Friday, May 2, 2014

महाराजा यशवंतराव : एक मुल्यमापन


    आपण यशवंतराव होळकरांचा एकुण जीवनप्रवास पाहिला आहे. असा थरारक जीवनप्रवास, संकटांची एवढी वादळे, युद्द्धांचा सतत झंझावात, सतत विजयांची आस, स्वातंत्र्याची आस, विश्वासघात सहज पचवत पुढे जाण्याची तयारी, अफाट नेत्रुत्वक्षमता, पराकोटीचे युद्धकौशल्य, नितांत दुर्दम्य आशावाद, प्रयत्नांची निराश न होता केलेली पराकाष्ठा, क्षमाशीलता, शत्रुशी दुर्दांत क्रुरता असे सर्व गुण एकत्र असणारा महायोद्धा व राज्यकर्ता जगाच्या इतिहासात क्वचितच सापडेल.

     यशवंतरावांना राज्य सोडा साधी बोटभर जहागीर वंशपरंपरेने मिलालेली नाही. ते त्यांना भिल्ल-पेंढारी व पठानांच्या स्वत: उभारलेल्या अल्प सैन्याच्या जीवावर प्रशिक्षीत पलटनींशी लढुन मिळवावी लागली. त्यांनी शिंदे-पेशव्याच्या घशातुन जप्त झालेले होळकरी प्रांत अविरत लढत-लढतच मुक्त केलेत. एवढेच काय पण शिंद्यांनी कैदेत टाकलेली पत्नी आणि अल्पवयीन कन्येलाही लढुनच मुक्त केले. गादीचा खरा वारसदार खंडेरावाला मुक्त करण्यासाठी आयुष्य पणाला लावले. त्यांना स्वत:ला ईंदोरी गादीची हाव कधीच नव्हती हे त्यांच्या सर्व कृत्यांवरुन सिद्ध होते. आणि हे सर्व प्रांत त्यांनी जिंकलेले होते. एका अर्थाने त्यांनी संपुर्णपणे नव्याने राज्याची पायाभरणी केली होती. शिवरायांनंतर स्वत:चे राज्य स्वत:च्या हिमतीवर मिळवणारा, शेवटपर्यंत स्वतंत्र राहनारा, स्वत:हुन एकही तह कोनाशीही न करनारा हा एकमेव महायोद्धा होता.

    दौलतराव शिंद्यांनी व पेशव्यांनी त्यांच्यावर व त्यांच्या परिवारावर आपत्तीमागुन आपत्ती कोसळवल्या. दुसर्या मल्हाररावांचा खुन केला. यशवंतराव व विठोजीरावांना कोवळ्या वयात आश्रयासाठी वनवण भटकावे लागले. रघोजी भोसलेनेही विश्वासघात केला. त्या क्षणापासुन यशवंतरावांचे जीवन पुर्ण पालटलेले दिसते. त्यांनी स्वत: आपला मार्ग निर्माण केला, स्वत:च स्वत:चे नियम बनवले आणि आपली अविरत वाटचाल सुरु ठेवली.  

    पेशव्याकडे व दौलतरावाकडे त्यांच्या सतत त्याच मागण्या होत्या...खंडेरावाला व होळकरी परिवाराला मुक्त करा, होळकरी प्रांतांवरेल जप्तीचे हुकुम मागे घ्या, दौलतरावांशी समेट करुन द्या. खरे तर तोवर त्यांची स्वत:चीच शक्ती एवढी वाढली होती कि पेशव्यांवर आक्रमण करुन पेशवाई बुडवुन ते आपल्याला हवे ते साध्य करु शकत होते. पण त्यांनी पेशव्यांच्या मसनदीचा, त्यांच्या सर्वोच्च अधिकारांचा नेहमीच आदर ठेवला. पेशव्याने त्यांचा थोरला भाउ विठोजीरावाला अत्यंत क्रुरतेने ठार मारले. कट्तर शत्रुलाही कोणत्याही राजसत्तेने अशी शिक्षा दिलेली नाही, तरीही संतापच्या भरात आततायी क्रुत्य करने त्यांनी टाळले. तत्पुर्वी शिंद्यांनी मल्हारराव (दुसरा) या सावत्रभावाचीही हत्या केली होती. पेशवे नव्हेत तर शिंदे हेच आपले शत्रु आहेत एवढीच खुणगाठ त्यांनी मनाशी बांधली. हडपसरच्या युद्धात त्यांनी स्वत: ऐन जंगेत उतरुन जो पराक्रम गाजवला त्याचे त्यांचा कट्टर शत्रु मेजर माल्कमही करतो. खरे तर पेशव्याने यशवंतरावांच्या पराक्रमाचा दौलतीसाठी उपयोग करण्याची थोडीतरी दुरद्रुष्टी दाखवली असती तर इंग्रजांचे राज्य या देशात कदापि आले नसते हे आपण यशवंतरावांनी एकट्याच्या जीवावर इंग्रजांशी जी युद्धे केली-जिंकली त्यावरुन सहज स्पष्ट होते.

    त्यांनी पुणे जाळले-लुटले हा धादांत खोटा आरोप करुन पुणेकर सनातन्यांनी त्यांना महाराष्ट्रात पुरते बदनाम करुन टाकले. अगा जे घडलेच नाही त्याच्या खोट्या रसभरीत कहान्या बनवल्या गेल्या. पेशवा पळुन गेला. त्याला परत आणायचा यशवंतरावांनी पराकोटीचा आटापिटा केला....पण पेशवा पेशवाई इंग्रजांना विकुन बसला. एवढे होवुनही यशवंतरावांनी कोठेही पेशव्यांबद्दल कटु उद्गार काढलेले नाहीत ही बाब यशवंतरावांच्या व्यक्तिमत्वावर वेगळाच प्रकाश टाकते. पण पुणेकरांनी त्यांची गणना "प्रात:काळी ज्यांची नावे घेवू नयेत" अशा त्रयीत करुन टाकली. बंडवाला होळकर...होळकरी दंगा असे शब्दप्रयोग वापरले. लाखावरच्या सैन्याचा अधिपती, स्वतंत्र सार्वभौम राजाला त्यांनी बंडखोर-दंगेखोर ठरवले. मराठीत यशवंतरावांवर फारसे का लिहिले गेले नाही, जेही लिहिले गेले ते प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या त्यांची बदनामी करणारेच का होते या प्रश्नांची उत्तरे आपल्याच आजही भिषण असलेल्या व्यवस्थेत आहेत यात शंका बाळगायचे कारण नाही.

    वसईचा तह झाल्यानंतर इंग्रजांच्या आसुरी आकांक्षांचा अंदाज आलेला हा पहिला भारतीय शासक. शिंदेंशी परंपरागत हाडवैर असुनही, त्यांनी होळकरांचे एवढे अपराध केले असुनही त्यांनी शिंदेंना व भोसलेंना इंग्रजांविरुद्ध एकत्र आणण्याचे पराकोटीचे प्रयत्न केले.  शिंदेंनी काय केले तर होळकरांच्याच नाशाच्या योजना आखल्या. जर नर्मदेच्या तीरी हे शिंदे व भोसले मनात कपट न ठेवता होळकरांची साथ देत तिघे इंग्रजांविरुद्ध सर्वकश लढा देते तर? यशवंतराव दिल्लीवर चालुन गेले तेंव्हाच भोसले यशवंतरावांच्या सुचनेनुसार खरेच कलकत्त्यावर चालुन जाते तर? किंवा आपापल्या बळावर इंग्रजांशी सुनियोजित लढा देते तर? पण तसे झाले नाही. यशवंतरावांतील धगधगते राष्ट्रप्रेम आणि इंग्रजांचा खरा धोका त्यांना समजलाच नाही. त्याची परिणती त्यांच्याच अवमानास्पद पराभव व मांडलिकत्वाच्या तहांत झाली.

    यशवंतरावांच्या दुरद्रुष्टीला दाद देत असता या करंट्या सरदारांच्या आत्मघातकी क्रुत्यांबाबत कोणालाही रोष वाटने स्वाभाविक आहे.
   
    यशवंतरावांची युद्धनीति इंग्रजांना नेहमीच बुचकळ्यात टाकत राहीली. गनीमी कावा हा फक्त पहाडी प्रदेशांत उपयुक्त असतो हे खोटे आहे हे त्यांनी मल्हाररावांपाठोपाठ सिद्ध करुन दाखवले. मोन्सनचा भिषण पराभव हा गनीमी काव्याचा अभिनव आणि कल्पक नमुना होता. युद्धशास्त्राच्या अंगानेही त्याचे विश्लेषन व्हायला हवे. आधी शत्रुला आपल्या मागे आणुन, मग त्याला उलटे पळायला लावुन, बदलत्या हवामानाचा अंदाज ठेवुन भर पावसाळ्यात गाळाच्या जमीनीत त्याची फजीती करत, तब्बल २५० मैल पाठलाग करत, क्रमाक्रमाने त्याची शक्ती कमी करत नेत कसे संपवावे याचे हे एकमेव उदाहरण. या युद्धात इंग्रजांचे दहा हजारापेक्षा अधिक सैन्य ठार झाले...

    यामुळेच अनेकदा अनेक इंग्रज इतिहासकार यशवंतरावांवर क्रौर्याचा आरोप करतात. हे खरे आहे कि यशवंतरावांनी युद्धात शत्रुच्या भिषण कत्तली केल्या. मग युद्धे असतात कशासाठी? लुटुपुटीची युद्धे करुन शत्रुला सन्मानपुर्वक जीवंत घरी धाडण्यासाठी? यशवंतरावांचे युद्ध धोरण शक्यतो आक्रमकच असे. ते तसेच असते तरच विजय मिळतात. कर्नल फोसेटवर त्यांनी इशा-याची लढाई केली त्यातही त्यांनी त्याच्या दोन पलटनी कापुन काढल्या. त्यामुळे इंग्रज वचकला. कधी आक्रमक व्हायचे, कधी शत्रुला सावकाश जेरीस आणत मग संपवायचे, कोठे युद्ध टाळायचे याचे त्यांचे स्वत:चे आडाखे होते आणि ते बव्हंशी यशस्वी झालेले आहेत. यशवंतरावांच्या या आक्रमकतेचा व कथित क्रौर्याचा फटका सामान्य मानसाला बसल्याचे एकही उदाहरण नाही. त्यामुळेच आजही उत्तर भारतात यशवंतरावांचे पवाडे गायले जातात.

    "हिंदवाणा हलको हुवा
    तुरका रहयो न तत
    अग्र अंगरेजा उछल कियौ
    जोखाकियौ जसवंत..."
    (हिंदुस्तानचा एकमेव रक्षक आता राहिला नाही. हिंदु समाजाचे बळ तुटले आहे. मुस्लिम बादशहाचे बळ तर पुर्वीच तुटले होते. यशवंतरावांच्या देहांतामुळे इंग्रज बेहद्द खुष झाले आहेत.) असे कवि चैन सांदुने यशवंतरावांच्या म्रुत्युनंतर लिहिले, यावरुन उत्तर भारतात या पहिल्या स्वातंत्रयोद्ध्याचा केवढा सन्मान आहे याची मराठी वाचकांना कल्पना यावी.

    खरे तर इंग्रजी सैन्य हे त्यांच्या सैन्यापेक्षा खुप प्रशिक्षित आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज होते. भारतातच काय फ्रांसमद्धे नेपोलियनलाही धुळ चारणारे हे ईंग्रजी सैन्य. त्यात इंग्रजांनी यशवंतरावांवर कोण सोडला तर जनरल जेरार्ड लेक...अत्यंत अनुभवी आणि कडवा सेनानी. त्याला यशवंतरावांनी भरतपुरच्या युद्धात धुळ चारली. त्याचा पराभव हा इंग्रजांच्या जिव्हारी लागणारा होता. जनरल स्मिथ, कर्नल मोन्सन, मरे, फोसेटसारख्या दिग्गजांचा पराभवही यशवंतरावांनी लीलया केला. याचे कारण म्हनजे यशवंतरावही आधुनिकतेचे भोक्ते होते. इंग्रजांएवढी नसली तरी त्यांच्या सैन्याला त्यांनी पाश्चात्य शिस्त लावली होती. पेंढा-यांसारख्या तशा बेशिस्त आणि बेबंद सैन्यालाही त्यांनी आपल्या कडव्या शिस्तीच्या जोरावर कह्यात ठेवले होते. उज्जैन व पुण्यावरील मोठ्या विजयानंतरही त्यांनी पेंढा-यांना शहरे लुटु दिली नाहीत. ज्यांनी प्रयत्न केले त्यांना हातपाय तोडायच्या शिक्षा दिल्या. इंग्रजांनीही त्यांच्या या कठोर शिस्तप्रियतेचे कौतुक केले आहे. या उलट अन्य सरदारांच्या सैन्यातील पेंढा-यांचे वर्तन होते. खुद्द दौलतरावांच्या सैन्यातील पेंढा-यांनी पुणे, पुण्याचा परिसर ते पेशव्यांच्या अखत्यारीतील महाराष्ट्र किती निर्दयतेने लुटला याची अंगावर शहारा आनणारी वर्णणे माल्कमनेच केलेली आहेत. पेंढारी त्यासाठीच कुप्रसिद्ध होते. पण यशवंतरावांनी त्यांच्या या वृत्तीवर कठोरपणे लगाम घालत त्यांच्या पराक्रमी प्रव्रुत्तींचा पुरेपुर उपयोग करुन घेतला यातच त्यांच्या सैन्यव्यवस्थापन क्षमतेची चुणुक दिसते.

    इंग्रजांनी यशवंतरावांना सतत लुटारु व दरवडेखोर-बंडखोर असे उल्लेखुन बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. पण ती इंग्रजांची जुनीच रीत आहे. शिवरायांनाही ते लुटारुच म्हणत असत. स्वाभाविक आहे. शत्रुची बदनामी करण्याची संधी कोणी सोडत नाही. पण वास्तव हे आहे कि यशवंतरावांनी शत्रुंकडुन रीतसर खंडण्या वसुल केल्या. ज्यांनी नकार दिला त्यांच्याच विभाग-महालांची लुट केली. पण असे करत असतांना त्यांनी हात लावला तो फक्त श्रीमंतांना. सामान्यांना नाही अन्यथा उत्तर भारतात त्यांचा जनमानसात सन्मान राहिला नसता. भवानी शंकर खत्रीने त्यांच्याशी गद्दारी केली तर त्यच्या हवेलीला आजही "निमकहरामकी हवेली" असे म्हटले नसते.  सैन्य पोटावर चालते आणि त्याचा खर्च हरलेल्यांकडुन वसुल करण्याची जुनी रीत आहे. अगदी आजही ती चालु आहे. दुस-या महायुद्धानंतर अमेरिकेने जपान ते जर्मनीवर ज्या जबरी खंडण्या लादल्या तो इतिहास तर अगदी अलीकडचाच आहे.

    शत्रुला बदनामच करायचे झाले कि कोणतेही कारण पुरते याचे हा आरोप म्हनजे एक नमुना आहे यापलीकडे त्याला महत्व देण्याची आवश्यकता नाही.

    तत्कालीन हिंदवी राज्यकर्त्यांमद्धे आस्तित्वातच नसलेले यशवंतरावांचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना उमगलेली राष्ट्रभावना. १८५७चे बंडही जे झाले ते स्वत:ची संस्थाने सुरक्षीत ठेवण्याकरता. राष्ट्रासाठी नाही. दुस-या बाजीरावाला फक्त आपल्या गादीची पडली होती. निजाम, टिपु, बडोद्याचे गायकवाड, उत्तरेतील शिख महाराजे, नबाब, रजपुत राजे हे सर्वच आपापल्या संस्थानांपुरते पहात होते आणि त्यामुळेच ते इंग्रजांचे मांडलिक/अंकितही बनत गेले. पण यशवंतरावांसमोर फक्त स्वत:चे राज्य कधीच नव्हते...तर संपुर्ण देश होता. त्यासाठी ते सर्व राजेरजवाड्यांना, शिंदे-भोसलेंना जी पत्रे धाडत होते त्यातील राष्ट्रीयता दाहक आहे. ते पत्रांत म्हणतात..."पहिले माझे राष्ट्र, माझा देश. आज धर्म, जात, प्रदेश याच्यापलीकडे जावून देश-राष्ट्रहित पाहण्याची गरज आहे. माझ्यासारखेच तुम्हा सर्वांना इंग्रजांविरुद्ध संघर्षाने युद्धास उभे राहीले पाहिजे. " पुढे यशवंतराव भोसलेंना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, "पुर्वी स्वराज्यात ऐक्यता बहुत. येणे करोन आजपावेतो व्यंग न पडता एकछत्री अंमल फैलावला होता...." स्वराज्याची आठवण करुन देत यशवंतराव पुढे तेच स्वराज्य घरापुरते करण्यात जमीनदार ते सरदार कसे गर्क झाले आहेत ही कटु वस्तुस्थिती विषद करत खंत व्यक्त करतात.

    एक राष्ट्र, परकियांची हकालपट्टी व एतेद्देशियांचा अम्मल हेच त्यांच्या संघर्षामागील खरे आणि एकमेव कारण आहे. आणि १८०३ ला त्यांनी सुरु केलेला हा संघर्ष मुळात स्वत:साठी नव्हताच कारण त्यांचे स्वत:चे राज्य सुरक्षीत होतेच. त्यांनी उत्तरेत १८०३ पासुन ज्या मोहिमा केल्या त्या सर्वस्वी अन्य राजसत्तांना जागे करत इंग्रजांविरुद्ध बळ एकवटवण्यासाठी. त्यांनी ज्याही १८०३ नंतर लढाया केल्या त्या सर्वच्या सर्व इंग्रजांविरुद्धच्या आहेत, एतद्देशियाविरुद्ध एकही नाही हेही येथे लक्षात ठेवले पाहिजे. या सर्व लढायांत-युद्धांत ते अजिंक्य राहिले आहेत हेही उल्लेखनीय आहे.

    माल्कम म्हणतो ते खरेच आहे. यशवंतरावांत एक अद्भुत चैतन्य सळसळत असायचे. निराशा त्यांना माहित नव्हती. पराकोटीची व्यक्तिगत संकटे कोसळुनही त्यांनी मनाचे संतुलन ढळु दिले नाही. त्यांच्या स्वता: मैदानात सैनिकांच्या खांद्याला खांदा लावुन लढण्याच्या व्रुत्तीमुळे अनेकदा संभाव्य पराजयही त्यांनी विजयात बदलवले आहेत. यशवंतरावांना भारताचा नेपोलियन का म्हणतात हे यावरुन लक्षात यावे. खरे तर नेपोलियनच यशवंतरावांपासुन तर शिकला नाही ना असा प्रश्न उपस्थित होतो...कारण यशवंतराव आधी झाले...नेपोलियन पाठोपाठ. वाटर्लूचे युद्ध १८१५ मद्धे झाले. आणि भारतात अनेक फ्रेंच तेंव्हा तत्कालीन राजकीय व सामरीक घटनांची नोंद घेत होते व त्या आपल्या मायदेशी कळवत होते. त्यातून नेपोलियन काही शिकलाच नसेल असे म्हणता येत नाही. या युद्धात भरतपुरच्या युद्धातील काही सेनानी नंतर सामील झाले होते. तेही म्हणतात भरतपुर वाटर्लूपेक्षा अवघड होते. हीच यशवंतरावांना जागतीक योद्ध्यांनी दिलेली सलामी आहे.

    यशवंतराव हिंदु धर्माचे अभिमानी जरी  असले तरी त्यांनी अन्यधर्मियांचा दुस्वास केल्याचे एकही उदाहरण नाही. अमिरखानाला तर ते सगा भाई मानत असत. अक्षरश: हजारोंचे मुस्लिम सैन्य त्यांच्या पदरी होते. फ्रेंच-इंग्रज असे ख्रिस्ती सेनानी व सैनिकही त्यांच्या पदरी होते. त्यांच्या सैन्यात भिल्लांसह सर्व जातींचे लोक होते. दरबारात ब्राह्मण कारभारी होते. स्त्रीयांबाबत त्यांची भुमिका उदार होती. आपली कन्या भिमाबाई हीस त्यांनी घोडेस्वारी ते सर्व शस्त्रास्त्रांचे शिक्षण दिले तसेच लिहायला-वाचायलाही शिकवले. तत्कालीन सामाजिक स्थितीत राजे-रजवाड्यांच्या स्त्रीया या जनानायात पर्दानशीन वा घुंघटात असायच्या. महाराणी तुळसाबाईंनाही त्यांनी आवश्यक ते शिक्षण दिले होते त्यामुळेच यशवंतरावांनंतर त्या राज्यकारभार पाहु शकल्या. इंग्रजांना अखेर त्यांचा खुनही गफुरखानाला विकत घेवुनच करावा लागला. त्यांचा खुन करण्याचे एकमेव खरे कारण म्हनजे त्या जीवंत असता आपल्याला होळकरी राज्य गिळता येणार नाही याची त्यांना पटलेली खात्री.

    यशवंतरावांची शिस्त कठोर होती. आपले इंग्रज अधिकारी फितुर झाले आहेत हे कळताच त्यांनी त्यांना देहांत शासन दिले.

    यशवंतरावांचे सर्वात मोठे आणि शिवरायांनंतरचे अद्वितीय कार्य म्हणजे त्यांनी ६ जानेवारी १७९९ रोजी करुन घेतलेला राज्याभिषेक. या राज्याभिषेकाची कधीच चर्चा होत नाही. यशवंतरावांना पेशव्याने अधिक्रुत कधीच राजवस्त्रे दिली नाहीत. तरी लोकमान्यतेसाठी व अन्य सरदारांनी आपले महत्व जाणावे व आपल्या कार्यात साथ द्यावी म्हणुन त्यांनी राज्याभिषेक करुन घेतला. एका धनगराचा आधुनिक काळातील हा एकमेव राज्याभिषेक. त्याचे ऐतिहासिक व समाजशास्त्रीय मोल अद्याप आपल्याला समजावयाचे आहे.

    यशवंतरावांना हिंदी, पर्शियन, उर्दु, मराठी व संस्क्रुत भाषा येत असत हे वेगवेगळ्या ठिकाणी माल्कमनेच नोंदवुन ठेवले आहे. ते स्वत: सर्वच शस्त्रास्त्रे उत्तम रित्या चालवत असत. बंदुकीवर त्यांचे विशेष प्रेम होते. एकदा नेमबाजीचा सराव करत असता तोडा फुटुन झालेल्या स्फोटात त्यांचा उजवा डोळा जायबंदी झाला होता. नंतरही त्यांचे बंदुकप्रेम कधी कमी झाले नाही. भालाफेकीत तर त्या काळात त्यांचा हात धरणारा कोणी नव्हता असे माल्कमने गौरवाने नोंदवले आहेच. ते स्वत: उत्तम हिशेबतपासनीस होते त्यामुळे महसुल-खंडणी वसुल्यांत कारकुन त्यांची फसवणुक करण्याची शक्यता नसे. तोफांच्या कारखान्यात स्वत: तोफा ओतण्याचे कामही त्यांनी केले यावरुन त्यांची द्धेयावरची अथांग श्रद्धा सिद्ध होते.

    आता प्रश्न असा उपस्थित राहतो कि बाजीराव पेशव्यांनी दौलतराव शिंदेंच्या एवढे कह्यात जावुन यशवंतरावांचा एवढा दुस्वास का करावा? यशवंतरावांच्या उत्तरेतील पराक्रमाच्या वार्ता कानावर येत असता त्यांचा उपयोग दौलतीसाठी का केला नाही? हे महत्वाचे प्रश्न आहेत व या प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे आहे. कारण पेशवाईच्या अस्तामागे पेशव्यांचे यशवंतरावांबाबतचे चुकलेले धोरण आहे हे तर उघड आहे.

    इतिहासावरुन तीन गोष्टी ठळक होतात त्या अशा:

    १. मल्हारराव होळकरांच्या निधनानंतर महादजी शिंदेंचे प्रस्थ पुणे दरबारात वाढले. त्यांच्यानंतर आलेल्या दौलतरावाने तेच स्थान कायम ठेवण्याचा सर्वस्वी प्रयत्न केला. पेशव्याला आपल्या अंकित ठेवण्याचा सतत प्रयत्न केला, इतका कि त्यामुळे वैतागलेले  पेशवे स्वत: शिंदेंचे वर्चस्व झुगारण्यासाठी इंग्रजांच्या मदतीसाठी सन १८०० पासुनच प्रयत्न करत होते, पण तेंव्हा ते ब्रिटिशांच्या अटी मानण्याच्या परिस्थितीत नव्हते. अहिल्याबाईंनी तुकोजीरावांना होळकरी राज्याचा सेनापती नेमले असले व विविध युद्धांत सेना घेवुन ते सामील होत असले तरी ते अहिल्याबाई असेपर्यंत अधिक्रुत शासक नसल्याने राजकारणात पेशव्यांनी त्यांना सामील करुन घेतले नाही. अहिल्याबाई व नंतर तुकोजीरावही गेल्यानंतर होळकरांचे राज्य बेवारस असुन ते गिळता येईल असाच दौलतराव व बाजीराव पेशव्याचा होरा होता. आणि ते शक्य केलेही. पण यशवंतराव एवढे पराक्रमी निघतील व जप्त केलेले होळकरी राज्य ते परत जिंकुन घेतील याचा त्यांना अदमास आला नाही. तेथुन त्यांचे सारेच आडाखे फसत गेले. दौलतरावाच्या सैनिकी शक्तीवर बाजीरावाचा फाजील विश्वास होताच. पुढे यशवंतरावांनी तो आत्मविश्वास धूळीला मिळवला.

    २. दुसरे असे कि यशवंतरावांना पेशव्याने वा दौलतरावाने "औरस" कधीच मानले नाही. अनौरसाकडे पाहण्याचा खास तत्कालीन हीनत्वाचा द्रुष्टीकोन येथे आडवा आला व कसलीही माहिती नसतांना त्यांनी यशवंतरावांना एक "बंडखोर" अशीच उपाधी देवुन पेशवाईचा शेवटपर्यंत शत्रुच मानले. त्यामुळे बाजीरावाने यशवंतराव व शिंद्यांत सलोखा घडवुन आनण्याचा प्रयत्न केला नाही. शिंद्यांनी तसा प्रयत्न फेटाळुनच लावला असता कारण "अनौरसाशी काय समझोता करायचा?" या उद्दाम भावनेतच तो राहिला. पुढेही त्याने यशवंतरावांच्या ऐक्याच्या व इंग्रजांविरुद्धच्या लढ्याच्या ज्या हाका दिल्या त्याला नीट प्रतिसाद का दिला नाही, याचे उत्तर याच खास तत्कालीन मराठी सनातनी व्रुत्तीत आहे.. भोसलेंबाबतही हेच म्हनता येईल. प्रत्यक्षात यशवंतरावांनी कोणाहीबाबत कटुता ठेवली नव्हती हे आपण पाहिलेच आहे.

    ३. पहिले बाजीराव हे जातीभेदातीत बुलंद व्यक्तिमत्व होते. त्यामुळे अनेक नवी लढवैय्यी घराणी पुढे आली हे वास्तव आहे. पण पुढील पेशवाई, माधवरावांचा अपवाद वगळला तर, फाजील चित्पावनी वर्णाहंकाराची होती. पानिपतच्या युद्धकाळातील घडामोडींतच जातीयवादाच्या पावुलखुणा उमटतांना आपल्याला दिसतात. पानिपतच्या पराजयामागे हा छुपा जातीयवाद होता हे मी अन्यत्र लेख/पुस्तकांत सिद्ध केलेले आहेच. पानिपतच्या युद्धात मसलतींत मल्हाररावांना डावलले जात होते. ब्राह्मण (त्यातही चित्पावन)-मराठा-अन्यजातीय अशी त्रिभागणी उत्तर-पेशवाईच्या काळात झालेली दिसते. एका धनगराला मराठा राजमंडलात बरोबरीचे स्थान द्यावे काय अशा सुप्त प्रवाहांच्या नोंदी आपल्याला इतिहासात सापडतात. त्यामुळे यशवंतरावांना न मोजण्याचे धोरण दुस-या बाजीरावाने कायम ठेवले असे दिसते. "इंग्रजांच्या वर्चस्वाखाली जाणे श्रेय:स्कर पण यशवंतराव होळकरांच्या नको..." असा निर्णय दुस-या बाजीरावाने घेतला असेल तर त्याची जातीय मनोभुमिका आपण समजावुन घेवू शकतो. पण त्याचे दुरगामी परिणाम काय होतील याचा कसलाही विचार पेशव्याने केला नाही हे दुर्दैवी आहे. त्याने यशवंतरावांच्या आवाहनांना प्रतिसाद देवुन परत पुण्याला यायला हवे होते...पण तसे झालेले नाही.
   
    १७९७ ते १८११ असा फक्त चवदा वर्षांचा काळ यशवंतरावांच्या कर्तुत्वासाठी मिळाला. १७९७ ते १८०३ हा काळ यशवंतरावांना स्वत:चे राज्य व अधिकार प्रतिष्ठापित करण्यासाठी, स्वता:ची पत्नी व कन्येस कैदेतुन मुक्त करण्यासाठी वेचावी लागली. १८०३ पासुन त्यांनी इंग्रजांविरुद्ध सर्वकश अथक लढा उभारला आणि बलाढ्य इंग्रज सेनांना एकामागुन एक वेळा पराजित केले. यशवंतरावांना जिंकता येत नाही म्हणुन वेलस्लीसारख्या गवर्नर जनरलची हकालपट्टी इंग्रज सरकारला करावी लागली. भारताबाबतची धोरणे बदलावी लागली. जगात अजिंक्य मानल्या जाणा-या इंग्रज सेनेची इभ्रत जगाच्या वेशीवर टांगली गेली. एवढे झंझावाती, दुर्दैवाच्या आघातांनी भरलेले त्यांचे जीवन. पण त्यांचा अजरामर आशावाद कधीच निस्तेज झाला नाही. कलकत्त्यावर आक्रमण करुन एकट्याच्या जीवावर भारत स्वतंत्र करण्याची त्यांची उमेद अखेरच्या क्षणापर्यंत अभंग होती. मला वाटते कोणत्याही महाकवीला स्फुर्ती देईल असेच हे वादळी जीवन होते. असा महामानव आपल्या धरतीवर जन्माला आला हे आपले भाग्यच आहे. आपण त्यांना समजवुन घेतले नाही हे आपले दुर्भाग्य आहे.

      जेम्स व्हीलर नावाचा पाश्चात्य इतिहासकार यशवंतरावांबद्दल लिहितो-

    " The life of Yashwant Rao Holkar was one of unceasing struggle and peril, endured with the abounding high spirits for which he was renowned. He experienced the murder of one brother by Sindhia and the public execution of another by the Peshwa. He took lightly even the loss of an eye by the bursting of a matchlock; jesting at the belief that a one-eyed man is wicked, he exclaimed that he had been bad enough before but would now surely be the guru or high priest of roguery. He was generous as well as witty, and his wildness was pardoned as part of the eccentricity of genius. He was of superior education as well as superior mental abilities, a skilled accountant and literate in Persian as well as Marathi.
    " No member of his race ever possessed the gift of guerilla warfare in such higher measures as did Yashwant Rao Holkar. His resources were always slight, but his energy and hopefulness boundless. When for the war that now followed he announced to his troopers that they must gather their own rewards and these conditions were accepted with enthusiasm. His reputation was such that, even when himself a fugitive from Scindia`s army, he had been continually strengthened by desertions from his pursuer. His personal courage was of the kind which soldiers most esteem, that of such leaders as Ney and Lannes, and he never lost his personal ascendancy until he lost his reason. "

        मला वाटते खरे यशवंतराव या लेखमालिकेमुळे कळायला मदत झाली असेल....आता तरी त्यांच्या वीरश्रीचे, स्वातंत्र्यप्रेमाचे पवाडे मुक्तकंठाने गाल आणि भारतभुमीच्या या सुपुत्राची नित्य आठवण ठेवाल अशी आशा आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संदर्भ सुची
मराठी:
१. मराठे आणि महाराष्ट्र- अ. रा. कुलकर्णी
२. मराठ्यांचा इतिहास, खंड - ३ ( संपादक :- अ. रा. कुलकर्णी आणि ग. ह. खरे )
३. मराठी रियासत, खंड ८: गो.स. सरदेसाई
४. झुंज- ना. सं. इनामदार
५. ऐतिहासिक बखरी, खंड दुसरा- संपादक अविनाश सोवनी
६. पानिपत:१७६१ : त्र्यं. शं शेजवलकर
७. पुणे शहराचे वर्णन: ना. वि. जोशी
८. ऐतिहासिक गोष्टी: लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख.
इंग्रजी:
१. Battles of the honourable East India Company: making of the Raj:  By M. S. Naravane
२. Advanced study in the history of modern India 1707-1813: By Jaswant Lal Mehta
३. Fall Of The Mughal Empire Vol.5 (1789-1803):  By Jadunath Sarkar
४. Memoir of Central India by Sir John Malcolm
५. Memoir of the services of the Bengal artillery ... edited. by J.W. Kaye( By E. Buckle, Sir John William Kaye)
६. Strangers within the gates:  By Gabrielle Festing
७. Women in the medieval Islamic world: power, patronage, and piety : By Gavin Hambly
८. Blackwood's Edinburgh magazine, Volume 4: Despatches of the Duke of  Wellington
९०. The History of India from the Earliest Period to the Close of Lord Dalhousie’s Administration. – 1867. John Clark Marshman
१०. Indian women freedom fighters: By Ushā Bālā, Anshu Sharma
११. Journal of the Society for Army Historical Research:  Vol. 63 & 64
12. The political history of India, 1784 to 1823: By Sir John Malcolm

6 comments:

  1. सर,
    तुमच्या एक लक्षात आले का की यशवंतराव होळकर यांच्या लिखाणावर एकूण इतर विषयाचा प्रतिसाद पाहता जवळ जवळ शून्य प्रतिसाद मिळाला आहे हि अतिशय खेदाची गोष्ट आहे
    जर आपण ब्राह्मण आणि वैदिक या विषयावर लिहिले असते तर शेकडो प्रतिक्रिया आल्या असत्या
    याचा अर्थच असा होतो की आपल्या लिखाणाचे अभ्यासात्मक वाचन ,विश्लेषण करून लिहिणारे फारच थोडे आहेत आणि विषारी , विखारी भडक लिहिणारे जास्त आहेत !
    महाराज होळकर आणि त्यांनी स्वराज्यासाठी केलेली धडपड यासाठी आपण एक मालिका लिहिली आणि ती पुस्तक रूपाने बाजारात येइलच !
    सर आपण एखाद्या ऐतिहासिक विषयावर एखादा सिनेमा का काढत नाही ज्यात आपण मुख्य भूमिका करा !सध्या जेजुरीच्या खान्डोबावरील सिनेमाची जाहिरात बघून ते आपण तर नाही केले अशी शंका येते !
    आता असा विषय घ्या की शेकड्याने प्रतिवाद होतील , कारण
    गाढवाला गुळाची चव काय अशी अवस्था आहे !

    ReplyDelete
  2. आपण अजूनही स्वघोषित सेन्सोर्शीप लावली आहे आणि आपण अनेक लोकांना फुशारकीने सांगत असता कि संजय सोनवणी इतरांच्या मताची कदर करतात , पण मग हे काय ?
    आपण खुलासा करणार नाही कारण आपला नरेंद्र मोदी झाला आहे !
    त्याच्या सारखेच आपण उद्दाम आत्म केंद्रित आणि स्वतःवरच खूष झालेले आहात !

    ReplyDelete
  3. Why don't you consider the role of Kahirao Holkar in the whole episode? He was officially the ruler of Holkar dyansty, right? Just consider what will be the mindset of Peshwa, Shindes and other people about yashwantrao when Kahirao was official ruler? I agree that yashwantrao was a brave person, but when an official heir of the dynasty is live, why other people will agree with Yashwantrao?

    ReplyDelete
  4. सर, खुप महत्वपूर्ण माहिती दिली,धन्यवाद।

    ReplyDelete
  5. Kaahi baabi khataktaat. Daulatrao Shinde ani Bhosle yanchi saath Hokaraani dili naahi haa aadhicha itihaas aahe. Pudhe wair zaale wagere yaachi wegli karne aahet.

    http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/164527/10/10_chapter%205.pdf

    ReplyDelete
  6. सर खूप छान माहिती छत्रपती यशवंतराजे होळकर महाराज यांच्या विषयी महिती लिहिली आहे.त्याबद्दल आपले सर्व प्रथम आभार व अभिनंदन.सर आपणच धनगर समाजाचा खरा इतिहास आम्हास उपलब्ध करून दिलात नाहीतर प्रस्थापितांनी होळकर शाही चा इतिहास अंधारात ठेवला

    ReplyDelete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...