Thursday, November 6, 2014

अर्थकारणाचे राजकारण.....

जगाचा इतिहास पाहिला तर लक्षात येते कि बव्हंशी साम्राज्ये कोसळण्यामागे इतर अनेक कारणांबरोबरच महत्वाचे कारण होते ते म्हणजे विशिष्ट मर्यादेनंतर आलेली आर्थिक विकलांगता. रोमन साम्राज्याचे पतन हे नेहमीच इतिहासकारांच्या आकर्षणा॑चे केंद्र राहिले आहे. गिबनच्या जगप्रसिद्ध "डिक्लाइन अन्ड फाल ओफ़ रोमन एम्पायर" या ग्रंथात त्याने आर्थिक अंगाने रोमन साम्रज्याच्या पतनाची चिकित्सा केली नसली तरी त्याने दिलेल्या पुराव्यांनुसार ज्युलियन फेन्नरसारखे आधुनिक अर्थतद्न्य आता पतनामागील आर्थिक कारणांचा शोध घेत आहेत. त्याच अनुषंगाने भारतातील शिशुनाग, मौर्य, गुप्त, सातवाहनादि साम्राज्यांच्या पतनांचा अभ्यास केला असता असे दिसते कि ही साम्राज्ये पतीत होण्यामागे केवळ परकीय आक्रमणे, स्थानिक बंडे, सांस्क्रुतीक वा राजकीय कारणे नव्हती तर आर्थिक विकासाचे भरकटलेले राजकारणही होते.

भारतात तसा आर्थिक इतिहास लिहिला गेलेला नसला तरी तत्कालीन समाजस्थितीची जी वर्णने मिळतात त्यावरुन बराच अंदाज बांधता येवु शकतो. कोणतेही साम्राज्य/राज्य अस्थिर व्हायची सुरुवात तेंव्हाच होते जेंव्हा प्रजेची आर्थिक वाताहत झालेली असते वा होवु लागलेली असते. ही आर्थिक वाताहत फक्त आक्रमकांच्या लुटींमुळेच झालेली असते असे नाही तर अंतर्गत अर्थकारण नैसर्गिक वा चुकीच्या आर्थिक धोरणांमुळेही झालेली असते. अर्थकारण हे नेहमीच सांस्क्रुतीक वा धर्मकारणापेक्षा वास्तव जीवनावर प्रभाव टाकणारे सर्वोच्च कारण असते. किंबहुना ज्याचे अर्थकारण स्थायी आणि वर्धिष्णू असते त्याच संस्कृत्या बलाढ्य होतात. जगात एकही संस्कृती प्रदिर्घकाळ बलाढ्य राहू शकलेली नाही, पतने झाली आहेत याचे कारण आपल्याला अर्थकारणांतच शोधावे लागते. आजच्या महासत्ता परवा नव्हत्या म्हणून उद्या त्या तशा असतील हा भाबडा आशावाद झाला. ते वास्तव नाही...कधीही नव्हते.

अर्थकारणच मानवी संस्क्रुती घडवत असते. मानवी स्वप्ने, आकांक्षा आणि अभिव्यक्ती अर्थकारणांवरच अवलंबुन असतात. स्वागत करणारे आणि विद्रोह करणारे अशाच संस्क्रुतींमद्धे एकत्रच वावरत असतात. या दोहोंत सतत कधी सुप्त तर कधी उघड संघर्ष असतोच. अमेरिकेतील "आक्युपाय वाल स्ट्रीट" हे जनांदोलन या विद्रोहाचेच एक प्रतीक होते. सुरुवातीला आर्थिक बदलांचे स्वागत करणारा वर्गही जेंव्हा आर्थिक असुरक्षेने ग्रासला जातो तेंव्हा तोही अशा विद्रोहाचे समर्थक बनु लागतो. पण या समस्त मंडळीला स्वार्थ भावना सोडता मुळात आपल्या अर्थप्रेरणाच समूळ चुकीच्या आहेत, अवास्तव आहेत आणि पृथ्वी जरी सर्वांचे पोट भरू शकत असली तरी सर्वांच्या आसुरी आकांक्षा साकार करण्याची शक्ती तिच्या ठायी नाही हे माणसाला कधीच समजलेले नाही.

आपले अर्थतज्ञ भांडवलवाद, समाजवाद अथवा मार्क्सवादाभोवती फिरत सिद्धांत मांडत असतात. सता या सिद्धांतांना कितपत प्राधान्य देतात, चर्चा करत आर्थिक धोरणे ठरवतात हा विवादास्पद प्रश्न आहे. उपलब्ध साधनसंपत्तीचे नियोजन मात्र यात राहून जाते. उत्पादने मनुष्याला कार्यक्षम करण्यासाठी असतात...पण प्रत्यक्षात तसे होत नाही. कारण समाजच आपली कार्यक्षमता अर्थव्यवस्थेशी सुसंगत ठेवत नाही. जेंहा एकुणातीलच मनस्थिती तशी बनत जाते तेंव्हा सत्ता-साम्राज्ये कोसळत जातात. आर्थिक व म्हणूणच सांस्कृतीक अवनत्या येत जातात.

भारतात अनेक आंदोलने होत असली तरी "आर्थिक पर्यावरण" सुदृढ होईल अशी आंदोलने झालेली नाहीत. आर्थिक पर्यावरणात अर्थकारणांचे, गरजांचे आणि भवितव्याचे सर्वांगीण व सार्वत्रिक भान याचा समावेश होतो. त्या दृष्टीने आम्ही अर्थ-अडाणी आहोत असे म्हटले तरी वावगे होणार नाही. आम्हाला अजुनही स्वस्ताई-महागाई कशी येते हे नीट समजत नाही तर मग बाकी बाबींचे काय? ज्या अर्थकारणाला विघातक बाबी आहेत त्यांना आपलीच मूक संमती असते कारण आपल्याला मुळत त्या बाबी नीट समजलेल्याच नसतात. वृत्तपत्रीय पेड लेखांतून आपल्याला जे समजावण्याचा प्रयत्न होतो त्यावरच आपली भिस्त असते.

अर्थकारण हा राजकारणाचा भाग असला तरी अर्थकारणाचे राजकारण कधीही होऊ द्यायचे नसते हे आपल्याला समजलेले नाही. पुर्वीही समजले नव्हते त्यामुळेच उत्थानात अत्यानंदी होणा-या समाजांचेही नंतर एवढे अध:पतन झाले कि त्यांचा इतिहास आता अवशेषांत शोधावा लागतो!

No comments:

Post a Comment

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...