सध्या घग्गर-हक्रा नदी म्हणजेच वैदिक सरस्वती नदी असे सिद्ध करण्याचा हिरीरीने प्रयत्न सुरू आहेत. घग्गर-हक्राच्या काठी सर्वाधिक, म्हनजे हजारापेक्षा अधिक पुरातन नगरांचे अवशेष मिळालेले असल्याने या संस्कृतीचे नांव सिंधू संस्कृतीऐवजी "सरस्वती संस्कृती" असे नामकरण करावे अशीही मागणी केली जात आहे. इतकेच नव्हे तर सरस्वती नदीकाठची संस्कृती आणि वेदांतील सरस्वतीचे माहात्म्य पाहता या संस्कृतीचे निर्माते हे वैदिकच होते असेही घाईचे निष्कर्ष काढले जात आहे. वैदिकवाद्यांचे त्यात जे स्वार्थ असतील ते असोत, पण वास्तव काय आहे हे आधी आपण समजावून घ्यायला पाहिजे.
घग्गर म्हणजेच सरस्वती?
घग्गर म्हणजे सरस्वती आहे काय हे आधी आपण ऋग्वेदाच्याच आधारे पाहुयात. ६.६१, ७.९५ व ७९६ ही तीन सरस्वतीसुक्ते असून अन्य काही सूक्तांतही सरस्वती नदीचे उल्लेख आहेत. दुस-या मंडलातील एका सूक्तात (२.४१.१६-१७) वैदिक ऋषींनी सरस्वतीला देवी व माता मानून तिची प्रार्थना केली आहे. या सूक्तात या नदीला "नदीतमे, अम्बितमे, देवीतमे" असे संबोधले आहे. वेदांत सिंधू, सरस्वती व सरयू यांची गणना महानद्यांत केली असून सरस्वती ही सर्वश्रेष्ठ नदी आहे. सिंधूसूक्तात (ऋग्वेद-१०.७५.५) यमुना, शुतुद्री (शतद्रू नव्हे), परुष्णी, असिक्नी, वितस्ता ई. नद्यांच्या बरोबरच सरस्वतीचा उल्लेख आला आहे. सरस्वान नामक समुद्राचा उल्लेखही ऋग्वेदात (७.९५.३, ७.९६.४-६, १०.६६.५) आढळतो. सरस्वती नदी या समुद्राला मिळत असल्याने त्याला सरस्वान असे नांव दिले गेलेले दिसते.
ऋग्वेदातील सरस्वतीच्या पुर्वेला यमुना नदी असून पश्चिमेला शतुद्री नदी आहे. म्हणजे दोन नद्यांच्या मधोमध सरस्वती नदी वाहते आहे.
ज्या पुरातत्त्वीय आणि भुगोलशास्त्रावरून घग्गर हीच सरस्वती ठरवण्याचा प्रयत्न होतो, तो त्याच पुराव्यांवर पाहता घग्गर ही सरस्वती असल्याचे सिद्ध होत नाही. कारण आज यमुना घग्गरच्या पुर्वेस वाहत असली तरी दहा हजार वर्षांपुर्वी यमुना ही घग्गरची उपनदी होती. तीच बाब सतलजचीही. म्हणजे या दोन्ही नद्या घग्गरला तिच्या उगमापासून काही अंतरावरच येवून मिळत होत्या. हे संगम घग्गरच्या वरच्या टोकाला असल्याने व या नद्या घग्गरला मिळत असल्याने घग्गरमद्धे मोठ्या प्रमाणात पाणी येत होते हे वास्तव असल्याने ऋग्वेदातील शतुद्री-यमुनेचा भुगोल जुळत नाही. बरे त्या ऋग्वेदातील स्वतंत्र व मोठ्या नद्या आहेत. त्या घग्गरला येवून मिळतात असे वर्णन आपल्याला ऋग्वेदात कोठेही सापडत नाही.
दुसरी महत्वाची बाब अशी कि पुरातत्वीय संशोधनांनुसार घग्गर ही एक मोठी नदी असली तरी ती नेहमीच मान्सूनवर अवलंबून होती. हिमालयातुन तिचा उगम होत नाही. घग्गरच्या पात्रातील गाळ व रेतीवर केलेल्या अनेक परिक्षणांतून हे सिद्ध झाले आहे कि इसपू दहा हजार वर्षांपासून त्यात हिमालयीन गाळाचे अवशेष मिळत नाहीत. ऋग्वेदात वर्णन केल्याप्रमाने पहाडांतून झेपा घेत खाली उतरणारी, रथसदृष वेगवान अशी घग्गर पुरातन काळातही नव्हती. यमुना आणि शतुद्री (तिचेच नवे नांव सतलज मानायची प्रथा आहे, पण तेही खरे नाही कारण ऋग्वेदातच शुतुद्री आणि शतदृ अशी दोन वेगवेगळी नांवे आलेली आहेत व त्यांचे अर्थही वेगवेगळे आहेत.)
तीव्र क्षमतेच्या भुकंपामुळे (भुगर्भातील हालचालींमुळे) सतलज व यमुनेने आपले प्रवाहमार्ग बदलले. सतलज पश्चिमवाहिनी होत सिंधुला जावून मिळाली तर यमुना पुर्ववाहिनी होत गंगेला जावून मिळाली. या दोन मुख्य उपनद्यांनीच मार्ग बदलल्याने घग्गर नदी आटली हे पुरातत्वीय पुरावे व उपग्रहांनी टिपलेली छायाचित्रे यातून स्पष्ट होते. घग्गर नदी आटल्याने तिच्या काठावरील वसाहती पुर्वेला व उतरेकडे सरकल्या असे दिसते. सरस्वती हीच घग्गर नदी मानले आणि तिच्याच काठावर वेदरचना झाली असे मानले तर या प्राकृतीक उत्पाताचा कसलाही संदर्भ ऋग्वेद अथवा उत्तर-वैदिक साहित्यात का मिळत नाही हा प्रश्न उपस्थित होतो.
महाभारतात (वनपर्व १३०.४-५) म्हटले आहे कि विनशन या ठिकाणी सरस्वती भूगर्भात लुप्त झाली आणि चमसोद्भेद या ठिकाणी ती पुन्हा प्रकट झाली आणि तिला अनेक नद्या मिळाल्या असे म्हटले आहे. पण या मताला कसलेही पुरातत्वीय समर्थन मिळत नाही. हक्रा नदीला (पाकिस्तानात जेथे घग्गर प्रकट होते तेथून या नदीला हक्रा असे म्हणतात.) कोणतीही उपनदी पुरातन कालातही मिळत होती असा पुरावा उपलब्ध नाही.
पुराणांत सरस्वती नदीचे तीन भिन्न उल्लेख आहेत. पहिली म्हनजे कुरुक्षेत्रातील नदी, दुसरी म्हनजे पुष्कर-सरस्वती नदी आणि तिसरी म्हणजे प्रभास येथे समुद्राला मिळनारी नदी. या तीनही सरस्वती सर्वस्वी वेगवेगळ्या आहेत. महाभारतात बलरामाने प्रभास तीर्थापासून ज्या सरस्वतीच्या काठाने प्लक्षप्रस्त्रवन या तिच्या उगमाच्या ठिकानापर्यंत प्रवास केल्याचे वर्णण येते तेही घग्गर नदीला लागू पडत नाही. म्हणजे ऋग्वेदात नदीतमा असलेल्या महनीय नदीबाबत वैदिक साहित्यातच प्रचंड गोंधळ दिसतो हे उघड आहे.
हक्रा (घग्गर नव्हे) हीच ऋग्वेदातील गुप्त झालेली सरस्वती नदी होय हे मत सर्वप्रथम के. एन. दिक्षित यांनी व्यक्त केले होते. याला कारण घडले सर ओरेल स्टीन यांना हक्राच्या काठी अनेक पुरातत्वीय स्थाने दिसली म्हणून. सरस्वती गुप्त झाली व ती अदृष्य रुपाने गंगा-यमुना संगमात सामील होते अशी हिंदू मान्यता आहे, तेही वास्तव नाही. घग्गर नदी ही सुकलेली नाही. आजही ती पावसाळ्यात वाहती असते. थरच्या वाळवंटात मात्र पुरेशा प्रवाहाअभावी तिचे पात्र सुकलेले असते. वाळवंट ओलांडल्यानंतर ती पुन्हा कच्छच्या रणापर्यंत वाहती होते. त्यामुळे सरस्वती अदृष्य झाली तशी घग्गर मात्र आजही अदृष्य झालेली नाही, हे एक वास्तव आहे.
घग्गर हीच समजा सरस्वती नदी होती आणि ती एवढी पुज्य-पवित्र होती कि पुराणांतरीही तिचे उल्लेख श्रद्धेनेच केले जातात तर मग सरस्वती नदीचे नांव घग्गर कसे बनले याचे उत्तर वैदिक व पौराणिक साहित्यातही मिळत नाही. पवित्र पूज्य नद्यांचे नांव बदलले जाण्याचा इतिहास नाही. सरसुती नामक एक अत्यंत लहाण, नालासदृश्य एक नदी घग्गरला येवून मिळते. तीच वैदिक सरस्वती असे म्हनण्याची कसलीही सोय नाही कारण मग भुगोल अत्यंत वेगळा बनतो.
खुद्द ऋग्वैदिक भुगोल कसा घग्गर हीच सरस्वती या समीकरणाच्या विरोधात जाते हे आपण आधीच थोडक्यात पाहिले आहे.
सांस्कृतिक अवशेष व ऋग्वैदिक संस्कृती
घग्गर-हक्रा म्हनजेच वैदिक सरस्वती हे ठरवण्याचा घाट का घातला जात आहे यामागील खरे कारण म्हणजे घग्गर-हक्राच्या काठी सापडलेली हजारो सिंधु संस्कृतीची स्थाने. या हजारापेक्षा जास्त असलेल्या स्थानांपैकी कालिबंगन व लोथल या दोनच स्थानांत काही कुंडे सापडली. ही कुंडे म्हणजे वैदिक यज्ञकुंडेच असा दावा सर्वप्रथम एस. आर. राव यांनी केला व सपुर्ण संस्कृतीचे निर्माते म्हणजे वैदिक धर्मीय होते असा अजब निष्कर्ष त्यांनी काढला. त्यांच्या सिद्धांताच्या विरोधात जाणारे अन्य हजारो पुरावे सर्वच्या सर्व म्हणजे हजाराहुनही अधिक अवशेषांत मिळुनही सुतावरून स्वर्ग गाठणे म्हनजे काय याची प्रचिती या निमित्ताने आली. अर्थात सर्व वैदिक संशोधक या गृहितकावर अंध उडी घेते झाले हे ओघाने आलेच!
मी सोबत त्या कुंडांचा फोटो दिला आहे. वैदिकांचे अनेक प्रकारचे यज्ञ होते. यज्ञवेदीच्या रचनेला आणि आकारांना त्यात महत्वाचे स्थान असून चारही दिशांनी कोणी बसायचे याचे नियम ठरलेले आहेत. यज्ञ हे मंडपात होत. गृहयज्ञही आहेत. पण छायाचित्रात दिसते तशी खेटून नालाच्या आकारांच्या अनेक वेदी रचना असलेल्या यज्ञाचे वर्णन कोठेही आढळून येत नाही. आणि समजा ओढून ताणुन त्या यज्ञवेद्याच आहेत असा अट्टाहास क्षणभर खरा मानला तरी दोनच ठिकाणी मिळणा-या कथित वेद्यांवरून हजारो ठिकानची संस्कृती वैदिकच असे म्हणण्याचे धाडस हे अविचारीच म्हणायला हवे!
आधी आपण ऋग्वैदिक संस्कृती आणि सिंधू संस्कृतीत नेमका काय ढोबळ फरक आहे हे पाहुयात.
१. वैदिक लोकांना लोह माहित होते. सिंधू संस्कृती अद्यापही ताम्रयुगातच होती. लोहवस्तुंचे कसलेही अवशेष सिंधू संस्कृतीत मिळुन आलेले नाहीत.
२. वैदिक लोक लोकरीची वस्त्रे वापरत. त्यांच्या स्त्रीयांना लोकरीचे सुंदर वीणकाम येई. (ऋ. ५.२९, १.३४.४, १०.१०६.१) त्यांना सूती वस्त्रे माहित नव्हती तर सिंधू संस्कृतीचे लोक सुती वस्त्रे वापरत, मोठ्या प्रमाणात निर्यातही करत.
३. वैदिक लोक निसर्गाचीच अमूर्त व्यक्तीरुपे पावलेली दैवते आहेत. या दैवतांना यज्ञातून हवन देत संतुष्ट करणे हा ऋग्वैदिक धर्म आहे. सिंधू संस्कृतीचे लोक मात्र मातृपूजा आणि लिंगपूजा करत. त्याचे आज पुजले जातात तशाच्या तशा शिवलिंगांसकट अगणित अवशेष सर्वच पुरातत्वीय अवशेषांतून मिळालेले आहेत. उलट या पुजांचे (किंबहुना मुर्ती/प्रतीक पुजेचे) कसलेही उल्लेख वेदांत मिळत नाहीत.
४. सिंधू (घग्गर) संस्कृतीचे लोक नियोजनबद्ध नगरांत रहात होते. शेती व उद्योग-व्यापारप्रधान ही संस्कृती होती. परदेशांशीही त्यांचा व्यापार चालत होते हे खाल्दियन संस्कृतीत मिळालेल्या पुराव्यांवरुनही सिद्ध होते. ऋग्वेदात अशा व्यापारांचा, विदेशी संस्कॄत्यांचा कसलाही उल्लेख नाही. वैदिक लोक हे प्राय: पशुपालक असून थोडीशी भटक्या स्वरुपाची शेती ते करत असत. किंबहुना नगरांत राहना-या "शिस्नदेव" पुजना-या संस्कृतीविषयक द्वेष-शत्रुभावना वेदात वारंवार आढळते.
५. सिंधु जनांना लिपी माहित होती हे तर सिद्धच आहे. वेदांत लिपी अथवा लेखनासाठी कसलाही प्रतिशब्द मिळत नाही.
६. सिंधू संस्कृतीची स्थाने १२ लाख चौरस कि.मी.त मिळाली आहेत. सर्वत्र एकाकार संस्कृतीचे पुरावे उपलब्ध आहेत. ही संस्कृती युद्धायमान नव्हती तर व्यापार-कृषीप्रधान शांततामय जीवन जगनारी संस्कृती होती याबाबत सर्व विद्वानांत एकमत आहे. वैदिक जन मात्र ऋग्वेदावरुनच सतत युद्धायमान असल्याचे दिसते. ऋग्वैदिक शस्त्रे व शिरस्त्रान-कवच इत्यादींचा सिंधू संस्कृतीतील अभावही उत्खननांतुनच स्पष्ट होतो.
७. सिंधू संस्कृतीत वृषभाचे अनन्यसाधारण महत्व होते कारण ही संस्कृती कृषीप्रधान होती. अगणित वृषभमुद्रा त्याचे प्रतीक आहे. शिवासमोर आजही नंदीला मानाचे स्थान असते. ऋग्वेदात मात्र वृषभ हा एक खाद्य व हवनीय प्राणी आहे. पशू हे त्यांच्या दृष्टीने भुमीपेक्षाही महत्वाची संपत्ती असून ते त्यांच्या पशुपालक रुपाला साजेशे आहे. ऋग्वेदातील बव्हंशी सूक्ते ही पशुधन वाढावे यासाठी आहेत, शेतीतील यशासाठी नाहीत.
८. ऋग्वेदात नौकांचे (शंभर वल्ही असलेल्याही) उल्लेख आहेत पण या नौकांची वर्णने पणी नामक व्यापारी अवैदिक लोकांशी संबंधीत आहेत. सुरुवातीच्या काळात पणींचा द्वेष करणारे वैदिकजन बुबू नामक पणीकडून दान स्वीकारत त्याचे गौरवही करतांना दिसतात. ऋग्वेदातील बुबू हा गंगातीरावरील पणी असून नौका बांधनारी धनाढ्य दानशूर व्यक्ती होय. पणींबाबत ऋग्वेदात द्वेषपुर्ण अशा अनेक ऋचा आहेत व त्यांच्या समूळ नाशाच्या प्रार्थना आहेत.
९. ऋग्वेदात रथ व अश्वांचे विपूल उल्लेख आहेत. सिंधू संस्कृतीत भरीव चाकांच्या बैलगाड्यांचे पुरावे मिळतात. पण आ-यांचे रथ अथवा अश्वाचे पुरावे मात्र मिळत नाहीत. सिंधू संस्कृतीचे लोक कृषी संस्कृतीचे असल्याने त्यांना अश्वांऐवजी वृषभाचे महत्व अधिक असणे तर वैदिक लोक हे मुख्यत: पशुपालक असल्याने त्यांना अश्वाचे महत्व अधिक असणे स्वाभाविक आहे. घग्गर संस्कृतीचे निर्माते वैदिक असते तर अश्वाचे व रथाचे काहीतरी पुरावे मिळाले असते, पण तसे वास्तव नाही.
१०. सिंधू (घग्गर) संस्कृतीत असंख्य मुद्रा मिळालेल्या आहेत. कोणत्याही वेदात अथवा उत्तरकालीन वैदिक वाड:मयात मुद्रांचा कसलाही उल्लेख मिळून येत नाही.
हा असा सांस्कृतिक विभेदच एवढा मोठा आहे कि वैदिक हे सिंधू (घग्गर) संस्कृतीचे निर्माते होत हा दावाच हास्यास्पद आणि एनकेनप्रकारेन वैदिक सांस्कृतीक वर्चस्वतावाद निर्माण करण्याचा प्रयत्न ठरतो.
थोडक्यात घग्गर म्हणजे सरस्वती नव्हे, मुळची सरस्वती कोणती याचेही व्यापक पुरावे उपलब्ध आहेत. त्यावर खालील दुव्यांना भेट दिली तर अजून काही बाबी स्पष्ट होतील.
http://sanjay-sonawani.hubpages.com/hub/induscivilizationblunders
http://sanjay-sonawani.hubpages.com/hub/Myth-of-the-lost-river-Saraswati
http://sanjay-sonawani.hubpages.com/hub/helmand-saraswati
Saraswati river was a only fictitious and non-existsent river, is a complete truth.
ReplyDeleteSarang.