Sunday, July 7, 2013

भरकटलेली वारी

भरकटलेली वारी

By  on July 7, 2013
0
feature size
कोणत्याही सामाजिक बदलाची सुरुवात चांगली असते. ती सुरुवात चांगली असते म्हणून लोकही त्यात अधिकाधिक सहभाग नोंदवू लागतात. गर्दी पाहिली की तिचा वापर स्वार्थासाठी करण्याचा प्रयत्न करणारेही मग तयार होत जातात. अशा लोकांना झुंडीचं मानसशास्त्र चांगलंच माहीत असतं. मग चांगल्या गोष्टींची वाताहत सुरू व्हायला वेळ लागत नाही. आणि मूळ हेतू चांगला असल्याने विरोध करायलाही सहसा कोणी धजावत नाही. तसंही झुंडींच्या विरोधात जाणं हे अंगलट येतं हा पुरोगामी महाराष्ट्राचा इतिहासच असल्याने वारीचंही अगदी असंच झालं आहे.
श्रीविठ्ठल हा मुळचा धनगर-कुरुबांचा दैवत प्रतिष्ठा प्राप्त करून बसलेला एक पुरातन पूर्वज. पौंड्र वंशातील म्हणून पौंड्रंक विठ्ठल… ज्याचा कालौघात झाला पांडुरंग विठ्ठल. या पौंड्र लोकांचा आराध्य देव म्हणजे पौंड्रिकेश्वर शिव… आणि पौंड्रांची राजधानी पौंड्रपूरचं कालौघात झालं पंढरपूर. म्हणजे हे स्थान पुरातन कालापासून शैवस्थान होतं. पुराऐतिहासिक धनगर-कुरुबांचं सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय केंद्र होतं. आजही पुंड्रिकेशचं जे मंदिर आहे ते शिवमंदिरच आहे. धनगर-कुरुबांची वारी शेळ्या-मेंढ्या घेऊन होतच असे… पण तिचं स्वरूप सर्वस्वी वेगळं होतं… हेतुही वेगळे होते.
पण चवथ्या शतकात वैदिक धर्मियांनी बौद्ध आणि शैवांना शह देण्यासाठी एक जबरदस्त युक्ती शोधली. त्यांनी ऋग्वेदातील एक दुय्यम देवता शोधून काढली. त्या देवतेचं नाव विष्णू. त्यांनी अवैदिक वासुदेवभक्तिच्या पांचरात्र संप्रदायातून भक्तिची संकल्पना उचलली. कृष्ण, रामादि अवैदिक देवतांना विष्णुचे अवतार बनवून टाकलंच, पण गौतम बुद्धालाही नववा अवतार बनवून टाकलं. बौद्ध धर्मातील मांसाहार-निषेध, अहिंसादि तत्त्वं उचलली गेली. ‘हर’ या पुरातन शिववाचक शब्दाला गाडण्यासाठी ‘हरी’ हा नवाच शब्द शोधला गेला. वैदिकजनांनी एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला. त्यात ते बौद्ध धर्माला शह देण्यात यशस्वी झाले. काही बौद्ध आणि शैवस्थानं वैष्णव बनवण्यात त्यांना यश लाभलं. पंढरपूरचा विठ्ठल आणि तिरूपतीचा बालाजी ही दोन स्थानं त्यात महत्त्वाची आहेत. दहाव्या अकराव्या शतकापर्यंत ही शैवस्थानं वैष्णव कशी बदलवली गेली हा धर्मेतिहासातील अत्यंत कळीचा प्रश्न आहे. वारीची दिशा आणि दशा बदलायला तिथूनच सुरुवात झाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
संतांना विठ्ठल हा शैव आहे याची जाणीव होती. पण हरी-हर ऐक्याच्या संकल्पनेमुळे त्यांनी विठ्ठलाला जे नवं स्वरूप दिलं गेलं होतं त्याच स्वरूपात पाहिलं. शिवावर लादल्या गेलेल्या वैष्णव चरित्रावर त्यांनी आक्षेप घेणं तर दूरच पण ‘विष्णुसहित शिव आणिला पंढरी…’ या जाणिवेसहित विठ्ठलाला कान्हा, विष्णू याच रूपात पाहिलं. प्रश्न असा आहे की संतांना हे वैष्णव चरित्र का रुचलं? विष्णू वैदिक देवता आहे हे त्यांना माहीत नव्हतं काय? विठ्ठल स्वतः अवैदिक आहे आणि विठ्ठल विष्णुच्या २४ अवतारांत अथवा विष्णु-सहस्त्रनामातही सापडत नाही हे संतांना चांगलंच माहीत होतं. त्यांनी आपापल्या अभंगांतही तसे उल्लेख स्पष्टपणे करून ठेवले आहेत. पण तरीही वैष्णव चरित्र स्वीकारल्यामुळे, म्हणजेच थोडक्यात वैदिक चरित्र स्वीकारल्यामुळे चोखामेळा यांच्यासारख्या महान संताला नामदेवांची साथ असतानाही श्रीविठ्ठलाची गळाभेट कधीच घेता आली नाही. म्हणजेच समतेचं महान ध्येय वारकरी पंथाला सुरुवातीपासूनच गाठता आलं नाही.
याचं कारण मुळात संतांनी स्वीकारलेल्या विठ्ठलाच्या वैष्णव… म्हणजे वैदिम्क रूपात आहे. माधवराव पेशव्यांच्या दैनंदिनीत दोन महत्त्वाचे आदेश आहेत ते या दृष्टीने पाहिले पाहिजेत. एका आदेशानुसार विठ्ठलाला बाट लागू नये म्हणून महारांना चोखामेळांच्या दगडापलीकडे (समाधीपलीकडे) जाऊ देऊ नये तर दुसर्या आदेशानुसार शिवमंदिराच्या रक्षणासाठी दोन महार रक्षक नेमावेत. म्हणजेच शिवाला बाट लागत नव्हता पण विठ्ठल वैष्णव मानला गेल्यामुळे मात्र त्याला बाट लागत होता. ही सांस्कृतिक उलथापालथ समजावून घ्यायला पाहिजे. संतांच्या वारीचं मूळ समतेसाठी होतं. विठ्ठल त्यासाठी आदर्श देव होता कारण तो अवैदिक होता. पण वैष्णव रूपांतरामुळे समतेची गुढी जातीयतेच्या दलदलीत संतचळवळीच्या आरंभकाळापासून फसली ती फसलीच.
पण हा झाला इतिहास. आधुनिक काळात वारी ही आधुनिकतेची गुढी उभारेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. कोणीही न बोलावता लाखो लोक एकत्र येत हरीनामाचा गजर करत पायी पंढरीची वाट तुडवतात ही घटनाच अनोखी आहे यात शंका नाही. देशी-विदेशी विद्वानांनाही हे गूढ उलगडण्यासाठी सायास करावं वाटणं हेही स्वाभाविकच होतं. पण ही वारी भावभक्तिची आहे की पलायनवादी लोकांनी शोधलेली ही पंढरीवाट आहे यावर प्रश्न उठणंही तेवढंच स्वाभाविक होतं. वारकरी खरंच समतेचे पाईक आहेत की केवळ समतेचं सोंग घेतलेले वैदिक बुरखे आहेत हेही प्रश्न वारंवार उठत आले आहेत. कारण वारकरी आणि त्याहीपेक्षा त्यांचे फडकरी आजवर जे वर्तन करत आले आहेत ते नक्कीच समतेचे, स्वातंत्र्याचे आणि बंधुतेचे द्योतक नाहीत.
अलीकडचंच महत्त्वाचं उदाहरण घ्यायचं म्हणजे आनंद यादव यांच्या ‘संतसूर्य तुकाराम’ या कादंबरीचं. ऑगस्ट २००८ मध्ये ही कादंबरी प्रकाशित झाली होती. त्यावर विविध वृत्तपत्रांत सविस्तर समीक्षणंही प्रसिद्ध झाली होती. एकाही समीक्षकाला ही कादंबरी (ती रद्दड वाटली तरी) आक्षेपार्ह आहे अशी वाटली नव्हती. तोवर असंख्य वाचकांनीही ही कादंबरी वाचली होती. त्यांनाही ती आक्षेपार्ह वाटली नव्हती. पण साहित्यसंमेलनाचे पडघम वाजू लागले आणि आनंद यादव निवडूनही आले आणि एकाएकी देहुकरांना जाग आली. अक्षरशः दहशतवाद माजवत यादवांना त्यांची कादंबरी मागे घ्यायला लावली गेली. जगाच्या इतिहासातील हे एकमेव उदाहरण असावं. यादवही कणाहीन असल्याने ते पुरते झुकले. एवढंच नव्हे तर संमेलनाध्यक्षपदाचा राजीनामाही दिला. अध्यक्षाशिवाय साहित्यसंमेलन भरवायची नामुष्की महाराष्ट्रावर ओढवली.
मी यावर वारकरी तालिबानी झाले आहेत अशी जाहीर प्रतिक्रिया दिली होती. कर्हाडकर माझ्या घरावर दगड फेकायला तयारही झाले होते. पण त्यांना त्यासाठी आर्थिक प्रायोजक न भेटल्याने तो बेत बारगळला ही बाब वेगळी. पण ह.भ.प. देगलुरकर महाराजांनी एक ‘फतवा’ जारी केला आणि त्यात म्हटलं, ‘संतांबद्दल श्रद्धायुक्त अंतःकरणानेच लिहिलं पाहिजे. अन्यथा लिहू नये.’
हे सर्व सांगायचं कारण म्हणजे वारकरी संप्रदाय हा नेमका कशासाठी होता, का होता, त्याने नेमकं कोणतं सामाजिक मूल्य विकसित करत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात भर घातली हे प्रश्न पडतात आणि त्यांची उत्तरं शोधली पाहिजेत म्हणून. वारकरी संप्रदाय हा भक्तीचा मेळा आहे म्हणून त्यावर चर्चाही करू नये असा अभिप्राय अनेक झुंडशाहीवादींचा असतो, पण ते तत्त्वतःच मान्य करता येत नाही. याचं कारण म्हणजे वारकरी संप्रदायाने आपली मर्यादा ओलांडत साहित्य-संस्कृतीच्याच प्रकट उद्गारावर घाला घालण्याचं पाप केलं आहे. कोणतीही साहित्यकृती टीकेसाठी उपलब्ध आहे, पण तिचा गळा दाबण्याचा अधिकार कोणालाही नाही हे किमान विद्रोही तुकारामांचे पाईक समजणार्या वारकर्यांना आणि फडकर्यांना समजलं नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे.
डाऊ केमिकलविरुद्धच्या आंदोलनात वारकर्यांनी पुढाकार घेऊन वारकरी ही एक सामाजिक शक्ती आहे असं दर्शवण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न केला असं म्हणण्यापेक्षा राजकीय शक्तिंनी वारकरी शक्तिला वापरून घेतलं असे जे आरोप झालेत त्याकडेही पहावं लागतं. वारकरी चळवळ ही सामाजिक चळवळ व्हावी अशी मतं आणि तसे प्रयत्न झालेले नाहीत अशातला भाग नाही. टिळकांनाही वारकरी संप्रदायाला राष्ट्रकार्यासाठी वापरता येईल असं सुरुवातीला वाटत होतं, पण त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. किंबहुना वारकरी संप्रदाय हा शाहु-फुले-आंबेडकरप्रणित प्रबोधनाच्या मार्गात सहाय्यक न बनता अडसरच बनून बसल्याचं आजवरचा इतिहास पाहता लक्षात येतं. अलीकडे अंधश्रद्धा निर्मुलनासाठीचं जे विधेयक येतं आहे त्यालाही वारकरी संप्रदायाचा कडवा विरोध आहे.
वारकरी संप्रदायाचं गेल्या काही शतकांत सावकाश वैदिकीकरण झालं. उच्चनीचतेचे संदर्भ तंतोतंत पाळणं, इतिहासाला भक्तिच्या नावाखाली गाडून टाकत नवेच संदर्भ देत जाणं हा धंदा महंतांनी सुरू केला आणि तो त्यांच्या अनुयायांनी पाळला. याचा फायदा राजकीय लोक न घेत तरच नवल होतं. आजकाल संघशक्तिच्या आहारी वारकरी संप्रदाय जात आहे असं जे अधून-मधून उद्गार का उठतात ही बाबही विचारणीय आहे.
यामागील मतितार्थ नीट समजावून घ्यायला हवा. लोक एकत्र येतात त्याची झुंड बनते. झुंडीचं कोणतंही तत्त्वज्ञान नसतं. त्यात एकात्मता नसते. परंपरेचं ओझं आणि व्यक्तिगत भावनिकता यातून वारी होते पण त्यात सामाजिक भान नसतं. वारी वर्षातून दोनदा होत असली तरी सप्त्यांच्या रूपाने ती अष्टौप्रहर महाराष्ट्रभूमीवर अस्तित्वात असते. या सप्त्यांचे प्रायोजक स्थानिक राजकारणी आणि गांवगुंड असतात हा योगायोग नसतो. किर्तनकार आज सर्व समाजातून आहेत, पण त्यांना त्याच्याशी घेणंदेणं नसतं. आपापल्या समाजातील किर्तनकार बोलवायचा प्रघात आहे. याला जर कोणी समतेची चळवळ म्हणजे वारकरी संप्रदाय असं म्हणत असतील तर ते मूर्खांच्या नंदनवनात वावरत आहेत असंच म्हणायला पाहिजे. किर्तनकारी हा आजचा क्लासवाल्यांसारखाच मोठा धंदा बनला आहे. गाडगेबाबा, तुकडोजी महाराज कधीच अस्तंगत झालेले आहेत.
महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून एक विचित्र प्रथा पडली आणि ती म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पहिली महापूजा. भारत देश हा धर्म-निरपेक्ष आहे अशी आपली समजूत आहे. सत्ताधार्यांनी आपापला धर्म व्यक्तिगत पातळीवर पाळायला कोणाचीही हरकत असण्याचं कारण नाही. मात्र शासकीय इतमामात पहिली महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असेल तर पुढचा प्रश्न अपरिहार्यपणे असा उपस्थित होतो की आपण धर्मनिरपेक्ष राज्यात राहतो काय? महाराष्ट्र धर्मसापेक्ष राज्य कधीपासून झालं? घटनेची या कृत्याला मान्यता आहे काय? पुढची बाब म्हणजे मुख्यमंत्र्यांची आजवरची महापूजेनंतरची विधानं पाहिली तर ती अशीच असतात… ‘पाऊसपाणी चांगला होऊ दे, असं साकडं विठ्ठलाला घातलं…’ आता हेच मुख्यमंत्री (कोणत्याही पक्षाचे असोत) अंधश्रद्धेच्या विरोधातही बोलणार, विधेयकं आणणार आणि पुरेपूर अंधश्रद्धाळू विधानंही करणार. महाराष्ट्रभू टाळ्या वाजवणार. वारकर्यांच्या अंतःकरणात श्रद्धेचं तेज उमलणार…
वारी हा भक्तिचा व्यवहार आहे, उपचार आहे की भक्तिचा व्यभिचार आहे यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. मी होणारी गर्दी, त्यातून निर्माण होऊ शकणार्या (आणि झालेल्या) समस्या, अस्वच्छता, वारकर्यांच्या पंथोपपंथांचे आपापसातील मानपान याबद्दल लिहित नाही. वारकरी संप्रदाय आणि वारी केवढी भरकटली आहे हे आपल्या लक्षात आलं तरी पुरेसं आहे. या संप्रदायात परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता असतानाही वारीला राजकीय हालचालींचं आणि वैदिक सांस्कृतिक ढवळाढवळीचं प्यादं बनू दिलं आणि शेवटी नामदेव महाराज ते तुकोबारायांची समतेची जी संकल्पना होती तिला विकसित तर केलं नाहीच पण विषमतेच्या जंजाळात तिला कसं ढकलून दिलं आहे ही खरी चिंतेची बाब आहे.
वारीने सध्यातरी सांस्कृतिक अधःपतनाचा तळ गाठला आहे असं नाईलाजाने म्हणावं लागतं. श्रद्धा-भक्ती यांना आक्षेप असू शकत नाही. असूही नये. पण तिची फळं सामाजिक आहेत की असामाजिक याचा ताळेबंद मात्र मांडावा लागतो. ‘आहे म्हणून आहे वारी’ यात कोणी सांस्कृतिक उत्सव शोधू नये. सांस्कृतिक विकसनाची तर क्षमता कधीही दिसलेली नाही याची मात्र खंत असलीच पाहिजे. वारी भरकटलेली आहे… तिने ताळ्यावर येत खरं सामाजिक उत्सवगान बनावं अशी अपेक्षा करायला हवी खरं तर… पण राजकारण्यांच्या आहारी जात असलेल्या फडकर्यांना हे समजणार आहे काय?
- संजय सोनवणी

17 comments:

  1. मुळात भकतीमार्ग हाच मुळात मानवाच्या प्राथमिक अवस्थेतील दु:ख, तणाव, भीती घालवून तत्कालिन अशिक्षीत(अविकसित मन)मानवी जीवन सुरळीत चालविण्याचा एक प्रयत्न आढळून येतो. तो किती योग्य अयोग्य ही गोष्ट वेगळी. पण त्याही पुढे जाऊन मानवाच्या जाणीवा विकसीत करण्याचे जे मार्ग झाले. त्यात हया जुन्या झापडबंद मार्गांच्या अध्वर्यूनी सोनवणीसरांनी म्हटल्याप्रमाणे प्रबोधनाऐवजी अडथळेच आणले आहेत. नव्हे ती त्यांची गरजच होऊन बसली आहे. जैन बौध्द धर्म वगळता सर्वच धर्ममार्गांनी ईश्वर केंद्रीत भक्ती मार्गात सर्वच खंडातील लोकांना अडकवून ठेवले. परिणामी मानवी मन व निसर्ग संबध यांवर संशोधन त्यानुसार आचरण याबाबतच्या जाणीवा विकसित करण्याची वृत्तीच मारुन टाकली. मानवात मुळातच नैसर्गिकतेने मानवतेच्या जाणीवेच्या प्रेरणा पुरेपूर आहेत. परंतू या जाणीवा न्यायबुध्दी समत्व साक्षीभाव इ.चा सोयीनुसारच गैरवापर झालेला आहे. म्हणूनच आता भक्तीमार्गाच्या किती आहारी जायचे हे समजदारांनी ठरवायचे आहे. नव्हे ते मध्यममार्गीनेच समाज हा जातो आहे. एक मात्र नक्की कुठल्याही ग्लोबच्या टोकांवर /कडेला गती कमी असते. तर मध्यभागी परिवर्तनाची काळ यांची गती नेहमीच अधिक आढळते. तसेच या कटटरपंथी मार्गीयांचे होत आहे. परंतू सोनवणी सरांचे एवढे रोखठोक आणि खरे समत्वाने तटस्थपणे विश्लेषण करण्यासाठी अभिनंदन. आमच्या सारख्या बऱ्याच समविचारी लोकांना हे वाचून समाधान वाटते. व नव्या विषयांची आम्ही वाटच पाहत असतो. आपल्या सर्वाच्या पुढच्या पिढयांसाठी ही परिवर्तनाची प्रबोधनाची पहाटच मी मानतो. अभय वांद्रे,मुंबई.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. संजय सोनवणी,
    आपण जाग्यावर बसून वारी बद्दल बोलत आहेत प्रत्यक्षात केली आहे काय ?? समतेची शिकवण असल्यामुळे आज सर्व जातीचे लोक त्यात सामील होता. फडकरी , महाराज मंडळी म्हणजे वारी नाही हा वैष्णवांचा सुखाचा मेळा सनातन वाल्यांना रुचणारा नाही म्हणूनतर पुण्यात गणपती पुढे अथर्व शिर्षाची प्रथा वाढत चालली आहे.लोकमान्यांना वारी सारखी प्रती परंपरेची अपेक्षा होती म्हणूनतर त्यांच्या संकल्पनेचे बीज म्हणजे आजचे राजकीय अड्डा असलेला गणपती उत्सव. वारी आणि आपल्याला दिसणारे वारकरी यात भेद आहे . कीर्तनकार प्रवचनकार म्हणविणारी मंडळी स्वतः वारकरी कोठे आहेत ? वारीमधील परिवर्तनाची अपेक्षा तुमच्या सारख्या सुज्ञ माणसांकडून करायला हरकत नाही परंतु तुम्ही पुढाकार घेतलातर ? कंटाळा येणे स्वाभाविक आहे अजून तरी ८०० वर्ष वारीचा कंटाळा वारकऱ्यांना आला नाही.आणि हा कथकथीत आजच्या भोंदू महाराजांमुळे आजचे वारीचे स्वरूप नाही तर तुकोबांच्या अभंगाचे मूर्त स्वरूप आहे. वारकऱ्याबद्दल आपले विधाने बरोबर आहेत परंतु ते वारीच्या परंपरेला लागू होत नाही. निगेटीव्ह पाहण्यापेक्षा चांगल्या गोशीकडे लक्ष लावले पाहिजे तुम्ही उलट अंगानी थोडक्या गोष्टीचा उल्लेख करून परंपराच खंडीत करताहेत . ठीक आहे वारीचे वैदिकीकरण ( राजकारण + अर्थकारण + भोगविलास = वैदिकीकरण ) झाले असेल परंतु मनुष्याने मनुष्याच्या सुखासाठी हा सोहळा वाढवला आहे आपल्या 'अडनावा'शी आपण बांधील असतो हि तर ८०० वर्ष महाराष्ट्राच्या रक्तात भिनलेली आहे ती आता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अंगाची अविभाज्य घटक बनली आहे. देवत्व कोठे आढळत नाही परंतु त्याची अनुभूती अशा विशाल भव्य स्वरुपात अनुभव करण्यास हरकत नसावी. सांस्कृतिक अधः पतन वारीमुळे होत असेल तर ते ब्रह्मिण समाजाचे होत आहे कारण येथे पुजाऱ्याविना चाललेली धारा आहे या वारीला पंडिती आश्रय नाही. लोक स्वतःच्या सुखासाठी प्रवास करतात त्यांना कोठे तुमच्यासारखे तत्त्व माहिती असते? देव धर्माच्या नावावर एकत्र झालेल्या जनसमुदयाला, सामाजिक भान देण्याचे महान कार्य, महाराष्ट्रातील संतांनी १३ व्या शतकात करून सामाजिक क्रांतीची ज्योत पेटवली. या क्रांतीला वैचारिक वळण ज्ञानेश्वर महाराजांनी लाविले आणि परिपूर्णता तुकाराम महाराजांनी आणली. आजची दिसणारी वारी हि त्या क्रांतीचे फळ आहे. हे फळ व्यक्तीस्वातंत्र्याचे प्रतिक आहे. सामाजिकबांधिलकी जपून वैयक्तिक स्वतंत्रतेची पूर्तता म्हणजे वारी होय.. . अमर दांगट

    ReplyDelete
  4. काही गोष्टी बरोबर आहेत. माझी काकू अनेक वर्ष वारी करते. मी पण स्वतः २ वेळा तिच्याबरोबर थोडा गेलो होतो. पण तिथले मानपान बघून सर्द झालो आणि नंतर जाणे बंद केले. लहानपणी फार ओढ होती पण जे काही प्रत्यक्ष बघितले त्यामुळे भ्रमनिरास झाला. पण तुमचे वैदिक आणि अवैदिक फारसे पटत नाहीये अजून. म्हणजे तसे असू शकेल पण इतक्या सहजतेने ते झाले आहे ह्याचा अर्थ काहीतरी कुठेतरी आधीच्या गोष्टींचा लोकांना तिटकारा असला पाहिजेल. बाकी अभ्यास नसल्याने जास्त बोलणे बरोबर नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. काही गोष्टी बरोबर आहेत. माझी काकू अनेक वर्ष वारी करते. मी पण स्वतः २ वेळा तिच्याबरोबर थोडा गेलो होतो‍‌ पण तिथले मानपान बघून सर्द झालो आणि नंतर जाणे बंद केले. लहानपणी फार ओढ होती पण जे काही प्रत्यक्ष बघितले त्यामुळे भ्रमनिरास झाला. ;;;;;;;;;;;;;;;;;......... वारीत मान पान कोठे बघितले ?? का तुम्हाला वारीत आल्याबद्दल मानपान दिला नाही ? व्यापकतेने पाहायला पाहिजे. प्रत्येक मुक्कामी लाखो वारकरी मानपानासाठी येतात का ? तुकोबांच्या अभंगाचा आस्वाद घेतला का नाही ? फुगडी पावले नाचवली का नाहीत ? का केवळ लहानपणी मानपानाचे निरीक्षण करायला गेले होते ? तुकोबांचा अभंग आणि वारी नसली असती तर महाराष्ट्राच्या कान्याकोपाऱ्यात केवळ वैदिक संचारच पाहायला मिळाला असता. १० ते २० लाख पायी चालतात ते काय उपाशी राहणार का ? चालता चालता साली कचरा रिकाम्या बाटल्या कोठे टाकणार ? महाराष्ट्र शासनाला ते पण tax भरतात पण शासन काय सोय करते ? तात्पुरत्या काचराकुड्या आहेत का ? यासाठी जो प्रयत्न करेन त्यामुळे निश्चितच स्वच्छता होईल. महापुरुषांनी स्वतः आंदोलनात भाग घेतला स्वतः प्रयत्न केले.... चैतन्य चला आपण संजयजीना घेऊन त्यासाठी प्रयत्न करू. वारकरीकीर्तनकाराची वाट बघण्यात काय अर्थ आहे. दोष दाखवण्या पेक्षा ते घालविण्यासाठी उपाय सुचविले पाहिजे.

      Delete
    2. अहो माझी दिंडी आधी का तुझी आधी ह्यावरून भरपूर वाद पाहिलेत. माझे कीर्तन आधी का तुझे. तिथेही मान ठेवला पाहिजेल. काय आहे की आपल्या संस्कृतीमध्ये मोठ्या माणसांचा मान ठेवला पाहिजेल असे सांगितले आहे पण जेंव्हा कर्तृत्वापेक्षा फक्त मी मोठा आणि वेगळ्या जातीचा मग तो ब्राह्मण असो वा अजून कोणी असो असे होते तेंव्हा वैताग येतो. दिंडी बरोबर चालणारे खरोखर किती भक्तीभावाने येतात हां प्रश्नच आहे. पण असे म्हटले की राग येतो मग ८ शतकांची यात्रा वगैरे इमोशनल गोष्टी होतात. असो पण तुमचा हां मुद्दा १०१% मान्य आहे की इतक्या लोकांची सोय होत नाही. मलाही ह्या गोष्टीचे आश्चर्यच वाटते पण काय आहे आपल्याकडे एकदा एखाद्या गोष्टीची सवय लागली की ती तशीच आहे असे काहीसे मनात ठरावून लोक वागतात. असो ह्यावर उपाय तुम्ही म्हणता तो मान्य आहे की आपणच काहीतरी केले पाहिजेल पण दुसरीकडे असेही मी पहिले आहे की स्वयंसेवक करता आहेत म्हटल्यावर सरकारी लोक आणि कामगार हात काढून घेतात. म्हणजे पैसे घेतील पण काम करणार नाहीत.

      Delete
    3. एवढ्या दिंड्या आहेत म्हणजे त्या क्रमाने चालणे योग्यच आहे . तुम्हाला तो अनुभव कुठे आला माहित नाही . पण मी बघतोय तेव्हा पासून तरी पालाखीत्ला क्रम ठरलेला असतो . मागचा पुढे जात नहि. पुढचा मागे येत नाही . हे क्रम सुध्दा आधी आलेल्याला पहिला या प्रमाणे मिळाला आहे . त्या त्या दिवसाची कीर्तने आणि इतर कार्यक्रम ठरलेले असतात . त्यात वाद कोणत्या मुक्कामी झालेला आढळला ?
      आजकाल काही ग्रुप येत आहेत . यांना पालखीच्या जवळ एखाद्या दिंडीत चालायचे असते. मग ते जास्तीचे पैसे देवून बघ्तत. पण यांना इतरांमध्ये मिक्स व्हायचे नसते . वैदिक मंत्र जागर वगैरे कार्यक्रम राबवतात . काहीजण रामदासांचे साहित्य वारकर्यांनी वापरावे म्हणून प्रचाराला येतात
      सुविधा वाढल्यापासून वारीत लोकांचे प्रमाण जस्तच वाढले असून याचा त्रास मनापासून वारी करणाऱ्यांना होतो . अर्थात सध्या हि स्थिती ट्रेकिंग पासून सर्व ठिकाणी झाली आहे .

      Delete
  5. स्वत:च्या फायद्यासाठी वैदिक जर अवैदिकांच्या देवतांना स्वीकारत असतील तर अवैदिकांनीही वेदांचा अधिकार मिळवायला हरकत काय आहे? वैदिकांनी जर अवैदिकांच्या हक्कांवर अतिक्रमण केले असेल तर आता अवैदिकांनीही वैदिकांच्या हक्कांवर अतिक्रमण करायला हवे.

    ReplyDelete
  6. sanjay ji kilrtankar mhanje class wale ahet aase apale mhane ahe mag je tatkhatit samajsudharak karykrmana yetat tewha pahit ghetat kiwa lekhanchya badalyat mobadale milwatat tyana kay mhanwe nusate durun nirikshan karne aani tyata shamil houn nirikshan karane yat farak asato dusare ase jar mukhyamantrichi puja tumhala khatakatee tar mag hech sarw lok ifttar party athwa itar kuthalya karykramana jatat te nahi ho khatkat tumcha mhanan ahe ki dhangarnacha dev hijack kela aho pan vaidikani tyala motha kelana tyach kay ek samjik samrsata aali na ti nako ahe ka tumhala ka shaivani shiv pujva vishnwani vishnu asech chalu dyave ka ? chaintynasaheb bar pandharpur la janar jo varkari asato na to tumchaya ewada vicharwant nasato to bhola bichara dyanoba tukaram mhanat nighalela asato jewha maulichi palkhi pandarpurat yete tewha bhaga sagle kase ekmekaan paya padat asatat sarw maulimay houn jate

    ReplyDelete
  7. बाबामहाराज सातारकर , बंडातात्या कराडकर , इंदोरीकर , रामराव ढोक हे कीर्तनकार सर्वांना परिचित आहेत . यांना त्यांच्या जातीचेच लोक बोलावत असतील हा एक विनोद होईल . इतर लहान मोठ्या कीर्तन कार्यक्रमाची पत्रिका बघितली तरी त्यात वेग वेगळ्या जातीचे कीर्तनकार दिसून येतात .
    शंकराच्या मंदिरात अस्पृश्य ठरवल्या गेलेल्या समाजाला कधी प्रवेश होता ? रक्षणाला ठेवलेल्या लोकांना आत सोडत होते का ?

    पुराणांचा , वेदांचा विकास कसा झाला ? कोणती देवता कोणत्या काळात निर्माण झाली हे वारकरी संतांना माहित होते का ?

    संतसूर्य कादंबरीत तुकारामांची प्रेम प्रकरणे रंगवली होती . तुकाराम शिवाजींना तुम्ही रामदास स्वामींकडे जा असा उपदेश करताना दाखवले होते . या कादंबरीला समीक्षकांनी आक्षेप घेतला नाही म्हणजे हे योग्य झाले का ?

    ReplyDelete
  8. संजय महाराज वारीबद्दल एक सांगायचे आहे

    पांडुरंग हा जर शैव असेल तर गरुड ध्वज खांब आहे त्या ठिकाणी एक मोठ्ठा नंदी आणून बसवण्याचे आंदोलन आपण चालू करा - ताबडतोब ! मस्त कल्पना आहे - विचार करा -

    झेपेल त्या धातूचा करा -किंवा दगडाचा करा -

    त्या शेजारी वघ्याच पण पुतळा ठेवायचा का ?

    ReplyDelete
  9. च्यायला! ह्या इलेक्शनमध्ये धनगरांना एकतरी खाते देऊन टाका राव! त्याशिवाय ही पौंड्र पौंड्रंक पौंड्रिकेश्वर ची पुंगी थांबणार नाही.

    ReplyDelete
  10. सोनवणी! तू आणि रामटेके दोघांनी वारीवर वार करायला सुरुवात केली तरी नेम कोणी धरला आहे हे न कळण्याइतके वारकरी दुधखुळे नाहीत.

    ReplyDelete
  11. सोनवणे साहेब,आपल्या पूर्वज नीतिवान होते.प्रत्येक नव्या विचारला स्वत: समाहित करणे त्यांना येत. होते. लोकांमध्ये परस्पर सद्भाव राखण्यासाठी भिन्न भिन्न विचारवंतांच्या देवतांना ही एकसूत्रात माळण्यासाठी 'विष्णू' नावाच्या देवतेचे दशावतारात सर्वाना स्थान दिले तर त्यात वाईट काय? काही लोक विष्णू हा नागांचा देवता होता व इंद्र विरोधी होता असे ही मानतात. पण आज आपण सर्व देवतांना विष्णू, रूपाने पाहतो. 'सर्व धर्म समभाव' यालाच म्हणतात. वैदिक धर्म तर लोक केंव्हाच विसरून गेले. नवीन नवीन देवता येत राहतील आणि जो पर्यंत आपण त्यांना आपल्यात समाहित करत राहू तो पर्यंत देशात, शांती आणि प्रेम राहील.

    ReplyDelete
    Replies
    1. विवेकवादी, बुद्धिवादी बना. काय देव देव करीत बसला आहात. सोडा त्या सगळ्या अंधश्रद्धा आणि बना अस्सल मानववादी!

      Delete
  12. विठ्ठल मन्दिर धनगर राजा नी बांधले आहे

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...