Saturday, May 24, 2014

श्रेष्ठ प्रशासिका अहिल्याबाई होळकर!

धर्मराज युधिष्ठिरानंतर फक्त अहिल्याबाई होळकरांना जनतेने पुण्यश्लोक असा किताब बहाल केला. त्या थोर शिवभक्त होत्या. ज्या काळात राजे-रजवाडे आपल्या क्षेत्राच्या बाहेरील प्रजेचा साधा विचारही करत नसत त्या काळात अहिल्याबाईंनी देशभरात हजारो लोकोपयोगी  कामे केली. त्या कामांनी त्यांची ख्याती देशभरात चिरंतन राहिली आहे. पण अहिल्याबाईंची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्यांचे प्रशासन! अठराव्या शतकातील भारतातील सर्वश्रेष्ठ प्रशासिका असा त्यांचा गौरव ब्रिटिश पार्लमेंटने केला आहे. देशातील हिंदू-मुस्लिम सर्वच रजवाडेही त्यांचा गौरव करत असत. त्यामुळे त्यांच्या इंदोर संस्थानाबाहेरच्या कोणत्याही समाजकार्याला कोणीही आडकाठी केली नाही. टिपू सुलतान तर अहिल्यादेवींना तत्वज्ञ प्रशासिका म्हणे.

अहिल्यादेवींचे प्रशासन हे राजकेंद्री नसून समाजकेंद्री होते. समाजातील सर्व घटकांना समान न्याय हे त्यांचे वैशिष्ट्य होते. निपुत्रीक विधवांची संपत्ती जप्त करण्याचा परंपरागत कायदा त्यांनी रद्द तर केलाच पण विधवांना दत्तक पुत्र घेता येईल असे कायदे बनवले. ही एक सामाजिक क्रांती होती.
अहिल्यादेवींनी आपल्या राज्यात कररचना सौम्य व समानतेच्या तत्वावर ठेवली होती. इंग्रजांनी त्यांचे शासन देशात सुस्थापित झाल्यानंतर अहिल्यादेवींच्या कररचनेचा आधार घेतच आपली कररचना केली. तत्पुर्वी कररचना ही रजवाड्यांच्या मर्जीप्रमाणे असे. त्यामुळे श्रीमंत लोकही आपल्या वैभवाचे प्रदर्शन टाळत असत. अहिल्यादेवींच्या राज्यात मात्र तशी परिस्थिती नव्हती. प्रत्येकाच्या जिवित-वित्ताची हमी घेतलेले असे अहिल्यादेवींचे कल्याणकारी राज्य होते. त्या रोज दरबारात उपस्थित असत व प्रत्येक प्रजाननाची तक्रार ऐकून लगेच निर्णय देत किंवा गुंतागुंतीचे विषय न्यायखात्याकडे स्वत: पाठवत.
अहिल्यादेवींनी आपल्या व्यवस्थापनाचे सैनिकी प्रशासन व मुलकी प्रशासन असे दोन विभाग केले होते. सैनिकी व्यवस्थापन तुकोजीराजे होळकरांकडे सोपवले तर मुलकी प्रशासन आपल्या हातात ठेवले.
अहिल्यादेवींचे महत्वाचे क्रांतीकारी कार्य म्हणजे त्यांनी स्थापन केलेली महिलांना लष्करी प्रशिक्षण देणा-या संस्थेची स्थापना. या संस्थेतून अक्षरश: हजारो स्त्रीया प्रशिक्षीत झाल्या. खुद्द अहिल्यादेवींनी आपले स्वत:चे असे ५०० महिलांचे लढवैय्या पथक स्थापन केले होते. भारताच्या इतिहासातील प्रशिक्षित महिलांचे हे पहिलेच पथक!
राज्यातील व्यापार उदीम बाढावा यासाठी त्यांनी भरपूर कष्ट घेतले. महेश्वरला वीणकरांना स्थायिक करून त्यांनी वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन दिले. ते इतके यशस्वी ठरले की माहेश्वरी साड्या व अन्य वस्त्रे भारतीय बाजारपेठ व्यापून उरले. आजही ती ख्याती पुसलेली नाही.

इंदोर हे त्या काळी एक छोटे खेडे होते. अहिल्यादेवींनी इंदोर हे एका नगरामद्धे परिवर्तीत करण्याचा चंग बांधला. फलश्रुती अशी कि इंदोर एका भव्य शहरात बदलले. आज ती मध्य प्रदेशाची आर्थिक राजधानी आहे.
अहिल्यादेवींचा समकालीन इतिहासकार स्टुअर्ड गोर्डन म्हणतो, त्या काळात देशभरात अंदाधुंदी चालू असतांना अहिल्यादेवींचा प्रदेश मात्र अठराव्या शतकातील सर्वात शांततेचा आणि भरभराटीचा होता. अहिल्यादेवींचे सामाजिक व आर्थिक भान कसे होते हे पाहिले तर आजही थक्क व्हायला होते. रानावनांतून जाणा-या यात्रेकरुंना भिल्ल लुटत असत. अहिल्यादेवींनी सैन्य पाठवून त्यंचा बंदोबस्त करण्यापेक्षा भिल्ल असे का करतात याचा शोध घेतला. उत्पन्नाची कसलीही साधने नसल्याने भिल्ल लुटारु बनले आहेत हे लक्षात येताच त्यांनी भिल्लांना कसण्यासाठी शेतजमीनी दिल्या. एवढ्यावरच त्या थांबल्या नाही तर भिल्लांवरच यात्रेकरुंना सुखरुप इप्सित ठिकाणी अल्प मोबदल्यात पोहोचवण्याची जबाबदारी दिली. भिल्ल यात्रेकरुंकडुन या कामासाठी जो मोबदला घेत त्याला "भिलवाडी" म्हणत. यामुळे भिल्लांच्या उदरनिर्वाहाचीही सोय झाली आणि यात्रेकरुंना होणारा उपद्रव संपला.

इंग्रजांबद्दल अहिल्यादेवींचे मत आणि धोरण दूरदृष्टीचे होते. १७७७ साली पेशव्याला लिहिलेल्या पत्रात त्या म्हणतात, इंगरज गोडबोल्या आणि अस्वलासारखा धूर्त आहे. त्याच्याशी संग करू नका. तो गुदगुल्या करुन मारेल. अस्वलाला ठार मारायचे तर त्याचा तोंडावरच आघात करावा लागतो." हे कार्य पेशव्यांना जमले नसले तरी पुढे महाराजा यशवंतराव होळकरांनी इंग्रजांचा धोका लक्षात घेऊन त्यांना अनेक युद्धांत धूळ चारली.
अहिल्यादेवींची किर्ती त्या काळात जगभर पोहोचली होती. जोआना बेली या ब्रिटिश कवयित्रीने तर अहिल्यादेवींवर इंग्रजीत खंडकाव्य लिहिले. या खंडकाव्यात जोआना बेली म्हणतात, "तीस वर्षांचा तिचा शांततामय राज्यकारभार, प्रजेच्या आशिर्वचनांनी ओथंबलेली तिची भूमी, आया त्यांच्या लहानग्यांना म्हणतात...खुद्द ब्रह्मदेवाने आपल्या भूमीवर राज्य करण्यासाठी तिला पाठवले...एक राजस हृदयी, कोमल अंत:करणाची आणि बुलंद व्यक्तिमत्वाची ती अहिल्या!"

ही कोमल अंत:करणाची स्त्री तेवढीच कठोर होती. तिचे संस्थान जप्त करून घशात घालण्यासाठी राघोबादादा सैन्य घेऊन महेश्वरवर चालून आला होता, तेंव्हा अहिल्यादेवींनी त्याला निरोप पाठवला..."मी एक अबला आहे, असहाय स्त्री आहे, या भ्रमात कोणी राहू नये. मी भाला घेऊन उभी ठाकले, तर तुमचे मनसुबे जागीच जिरतील. मी कोणत्या प्रकारची अबला आहे, हे रणांगनावरच कळेल!"

जोआना बेली म्हणतात ते खरेच आहे. कोमल अंत:करणाची, प्रजाहितदक्ष, उत्कृष्ठ प्रशासक महान धैर्यवतीही होती. नगर जिल्ह्यातील चोंडी हे एक छोटे गांव त्यांचे जन्मस्थान. ३१ मे १७२५ हा त्यांचा जन्मदिन. दरवर्षी लाखो लोक या महान पुण्यश्लोक महिलेला मानवंदना देण्यासाठी त्यांच्या जन्मदिनी चोंडीला जमतात. आपणही जायलाच हवे!

2 comments:

  1. पुण्यश्लोक आहिल्यामाई होळकर यांना विनम्र अभिवादन __/\__
    जय जिजाऊ

    ReplyDelete
  2. अभ्यासपूर्ण लेख.

    ReplyDelete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...