Saturday, November 8, 2014

सर्वांनीच भुईसपाट व्हायचे?

महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे औद्योगिक राज्य मानले जाते. (काही लोक मानत नव्हते पण सत्तेत आल्यावर पुन्हा मानू लागले आहेत.) पण हा दर्जा वाढवणे सोडा, आहे तो दर्जा टिकवणेही महाराष्ट्राला दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. राज्यातील अनेक उद्योग महाराष्ट्राबाहेरची वाट चालू लागले आहेत. नवीन उद्योग महाराष्ट्राला प्राधान्य देतांना दिसत नाहीत. महाराष्ट्राचे औद्योगिक धोरण याला जबाबदार असेल असे वरकरणी वाटणे संभव आहे, परंतु ते एकमेव कारण नाही. कोणताही प्रश्न स्वतंत्रपणे वेगळा काढून त्याचा अन्वयार्थ लावायला गेलो तर आपल्याला एकुणच प्रश्नांच्या मुळाशी जाता येणार नाही. त्यामुळे समग्र प्रश्नांचा स्वतंत्र विचार करत असतांनाच त्या प्रश्नांची एकमेकांशी असलेली गुंतागुंत, परस्परसंबंध आणि त्यातून निर्माण झालेले तिढे यांचा एकत्रीतपणे विचार केल्याशिवाय आपल्याला उत्तरे शोधता येणेही अवघड होवून जाईल. परंतु सामान्यतया प्रत्येक प्रश्नाचा स्वतंत्र विचार करत स्वतंत्र उत्तर शोधण्याची आपली सवय आपल्याला घातक बनली आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि शेवटी सर्वच प्रश्न अर्थोन्नतीशी येवून ठेपतात हेही विसरता येत नाही. उदाहरणार्थ महाराष्ट्राबाहेर अलीकडे जे उद्योग गेले ते येथील जमीनींचे वाढलेले अवाढव्य दर, पाणी आणि वीजेच्या पुरवठ्यातील अनियमितता व सामाजिक दंडेलशाह्या गाजवणा-या संस्था/टोळ्यांच्या कर्तुत्वामुळे...यावर आपण कधी विचार केला आहे असे दिसत नाही. (माझ्या एक गुजराथी मित्र आहे. तो महाराष्ट्रातच कारखाना काढणार होता. परवानग्याही मिळवल्या. पण भुमीपुजनाच्या आधीच राजकीय व समाजकंटकांनी त्याला देणग्यांच्या नांवाखाली खंडण्या मागायला सुरुवात केली. त्याने उद्योग बलसाडला हलवला...आता व्यवस्थित चालुही झाला आहे.)

महाराष्ट्र राज्याला इतिहासाचा उदंड वारसा आहे. सातवाहनांपासून सुरु होणारा महाराष्ट्राचा ज्ञात इतिहास यादवकाळापर्यंत सुवर्णाक्षरांनी नोंदवावा असाच आहे. पारतंत्र्याच्या बेड्यांनी महाराष्ट्र जखदला गेला असला तरी नंतर शिवरायांच्या रुपात माहाराष्ट्री स्वातंत्र्याचा तेजस्वी उद्गार उमटला. पानिपत युद्ध व त्यानंतरही महाराष्ट्राने राष्ट्रीय राजकारण करत आपला राष्ट्रव्यापी ठसा उमटवण्यात यश मिळवले. सामाजिक सुधारणांचाही पहिला उद्गारही महाराष्ट्रातच उमटला. एकोणिसाव्या शतकानंतर महाराष्ट्रात पुरोगामी चळवळी सुरु होत समाजमन पारंपारिकतेच्या जोखडातून बाहेर पडु लागले असे आपण सर्वसाधारणतया मानतो. पुरोगामी चळवळींचे यशापयश हा आपल्या चर्चेचा विषय नाही. कोणत्यातरी पद्धतीने का होईना, जनसामान्यही विचार करु लागले एवढे तरी श्रेय पुरोगामी चळवळींना द्यावेच लागते. एवढेच!

असे असले तरी महाराष्ट्र आजच्या जागतिकीकरनाच्या प्रक्रियेत नेमका कोठे बसतो याचा विचार केला तर उत्तर फारसे समाधानकारक येत नाही. आजही महाराष्ट्राची ६५% लोकसंख्या शेतीवरच अवलंबून आहे. शेतीचे प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्याऐवजी आपला भर समस्यांवर तात्पुरत्या मलमपट्ट्या करण्यावर राहिलेला आहे. सरासरी तीन वर्षांनी अवर्षनाचे चक्र येते हा इतिहास सर्वांना तोंडपाठ असुनही जलसंधारण व सिंचन योजना तसेच पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यात आम्हाला घोर अपयश आले आहे. यंदाचा मराठवाड्यातील दुष्काळ हे त्याचे सूचक चिन्ह आहे. जानेवारी-फेब्रुवारीनंतर कोठे कोठे ट्यंकर पाठवावे लागतील हे आम्हालाच माहित नाही. म्हणजे आम्ही आमच्याच नियोजनाबाबत किती उदासीन आहोत व सरकारभरोसे (जे भरोशांवर रहायच्या योग्यतेचे कधीच नव्हते) राहण्यात धन्यता मानतो.

महत्वाचे उदाहरण म्हणजे उद्योगधंद्यांचे केंद्रीकरण बव्हंशी पश्चिम महाराष्ट्रात झाल्याने महाराष्ट्रात प्रादेशिक असमतोलाची विलक्षण परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याच मुळे विदर्भ आणि मराठवाडा मात्र बकालीच्या स्थितीकडॆ वाटचाल करत आहेत. उद्योगव्यवसायांच्या केंद्रीकरणामुळे एकीकडे काही शहरे प्रमानाबाहेर फुगत जात सामाजिक समस्यांनाही जन्म देत पायाभुत सुविधांवर पराकोटीचा ताण निर्माण करत आहेत तर दुसरीकडे बकालपना वाढतो आहे. अविकसीत प्रदेशांच्या सर्वकश विकासासाठी व उद्योगधंद्यांच्या विकेंद्रीकरनासाठी आमच्याकडे आजही ठोस योजना दिसत नाही. यामुळे महाराष्ट्राचे बकालीकरण होणे अपरिहार्य बनले आहे. पशुपालन हा महाराष्ट्राचा शेतीखालोखालचा महत्वाचा उद्योग आहे. य घटकाबाबत तर आपले मुळीच धोरण नाही असे म्हतले तरी वावगे ठरणार नाही. चरावू कुरणांची अन्य कामांसाठी राजरोस लूट करत पशुपालन व्यवसायाचा गळा घोटला जातो आहे. एवढेच नव्हे तर यामुळे पर्यावरणाचाही गंभीर प्रश्न आपल्यासमोर उभा ठाकलेला आहे.

म्हणजे आमचे अर्थपर्यावरण हे नैसर्गिक पर्यावरणाला संपवत चालले आहे त्यामुळे तेही आजारी आहे. आमची मानसिकताच जर त्याला जबाबदार असेल, धोरण आणि नियोजनबद्ध प्रामाणिक प्रयत्नांची जोड नसेल तर महाराष्ट्र आहे ते स्थान टिकवू शकणार नाही....अर्थव्यवस्थेचा मुळ पायाच ढिसुळ झालेला आहे....

त्याला भक्कम करत न्यायचे कि अजून पोखरत एक दिवस आपण सर्वांनीच भुईसपाट व्हायचे याचा निर्णय आपल्याला आताच घ्यावा लागेल.

3 comments:

  1. आप्पा- किती सुंदर आत्म परीक्षण आहे !
    बाप्पा - संजय एकदम विचारी माणूस आहे !
    आप्पा - आपला महाराष्ट्र जर प्रथम क्रमांकावर हवा असेल तर - आपण सर्वांनी कंबर कसून कामाला लागुया !सुरेश प्रभू यांनी नदी जोड प्रकल्प सांगितला होता - जर पं मोदी याना त्याचे कौतुक असेल तर संजय सरांनी आत्ताच अभ्यास करून त्यातील कच्चे दुवे पं मोदींना सांगितले तर , कदाचित संजय सराना पण उत्तम कार्य करण्याची संधी मिळेल - अगदी केंद्रात - भक्कम कल्पना असतील तर दिल्लीत नक्कीच वाव आहे !
    बाप्पा - संजय सरांचे विचार अत्यंत मूलभूत असतात आणि आजच्या घडीला महाराष्ट्राची नेमकी नाडी पकडून नवीन योजना नव्या सरकार पुढे ठेवायची हि सुवर्ण संधी संजय ने हुकवू नये असे प्रेमाने सांगावेसे वाटते -
    आप्पा - वेळ पडल्यास संजय आपले करियर आणि संसार बाजूला ठेवून आपल्या मराठी मातीसाठी नव्याने - पुनश्च हरी ओम करत - नवे नवे विचार आणि योजना सादर करत सर्वाना आश्चर्याचा धका देऊ शकतो - न जाणो - पं मोदी देशहितासाठी आमच्या संजयला केंद्रात अलगद ओढून नेतील

    बाप्पा - संजय , आम्ही तुझ्या मागे आहोत ! अर्थपूर्ण योजना मांडल्या तर त्याचे चीज होते का ? होईल का ?अजित दादा सारख्या घर खाउन घराचे वासे खाणाऱ्या लोकांचा आधार घेत हे सगळे घडवून आणायचे स्वप्न बघायचे का ? का उद्धवच्या बरोबर फरफट करत नुसतीच मराठी अस्मितेची ओरड करत पाच वर्षे ढकलायची ?
    आप्पा - उद्धवचा बापूस असताना मनोहर जोशींनी काय दिवे लावले ? मराठी बाण्याचा ओरडा करणारा आणि प्रबोधन कारांचा वारसा सांगणारा बाळ ठाकरे काय करू शकला ? शून्य भोपळा !
    बाप्पा - मग संजय राउतच्या तालावर नाचणारा उद्धव तरी काय दिवे लावणार ?
    आप्पा - तेच सांगतो - महाराष्ट्र आणि प्रथम क्रमांक - वगैरे नुसत्या गप्पा आहेत - !
    आमच्या संजयला संधी मिळाली तर तो मात्र अघटीत ते शक्य करून दाखवेल !

    ReplyDelete
  2. संजय भाऊ,

    अतिशय सुंदर विचार तुम्ही मांडला आहे. तुमचे खूप-खूप आभार.

    असेच छान-छान लिहित रहा.

    तुम्हाला आमच्या कडून अगदी मनापासून भरपूर शुभेच्छा!

    धन्यवाद!

    ReplyDelete
  3. संजय सोनावणी सर ,
    फारच छान !
    आपणास महाराष्ट्राच्या पुनर्बांधणीसाठी नक्कीच काम करता येईल
    खरे तर अनेक योजना राबवता येतील त्यासाठी आपल्या सारख्या प्रामाणिक आणि दूरदर्शी व्यक्तीची नितांत गरज आहे !आपण जर केंद्रात गेलात तर नाहीतर महाराष्ट्रात राहूनही उत्तम काम करू शकता !- तुमच्या कल्पक विचारांची महाराष्ट्राला गरज आहे
    निर्णय आपण घ्यायचा आहे !
    उशीर करून चालणार नाही - नाहीतर तुमचा उद्धव व्हायचा !

    ReplyDelete

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...