Monday, October 6, 2014

मराठा सेवा संघ...आणि मी!

मराठा सेवा संघ. मला ही संघटना अस्तित्वात आहे हे भांडारकर प्रकरणामुळे समजले. खरे तर माझा चळवळीतील कोणत्याही संघटनेशी कधी संबंध आला नसल्याने त्यात विशेष नवलही वाटण्याचे कारण नाही. मी तसा उद्योग-व्यवसाय जगतातील माणूस. मी कादंब-या भरपूर लिहिल्या असल्या तरी त्यांचे विषय राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय. त्यातील तिढे आणि त्यातून माणसाचा शोध. जाती-पाती, त्यावरील सामाजिक कलह याशी माझा संबंध न आल्याने किंवा त्यामुळेच त्यांचा विशेष अनुभव नसल्याने  माझ्या लेखनात त्याचे प्रतिबिंब न पडणेही स्वाभाविक होते. माझे नायक-नायिका (नंतर विचार केल्यावर लक्षात आले) समाजातील जवळपास बहुतेक जातींतील आहेत. ते मी जाणुन बुजून केले असे मुळीच नाही. असे असले तरी मी रा. स्व. संघाचा मात्र पुर्वीपासून विरोधक राहिलो आहे हेही खरे. त्याची सुरुवात १९८५ सालीच झाली होती. मी तेंव्हा एकविस वर्षांचा होतो आणि नुकताच पुण्यात रहायला आलेलो होतो. स्टोनीब्रुक विद्यापीठासाठी मी "An Ancient Aryans Thought on Religion" हा प्रबंध लिहिला होता. त्याच वर्षी तो एका दिवाळी अंकात मराठीतही प्रसिद्ध झाला. मला सर्वप्रथम, जवळपास पाठलाग कर भेटायला आले ते संघाचे दोन वयस्क गृहस्थ. माझे लेखन आवडून इतक्या चकरा मारत शेवटी भेटलेले ते गृहस्थ पाहून मला आनंद होणे स्वाभाविक होते. संघाची मला विशेष माहिती नसली तरी ती एक कडवी हिंदुत्ववादी विचारधारा आहे हे नक्कीच माहित होते. त्यांनी मला सर्वप्रथम जे पुस्तक भेट दिले ते गोळवलकर गुरुजींचे "विचारधन".

विचारधनाने मी अर्थातच अस्वस्थ झालो. संतापही आला. त्याचे पडसाद माझ्या अनेक कादंब-यांतही पडले. कल्की, सव्यसाचीवर हिंदुत्ववाद्यांनी हल्लेही चढवले. पण ठीक आहे. मला त्याची फारशी पर्वा करण्याचे कारण नव्हते. केलीही नाही. तरीही माझे अन्य सामाजिक चळवळींशी कधी संबंध आले नाही किंवा चळवळीतील कोणी मला भेटलेही नाही. २००१ साली मी भारतीय संस्कृती कोशाचे सर्व खंड घेतले. सारे वाचून काढले. आणि सांस्कृतिक खोटेपणाबद्दल एक चीड निर्माण झाली. मग मी पुरातन संस्कृतीशी संबंधीत इतरही मराठी-इंग्रजी पुस्तके जमतील तशी वाचून काढली. खोटेपणाचा, वैदिक आणि आर्य महत्तेचा एवढा मोठा पर्वत खोट्याच्या आधारावर रचला गेलेला पाहून मी अस्वस्थ नव्हे तर संतप्त झालो.

मी मुळचा कादंबरीकार. त्या पहिल्या प्रबंधानंतर मी कधीही वैचारिक लेखनाला हात घातलेला नव्हता. पण या प्रकाराने उद्वेगून मी "हिंदू धर्माचे शैव रहस्य!" हे पुस्तक लिहिले. सिंधू काळापासून भारतात अव्याहत वाहत राहिलेली धर्म धारा म्हनजे शैव प्रधान आहे याचे विपूल पुरावे उपलब्ध असतांनाही त्यावर वैदिक कलमे चढवत वैदिक माहात्म्याची कशी सोय लावली गेली आहे याबाबत मी या विचारकांचे त्यात वाभाडे काढले. हे सारे सांगायचे कारण म्हणजे चळवळीशी आणि विशेषत: मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड आणि तत्सम संस्था यांच्याशी माझा कसा संबंध आला हे आहे.

"हिंदू धर्माचे शैव रहस्य!" जसे वैदिकवाद्यांना आवडले नाही तसेच ते चळवळीतल्या लोकांच्याही पसंतीस आले नाही. त्याची कारणे चर्चायचे येथे प्रयोजनही नाही. पण हे पुस्तक येवून गेल्यावर काही काळाने माझ्या वाचनात ह. मो. मराठे यांचे "ब्राह्मणांना अजून किती झोडपणार?" हे पुस्तकही वाचण्यात आले. ज्या पद्धतीने ह.मों.नी हे पुस्तक लिहिले होते ती पद्धत कांगावेखोराची अधिक होती,. या पुस्तकाला प्रत्युत्तर म्हणून "ब्राह्मण का झोडपले जातात?" ही पुस्तिका लिहिली. या पुस्तिकेमुळे मला माझी प्रकाशन संस्था बंद करावी लागली. (बहुतेक विक्रेते ब्राह्मण असल्याने.) आर्थिक नुकसानही सोसावे लागले. पण याच पुस्तिकेमुळे व विशेषत: गणेश हलकारे यांच्यामुळे सर्वप्रथम माझी भेट पुरुषोत्तम खेडेकर आणि प्रवीण गायकवाड यांच्याशी झाली. या भेटीत मला खेडेकरांनी त्यांच्या तसेच इतरांच्याही पुस्तिका वाचायला दिल्या. ही झाली माझी एखाद्या चळवळीतील संघटनेशी ओळख कशी झाली याची कथा.

पुस्तिका वाचून माझे मत जसे संघाबद्दल बनले होते तसेच मराठा सेवा संघाबद्दल बनले. पुराव्यांची मोडतोड आणि प्रत्येक अवनतीला ब्राह्मणांना दोषी ठरवत जाणे हेही मला पटण्यासारखे नव्हते. विशेषत: त्यांतील भाषा ही शिवराळ होती. तरीही या पुस्तिका मी ज्येष्ठ समिक्षक शंकर सारडा यांनाही दिल्या आणि समाजात असेही प्रवाह आहेत त्याची नोंद समिक्षकांनी घ्यायला पाहिजे असे सुचवले. अर्थात सारडांनी त्यावर एक ओळही लिहिली नाही हे वेगळे.

दरम्यान दादोजी कोंडदेव पुतळ्याचा वाद चालू झाला. फेसबुकवर तर हंगामा सुरू होता. एकीकडे दादोजी हे महाराजांचे कसे गुरू होते यावर हिरीरीने लिहिणारा एक वर्ग तर दादोजींचा उद्धार करत ब्राह्मणांना लाखोल्या वाहणारा ब्रिगेडी व बामसेफी वर्ग एकीकडे. मी या वादात आपसूक ओढला गेलो. दादोजी शिवरायांचे गुरू किंवा शहाजी महाराजांचे नोकरही असू शकत नाहीत कारण ते आदिलशहाचे कोंडाणा किल्ल्याचे सुभेदार होते, त्यामुळे ते एखाद्या जहागिरदाराचे चाकर असू शकत नाहीत हे मी पुराव्यानिशी सिद्ध केले, त्यावर ब्लोग लिहिला. तोवर हा वाद विकोपाला गेला होता आणि ब्रिगेडची बाजू तात्विकदृष्ट्या बरोबर असली तरी त्यांचे पुरावे लंगडे पडत होते. पण पुण्यनगरी दैनिकाने अचानक मला फोन करून विचारले कि दादोजींवरचा तुमचा ब्लोगवरील लेख प्रसिद्ध केला तर चालेल काय? मी नाही म्हनण्याचा प्रश्नच नव्हता. लेख प्रसिद्ध झाला. आणि त्यानंतर काही दिवसांतच दादोजींचा पुतळा हटवलाही गेला. यावर प्रतिक्रिया देतांना मीम्हणालो होतो, "सत्याचा विजय झाला पण यामुळे उन्माद केला जावू नये." ही प्रतिक्रिया पुण्यनगरी व दै. प्रभातमद्ध्ये प्रसिद्ध झाली होती.

पण तसे व्हायचे नव्हते. उत्साहाच्या भरात ब्रिगेडने लगेच दोन उपक्रम हाती घेतले व ते म्हणजे नाटककार गडकरींचा संभाजी उद्यानातील पुतळा व रायगडावरील वाघ्याचा पुतळा छ. शिवाजी महाराजांची बदनामी केली व होतेय यामुळे काढून टाकायची घोषणा. यात मी विरोधी बाजुला आपसूक गेलो. वाघ्याचा पुतळा हा पुर्वापार होता, जर्मन प्रवाशांनीही त्याची नोंद घेतली आहे, आधी तो दगडी होता...नंतरचा मात्र पंचधातुचा आहे आणि शिवाजी महाराजांचे स्मारक करनारे त्यांचाच अवमान करण्यासाठी वाघ्याचा पुतळा बसवणार नाहीत असा माझा युक्तिवाद होता. याच दरम्यान प्रसिद्ध विचारवंत प्रा. हरी नरके आणि मराठा सेवा संघ व बामसेफमद्ध्ये वैचारिक मतभेद झाले. त्याचे परिणती प्रा. नरकेंवर अत्यंत अश्लाघ्य भाषेत हल्ले सुरु करण्यात झाली. मीही अर्थातच वाचलो नाही. अशा वेळीस चळवळीतील कोणीही माझ्या अथवा नरकेंच्या मागे उभे राहिले नाही. मी बामसेफवर व ब्रिगेडवर त्याबाबत जाहीर टीका सुरु केली. वाघ्याचे प्रकरण पेटत होतेच. यातून एक झाले व ते म्हणजे गडकरींच्या पुतळ्याला हात लावायचा विचार मात्र त्यांनी सोडून दिला. याला माझे फेसबुकवरील व ब्लोगवरील सातत्याने होत असलेले लेखन होते असे ब्रिगेडचेच लोक म्हणतात. असो.

वाघ्याचा वाद मात्र थांबायला तयार नव्हता. कितीही पुरावे दिले तरी ते मान्य करण्याच्या स्थितीत ते नव्हते. शिवराज्याभिषेक सोहोळा जवळ आला कि पुतळा हटाव मोहिमेला जोर यायचा. बहुदा जुलै १२ मद्ध्ये तो काढला गेला. मला वाहिन्यांचे-वृत्तपत्रांचे फोन आले. आता काय करणार? मी म्हणालो, मी एकटा आहे, माझ्या पाठी ना संघटना ना कोणी...मी सपत्नीक उपोषणाला बसणार. दुस-या दिवशी माझे सकाळी उपोषण सुरू झाले, दुपारपर्यंत बातमी आली, वाघ्या पुन्हा स्थापित झाला होता. मी उपोषण सोडले. (वाघ्याची पुनर्स्थापना माझ्या उपोषणाने झाली असा माझा भ्रम नाही.)

यानंतर "शिवरायांच्या बदनामीची केंद्रे" हे पुरुषोत्तम खेडेकर यांचे पुस्तक वाचन्यात आले. त्यातील ब्राह्मणांबद्दलचे किती जहर त्यांच्या मनात बसले आहे याची प्रचिती आली. त्यात ब्राह्मण स्त्रीयांबद्दल जे लिहिले आहे ते कोणीही सुसंस्कृत माणूस वाचुही शकणार नाही. त्यातच ब्राह्मण पुरुषांच्या कत्तलींचे जाहीर आवाहन केले होते. तत्पुर्वी मी अशी विघातक आवाहने (भाषा किंचित सभ्य असली तरी) सावरकरांच्या पुस्तकांत मुस्लिम स्त्रीयांबद्दल वाचले होते. असो. आम्ही पाच मित्रांनी ही बाब पुणे पोलिस आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी ते वाचून तडकाफडकी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. आम्ही गुन्हा दाखल केला. आता तो न्यायालयात प्रलंबित आहे.

* * *

असा माझा मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि बामसेफशी आला. यातून त्यांची विचारधारा लक्षात यायला मदत होईल. वाघ्या प्रकरणानंतर म. से. संघ आणि ब्रिगेडचे आक्रमक धोरण कमी होऊन ते मराठा आरक्षनाच्या आंदोलनांकडे वळाले. औरंगाबादच्या एका कार्यक्रमात "बहुजनांनी ब्रह्मणांना शिव्या देत बसण्यापेक्षा स्वत:ची प्रगती साधावी" अशा अर्थाचे उद्गार काढले, ते मी वृत्तपत्रात वाचले. स्त्रीयांबद्दलची त्यांची मते बदलली असावीत अशा अर्थाचीही काही विधाने प्रसिद्ध झाली आहेत. विशेष म्हनजे ७-८ महिन्यांपुर्वी डेक्कन कोलेजच्या एका विदुषीने पेशव्यांवर एक पुस्तक प्रकाशित केले त्याच्या दुस-याच दिवशी खेडेकरांचा मला फोन आला होता व पेशव्यांवर तुम्ही लिहा अशी सुचनाही केली होती. तेंव्हा मी ब्रिगेडकडे एवढे इतिहासकार असतांना मला का विचारले, असा प्रश्न केला असता, "आमच्या इतिहासकारांची विश्वासार्हता राहिलेली नाही." असेही प्रांजळ विधान केले होते. मी तर लिहिण्याची शक्यता नव्हती. पण तटस्थपणे ज्याचे माप त्याच्या पदरी घालू शकतो असा "पानिपत असे घडले" चा लेखक संजय क्षिरसागर याला ते काम सांगितले. हे झाले उत्तरायण. एवढेच.

* * *

यातून माझ्या लक्षात आलेल्या बाबी अशा आहेत कि रा. स्व. संघ आणि म. से. संघ यांच्या मुलभूत तत्वज्ञानात काही फरक नव्हता. (नव्हता हा शब्द अशासाठी वापरतो आहे कि जर समजा म. से. संघ आपल्या तत्वज्ञानाची पुनर्रचना करत असेल तर ते स्वागतार्ह आहे.) रा. स्व. संघाने नेहमीच मुस्लिम द्वेषाचा हौवा उभा करत, खोटीनाटी इतिहासाची प्रकरणे उकरत त्या भितीने तरी हिंदू संघटित होतील असा वारंवार स्थापनेपासून प्रयत्न केला. त्यांचे आदर्श हिटलर आणि खेडेकरांच्या पुस्तकातील हिटलरचे उल्लेख काही वेगळे दर्शवत नाहीत. म्हणजे आयडोलोजी एकच. द्वेष आणि त्यातून स्वसंघटन.

या संघटनेचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. मुळात संघटना उभी करणे आणि इतकी वर्ष ती चालवणे हे सोपे काम नाही. या संघटनेने आधी ही संघटना ब्राह्मणेतर सर्व बहुजनांची आहे असा देखावा निर्माण करण्यात यश मिळवल्याने अनेक मराठेतर तरुणही हिरीरीने या संघटनेत सामील होत क्यडर क्यंपही अटॆंड करत होते. प्रत्यक्षात ही मराठाकेंद्रीत संघटना आहे व होती. रा. स्व. संघात जरी बहुजन असले तरी खरे वर्चस्व वैदिकांचेच असते तशातलाच हा प्रकार. बरे त्यात काही वावगे नाही. पण असा बुरखा पांघरण्याची गरज नव्हती. मराठा समाजालाही प्रबोधनाची आत्यंतिक आवश्यकता आहे हे कोणी नाकारणार नाही. जेवढा वर्चस्वतावादाचा भाव वैदिकांत असतो तेवढाच, कधी जास्तच मराठा समाजात आढळतो हे वास्तव आहे. विवाहांतील वारेमाप खर्च एकीकडे तर शेतीच्या तुकडीकरणामुळे व राजकारणाच्या कच्छपी लागल्याने मराठा तरुणांची होत चाललेली आर्थिक अवनती दुसरीकडे. इतिहासाचे व त्यातील ख-या-खोट्या गौरवगाथांची मस्ती एकीकडे तर कमी शिक्षण आणि म्हणुनच नोक-यांचा अभाव एकीकडे. या स्थितीत सापडलेल्या, विशेषत: मराठवाड्यातील मराठा तरुणांना, योग्य दिशादिग्दर्शनाची गरज होती व आहे. प्रागतिक शेती, स्वयंरोजगार, इतिहास व वर्तमानाचे सम्यक भान व भविष्याच्या प्रगतीशील दिशा याबाबत जागरणाची गरज होती व आहे. त्याऐवजी अत्यंत सोपा मार्ग शोधला गेला तो म्हणजे आरक्षणाचा. ते कोर्टात टिकेल कि नाही हे त्यांनाही सांगता येनार नाही. शेवटी मराठा तरुणांना सांस्कृतिक जरी नाही तरी ऐहिक आधार कसा दिला जाईल हा एक प्रश्नच आहे.

* * *

मराठा सेवा संघाने मराठा तरुणांना अंधश्रद्धांपासून दूर केले काय या प्रश्नाचे उत्तर अवघड आहे. म. से. संघाच्याच एका लाडक्या लेखकाने आपल्या मुलाच्या लग्नात लग्न लावायला ब्राह्मणाला बोलावले होते. या लग्नाचे निमंत्रण त्याने म. से. संघ/ब्रिगेडच्या कार्यकर्त्याला लाजेपोटी दिले नाही. एका दृष्टीने गुपचूप विवाह उरकला हे मी स्वत: पाहिले आहे. रा. स्व. संघाला मराठा सेवा संघाचे आव्हान आहे कि पाठबळ आहे हे शोधण्यासाठी माझाच एक अनुभव येथे देतो.

पुण्यात लोहगांवजवळ शिवाजी महाराजांचे मंदिर करण्याची घोषणा रा. स्व. संघाशी निगडित असलेल्या फ्रंकोइस गोतिये नामक फ्रेंच (आता भारतीय व कडवा हिंदूत्ववादी) गृहस्थाने केली. मी याबाबत प्रथम लोकमतमद्ध्ये विरोध करणारा लेख लिहिला. मला चक्क ब्रिगेडच्याच असंख्य कार्यकर्त्यांचे अभिनंदनाचे फोन आले. काही काळाने गोतिये यांनी डी. एन. ऎ. या वृत्तपत्रात माझ्यावर झोड उठवणारा लेख लिहिला. मी त्यालाही सविस्तर उत्तर दिले व महाराजांचे दैवतीकरण करणे, त्यांचे मंदिर करणे अयोग्य असल्याचे प्रतिपादन केले. गोतिये व माझे लेख पुन्हा लोकमतमद्धेही प्रसिद्ध झाले. या वेळीस मात्र मला एकही फोन आला नाही. यथावकाश मंदिराचे व वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन पं. रविशंकर यांच्या हस्ते यज्ञ करुन झाले.

या कार्यक्रमाच्या प्रमूख पाव्हण्या होत्या सौ. सुनेत्रा पवार. अजितदादा काही कारणांमुळे येवू शकले नाहीत. अर्थातच म.से.संघ अथवा ब्रिगेडने या प्रकाराचा साधा निषेधही केला नाही. पुरुषोत्तम खेडेकरांचे काही नातेवाईक रा. स्व. संघाशी निकटचे संबंधी असल्याचे दावे केले गेले आहेत. ते खरे नसतीलच असे म्हनण्याची सोय नाही. (नगर जिल्ह्यात महाराजांचे मंदिर करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला तो ब्रिगेडने मात्र उग्रपणे हानून पाडला होता असे वाचल्याचे मला स्मरते.)

त्यामुळे रा. स्व. संघ आणि मराठा सेवा संघ हे विरोधी आहेत कि विरोध दाखवत आतून हातमिळवणी करत आहेत हे सांगता येणे अशक्य आहे. इतिहासाच्या शुद्धीकरनासाठी रा. स्व. संघाची "इतिहास संकलन समिती" ज्याप्रमाने सांस्कृतिक आचरट पुस्तके प्रसिद्ध करत असते जवळपास तशीच् पुस्तके म. से. संघाच्या जिजाई प्रकाशनामार्फत प्रसिद्ध होत असतात. पण यांना वरकरणी साधर्म्ये म्हनता येतील. महत्वाचा प्रश्न हा उपस्थित होतो कि म. से. संघाचे महाराष्ट्राला सांस्कृतिक योगदान काय?

* * *

म. से. संघाने ब्राह्मण द्वेषाची लाट आणली हे तर वास्तव आहे. प्रत्येक बाबीचे खापर ब्राह्मणांवर फोडणे, दुरवस्थांना जबाबदार धरणे हा प्रकार अतिरेक म्हणता येईल या पातळीवर गेल्याने सांस्कृतिक म्हणता येईल अशी चळवळ उभी राहिली नाही. द्वेषातून जनजागरण घडत नसते याचे भान त्यांना आले नाही. जरी फुले-शाहू-आंबेडकर अशे बहुजनांना प्रिय वाटतील अशा नांवांभोवती म. से. संघाची इमारत उभी करण्याचा प्रयत्न झाला असला तरी तो पुरता यशस्वी झाला नाही तो यामुळेच. एक मात्र खरे कि कट्टर मराठ्यांना म. से. संघाने बाबासाहेब वाचायला लावले. बामसेफशी (राजकीय हितसंबंधांसाठी का होईना) जी मोट बांधली त्यामुळे दलित-मराठ्यांतील दरी काही प्रमानात का होईना कमी झाली. तीच बाब मुस्लिमांची. म. से. संघ / ब्रिगेडने हिंदु-मुस्लिम तेढ कमी करण्याचा जाणीवपुर्वक प्रत्यत्न केला हे नाकारण्यात अर्थ नाही. पण यासाठी इतिहासाचे आधार वाकवले गेले, जिजाऊ महार होत्या असे शोधही लावले गेले. महार नागवंशी तसेच मराठेही नागवंशी म्हणून दोहोंचे मूळ एकच असेही सिद्धांत मांडले गेले. मुस्लिम-शिवाजी महाराज यांचे संबंध वास्तवदर्शी न राहता अतिरंजित बनवले गेले.

हिंदू धर्माचा आणि त्याच्या देवदेवतांचा द्वेष करणे हा बहुदा पुरोगामी म्हनवणा-या सामाजिक चळवळींचा प्राणच बनून गेला आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. ब्रिगेड त्यात कधीही मागे राहिली नाही. ज्या देवतांना आपण शिव्या देत आहोत त्या वैदिक नव्हेत तर शुद्ध अवैदिक असून त्यावर वैदिकांनी केलेले अतिक्रमण हटवण्यापेक्षा ब्राह्मणांना नाकारायचे तर हिंदू देवतांनाही नाकारा असा अतिरेकीपणा घुसला. ब्राह्मणांना जेवढी शिवीगाळ तेवढीच देवतांनाही होणे मग स्वाभाविक होते. यातून भडक माथ्याचे तरुण अजून अतिरेकी जरी बनत गेले तरी सर्वसामान्य , अगदी मराठा वर्गही, हिंदू धर्मावरील एवढे हल्ले पचवू शकत नव्हता. त्यामुळे ही चळवळ मर्यादित होत गेली असल्यास नवल नाही. पण म. से. संघाला हिंदू धर्म नाकारायचा होता हेही खरे.

यातून मग एक पर्याय काढला गेला व तो म्हणजे नव्या धर्माची स्थापना. नवीन धर्माची स्थापना हे म. से. संघाचे फार मोठे धाडस आहे हे मान्य केलेच पाहिजे.  हिंदू धर्म नाकारण्यासाठी या धर्माची स्थापना झाली. या धर्माचे संहिता लिहिण्याचे कार्य डा. आ. ह. साळूंखे व अन्य विद्वानांवर सोपवले गेले. ती संहिता पुर्ण झाले कि नाही हे मला माहित नाही. पण शिवधर्म पद्धतीचे विवाह किमान फेसबुकवरुन अधे-मधे गाजत असल्याने या धर्माची कर्मकांडेही तयार झाली आहेत असे दिसते. हा शिवधर्म म्हणजे पुरातन शैव धर्म कि छ. शिवाजी महाराजांना केंद्रीभूत मानून स्थापन झालेला शिवधर्म हा मात्र गोंधळ इतरांच्या (माझ्याही) मनात आहे खरा!

काहीही असले तरी चळवळीने चक्क स्वतंत्र धर्म स्थापन करण्याची घटना भारतात कधी घडली नाही हे खरे. म. फुलेंनीही "सत्यशोधक" समाजाची स्थापना केली होती, धर्माची नव्हे हेही येथे लक्षात घेतले पाहिजे.

पण यातील गंमतीचा भाग म्हणजे, आम्ही बौद्ध धर्माच्याच वाटेवर आहोत...शिवधर्म एक थांबा आहे असे सांगायला हे लोक कचरत नाहीत हे एक विशेष!
* * *

मग नेमकी म. से. संघाची भूमिका काय आहे? ती बहुजनवादी आहे कि मराठावादी आहे? ती मराठावादी आहे हे अनेक घटनांवरुन स्पष्टच दिसते. जिजाऊंना केवळ सावित्रीबाई फुलेंना मागे सारायचे म्हणून प्रमोट केले जात आहे असे आरोप चळवळीतून अधून-मधून होत असतात. शहाजी महाराज, छ. शिवाजी महाराजांच्या पुर्वी आणि संभाजी महाराजांनंतर जणू मराठ्यांना इतिहासच नव्हता कि काय असे वाटावे या पद्धतीने इतिहास-लेखन (?) कार्य चाललेले असते.

वामन मेश्रामांच्या बामसेफशी म. सेवा. संघाची युती तर कोड्यात टाकणारी आहे. ही संघटना म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीचे उत्तम उदाहरण आहे. खुद्द बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाची-विचारांची जेवढी पायमल्ली या संघटनेने केली आहे तेवढी बाबासाहेबांच्या कट्टर विरोधकांनीही केली नसेल. म. से. संघ आणि बामसेफमधील एक समान दुवा म्हणजे पराकोटीचा ब्राह्मण द्वेष. पण त्यात छुपी राजकीय गणितेही असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अगदी ताजे उदाहरण म्हणजे सोशल मिडियावरून ब्राह्मण विरुद्ध मराठा वाद निवडणुका समोर ठेवून एका प्रादेशिक पक्षातर्फे पेटवला जात असल्याचा आरोप एका राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याने केल्याच्या बातम्या आल्या आहेत. आता मोठा राष्ट्रीय पक्ष म्हणजे भाजपा असला तर प्रादेशिक पक्ष राष्ट्रवादी कोंग्रेस असावा. राष्ट्रवादीची म. से. संघावर मेहरनजर आहे असे मानले जाते.

वरील बाबी पाहिल्या तर म. से. संघाची गोंधळयुक्त स्थिती लक्षात येईल. रा. स्व. संघाला तोंड देण्यासाठी खरे अवैदिक बहुजनवादी संघटना हवी काय तर त्याचे उत्तर निखालसपणे "होय" असेच आहे. रा. स्व. संघाने आक्टोपसप्रमाणे एवढा फास आवळत आनला आहे कि ते म्हणतील ती संस्कृती, ते म्हणतील ते धर्मकर्तव्य आणि ते सांगतील तसाच राष्ट्रवाद अशी परिस्थिती आलेली आहे. सिंधू संस्कृतीपासून अव्याहतपणे वाहत आलेली बहुजनीय अवैदिक विचारधारा आपलीच तत्वज्ञाने व धर्मचिन्हे अपहृत होऊ दिल्याने सांस्कृतिक अवनती आली. ती वैदिक पुटे कढत, अनिष्ट ते सोडत परत मिळवण्याऐवजी केवळ द्वेषाचा आधार घेत कर्तव्यशून्य शिवीबाज बनायच्या भानगडीत कोणतीही बहुजनीय संघटना रा. स्व. संघाला तोंड देवू शकण्याची शक्यता दिसत नाही. म. से. संघाला ही पोकळी भरून काढण्याचे चांगली संधी होती, पण तिने ती मुळातच चळवळीचे तत्वज्ञान राजकीय, सामाजिक कि स्वजातीय असावे यातच मुलभूत गोंधळ केल्याने गमावली आहे असेच म्हणावे लागेल.

रौप्यमहोत्सवी वर्षात प्रवेश करतांना पुरुषोत्तम खेडेकरांचा होऊ शकणारा पुणे मनपाचा सर्वोच्च नागरी सन्मान लोकांच्या विरोधामुळे गमवावा लागावा यातच म. से. संघाच्या कार्याची सुफळ कहानी संपन्न होते. 

आपण परिवर्तनवादी आहोत. माणसे बदलतात. संघटनाही बदलू शकतात यावर विश्वास ठेवतो. वैचारिक गोंधळातून म. से. संघही वाट काढेल, निखळ द्वेषाचे धोरण न ठेवता अभ्यासपुर्वक वैदिकांचे सारे दावे खोडून काढत त्यांचा तथाकथित वर्चस्वतावाद हटवायला चांगला हातभार लावेल आणि समाजाला, अगदी मराठ्यांनाही, समतेच्या पातळीवर आणायचा भविष्यात अविरत प्रयत्न करेल अशी आशा बाळगायला हरकत नाही.

(My article in Media Watch Diwali issue)

14 comments:

  1. सुंदर लेख आहे. सगळ्यांना अगदी सडेतोड उत्तर…

    ReplyDelete
  2. आप्पा - असा अवेळी पाउस आल्यासारखा हा संजय एकदम मराठा सेवा संघ आणि रा स्व संघ याबद्दल का लिहितो आहे - आपण त्याला काही सांगावे का ?
    बाप्पा - चालेल चालेल - तो सर्वांचे ऐकतो
    आप्पा- त्याचे फारच कन्फ्युजन झालेले दिसते - आपण आपले होण्यापूर्वी त्याला काही शंका विचारुया
    बाप्पा - त्यांनी एक प्रबंध लिहिला होता त्याचे काय झाले - त्याना डॉक्टरेट मिळाली का ?
    आप्पा - ते शिवधर्म स्थापनेबद्दल बोलतात त्यावेळेस शंका अशी येते - अवैदिक धर्म म्हणजे काय ?
    बाप्पा - अवैदिक धर्माबद्दल सविस्तर सांगता आले तर - संजयाच्या जुन्या लिखाणात वाचनीय काही असेल तरी आम्ही वाचू -आम्हाला वैदिक सोडून उरलेल्या अवैदिक जगाची ,धर्माची,संस्कृतीची तोंड ओळख करून घ्यायची आहे रोजच्या दिनक्रमात काही स्तोत्रे आणि गद्य पद्य काहीतरी हाताशी हवे आहे - ते संजय आम्हास सांगेल का ?
    आप्पा - हिंदू पण अवैदिक देवता कोणत्या ?
    बाप्पा - जगात अवैदिक आधी होते हे तर संजयचे आवडते सांगणे आहे - आर्य बाहेरून भारतात आले का ?संजयाच्या विचारात मांडणी करताना सगळा सावळा गोंधळ होतो आहे असा भास होतो - तसे खरेतर नसेलही - पण आम्हाला काही गोष्टींची एका वाक्यात उत्तरे हवी आहेत - ती मिळाली तर फार फार बरे होईल आणि आम्हाला संजयाने मार्गदर्शन उत्तम केले असे आम्ही म्हणू - प
    आप्पा - म्हणजे प्रश्न पडणे हे जीवंत पानाचे लक्षण आहे असेच ना ?
    बाप्पा - आम्हाला एखाद्या गोष्टीचा मुळातच जाणे आवडते आणि एकदा आमची खात्री पटली की आम्ही त्या चळवळीचे कट्टर समर्थक बनतो - कोणताही विचार हा स्वतः जगायचा असतो - म्हणूनच अगदी बेसिक प्रश्न पडतात
    आप्पा - म्हणजे ?
    आप्पा - आता माझा दिनक्रमाच सांगू का ? त्यातील अवैदिक संजयाने सांगावे -इतके सोपे !
    बाप्पा - सांग
    आप्पा - सकाळी उठल्यावर कराग्रे वसते लक्ष्मी -नंतर गार पाण्याने स्नान करताना ओम नमः शिवाय - नंतर पूजा करताना कृष्ण पंचायतन - गणपती ,मुरलीधर ,अन्नपूर्णा सूर्य, शालिग्राम आणि गुरुदेव दत्त यांची पूजा - चंदन फुले वापरून तुपाचे निरंजन लावून सर्वाना चांगली बुद्धी देण्याचे साकडे घालून मंत्र पुष्पांजली म्हणून देवाला नैवेद्य दाखवून चार घास आपण घ्यायचे !
    बाप्पा - म्हणजे थोडक्यात तुला शिव आणि वैष्णव दोन्हीही प्यारे !असेच ना ?
    आप्पा - आमच्याकडे जोगवा मागतात , नवरात्र असते दहा दिसाचा गणपती असतो - मग आम्ही कोण ?शिव धर्मात नेमके काय असते ?
    बाप्पा - अरे आपल्या हाताला धरून आपली आई देवळात घेऊन जाते - आणि सांगते - हं बाप्पाला सांग मला चांगली बुद्धी दे - तिथे कुठे प्रश्न येतो ?
    हे बघ भावनांच्या लाटा निर्माण करून विषयांतर करू नकोस !
    आप्पा - अरे कस सांगू तुला माझ्या मनाचा उद्वेग ! सगळ भावविश्व कुरतडून काढाल बघ या वैदिक अवैदिक् घोटाळ्याने !सगळ्यातील गम्मतच संपली - भरपूर शिकलो छान काम करून मोठ्ठे झालो - कधी जातपात मानली नाही - पण हे एकदम मध मासांचे पोळे फुटावे तसे - एकदम द्वेषाचे मोहोळ म्हणता म्हणता सर्वत्र घोंगावू लागले प्रत्येक विषयात दोन पक्ष !
    बाप्पा - खरे आहे रे बाबा !संजयाच सांगेल आता काय ते !

    ReplyDelete
    Replies
    1. आप्पा-बाप्पा, तुम्ही जे करताय ते अर्धे वैदिक आणि अर्धे वैदिक आहे. मी भारतीय ब्राह्मण हे द्वैधर्मी आहेत असे अनेकदा लिहिलेले आहे आणि ते तुम्ही वाचलेले आहे. आम्ही वैदिक नाही...१००% अवैदिक शैव आहोत. फरक तेथे आहे. हा लेख मुख्यता म.से.संघाबद्दल आहे...वैदिक-अवैदिक याबाबत अनेक लेख आहेतच....

      Delete
  3. आप्पा -संजय सरांचे आभार मानायचे का ? का अजून प्रश्न विचारायचे ?
    बाप्पा - त्याना वेळ असेल का ?पण हे प्रश्न त्यांनीच डोक्यात निर्माण केले आपाळ्या - आता उत्तरे त्यांनाच द्यावी लागतील असे म्हणू फार तर !कारण त्यांच्या इतके सोप्या भाषेत दुसरे कोण सांगेल?
    आप्पा - हीच तर अडचण आहे - नुसते वाचले आणि विसरले असे आपले होत नाही - आपल्याला शेवट गाठायची आवड - विचारू ?
    बाप्पा - विचार की - संजय काय आपला शत्रू थोडाच आहे ?विचारांच्या दुनियेत विचारच शेवटी राहतो !
    आप्पा - प्रत्येक अवैदिक हा शैव असतोच का ?आणि नुसताच अवैदिक नसतो का ?
    बाप्पा - पूर्वी सगळे एकमेकांशी भांडायचे - वाद घालायचे - द्वैत अद्वैत विशिष्ठाद्वैत असे कितीतरी प्रकार !सगळ्यांना भूक लागायची,सगळे आईला आई म्हणूनच हाक मारत असत , सगळ्यांना स्वप्ने पडत असत -सगळ्याना आजार होत असत - त्यात वैदिक होते शैव होते -नंतर एक वादळ आले - झंझावात - सगळे उपखंड हादरून गेले - मुस्लिम आले -नायनाट करत आले - विध्वंस करत आले - आहे ते उपटून फेकून देत त्यांनी बांग दिली अल्ला हो अकबर !- आम्ही भांडतोच आहोत !
    आप्पा - अजूनही संजय सांगत नाही की शैव म्हणजे शिव पूजन करणारे सश्रद्ध असेच ना ?
    गणपती शिवपुत्र आहे का ?मारुती शिवाचा अंश आहे का ?असे अनेक प्रश्न आहेत रे संजय - तू उत्तर दे ना जरा - कारण आम्ही अबोधपणे सर्व करतो आहोत - आम्हाला मारुती शंकराचा अवतार वाटतो - गणपती शिवपुत्र वाटतो ! आणि नेमका शिवधर्माचा धर्म ग्रंथ कोणता ? शिवलीलामृत ?त्यांचे शिक्षण कोणत्या भाषेत होते - प्रांताप्रमाणे शिवाची भाषा बदलत जाणार का ?कन्नड तमिळ बांगला ?धर्म ग्रंथ काय असणार आणि कोणत्या भाषेत ?बाप्पा - प्रत्येक देवाला एक रूप रंग आणि इतिहास असतोच तो कथारुपात असतो असे मानले तर शिवाचा इतिहास काय ?
    बाप्पा - संजया , प्लीज आम्हास सांग तुझ्या कोणत्या पुस्तकात हे सर्व आहे ? आम्ही ते जरूर विकत घेऊ - पण आमचा वैचारिक कोंडमारा थांबवणे फक्त तुझ्याच हाती आहे !
    आप्पा - थोडासा वेळ काढ ! मल्हारी हा शिवाचा अवतार आहे ना ? असे किती अवतार आहेत ? त्याना जन्म आणि मृत्यू आहे ना ? म्हणजे तारीख आहेच की ! ते पण सांग !

    ReplyDelete
  4. चार्वाक शैव होता का -अवैदिक होता का - चाणक्य अवैदिक होता का ?
    इतिहासाचे मूल्यमापन करताना वैदिक एकही थोर निपजला नाही का ?अवतार कल्पना शैव धर्मात आहे का ? दशावातार वैदिक पंथाची देणगी आहे का ? सर्व शक्तिपीठे आणि देव्या शैव पंथाची जहागीर आहे का ? वैष्णोदेवी हि पण शिव धर्मियच आहे का ?असे हजारो उप प्रश्नही आहेत -
    वैदिकाना वेगळा धर्म का स्थापन करावासा वाटला ?
    स्थापना आली की साल आणि तारीख आली - वैदिकांच्या बाबत तसे काय सांगता येईल ?
    अमुक तारखे पर्यंत शैव एकमेव या उपखंडात किंवा आशियात होते आणि अमुक तारखे नंतर सगळे बिघडले - आमच्या देव्या आणि शक्तिपीठे वैदिकांनी पळवली असे काही आहे का खरोखरचे ?
    आणि जर सर्व पृथ्वीवर शैव धर्मच मूलधर्म होता तर इतर देशात त्याचे पतन कसे झाले ? मुसलमान हे शैव धर्माचेच सुधारीत रूप तर नाही ना ?

    ReplyDelete
  5. अहो नुसते मुसलमान नव्हे तर ख्रिश्चन धर्म पण शैव धर्माचे भ्रष्ट रूप असलाच पाहिजे !
    शैवांच्या आधी काहीच नव्हते ! आणि तो पुढे का अस्तंगत झाला ? त्याचे पुनरुत्थान झालेच पाहिजे !
    ओम नमः शिवाय यात ओम हा वैदिक आहे असे आपले म्हणणे आहे असे स्मरते - बरोबर का ? संस्कृत हि शैवांची भाषा नाही - बरोबर ना ?

    ReplyDelete
  6. शिव धर्मात शिवाचे कंकर , यमदूत आहेत , म्हणजे नरक आहे पुनर्जन्म आहे ?
    म्हणजेच हिशोब आला , पाप पुण्य आले ?त्याची भाषा आली , गणित आले ?

    शिवाजी महाराजाना सरकार भारतरत्न देत नाही म्हणून शिवधर्मीय आंदोलन करणार का ? मृत्यू पश्चात ते अनेक वेळा दिलेले आहे - डॉ आंबेडकर याना मिळाले तर शिव छात्रपतीना का नाही ?

    शिवाची गंगा मान्य आहे ना का ते पण वैदिकांचे घुसडणे आहे ?

    खरा शिव धर्म आणि त्याचा ग्रंथ आणि तत्वे , पाप पुण्याच्या कल्पना काय आहेत ? आद्य शंकराचार्य - पुनरपि जननं पुनरपि मरणं म्हणत - ते जर वैदिक असतील तर शैव नक्कीच उलट विचारांचे असणार - पुनर्जन्मावर विश्वास नसणारे असणार - मग हे यमदूत कशाला ?

    आपणालाच अजून शिवधर्म हा शिवाशी निगडीत आहे का शिवाजीशी निगडीत आहे याची खात्री नाही तर मग काय ?
    साधारणपणे वैदिक हे शिवाच्या मानाने नवीन आणि त्यांनी शैवाना झाकोळून टाकले असा सूर दिसतो , पण मग ते का झाकालाले गेले त्यांच्या आचार विचारात झाकोळले जाण्यासारखे काय आहे ?आम्ही या बाबतीत अजिबातच अशिक्षित आहोत , आणि आपण सर्वाद्न्य आहात - आपण आम्हाला मार्ग दर्शन करून शिव धर्म समजून घ्यायला मदत कराल अशी आशा आहे
    शिव्धार्माबद्दल अनेक शंका आहेत
    महाशिवरात्रीचे महत्व काय ?श्रीशंकर हा खराखुरा भेटणारा देव आहे का ? तो भेटल्यावर काय होते ?शिवभक्त नशा - गांजा आणि चिलीम याला महत्व देतात ते का ?

    ReplyDelete
  7. सर्व मराठा आणि बहुजन शैव आहेत का ?

    ReplyDelete
  8. वैदिक हा हिंदू नाही आणि शैव हा हिंदू आहे असे आपले मत आहे का ?

    ReplyDelete
  9. शिवाला कवठ आणि इतर फल पुष्पे वाहतात - का ? देवाला असे स्पेसिफिक असणे आवडते हे आपणास पटते का ?आपण आपल्या कल्पना देवावर लादत नाही का ? पान्दुरांगाला तुलासिहार आणि शिवला बेल वाहने यात तत्वतः काय फरक आहे ?उपवासाने काय साधते ? विपश्यना शिवणा मान्य आहे का ? हिंसा मान्य आहे का ?
    शिव हा स्मशानात राहतो याचा अतिरेक होत जाउन शैव पंथाला ओंगळ पणा आला आहे असे वाटते का ?

    ReplyDelete
  10. संजय सरांनी आप्पा बाप्पा याना ब्राह्मण ठरवून कमालच केली आहे
    त्याना कसे समजले हे

    सर्व देवघरातून शुभम करोति म्हटले जाते ते फक्त ब्राह्मणातच का ?
    सर्व कथा कादंबरी यातून बहुजन फक्त तमाशा बघतो असे नसते दाखवलेले - बहुजन हा शिव धर्माचा जास्त करून मानणारा आहे - त्यांच्यावर वैष्णव संस्कार होत होत आता ते तुलासिमाळा गळा कर ठेवून असतात ,

    ReplyDelete
  11. आरएसएस व एमएसएस दोन्ही संघटाने विषयी योग्य आकलन, योग्य भाष्य आणि योग्य सल्ला सुद्धा आहे या लेखात ! चळवळीतिल प्रत्येक घटकासाठी संग्रहणीय लेख !!

    ReplyDelete
  12. Mahashivratri chya divshi "SHIVLELA AMRIT" vachle tar chalel ka????

    ReplyDelete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...