Wednesday, August 14, 2013

तरुणांनी प्रश्नच विचारायचे नाहीत कि काय?

सोक्रेटिस हा एक महान ग्रीक तत्ववेत्ता मानला जातो. त्याने स्वत: एकही पुस्तक लिहिले नाही. त्याचा शिष्य प्लेटोच्या "डयलोग" या ग्रंथामुळे व काही नाटकांमुळे आपल्याला सोक्रेटिस माहित आहे. तरुणांना प्रश्न विचारायला प्रेरीत करून अराजक घडवतो या आरोपाखाली त्याला देहदंडाची शिक्षा ठोठावली गेली.  त्याला पळून जायची संधी उपलब्ध असतांनाही आपल्या राज्यव्यवस्थेची घटना पायतळी तुडविली जावू नये म्हणुन तो हेमलाक या जहरी वनस्पतीचा रस पिऊन मृत्यूदंड स्वीकारतो. वीष घ्यायला सुरुवात केल्यापासून तो मरेपर्यंत जे उदात्त विचार ऐकवतो ते आजही मानवी जीवनेतिहासाला थक्क करनारे आहेत. "सूर्य पाहिलेला माणुस" या नाटकाने आणि त्यातील डा. श्रीराम लागू यांच्या चिरंतन अभिनयाने गाजलेली ही कलाकृती बव्हंशी विचारी मराठी माणसानी पाहिलेली आहे.... असेल.... त्यातून आम्ही काय शिकलो हा खरा प्रश्न आहे.

सोक्रेटिस जन्माला आला तो काळ ग्रीसमधील सांस्कृतीक आणि राजकीय संक्रमणाचा काळ होता. सोक्रेटिस वंशपरंपरेने खरे तर दगडफोड्या. आपल्याकडे वडार समाज जे काम करतो तेच काम तो करत असे. ग्रीसमद्धे आपल्यासारखी जातीय व्यवस्था नसल्याने एका दगडफोड्यालाही आपली अभिव्यक्ती करण्याचे स्वातंत्र्य जसे होते तसेच प्लेटोला त्याचा शिष्य बनायला कमीपना वाटला नाही...त्याचेही स्वातंत्र्य असेल...उलट त्याने या आपल्या या लोकोत्तर गुरुला, ज्याने एक शब्दही लिहिला नाही, अजरामर करून सोडले.

प्रश्न विचारायला प्रेरित करना-या सोक्रेटीसने राजकीय कारणांमुळे देहदंड सोसला. प्रश्न विचारणारे तरुण नसतात तो समाज मृतवत असतो. प्रश्नांची दखल घेतली नाही तर सत्ता, मग त्या कोणत्याही असोत, धार्मिक...सांस्कृतीक असोत की राजकीय...उलथल्या जातात हे इतिहासात घडले आहे.  भारतही त्याला अपवाद नव्हता. महावीर-बुद्धाने जी सांस्कृतीक क्रांती घडवली ती प्रश्न विचारुनच. उत्तरे मिळाली नाहीत तेंव्हा त्यांनी ती स्वतंत्रपणे शोधली आणि प्रस्थापित सत्ता उध्वस्त झाल्या. कपिलमुनी, कणाद, मंस्खली घोशाल, अजित केशकंबल यांनीही व्यवस्थेवर प्रश्नचिन्हे उभी केली. पुढेही शेकडो आव्हानकारी उभे ठाकले...मग ते चक्रधर असोत की नाथपंथीय...संतपरंपरा असो कि आधुनिक काळातील आगरकर, म. फुले, बाबासाहेब. या सर्वांचे एकमेवद्वितीय वैशिष्ट्य हे होते कि त्यांनी प्रश्न विचारले. व्यवस्थेला उत्तरे देता आली नाहीत म्हणुन त्यांनी स्वत: उत्तरे शोधली आणि सामाजिक क्रांती घडवली. परंतू आपण या विविध समाजसांस्कृतीक क्रांत्यांतून अथवा अभिसरणांतून एक संमिश्र आणि म्हणुनच एक परस्परविरुद्ध कलहांकित संस्कृती घडवली आहे. त्याची फळे आपण आजही भोगत आहोत.

हे सारे खरे आहे. पण आपण आज तरी बदललो आहोत काय हा खरा प्रश्न आहे. आज या लेखाला कारण घडलेत माझे तरून मित्र श्रीरंजन आवटे. आवटेंनी "डहाके सर, नेमकं काय निवडून घ्यायचं?" असा एक लेख लोकप्रभात (http://epaper.lokprabha.com/137059/Lokprabha/26-07-2013#dual/28/1 ) प्रसिद्ध केला. या लेखात त्यांनी "नेमके निवडून घ्या ज्ञान" या दहावीच्या नव्या मराठी पुस्तकातील लहू कानडे यांच्या कवितेबाबत ती कशी निवडली गेली याबाबत विनम्रपणे प्रश्न उपस्थित केले होते. संपुर्ण कविता वर दिलेल्या दुव्यात आहे. या लेखाला माझ्यासकट अनेक वाचकांची पत्रे गेली होती. पण अर्थातच ती प्रसिद्ध झाली नाहीत. असो. पण वसंत डहाके सरांनी आवटेंच्या लेखाला प्रत्युत्तर दिले आणि "नेमके निवडून घ्या ज्ञान ही कविताच" असे ठामपणे सांगितले. ( http://epaper.lokprabha.com/142462/Lokprabha/09-08-2013#dual/12/2 ) परंतू हे लिहितांना त्यांनी आवटेंच्या मुळ प्रश्नांना बगल देत जे उत्तर दिले त्यातील हे विधान महत्वाचे आहे. डहाके सर म्हणतात, "...या निकषांनुसार कविता ठरलेली कोणतीही रचना दहावीच्या अभ्यासक्रमात सामील करता येईल असे मला वाटत नाही." थोडक्यात डहाके सरांचे म्हणने आहे कि कवितेचे कोणतेही निकष नसतात तर मग त्या निवडायला निवडसमितीची गरजच काय हा प्रश्न उपस्थित होत नाही काय? वृत्तप्त्रीय बातम्यांतील ओळीही तोडून छापल्या तर तीही एक मूक्त कविता बनेलच कि!

असो. डहाके सरांनी आपल्या कवितांच्या आकलनाला सांभाळत उत्तर तरी दिले याबाबत त्यांचे अभिनंदन केलेच पाहिजे. या निमित्ताने बालाजी सुतार, छाया थोरात, संतोष देशपांडे, भैरवी प्रेडिक्ट्स अशा असंख्य फेसबुकवरील व पुस्तकरुपांनी प्रसिद्ध कवींना आपल्याच कविता लेखनाबद्दल पुन्हा एकदा आपण लिहितो त्या कविताच आहेत कि काय असा प्रश्न स्वत:लाच विचारायला भाग पाडले गेले हेही अभिनंदनीयच आहे. पण गोष्ट येथे संपत नाही.

"thorat sir awte yanni mala patra lihile, ithech te thamble naheet, tyani mandala mahitichya adhikarat mahiti vicharli. kevdha ha udyog !" अशी डहाके सरांची पोस्ट हरिश्चंद्र थोरात या समिक्षकांच्या वालवर २ आगष्ट रोजी प्रसिद्ध झाली. त्यावर प्रतिक्रिया म्हणुन कविता महाजन, ज्यांच्याबद्दल मला पुरेपूर आदर आहे, त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली..."मरो... असल्यांकडे दुर्लक्ष करणे उत्तम. मी तर त्याला पूर्वीच ब्लॉक करून टाकले आहे. व्यक्तिगत पातळीवर येऊन असभ्य लिहू लागला म्हणून." आणि त्याखालीच त्यांनी अधिकची प्रतिक्रिया दिली ..."होय सर. पण आता त्याला ब्लॉक करा.
स्वतः काही न करता निव्वळ खाजवून खरूज काढण्यात आनंद घेणार्‍या या पोरांना आपण खतपाणी घालून वाढवण्याची गरज नाही.
मध्यंतरीही असे काही लोक होते जे निव्वळ भडकाऊ पद्धतीने स्वतःचं नाव करू पाहत होते. काळाच्या ओघात ते गायब झाले. उदा. विंदांना ज्ञानपीठ मिळालं तेव्हा त्यांच्यावर चिल्लर टवाळी करणारा लेख एकाने लिहिला होता.
नव्या पिढीचा विद्रोह आपण समजू शकतो, पण तो अस्सल हवा. ही चमकोगिरी म्हणजे फेसाचे फुगे."

खरे तर दहावीच्या अभ्यासक्रमात कानडेंची कविता कशी आली आणि तिचे प्रयोजन काय हा आवटेंचा मुख्य प्रश्न होता. ती कविताच आहे असे डहाके सरांचे म्हणने पडल्यावर ती कविता कशी ठरली...कवितेचे निकष काय हा प्रश्न माहितीच्या अधिकारात विचारल्यानंतर त्याचे उत्तर त्याच प्रक्रियेतून देण्याऐवजी फेसबुकवरुन आणि तेही थोरातांच्या वालवरुन (किंवा डहाकेंच्या वालवरून थोरातांनी शेयर केली असेल) आवटेंच्या प्रश्नांना "उद्योग" म्हणणे डहाके सरांना शोभते काय? तरुणांनी प्रश्न विचारणे हा "पोरांचा खाजवून खरूज काढण्यात आनंद" असे विधान करणे कविताताईंना शोभते काय? खाजवून खरुज वाढते...ती वाढणे हा खरुजेचा मुलभूत गुणधर्म आहे कारण खरूज आधीच अस्तित्वात असते. ती खाज मागते आणि खाजवली तर वाढते...हे चक्र आहे. मुळात खाजच का निर्माण झाली या प्रश्नाचे उत्तर काय आहे?

माझा मुद्दा अत्यंत साधा आहे. तरुणांनी प्रश्न विचारणे हा त्यांचा मुलभूत अधिकार आहे आणि व्यवस्थेकडून उत्तरे मागणे त्यांचे कर्तव्यही आहे. प्रश्नांचे समाधान करता येत नाही तेंव्हा त्यांना ब्लोक करा अथवा निंदित करा हा धंदा पुरातन आहे. त्याला अपवाद कोणताही समाजघटक नसतो. नाही.

मुख्य मुद्दा डहाके सर आणि कविताताई विसरल्या तो हा कि दहावीच्या, म्हणजे १५-१६ वर्षांच्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय शिकवू इच्छिता? बालकाव्य अथवा बडबडगीत म्हणुनही जे शोभणार नाही त्याला कविता म्हणायचे असेल तर त्याबाबत चिकित्सक ग्रंथ लिहा...हवे त्या लिखानाला कविता ठरवा...पण शिकणा-या पिढ्यांना अशिक्षित बनवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?

मी जी पर्तिक्रिया आधी लोकप्रभाला पाठवली होती ती अशी...

"आपल्या ताज्या अंकात श्रीरंजन आवटे यांचा "डहाके सर, नेमकं काय निवडून घ्यायचं" हा लेख वाचला. आवटे यांनी पाठ्यपुस्तक संपादन मंडळाच्या एकुणातीलच साहित्यजाणीवांवर प्रश्नचिन्ह उभे केले याबद्दल त्यांचे अभिनंदन. श्री. लहू कानडे यांची "नेमके निवडुन घ्या ज्ञान" ही कविता अगदी "न-कविता" म्हनण्याच्याही दर्जाची नाही हे उघड आहे. अन्य निवडीही पारख्याच्या नजरेने झाल्या असत्या तर अधिक योग्य झाले असते. विद्यार्थ्यांच्या नुसत्या जाणीवा प्रगल्भ करणा-याच नव्हेत तर काव्यविषयक आवडही निर्माण होईल अशा कविता निवडणे आवश्यक आहे. आम्हाला लहानपणी अभ्यासक्रमात असलेल्या अनेक कविता आजही तोंडपाठ आहेत आणि मनोसंस्कृतीचा एक भाग बनून बसल्या आहेत. ज्यातून शोधुनही हाती काही लागत नाही अशा कविता पाठ्यपुस्तकात टाकून संपादक मंडळ एकार्थाने विद्यार्थ्यांचेच नुकसान करत आहेत आणि शिक्षकांचीही पंचाईत करत आहेत याचे भान असावे एवढीच माफक अपेक्षा."

असो. हेही ठीक. मुख्य प्रश्न उरतो तो हा कि नवपिढीच्या तरुणांनी प्रश्न विचारायचे कि मौन होत आहे ते उत्तम असे म्हणत त्या कथित उत्तमतेत अध:पतीत व्हायचे? प्रश्न विचारले तर वर दिलेली उत्तरे असतील तर ती उत्तरेच अधिक गंभीर प्रश्न उपस्थित करतात. ती या तरुणांना वरकरणी नामोहरम करनारी अथवा त्यांची "अक्कल" काढणारी असली म्हणुन प्रश्नचिन्हे थांबत नसतात याचे भान असायला हवे. श्रीरंजन आवटे यांचे हे एक उदाहरण आहे. असे प्रश्न विचारणारे हजारो तरुण आज पुढे येत आहेत. ते अजुनही यावेत. द्यायची तर समाधानकारक उत्तरे द्या. चूक झाली असेल तर मान्य करा...किंवा तुम्ही बरोबर आहात हे तेवढ्याच प्रामाणिकपणे सिद्ध करा...त्यातून तुमचा मोठेपणाच सिद्ध होईल...उत्तरे टाळाल...प्रश्न विचारणा-यालाच आरोपी बनवाल तर तुम्ही किती क्षूद्र आहात हेच सिद्ध होत राहील.

आपल्याला प्रश्न विचारणा-यांची संस्कृती हवी आहे
उत्तरे टाळणा-यांची नाही!

8 comments:

  1. आपल्याला प्रश्न विचारणा-यांची संस्कृती हवी आहे
    उत्तरे टाळणा-यांची नाही!
    शेवटचा प्रश्न हा महत्वाचा विचारला असल्याने पुढे कांहीही न बोललेले बरे.

    ReplyDelete
  2. अहो अभय तरंगे ,

    कुठे हवेत तरंगताय ? का भरकटताय काट लेल्या पतंगासारखे ?- दिशाहीन आणि कणाहीन ?शक्तीहीन ?

    म फुले पुणेकर होते - तुम्ही त्यांचे स्मारक कुठे पाहिले हो साहेब ? ते कुठे राहात हो -पुण्याला का कोल्हापुरात ?



    खुद्द शिवाजी महाराज लाल महालात राहात - तो पुण्यातच आहे -ते काय सातारला नव्हते रहात !

    महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि महर्षी धोंडो केशव कर्वे पुण्याचेच

    पुण्यात रुजलेल्या- मोठे झालेल्या किती जणाना भारतरत्न मिळाले - तुम्हीच बघा !

    विनोबा भावे आणि पां वा काणे ,भीमसेन जोशी , लता मंगेशकर यांचे बरेचसे कर्तृत्व पुण्यात घडले तसे त्यांनी अनेक वेळा आपल्या भाषणातून सांगितले आहे ! सगळे भारतरत्न !



    गमतीचा भाग म्हणजे - खास संजय सोनवणी साठी - सगळे आपापल्या कार्यात मराठी व्याकरणाचा मान राखत होते - कै . भीमसेन जोशी तर प्रत्येक अक्षर शुद्ध म्हणायचा आग्रह धरत - मराठीचा - स्वतः कानडी असून -लता मंगेशकर तर संस्कृत आणि मराठी उच्चार याबाबत अत्यंत दक्ष असते ! विनोबा आणि पां वा काणे तर संस्कृतचे गाढे अभ्यासक ! आणि दोघेही महर्षी शिंदे आणि महर्षी कर्वे तर सरस्वतीचे पुजारीच !



    पुण्यात उत्तम महाविद्यालये कुणी काढली ?

    टिळक आगरकर या लोकांनी रक्ताचे पाणी करून राष्ट्रीय शिक्षण या भूमिकेतून स्वतःला त्रास करून हे ज्ञान वृक्ष रुजवले - आत्ता सारखा पतंगराव आणि इतरांसारखा पैसे कमावण्याचा उद्योग केला नाही -

    पुणेकरांनी काहीही केले नाही हे म्हणणे म्हणजे स्वतःच्या नपुसक कर्तृत्वहीन आयुष्याच्यावरून तर निष्कर्ष काढत नाही न आपण ?

    पुण्याच्या ज्ञान विश्वाला प्रचंड परंपरा आहे !सर्व जातीचे आणि जमातीचे लोक या नगरीने आपले मानून त्यांना यशाचा मार्ग दाखवला आहे !

    पुणेकर हे काहीही करत नाहीत हे थोतांड आहे - तशा कथा रचणे हा तुमचा खानदानी पेशा दिसतो आहे !

    बोला संजय राव - तुम्हालापण अज्ञानाची झोप लागली वाटते ?

    का तुमचे हितसंबंध दडले आहेत अशा प्रकारचे छापण्यात ?

    बोला - बोला !

    उचलली जीभ आणि लावली टाळ्याला - हा प्रकार बंद करायला शिका जरा !असे जरा त्या अभय तरंग्याला सांगा !- कोण कुठून येतात - आणि उगीचच बडबड करत बसतात -



    संजय कुमार !

    अशा नाठाळाना काठीच पाहिजे !

    आपला स्वभाव पडला - भले तरी देऊ कासेची लंगोटी - असा - असो - अशा आचरट लोकाना आपण मार्गदर्शन करू शकाल का ?

    मला जरा शंका वाटते ! उलट अशा लोकांचीच गर्दी तुम्हाला तुमच्या अवती भवती हवी आहे ! तुमचा उद्योगच तो !

    ReplyDelete
  3. ह्या ब्लॉगच्या सर्व वाचकांना ६७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप-खूप शुभेच्छा !!!!!!!!!!!!!!!!
    HAPPY INDEPENDENCE DAY !!!!!!!!!!

    ReplyDelete
  4. शुद्ध भाषा म्हणजे काय हा एक प्रश्नच आहे . पेशव्यांची मोडी लिपीतली पत्रे कर व्याकरणाचे नियम लावून तपासली तर ? बरे वेद हे आर्ष म्हणजे अशुद्ध संस्क्रुत भाषेत आहेत हे माहित आहे काय …
    व्याकरणाचे नियम काळानुसार बदलत असतात . हे माहित आहे काय ?

    सध्या इंटरनेट वर लिहिण्याचा काळ आहे . त्यात इंग्रजी फोनेटिक टाइपराइटर वापरला जातो . त्यामुळे आणि आणि पाणि आणि कोणि वेगळ्या प्रकारे लिहिले जाते ……

    प्रमाण भाषा म्हणजे मुख्यत: पुण्याच्या पेशव्या ची बोली भाषा . त्याने हि भाषा कोकणातून आणल्याने कोकणातला कुणबी शुद्ध मराठि बोलतो ! तर सांगलीचे देशपांडे हि आनि पानि च करतात ……… तेंव्हा शुद्ध भाषा प्रमाण भाषा असा काही नसत ! शाळेतल्या मुलांसांठि एक ठीक आहे । पण सगळेच लेखन प्रमाण (भाक्षेतुन) होऊ लागले तर ते एकसुरी । बोर …. आणि कंटाळवाणे होईल … प्रमाणभाषेचा आग्रह वर्चस्व वृत्तीतून होतो आहे असे वाटते …

    ReplyDelete
  5. कविता लिहिण्याचा छंद जोपासणे ही वेगळी गोष्ट आणि कवितेतील छंद जपणे ही वेगळी गोष्ट. म्हणूनच मुक्तछंद असला तरी त्यातही एक अमूर्त छंद नादत असतो..जाणकार रसिकांना त्याची चाहूल लागत असते. सध्या कवितेतील गेयता लोप पावत आहे अशी बोच असणारा मोठा वाचकवर्ग आहे. मात्र येथे प्रश्न केवळ छंदाचा उरत नाही तर कवितेतील आशयाभोवती फिरतोय. खरं सांगायचं तर कवितेने अमूक एक संदेश दिलाच पाहिजे अशी अपेक्षा कुणाचीच नसते..मात्र किमानपक्षी कवी म्हणून आपणा स्वतःला आणि ती कविता वाचणाऱ्याच्या अंतर्मनाला तिने स्पर्श केलेला असला पाहिजे असा किमान निकष स्वीकारयला काय हरकत आहे? यावर, आता मुक्तछंदात एखादा छोटेखानी धडा लिहिला तर काय हरकत आहे, असे किंवा अ व ब अशा तीन अक्षरांतच एखाद्याने कविता लिहिली तर काय असा प्रश्न विचारण्यारेही मिळू शकतात. म्हणूनच, संपादनाची जबाबदारी असणार्यांनी किमान या बाबी तरी ग्राह्य धराव्यात.
    आता उतरला प्रश्न दहावीच्या मुलांना कवितेतून आपण काय देतो आहोत याचा...कदाचित संगणकप्रधान संस्कृतीत माहिती व ज्ञान यांची गल्लत करु नका असे कवीला सूचवायचे असेल तर उद्या एखाद्याने बाळांनो मोबाईल असा ऑपरेट करा, असे सूचित करणारे अगदी गद्यात जरी लिहिले तरी त्यातून काय हाशील होईल? संजयजींनी येथे उपस्थित केलेला प्रश्न कवी अथवा संपादन करणारे मान्यवर यांच्या योग्यतेशी कुठेही शंका घेत नाही तर कविता म्हणून आपण मुलांच्या भावविश्वात काही पेरणी करतोय की नाही याकडे लक्ष वेधतोय, असे मला वाटते. आताच नाही तर भविष्यातही असे प्रश्न हे विचारलेच जातील तेव्हा त्याचे उत्तरदायीत्वही ठरायला काय हरकत आहे?

    - संतोष देशपांडे

    ReplyDelete
  6. डॉ . अभिराम दीक्षित सर ,

    रा रा संजय सर

    आप्पा -प्रथम एक सांगू का ?

    आम्ही आप्पा बाप्पा -

    नेहमी आपापसात गप्पा मारत असतो - पण आपण विषय छान मांडला आहे - म्हणून ,


    बाप्पा -आम्ही आपणास स्वतः कोकणात घेऊन जाउन दाखवू शकतो की कोकणातला कुणबी , भंडारी अथवा खारवी - इतके कशाला अगदी कोकणस्थ ब्राह्मणही -अजिबात शुद्ध मराठी बोलत नाही - ( आपली येण्याची इच्छा असेल तर !) -गोकुळाष्टमीला ?- तरीही कोकणी माणसाच्या बोलण्याला गोडवा असतोच अगदी पुणेरी बोलीपेक्षा ! भाषेचा गोडवा व उत्स्फूर्तता आणि त्याची सर्वमान्य शुद्धता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत !आता सर्वमान्य म्हणजे काय ? तर सरकार जे काही मंडळ नेमते ते आपण सर्व साधारणपणे सर्वमान्य धरतो - उदा . आरक्षण ,जातीची दिली जाणारी शिफारसपत्रे यासाठीची सरकारने नेमलेली मंडळे , काहीजण जुन्या ग्रंथांची शुद्ध प्रत बनवतात - कुणाचे जन्म दिवस ठरवतात - उदा . छ . शिवाजी महाराज असो ! किंवा ज्ञानेश्वरी वा तुकाराम गाथेची सुधारीत प्रत असो -


    शुद्धता ठरवल्याशिवाय अशुद्धता ठरवता येणार नाही - नाही का ?आणि सगळ पुणेरी ते शुद्ध असतेच असेपण नाही !पुणेरी ही कल्पना आहे - जसे राष्ट्रीय हिंदी तसेच पुणेरी मराठी - कधीकधी ही हास्यास्पद ठरेल असेपण अवतार घेते - त्यावेळी आपण त्याला सरकारी मराठी म्हणून हिणवतो !

    बरीच वर्षे शासकीय निर्णय प्रक्रियेत कोकणस्थ ब्राह्मणांचा सहभाग असल्यामुळे असा समज झाला असावा की पुणेरी जे जे - ते ते सर्व ब्राह्मणी - असो !

    पण शामची आई च्या लिखाणात कोकणाचे वर्णन आहे पण भाषा कशी आहे ?बाळबोध - लिहिणारे साने गुरुजी कोकणातलेच - पण कुठेही भाषेत कोकणस्थी ( ? )आगावपणा नाही -


    -आप्पा - तसेच प्रत्येक विभागाचे आहे - मग ते खानदेशी असो किंवा वऱ्हाडी -प्रत्येक भागाच्या बोलीभाषेची गोडी अवीटच आहे , पण ती अधिकृत भाषा ठरत नाही

    पेशवे असोत किंवा शिवाजी महाराज - त्यांच्या काळात पण राज व्यवहाराची भाषा शुद्ध मराठी नव्हतीच - त्यात फारसी शब्द जास्त होते - छत्रपतींनी तर राज व्यवहार कोश तयार करण्यात पुढाकार घेतला - तो का ?

    तो अस्मितेचा प्रश्न असावा - एक वेगळे राज्य - त्याचा निर्माता - जन्मदाता - छत्रपती म्हणतो की आपली भाषा एका विशिष्ठ नियमांनी बद्ध असावी - "त्यांचे "शब्द आपण हिंदवी स्वराज्यात वापरावेत असे न होता आपण आपल्या लेखनाचे - राज व्यवहाराचे - नियम स्वतः तयार करू -त्यासाठी त्यांनी त्यावेळच्या शिष्ठ संमत लोकांची ( ब्राह्मण ? ) मदत घेतली - तो राज व्यवहाराचा भाग झाला - छत्रपती पूर्व काळा पासून ते थेट आजपर्यंत राज्यकर्ते भाषेचे धोरण असो किंवा शिक्षणाचे - ब्राह्मणांचा आधार का घेताना दिसतात ! निजाम असो किंवा बहामनी राज्ये किंवा मुघल अथवा स्वराज्य - वकील सगळे ब्राह्मण - असे का ? त्याना भाषेचा अभ्यास - आणि वाक्यांचे अर्थ लावता येत होते म्हणूनच ना ?


    बाप्पा -तसेच आज सरकार म्हणा किंवा काही संस्था - समजा साहित्य परिषद किंवा तत्सम कार्य करणाऱ्या संस्था असा विचार करून तसे काम करतात त्या वेळेस आपणपण काही नियम आणि बंधने स्वीकारणे भाग आहे - नाही का ?कारण अशाने कोणत्याही मुद्द्यावर कितीतरी पिढ्या एकमतच होणार नाही - जसे सध्या माहिती अधिकाराच्या कायद्याचे आपण बघत आहोत !-

    एक भाषा ( क्षणभर तिची शुद्धता बाजूला ठेवू या ) सर्वाना एकत्र ठेवेलच असेपण नाही हेपण आपण आता तेलंगण आणि इतर बाबतीत बघत आहोत !

    एका धर्माने तरी कुणाला एकत्र ठेवले का ?-युरोपियन आणि अरबी देश पाहिले की ते लगेच लक्षात येते -पण एक शिस्त म्हणून एक प्रांत एक भाषा या तत्वानुसार त्या भाषेच्या शुधाशुधातेसाठी तिचा जर व्यवहारात - कोर्ट कचेऱ्यात -शिक्षणात,आणि राज्य भाषा म्हणून वापर करायचा असेल तर तिला एक चौकात आणि व्याकरणाचे नियम मान्य करावेच लागतील - लागतात .ते न मानणे ही एक स्वनाळू फ्यांटसी म्हणता येईल -

    घराचे घरपण टिकवायला जसे घराचे नियम असतात तसेच देशाचे आणि प्रांताचे - नाही का ?

    शिवाजी महाराजांनी राज व्यवहार कोषात " लई , वंगाळ ,शानपना ,अशा शब्दाना मान्यता दिली नाही - तात्पर्य - शुद्ध ते पुणेरी असेपण आम्ही मानत नाही आणि ते ब्राह्मणी तर मुळीच नव्हे असे आमचे मत आहे !

    आमचे हे मत रा रा संजय सोनवणी प्रेमाने ऐकून घेतील असे वाटते

    आप्पा - चला बाप्पा -

    बाप्पा - फार जाड जाड शब्दात बोललो नाही का ?

    आप्पा - राजभाषा हि बहुजनांची भाषा नसतेच -

    बाप्पा - पण ती असावी लागते हि पण एक अपरिहार्यता असतेच !

    आप्पा - चला माझी जीभ दुखायला लागली - खूप आईस्क्रीम खाल्यावर रामरक्षा म्हणायला सांगितले तर जसे होईल तसे झाले आहे - !

    बाप्पा - अच्छा !!

    आप्पा - अच्छा ! संजय महाराज !

    ReplyDelete
  7. संजय सर,
    तुमच्या अभ्यासपूर्ण विवेचनाला सलाम.
    तुमची मते मला पचायला जराशी कठीण वाटली तरी त्याचा प्रतिवाद सहजा सहजी होणे कठीण आहे.
    पण वाचत रहावेसे वाटते.
    अगदी तुमच्या पुस्तकांसारखे.

    ReplyDelete
  8. बहुजन समाज बोलतो ती भाषा. अधिकतर जन अधिकार गमावतात असे नको

    ReplyDelete

ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड

  ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड करणे आणि लोकांची दिशाभूल करणे हा भाजपाचा पूर्वीपासून उद्योग राहिलेला आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी नुकतेच नेह...