळाले कि हो..."
    कढ माझ्याही घशात दाटुन आला होता...पण मी त्याने दिलेल्या सिगारेट घेतल्या.
    जेलमद्धे मिळते तरी काय काय हा प्रश्न मला आता सतावू लागला होता...
    मी जेलमधुन बाहेर पडेपर्यंतही हा तात्या आतच होता. मी त्याला माझ्या अन्य स्थानिक मित्रामार्फत नंतर जामीन देवून त्याला मुक्त केले...मग त्याच्या गांवीही गेलो...तो उत्सव काही वेगळाच होता. 

    अकरा वाजले. (तुरुंगात घड्याळ ठेवता येत नाही. दर तासाला टोल पडतात.) कैदी अजुनही कोंडाळी करुन पटांगनात गर्दी करुन होते. तोवर जेवणही वाढले गेले होते. आम्हाला खाण्यात कसलाही रस नव्हता. पण तरीही हे सारे कैदी कशाची तरी वाट पहात होते. त्यांचे डोळे त्या मधल्या बंद द्वाराकडे लागले होते. त्यापलीकडे ती आमराई, छोटे शेत आणि मग उप-दरवाजा आणि कैद्याला मुक्त करणारा कडेकोट बंद असा महादरवाजा. मी मुळेशी पुण्यात काय चालले असेल, बाकी संचालक आणि व्यवस्थापक मंडळी दैनंदिन कामकाज कसे पहात असतील...यावर बोलायचा प्रयत्न करत होतो...पण मुळे मुकच होता. तो काहीतरी माझ्यापासुन लपवत आहे असे मला वाटु लागले. मला त्यावेळी वाटले होते कि तो अकारण या स्थितीत सापडल्याबद्दल खंतावलेला असावा. पण ते तसेही नव्हते. पुढे मला कळाले कि त्याने माझ्याशी पोलिसी दडपनाला बळी पडुन आणि स्वत:ला सुरक्षीत ठेवण्यासाठी गद्दारी केलेली होती. खरे तर त्याची काहीएक गरज नव्हती. त्याचा मुळात जेही काही असेल त्याशी काहीएक संबंधच नव्हता.  पण त्याबाबत त्याने मला एकदाही सांगितले नाही कि स्वत:ला सुरक्षीत ठेवण्यासाठी पोलिस म्हणतील तसे स्टेटमेंट न्यायाधिशासमोर लिहून दिलेय......अगदी ५१ दिवस एकत्र असतांनाही त्यावर तो काही बोलला नाही. ते मला कळाले जवळपास दोन वर्षांनंतर...मग मात्र त्याने माझे तोंड चुकवले ते चुकवलेच! त्याचीही गरज नव्हती. कारण कसेही स्टेटमेंट दिले असले तरी सत्य बदलणार तर नव्हते!
    असो. हे महत्वाचे नाही.

    अकरा वाजले.  एक गार्ड आला...एका विशिष्ट स्टाईलमद्धे त्याने ज्यांची पत्रे आली होती त्या नांवांचा पुकारा केला. ज्यांची आली होती ते खुष होते तर ज्यांची आली नाही ते निमुट होते. ज्यांना पत्रांची आशाच नव्हती ते आत बराकीत बसुन आपापल्या वाट्याचे ते कदान्न खात बसले होते.
    नंतर अर्ध्या तासात अजुन एक गार्ड अवतरला. त्याचा पुकारा होता ज्यांचा जामीन झाला आहे आणि आता मुक्त आहेत अशांचा. हा पुकारा आदल्या दिवशी उशीरा ज्यांचा जामीण झाला असतो त्यांच्यासाठीचा. आमचा असणे शक्यच नव्हते. काल सायंकाळीच तर आमचा जामीण नाकारला गेला होता...पण आज सायंकाळी आमचाही जामीण-मूक्त असा पुकारा होनार यावर विश्वास होता...किती वेळ उरला बरे? सायंकाळी पाच वाजता? ओके. तेवढी वाट पाहण्याची हिम्मत होती.
    आणि ज्यांचा जांमीण झाल्याचा पुकारा होत होता...ते ज्या आनंदाने आपापले सामान घ्यायला धावत होते...एकमेकांना मिठ्या मारत ऋणानुबंध जतावत बाहेर मुक्त हवेचा श्वास घ्यायला प्रमुदितपणे धावत होते...
    बारा वाजता बंदी. म्हनजे सर्वांनी आत जायचे. मग गिनती. एक प्रथा. एक कैदी ज्यादा वा कमी भरता कामा नये. आकडे जुळले कि मग गार्ड बाहेरुन कुलुपबंद करणार. आम्हीही आत आलो. आजच बाहेर पडणार म्हणुन काही वेळ सहकैद्यांशी गप्पा मारण्यात, त्यांना जाणुन घेण्यत काय हरकत होती?
    मुजा पहिला. मुजा स्वत:बद्दल बोलायला तयार नव्हता. दुसरा एक काळाकुट्ट पण लोखंडाच्या कांबीसारखी शरीरयष्टी असलेला आणि २८ चो-यांचे गुन्हे दाखल असलेला क्रुष्णा. (पैकी ८ गुन्हे त्याने खरोखरच केले होते आणि त्यांत मात्र तो निर्दोष ठरला होता. आणि जे त्याने केलेच नाहीत त्याबद्दल मात्र सुनावण्या सुरु होत्या...त्याची रोजच सांगली कोर्टात तारीख असे. त्याने एके दिवशी जजला सरळ सांगितले ...(त्याचा वकील नव्हता...अडानी तो स्वत:च स्वत:चा युक्तिवाद करत असे...) अहो महाराज जे गुन्हे मी केले त्यात तुम्ही निर्दोष ठरवलेत कि हो...आता मी हे काय बी गुन्हे केलेले नाहीत...सोडा कि आता तरी मला...त्यावर जज हसला होता म्हणे.) मी तेथे असेपर्यंत तरी त्याला मुक्त केले गेले नव्हते. असे म्हणतात कि जेलमधील सहकैद्याला चुकुनही स्वत:चा खरा पत्ता द्यायचा नसतो. पण मी त्याला दिला होता आणि म्हणालो होतो..."लेका...सरळ डोअरबेल वाजवुनच घरात ये...नाहीतर पाईपवरुन चढुन यायचास सरळ बेडरुममद्धे..." हा बराच काळ त्या जेलमधील विनोद बनला होता. पण क्रिष्णा कधी बेल वाजवुनही ना आला ना पाईपवर चढुन...)
    अजुन एक वल्ली होता. त्याला शिक्षा झालेली नव्हती. (हे उप-कारागृह असल्याने येथे फक्त कच्चे कैदी ठेवले जात.)  मध्यमवयीन पण काटक माणुस. पण तो गेली तीन वर्ष येथे होता. कारागृहीय शेतात काम करुन कमाई करुन पट्ठ्या जगत होता. तो एका सहकारी ब्यंकेत शिपाई होता. शिपाई म्हनजे येथे ओफिसबोय असे घ्यावे. आणि त्या ब्यंकेत म्हणे महाघोटाळा झाला आणि २०-२२ लोक पकडले गेले त्यातील हा महाभाग. बाकी सारे जामीनावर बाहेर...पण हा मात्र जामीण घेतच नव्हता. त्याचे म्हनने हे कि
शिक्षा किती होईल समजा झाली तर? तर ५ वर्षे. काय करायचे बाहेर जावून? सारे दळींदर लोक...हरामी बायको आणि कुत्र्याच्या अवलादीचा समाज...येथेच बरा आहे...आश्चर्यकारक खरे पण खरेही. बाहेरचा समाज हा या कैद्यांपेक्षा नालायक असतो हे मीही अनुभवत नव्हतो काय? तो त्या दिवशीही आमराईतुन कै-या घेवुन आला होता. त्या दिवशी जरी मी व मुळे जेवलो नसलो तरी त्या कै-या मात्र खाल्ल्या होत्या. नंतर तर जेलमधील, पण मुजाच्या हंडीतुन प्रक्रिया झालेले जेवण खातांना, चवीला त्याने आनलेल्या कै-या हा अम्रुततुल्य अनुभव असायचा.
    हे चालले होते हे खरे पण मनात पाच कधी वाजतात हे होतेच. एक एक क्षण जड वाटत होता. ते ओझे वाढत होते आणि त्या ओझ्याखाली मी अनेक प्रश्नांची उत्तरे देत होतो,...प्रश्न विचारत होतो...हा माझा येथील अखेरचा दिवस...गोळा करता येतील तेवढे अनुभवाचे क्षण गोळा करुयात...
    पुढचे ४० दिवस मला तेच करावे लागणार होते...फक्त मला त्याची त्यावेळी जाणीव नव्हती एवढेच.

    चार वाजले. गिनतीनंतर गजाड दार उघडले. अतीव उत्सुकतेने आम्ही बाहेर आलो. 
    चार ते पाच...एक तास...खरे तर ६० मिनिटं...आणि अधिक खोलात जायचे तर ३६०० सेकंद. एक सेकंद केवढा जीवघेणा असु शकतो? जवळ येवुन विचारपुस करणा-यांबद्दल चीड. मी बाहेर पडताक्षणी जयंत पाटील ते विजय पाटीलांची प्रेस कोन्फरंस घेवून कशी वाट लावणार...इस्लामपुरच्या जजांपासुन ते मला अकारण अटक करणा-या पोलिस इन्स्पेक्टर सर्जेराव गायकवाडाला कसा हाय कोर्टापुढे खेचणार...माझ्या योजना ठरलेल्या होत्या. फक्त पाच वाजता माझा व मुळेचा जामीण यायला हवा.
    पाच वाजले. पण ते द्वार उघडले नाही. मुळेचा चेहरा वेदनांनी पिळवटत चालला होता. मी त्याचा हात हाती घेतला...मुळे...काळजी करु नकोस...आपण काहीएक चुक केलेली नाहीहे... हे जे चाललेय ते एक दु:स्वप्न आहे...विरेल ते...नक्कीच विरेल...
    पण तसे व्हायचे नव्हते.
    जामीनाचा पुकारा आला. छाती फुटेल एवढ्या आवेगाने...कानांत आत्मा आणुन जामीण झालेल्यांचे नांव ऐकले...

    आमचे नांव त्यात नव्हते.
   
    मग जरा जेलमधील जीवन अंगवळनी पडले. बंधु विनोदने मला व मुळेला चड्ड्या, टूथपेस्ट-ब्रश आणि काही कपडे पाठवले. तेथेच लक्षात आले...आमचा जामीण सेशन कोर्टानेही नाकारला आहे. आणि आता हाय-कोर्टाखेरीज पर्याय नाही.
    उन्हाळ्याच्या कोर्ट सुट्ट्या सुरु झाल्या होत्या. म्हणजे एकच बेंच बसनार. अवघ्या महाराष्ट्रातील कोणत्याही केसेस असोत त्या एकाच बेंचसमोर येणार....आणि त्यात आमचे दुर्दैवातील महादुर्दैव असे कि कर्णिक महोदयांची एम.पी.एस.सी. परिक्षा घोटाळ्याची केसही तेंव्हाच हाय कोर्टसमोर यायची होती.
    असो. मीच नव्हे तर राज्यातील असे हजारो बंदी त्या उन्हाळी सुट्ट्या आणि अशाच दिर्घकालीन चालणा-या केसेसमुळे अडकुन पडले असतील.
    त्यांत आम्हीही होतो हे आमचे नशीब!
   
    जेलमद्धे दर मंगळवारी जेलर कांबळे कैद्यांची तपासणी करायला येत असत. खरे तर जेलमद्धे केस वाढवलेले असणे हे महत्पाप. कांबळे मुजाला त्याच्या या मस्तकीय आणि चेहरीय केसव्रुद्धीबाबत लेक्चर देत असे. मग नंतर मी. मला तो "लबाड...चोर...बदमाश" म्हणत पुढे जाई. मुळेला बोलायला त्याच्याकडे शब्द नसत. या पद्धतीने तो आपला साप्ताहिक कार्यक्रम उरकुन पुढे जाइ.
    येथे या जेलर कांबळे महोदयांबद्दल थोडक्यात लिहिणे उचित ठरेल. हा माणुस महाभ्रष्ट होता, कैद्यांना जे अन्न ते औषधांचे अनुदान असे ते तो जवळपास स्वता: लाटत असे. जेलमद्धे कसलीही औषधे उपलब्ध नसत. उदा. मला डायबेटीस होता आणि ग्लायकोमेटच्या गोळ्या मला देणे हे जेल प्रशासनाला बंधनकारक होते. त्या मला कधीच मिळाल्या नाहीत. अर्थात जेलमधील जेवण हे (प्रक्रिया करुनही) एवढे भारी असे कि मला गोळ्या न घेता कधीही मधुमेहाचा त्रास जाणवला नाही. शरीरातील साखर वाढायला त्या अन्नात काही शर्करी असायला हवी कि नको? जगातल्या मधुमेहींनी ही खास तुरुंगीय ट्रीटमेंट घरातच घेतली तर मधुमेह नाहीसा होईल हे मी अनुभवाने सांगू शकतो.
   
    दर शुक्रवारी जेलमद्धे सायंकालीन एक कार्यक्रम असे,  म्हणजे सांगलीतील अनिरुद्धबापुंचे भक्त जेलमद्धे येत आणि कैद्यांना सत्संग घडवत. (हे मी नंतर येरवडा जेलमद्धेही पाहिले आहे.) या सत्संगींमुळे जेल पवित्र होईल असा काहीतरी समज असावा. मी एक कार्यक्रम आवर्जुन...मुजा फारच विरोधात होत आणि खरे तर नाईलाज म्हणुन मुद्दाम अटेंड केला. बाकीचे मात्र तो प्रत्येक कार्यक्रम उत्साहाने अटेंड करत असत. अनिरुद्ध बापुंच्या आई-वडील ते भाऊ-बहीणी या स्मरणानंतर अनिरुद्ध बापु हे क्रुष्णावतार असे वंदन झाले कि मानवी जीवनाचे तात्विक वाभाडे निघायला सुरुवात. मद्धेच भजने...आणि त्या साधकांच्या तत्वद्न्यानाची पोपटपंची बरसात.
    माझे एवढे मनोरंजन कोणीच कधी केलेले नसेल!

    तो तुरुंग होता. खरे आहे. तुरुंगाने तुरुंगासारखे असने यातच तुरुंगाची महत्ता आहे आणि त्यात वावगे वाटायचे कारण नाही. पण त्याच तुरुंगात गर्द, अफु आणि अन्य मादक द्रव्यांच्या आरोपात असनारे कैदी होते. पण तुरुंगात हीच सर्व द्रव्ये मुबलक उपलब्ध होती. उदाहरणार्थ याच जेलमद्धे आयुष्यातील पहिला गांजा मी प्यालो...
    येथे साखर, मिठाया, तिखट ते साखर...सारेच उपलब्ध होते...पण पैसे द्यायची ताकद पाहिजे. आणि हे पैसे कसे येत? मी स्वत:च नंतर आणले असल्याने खात्रीशीर अनुभवाने सांगतो...जेलगार्डला बाहेर ५०० रुपये दिले कि तो ३०० रुपये मागवणा-यापर्यंत पोहोचवत असे. त्यात त्याला समजा १ किलो बटाटे घेवुन ये असे सांगितले कि त्यावेळी ५-६ रुपये किलोचा बटाटा २०-२२ रुपये किलोने तो आत आणुन द्यायचा. माझ्या सिगारेटी याच मार्गाने इम्पोर्ट होत! मी विनोदाने म्हणे "साला दुबईत रहिल्याप्रमाणे वाटतेय!"
   
    मला पैसे कोण आणुन देत होते? एक काळे नावाचा माझा एक पुण्यातील स्टाफ होता. तो मी आत आहे म्हणुन सांगलीत येवुन काही काळासाठी स्थाइक झाला होता. त्याला ना माझ्या बंधुंचा पाठिंबा होता ना कंपन्यांची वाट लावून नंतर लगोलग राजीनामा देवुन मोकळ्या झालेल्या संचालकांचा. त्याने तेथील गार्ड पुरेपुर पटवुन मला सिगारेट ते पैसे स्वत:च्या खिशातुन खर्च करत आत पाठवले.
    मी त्याचा क्रुतज्ञ आहे.
       
    सांगली जेलमद्धे मी मानवी जीवनाची फसगत म्हणजे नेमके काय असते हे अनुभवले. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपली प्रत्येकाने फसगत केली आहे असे वाटतच असते. मीही या तत्वाला अपवाद नव्हतो. प्रत्येक माणसाची स्वत:ची एक बाजु असतेच. कोणती बाजु न्याय्य हे अन्यायी लोकांनी न्याय्य लोकांना सांगायचे कि न्याय्य लोकांनी अन्यायींना?
    आणि काय न्याय आणि काय अन्याय याची व्याख्या नेमकी कोणी करायची?
    कोणाची व्याख्या खरी धरायची?
    चार भिंतीआंत गाडुन बसना-यांसाठी ते ठीकही असते कारण त्यांनी मुळात जीवनाचा हा नग्न चेहरा कधी पहिलेलाही नसतो.


    दिवसांमागुन दिवस जात होते. तो एम.पी,एस.सी.चा प्रश्न माझी केस हायकोर्टासमोर येवु देत नव्हता. आमचा जामीण होता होत नव्हता.
    जेलीय रुटीन मीच बदलले. हीही एक गम्मतच आहे. आयुष्यात मी कधी नशीबावर विश्वास ठेवला नव्हता...आता जरा बसतोय...पण ते नंतर. झाले काय एके सकाळी मी उदास मुळेचा हात हाती घेतला आणि त्याच्या हस्तरेषा बघु लागलो. माझे वडील उत्तम ज्योतिषी आहेत. शिकायला माझ्यासारखा विद्यार्थी नसेल. मी खरे तर मुळेला धीर देण्यासाठी काही भुलथापा मारणार होतो. पण गम्मत सांगतो...मी मुळेचा हात पहातोय हे दिसताच २०-२५ कैदी बाजुला जमा झाले आणि आपापले हात चोळत माझ्याकडे अपार उत्सुकतेने पहायला लागले.
    तुम्हाला नवल वाटेल...उर्वरीत २५-२६ दिवसांत मी किमान ७-८०० हात पाहिले. प्रत्येकाचा अंतरात्मा मला हे काकुळतीने विचारु पाही कि जामीण कधी होनार? कोणी साध्या मारामारीत आत होता तर कोणी कौटुंबिक अदावतीत आत आला होता. कोणी चोर होता तर कोणी गर्द-गांजा अशा मादक पदार्थांच्या विक्रीप्रकरणी आत होता. एक पत्रकार बायकोने बलात्काराची तक्रार केली म्हणुन आत होता. कोणी आपण निर्दोष असल्याचे सांगत होता तर कोणी कोणाच्या तरी बदली म्हणुन आत आलेला होता. 
    खरे काय खोटे काय हे सांगायला मी तज्ञ नव्हे, पण बव्हंशी लोक अमावस्या...अष्टमी व पौर्णिमेचा जवळपास अटक झाले होते वा त्यांचे अपराध त्याच काळात झाले होते.
    सायंकाळचा मीच एक प्रवचनकारही बनलो. धर्म काय...विश्वनिर्मिती काय...आणि जगण्याचा अर्थ काय असे मी मलाच जीवन यत्किंचितही न कळता ठोकुन देवु लागलो.
    वेळ जात होता ना...
    आणि लोकांनाही खूप प्रश्न असत...स्वत:चे असत तसेच जगाबाबतही असत.
    जमेल तेवढी उत्तरे देण्यापलीकडे मी काय करू शकत होतो?
    खरे तर मला तरी कोठे काय माहित होते? साधा माझा जामीन कधी होनार हेही माहित नव्हते. मी येथे का आहे हे तर त्याहुनही माहित नव्हते. बाह्य जगाशी पुरता संपर्क तुटलेला होता. काळे चिठ्ठ्यांमधुन कळवे तेवढेच त्रोटक...

    माझे प्रवचन टी. व्ही. सुरु करतावेळी संपायचे.
    एकच दूरदर्शनचा च्यनेल...तीच "ठंडा ठंडा डर्मी कूल"ची जाहिरात..त्या असह्य उकाड्यात हवीशी वाटायची....कसलाही कार्यक्रम असो...पाहिलाच जायचा...

    खालच्या मजल्यावरील टी.व्ही. वरच्या मजल्यावर गेला कि मुजा आम्हाला वर घेवुन जाई. त्याचा मोठाच वट होता तिथे.
    तो आत का?
    त्याने म्हणे त्याच्या बायकोला ठार मारले होते.
    पार विधानसभेत त्याच्या या कृत्यावर गदारोळ झाला होता.
    पण त्याच्या बायकोचे प्रेतच अद्याप सापडले नसल्याने कायदाही त्याला फक्त आत ठेवत होता...काहीच करु शकत नव्हता.

    आम्ही या जेलमधुन बाहेर यायच्या तीन दिवस आधी एक कन्नडीगा वयोव्रुद्ध कैदी याच जेलमद्धे आला. त्याला स्वाभाविकच सर्व कैद्यांची रांग संपते तेथे, म्हणजे संडासाशेजारी, जागा मिळाली. तो आजारी होता. त्याला उठवत नव्हते. मी मुजाला विनंती केली. मुजाने जेलर कांबळेला भेटुन विनंती केली कि त्या शरणाप्पाला दवाखान्यात दाखल करावे. कांबळेने ऐकल्याचे नाटक केले.
    तो कैदी तसाच पडुन राहीला. मी व मुजाने त्याला जे आमच्याकडे सर्वोत्क्रुष्ठ होते ते त्याला भरवायचा प्रयत्न केला. त्याने ते सारे ओकुन काढले. आम्ही चिंतेत पडलो.  त्याची तब्बेत पराकोटीची बिघडत गेली. पण रात्र झाली होती. दार बंद होते. कोणी गार्ड तेथे नव्हता.
    दुस-या दिवशी सकाळीच आम्ही त्याला बाहेर काढले. गार्डना हाक मारली. ते त्याला मेन गेटजवळ घेवुन गेले. मुजा त्यांच्यासोबत गेला.
    काही वेळाने मुजा परत आला...तो अस्वस्थ होता...
    तुरुंगाच्या दारापाशीच तो बिचारा शरणाप्पा मरुन गेला होता
.
    पण त्याचा म्रुत्यु जाहीर असा झाला कि जणु तुरुंग प्रशासनाने आजारी शरणाप्पाला सिव्हिल होस्पिटलमद्धे दाखल केले होते तेथे उपचार करत असतांना त्याचा म्रुत्यु झाला.

    आणि त्यानंतर दोनच दिवसांनी माझ्या व मुळेच्या जामीनाचा आदेश आला.
   
    आम्ही मुक्त झालो.
    आम्हाला घ्यायला विनोद आणि त्याचे सासरे आले होते. दादासाहेब आढावांनी आम्हा दोघांना जामीण दिला होता. जेलचा दरवजा आम्हाला बाहेर काढुन परत बंद झाला.


    मी बाहेर आल्यानंतर प्रथम काय केले असेल तर शरणाप्पाच्या म्रुत्युबद्दल जेल प्रशासन ते ग्रुहमंत्र्यांना पत्रे पाठवली...
   
    त्याची दखल एवढीच कि जेलर कांबळेसाहेबांची बदली झाली.

    कायद्याकडुन आपण काय अपेक्षु शकतो?
    त्यानंतरची माझी लढाई काय होती हे नंतर कधीतरी...
    तत्पुर्वी मी मुळात आत कसा गेलो हे समजावुन घेण्यासाठी या http://sanjaysonawani.blogspot.com/2011/07/blog-post_5657.html  लिंकला भेट द्यावी ही विनंती.

2 comments:

  1. sir ata purn vachale an thaka zalo.
    bhayan aanubhav an vastav vachun man helaun gele.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete