Friday, October 10, 2014

आपली पाळेमुळे...

सध्या वैदिकांच्या पावलावर पाऊल ठेवून आपापल्या जातींची मुळे युरेशियात, दुरच्या काळातील एखाद्या प्रख्यात राजवंशांत, लोप पावलेल्या (किंवा कधीही नसलेल्या) क्षत्रियत्वात शोधण्याची एक परंपरा निर्माण होते आहे. कोणी आपली जात नागवंशी असल्याचे सिद्द्ध करण्याचा अट्टाहास करतो तर कोणी आमच्याच पुर्वजांनी वेद लिहिले असेही दावे करतो. हे दावे करणारे वैदिक नसतात हे विशेष. सिंधू संस्कृतीचे निर्माते महाराष्ट्रातील मराठे आहेत असेही काही दावे आहेत. द्रविडही यात मागे नाहीत. सिंधू संस्कृतीचे निर्माते द्रविडच असल्याचे दावे आहेत. सिंधू लिपी वाचल्याचे दावे डा. मालती शेंडगे, सदार ते पारपोलापर्यंत सर्वांनीच केलेत...पण एकाच्याही लिपी वाचनात साधर्म्य नाही. राजपूत वंशाशी कसेही करून नाळ भिडवणे तर सर्वात सोपे.. एके काळी ज्यू लोक आपण हिंदुस्तानातून आलो असे सांगत असत. युरोपिय लोकही आम्ही त्या त्या युरोपिय देशातील मुळचे नसून इंडो-युरोपियन आर्य असल्याचे सांगत क्यस्पियन अथवा दक्षीण रशिया हे आपलेव मुलस्थान असल्याचे सांगत असतात. जर्मनांना हे मान्य नाही. ते चार पावले पुढे. ते म्हणतात आर्य मुळचे तिकडचेच आणि शुद्ध नोर्डिक वंश म्हणजेच आर्य वंश. कोणी म्हणतो आम्हीच मुलनिवासी. आर्यभट परकीय...त्यांना युरेशियात हाकला तर वैदिक लोक आम्ही येथलेच...येथुनच जगात आम्ही संस्कृती नेली असे सांगतात.

थोडक्यात प्रत्यकजण आपापल्या पाळामुळांबद्दल संभ्रमात नाही काय?

खरे तर पुराणांतील व महाभारतातील वंशावळ्या जुळत नाहीत. मुळात त्या अवास्तव आणि मिथकांनी भरलेल्या आहेत. उदा. ऋग्वेदातील ययाती, नहूष हे वैदिक ऋचा लिहिणारे ऋषी आहेत तर याच नांवाचे महाभारतात कुरु वंशाचे पुर्वज आहेत. यदु, द्रह्यु, अनु, पुरु व तुर्वश ही ऋग्वेदात टोळ्यांची नांवे आहेत तर महाभारतात ती चक्क ययातीच्या शर्मिष्ठा व देवयानीपासून झालेल्या मुलांची नांवे आहेत. ऋग्वेद ज्याच्या घराण्यात लिहिला गेला त्या मात्र सुदासाचे नांवही महाभारतात येत नाही. एवढेच काय सर्वात मोठे नोंदले गेलेले दाशराज्ञ युद्ध महाभारत अथवा पुराणांत उल्लेखलेले नाही...असो.

असे असुनही आजचे जातीसमाज मात्र आपल्या पाळामुळांच्या शोधात रममाण आहेत. आपली पाळेमुळे शोधावीत असे वाटणे स्वाभाविक आहे, परंतू त्यासाठी भोंगळ साधणे, पौराणिक कालगणना, त्यातील पिढ्यांच्या याद्या, युगसंकल्पनेतील अवास्तवता, त्यातील व्यक्तींची काही हजार वर्षांची आयुर्माने....इकडे सोयिस्कर अथवा अभिनिवेशापोटी दुर्लक्ष करत आपल्या इतिहासाची नाळ काहीही करुन नुसती पुरातन नव्हे तर तर प्रसिद्ध देशातील अथवा विदेशातील प्रसिद्ध टोळ्या/घराणी यांशी केवळ वरकरणी नामसाधर्म्यांनी जुळवायचे प्रयत्न होतात. ज्युडिया म्हणजे इकडील जाधव अशाही मजला गाठल्या जातात.  हिट्टाईट लोक म्हणजे हाटकर धनगर अशीही संशोधने होतात. वैदिक ज्याप्रमाणे आजकाल आर्य भारतीयच असून येथुन जगात पसरले असे सांगतात तसे हट्टी लोकही भारतातुन "तिकडे" गेले असे सांगितले जाते.

अशा संशोधनांतून (?) जाती/धर्म अहंकार वाढण्यापलीकडे काय साध्य होणार? खोट्या अहंकारांवर कोणत्या जाती/धर्माचे कल्याण होणार? आहे त्या ज्ञात इतिहासात आपापले योगदान काय याचे तटस्थ विवेचन पुरेसे नाही काय? जनुकीय विज्ञान अजुन बाल्यावस्थेत आहे व त्याचे निष्कर्ष हे परस्परविरोधी आहेत हे उघड असतांना सोयिस्कर निष्कर्ष का उचलले जातात? आउट ओफ़ आफ्रिका हा गेली काही दशके लोकप्रिय असलेल्या सिधांताला तडे जातील असे पुरावे आता आशिया, चीन, मलेशियात समोर येत असल्याने त्या सिद्द्धांताला जनुकीय आधारावरच मुठमाती देण्याच्या बेतात वैज्ञानिक जग आहे हे लक्षात कोण घेणार?

पण या कथित सिद्धांतांनी समाजाचे (युरोपियही) सामाजिक व सांस्कृतीक पराकोटीचे नुकसानच झाले आहे. भारतातील मुलनिवासी विरुद्ध वैदिक वाद, द्रविड विरुद्ध आर्यवादातून निर्माण झालेला व आजही जीवंत असलेला संघर्ष हा सरळ सरळ समाजाची उभी आडवी फाळणी करणारा आहे हे कधी समजणार?

आपापली पाळेमुळे शोधली पाहिजेत. ती माणसाची मानसिक गरज आहे. आत्माभिमान येत न्यूनगंडातून अथवा वर्चस्वतावाद गंडातून मुक्ती त्यामुळेच मिळू शकते. पण जाती/धर्म/वांशिक अहंकारातून संशोधने केली गेली तर मात्र स्वत:च्या हातीही ठोस काही पडणार तर नाहीच पण उलट सामाजिक नुकसानच होईल. युरोपचा इतिहास फार तरुण आहे तो वयोवृद्ध ठरवता यावा व काळ्यांपेक्षा गोरे श्रेष्ठ या अहंभावातून आर्य सिद्धांताचा जन्म झाला. पण काळ्यांचा इतिहास जुनाच आहे, युरोपियन वा भारतियांपेक्षाही हे मान्य करण्याची नैतिक हिंमत यांच्यात आहे काय? पण अस्तित्वात नसलेल्या "आर्य भाषा गटाच्या मुलस्थानावर" जेवढी चर्चा होते तशी सेमेटिक गटाची का होत नाही? त्यांचा इतिहास तर केवळ अवशेषांतून नव्हे तर लिखित स्वरुपात उपलब्ध आहे. गिल्गमेश सारखे जगातील आद्य महाकाव्य लिखित स्वरुपात जसेच्या तसे उपलब्ध आहे. तसे रामायण-महाभारताचे आहे काय? खुद्द ऋग्वेदाचे आहे काय? होमर वगैरे तर फार फार अलीकडचे.

हा सांस्कृतीक बाष्कळपणा करण्यात वैदिकांनी पिढ्या खपवल्या. आता त्यात अवैदिकांचीही (ते स्वत:लाच वैदिक समजतात हा भाग अलाहिदा.) भर पडावी हे भविष्यासाठी सांस्कृतीक दु:श्चिन्ह आहे.

बरे या समाजांचा मानसिक दुभंग पहा. आरक्षणासाठी हेच आम्ही सामाजिक मागास असल्याचे हिरीरीने दावे करतात...एकीकडे तुम्ही सुर्यवंशी/चंद्रवंशी क्षत्रीय म्हणवता, आपापली पाळेमुळे वैश्विक इतिहासातील पुढारलेल्या घटकांतच शोधतात आणि वर मागासही म्हणवून घेता...हे काय आहे? हा स्वत:च्याच अस्तित्वाबद्दलचा मानसिक दुभंग नव्हे तर अन्य काय आहे? स्वत:च्या हीणगंडातून येणारी ही वर्चस्वगंडाची प्रतिक्रिया तर नव्हे?

कोणताही गंड कामाचा नाही. श्रेष्ठता वंशात/प्रांतात/धर्मात/जातीत नसते...ती व्यक्तींच्या एकुणातील सांस्कृतीक/सामाजिक आणि अर्थव्यवस्थेतील योगदानात असते. ती योग्यता आधी वाढवा. पाळेमुळे अवश्य शोधा...पण ती कोणत्याही गंडाच्या किंवा अर्धवट शिजलेल्या विद्वानांच्या साहित्यालाच मुख्य संदर्भ ग्रंथ मानून आणि केवळ काही शब्द-साम्यांतून शोधू नका. नाहीतर "ज्याचा खोट्या इतिहासावर विश्वास असतो त्याचे भविष्यही खोटेच असणार!" याची नोंद ठेवा.

20 comments:

  1. आप्पा- आम्हाला समजून घ्यायचे आहे संजय !
    बाप्पा - आमची अडचण हि आहे की आम्हाला कोणीच सांगत नाहीये की वैदिक आले कोठून , जर त्यांनी इतके राडे करून ठेवले आहेत तर त्यांचेच मूळ आधी शोधले पाहिजे -
    आप्पा - अरे संजय सरांचा एक लेख आहे=शैव= त्यात त्यांनी स्पष्ट म्हटले आहे इसपु १००० च्या आसपास वैदिक धर्माचा उदय भारतात झाला - तसे जर असेल तर ज्या वेदाना प्रमाण मानतो हा वैदिक धर्म त्याची निर्मिती आणि वेदांची निर्मिती यात इतके वर्षांचे अंतर का ?
    बाप्पा - संजय , तुझ्या मते वेदांची निर्मिती अलीकडची आहे कारण त्यात अवेस्तचा उल्लेख आहे - -ते प्रक्षिप्त असेल असे क्षणभर बाजूला ठेवले तरी - वेदांची निर्मिती , महाभारताचा काल आणि इसपु १०००
    हा गोंधळ समजत नाही - समजून तर घ्यायचा आहे अगदी तीव्रतेने - त्याला कारण म्हणजे वैदिक हे सुरवातीला वाईट नाहीत असे असेल का ?आर्य अनार्य आणि शैव वैदिक हा वाद वेगवेगळा आहे हे तरी समजून घेऊया !

    आप्पा - मुसलमान काय किंवा ख्रिश्चन काय , त्यापूर्वी असलेल्या प्रथांचा , धर्माचा निषेध म्हणूनच हे धर्म जन्माला आले - नाही का ?मग असे समजायचे का की प्रस्थापित शैव धर्माचा निषेध म्हणून वैदिक धर्म जन्माला आला ?कारण आपण म्हणता त्याप्रमाणे वैदिक हे पूर्ण भारतीयच आहेत - आणि त्यांच्या पूर्वी शैव होतेच आणि आजही आहेत पण मग वैदिक धर्माचा संस्थापक का सांगता येत नाही ?

    बाप्पा - मग हा मूळ विचार समजून न घेता संजय एकसारखा इतिहास आणि सनावळ्या यातच अडकतो - ते का ?दोन्ही पंथ इथलेच याच मातीतलेच हे तर खरे - त्यात शैव अधिक पूर्वापार हे सत्य कुणीच नाकारत नाही !
    आप्पां - मग आद्य शंकराचार्य शैव असे धरायला पाहिजे - पण त्यांनी वैदिक चार पीठे स्थापन केलीहे खरे आहे - का त्यांनी शैव शंकराचार्य असलेले ४ दिशाना ४ मठ स्थापन केले ?भज गोविन्दम हे प्रक्षिप्त आहे का ?बौद्ध आणि जैन तत्व्द्न्यानाचा पराभव करायची गरज शैवाना नव्हती आणि वैदिकाना जास्त होती असे कांही आहे का ?कारण जास्त वादविवाद आद्य शंकराचार्य विरुद्ध बौद्ध किंवा जैन असेच चित्र सदोदित दिसते - मला तरी शैव वैदिक असा सरळ सरळ वादाचा सामना कुठेच दिसला नाही , आपण त्याबद्दलही सांगावे !

    ReplyDelete
    Replies
    1. आप्पा-बाप्पा...तुम्हाला खरेच समजावून घ्यायचे आहे कि उगाचचचेच प्रश्न आहेत हे तुम्हालाच ठाऊक, पण सध्यातरी शंका प्रामाणिक आहेत असे गृहित धरतो. शैव-वैदिक हा वाद आहे काय? याबाबत पुष्कळ लिहिले आहे आणि ते प्रत्येक लेखात रिपीट करणे शक्य नाही...आणि या लेखाचा हेतू अकारणं कोठेही पाळेमुळे शोधत बसणे याशी निगडित आहे. वैदिकांचा अद्यापही आपला मुळ शोध संपलेला नाही...कधी ते आर्क्टिक प्रदेशतले असतात तर कधी कुर्गन सम्स्कृतीचे, कधी ते अंड्रोनोवो संस्कृतीतुन आले म्हणतात तर कधी अनातोलियन...आजकाल आम्ही भारतातुनच मग बाहेर गेलो असेही सांगितले जाते...नक्की काय हे त्यांना अजुन तरी समजलेले दिसत नाही. दुसरे म्हणजे वैदिक धर्म वाईट असे मी कोठेही म्हटले नसून तो स्वतंत्र धर्म आहे असेच म्हटलेले आहे, त्याचा मुर्तीपुजक शैव धर्माशी काडीइतकाही संबंध नाही...उलट वेदांनी (यजुर्वेद) मुर्ती-प्रतिमापुजेचा निषेध केलेला आहे. असे असतांनाही आज वैदिक मुर्तीपुजाही करत असतील आणि वेदांनाही कवटाळत असतील तर ते द्वैधर्मी आहेत.

      वैदिक धर्म इसपू १५०० ते इसपू १००० च्या काळात जन्माला आला ही विद्वत्मान्यता आहे. धर्म आधी कि धर्मग्रंथ आधी? वैदिक धर्मात ती समांतर चाललेली विकसनाची प्रक्रिया दिसते.त्यामुळे मुख्य देवताही बदलतांना दिसतात...इंद्र-वरुण-मित्र-प्रजापती...ई. आपले स्थान बदलतांना दिसतात...एकच एक श्रेष्ठ देवता ही कल्पना ऋग्वेदात दिसत नाही. महाभारताचा काळ निश्चित नाही. पुरातत्वीय पुरावे ग्राह्य धरले तर हा काळ सनपुर्व ४०० एवढाच येतो...(मला तो मान्य नाही....ते बरेच आधी, पण नेमके कधी, हे सांगता येणार नाही.

      वैदिक धर्म कोणच्या विरोधात स्थापन झाला? अर्थात तो मुर्ती/प्रतिमापुजकांच्या विरोधात स्थापन झाला. दाशराज्ञ उद्ध्याचे कारणही धार्मिक संघर्षात दडले आहे. ऋग्वेदात आलेले अवेस्त्यातील उल्लेख प्रक्षिप्त आहेत काय? एखा-दुसरे उल्लेख असते तर ते समजण्यासारखे आहेत, पण मघवन (मगी) या अवेस्तन धर्मातील पुरोहित वर्गाचाही उल्लेख ऋग्वेदात येतो, एवढेच नव्हे तर बहुतेक व्यक्तीरेखाही ऋग्वेदात येतात, त्यामुळे त्यांना प्रक्षिप्त मानता येत नाही. नीट पाहिले तर बौद्धांना वैदिकांचा जास्त विरोध होता कारण बौद्ध धर्म वैदिक धर्मातीलच पुढची सुधअरणा आहे हे लक्षात येईल. बुद्ध यज्ञांना नव्हे तर त्यातील हिंसेला विरोध करतो. बुद्ध चातुर्वर्ण्याला विरोध करत नाही मात्र क्षत्रीय हे ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ सांगतो. मुर्तीपुजा मानत नाही. अशी अनेक साम्ये दोन धर्मांत आहेत, त्यामुळे त्याचे सर्वात पहिले अनुयायी हे वैदिकच होते हे येथे लक्षात घ्यायला पाहिजे. पण नंतर बौद्ध धर्म शैवांतील वामतंत्रांच्या आहारी गेला (वज्रयान) आणि त्याच्या अवनतीची बीजे रोवली गेली. आदि शंकराचार्य वैदिक होते काय? कि दोन धर्मात समन्वय घडवू पाहत होते? त्यांनी चार मठांना चार वेद दिले हे मठाम्नायमद्धे नमूद आहे पण हा ग्रंथ आचार्यांचा नाही हे सिद्ध झालेले आहे. अनेक स्तोत्रे ही त्यांची नाहेत...उदा. पांडुरंग स्तोत्र. भज गोविंदम बद्दल नक्की सांगता येणार नाही तरी कृष्ण हा अवैदिक असल्याने त्याबद्दल कोणताही दावा करता येत नाही.

      शेवटचे...वैदिक धर्माचा संस्थापनाचे (किंवा प्रारंभाचे) कार्य राजा सुदासाच्या विश्वामित्र व्ग वशिष्ठ यांच्याकडे जातेच, त्यामुळे वैदिक धर्माला संस्थापकच नाही असे म्हणता येणार नाही. वशिष्ठ व विश्वामित्र वैरामुळे वैदिक धर्मातही दोन सरळ सरळ वेगळे प्रवाह आहेत...एक इंद्रप्राधान्याचा तर दुसरा वरुण प्राधान्याचा.

      Delete
    2. प्रियवर,
      जहाँ तक मुझे याद है अपने एक इंग्लिश लेख पर दिए गए कामेंट पर आपने वैदिक धर्म को दुनिया का सबसे worst धर्म लिखा है. यदि वह अलग धर्म मात्र है, तो आप उस धर्म विशेष के प्रति इतने अनादर से क्यों भरे हैं? आपने कभी मुस्लिम, ईसाई , बौद्ध, जैन और यहूदी धर्म पर इतना कटुतापूर्ण नहीं लिखा है जितना आप वैदिक धर्म पर लिखते आये हो.
      दिनेश शर्मा

      Delete
  2. शिवधर्म या लेखात ,
    शैव धर्म कर्म कांडे असलेला धर्म आहे असे संजय म्हणतो !
    मूर्तीपूजा आली की - मूर्ती घडवण्या पासून , दगड निवडण्यापासून शास्त्र आणि विधी आले -
    प्राण प्रतिष्ठा आली -त्याचे विधी आले शिव असो वा शक्ती - त्यासाठी विधी आलेच - त्यासाठी
    श्लोक आले - रचना आल्या , आडाखे आले शकुन अपशकुन आले , कौल आले , उतारे आले , जसे पुनर्जन्म मानले कि स्वर्ग नरक आपसूक आले तसेच हे ! हे निर्माण होणे आणि श्रद्धा यांचा परस्पर मेळ असणारच ! संजय म्हणता वैदिकांमध्ये मुर्तीपुजाच नाही - फाकत आवाहने आहेत !वेगवेगळ्या निसर्ग शक्तीना आवाहने आहेत , इंद्र वरुनादॆना समाजाच्या भल्यासाठी आवाहने आहेत !
    आता आमचे आम्हालाच कळत नाही की यातले योग्य काय ?
    संजय सर यांचा ओरडा नेमका कशासाठी आहे ?
    वैदिक अमूर्ताला पुजाणारे होते , होमहवन करणारे होते आणि शैव शक्ती पूजक सामुर्ताला पुजाणारे होते - नेमके आदर्श काय ?
    संजय सर समाजाला चुकीच्या दिशेने मार्गदर्शन करत नाहीत का ?
    नैवेद्य किंवा बळी ही कल्पना दोन्ही पंथात आहे का ?वैदिक आणि शैव-शक्ती ?
    आप्पा आणि बाप्पा यांनी विचारलेल्या शंका फारच महत्वाच्या आहेत आम्हा शंकांचे आपण निरसन कराल अशी आशा आहे !समजुतीने आम्हाला समजावून सांगाल का ?

    ReplyDelete
    Replies
    1. आजीबाई, (तुम्ही आजीबाईच असणार त्याशिवाय एकेरीत येण्याचा उद्धटपणा केला नसतात) तुम्ही म्हणता..."शिवधर्म या लेखात ,
      शैव धर्म कर्म कांडे असलेला धर्म आहे असे संजय म्हणतो !
      मूर्तीपूजा आली की - मूर्ती घडवण्या पासून , दगड निवडण्यापासून शास्त्र आणि विधी आले -"

      मुळ लेख नीट वाचलाय काय? शैव धर्मात कर्मकांड आहेच पण कर्मकांडे नाकारणारा ब्रिगेडी लोकांनी काढलेल्या "शिव" (शैव नव्हे) धर्मातही कर्मकांडे आली असावीत असे ते विधान आहे. अर्धवट वाचून बाष्कळ प्रश्न उपस्थित केले जाणे हे तुमच्या वयोमानाला साजेशे असेल कदाचित!

      ज्यांना अमूर्त वैदिक धर्म आवडतो त्यांनी तो खुशाल आवडून घ्यावा, जपावा. शैव धर्म चांगला कि वाईट हे अवैदिक शैवधर्मीय पाहून घेतील. वैदिक धर्माचा शैव धर्माशी काहीही संबंध नाही. बाकी प्रश्नांची उत्तरे आप्पा-बापा या महाआजोबांना दिलेल्या उत्तरात सापदतील.

      Delete
  3. मला असे सुचवायचे आहे की आज पर्यंत कितीतरी उत्तम लेखक संशोधक होऊन गेले एकापेक्षा एक - पण संजय सारखा घाई झालेला विरळाच !किती घाई झालेली असते याला - आणि सर्व काही आधीच ठरलेले असते की काय सिद्ध करायचे आहे , कशाच्या विरुद्ध मांडणी करायची आहे - त्यामुळे सर्व प्रकार हा अत्यंत फालतू ठरतो आणि त्याला प्रतिसाद फारच कमी ! अत्यंत हिणकस विचार आणि मांडणी - सारखे वैदिक आणि ब्राह्मण वर्चस्व हाच एक कलमी प्रोग्रॅम - त्यामुळे त्यात नाविन्य काहीच नाही - कुणालाच आता त्याच्या लेखनाचे गांभीर्य नाही - स्वतःच्या हाताने पाठ थोपटून घ्यायची हौस -एक ग वा बेहेरे सोडता असे करणारा कुणीच आमच्या पहाण्यात नाही - त्यांनापण अशीच हौस होती - मी असे केले - मी तसे केले - परदेशाचे रेफ़रन्स देऊन सारखे आपली लाल करायची - अमका मला असे म्हणाला आणि तमका तसे म्हणाला - पण खर्या विचारवंताला त्याचे काहीच वाटत नाही - अशी मार्केटिंग करायची त्याला गरजच नसते - त्यामुळे संजय अत्यंत केविलवाणा जीव वाटतो !
    असो - बिचार्याची कीव वाटते - शिवधर्म असो किंवा वैदिकांबद्दलचे त्याचे विचार असोत - कुणीच सिरीयसली घेत नाही - भाषणाला बोलावले की जरा मजा म्हणून लोक ऐकतात - आणि करमणूक झाली की टाळ्या वाजवतात - इतकेच ! समाज घडवण्याचा पल्ला तर दूरच - आधी सुजाण विचार समाजाला देण्याची कुवत संजय मध्ये नाही ! कुणीतरी छान खिल्ली उडवली आहे - संजयची कोणती कादंबरी अर्थ पूर्ण आहे ? ७० ८० पाने लिहिली म्हणजे तो काही लेखक होत नाही - आणी असले फाटके विचार असतील तर लोक विसरून जातात ! बिचारा संजय !

    ReplyDelete
    Replies
    1. प्रतिक्रिया देण्यासाठी एवढे श्रम घेण्याची तरी काय गरज आहे मग?

      Delete
  4. आप्पा - अहो बाप्पा - लवकर या हो इकडे
    बाप्पा - काहो , इतके हाकारे पिटारे ?
    आप्पा - संजयाने आपले ऐकून लगेच उत्तर दिले आहे , आणि किती मुद्देसूद , माझ्यातरी सगळ्या शंका दूर झाल्या - असे पाहिजे प्रोम्पट , आता आपल्यालाच आपली मते अधिक मुद्देसूद मांडली पाहिजेत
    बाप्पा - हो हो मीपण वाचतच होतो आणि इकडेच येणार होतो - संजयचे अभिनंदन केले पाहिजे -
    आप्पा - संजय जुग जुग जियो - मेरे लाल !असे खुलासे आणि असे आदान प्रदान झाले तर तुला हजारो अनुयायी मिळतील - आपलाची वाद आपणासी असतोच पण इतराना आपलेसे करायला त्यांच्याशीही असा दिलखुलास संवाद खूप वेगळी दिशा देतो ! अभिनंदन !
    बाप्पा - आणि एक जाता जाता सांगतो - आम्ही नाही रे बाबा महा आजोबा !आजही आम्ही अक्रोड दाताने फोडतो तडातड - आम्ही विचाराने बुरसटले वाटतो का ?नाही - आम्ही देवच न मानणारे - मग कसले बुरसटलेले -
    आप्पा - पण अगदी प्रथम जेंव्हा पं नेहरूंचे इंदिरेस पत्र वाचले आणि डिसकव्हरी ऑफ इंडिया हातावेगळे केले त्यावेळेस वाटले हे काहीतरी वेगळे आहे - सत्याचे प्रयोग वाचले होतेच - नंतर असे बरेच वाचले - पण घात झाला - सगळेच लिहित गेले आणि वर्तनात त्याचे कुठेच साम्य दिसेना - मग वाटू लागले हे सर्व ढोंग करतात !
    बाप्पा - हा मोदी किती जीवघेणा खोटारडा आहे - हि फार गमतीदार भूमिका आहे - गुजराथी म्हणून त्याने गांधीजीना जणूकाही कीडन्याप केले आणि बघता बघता भगवा खादीमय झाला - जगात काहीही घडू शकते -संजय सांगतो ते पण मानावे लागते ते या अशा फसव्या मतमतांतरामुळे -बघता बघता गोडसेला पुजणारे महात्म्याला खिशात घालू लागले आणि आपण साक्षीदार म्हणून बघत आहोत - हे खरे का ते खरे ?गेंड्याची कातडी म्हणतात ती अशी !
    आप्पा - संजय फार पोट तिडकीने सांगतो त्याची मते - आपण त्याचा अनादर नाही केला , पण तो ज्या वेळेस आपल्याला - महा आजोबा - म्हणतो कुठेतरी काहीतरी चुकते आहे असे वाटू लागते !

    ReplyDelete
  5. आपण आर्य आणि वैदिक एकाच मानता का ?
    प्रत्येक नवीन धर्म हा अस्तित्वातील धर्माच्या उनिवनच्या उत्तरादाखल प्रत्युत्तर म्हणून निर्माण होऊन आपले अनुयायी जुन्या धर्मातूनच उभे करतो हा इतिहास आप्पा बाप्पा या जोडीने मांडला आहे त्या बद्दल त्यांनी असेही विचारले आहे की शैव धर्मातूनच वैदिक निर्माण झाले का ?त्याबद्दल आपण काहीच उत्तर दिलेले नाही असे वाटते - त्याचे काय ?

    ReplyDelete
  6. वैदिक धर्म स्थापन झाला त्याआधी राजा सुदास, विश्वामित्र, वशिष्ठ कोणत्या धर्माचे होते? ते तत्कालीन कोणत्याना कोणत्या धर्माचे होतेच. हा धर्म स्थापन झाला तो दक्षीण अफगाणिस्तानात. तेथे लिंगपुजक पुर्वीपासून आहेत म्हणजे तेही मुळचे शैव असण्याची दाट शक्यता आहेच. भारतात हा धर्म नंतर भृगू, काण्व व अगस्त्याने प्रचारित केला. म्हणजे भारतातील वैदिक हे धर्मांतरील वैदिक आहेत. आर्य हा मुळात वंशच नसल्याने, संबोधन असल्याने, आर्य मानता का हा प्रश्न एखाद्या जनसमूहाला उद्देशून असेल तर चुक आहे.त्यामुळे आर्य आणि वैदिक एकच असे म्हणता येणार नाही. अगस्त्य, भृगू, काण्व (व इतर अनेक वैदिक ऋषी) अनार्य असल्याचे विद्वानांनी दाखवून दिले आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. संजय सोनवणी ,
      आपण अत्यंत अभ्यासपूर्ण उत्तर दिल्याने मला पूर्ण समाधान मिळाले
      मनातल्या शंका प्रत्येक उत्तराने वाढतच जातात हेही तितकेच खरे - त्यामुळे शेवटी असे वाटू लागते की आपण सर्व या विषयात रस घेणारे प्रामाणिकपणे एकत्र जमलो तर किती चान भेट असेल ती ?
      कारण संवादातूनच द्न्यांवृद्धी होते - नवीन न सुचलेले विचार सुचतात , न पडलेले प्रश्न सामोरे येतात आणि परत परत चर्चा होत राहून विचारांची घडी पक्की बसते - - आपण असे बौद्धिक का घेत नाही - ज्यात सर्व लोकाना ( प्रामाणिक ) शंका समाधान होण्यासाठी एक जागा असेल ?
      आपल्या उत्तराबद्दल पुनश्च आभार !

      Delete
  7. प्रश्न या संदर्भातालेच आहेत म्हणून विचारण्याचे धाडस करतो आहे
    आपण नेहमी श्रीकृष्ण देवाना शैव म्हणवता वैदिक परंपरा आणि वैष्णव परंपरा हि वेगळी मानायची का ?
    दशावतार हे काही प्रमाणात उत्क्रांतीच्या सिद्धांताशी जुळणारे वाटतात जसे कि जल आणि स्थळ प्राण्यांची उत्क्रांती - मत्स्य - फक्त जलचर ,कूर्म - जलचर आणि स्थलचर ,वराह - स्वताचे फक्त संरक्षण न करत आ क्र्मानाची वृत्ती -तरीही प्राणीच - , नृसिंह - अर्धा मानव अर्धा सिंह - वामन - हा पूर्ण मानव , परशुराम - ब्राह्मण नेतृत्व , श्रीराम - क्षत्रिय नेतृत्व , श्रीकृष्ण - पाळीव प्राणी धन मानणारा गोप वर्ग -बौद्ध - बुद्धिनिष्ठ , कलंकी - स्वार्थाचा परमावधी आणि नितीशुन्य समाजाचा पसारा आणि शेवटी संपूर्ण व्यवस्थेचा संपूर्ण अधः पात - असा हा सुचलेला विचार आहे -
    यात उत्क्रांती आणि समाज बांधणी यात ठराविक अवस्थेत ठराविक वर्गाचे महत्व मान्य करत हा दशावतारी विचार केला आहे - आणि - यात एक समान धर्म मानला असावा - कारण एका धर्माचे आक्रमण आणि दुसर्याचा पराभव - असा विचार नाही - नवीन धर्म म्हणजे तरी काय ? शेवटी आपले विचार पुर्वासुरींशी जुळत नाहीत म्हणून विचारांची नवी चूल मांडणे - म्हणजेच नवा धर्म - नव्हे का ?- नवा धर्म हि एक अहिंसक सोय आहे - पण असे दिसते की वांशिक वरचढपणाच्या भावनेतून त्यातून हिंसेचा पुरस्कार वाढत गेला असावा !
    शैव हे जर अति प्राचीन आणि शाश्वत तत्वज्ञान असेल तर त्या नंतर मानवाला त्याच्या वैचारिक उत्क्रांतीत दुसऱ्या किंवा सुधारीत नाव विचारांची गरज वाटली का ?
    धर्म हि दशावाताराप्रमाणे उत्क्रांतीतील एक एक चढती पायरी असू शकते का ?
    मुळात नवीन धर्म स्थापनेची माणसाला तीव्र आस का लागत असेल हाही विचार अंतर्मुख करतो पण उत्तर सापडत नाही - पुर्वाश्रामिंच्या धर्मातील कर्मकांडाचा अतिरेक हे एकमेव कारण नवीन धर्म स्थापनेला कारणीभूत होते का ? का खरोखरच आत्मिक उर्मितील चिंतनातून माणसाला नवीन उत्तर सापडते म्हणून नवीन धर्मविचार जन्मास येतो ? ती फक्त राजकीय सोय असते का समाज प्रबोधनातून प्रस्थापित विचारांच्या विरुद्ध केलेले बंद असते - नेमके काय असते ?
    संजय सर आपण यात सहभाग घ्याल का आणि शंका निरसन कराल का ?

    ReplyDelete
    Replies
    1. पृथ्वीराज, अवतार संकल्पना प्रथम ऋग्वेदात प्रथम येते आणि पहिले तीन-चार अवतार प्रजापतीचे आहेत, विष्णुचे नाहीत. नंतर पुराणांनी ती संकल्पना उचलत अवतार कार्य विष्णुकडे दिले. ही कल्पना वैज्ञानिक म्हणता येणार नाही. उत्कांतीवाद मुलात तसा नाही. वैदिक धर्मात मुर्तीपूजा नाही, पण चवथ्या शतकानंतर यज्ञ बंद पडल्याने वैदिक विष्णुची मुर्तीपुजा सुरु केली गेली. शैव-वैष्णव वाद त्यातुन वाढला. शाश्वत तत्वज्ञान ही बाब जगात अस्तित्वात नाही. शैव धर्म पुरातन आहे. वैदिक धर्म कोणाच्या प्रतिक्रियेतून निर्माण झाला म्हणाल तर तो शैवांची नव्हे तर अवेस्तन (असूर) धर्माची प्रतिक्रिया म्हणून निर्माण झालेला आहे. याच्व्ही कारणे त्या दोन समाजांतील अन्य संघर्षातही आहेत...केवळ धार्मिक नव्हेत.

      एक दिवस सारेच धर्म संपावेत ही खरी माणसाची उत्क्रांती, धर्मांमुळे माणूस उत्क्रांत नव्हे तर अवनत होतो. धर्म ही बव्हंशी राजकीय आश्रयाने वाढणारी बाब आहे. उदा. जेंव्हा जेंव्हा वैदिक धर्माला राजाश्रय मिळाला तो वाढलेला आहे. ख्रिस्ती धर्म रोमन सम्राटाने आश्रय दिला म्हनून फोफावला.

      Delete
  8. संजय सोनावणी , बरेचसे समाधान झाले , पण नेमका गुंता अजूनही काही सुटला नाही -
    आपण श्रीकृष्ण शैव मानता , आणि दशावतार हे साधारण वैष्णव किंवा वैदिक मानता का ?
    वैदिक आणि वैष्णव परंपरा एक आहेत का ? हा तिढा काही सुटत नाही -
    वैदिक धर्मपंथ हा अवेस्तन धर्माची प्रतिक्रिया म्हणून आला असे आपण म्हणता !मग वैष्णव म्हणजे परत नेमके काय ? ती वैदिकानीच हिंदू धर्मात मारलेली मेख आहे का ?
    शैव वैष्णव यांच्यात वाद आहे का ?माश्यामतेआहे - दक्षिणेत तर आडवे गंध आणि उभे गंध लावण्या वरूनही वाद आहेत -
    आमच्या मते आपण १)शैव , २)वैदिक , ३)वैष्णव , ४) आर्य असे विश्लेषण करून आम्हाला समजावून सांगितले तर आम्ही आपले ऋणी राहू - कारण हा घोळ न संपता वाढतच जात आहे -
    त्यातील आर्यांबद्दल आपण सांगितले आहे - ते समजले -ते एक केवळ संबोधन आहे वगैरे -
    आता ,
    शैव आणि वैष्णव वेगवेगळे आहेत - बरोबर ?
    आपल्या मते शैव आणि वैदिक हेपण वेगवेगळे आहेत ?
    आणि वैष्णव आणि वैदिक पण वेगवेगळे आहेत का ?
    वैदिक जर अवेस्तन - पारशी धर्माला प्रतिक्रिया असेल तर मग वैष्णव पंथ हाही कुणाला प्रतिक्रिया म्हणून बहरला का ? महाभारत हे वैष्णवांचे महाकाव्य आहे का शैवांचे - कारण आपल्या मते श्रीकृष्ण शैव आहे !म्हणजेच महाभारत हा शैव लोकांचा मेरुमणी आहे का ?
    नारद हे कोणत्या पंथात मान्य व्यक्तित्व आहे ?कारण शैव पंथात पण त्याला स्थान आहेच ना ? आणि नारद तर कायम नारायण नारायण म्हणत असतात !
    अशा अनेक शंका अनुत्तरीत आहेत - आपण काही याबाबत सांगाल का ?

    ReplyDelete
    Replies
    1. पृथ्वीराजजी, थोदक्यात तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो.

      १. .....आपण श्रीकृष्ण शैव मानता , आणि दशावतार हे साधारण वैष्णव किंवा वैदिक मानता का ?....ख्रुष्णाचा संबंध वैष्णवांशी नाही , उलट कृष्णाच्याच सात्वतांनी कृष्ण, बलराम, प्रद्युम्न वगैरेंचा पांचरात्र संप्रदाय (अवैदिक) काढला होता व तो किमान इसपू १०० पर्यंत उत्तरेत अत्यंत प्रभावी पंथ होता. सोमनाथाचा पहिला जिर्णोद्धार कृष्णाच्या नांवावर जमा आहे. त्यामुळे कृष्णाला वैदिक अथवा वैष्णव म्हणता येत नाही.

      २. वैदिक आणि वैष्णव परंपरा एक आहेत का ? हा तिढा काही सुटत नाही -...वैदिकांतुनच वैष्णव परंपरा निर्माण झाली असली तरी त्या मुळीच समान नाहीत. ऐदिक धर्मात मुळात प्रतिमा/मुर्ती पुजन निष्द्ध आहे, विष्ण्चे पुजा मुर्ती स्वरुपात होते. फार तर त्याला वैदिकांचा एक उपसंप्रदाय म्हणता येईल.

      ३. वैदिक धर्मपंथ हा अवेस्तन धर्माची प्रतिक्रिया म्हणून आला असे आपण म्हणता !मग वैष्णव म्हणजे परत नेमके काय ? ती वैदिकानीच हिंदू धर्मात मारलेली मेख आहे का ?......यज्ञ वेळखाऊ आणि खर्चिक झाले होते. त्यामुळे यजमान मिळणे अवघड, थात जैन-बौद्ध-शैव हे प्रबळ प्रतिस्पर्धी, त्यामुळे वैदिकांना बदल स्विकारणे भाग होते. त्यांनी मुर्तीपुजा स्विकारली, पण वैदिक देवतेची. त्यालाच आपण वैष्णव संप्रदाय म्हणतो.

      ४. शैव वैष्णव यांच्यात वाद आहे का ?माश्यामतेआहे - दक्षिणेत तर आडवे गंध आणि उभे गंध लावण्या वरूनही वाद आहेत -
      आमच्या मते आपण १)शैव , २)वैदिक , ३)वैष्णव , ४) आर्य असे विश्लेषण करून आम्हाला समजावून सांगितले तर आम्ही आपले ऋणी राहू - कारण हा घोळ न संपता वाढतच जात आहे -...शैव वैष्णव वाद आहेत हे तुमचे निरिक्षण बरोबर आहे...पण खरा वाद वैदिक आणि अवैदिक शैव असा आहे. आर्य हा वंश नाही. संबोधन आहे. वैदिक म्हणजेच आर्य असेही नाही कारण खुद्द ऋग्वेदात वैदिकांचे शत्रु आर्य आहेतच. दाशराज्ञ युद्धात वैदिक सुदासाविरुद्ध जे दहा राजे जमा झाले होते त्यात पाच आर्य म्हणवणारे पण वैदिक राजे तर ५ अवैदिक आर्य न म्हणवणारे ५ अवैदिक राजे होते.

      ५. आता शैव आणि वैष्णव वेगवेगळे आहेत - बरोबर ? आपल्या मते शैव आणि वैदिक हेपण वेगवेगळे आहेत ? आणि वैष्णव आणि वैदिक पण वेगवेगळे आहेत का ?शैव आणि वैदिक (वैष्णवही) वेगळे आहेत. नंतरच्या काळात दोघांत समन्वयाचा प्रयत्न झाला असला तरी विष्णुची वेदमान्यता आणि वेदमाहात्म्य न संपल्यामुळे तो वाद / विभेद आहेच.

      ६. वैदिक जर अवेस्तन - पारशी धर्माला प्रतिक्रिया असेल तर मग वैष्णव पंथ हाही कुणाला प्रतिक्रिया म्हणून बहरला का ? महाभारत हे वैष्णवांचे महाकाव्य आहे का शैवांचे - कारण आपल्या मते श्रीकृष्ण शैव आहे !म्हणजेच महाभारत हा शैव लोकांचा मेरुमणी आहे का ?...........आज जे महाभारत उपलब्ध आहे ते कृष्णाचे वैदिकीकरण (वैष्णवीकरण) केल्यानंतरचे आहे. मुळ महाभारत जय नांवाचे होते व ते केवळ १२००० श्लोकांचे होते, नंतर त्यात भर घालत घालत चवथ्या शतकापर्यंत लाख श्लोकाचे बनले. मुळात काय होते हे माहित नसले तरी पांचरात्र संप्रदाय, यज्ञापेक्षा योग (शैव) उत्तम, पुजा उत्तम (पुजा हा सर्वस्वी अवैदिक भाग आहे. हा शब्दही मुळचा संस्कृत नाही.) असंख्य शिवकथा महाभारतात आहेत. पण तरीही त्यात भरपूर मिश्रणेही आहेत त्यामुळे त्याला (आताच्या महाभारताला) निव्वळ शैव म्हणता येत नाही.

      ७. नारद हे कोणत्या पंथात मान्य व्यक्तित्व आहे ?कारण शैव पंथात पण त्याला स्थान आहेच ना ? आणि नारद तर कायम नारायण नारायण म्हणत असतात ! अशा अनेक शंका अनुत्तरीत आहेत - आपण काही याबाबत सांगाल का ? ......नर-नारद-नारायण हे शब्दच मुळात द्राविडियन आहेत. नारायण हा शब्द विष्णुचा पर्यायवाची मानला जात असला तरी तसे वास्तव नाही. संस्कृत "नीर" पासून हे शब्द साधले गेलेले नाहीत असे विद्वानांचे मत आहे. प्रत्यक्षात नारायण आणि विष्णू हे एक नव्हेत.

      Delete
  9. संजय सर ,
    वैष्णव हे भक्तीमार्गी म्हणून प्रसिद्ध आहेत - त्यांच्यात आणि शैव पंथात एकमत आहे का ?
    समान विचार सारणी आहे का ? कारण आपण म्हणता त्याप्रमाणे शैव हे कर्मकांड मानतात - आणि वैष्णव हे भक्तीमार्गाने देवापर्यंत पोहोचता येते असे मानतात -
    वैष्णव हे मुस्लिम सुफी पंथाची प्रतिक्रिया आहेत का ?
    भक्तिपंथ हा ७ व्या शतकात तामिळनाडू मध्ये निर्माण झाला असे अभ्यासक सांगतात ,
    आणि शैव आणि वैष्णव दोन्ही पंथात तिचा प्रसार झाला , आणि इतर विचार प्रवाहा बरोबर ही कल्पना प्रवृत्ती सुखाने बहरू लागली आणि स्थिर झाली

    रामानंद रविदास चैतन्य महाप्रभू , सूरदास मीराबाई कबीर तुलसीदास नामदेव , ज्ञानेश्वर , यांनी उत्तरेत भक्तिपंथ वाढीस लावला तर त्यागराज ,अन्नामाचार्या , भद्रचल रामदास यांनी दक्षिणेत तो वाढीस लावला - मुख्यत्वे जातिभेदाच्या भिंती झुगारून हा पंथ पसरत गेला हे त्याचे विशेष सांगता येईल शैव पंथात बसवेश्वर यांनी हे कार्य वृद्धिंगत केले रामप्रसाद सेन यांचे श्याम संगीत मा कालीची आराधना करताना वेदान्त सांगत काळी प्रीती शिकवत भक्तीचा अनोखा मिपाफ घडवून आणते रामकृष्ण परमहंस यांनी हि कालीशाक्तीची भक्ती परमोच्च पदाला पोचवली
    रूढी आणि शिस्त यात अडकलेल्या वैदिक विचारांना भक्ती मार्गाने हलके फुलके बनवले - शुद्रातीशुद्रालापण जमेल असे हे आत्मभान शिकवले - हे एक प्रकारे बंडही होते आणि सखोल विचारांती स्फुरलेला मार्ग होता - त्यात सुफू सम्प्रदयचाहि वाटा मोलाचा आहे !
    पुरातन शैव आणि इसपू १०० च्या आसपास चा वैदिक धर्म यानंतर मुस्लिम आक्रमणाला सुफू विचाराना भक्तिमार्गाने दिलेले हिंदू उत्तर असे भक्ती मार्गाचे विश्लेषण करता येईल का ?

    आजकाल आपण सर्व जे करतो मग ते शैव असो वा वैदिक - ती भक्ती मार्गाचीच वाटचाल असते -
    त्यात कोणताही वैदिक अवैदिक वाद नसतो - शैव वैष्णव वाद नसतो -

    ReplyDelete
    Replies
    1. १. वैष्णव हे भक्तीमार्गी म्हणून प्रसिद्ध आहेत - त्यांच्यात आणि शैव पंथात एकमत आहे का ?समान विचार सारणी आहे का ? कारण आपण म्हणता त्याप्रमाणे शैव हे कर्मकांड मानतात - आणि वैष्णव हे भक्तीमार्गाने देवापर्यंत पोहोचता येते असे मानतात -

      उत्तर:- शैव हे पुजा एवढेच कर्मकांड मानणारे. पुजेत भक्ती असतेच, पण शैवांनी योगाला (चित्त-वृत्ती-निरोध) महत्व दिले आहे. भक्ती मार्ग हा पांचरात्र संप्रदायातून आला, भक्तीतुनच मोक्ष हे त्याचे तत्वज्ञान वैष्नवांनी पांचरात्र संप्रदायातील भक्ती तत्वज्ञान उचलले. भक्ती-पुजा यापेक्षा दोन धर्मातला मुख्य फरक आहे तो वेद मान्य कि अमान्य यावर. वैदिक धर्मातील वर्णमान्यता शैवांना मुलत: मान्य नाही. वैष्णव संत हे वेद (वाचले असोत अथवा नसोत, वेदाधिकार असोत अथवा नसोत) मानतात. शैव मानत नाहीत. गीता ही सर्व तत्कालीन तत्वज्ञानांचा सारसंग्रह आहे असे मी पुर्वी एका लेखात त्यामुळेच लिहिलेले आहे. भक्ती हे कर्मकांडच आहे. जगात कर्मकांड नसलेला धर्म नाही.

      २. वैष्णव हे मुस्लिम सुफी पंथाची प्रतिक्रिया आहेत का ?
      :- नाही. सुफी पंथ अरबस्तानात इस्लाम स्थापन होण्याच्या पुर्वीपासुनचा आहे. भारतातला भक्तीपंथ पांचरात्र संप्रदायाच्या रुपाने इसपू सातव्या-आठव्या शतकात निघाला असावा असा तर्क आहे.

      ३. रूढी आणि शिस्त यात अडकलेल्या वैदिक विचारांना भक्ती मार्गाने हलके फुलके बनवले - शुद्रातीशुद्रालापण जमेल असे हे आत्मभान शिकवले - हे एक प्रकारे बंडही होते आणि सखोल विचारांती स्फुरलेला मार्ग होता - त्यात सुफू सम्प्रदयचाहि वाटा मोलाचा आहे !
      : हे विधान धाडसी आहे. शूद्र म्हणजेच मुळात जे वैदिक धर्मीय नाहीत तेव्हा त्यांना आत्मभान देण्यचे कार्य वैदिक धर्माचे कधीच नव्हते व नाही. वेदांपासून शूद्र नेहमीच दूर राहिले. वैष्णव पंथामुळे वेदमहत्ता वाढली तरी अवैदिक वैष्णवांना वेदाधिकार कधीच नव्हता. वैदिक विचार हा मुळात जन्माधारित विषमतेच्या विचारांचा पुरस्कर्ता राहिला आहे. त्यामुळे एकाच ब्राह्मण वर्णातही उच्चनीचतेची उतरंड आहेच. वैदिक धर्माने कधीही बंडाची भुमिका घेतलेली नाही. "सनातनता" ही वैदिक धर्माचा अपरिहार्य भाग आहे.

      ४. आजकाल आपण सर्व जे करतो मग ते शैव असो वा वैदिक - ती भक्ती मार्गाचीच वाटचाल असते -
      त्यात कोणताही वैदिक अवैदिक वाद नसतो - शैव वैष्णव वाद नसतो

      -: मुख्य वाद वैदिक अवैदिक हा नाहीच अहे. वैदिक धर्म स्वतंत्र व वेगळा आहे अतर अवैदिकांचा धर्म वेगळा आहे. अवैदिकांच्या धर्मात वैदिक घुसखोरी करत असल्याने हा वाद आहे. ज्याने त्याने आपापला धर्म जपावा...दुस-यांच्या धर्माचा सन्मान ठेवावा..पणघुसखोरी करु नये. वैदिकांच्या धर्मात अवैदिकांनी घुसखोरी करण्याचे प्रयत्न झालेले नाहीत असे नाही, पण वैदिकांनी त्यांना कटाक्षाने बाहेर काढले. आता वैदिकांना अवैदिक (म्हणजेच हिंदू ) धर्मातून बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू आहेत.

      Delete
  10. मला असे सुचवायचे - विचारायचे आणि समजूनही घ्यायचे आहे की संत तुकाराम महाराज हे आपण वैष्णव मानतो - तुळसी माळा गळा कर ठेवून कटी - अशा त्या पांडुरंगाचे त्याना कायम ध्यान लागले होते - सर्व वारकरी संताना असेच होत होते - जणू सर्व समाज विठ्ठलमय झाला होता !
    ज्ञानेश्वरांपासून शैव मार्ग बदलून महाराष्ट्र विठ्ठलमय होत गेला का ?-
    पुंडलिका पासून झाडून सर्व संत अगदी तुकाराम महाराजांपर्यंत - आपणास पंढरीच्या वाळवंटात रमणारे आणि पांडुरंगाशी संवाद साधणारे दिसतात - आपण जरी पांडुरंग हे पण मूळ शैव रूप आहे असे मानत असलात तरी संतांच्या ते गावीही नव्हते का ?
    - गोरा कुंभार असो , सावता माळी चोखामेळा असो जनाबाई , मुक्ताबाई , नामदेव आणि असेच असंख्य -असो -
    आजच्या घडीला अगदी मनापासून विचार केला तर सामाजात काय चित्र दिसते ? आज उत्सव प्रियता वाढीला लागली आहे - समाजाला एक साजरे करायला व्यासपीठ हवे आहे - आपले नशीब - अजून तरी समाज पूर्ण रेव्ह पार्टी आणि इतर चं गळवादात आकंठ बुडाला नाहीये !आजही समाजमन या उत्सव प्रीयतेमुळे गणपती , नवरात्र , इत्यादी सण धूम धडाक्याने साजरे करत असते - त्यात भक्ती किती हा दुसरा विषय आहे - अशावेळी आपणास खरोखरच वाटते का की समाज आपला मार्ग बदलेल - तुम्ही कितीही सत्य उघड करत लेख लिहिले तरी - " छोड ना यार " जानेभी दो यारो" - "बोअर मत करना यार "असेच जर समाज मन म्हणणार असेल तर कशालाच अर्थ रहात नाही - आपला उत्साह कुठेतरी जिरवायचा - हेच आणि इतकेच ज्यांचे ध्येय असते त्याना आपल्या संशोधनाची काय किंमत असणार ? आम्हाला याचेच फार फार वाईट वाटते - आपल्याकडे अनेक थोर विचारवंत आणि इतिहास संशोधक होऊन गेले त्यांनी अनेक प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला - पण समाजमन काहीच गंभीरपणे घेत नाही - एक कार्निव्हल इतकीच त्यांची सणासुदी बद्दल भूमिका असते -शुचिर्भूतता संपल्यामुळेच आजकाल गणेश उत्सवाचे कार्निव्हल झाले आहे - आणि आपले हसे होते आहे -मला याच बाबतीत असे वाटते की आपण वैदिक अवैदिक , शैव वैष्णव अशा चर्चा करतो - त्या अत्यंत उपयोगी आहेत आपले मूळ शोधणे हे समाजाच्या जिवंत पणाचे एक लक्षण आहे - पण आज खरोखर कोणालाच त्याची उत्सुकताही नाही आणि गरजही नाही असा सूर दिसतो - आणि फार वाईट वाटते !
    संशोधन आणि बदलाचा आग्रह असे दोन मुद्दे आहेत =
    इतिहासकार संशोधन करत सत्य उलगडत असतो , आपण त्याहीपुढे जाउन समाजाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न आग्रहाने करत असता - पण
    समाजाला त्याचे काहीच अप्रूप नाही - आणि अजून ५० ६० वर्षांनी याच मांढरदेवी आणि इतर जात्राना काय स्वरूप येईल त्याची चिंता वाटते - आज पुण्यातून ज्ञानदेव तुकोबांची पालखी जाताना जो उद्दामपणा दिसतो त्याची काळजी वाटते - गणेशोत्सवात जो धुमाकूळ चालतो त्याची चिंता वाटते आणि नवरात्रीत जो बंदिस्त बाजार चालतो त्याने भक्तिमार्ग आणि शैव वैष्णव आदिशक्ती या सर्व गप्पाच राहतात आणि मन उद्विग्न होते - आपले लिखाण वाचून तर अजूनच खेद वाढत जातो - आज इंग्लिश मिडीयम मुले धार्मिक श्रद्धांबाबत एक विचित्र मानसिकता दिसते - आपण खरेतर याबाबत विचार केला पाहिजे
    नकळत समाज धर्म या कल्पनेपासून दूर जातो आहे का ?
    काहीच हरकत नाही - उलट स्वागतच केले पाहिजे - पण तसेही होत नाही - सामाजिक प्रगल्भतेतून जर खऱ्या अर्थाने समाज धर्म मुक्त झाला तर तो सुदिन असेल , पण तसे होत नाही - समाजालाच काहीतरी दंगा करण्या पुरते हवे असते , सश्रध्दपणाशी त्याना काहीच घेणे देणे नाही याचेच वाईट वाटते
    मी व्यक्त केलेले विचार आपल्या सद्य लेखाशी संबंधित नाहीत तरीही मन मोकळे केले आहे
    शाश्वत मूल्यांच्या अभावामुळे संपूर्ण पिढीची चिंता वाटते इतकेच - म्हणून हे स्वातंत्र्य घेत लिहिले ! आपली आभारी आहे

    ReplyDelete
    Replies
    1. खरे तर मुर्तीपूजा ही संकल्पना मुळात वैदिक नाही. यज्ञांतील आहुतींद्वारे हवन करत इंद्र-वरुणादि अमूर्त वैदिक देवतांना आवाहने करत संतुष्ट करणे हे वैदिक कर्मकांड. परंतू बुद्धाच्या उदयापासूनच त्याने हिंसात्मक यज्ञांना विरोध सुरु केल्याने यज्ञ मावळू लागले होते. शिवाय ते खर्चिक, गुंतागुंतीचे आणि वेळखाऊ (काही यज्ञ १२-१२ वर्ष चालत) बनल्याने यजमान सापडण्याचीही मारामार होऊ लागली होती. त्यामुळे मुर्तीपुजेला शरण जाण्याखेरीज त्यांच्यासमोर पर्याय राहिला नाही. पण तसे करतांना त्यांनी अवैदिक देवता न निवडता विष्णू हीच वैदिक देवता निवडली. पांचरात्र या अवैदिक संप्रदायातील भक्तीतत्व उचलले आणि वैष्णव पंथ जोमाने वाढवला जावू लागला. पण या पंथातील वैदिक वर्णव्यवस्थेची मुलतत्वे मात्र कायम ठेवण्यात आली. महाराष्ट्रात समतेच्या शैव पंथांचा जागर सुरु असतांना एक अप्रसिद्ध शैवस्थान वैष्णव स्थान म्हणून पुढे का आनले गेले याचे कारण वैदिक-अवैदिक संघर्षात आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. शैव पंथांना मात दिल्याखेरीज वैदिक महत्ता वाढणार नाही ही यामागची व्यूहनिती होती. त्यामुळे विठ्ठलाला वैष्णव साज चढवण्यात आले. विठ्ठलाचा पुर्व-दैवतेतिहास हा अत्यंत धूसर असल्याने हे वैष्णव चरित्र चढवता येणे सोपेही होते. तसे ते झालेही. आद्य संतांनी विठ्ठलाला विष्णू-कृष्ण याच रुपात पाहिले असल्याने हा चरित्रबदल स्विकारलाही गेला होता असे स्पष्ट दिसते. मात्र चक्रधर जरी कृष्णोपासक असले तरी त्यांनी विठ्ठलाला कधीही कृष्णाचे रूप मान्य केले नाही. उलट ते विठ्ठलाला "गोचोर", "भडखंभा" अशा विशेषणानी हिणावत असल्याचे दिसते.विठ्ठलाला वैष्णव रूप लाभल्याने दोन गोष्टी झाल्या. पहिली बाब म्हणजे वेदमाहात्म्य, जे अन्य शैव पंथांनी नाकारले होते ते, कायम प्रस्थापित झाले. विठ्ठलाचे वर्णन करतांना संतांच्या शब्दांत वेद-तूल्य अशा शब्दकळा पाझरतांना दिसतात. "वेदांनाही ज्याचे रूप समजले नाही..." ते "वेदांचा अर्थ आम्हासही ठावा..." अशी तुकोबावाणीही उमटत राहिली. म्हनजे वेदमहत्ता वैष्णव संतांनी स्वाभाविकपणे मान्य केली. जरी त्यांना वेदाधिकार नसले तरी वेदमोहिनी वाढली. ज्ञानेश्वरही अध्यात्मात नसले तरी व्यवहारात वैदिक चातुर्वर्ण्य आहेत हे मान्य करतांना दिसतात. "अनादि निर्मळ वेदांचे जे मूळ...परब्रह्म सोज्वळ विटेवरी", "ज्या कारणे वेदश्रुति अनुवादती...तो हा रमापती पंढरिये.." असे खुद्द चोखोबाच म्हणतात. या जन्मी लाभलेली गती ही गतजन्मातील पातकांच्यामुळे आहे हा कर्मविपाक सिद्धांत चोखा व त्यांचा परिवारही मान्य करतांना दिसतो. आपल्या सामाजिक अधोगतीला, अस्पृष्यतेचा दोष तो गतजन्मीच्या पातकांना देतो...त्याविरुद्ध बंड करत नाही हे वैष्नव संप्रदायच मुळात वैदिक असल्याने असे झाले असे म्हणता येणार नाही काय?

      . असे असले तरी विठ्ठल मुळचा शिव आहे याची जाणीवही संतांना दिसते. "विष्णूसहित शिव...आणिला पंढरी" असा संत क्वचित का होईना उद्घोष करतांना दिसतात. तरीही विठ्ठलाला वैष्णव चरित्र बहाल केले गेले, यादवकाळातील ज्ञानेश्वर ते चोख्याने ते स्विकारले आणि त्यालाच आपले आराध्य बनवले हे एक वास्तव आहे.

      Delete
    2. येथे महत्वाचे पुन्हा लक्षात घेतले पाहिजे, शैव पंथ वेद मान्य करत नाहीत आणि म्हनूणच चातुर्वर्ण्य मान्य करत नाहीत. विठ्ठलाचा बोलबाला होण्याआधी महाराष्ट्रात नाथ-सिद्ध-दत्त आदि संप्रदाय शैव सिद्धांतांना आधारभूत घेतच समतेचा लढा यशस्वीपणे लढत होते. इतकेच काय स्वत: ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे ही नाथ संप्रदायातीलच होती. "अमृतानुभव" हे स्वतंत्र प्रज्ञेचे शैव तत्वज्ञान मांडते.असे असतांनाही ते वैदिक वैष्णव संप्रदायाचे अग्रदूत कसे बनले हे एक आपल्या सांस्कृतिक इतिहासातील कोडे आहे.

      परंतू संतांच्या समतेच्या चळवळीला आध्यात्मिक अधिष्ठान लाभले असले तरी व्यावहारिक अधिष्ठान लाभले नाही याची कारणे आपल्याला वैदिक तत्वज्ञानात सापडतात. मानसिक पातळीवरील व व्यवहारातील जन्माधारित जातीने आलेला हीणभाव त्यामुळेच गेलेला दिसत नाही. चोख्याला आपल्या आराध्याची गळाभेट घेण्याचे भाग्य लाभले नाही. कारण ज्या मुलभूत तत्वज्ञानावर हा वैष्णव पंथ उभा होता त्याचे तत्वज्ञानच जन्माधारित विषमतेचे होते.

      आजही विठ्ठलाच्या पुजेत विषमतेचे आदि कारण मानले गेलेले पुरुषसूक्त म्हटले जाते यावरून मला काय म्हनायचे आहे ते लक्षात यावे. समतेची चळवळ पायाच चुकीचा असल्याने फसली तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

      आपण इतिहासाला जमेल तेवढा स्वच्छ करायला हवे. पुढील पिढ्या कशा सांस्कृतीक वर्तन करतील याचे भाकीत ठरवता येणे अशक्य आहे. माझा व्यक्तिगत लढा हा विषमतेच्या तत्वज्ञानाशी आहे. इतिहासात जे काही अयोग्य झाले आहे हे सांगत राहणे त्यामुळेच आवश्यक वाटते.

      Delete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...