
आजचा हा एक अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण होता. आणीबाणीच्या काळात मी फार फार तर १२-१३ वर्षांचा असेल. तेंव्हा आम्ही शिरूर तालुक्यातील वरुडे या गांवी राहत असू. मोहन धारिया आमचे त्या काळात हिरो होते. त्यांचे भाषण आहे पुण्यात असे समजले म्हणून घरात कोणाला न सांगता मी, पळुनच म्हणा ना, आठाणे खिशात असतांना निघालो. आठाण्यात एस्टीने मला फक्त शिक्रापुरपर्यंत सोडले. शिक्रापूरपासून चालत मी पुण्याला पोहोचलो थेट एस्पी कोलेजच्या ग्राउंडला. अलोट जनसमुदाय जमलेला होता. खरे तर आणीबाणी म्हणजे काय हेही मला तेंव्हा माहित नव्हते. गांवातील म्हाता-या-कोता-यांनाही नसबंदी करायला जीपमद्धे टाकून नेतात आणि तगाईची (लेव्हीचीही) कठोर वसूली होते म्हणुन लोक अन्न-धान्य कडब्याच्या गंजीत लपवून ठेवतात एवढेच माहित होते. (दुरून एखाद्या वाहनाचा धुरळा जरी उडालेला दिसला कि तरणे ते म्हातारे रानोमाळी पळून जात असत.) आमच्या वरुड्यात एका गंजीला आग लागली तेंव्हा शेतकरी "गंज सोडा...आत लपवलेले धान्य वाचवा" असा आक्रोश करतांना मी स्वत: पाहिलेले होते. या सा-याचा अन्वयार्थ उमजत नव्हता एवढेच. "धान्य लपवणा-यांचा देश" एवढे मात्र माझ्या मनात तेंव्हा मात्र ठसले ते ठसलेच. पैशांसाठी नसबंदी करुन घेणारे महाभागही तेंव्हा मी पाहिले होते. "बाईंची ही सत्ता वाईटच" हे पटायला जड जाणे शक्यच नव्हते. मोहन धारिया तरुण तुर्क म्हणुन आम्हाला पेपरांतनं (केसरीत) सांगायचे म्हणून माहित. आमच्यावर जबरी प्रभाव. त्यांचे भाषण...म्हणुन वरुड्यावरनं पुण्याला आलो...तेंव्हा वेळ फार सावकाश जायचा....दोन चार दिवस म्हनजे लै फास्ट वाटायचं.... (आम्ही बी त्याच हिशोबानं लै फास्ट वाढलो...) असो. त्या वेळी काही कळत नव्हतं. धारियांचं भाषण मात्र ऐकलं. कळलं तेवढ कळलं...आपण एका क्रांतीत सहभागी आहोत या अभिमानाने वारंवार उर भरून घेतला. रात्र फुटपाथवर काढली आणि चालत परत वरुड्याला.
नंतर काळ गेला...सारेच बदलले....माझ्या लाडक्या "राधेय" या रणजित देसाईंच्या कादंबरीच्या हिंदी अनुवादाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने मी आणि धारिया सर नारायण पेठेतील हिंदी राष्ट्रभाषा सभेच्या कार्यालयाच्या प्रांगणात एकत्र आलो होतो. सर तेंव्हा किंचित थकलेले होते...पण आतील तेज लपत नव्हते. त्यावेळी माझ्या "On the Brink of Death" या इंग्रजी कादंबरीचे परिक्षण टाइम्समद्धे आलेले होते. त्याबद्दल ते आवर्जून बोलले. आपल्या बालपणीच्या महानायकाला जवळुन भेटतोय याचेच मला केवढे अप्रूप होते! त्यालाही बारा कि पंधरा वर्ष उलटली.
आज माझे नवस्नेही घन:शाम पाटील यांच्यामुळे पुन्हा भेटीचा योग जुळुन आला. प्रभाकर तुंगार यांच्या "शांतीदूत लालबहादूर शास्त्री" या चरित्राच्या तिस-या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आम्ही अधिक जवळुन भेटलो...भेटलो नव्हे...शब्द नि:शब्द कसे होतात हे अनुभवले...काही सुचत नव्हते. काळ वाहत होता कि स्तब्ध होता...नाही माहित...
सुंदर क्षण कधीच मरत नाहीत...ते अजरामर असतात...
आपण असू किंवा नसू...
नाही का?
(प्रभाकर तुंगार यांनी लिहिलेल्या आणि 'चपराक प्रकाशन' ने प्रकाशित केलेल्या 'शांतीदूत लालबहाद्दूर शास्त्री' या पुस्तकाच्या तिस-या आवृत्तिचे प्रकाशन आज ज्येष्ठ नेते मा. श्री. मोहन धारिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुप्रसिद्ध समीक्षक प्रा. श्रीपाल सबनीस, संजय सोनवणी, 'वनराई'चे सचिव श्रीराम गोमरकर, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे शंकर भिडे आणि 'चपराक' चे सर्व सदस्य उपस्थित होते.)
Sundar. Chhan.
ReplyDeleteअतिशय सुंदर!
ReplyDelete