Monday, July 8, 2013

सुशिक्षित आहेत तरी कोठे?

शिक्षणाचा प्रचार-प्रसार वाढला तसे साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे. वाढले नाही ते सुशिक्षिततेचे प्रमाण. उच्चपदवीधरही क्वचितच सुशिक्षित असतांना दिसून येतात कारण ते त्यांच्या अविकसित जाणीवांच्या, बुरसटलेल्या विचासरणींच्या आणि आधुनिकतेपासून दूर पळण्याच्या प्रवृत्तीमुळे. त्यामुळे सामाजिक-सांस्कृतीक प्रश्न सुटणे तर दुरच पण अधिकाधिक गुंतागुंतीचे होत चालल्याचे आढळुन येते. त्याचे पडसाद आपण अलीकडच्या नाशिकच्या जातपंचायतीच्या अनाचारातून अथवा नित्यश: वाढतच चाललेल्या जाती-धर्म-वर्चस्वतावादातून पाहू शकतो.

झापडबंद शिक्षणपद्धतीमुळे आमचा नागरिक "सुशिक्षित" होत नाही म्हणुणच तो आधुनिकही होवू शकत नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञाने मुबलकपणे वापरात आणली म्हणुन कोणी आधुनिक होत नसतो. आधुनिकता ही विचारांत व आचारांत यावी लागते. सहिष्णुता-उदारता आणि प्रश्न मुळातून समजावून घेत नंतरच त्यावर भाष्य करण्याची प्रवृत्ती विकसीत करावी लागते. प्रत्यक्षात आपल्या सामाजिक जीवनात त्याचा दिवसेंदिवस अभाव वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सुशिक्षित नसलेल्या, अर्धवट ज्ञानाने अत्यंत घाईत नि:ष्कर्ष काढण्याच्या प्रवृत्तींना प्रोत्साहन मिळत आहे. बोधी गया येथे झालेल्या साखळी स्फोटांत शासकीय यंत्रणाच नव्हेत तर सर्वसामान्य नागरिकांनी (नेटक-यांनीही) तात्काळ त्यामागील गुन्हेगार कोण हे घोषित केले एवढेच नव्हे तर त्यावर वाक्युद्ध्येही झडू लागली. परस्पर धर्मांवर/जातींवर/राजकीय पक्षांवर शाब्दिक हल्ले सुरू झाले. असे दरवळेस होते. हे काही "आधुनिक" भारतियांचे लक्षण नव्हे.

वाढत्या असहिष्णुतेचे दुसरे उदाहरण म्हणुन आपण चिकित्सा नाकारण्याच्या वाढत्या दु:ष्प्रवृत्तीकडे पाहू शकतो. धर्मपंडितांना चिकित्सा अमान्य असते हे गृहित धरले तरी ज्ञानाच्या विकसनासाठी ती सर्वसामान्यांना आवश्यक बनून जाते. इतिहासाची, ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचीही पुन्हा पुन्हा चिकित्सा करणे हे समाजाच्या एकुणातल्या भावी विकसनासाठी आवश्यकच असते. किंबहुना अचिकित्सक समाज हा अंध समाज बनत जातो व म्हणुनच तो अंधारयुगात जगत असतो. आज आपला समाज एकुणातच अंधारयुगातच जगत आहे असे म्हनावे लागते कारण आम्ही क्रमश: इतिहास आणि धर्मचिकित्सा थांबवत नेल्या आहेत.

आज बुद्ध, राम, पैगंबर, शिवाजी महाराज ते बाबासाहेब यांची चिकित्सा करणे म्हणजे कोणता ना कोणता समाज सरळ शत्रू बनवून घेणे. चिकित्सा म्हणजे टीका करण्यासाठीच असते असा सर्वसाधारण समज आपल्याकडे दृढ होत चालला आहे. प्रत्येक महापुरुष जातींत वाटला गेल्याने इतिहास हा जातीनिहाय, धर्मनिहाय बनत गेला आहे. इतिहासाचे शुद्धीकरण करण्याच्या नादात जातीय मंडळी इतिहासाचे शुद्धीकरण न करता विकृतीकरण चालले आहेत हे आपण असंख्य उदाहरणांतून पाहू शकतो. एखाद्या व्यक्तीवरील टीका म्हणजे ती त्या व्यक्तीच्या जातीतील सर्वांवरीलच टीका असा सोयिस्कर अर्थ घेणा-या आणि टीकाकारांवर झुंड बनवित सरळ हल्ले चढवणा-या महाभागांची संख्या कमी नाही. याचे कारण म्हणजे लोक जातीय बेड्यांत घट्ट अदकलेले आहेत आणि या बेड्या त्याला झुंडीच्या मानसशास्त्रानुसार वर्तन करायला लावतात हे आपण पाहू शकतो. भटक्या विमुक्तांच्या जातपंचायतींवर टीका करत असतांना या जातीय झुंडीय मनोवृत्तीवर तेवढीच टीका करणे भाग पडते कारण जातीय दात दाखवण्यआच्या पद्धती वेगळ्या असतील पण मनोवृत्त्या मात्र त्याच आहेत.

चिकित्सेच्या अभावात ज्ञान आणि विचार पुढे जावू शकत नाहीत याचे भान आपण हरपून बसलो आहोत. आमचे पालक चिकित्सा नाकारतात. आमची शिक्षणपद्धतीही चिकित्सा नाकारते. धर्मशिक्षण आणि शालेय ते उच्च-शिक्षण हे एकाच तागड्यात मोजता येईल असे बनलेले आहे. धर्म चिकित्सा नाकारतो कारण धर्माची बिंगे फुटण्याचा धोका असतो. धर्मचिकित्सकाला "पाखंडी" ठरवून मोकळे होणे त्यांना गरजेचे वाटते. युरोपातही असे घडुन गेले आहे...पण तिकडील विचारकांनी मध्ययुगातच धर्मलंडांना प्रसंगी छळ सोसुनही शेवटी शरण आणले. कारण ते चिकित्सक होते. प्रश्न विचारत होते. उत्तरेही शोधत होते. म्हणुन ते ब-यापैकी आधुनिकही बनले.

आज एकविसाव्या शतकात येवुनही आम्ही मात्र मध्ययुगातच अडकून पडलो. आमची मानसिकता अधुनिक बनलेच नाही. त्यामुळे आजही आमची मदार पुरातन काळातील ख-या-खोट्या गौरवांवर असते अथवा पाश्चात्यांनी शोधलेल्या उत्तरांवर असते. आम्ही आमची विचार करण्याची समग्र पद्धत बदलू शकेल असा एखाद-दुसरा अपवाद केला तर विचारवंत/तत्वज्ञ पैदा केला नाही कारण मुळात तशी मानसिकताच आम्ही जोपासली नाही व ज्यांनी जोपासली त्यांचे पंख जातीय पिंज-यांत बंदिस्त करुन छाटुन टाकले. राजकारण्यांना हे अधिक सोयीचे होते. विखंडित प्रजा हे अनिर्बंध राज्य करण्यास मुक्तद्वार देत असते. त्यामुळे विचारी समाज त्यांना नकोच असतो. किंबहुना त्याचेच प्रतिबिंब आपल्या शिक्षण पद्धत बनवण्यात पडलेले आहे असे दिसते.

समीर मोहिते या धडाडीच्या तरुणाने टाटा समाज विज्ञान संस्थेमार्फत कोकणातील दोन गांवातील सातवी व नववीत शिकणा-या विद्यार्थ्यांचे एक सर्वांगीण सर्वेक्षण केले. त्यातील निरिक्षणे काळजीत टाकणारी आहेत. विद्यार्थी दशेतच जातीय जाणीवा, जातिभेद व लिंगभेद जाणीवा कशा विकसीत झालेल्या असतात व त्यांचे निराकरण करण्याची कसलीही सोय आपल्या शिक्षणपद्धतीत नाही. बव्हंशी विद्यार्थ्यांचे मित्रही आपल्याच जातीतील असतात. याचाच अर्थ असा कि ते कितीही कथित उच्च-शिक्षित बनले तरीही ते फक्त साक्षरच राहनार कारण त्यांच्या विचारपद्धतीत आमुलाग्र बदल करण्याची सुविधा आपली समाजव्यवस्थाच उपलब्ध करून देत नाही.   

मानवी मेंदू हा विचार करण्यासाठी, नवनवीन संकल्पना शोधण्यासाठी आणि पुर्ण सामर्थ्याने अभिव्यक्ती करण्यासाठी असतो. तेवढी नैसर्गिक शक्ती ही प्रत्येक व्यक्तीत असतेच. प्रश्न असतो तिच्या विकसनासाठी योग्य मार्ग देण्याचा. दिशा देण्याचा. त्यात आम्ही क्रमश: कमी पडत गेल्याने आज साक्षरांची मोठी फौज निर्माण झालीय खरी. पण सुशिक्षितांच्या अभावामुळे असहिष्णुता जोमाने फोफावत चालली आहे. एखाद्या जातीय संघटनांची खोट्या इतिहासाने भरलेली व म्हणुनच उथळ विचारांची चार पुस्तके वाचून "क्रांतीकारक" बनण्याची स्वप्ने पाहणारी तरुणांची पिढी बनते ती यामुळेच. भडक भाषा, विशिष्ट जातीसमुहाला सातत्याने शिवीगाळ केल्याने समाज बदलत नसतो याचे भान तथाकथित विचारवंतांनी व म्हणुण त्यांच्या अनुयायांनीही गमावले असेल तर याचा अर्थ हाच निघतो कि आमची तरुण पिढी घडवण्यात समाज अपयशी ठरला आहे. घडवले जात असतील तर जाती-धर्मांच्या पारंपारिक बेड्यांत अडकवून घेणारे गुलाम.

आणि हे चित्र मुळीच सुखावह नाही. ते बदलावे असे शासनकर्त्यांना वाटने शक्य नाही कारण ते तरी कोठे सुशिक्षित आहेत? ते तरी कोठे आधुनिक आहेत? ज्या शिवराळ भाषांत आपले आपले नेते बोलत असतात आणि श्रोतेही निर्लज्जपणे टाळ्या वाजवत असतात त्यांना समाज सुशिक्षित होणे कसे आवडेल? त्यांना आव्हाने नाही उभी राहणार? सत्तेची समीकरणे जुळविण्यासाठी त्यांना परंपरेच्या गुलामीत अडकलेले समाजच हवे असणार हे उघड आहे. त्यामुळे ते कसलाही गुणात्मक सामाजिक बदल घडवून आणतील या आशेत राहण्यात काही एक अर्थ नाही.

मनुष्यक्रांती हे समाजाने ध्येय बनवायला हवे. मनुष्य क्रांती ही माणसाला प्रगल्भ नागरिक बनवण्यासाठी व्हायला हवी. ती समाजालाच करावी लागेल. पण त्यासाठी आधी काहींनी तरी गुलामीच्या बेड्यांना तोडावे लागेल. मोकळेपणे चिकित्सा करायला आणि स्वीकारायला शिकावे लागेल. प्रश्न उपस्थित करावे लागतील आणि उत्तरेही शोधावी लागतील. प्रज्ञावादाचा आश्रय घेतल्याखेरीज असे घडणे असंभाव्य आहे. आम्ही असे करु शकत नसू तर पुढील पिढ्या आपल्याला क्षमा करणार नाहीत याचेही भान असायला हवे. खोटा इतिहास कोणाच्याही कामाला येत नाही...खोटा धर्मही नाही मग खोटी जात काय कामाला येणार हा प्रश्न आम्हीच आम्हाला विचारायला हवा. जातपंचायतींच्या अमानुषपणावर बोलतांना आम्हीही वैचारिक अमानुषच बनलेलो आहोत याचे भान ठेवले कि उत्तर शोधणे सोपे जाईल.

अर्धवट वैचारिकता ही सर्वात अधिक हिंसक असते. असहिष्णू आणि म्हणुनच असंयमी आणि उथळ असते. मूल्यशिक्षण आपल्या शिक्षणपद्धतीने कधीच हद्दपार केले आहे. पालकांनाच मूल्यव्यवस्थेचे वावडे असल्याने घराघरांतून दिले जाणारे मूल्यशिक्षणही कधीच बाद झाले आहे. आणि त्यातुनच आजचा आपला सांस्कृतिकतेचा महान वारसा सांगणारा, त्याचा अभिमान बाळगणारा असांस्कृतीक समाज घडला आहे. या दुभंगपनातुन बाहेर पडण्यासाठी सर्वांनाच कंबर कसावी लागेल...

3 comments:

  1. "मूल्यशिक्षण आपल्या शिक्षणपद्धतीने कधीच हद्दपार केले आहे. पालकांनाच मूल्यव्यवस्थेचे वावडे असल्याने घराघरांतून दिले जाणारे मूल्यशिक्षणही कधीच बाद झाले आहे. आणि त्यातुनच आजचा आपला सांस्कृतिकतेचा महान वारसा सांगणारा, त्याचा अभिमान बाळगणारा असांस्कृतीक समाज घडला आहे." very true sir.

    ReplyDelete
  2. आता शिक्षण पध्दती बदलण्यासाठी आंदोलन झाली पाहिजे. नव्हे ते भारतीयांच्या मेंदूत सवयीने घटट बसलेल्या बऱ्याच मानसिक आजारांवरचे उपचारासाठी निदान आहे. या मुळापर्यंतच भारतीय शिक्षणतज्ञ,सामाजीक मानसिक वैज्ञानिक अभ्यासक यांना जावे लागेल. विवेक, नीती मानवता तसेच वर सांगितल्याप्रमाणे नैसर्गिक गुणांचा विकास, ब्रेन डेव्हलपमेंट आणि प्रत्यक्ष ज्ञान,अनुभव यांची सांगड मानव विकासासाठी प्रयत्न करावेच लागतील. अन्यथा सोनवीण सरांच्या मागच्या एका लेखात आतापर्यंत बऱ्याच मतलबी संधीसाधू भित्रया साक्षर पिढया तयार झाल्या आहेत. त्यामुळे वर सांगितलेली सर्व आवश्यकता हीच काळाची गरज ठरेल. वागणे बोलणे,रस्त्याने वावरतांना सार्वजनिक बाबींचे गांभीर्य, स्त्रीया बालके वृध्द यांच्याशी तर सर्रास वाद घातले जातात.ही तर या शिक्षीत साक्षर पिढयाचे भातावरचे शित होय. समतेचा केवळ यांत्रिक अर्थ् न घेता समत्व मनामध्ये बसले पाहिजे. त्यासाठी मनावरच उपचार शिक्षणपध्दतीमध्ये झाले पाहिजे. ज्यामुळे जात धर्म इर्शा मतलब ढोंगीपणा पाखंड इ. बाबी बऱ्याच अंशी कमी व्हावयास मदत होईल. नव्या पिढया या नव्या दिवसांच्या वाहत्या चैतन्याच्या आहेत. म्हणून आधुनिक मन जाणीवेवर आधारीत मन कौशल्य विकसित होणे ही जबाबदारी वर सांगितलेल्या या सर्व जबाबदार घटकांची राहिल. मुक्त नैसर्गिक श्वासानेच काम करावे लागेल. नामात न अडकता जाणीवा जाग्या केल्याच पाहिजे. श्वास साधना,चित्तएकाग्रता, व्यायाम,संयमाची जाणीव,नवे करुन दाखवण्याची वृत्ती,तिचा सन्मान तिला संयम सल्ला हा पूरक अाहार द्यावाच लागेल.आणि सुरुवात ती लहान वयातच मग काय पुढे हे विश्वची माझे घर..(अभय)

    ReplyDelete
  3. संपूर्ण लेख वाचला एक एक शब्द अतिशय मोलाचा शब्दांची सजावट कोठे करत आली असती तर यातले बहुतांश शब्द त्यात ठेवले असते. परखड शब्दांमुळेच विचारांना परखड पणा येतो आणि दिसतोही. मनवी जीवनात चिकित्सा हि फार महताव्ची बाब आहे हे माहित होते पण पटवून कसे सांगावे हे माहित नव्हते. अनेक गोष्टी आपल्याला माहित असतात पण त्या पटवून सांगता न येत असल्याने आपण उल्लेखलेल्या " सुशिक्षित लोकांसमोर " प्रतिवाद करत येत नाही. या देशातील पुरोगामी बनलेल्या समाजाला आपल्या सारख्या विचारवंतांची खरोखर खूप गरज आहे
    धन्यवाद !

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...