Tuesday, October 7, 2014

मी का लिहितो?

प्रत्येक व्यक्ती जन्मत:च आपले जग स्वत:बरोबर आणते असे म्हणतात ते खरेच आहे. ज्या आपल्या जगात तो वाढतो त्याचे जे काही भले-बुरे असते ते व्यक्तीच्या व्यक्तीमत्वाचे अपरिहार्य भाग बनणे स्वाभाविक अहे. लेखक आपल्या प्रतिभेच्या बळावर त्यातून आपली सृजनात्मक बीजे घेत आपल्या कृती रचत असतो. पण त्यातही त्याच्या स्वत:च्या जगाची मर्यादा सुटत नाही. मी त्याला अपवाद असणे शक्य नाही. त्यामुळे माझा लेखन प्रवास सांगत असतांना माझ्या जगाचे संदर्भ येणे अपरिहार्य आहे.

मी सातवीत असतांना पहिली एकांकिका लिहिली..."फितूरी". लेखकाचा प्रवास कवितेतुन सुरु होतो असे म्हणतात, तसे माझ्या बाबतीत झाले नाही. मी कविता लिहायला फार नंतर सुरुवात केली. एकांकिकेकडुन मी कथांकडे वळालो. मी अकरावीला जाईपर्यंत माझ्या अनेक कथा पुण्यातील मासिकांमद्धे प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानंतर मी सरळ उडी घेतली ती कादंबरीवर. बारावीत असतांनाच "विकल्प" ही कादंबरी लिहून झाली. मग कविता...आजवर माझी ८०च्या वर मराठी-इंग्रजी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. बहुतेक पुस्तकांच्या दोन ते सात-सात आवृत्त्या झाल्या आहेत. कादंब-उयांकडून मी इतिहास, अवकाशशास्त्र आणि समाजशास्त्रीय संशोधनांकडे वळालो त्यावरही अनेक पुस्तके झाली आहेत..अनेक प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. मी अमुकच गोष्टीकडे एका कसा वळालो हे मला नीटपणे सांगता येईल असे वाटत नाही. पुढे मी अजून कशाकडे वळेल हे मला सांगता येणार नाही. हे काहीच माहित नसणे, सारेच अनिश्चित आणि तरीही निश्चित असणे हे ज्या जगाला घेऊन मी सोबत आलो त्याचेच अपरिहार्य भाग आहेत.

मी मुळचा जळगांवचा. वडील प्राथमिक शिक्षक. चवथ्या वर्षापासुनचे बहुतेक मला सर्व आठवते. तेंव्हा मी पहिलीत होतो आणि दहिगांव (संत) या पाचोरा तालुक्यातील गिरणेकाठच्या गांवातल्या शाळेत, वडील तेथेच नियुक्तीला असल्याने, तेथेच शिकत होतो. आमची शाळा नदीकाठीच एका झाडाखाली भरे. पोहायला मी तेथेच शिकलो. कोळ्यांची वस्ती ब-यापैकी असल्याने मी खेकडे पकडण्यात लवकरच तरबेज झालो. आमच्यात पाचव्या वर्षी जावळ काढत. माझ्या केसांना वाढ फार...आई त्यामुळे वेण्या घालायची. तेंव्हा पाचवी-सहावीच्या मुली म्हणजे थोराड व काही चक्क विवाहित. मला त्यांनी अंगाखांद्यावर वाढवले म्हटले तरी हरकत नाही. दुसरीला मी आजीकडे जळगावात...म्युन्सिपालिटी शाळा क्र. २. आजी ५-६ घरी धुनीभांडी करायची. आजोबा कसे दिसायचे ते माहितच नाही. ते कधीच वारले होते. माझे काका अजून शिकतच होते. आजीबरोबर मीही घरकामांना जाई...आजीला मदत करे. नंतर आम्ही आलो ते सरळ पुणे जिल्ह्यातील वरुडे (ता. शिरुर) येथे. तो सर्व प्रवास रोमहर्षक आहे. वडिलांना वाचनाची प्रचंड आवड. मलाही ती लागली. सातवीपर्यंत पंचक्रोशीतील  सारी वाचनालये पालथी घालून झालेली.

वरुड्यात लाइट नव्हती, एस.टी. नव्हती आणि गिरणीही नव्हती. वडिल शिक्षक असले तरी अनेक कारणांनी दारिद्र्याचा कडेलोट होता. आई आणि मी सुताराच्या घरच्या जात्यावर लोकांची दळणे दळायचो. जास्त असेल तर चाराण्याला पायली या दराने दोनेक पायल्या डोक्यावर घेत जवळच्या गणेगांव किंवा वाघाळ्याच्या गिरणीतुन दळून आणुन द्यायचो. या प्रवासात माझ्या कल्पना भरा-या घेत असायच्या. त्यामुळे ओझ्याचे कधीच काही वाटले नाही. वाचायचो--तसे लिहावेही वाटायचे. सातवीत असता "फितुरी"ने मात्र एवढे झपाटले कि चक्क लिहुन पुर्णही केले. मानधन म्हणुन मास्तरांची कानफडीत पडली.


मी लेखक व्हायचे ठरवले होते का? तसे काही नाही. मला लिहायला आवडायचे एवढेच. तो एक विरंगुळा होता हलाखीच्या दिवसांतला. त्यामुळे कि काय माझे या काळातील, अगदी प्रसिद्ध झालेले लेखनही मी जपलेले नाही. माझी एक कवितांची वही रद्दीत गेली त्याचीही खंत नाही. आजही जवळपास तीस-पस्तीस कादंब-या अर्धवट लिहून केवळ मुड नाही म्हणून सोडून दिलेल्या. एका प्रकाशकाने "अगम्य" कादंबरीचे हस्तलिखित गहाळ केले, त्याचेही दु:ख नाही. माझे लेखन प्रसिद्ध व्हायचे म्हणून झाले तेवढेच...बाकी मी माझ्या लेखनात अडकुनही कधे पडलो नाही...एक झाले कि दुसरे सुरु हाच माझा खाक्या राहिला आहे.

असो. त्यावेळी मला परिस्थिती बदलायची होती...कथा-कादंब-यांतील नायकांप्रमाणे भव्य-दिव्य-वैभवशाली बनायचे होते. खरे म्हणजे स्वप्नरंजन हाच माझ्या जगण्याचा अपरिहार्य भाग बनला होता म्हणून मला परिस्थितीचे चटकेही तेवढे बसले नाहीत. बी. कोम होईपर्यंत माझ्या पायांना चप्पलही कधी मिळाली नाही. अकरावीनंतर ते पार थेट एम. कोम. होत शिक्षणाला पुर्णविराम देईपर्यंत मला परिक्षा आणि सेमिनार सोडता कधी कोलेजही अटेंड करता आले नाही. त्यामुळे कोलेज जीवन काय असते हे मला फार फार तर कादंब-या वाचुनच माहित आहे. माझ्या लेखनात ते जीवन कधीही आलेले नाही. फार काय कौटुंबिक कादंब-या जरी मी दोन-तीन लिहिल्या असल्या तरी त्यात पात्रे कमी आहेत...नात्यांचा मोठा गोतावळा नाही कि त्यातील जिव्हाळा नाही. मला त्याचा अनुभवच नाही तर काय करणार?

* * *

मी प्रचंड वाचायचो हे मी सांगितलेच आहे. पण माझ्यावर सर्वाधिक प्रभाव पाडणारी पुस्तके कोणती हे सांगणे जरा कठीण आहे. मी गो. ना. दातार ते डी. के. बेडेकर...रहस्य रोमांच ते तत्वज्ञान यात वाचन-मुशाफिरी केली. अनेक कृत्यांनी खूप भारावुनही गेलो. पण तात्पुरते. कोणत्याही लेखकाला मी कधी पत्र लिहिले नाही...किंवा प्रत्यक्ष भेटावे असे वाटलेही नाही. माझे इंग्रजी बेतास बात असल्याने अनुवादित पुस्तकेही खूप वाचली गेली.   कामुच्या "आऊटसायडर"ने मी काही काळ प्रचंड अस्वस्थ होतो हेही खरे. बहुदा मी स्वत:लाच "आउटसायडर" समजत असल्याने तसे झाले असेल हेही खरे. पण अस्तित्ववादाची मोहिनी पडली नाही...किंबहुना कोनताही वाद माझ्या काळजाचा ठाव घेऊ शकला नाही. माझ्यावर जर प्रभाव असेल तर जे वाचले त्या सर्वांचा सामुहिक प्रभाव आहे असे म्हटले तरे चालेल.

लेखकांना कोणीतरी मार्गदर्शक असतो असे म्हनतात...सुदैवाने म्हणा कि दुर्दैवाने, असे मला कोणी मिळाले नाही. दीपक शिंदे या मित्राशी होत तेवढ्याच साहित्यिक चर्चा...त्यापलीकडे काही नाही. लेखक म्हणून माझी वाढही एकाकीच झाली आहे असे म्हटले तरी वावगे होणार नाही. जी दिवास्वप्ने मी माझ्यासाठी पाहिली तीच माझ्या लेखनाची प्रेरणाच नव्हे तर एक भाग बनली.

* * *

माझा पहिला कवितासंग्रह "प्रवासी" ह महाराष्ट्र शासनाच्या अनुदानने प्रपंच प्रकाशनाने प्रसिद्ध केला तो १९८६ साली. मी २२ वर्षांचा होतो. त्याच वर्षी माझा "An Ancient Aryans Though on Religion" हा प्रबंध इंग्लंडमधील तत्कालीन स्टोनीब्रुक नामक एका सम्स्थेने स्विकारला...त्याचाच मराठी अनुवाद येथील गुढविद्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला. खूप गाजला. कविता आणि पुरातन इतिहास यात तसे साम्य नाही. पण मीच प्रचंड विरोधाभासाने भरलेलो असल्याने असंख्य विरोधाभास माझ्या जीवनात हरघडीला दत्त म्हणून हजर राहिलेले आहेत. ते जाणीवपुर्वक नव्हे तर आपसुकच घडत गेले. कवितांतही सा-या कविता मानवी प्रवासाला केंद्रबिंदू मानत सहा-सहा ओळीच्या स्वतंत्र आशयाच्या तरी खंडकाव्यसदृष्य होत्या. त्यात तरुणाईत अभिप्रेत असलेल्या प्रेमभावना नव्हेत तर तत्वज्ञानाचाच भाग अधिक होता. आणि त्याच वेळीस मी अर्थतज्ञ बनायच्या प्रयत्नांत होतो आणि दै. आज का आनंद मद्धे वार्ताहराची नोकरी करत होतो.

* * *

पुढच्याच वर्षी मेहता पब्लिशिंग हाऊसने माझी "नरभक्षकांच्या बेटावर विजय" ही किशोर साहस कादंबरिका प्रकाशित केली. बारावीत लिहिलेली पहिली कादंबरी "विकल्प" मात्र त्यानंतर तब्बल दहा वर्षांनी प्रकाशित झाली. मला साहस, रहस्य, थराराचे अननुभूत आकर्षण. नुसते आकर्षण नाही, मी स्वता: खाजगी गुप्तहेर संस्था काढून ती हौस प्रत्यक्षही भागवली...नुसते लिहिले नाही. सुरुवातीच्या माझ्या रहस्य-थरार कादंब-या दिलिपराज, अमोल, चंद्रमौळी प्रकाशनांनी प्रकाशित केल्या.

स्वतंत्र मराठी थरारकथा लिहिणारा मी मराठीतील पहिला लेखक. (रहस्य आणि थरार कादंब-या हा एकच प्रकार नव्हे) भारतात रहस्य थराराची बीजे पुरवणा-या घटनांची रेलचेल आहे. इंदिराजींच्या हत्येच्या घटनेचा वापर करत मी "डेथ ओफ द प्राईममिनिस्टर" ही थरार कादंबरी लिहिली. पुढे ती इंग्रजीत अनुवाद होऊन प्रकाशितही झाली. त्यावेळी इंडियन एक्स्प्रेसने मला "भारताचा फोरसीथ" अशी चक्क उपमाही दिली होती. मराठी लेखकाची थरारकादंबरी आणि तीही इंग्रजीत अनुवादित होते याचे अप्रुप मला नसले तरी अज्नेकांना होते...लोकप्रभात रवीप्रकाश कुलकर्णींनीही त्यावर लेख लिहिला होता.

नंतर राजीवजींच्या हत्यच्या पार्श्वभुमीवर मी "मृत्यूरेखा" ही कादंबरी लिहिली. मराठीत ते प्रचंड वाचली तर गेलीच तीही इंग्रजीत "On the Brink of Death"  या नांवाने प्रकाशित झाली...जगभर पसरली...अमेरिकेत रेडियोवर दोन मुलाखती झाल्या, दक्षीण आशियातील दहशतवादावर ती कादंबरी पाश्चात्य जगात चक्क संदर्भग्रंथ म्हणुनही वापरली गेली. समीर चक्रवर्ती हे पात्र निर्माण करत जवळपास आठ आंतरराष्ट्रीय थरारकथाही लिहिल्या. थोडक्यात सांगायचे तर थरार कादंबरी लेखनात मी बरीच भर घातली. अर्थात शंकर सारडा सोडले तर अन्य कोणी समिक्षक ते मान्य करणार नव्हता आणि केलेही नाही. आणि मीही प्रसिद्धीचा हव्यास नसल्याने त्या भानगडीत पडलो नाही. कारण थरार कादंब-या हेच माझे एकमेव लक्ष्य नव्हते.

मी नंतर आंतरराष्ट्रीय इतिहासाकडेही वळालो. १९९२ साली "क्लिओपात्रा" ही कादंबरी त्यातून साकार झाली. आश्चर्य वाटेल पण त्यावेळेस इंग्रजीतही क्लिओपात्रावर अनेक चित्रपट झाले असले, शेक्सपियरपासून अनेक नाटके लिहिली गेली असली तरी कादंबरी जवळपास १९९८ पर्यंत नव्हती. ही कादंबरी प्रचंड खपली. पेपरब्यक आवृत्त्यांमुळे जवलपास ५५००० प्रती विकल्या गेल्या. अनेक लोकांनी ही कादंबरी वाचून इजिप्तला भेटी दिल्या. इतिहास आणि तत्वज्ञान या जवळच्या बाबी आहेत. एकाकी राहण्याची सवय लहानपणापासुनच पडल्याने विचारांची जास्त सवय लागलेले होतीच. मानवी जीवनातील अनेक काल्पनिक संकल्पनात्मक समस्या घेत त्या सोडवत बसायचा माझा एक छंदच होता. क्लिओपात्राच्या विलक्षण व्यक्तीत्वाने मला झपाटले नसते तरच नवल.

त्यातून लिहिली गेली "यशोवर्मन". ही कादंबरी काल्पनिक इतिहासकाळात एका बेटावर घडते...मोजुन सहा पात्रे...आणि मध्यवर्ती एक गहन समस्या...आणि सहा दृष्टीकोन....ही कादंबरी प्रकाशित झाली. वाचकांनी चांगले स्वागत केले. प्रा. विजय काचरे सोडता यावर समिक्षात्मक लेखन मात्र झाले नाही. उलट "द जंगल" या नांवाने ही कादंबरी इंग्रजीत प्रकाशित झाली, अनेक अमेरिकन लेखकांनी आवर्जुन या कादंबरीवर लिहिले. तत्वचिंतनात्मक कादंबरी असुनही आणि माझ्यावर थरारकथालेखक असा शिक्का असुनही वाचकांनी ही कादंबरी स्वीकारली हे विशेष.

तसेच "कुशाण" या माझ्या तिस-या कादंबरीच्याही अनुवादाचे झाले. पुरातन काळातील भटक्या मानवी टोळ्या जेंव्हा नागर संस्कृतीच्या सन्निध्यात येतात...स्थिर होऊ लागतात तेंव्हा या संक्रमनातुन जी मानसिक उलघाल होते त्याचे चित्रण या कादंबरीत. नेहमीप्रमानेच ही कादंबरीही प्मराठीत उपेक्षीत राहिली पण तिचा इंग्रजी अनुवाद "Last of the Wanderers" प्रसिद्ध झाला आणि या कादंबरीला महाकाव्यसदृश कादंबरी असल्याची प्रतिक्रिया प्रख्यात अमेरिकन लेखिका सांड्रा स्यंचेझ यांनी दिली. अशा अनेक प्रतिक्रिया आल्या...लेख लिहिले गेले...चक्क दोन आवृत्त्या झाल्या.

असो. मराठीत मी अजून काही प्रयोग केले. राजकीय उपहास कादंब-या लिहिल्या. राजीव गांधींवर "गुडबाय प्राईममिनिस्टर" ही उपरोधकादंबरी लिहिली तर सद्दाम हुसेन-चंद्रशेखर-बुश-गोर्बाचेव या पात्रांना घेत आंतरराष्ट्रीय नव्हे तर आंतरविश्वीय उपरोध-कादंबरी लिहिली..."आभाळात गेलेली माणसं" या कादंबरीत मी सर्वप्रथम "एक जग: एक राष्ट्र" हे कल्पना मांडली. ही कादंबरीही कामिल पारखेंनी इंग्रजीत अनुवादित केली. "मातालियन्स" या शिर्षकाखाली प्रकाशितही झाली. "एक जग: एक राष्ट्र" ही संकल्पना केंद्रवर्ती मानत मी नंतर सैद्धांतिकही लेखन पुष्कळ केले. आज माझे या संकल्पनेसाठी ३-४ हजार अनुयायी आहेत आणि आम्ही ही संकल्पना रुजवण्यासाठी प्रयत्न करत आहोत.

असो. ते मह्त्वाचे नाही. महत्वाचे हे आहे कि मी अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय इतिहास व वर्तमानातील पार्श्वभुम्या घेत मानवी जीवनाचे मलाच पडलेले कोडे उलगडत राहिलो. हिंदू असल्याने मला अपरिहार्यपणे जात असली तरी मी कसल्याही जातीय अथवा धार्मिक वातावरणात न वाढल्याने माझी पात्रेही सर्वच जाती-धर्मातील. माझी जातही फारशी कोणाला ठावी नाही. चौकस लोकांना तर त्याचा मीच थांग लागू देत नाही. असे असले तरी मला जातीयवादाचा फटका बसला का? तर त्याचे उत्तर "होय" असेच आहे याची मराठी सारस्वताने पुन्हा एकदा माझ्या निमित्ताने नोंद घेतली पाहिजे. (नाही घेतली तर गेले फाट्यावर!)

* * *

राजीव गांधींचा मृत्यू ते बाबरी मशीदीच्या पतनाचा काळ आणि जागतिकीकरण यात बदलणारे राष्ट्रीय विश्व हा माझ्या पुढील "सव्यसाची" या कादंबरीचा गाभा बनला. ही माझी आकाराने सर्वात मोठी कादंबरी. तब्बल साडेपाचशे पानांची. या कादंबरीनंतर मात्र मी काही काळ मराठी लेखन थांबवले. इंग्रजीतच मी लेखन सुरु केले. "द अवेकनिंग" ही मृत्युचे रहस्य उलगडु पाहणारी एका काल्पनिक मित्थकथा निर्माण करत लिहिलेली कादंबरी. कै. नरसिंहरावांनी तिचे प्रकाशन केले...मनसोक्त कौतूक केले. अमेरिकेत अनेक समिक्षकांनी त्यावर भरभरुन लिहिले. या कादंबरीचा नंतर विजय तरवडेंनी मराठी अनुवाद केला. मुळ मराठीतुन इंग्रजीत आणि इंग्रजीतुन मराठीत अनुवाद असा प्रवास या निमित्ताने पुर्ण झाला.

यानंतर मात्र मी स्वत:च संकटात सापडलो. जेलमद्धेही गेलो. माझे प्रचंड वाटोळे झाले. कर्जांच्या असह्य खाईत कोसळलो. पण मी जेलमद्ध्ये असतांना मागे पडलेले "नीतीशास्त्र" हे पुस्तक आधुनिक विज्ञानाला वेठीस धरत आधीच्या नीतिविदांच्या भुमिका नाकारत नव्या संकल्पना मांडत पुरे केले. बाहेर आल्यावर विश्वनिर्मितीचा नवा सिद्धांत :"अवकाश ताण सिद्धांत आणि विश्वनिर्मिती" या पुस्तकात सिद्ध केला. माझे नीति आणि विश्वनिर्मिती यातील सिद्धांत कोनाला मान्य नसले तरी मी एकमेव भारतीय आहे ज्याने प्रस्थापित आधुनिक विज्ञानांना आव्हान देत स्वतंत्र सिद्धांत मांडले व तेही मराठीत. नंतर अर्थात ते इंग्रजीतही अनुवादित झाले. डा. सम्नर डेव्हीस, र्यंडाल रोससारख्या संशोधकांनी दाद दिली... याचा मला व्यक्तीगत अभिमान आहे. 

यानंतर मी "शून्य महाभारत" ही वेगळी तत्वज्ञानात्मक कादंबरी लिहिली. कृष्ण भारतयुद्धासमयी जर दुर्योधनच्या बाजुला गेला असता तर द्रौपदी ते भिष्म यांच्या प्रतिक्रिया काय असत्या, युद्ध झाले असते का अणि बदललेल्या परिस्थितीत गीता कशी असती हा या कादंबरीचा गाभा. अवघी ९८ पानांची ही कादंबरी..खरे म्हणजे कादंबरिकाच...आता तिचा हिंदी अनुवादही झाला आहे.

मी लेखक म्हणून जाणीवपुर्वक असा कोणताही फोर्म वापरला नाही. माझ्या कथेच्या किंवा विषयाच्या अनुषंगाने जो फोर्म आपसुक योग्य वाटला तो मी मी वापरला. कल्की, शून्य महाभारत, क्लिओपात्रा, यशोवर्मन या कादंब-यात त्यामुळे आपसूक वेगळे प्रयोग झाले. खरे तर कादंब-या व नाटकांत यामुळे सर्वत्रच वेगवेगळे फोर्म वापरले गेले. ते जाणीवपुर्वक झाले नसल्याने त्याबद्दल मी अधिक लिहू शकत नाही. मी जवळपास अर्धे जग मनमुक्त फिरलो असल्याने माझ्या कादंब-यांतील लोकेशन्स कधी कृत्रीमही झाली नाहीत. इंटरनेट आले तेंव्हापासून त्याचा वापर केल्याने जगभर मित्र झाले, त्यामुळे कोनताही देश, तेथील मानसिकता, सांस्कृतिक आंतरबंध याचे मला फर्स्ट ह्यंड ज्ञान मिळत राहिले...त्यामुळे लेखनात जीवंतपणाही आला.

पण इंग्रजी अनुवादांना/लेखनाला जो प्रतिसाद बाहेरुन तर मिळालाच, पण हिंदू, इंडिया टुडे, टाइम्स सारख्या देशी इंग्रजी माध्यमांनीही जी स्वत:हुन दखल घेतली त्यामुळे खरे सांगायचे तर मराठी प्रतिक्रियांच्या अभावाचे मला कधी वाईटही वाटले नाही. अपेक्षाही केली नाही. हा लेखही मी सारडा सरांच्याच आग्रहाने लिहित आहे, एरवी मला माझ्याबद्दल काही बोलायला-लिहायलाही आवडत नाही. पण मराठी जग असे का आहे हे मला आजही समजत नाही. पण त्याचे कारण जातीयवादात असावे असे वाटण्याचा एक अनुभव...मी तीन-चार वर्षांपुर्वी "महार कोण होते?" हे संशोधनात्मक तर "असुरवेद" आणि "...आणि पानिपत" या कादंब-या लिहिल्या. या कादंब-यांचे नायक तत्कालीन महार असल्याने माझ्या साहित्यावर डाक्टरेट करतो असे म्हनणारे २-३ प्राध्यापक पुढे आले. नंतर मी महार नाही हे समजल्यावर त्यांचे प्रस्ताव बारगळले. म्हणजे आपल्याकडे साहित्यिकही अक्षरश: "जातीचा" लागतो असे नाही काय? मी महार आहे, धनगर आहे कि अजुन अन्य कोणी जातीचा आहे याचा आणि माझ्या लेखनाचा काय संबंध? असा दळभद्रीपणा करत आम्ही किती नवप्रतिभा वाया घालवणार आहोत याची खंत कोणाला आहे काय? मला काही फरक पडत नाही...मी लिहायला आवडते म्हणून लिहितो...हे खरे असले तरी इतर लेखकांवर अशा वातावरणांचा काय परिणाम होत असेल याचा गांभिर्याने विचार करायला हवा. असो. असे विचार करायची पद्धत मराठीत नाही याचे अनुभव मी सामाजिक चळवळींतही घेत असल्याने ही अपेक्षा फोलच ठरल्यास नवल नाही.

* * *
मला लहानपणापासून मित्रच कमी. कमी म्हणजे किती? फक्त दोन. त्यातील एक प्रशांत पोखरकर अपघाती मृत्युने माझ्या जीवनातून उणे झाला. दुसरा दीपक शिंदे पुढे माझा खिसा उणे करुन लंपास झाला. मला मित्र नाहीत. एकटेपणाने मला अधिक समृद्ध केले. मी समाजाचा झालो. सामाजिक प्रश्नांत हिरीरीने झोकुन दिले. असे असले तरी माझा एकांत मात्र कधी भंगला नाही...सर्वांत असुनही मी नसल्यासारखाच राहिलो. माझ्या कादंब-या-नाटके-कवितांत याचे प्रतिबिंब आहे. त्याच बरोबर साहस, नवोन्मेश आणि धडाडी हे माझे मुलभूत गुणही माझ्या पात्रांतुन व्यक्त होत असतात. मला भव्यतेचा- दिव्यतेचा प्रचंड सोस आहे. प्रत्येक माणसाच्या आत दडलेल्या माणुसपणाचे, त्याच्या प्रसंगोपात्त होणा-या पडझडींचे आणि त्यातुनही ताठ उभे राहण्याच्या उर्म्यांचे मला अनिवार आकर्षण आहे. "ओडिसी" कादंबरीत मी हेच व्यक्त केले आहे. खरे तर हे मी नुसते लिहिलेले नाही...जगलेलो आहे. माझ्या जगण्याची जेवढी योग्यता आहे तेवढीच माझ्या लेखनाची योग्यता आहे. त्यापलीकडे मी माझ्या लेखनाचे परिशिलन करण्यात अर्थ नाही कारण मग ते माझेच परिशीलन असेल!

* * *

मी थोडा नाटककारही आहे. "मीच मांडीन खेळ माझा" या नाटकाचे काही प्रयोगही झाले. मी एकुण नऊ नाटके लिहिली. "रात्र अशी अंधारी" या नाटकाचे इंग्रजीत "हार्ट ओफ द म्यटर" रुपांतर झाले, त्याचेही काही प्रयोग झाले. मी नाटकांच्या प्रयोगांत रमलो नाही कारण हा समुहाचा खेळ आणि मी मुळात समुहातील माणूस नाही. त्यामुळे केवळ लिहिने पसंत केले. मुलांसाठी तर मी भरपूर लेखन केले. एक तर कल्पनाविश्वात आजही माझा रमण्याचा शोध. अद्भुत-साहसाची आवड...मग काय? ब-याच किशोर कादंब-या लिहिल्या...प्रसिद्ध झाल्या.

२००७ नंतर मी अपघातानेच सामाजिक जीवनात आलो. माझ्या "हिंदू धर्माचे शैव रहस्य" या पुस्तकाने भारतीय धर्मेतिहासावर नवा प्रकाश टाकला. लोकांनाही त्याचे आकर्षण वाटले. त्या निमित्ताने व्याख्याने सुरु झाली. समाजाच्या अधिक जवळ जाऊ लागलो. समाज वस्तव पाहून हादरलो. समाजातील अज्ञान एवढे असेल याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. या अज्ञानापोटी शासनही त्यांची कशी लुबाडणुक करत आहे ते लक्षात आले. सांस्कृतिक वर्चस्वतावादासाठी वैदिक धर्मीय समाजाची कशी मानसिक खच्चीकरणे करण्यासाठी सज्ज आहेत हे अनुभवले. त्यात संभाजी ब्रिगेडने घेतलेल्या ब्राह्मणविरोधी आतताई भुमिकेतुन सामान्यांचाही इतिहास पुसण्याचे प्रयत्न होताहेत हे लक्षात आले. माझ्या लेखनाचे संदर्भ बदलले. थोरामोठ्यांच्या इतिहासाकडून मी जनसामान्यांच्या इतिहासाकडे वळालो. "...आणि पानिपत" "असूरवेद" हे त्याचे कादंबरीमय उद्गार तर "जातिसंस्थेचा इतिहास", "महार कोण होते?"  ही संशोधनात्मक पुस्तके तर शेकडो लेख विविध वृत्तपत्रे, मासिके (आणि ब्लोगही) यावर प्रसिद्ध...धमासान चर्चा हे त्यातून उद्भवलेले फलित. गेल्या तीन दिवाळ्या माझ्या तर शिव्यांच्याच फराळात गेलेल्या./..किस्त्रीममधील लेखांमुळे. असो.  

येथेच मी थांबलो नाही. मी आंदोलने केली, भाग घेतला, उपोषणे केली...सामाजिक प्रश्नांवर स्पष्ट भुमिका घेत अनेक प्रस्थापित माझे कायमचे शत्रु बनवले...साहित्य लिहिता लिहिता मी पुन्हा वेगळ्या भुमिकेतुन साहित्य जगु लागलो.

प्रकाशक म्हनूनही बरेच प्रयोग केले. टीव्हीवर आणि होर्डिंग्जवर पुस्तकांच्या जाहिराती करणारा मी पहिला आणि बहुदा अखेरचा प्रकाशक. मी चित्रपटही निर्माण केले, भुमिका केल्या, संगीत दिले...उषा मंगेशकर, नितिन मुकेश वगरे माझ्या संगीतावर गायले. मीही गायलो.

उद्योजक म्हणून मी काय साध्य केले आणि काय गमावले ते येथे सांगायची जागा नाही. मी लेखक म्हणून काय केले आणि तो प्रवास कसा झाला एवढेच या लेखाचे प्रयोजन. मी जीवनाला मुक्तपणे सामोरा गेलो. मी आयुष्य मनसोक्त जगत राहिलो. मनापासून लिहित राहिलो. अनंत अनुभव या छोट्या आयुष्यात घेतले. मग माझे लेखन कोणत्या प्रकारात मोडते, त्यावर समिक्षा व्हावी काय, समिक्षकांच्या कच्छपी लागावे काय हे प्रश्न मला कधी पडले नाहीत. पुरस्कारांना तर पुस्तके न पाठवण्याचा माझा निर्णय १९९१ सालचा. त्यात बदल व्हावा असे साहित्य क्षेत्राचे वातावरण मला कधी दिसले नाही. गेल्या वर्षी तर पडणार हे माहित असुनही चक्क
साहित्य संमेलनाध्यक्षांची निवडणुकही लढवली. फ्यंटास्टिक अनुभव आले. माझी भुमिका लोकांपर्यंत पोहोचवता आली...जे एरवी शक्य झाले नसते हे त्याचे मोलाचे फलित.

मी कोणत्याही साहित्य प्रवाहाशी संबंधीत नाही...त्यामुळे कंपुंचा प्रश्नच येत नाही. माझ्या साहित्याची यत्ता काय, मराठीत त्यांचे स्थान काय? असले प्रश्न मला पडत नाहीत आणि त्यासाठी माझ्याकडे वेळही नाही. स्वत:हुन ओळख-पाळखही नसता माझी दखल घेणारे राजा दिक्षीत, विजय काचरे, शंकर सारडा हे संचित आहेच. त्यांनी दखल घेतली म्हणून त्यांनी अजून आपल्यावर लिहावे अशी मी अपेक्षाही केली नाही.

मी का लिहितो मग?

उत्तर खूप साधे आहे...

मला लिहायला आवडते आणि लिहिण्यासारखे खूप काही मला सतत सुचत असते म्हणून!

-संजय सोनवणी

("मेहता ग्रंथ जगत" च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला लेख.)

1 comment:

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...