Thursday, August 29, 2013

हे रात्री...हे वचन तुला...

ज्या समाजांना आपण नेमक्या कोणत्या विचारांवर, विचारांसाठी आणि अंतिम जीवनध्येयासाठी जगतो हेच माहित नसते ते समाज "जीवंत समाज" कसे असू शकतात? असे कोणते विलक्षण समाज असतात ज्यांना स्वत:चे विचार तर नसतात परंतू विचार करू पाहणा-यांना जगू न द्यायचे व्रत घ्यायचे असते? ज्या कोणत्याही व्यक्ति-समाजाला मानवी व्यथा-वेदनांना आधार देत वैश्विक समाज बनण्याची प्रेरणाच नाही तो समाज "जीवंत समाज" असतो काय? आम्ही सारे मेलेलो तर नाहीत? मरलेलेपणात मेलेले जीवन शोधणारे तर बनलेलो नाहीत? 
कोठे आहे आमचे जीवन? कोठे आहे आमचा सळसळता आत्मविलास? कोठे गेले ते आमचे प्रगल्भ जीवनचिंतन? कोठे गेला तो आमचा अभंग आत्मविश्वास?
व्यासांनी महाभारताची सांगता करतांना एक आक्रोश केला होता..."उर्ध्व बाहू विरोन्मैश्य न कश्चित शृणोति माम..." दोन्ही बाहु उभारुन मी आक्रोश करीत आहे तरीही तुम्ही ऐकत का नाही? खरेच...दीड-दोन हजार वर्षांपुर्वी जी एका चिंतकाची समस्या होती ती आजही आपली आहे. आज सारेच चिंतक आहेत आणि तरीही समस्या बदललेली नाही. आम्ही सारेच वांझ चिंतक आहोत याचा दुसरा पुरावा काय असू शकतो बरे?
सारेच आक्रोश करीत आहेत...पण आक्रोशांना सांत्वन देईल असे कोणी आम्ही निर्माण करु इच्छित नाही...
तुम्हारी भी पराजय
हमारी भी पराजय...गायचे असेच?
छे!
आम्ही नव्या विजयांच्या गाथा लिहिणारच...
हे रात्री...हे वचन तुला...
पुन्हा ही रात्र आम्ही पाहणार नाही!

No comments:

Post a Comment

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...