Thursday, August 29, 2013

आम्ही अर्थभान कसे विसरलो?

आम्ही अर्थभान कसे विसरलो?


भारताची जागतिकीकरणाची सुरुवातच मुळात अगतिकतेतून सुरू झाली होती. भारताला परकीय गंगाजळी संपली म्हणून सोने गहान ठेवावे लागले होते हा इतिहास आपल्या लक्षात असेलच. कै. नरसिंहरावांनी ढासळलेल्या, दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या देशाला तारण्यासाठी अर्थव्यवस्था खुली करण्याचे धोरण स्वीकारले. त्यामुळे अर्थव्यवस्था तरली आहे असे चित्र जरी सुरुवातीला दिसले असले तरी तिचा पाया पोकळ आहे हे आपल्या अर्थतज्ञांनी लक्षात घेतले नाही. बदलत्या व्यवस्थेचा फायदा घेण्यापेक्षा गैरफायदाच घेणा-यांची संख्या आपल्या देशात अधिकची निघाली. आज आपण त्याचे परिणाम आर्थिक आणि सांस्कृतीक पडझडीच्या रुपात भोगत आहोत.
खरे तर भांडवलबाजार हा देशाच्या ख-या अर्थस्थितीचे प्रतीक नसतो. भांडवलबाजारातील चढ-उतार आणि अर्थव्यवस्थेतील चढउतार यांचा फारच कमी संबंध असतो. किंबहुना भागभांडवल बाजारातील गुंतवणुक ही नेहमीच जुगाराच्या पातळीवर वावरत असते. आयपीओ अथवा कर्जरोख्यांच्या रुपात एखादी कंपनीच उत्पादक कार्यासाठी भांडवल उभारते तेंव्हाची बाब सोडली तर एरवीची भांडवलबाजारातील गुंतवणूक ही ख-या उत्पादकतेशी कधीच जोडलेली नसते.तो पैसा कधीही कंपन्यांकडे उत्पादकतेसाठीए जात नाही तर दलालांच्या साखळेतून फिरत राहतो. भांडवलबाजार खरे तर भावनिक लाटांवर चालणारा शासनमान्य जुगार असतो. परंतू हे लक्षात न घेतल्याने हर्षद मेहता ते केतन पारेख जन्माला आले. लक्षावधी गुंतवणुकदारांना देशोधडीला लावू शकले. आजही आपला भांडवलबाजार नेमका कशासाठी आहे याचे भान आपल्याला नाही. जी गुंतवणूक प्रत्यक्ष वस्तूउत्पादन अथवा सेवांउत्पादनात जाणार नाही तिला गुंतवणूक कसे म्हणता येईल हा विचार आमच्या अर्थतज्ञांना शिवला नाही. तसे प्रबोधनही केले गेले नाही.
परकीय भांडवल जे शेयर मार्केटमद्ध्ये येते ते मुळात स्थायी गुंतवणूक या स्वरुपात नसल्याने ते कधीही काढून घेतले जाऊ शकते हा विचार का केला गेला नाही? आपला भांडवलबाजार अचानक चढतो काय, कोसळतो काय याचा वास्तव अर्थव्यवस्थेशी काय संबंध असतो? विदेशी गुंतवणूकही बव्हंशी स्थायी पायाभुत संपत्तीत गुंतवली गेलेली नसून परताव्यांच्या अपेक्षांत आभासी समभागांत गुंतवली गेलेली आहे याचे भान आपण ठेवलेले नाही. या गुंतवणूकीचा देशी उत्पादकता वाढवण्यासाठी काहीही उपयोग नाही याचे भान आम्ही ठेवायला हवे.
या गुंतवणुकीमुळे भारताच्या एकुण सकल उत्पादनांवर कसलाही फरक पडणार नाही कारण मुळात ती उत्पादक कार्यात गुंतवली गेलेली नाही. अशा गुंतवणुकी होतात आणि काढुनही घेतल्या जातात. देशाच्या अर्थव्यवस्थेवर तिचा सकारात्मक परिणाम होत नसून ती केवळ कृत्रीम फुगवटा निर्माण करीत असते. मग ही गुंतवणूक देशांतर्गतची असो कि परकीय चलनातून होणारी. परंतू नव्या अर्थव्यवस्थेच्या गारुडात अडकत जात आम्ही अर्थभान विसरलो.
आपली पडझड येथेच थांबत नाही. आम्ही जागतिकीकरणच मुळात अगतिकतेतून स्वीकारले असल्याने समान पातळीवरील जागतिक व्यवहार करण्याच्या अवस्थेत आम्ही कधीच नव्हतो. आपली आधीचे बंदिस्त अर्थव्यवस्था लायसेन्स राजच्या जर्जर रोगाने पछाडलेली होती हे वास्तव मान्य केलेच पाहिजे. आणि म्हणुनच ती अत्यंत चुकीचीही होती.
परंतू ती चूक दुरुस्त करण्यासाठी आत्मघातकी पर्याय निवडला गेला. खरे तर आधी देशांतर्गत खुली अर्थव्यवस्था निर्माण केली जायला हवी होती. देशांतर्गत स्पर्धा निर्माण करत देशी उद्योगांना स्पर्धेची सवय लावायला हवी होती. देशांतर्गत लायसेन्सराज संपवत अर्थव्यवस्था खुली करत देशी उद्योगांना स्पर्धेच्या वातावरनात आधी आणने गरजेचे होते. लायसेन्सराजमुळे अत्यंत आळशी बनलेल्या, संशोधन व विकासाकडे सर्वस्वी पाठ फिरवलेल्या, प्रतिगामी उद्योजकांना त्या सुस्ताईतून आधी बाहेर काढण्यासाठी हे अत्यावश्यकच होते. भारतात भांडवलाची चणचण नसून काळ्या पैशांच्या ओझ्याखाली दबलेली आपली अर्थव्यवस्था वरकरणी दरिद्र स्वरूप दाखवत आहे हेही आपल्या लक्षात आले नाही. अर्थव्यवस्था एकाएकी खुली केली गेल्याने अनैतिक मनोवृत्तीच्या उद्योजकांनी लाभाचे नवे मार्ग बनवले. विदेशी तंत्रज्ञान आयात करण्याची, संयुक्त उद्योग उभारण्याची होड लागली. फक्त कागदावरचे असंख्य उद्योग अस्तित्वात आले आणि भांडवलबाजारातून त्यासाठी (बुडवण्यासाठी) पैसेही उभारले गेले. कायदे दिवसेंदिवस कडक करावे लागले तरीही आजही प्रत्यक्ष परिस्थितीत फरक पडलेला नाही.
गरज नसलेल्या गरजा वाढवणे व गरजांपेक्षा अधिक उत्पादन करणे हा नव्या अर्थव्यवस्थेचा मूलमंत्र आहे. भारतात वाहिन्या आल्या त्या मुळात या देशाला सुसंस्कृत-प्रगल्भ करायला नव्हे तर एक नवी कर्जाधारीत संस्कृती निर्माण करण्यासाठी. मानवी जीवनाचे नसलेले अवास्तव रुप आजच्या असंख्य वाहिन्यांवरील अगणित कार्यक्रम दाखवत असतात. भारतीय समाजाची एकुणातील मानसिकताच बदलवायला या वाहिन्यांनी हातभार लावला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ही मानसिकता सकारात्मकतेत बदलवण्याऐवजी ती अवास्तव स्वप्ने पहायला भाग पाडत निष्क्रीय जीवन जगायला प्रेरीत करणारी, नैतीक प्रेरणांचे हनन करणारी आणि इझी मनीच्या जोखडात गुंतवणारी बनू लागली. या नव-अर्थव्यवस्थेचा घोंघाव एवढ्या वेगाने झाला कि त्या चकाचौंधीने व तात्पुरत्या दिसलेल्या फायद्यांनी आपण चुकीची वाट पकडली आहे हेच आपल्या लक्षात आलेले नाही.
शाश्वत अर्थव्यवस्थेचा मुलभूत नियम असतो तो म्हणजे गरजांवर नियंत्रण आणि अनुत्पादक कर्जांपासून पूर्ण फारकत. परंतू आपला समाज या लाटेत एवढा सापडला आहे कि त्यामुळे आपलीच अर्थव्यवस्था आपण पोखरत आहोत याचे भान उरले नाही. एवढेच नव्हे तर यामुळे आपण एकुणातील समाजमानसिकतेचेही नुकसान करत आहोत हेही लक्षात आले नाही. त्याचे केवळ आर्थिकच नव्हेत तर सामाजिक दु:ष्परिनाम आपण आता भोगू लागलो आहोत. आपल्या ब्यंका अशा अनुत्पादक अतिरेकी कर्जांचे विशिष्ट समुहांना वाटप केल्याने खरे तर कधीही कोसळतील अशा अवस्थेत आहेत. ज्या कर्जांच्या परतफेडींची कसलीही शक्यता नाही अशी बुडित कर्जांची रक्कम पाहिली तर भोवळ येइल. साडेसहा लाख कोटी एवढी रक्कम आज बुडित आहे. यात खरेच व्यवसाय अडचणेत आल्याने बुडित कर्जांचे रक्कम अर्थातच कमी आहे. या लबाड्यांना वाव देणारी आपली अर्थव्यवस्था आहे.
नैतीक मूल्ये आभाळातून पडत नसतात अथवा शिकवून येत नसतात. अर्थव्यवस्था ज्या प्रेरणांना जन्म देते त्याचे अपरिहार्य प्रतिबिंब सामाजिक मानसिकतेवर प्डणे अपरिहार्य असते. संयमाचा कडेलोट, सहिष्णुतेचा व विवेकवादाचा अंत आणि मानवी नातेसंबंधांत येणारा अंतराय आपल्या अर्थव्यवस्थेचाच एक अपरिहार्य भाग आहे हे वास्तव आम्ही आता तरी लक्षात घ्यायला हवे. अलीकडीलच हत्याकांडे असोत, बलात्कार असोत, अब्जावधी रुपयांचे आर्थिक गुन्हे असोत, ब्रष्टाचाराला असलेले जनसमर्थन असो...दिवसेंदिवस समाजमन बधीर करणा-या घटनांमागील मानसिकतेचा विचार करून पहा, म्हणजे मला काय म्हणायचे आहे हे लक्षात येईल. जी अर्थव्यवस्था आम्ही स्वीकारली आहे तीच मुळात भारतीय मानसिकतेच्या विपरित आहे. तिचा पाया हा बव्हंशी "मागणा-यांच्या" बाजुचा आहे...देणा-यांच्या नव्हे. आता जेही अर्थव्यवस्थेशी निगडित कायदे येवू घातले आहेत ते बाहेरील गुंतवणूक मागण्यासाठी आहेत...देण्यासाठी नव्हेत. देशांतर्गत उद्योजकता वाढावी यासाठी आमचे काय प्रयत्न आहेत? बाहेरच्या कुबड्यांनी राष्ट्राची खरी व शाश्वत प्रगती होत नसते हे आपल्या लक्षात आलेले नाही. आपण जागतीक अर्थव्यवस्थांबरोबर बरोबरीच्या नात्याने व्यवहार जोवर करू शकण्याच्या स्थितीत येत नाही तोवर अशा निर्णयांचे दुरगामी अनिष्टच परिणाम होणार याबाबत शंका बाळगू नये.
भारताला पुन्हा शाश्वत अर्थव्यवस्थेची कास धरावी लागणार आहे. अमर्याद गरजा कृत्रीमपणे निर्माण करत जात विक्र्या वाढवत फोफावते आहे असे दिसणारी आणि म्हणुणच आकर्षित करनारी अर्थव्यवस्था ही एक मृगजळ आहे. त्यातून जी तथाकथित प्रगती साधली जाते आहे तीतून कोणत्या मानवी प्रेरणांचे विकसन होणार आहे हा आपल्या समोरचा ज्वलंत प्रश्न आहे. समाज-सांस्कृतीक समस्यांचे मूळ अर्थविषयक प्रेरणांत असते...अर्थव्यवस्थेत असते. तिच्या जगड्व्याळ चक्रातून जे समाज घटक अपरिहार्यपणे दूर ढकलले जातात त्यांना येणारे वैफल्य कोणत्या घटनांतून प्रकट होतेय याचे चित्र आपण रोजच्याच निराशच करणा-या वृत्तांतून पाहू शकतो.
आपल्याला पुन्हा एकदा आपल्या अर्थप्रेरणा तपासून पहायला हव्यात. शाश्वत अर्थव्यवस्थाच चिरंतन असते हे लक्षात घ्यायला हवे. आम्हाला अर्थभान हरपून चालणार नाही.

9 comments:

  1. विज्ञानाचा नितीमत्तेशी काहीही संबंध नसतो. याचा अर्थ विज्ञानातून नीतीला समर्थन मिळत नाही. तसेच विज्ञानाचा नीतीला विरोधही नसतो. थोडक्यात, विज्ञान हे नितिनिरपेक्ष असते.
    त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनही नीती-अनीती निरपेक्ष कार्यरत राहतो.

    उदार अर्थव्यवस्था ही आर्थिक विकास करण्यासाठी प्रत्येकाला स्वातंत्र्य तसेच संधीची उपलब्धताही करून देते. आर्थिक विकासाला ती प्रतिष्ठा निर्माण करून देते. तसेच व्यक्तीमध्ये आर्थिक विकासाची प्रेरणाही निर्माण करते.

    उदार आर्थिक व्यवस्था ही आर्थिक विकासाबरोबरच चंगळवादी प्रवृत्ती निर्माण करते. आणि त्यातूनच शोषणही वाढत जाते. कोणत्याही परिस्थितीत आर्थिक विकास हेच माणसाचे ध्येय बनून जाते. साहजिकच या प्रक्रियेत नितीमत्तेला फारसे महत्त्व राहत नाही.

    सध्याचे युग हे वैज्ञानिक दृष्टिकोनाचे तसेच उदार अर्थव्यवस्थेचे आहे. त्यामुळे या युगात नीतीला फारसे स्थान नाही. नीतीचे समर्थन करणारे कोणतेही तत्त्वज्ञान/ विचारधारा समाजाला मार्गदर्शन करण्यास समर्थ ठरत नही.

    प्रगतीचे भौतिक व सांस्कृतिक असे दोन अंग असतात. या दोन्हीही अंगांचा समतोल विकास होण्यातूनच प्रगती पूर्णत्वाला जाते. सध्या भौतिक प्रगतीला सीमा नाही. तथापि सांस्कृतिक प्रगतीचे काय ? आणि त्यातून निर्माण होणाऱ्या शोषण, द्वेष, संघर्ष यांचे काय ?
    Posted by Harihar Sarang at 02:02 No comments:

    ReplyDelete
  2. संजय सर ,

    विज्ञान हे समाजासाठी आहे का नाही ? कलेसाठी कला तसे विज्ञानाचे पण आहे का ?

    अणुबॉम्ब बनवणारा शेवटी रडलाच ना ?

    विज्ञानाची फळे तर अर्थ व्यवहारातून समाजाच्या दारा पर्यंत पोचवली जातात

    कमी उत्पादन,किंवा उत्पादनात हात राखून कमतरता निर्माण करून मागणी पुरवठा यात जे घडते त्यातून काळा बाजार निर्माण होतोच

    अशा वेळी नीती अनीतीचा समाजाने विचार केला नाही तरी सरकारला नाइलाजाने विचार करावाच लागणार ! नाहीतर गंभीर परिस्थिती निर्माण होईल !



    कामगाराची कुशलता डावलून त्या जागी मशीन येत जाउन कमी श्रमात जास्त आणि उत्तम प्रतीचे उत्पादन मशीन करते - ते संप करत नाही - मागण्या आणि अडवणूक करत नाही हे फायदे आपल्या सारख्या मनुष्यबळ अफाट असलेल्या देशाला परवडतात का ?

    नाइलाजाने " परवडत नाहीत " असे जरी उत्तर मन देत असले तरी आपण खुल्या भांडवल व्यवस्थेत तसा आग्रह धरू शकत नाही -

    एकीकडे उपासमार होणाऱ्या कुशल अकुशल कामगारांचे तांडे बेकारी सहन करत फिरत आहेत -अनेक कारखाने निम्म्या क्षमतेने काम करत आहेत - शेतकरी कर्जबाजारी होत आहे आणि तरीही बाजारपेठा लिपस्टिक पावडर आणि कपड्यांच्या उत्पादनाने ओसंडून वाहात आहेत - काही ठराविक वर्गच त्याचा उपभोग घेऊ शकेल - ते पण काही काळ - नंतर तो वर्ग पण या बेकारीच्या भोवऱ्यात ओढला जाइल - हे कसे टळणार -

    सरकारी भ्रष्टाचार , फसलेल्या पाणी योजना आणि वाढती बेकारी आणि रुपयाचे अवमुल्यन याने आत्ताच रुद्रावतार धारण केला आहे !शेती हा आपल्या अर्थ व्यवस्थेचा कणा खरच आहे का ?

    जर असेल तर ही कोस्मेटीक जीवनशैली भिरकावून देत आपण या संकटातून वाचवू शकू का आपल्या देशाला ?

    अशा कठीण परिस्थितीत आसाराम प्रभुतिञ्चा जास्त गवगवा होत जातो - सत्तेच्या एजंट लोकाना असे संत जवळ करणे सोयीचे असते - अशा सत्ताधारी मंडळीना संत महंत आणि अंध श्रद्धाळू समाज असे त्रिकुट आपली सत्ता टिकवायला बरे वाटते - अशा मस्तवाल संताना पोसण्यात त्यांचे हितसंबंध जपले जात असतात - हीच बेकार अर्धपोटी जनता आपल्या राज महालावर चालून येईल अशी सार्थ भीती त्यांना झोपू देत नाही म्हणून त्यांना हे आतातून कुंकू काढणारे प्रिय वाटतात - हिलिंग इफेक्ट च्या गोंडस नावाखाली अंधश्रद्धेची शेती बहरून येत जाते - हेच आपल्या देशाचे स्वप्न होते का ?

    इतक्या पंच वार्षिक योजना आल्या गेल्या - संस्कृतीच्या नावाखाली आपण याच अंध श्रद्धा जपणार आहोत का ?

    आपल्या गरजा कमी करायला तशी जागृती करायला कोण सरसावेल पुढे ?

    हे पण एक प्रकारचे व्रतस्थ कार्य आहे - डॉक्टर सरांच्या आपल्यातून जाण्याने अशी अनेक कार्ये अर्धवट राहणार का ?आज देशाला त्यांची किती गरज होती ते समजते

    ReplyDelete
  3. खरे कारण आहे कि आपण अर्थव्यवस्थेचे देशी मोडेल स्वीकारले नाही . अर्थात आपले भारतीय तत्व स्वीकारण्या ऐवजी पश्च्त्यांचे स्वीकारायची मानसिकता आपण स्वीकारली आहे . ती प्रत्येक क्षेत्रात लागू आहे . जो उपायअमेरिकेला योग्य आहे तो भारताला योग्य राहू शकणार नाही कारण भारत ब अमेतिका यात प्रत्येक बाबतीत फरक आहे . आपल्याकडे कमीत कमी २००० वर्षांची नागरी समाज जीवन पध्दत अस्तीतीवात होतॆ. त्यामुळे आर्थिक बाबतीत सुध्दा आपल्याकडे पूर्वीच्या शासकांनी विचार केला होता. व त्यापासून आपण प्रेरणा घेऊ शकतो. उदा. आर्य चाणक्य , शिवाजी महाराज इ.

    ReplyDelete
  4. संजयजी


    आपण म्हणता ते एकदम खरे आहे

    आपली शेयर बाजाराची पत ही आपल्या देशाच्या आर्थिक ताकदीची कधीच द्योतक असू शकत नाही हे सत्य आहे आणि जी काही गुंतवणूक परदेशातून होत जाते ती फक्त संधिसाधू टोळक्यांची

    नीती अनीती विधिनिषेध नसलेल्या लुटारूंची एकत्र विचारसरणी असते - ते धर्म ओळखत नाहीत - त्याला कोणतीही देशप्रेमाची बैठक नसते - आणि ते गृहीत धरूनच आपण वावरले पाहिजे . भांडवलदार हा नफा या एकाच तत्वावर जगात असतो - त्यासाठी तो कितीही कोलांट उडया मारत असतो - नक्राश्रू ढाळत असतो - पण त्याला जात पात पंथ आणि देश यांचे सोयरसुतक नसते - उलट जनतेला उल्लू बनवायला तो या सामाजिक सन आणि संस्कृतीच्या लांब लांब गप्पा ठोकत असतो !

    एकीकडे कामगार हा पण त्यांच्या समाजवादी तत्व ज्ञानामुळे काशावरही विश्वास ठेवत नसतो - अंततः संस्कृती हि आजकाल एक मार्केटिंग ची गोष्ट झाली आहे - गणपती असो गोकुळाष्टमी असो किंवा दसरा दिवाळी - असह्य होणारी जाहिरातबाजी आणि भपका यामुळे माणूस खऱ्या आनंदाला पारखा झाला आहे -

    आणि भ्रष्टाचार , बेकारी यामुळे देशाची वाताहत होत आहे त्यातच अंधश्रद्धेचा वावटळीने देश भ्रमिष्ट झाला आहे - शनि शिंगणापूर आणि तत्सम ठिकाणांची चाललेली भरभराट काय सांगते ?

    आपण खऱ्या निरोगी वैद्न्यानिक दृष्टीकोना पासून कित्येक मैल दूर आहोत आणि अजूनच लांब जात आहोत - त्यातच आपल्याला मनःशांती मिळते की काय अशी भीती वाटते कधी कधी

    आपल्या शातून विज्ञानावर

    आधारीत विचारधारा रुजवली जात नाही

    कोण करणार हे सर्व ?

    सर्व सामाजिक संघटना आज एकमेकांपासून अंतर ठेवून आहेत

    आसाराम बापू आणि नरेंद्र महाराज या सारखे विकृत आपल्याला संत म्हणवून घेत आहेत आणि समाज त्यांच्या मागे जात आहे !

    एक मोट्ठे खग्रास ग्रहण डॉक्टरांच्या हत्येच्या रूपाने लागले आहे

    ReplyDelete
  5. पुण्याचे नामकरण ‘संभाजीनगर' करा! (PART-I)

    पुणे जिल्ह्याला मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती राजे संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यायला हवे. मालोजी राजे भोसले यांनी पुण्याची पायाभरणी केली. मालोजी महाराजांचे पणतु छत्रपती संभाजी महाराजांनी पुण्याच्या भूमीला आपल्या रक्ताचा अभिषेक केला. मराठ्यांच्या लढावू इतिहासाला सर्वोच्च स्थानी नेले. भोसल्यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करण्यासाठी पुणे जिल्ह्याचे नाव ‘संभाजीनगर' असे ठेवण्यात यावे. येत्या १४ मे रोजी संभाजी महाराजांची जयंती आहे. त्याचे औचित्य साधून राज्यातील लोकशाही आघाडी सरकारने हा निर्णय घ्यावा. सरकार हा निर्णय घेणार नसेल, तर पुरोगामी विचारांच्या संघटनांनी त्यासाठी आंदोलन करावे, असे मी या निमित्ताने सुचवू इच्छिते.


    पुण्याचे संभाजीनगर असे नामांतर करणे कसे संयुक्तिक आहे, हे पाहण्यासाठी पुण्याचा धावता इतिहास पाहणे आवश्यक आहे. पुण्याला इ.स.च्या ९ व्या शतकापर्यंतचा जुना इतिहास आहे. इ.स. नवव्या शतकाच्या मध्य काळातील काही ताम्रपटांत पुन्नक या नावाचे उल्लेख असलेली छोटी वसाहत म्हणजे आजचे पुणे होय, असे इतिहासकार मानतात. ९ व्या शतकाच्या अखेरीस पुणे देवगिरीच्या यादवांनी ताब्यात घेतले. यादवांचे राज्य बुडाल्यानंतर महाराष्ट्रात मुस्लिम राज्यकत्र्यांचा अंमल सुरू झाला. या काळात पुणे वेगवेगळ्या मुस्लिम राजवटींच्या ताब्यात राहिले. या संपूर्ण काळात पुण्याचा इतिहास फार देदिप्यमान असा नव्हता. पुण्याला ऐतिहासिक झळाळी मिळवून देण्याचे काम केले ते वेरुळच्या भोसल्यांनी. आज पुण्याचे जे काही स्थान, ते केवळ आणि केवळ भोसल्यांमुळे. १५९५ मध्ये पुणे आणि सुपे ही गावे मालोजी राजे भोसल्यांना जहागिर म्हणून मिळाली. मालोजी राजांच्या ताब्यात येताच पुण्याचा उत्कर्ष सुरू झाला. हीच जहागिर वंश पुढे शहाजी राजांकडे आली. शहाजी राजांनी पुण्याचा संपूर्ण कायापालटच केला, हे सर्वज्ञात आहे.
    पुणे आणि छत्रपती संभाजी राजे
    पुण्याचा आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा संबंधांबाबत येथे लिहिण्याची गरज नाही. कारण हा इतिहास जवळपास सर्वांना माहिती आहे. पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला. शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात येतो. पुण्याच्या लाल महालात शिवाजी राजांचे बालपण गेले. तसेच स्वराज्यातील अनेक महत्वाचे किल्ले पुणे जिल्ह्यातच आहेत. मराठा साम्राज्याचे द्वितीय चक्रवर्ती सम्राट आणि शिवरायांचे ज्येष्ठ चिरंजीव छत्रपती संभाजी महाराज यांचा आणि पुण्याचा संबंध लोकांना फारसा माहीत नाही. संभाजी राजांचा जन्मही पुणे जिल्ह्यातच झाला. पुण्यापासून अवघ्या २० किमी अंतरावर असलेल्या पुरंदर किल्ल्यात संभाजी महाराजांचा जन्म झाला. तो दिवस होता १४ मे १६५७. पुरंदर हा पुणे जिल्ह्यातला एक तालुकाही आहे. शिवरायांप्रमाणेच संभाजी महाराजांचे बहुतांश बालपणही पुणे परिसरातच गेले. महाराज २ वर्षांचे असतानाच त्यांच्या मातोश्री महाराणी सईबाई यांचे अकाली निधन झाले. जिजाऊ माँसाहेबांनी राजांचे संगोपन केले. शिवरायांप्रमाणेच त्यांच्या छाव्यालाही जिजाऊ माँसाहेबांकडून राजकारणाचे सर्व शिक्षण मिळाल्यामुळे संभाजी महाराज प्रतिशिवाजी म्हणून कर्तृत्व गाजवू शकले. संभाजी महाराज १७ वर्षांचे असताना शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि संभाजी महाराज युवराज बनले.

    ReplyDelete
  6. पुण्याचे नामकरण ‘संभाजीनगर' करा! (PART-II)

    थोरल्या महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज छत्रपती झाले. मराठ्यांचे राज्य बुडविण्यासाठी दिल्लीचा सम्राट औरंगजेब ५ लक्ष फौज घेऊन महाराष्ट्रावर चाल करून आला. त्याच्या फौजेत ४ लाखांपेक्षाही जास्त हत्ती, घोडे आणि इतर जनावरे होती. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या छोट्याशा सैन्यानिशी औरंगजेबाशी सात वर्षे कडवी झुंज दिली. औरंगजेब महाराष्ट्रभर किल्ले जिंकित फिरला, परंतु त्याला ते कायम स्वरूपी कधीच ताब्यात ठेवता आले नाही. शेवटी औरंगजेबाने फंदफितुरीचा मार्ग अवलंबून १ फेब्रुवारी १६८९ रोजी कोकणातील संगमेश्वर येथे संभाजी महाराजांना कैद केले. नियतीची योजना फार कठोर असते. ज्या पुणे परिसरात महाराजांचा जन्म झाला त्याच परीसरात नियतीने त्यांचा मृत्यू लिहिला होता. तसे नसते तर कोकणात पकडले असताना महाराजांना ठार मारण्यासाठी औरंगजेबाने त्यांना घाटावर आणले नसते. संभाजी महाराजांना ताब्यात घेतल्यानंतर औरंगजेबाला मराठा सैन्याकडून असलेला धोका वाढला होता. हे जाणून औरंगजेब लगोलग घाट चढून तुळापूरला आला. तुळापूर हे गाव पुण्यापासून अवघ्या ४० किमींवर आहे. पुणे जिल्ह्यातच हे गाव येते. तुळापुरात महाराजांना ठार मारण्यात आले. आणि त्यांच्या देहाचे तुकडे करून परीसरात दूरवर फेकून देण्यात आले. जवळच असलेल्या वढू बुद्रूक गावातील शूर मावळ्यांनी महाराजांच्या देहाचे तुकडे गोळा करून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. तुळापुरात महाजांना ज्या ठिकाणी मारण्यात आले, त्या ठिकाणी कमान उभारण्यात आलेली आहे. तसेच वढू बुद्रुक गावात महाजांची समाधी आहे. ही दोन्ही स्थळे संभाजी महाराजांच्या शौर्याच्या जिवंत खुणा आहेत.



    छत्रपती संभाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाला ब्राह्मण इतिहासकारांनी दाबून ठेवले होते. महाराजांना बदफैली ठरविण्यात आले होते. तुळापूर, वढू बुद्रुक ही खरे तर महाराष्ट्रासाठी तीर्थस्थळे व्हायला हवी होती. कारण येथे मराठ्यांचा राजा धारातीर्थी पडला होता. मात्र, ब्राह्मणी कारस्थानाचा महिमा असा की, ही स्थळे दुर्लक्षित राहिली. अलीकडे पुरोगामी विचारांच्या संघटनांनी ती नव्याने प्रकाशात आणली. संभाजी राजांना पकडून देण्यामागे तसेच त्यांना हाल हाल करून मारण्यामागे ब्राह्मणांचा ब्रेन होता, हे आता इतिहासकारांनी शोधून काढले आहे. येथे प्रश्न असा निर्माण होतो की, मराठ्यांनी त्या काळीच आपला योग्य तो इतिहास का लिहिला नाही. तेव्हा मराठयांनी इतिहास लिहून ठेवला असता, तर आता जुनी कागदपत्रे धुंडाळणयचे काम पडले नसते. याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे, छत्रपती संभाजी महाजाराजांच्या मृत्यूनंतर मराठा सैन्य नुसते लढतच राहिले. इतर कामे करण्यास त्यांना कुठे वेळ होता. पुढची संपूर्ण २१ वर्षे मराठे लढत होते. मराठ्यांनी आपले साम्राज्य औरंगजेबाच्या हाती जाऊ दिले नाही. हतबल औरंगजेबाला महाराष्ट्रातच देह ठेवावा लागला. या संपूर्ण काळात मराठ्यांना इतिहास लिहायला किंवा आपली पूज्यस्थाने जपायला वेळ नव्हता. इतिहास लिहिण्याची जबाबदारी समाजातील विद्वान वर्गाची असते. महाराष्ट्रात ही जबाबदारी ब्राह्मणांकडे होती. ब्राह्मणांनी आपली जबाबदारी नीट पार तर पाडली नाहीच, उलट छत्रपती संभाजी राजांचा चुकीचा इतिहास प्रसृत केला. मराठे लढत होते, तेव्हा ब्राह्मण खोट्या बखरी लिहिण्यात गुंतले होते. ब्राह्मणांनी महाराष्ट्रद्रोह केला. अजूनही तो सुरूच आहे.

    उपसंहार
    छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातला. त्यांचे बालपण पुणे जिल्ह्यात गेले. जिजाऊ माँसाहेबांनी त्यांनी राजकारणाचे बाळकडू याच जिल्ह्यात दिले. याच जिल्ह्याच्या मातीने त्यांचा मृत्यू पाहिला. महाराजांचा देह याच मातीत विलीन झाला. पुणे जिल्ह्याची माती संभाजी महाराजांनी पुण्याच्या मातीला आपल्या रक्ताने पावन केले आहे. या पाश्र्वभूमीवर पुणे जिल्ह्याला संभाजीनगर हे नाव देणे हे एक ऐतिहासिक पाऊल ठरेल. हीच लोकभावना आहे. राज्यातील लोकशाही आघाडी सरकारने लोकभावनेचा आदर करून पुणे जिल्ह्याच्या नामांतराचा ठराव लवकरात लवकर आणावा. महाराजांचे नाव दिल्याने पुणे जिल्हा ख-या अर्थाने पुण्यवंत
    होणार आहे. हे पुण्यकर्म सरकारने करावेच. महाराष्ट्रात संभाजी महाराजांच्या नावाने कोणतेही शहर नाही. ही उणीव भरून काढली जायला हवी.
    FINISHED.

    ReplyDelete
  7. फारच छान

    विक्रोळीला मी संभाजी लेडीज बार पाहिला आहे- त्याचा मालक मराठी आहे पण ब्राह्मण नाही

    संभाजी बिडी तर जग प्रसिद्ध आहे

    संभाजी हेयर कटिंग सलून , संभाजी वडा पाव ,संभाजी लोटरी सेंटर मी पुण्यात पहातो आहे

    ह्या दुकानांचा मालक मराठी आहे पण ब्राह्मण नाही - असे कसे ?

    अहिल्या मटन शोप आहे - त्याचा मालक ब्राह्मणेतर आहे

    पण एकंदरीत संभाजी नगर हे पुण्याचे नाव ठेवण्याची कल्पना फारच सुंदर आहे


    संभाजीनगर मधील संभाजी पुलावरून पलीकडे जाउन संभाजी बागेच्या जवळील

    संभाजी केश कर्तनालयात संभाजी पवार नावाचा न्हावी संभाजी हिंगमिरे या गिऱ्हाइकाला

    शेजारच्या संभाजी वडापावची तारीफ सांगत होता

    वाक्य रचना आणि अर्थ यामुळे माणूस हरखून जाइल

    करूया करूया असेच करूया

    पण इतके वर्ष म न पा मध्ये आपलीच सत्ता आहे

    का बरे हा अलौकिक विचार आधी कुणाला सुचला नाही ?

    आपले पहिले महापौर बाबुराव सणस आणि उप महापौर होते पारगे - दोघेही कडवे मराठा

    पण त्याना नाही सुचले - त्यांनी लाल महाल परत नित कवला जिजामाता उद्यान संभाजी पूल आणि शिवाजी पूल असे नामकरण केले

    ज्याला सर्व पुणेकर लाकडी पूल आणि नवा पूल असेच म्हणतात

    संभाजी नगरचे उप नगर शिवाजी नगर असे काहीतरी होईल

    औरंगाबादचे नामकरण पण काय बरे आहे केलेले संभाजीनगर का शिवाजीनगर ?

    आपण परत एकदा नीट विचार करूया - मधल्या वेळात बाजीरावाचा पुतळा पर्वतीवर हलवून तिथे शहाजी -जिजाबाई ,शिवाजी आणि संभाजी - राजाराम असा ग्रुप पुतळा बसवावा

    ReplyDelete
  8. पुणे नावाला मोठा इतिहास आहे. पुनवडी ते पुणे असे मोठे स्थित्यंतर घडत हे नाव आले आहे. संभाजी महाराजांचा पराक्रम मोठा आहे यात वाद च नाही पण पुण्याला त्यांचे नाव द्यायचे प्रयोजन कळले नाहि. उगाच काही पण नवीन खूळ काढायचे का? आणि या ठिकाणी ते लिहायचे कारण काय? औरंगाबादचे संभाजी नगर आणि उस्मानाबादचे धाराशिव (धाराशिव हे खरे मूळ नाव आहे उस्मानाबादचे ) असे नामांतर युतीच्या काळात झाले होते ते विलासराव देशमुख हे खानदानी (?) मराठा मुख्यमंत्री असताना त्यांनी बदलून परत औरंगाबाद आणि उस्मानाबाद केले. त्यावर बोला. नाही तर संभाजी महाराजांचे यथोचित स्मारक करा, त्यांच्या नावाने एखादा पुरस्कार द्या किंवा अजून काही विधायक, समाजोपयोगी कार्य करा पण पुण्याचे नाव बदलायचे नाव पण घेवू नका. एकतर ते होणारच नाही झाले तर लोकच स्वीकारणार नाहित.
    बाकी संभाजी महाराजांना त्यांच्याच मेव्हण्याने फितुरी करून मुघलांना पकडून दिले. स्वकीयांनी फितुरी केली म्हणून ते पकडले गेले आणि राजराम महाराज व त्यांच्या सरदारांनी त्यांना सोडवायचे प्रयत्न केले नाहित. सोनवणी सरांनी यावर मागे धागा पण काढला होता. गादी साठी संभाजी विरुद्ध सोयरा बाई / राजाराम अशी लढाई होती यामध्ये आधी संभाजी यशस्वी झाले आणि नंतर हरले (१६८९ साली ). स्वराज्याला पण फंद फितुरी आणि बंडाळी चा शाप होता. स्वत संभाजी थोरल्या महाराजाविरुद्ध जावून मुघालाना मिळाले होते हा इतिहास आहे.

    ReplyDelete
  9. ‘मुस्लीम कवींची मराठी कविता’ हा शोधप्रबंध लवकरच ईबुक स्वरुपात प्रसिद्ध होत आहे.


    जयसिंगपूर (कवितासागर वृत्तसेवा) कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात अभ्यासक किशोरकुमार काशिनाथ कांबळे यांनी डिसेंबर २००९ मध्ये पीएच. डी. (मराठी) पदवीसाठी सादर केलेला व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरकडून अधिकृतरीत्या मान्यताप्राप्त झालेला शोध प्रबंध ‘मुस्लीम कवींची मराठी कविता’ लवकरच ईबुक स्वरुपात कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर मार्फत प्रसिद्ध होत आहे. अशी माहिती प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. ‘मुस्लिम कवीची मराठी कविता’ या संशोधनास देवचंद कॉलेज, अर्जुननगरचे यांचे मार्गदर्शन लाभले असून सदर संशोधनातील सहा प्रकरणात खालील बाबींचा समावेश करण्यात आला आहे...

    • प्रकरण पहिले - प्राचीन मुस्लीम कवींची काव्य परंपरा: प्रास्ताविक, मुस्लिमांचे भारतात आगमन, भारतात इस्लाम धर्माचा स्वीकार, पार्श्वभूमी, मुस्लीम मराठी संतांचा उदय, मुस्लीम मराठी संत, मुस्लीम मराठी शाहीर, आणि निष्कर्ष.

    • प्रकरण दुसरे - आधुनिक मुस्लीम कवींच्या मराठी कवितेचा उदय, विकास, स्वरूप व प्रेरणा: प्रास्ताविक, मुस्लीम साहित्याची पार्श्वभूमी, मुस्लीम साहित्य संकल्पना, मुस्लीम साहित्य व्याख्या, मुस्लीम साहित्याच्या प्रेरणा, मुस्लीम साहित्य प्रवाह, मुस्लीम कवितेचे स्वरूप आणि निष्कर्ष.

    • प्रकरण तिसरे - मुस्लीम मराठी कवितेचा आशय: प्रास्ताविक, सामाजिक आशय, धार्मिक - सांस्कृतिक आशय, राजकीय आशय, आर्थिक आशय, राष्ट्रीय एकात्मता, प्रबोधन, मानवतावाद आणि निष्कर्ष.

    • प्रकरण चौथे - मुस्लीम मराठी कवितेतील सांस्कृतिक संघर्ष: प्रास्ताविक, धर्मांतर, जातीयता, मूलतत्त्ववाद, उपरेपणाचं दु:ख, राष्ट्रनिष्ठा, मुस्लीम पुढा-यांचे राजकारण, मुस्लीम स्त्रियांचे प्रश्न, आणि निष्कर्ष.

    • प्रकरण पाचवे - मुस्लीम मराठी कवितेचे वाङमयीन मूल्यमापन: प्रास्ताविक, कवितासंग्रहांची शीर्षके, कवितासंग्रहांची अर्पणपत्रिका, मुक्तछंदात्मक रचना, संवादात्मक, भाषा, प्रतिमा - प्रतीके, गझलेचा रचनाबंध, गझलेतील विषय.

    • प्रकरण सहावे - उपसंहार

    डॉ. किशोरकुमार कांबळे यांच्या ‘मुस्लिम कवीची मराठी कविता’ या संशोधनात उपरोक्त बाबींचा समावेश आहे. जवळपास ७५० - ८०० पृष्ठांचा हा समिक्षा / संदर्भग्रंथ कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर यांच्या माध्यमातून ईबुक स्वरूपात प्रसिध्द होत आहे. मुस्लिम मराठी कवींचे छायाचित्र / फोटो व त्यांच्या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ सदर ग्रंथाच्या मुखपृष्ठावर प्रसिध्द करण्याचा विचार आहे. मराठी साहित्य आणि संस्कृती समजून घ्यायला अत्यंत उपयुक्त असलेला सदर ग्रंथ इंटरनेटच्या माध्यमातून जगभर वाचला जाणार आहे. अधिकृतरीत्या आय. एस. बी. एन. नोंदणीकृत असलेला ‘मुस्लिम कवीची मराठी कविता’ हा समीक्षा ग्रंथ मराठी साहित्य विश्वातली एक अजोड कलाकृती ठरला आहे.

    संपर्कासाठी पत्ता: कवितासागर प्रकाशन संस्था, जयसिंगपूर, सुदर्शन बिल्डिंग, प्लॉट # 16, पद्मावती हौसिंग सोसायटी, बायपास रोड, नांदणी नाक्याजवळ, जयसिंगपूर - ४१६१०१, पोस्ट - जयसिंगपूर, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र. मुस्लिम कवींनी आपले छायाचित्र/पासपोर्ट आयडेंटीसाईज फोटो, आपला साहित्यिक परिचय व कवितासंग्रह / कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ पाठवून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.



    • पुस्तक - मुस्लीम कवींची मराठी कविता (समीक्षा ग्रंथ)
    • ISBN - 978-81-929803-4-8
    • लेखक - डॉ. किशोरकुमार कांबळे (7385218021)
    • प्रकाशक - डॉ. सुनील दादा पाटील
    • प्रकाशन - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर
    • संपर्क - 02322 - 225500, 9975873569
    • ईमेल - sunildadapatil@gmail.com


    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...