Friday, December 12, 2014

आमचे अश्रू....

आमचे अश्रू,
आमचे हास्य,
जोवर आमच्याच व्यक्तिगत व्यथावेदनांशी आणि
सुखांशी
निगडित आहेत
तोवर
आम्हाला गदगदून...आत्म्याच्या तळातून
डोळ्यातुनच नव्हे तर रोमारोमांतून
ढळणारे मूक अश्रू
आणि आभाळालाही
गदगदुन हसायला भाग पाडील
असले मुक्त हास्य कसे मिळणार? 


मिळेल...
फक्त.....
जरा स्वत:च्याही बाहेर पडून पाहू!

9 comments:

  1. आप्पा -हे काय रे बाप्पा - आज हातात काय आहे हे इतके सामान ?
    बाप्पा - अरे काही नाही , यादी आहे संजयला द्यायची आहे
    आप्पा - कसली यादी ?
    बाप्पा - बरेच जण म्हणतात की संजय रोमारोमातून ढाळणारे मूक अश्रू आज दाखवणार आहे !
    आप्पा - खरच की रे आणि सांगतो आहे की स्वतःच्या बाहेर पडून पाहू !-
    बाप्पा - मला असल्या कविता काही केले तरी समजत नाहीत असे मी सहज भेळ खाता खाता म्हणालो तर एकदम २५-३० लोक माझ्याभोवती जमले आणि मला सांगू लागले की संजयच्या कविता अशा का असतात ?त्यात गाडी सोडून आलेले २ पाणीपुरीवाले आणि एक भेळवाला पण होता
    आप्पा - कसा काय ?
    बाप्पा - अरे संजयच्या प्रत्येक वाक्यातले शब्द मोजून हे लोक तिकडम खेळतात आणि काय सांगू - जय भोलेनाथ !- संजयच्या कविताना यश मिळते आहे - एकामागून एक तीन वेळा यांना यश मिळाले - सगळे संजयची कविता कधी मिळते वाचायला - असे हपापून बघत असतात !
    आप्पा - बघ कशी मजा आहे ते !काव्य आणि मटका असेही नाते आहे ! कृष्ण आणि बासरी जसे आहे ना तसेच हे -
    बाप्पा - हे सुरु कसे झाले ?
    आप्पा - अहो आपला रतन खत्री ! - त्याला कविता आणि शब्द कोड्यांचा भयानक नाद !- त्याचे मन राखायला मग सगळ्या पंटर लोकांनी युक्ती केली - सगळेच कवी झाले -
    बाप्पा - कुणी कशावरही कविता करू लागले !पूर्वी कवीलोक पाउस , कोवळे ऊन , आई , माझे गांव
    किंवा ,चेंडू ,फुलपाखरू , हिरवळ असे विषय निवडत - त्याही पूर्वी दीड दा दीड दा - चालायचे ,
    आप्पा - पण आता रडक्या कविता डझनांनी होऊ लागल्या - जुन्या आठवणी चघळत बसायला म्हणे मजा येते !गझल म्हणतात म्हणे त्याला !
    बाप्पा - मोदिनापण शब्द कोड्याची आवड आहे असे ऐकले बाबा !
    बाप्पा - पण बघा तरी एक केवळ मटकावाला आणि कलेला किती प्रोत्साहन देत असे - गेला बिचारा !
    आप्पा - असे काही बाही बोलू नकोस - त्यांनाही आकडेमोडीची आवड आहे - पण असले आकडे नाहीत - एकावर कितीतरी शून्य !
    बाप्पा - मनमोहन तर म्हणे कायम तंद्रीत असायचे - जो काही आकडा सकाळी मनात धरला असेल त्यावर अभ्यास करून ते नेमका फिट्ट सांगत असत , पण किती उशिरा आणि हळू -
    आप्पा - मग लोक पिसाळले आणि त्यांनी नवीन कोरा माल आणला - मोदी ! अगदी खणखणीत बंदा रुपय्या !
    आप्पा - मोदीना तर कविता खूप आवडतात !सर्व थोरांच्या आवडी एकसारख्या असतात - नाही का बाप्पा - हे मात्र खरे - अटलजी,मोदी , आप्पा , आणि संजय !
    आप्पा - परवा मोदींनी योगा दिवस पाळायचे आवाहन कवितेतून केले आणि काय जादू झाली बघितलेस ना ? किती ओघवती वाणी -
    बाप्पा - त्या मोदीला म्हणावे आमच्या संजयची कविता बघ तरी -
    अप्पा - किती तहानभूक हरपून लिहितो -
    बाप्पा - थोडक्यात , भूक लागली की कान्हा मात्रे वेलांट्या खातो असेच म्हणायचे आहे ना ?
    आप्पा - आमच्या संजयचे शुद्धालेखन जरा कच्चे आहे जरा सांभाळून घ्या , आपला माणूस आहे !

    ReplyDelete
  2. ‘एक दिवस मी परमेश्‍वराला
    आईवरून शिवी दिली :
    तो लेकाचा फक्कन हसला.
    ... मी म्हटले,
    ‘साल्या! तुकडाभर भाकरीसाठी
    गाडीभर लाकडं फोडशील काय?
    चिंधुक नेसल्या आईच्या पटकुराने
    घामेजले हाडके शरीर पुसशील काय?
    बापाच्या बिडीकाडी
    भावाबहिणीची हाडके झिजवशील काय ?

    -केशव मेश्राम

    ReplyDelete
  3. संत नामदेवांची कर्मभूमी असलेल्या पंजाबातील घुमान येथे ८८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरणार आहे. सुदैवाने यंदाच्या निवडणुकीत कोणतेही वादविवाद झाले नाहीत. संतसाहित्याचे गाढे अभ्यासक आणि विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांची संमेलनाध्यक्षपदी निवड झाली असून निवडणुकीनंतर त्यांनी प्रथमच आपली भूमिका मांडली.
    ..........

    न्या. महादेव गोविंद रानडे यांनी प्रवर्तित केलेली, अगोदर ग्रंथकारांचे संमेलन म्हणून अवतीर्ण होऊन नंतर 'साहित्य संमेलन' म्हणून प्रस्थापित झालेली गोष्ट मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग बनली आहे. प्रतिवर्षी होणाऱ्या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी एखाद्या मान्यवर लेखकाची निवड होत असते. ही निवड सन्मानपूर्वक व्हावी, ती करताना वादविवाद होऊ नयेत, अशी अनेकांची सदिच्छा आहे. तथापि, ही निवड निवडणूक प्रक्रियेतूनच होत असल्याने या सदिच्छा केवळ मनात राहतात. पात्रता असूनही निवडणूक नको असलेले चांगले लेखक या भानगडीत पडतच नाहीत. काही जण पडून पाहतात, पण निवडणूक 'लढविणे' ही गोष्ट त्यांना मानवत नसल्याने पराभूत होतात. या प्रक्रियेत सुधारणा व्हायची तेव्हा होवो, पण तूर्त तरी त्याला पर्याय नाही.
    आता थोडेसे माझ्या बाबतीत. साहित्य आणि संस्कृती यांच्या व्यवहारात बरीच वर्षे खर्ची घातलेल्या माझे पहिल्यापासूनचे मत आहे की, संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीची व्यक्ती निवडताना तिच्या स्वत:च्या पात्रतेच्या विचाराबरोबर स्थळ आणि काळ यांचाही विचार करायला हवा. अशा प्रकारच्या विचाराला साहित्यशास्त्रात औचित्यविचार असे म्हणतात, हे जाणकारांना वेगळे सांगायची गरज नाही.
    १९९६ साली संत ज्ञानेश्वरांच्या समाधीला सातशे वर्षे पूर्ण होत होती. त्यानिमित्ताने त्या वर्षीचे साहित्य संमेलन श्रीक्षेत्र आळंदी येथे भरविण्याचे ठरले तेव्हा मला अर्थातच आनंद झाला; पण मला असेही वाटले की, या संमेलनाचे अध्यक्षपद संतसाहित्याच्या व विशेषत: ज्ञानेश्वरांच्या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकाला दिले जावे. तेव्हा वयाची ८० वर्षे ओलांडलेल्या डॉ. भा. पं. बहिरट यांचे नाव आम्ही सुचविले. त्यांच्या नावाला विरोध झाला, हेदेखील समजून घेता येण्यासारखे आहे; पण मुख्य प्रवाहातील काही संबंधितांनी 'कोण बहिरट?', 'हे काय संतसाहित्य संमेलन आहे काय?' असे प्रश्न उपस्थित केले. बहिरटांसारख्या ज्येष्ठ अभ्यासकाचा पराभव पाहण्याची आमचीही इच्छा नव्हतीच. त्यामुळे त्यांचे नाव आम्ही मागे घेतले. तथापि, संतसाहित्यासंबंधीचे घोर अज्ञान पाहून मला स्वत:स वाईट वाटले. ते दूर करण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेची स्थापना करून तिच्या माध्यमातून संतसाहित्य संमेलनांचे आयोजन करून पाहिले; पण या प्रकाराने मला हवा असलेला संतसाहित्य आणि आधुनिक साहित्य यांच्यामधील संवाद अपेक्षित प्रमाणात होत नाही असा अनुभव आला.

    ReplyDelete
  4. दरम्यान, ८८वे साहित्य संमेलन संत नामदेवांची कर्मभूमी असलेल्या पंजाबातील घुमान या गावी भरणार असल्याची बातमी आली. आता परत माझ्याविषयी सांगायचे झाल्यास साहित्यिकाचे महत्त्व संमेलनाच्या अध्यक्षपदावर अवलंबून असते, असे मला कधीच वाटले नव्हते व त्यामुळे ती माझी महत्त्वाकांक्षा नव्हतीच. या व्यासपीठाकडे मी भूमिका मांडण्यासाठी उपयुक्त व्यासपीठ म्हणून पाहतो. साहजिकच घुमानच्या संमेलनाचे अध्यक्षपद संतसाहित्याशी नाते असलेल्या व्यक्तीस मिळाले तर त्याचा उपयोग ही भूमिका मांडण्यासाठी करता येईल, अशी माझी धारणा झाली.
    मात्र याचा अर्थ असा अध्यक्ष केवळ कीर्तनकार किंवा प्रवचनकार असावा असा नव्हे. त्याला आधुनिक साहित्याची जाण हवी आणि या दोन प्रवाहांचे नाते सांगण्याची क्षमताही त्याच्यात हवी याबद्दलही मला संशय नव्हता. आत्मश्लाघेचा दोष पत्करूनही सांगतो, की हे काम मी करू शकेन असा विश्वासही मला वाटला. खरे तर हे काम मी गेली ३०-४० वर्षे करीत आलो आहे. अगोदर फुटकळ लेख लिहिल्यानंतर मी 'तुकारामदर्शन' हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात इतर काही गोष्टींबरोबर महाराष्ट्राने आधुनिक काळात प्रवेश केला तोच मुळी तुकोबांचे बोट धरून, असे दाखवून देण्यात मी यशस्वी झालो होतो. तुकोबांच्या परिप्रेक्ष्यातून महाराष्ट्राचा वेध घेताना मी 'लोकमान्य ते महात्मा' हा द्विखंडात्मक ग्रंथ लिहिला. तो आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास असला तरी 'तुकारामदर्शन'मधील सूत्रच या नव्या संघर्षांत कसे अनुस्यूत आहे हे मी दाखवले. हे सूत्र केवळ मराठी साहित्यापुरते मर्यादित नसून महाराष्ट्राच्या समाजजीवनाला पुरून उरले आहे, हेदेखील त्यातून आपोआपच ध्वनित झाले.
    महाराष्ट्राचा वेध प्रभावशाली व्यक्तींच्या माध्यमातून घेऊन झाल्यावर एकूणच महाराष्ट्राच्या जडणघडणीचा शोध घ्यावा, असे मला वाटले आणि महाराष्ट्र राज्यनिर्मितीच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने मी 'गर्जा महाराष्ट्र' ग्रंथ सिद्ध केला. त्यात मी सातवाहनपूर्व काळापासून १९६० पर्यंतच्या महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, भाषिक, सांस्कृतिक जडणघडणीचे विश्लेषण केले.
    माझ्या या सर्व उपद्व्यापाचा आधार संतसाहित्य हाच आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. हे लेखन चालू असताना मी महाराष्ट्रातील दलितांच्या आणि बहुजनांच्या राजकारणाची चिकित्सा करणारी 'उजळत्या दिशा' आणि 'शिवचरित्र' ही नाटकेही लिहिली.
    थोडक्यात काय, की महाराष्ट्र, मराठी संस्कृती आणि मराठी भाषा हा माझ्या आस्थेचा विषय आहे. माझी अल्पस्वल्प शक्ती पणाला लावून मी विषयाची तड लावीत आलेलो आहे व हे करताना मी महाराष्ट्राच्या संस्थात्मक व सार्वजनिक जीवनातही माझ्या परीने वावरतो. समन्वयाचा पुरस्कार करताना जरूर तेथे संघर्ष करण्यातही कमी पडलो नाही.
    हे मुद्दे विचारात घेऊनच मी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरलो. मी आजवर केलेल्या सेवेची पावती मला मिळेल याची खात्री बाळगून उतरलो आणि मतदारांनी माझी निराशा केली नाही. मराठी साहित्य संमेलन केवळ साहित्यापुरते आणि तेही ललित साहित्यापुरते मर्यादित असू नये. तो खुशालचेंडूच ठरू नये, असे मला वाटते. त्यात मराठी माणसांचा विचार केला जावा. साहित्याचा व भाषेचा विचार माणसांना वगळून करता येत नाही.
    तेराव्या शतकात संत नामदेवांनी पंजाबात मराठी भाषेचा आध्यात्मिक प्रभाव दाखवला. अठराव्या शतकातील मराठय़ांनी मराठी भाषेचा राजकीय प्रभाव दाखवला. त्याचीच पुनरावृत्ती सामाजिक, राजकीय क्षेत्रांत फुले आणि टिळक यांनी पुढच्या दोन शतकांत केली. या साऱ्या प्रक्रियेत महाराष्ट्र आणि पंजाब यांचे संबंध कसे राहिले हे मला सांगायचे आहे. जागतिकीकरणाच्या दबावाने आणि जातीय अस्मितांच्या उद्रेकाने गोंधळलेला, बावरलेला मराठी समाज मी पाहतो आहे. त्याला वगळून कोणत्या साहित्याचा विचार आपण करू शकतो? निदान घुमान येथे तरी तेवढय़ापुरते मर्यादित राहू नये, ही माझी भूमिका होती.
    ही भूमिका मान्य झाली असे निकालावरून म्हणता येते. आता ती मांडण्यात कसोटी माझी आहे; पण नामदेवरायांच्या या लेकरावर संतांची कृपादृष्टी असल्याचे मला माझ्या पूर्वजाने- तुकोबांनीच सांगितले असल्याने माझ्यावर दडपण नाही. 'लाडकी लेक मी संतांची। मजवर कृपा बहुतांची।' असे तुकोबांचे ते वचन आहे.

    ReplyDelete
  5. मराठीची दुर्दशा

    मराठी ही राजभाषा असली, तरी तिची दैन्यावस्था आणि उपेक्षा अद्याप थांबलेली नाही. आता राज्यातल्या प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या कोट्यवधी विद्यार्थ्यांना मातृभाषा मराठीचे नीट आकलन होत नसल्याचे धक्कादायक निरीक्षण महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. या संस्थेने राज्यातल्या सर्व जिल्ह्यातल्या निवडक शाळातल्या पाचवीच्या विद्यार्थ्यांची मराठी आणि अन्य विषयांच्या आकलनाचे व्यापक सर्वेक्षण केले. या संस्थेने दिलेल्या अहवालातले हे निष्कर्ष ज्ञान आणि उपयोजन विभागात मराठीची उपेक्षा होत असल्याचेच दर्शवणारे आहेत. ज्या विद्यार्थ्यांना मातृभाषा मराठीचे नीट आकलन होत नसेल, ते विद्यार्थी परकीय इंग्रजी भाषेचे ज्ञान कसे मिळवणार याचा विचार इंग्रजीचे भूत मुंडीवर बसलेल्या राज्यातल्या पालकांनी करायला हवा. या अहवालातल्या निष्कर्षानुसार 14 जिल्ह्यांची कामगिरी राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक तर पंधरा जिल्ह्यांची कामगिरी सरासरीपेक्षा मराठी विषयात कमी आढळली. मराठी विषयाच्या चाचणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 53 टक्के आणि गणिताची 50 टक्के निघाली. विशेष म्हणजे ग्रामीण भागातले विद्यार्थी अभ्यासात शहरी विद्यार्थ्यांच्याही पुढे असल्याचे निष्पन्न झाले. या संस्थेने मराठी विषयाचे विद्यार्थ्यांना असणारे ज्ञान आणि आकलन शोधायसाठी श्रवण, वाचन, शब्दसंपत्ती, कार्यात्मक व्याकरण आणि लेखन या बाबींची चाचणी घेतली होती. त्यातल्या बहुतांश विद्यार्थ्यांना व्याकरण समजत नसल्याचे आढळून आले. संख्याज्ञान, अपूर्णांक, संख्या आणि अपूर्णांकावरील क्रिया, मापन, व्यावहारिक गणित, भूमिती अशी चाचणी गणित विषयासाठी घेतली गेली. पण या विद्यार्थ्यांना हातच्याची गणिते सोडवण्यात अवघड जात असल्याचे आढळून आले. भागाकारात हे विद्यार्थी कच्चे होते. बेरजेमध्ये मात्र पक्के होते. या पहिल्याच राज्यव्यापी सर्वेक्षणातून पुढे आलेले निष्कर्ष हे महाराष्ट्रातल्या प्राथमिक शालेय शिक्षणाचा दर्जा अद्यापही सुधारला नसल्याच्याच जुन्या निष्कर्षावर अधिकच प्रकाशझोत टाकणारे ठरतात. शिक्षण तज्ञांनीही मातृभाषेतून घेतलेले शिक्षण हेच विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारे आणि विविध विषय समजायला सोपे ठरणारे असल्याचे वारंवार सांगितले असले, तरी प्रत्यक्षात मात्र महाराष्ट्र मराठीची पिछेहाटच सुरू आहे. या आधीही काही सामाजिक संस्था आणि संघटनांनी राज्यभरातल्या सरकारी प्राथमिक शाळेतल्या शिक्षणाच्या केलेल्या सर्वेक्षणात, निम्म्या चौथी/पाचवीच्या मुलांना वाचता येत नसल्याचे आणि गणिते सोडवता येत नसल्याचे नमूद केले होते. प्राथमिक शाळेतल्या मुलींच्या गळतीबाबतही या संस्थांच्या अहवालात गंभीर चिंता व्यक्त केली होती. राज्य सरकारकडे हे अहवाल आले आणि धूळ खात पडले. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे, असे राज्य सरकार सातत्याने सांगत राहिले. त्यासाठी समित्यांवर समित्या नेमल्या गेल्या. प्रत्यक्षात मात्र शिक्षणाचा दर्जा सुधारायसाठी अंमलात आणलेली तकलादू उपाययोजना अयशस्वी ठरल्याचेच या नव्या अहवालाने समोर आले आहे.

    ReplyDelete
  6. सरकारही जबाबदार
    प्राथमिक शिक्षणाच्या, मराठी विषयाच्या घसरलेल्या दर्जाला फक्त प्राथमिक शिक्षकच जबाबदार आहेत, असे सरसकट म्हणणे योग्य ठरणारे नाही. प्राथमिक शिक्षणाच्या खालावलेल्या दर्जाला सरकारही तितकेच जबाबदार आहे. प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात सलग दहा वर्षे एकच धोरण सरकारने अंमलात आणलेले नाही. दर पाच वर्षांनी नवे धोरण अंमलात आणायचे आणि प्राथमिक शिक्षणाचा खेळखंडोबा करायचा, असा उद्योग गेली 50 वर्षे सुरू आहे. सरकारी शाळेतल्या शिक्षकांचे पूर्ण वेतन सरकार देते. शाळांसाठी इमारतीही सरकारीच आहेत. पण, राज्यातल्या हजारो शाळांना अद्यापही इमारती नाहीत. आदिवासी आणि दुर्गम भागातल्या हजारो शाळा भाड्याच्या जागेत, मंदिरात किंवा चावडीत भरवल्या जातात. बहुतांश शाळांना स्वच्छतागृहे नाहीत. शाळांची झाडलोट आणि स्वच्छता विद्यार्थीच करतात. बहुतांश शाळांना ग्रंथालय, प्रयोगशाळांच्या सुविधा नाहीत. शैक्षणिक वातावरण नाही. क्रीडांगण नाही. अशा स्थितीत मूलभूत सुविधा सर्व शाळांना उपलब्ध करून द्याव्यात, असे सरकारला वाटत नाही. राज्यात नेहमी नगरपालिका आणि महापालिकाच्या प्राथमिक शाळांतल्या समस्यांचीच चर्चा होते. पण, अधिक संख्येने असलेल्या ग्रामीण भागातल्या प्राथमिक शाळांच्या समस्या सोडवल्याच जात नाहीत. ग्रामीण भागातल्या प्राथमिक शाळात लाखो विद्यार्थी दररोज दोन ते पाच किलो मीटरची पायपीट करत येतात आणि परत जातात. पुणे, रायगड, अमरावती, ठाणे या जिल्ह्यातल्या अनेक प्राथमिक शाळात ओढे-नाले ओलांडून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही हजारोंनी आहे. आपला जीव मुठीत धरून हे विद्यार्थी नद्या- नाले ओलांडतात. पण, सरकारला मात्र त्यांची काळजी वाटत नाही. वास्तविक प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्दीने शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या अडचणी सरकारने अग्रक्रमाने दूर करायला हव्यात. पण तसे घडत नाही. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा घसरलेला दर्जा या विषयावर चर्चा होते. पण, विद्यार्थी कोणत्या अशैक्षणिक वातावरणात शिकतात, कोणत्या परिस्थितीला तोंड देतात, ग्रामीण भागातल्या प्राथमिक शिक्षकांच्या समस्या कोणत्या, यावर मात्र सरकारही चर्चा करीत नाही, शिक्षणाचा दर्जा आणि शैक्षणिक सुविधांचा परस्परांशी संबंध आहे, ही बाब शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी लक्षात घ्यायला हवी. पहिली ते आठवी पुन्हा वार्षिक परीक्षा घ्यायचे नवे धोरण सरकार स्वीकारणार असल्याची चर्चा आहे. त्या आधी राज्यातल्या ग्रामीण भागातल्या सर्व शाळांची सरकारने पाहणी करून किती शाळा उघड्यावर भरतात, किती शाळांना इमारती, अपुऱ्या वर्ग खोल्या आहेत. किती विद्यार्थी आणि वर्ग एका खोलीत कोंबले जातात, याचाही अभ्यास करायला हवा. ग्रामीण भागातल्या आदिवासी, श्रमिक आणि शेतमजुरांच्या, शहरी भागातल्या गरिबांच्या मुलांना खाजगी शाळातले शिक्षण परवडणारे नाही. त्यांना सरकारी आणि निमसरकारी शाळांशिवाय पर्याय नाही. अशा स्थितीत राज्यातल्या प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारायसाठी नव्या योजना अंमलात आणतानाच, या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वातावरण मिळावे, निदान शाळांच्या इमारती मालकीच्या असाव्यात, एवढी तरी उपाययोजना सरकारने अग्रक्रमाने करायला हवी. अन्यथा या पुढच्या काळातही मराठीसह शिक्षणाचा दर्जा सुधारायसाठी नव्या योजना अंमलात आणल्या, तरीही त्याचा विद्यार्थी आणि प्राथमिक शिक्षणावर फारसा परिणाम होणार नाही.

    ReplyDelete
  7. लिहा वाचा यांनी अतिशय आशयपूर्ण लिहिले आहे
    त्यांचे नाव जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे
    ते कळू शकेल का ? किंवा हा एक ठराविक विचाराचा ग्रुप आहे किंवा मंडळ आहे ?

    ReplyDelete
  8. लिहा वाचा यांनी छान लिहिले आहे ,
    महाराष्ट्रातील शिक्षणा बाबतचा वृत्तांत थोडेसे चिंतेत टाकणारा निश्चित आहे
    थोडासा वेगळ्या प्रकारे विषयाचे मुल्यांकन करावेसे वाटते - कदाचित कोणाला त्याला जातीयतेचा वास येईल पण तसा अजिबात हेतू नाही हे प्रथमच सांगावेसे आहे - आमच्या वडलाना जे मराठी धडे होते त्यात अनेक विषय असत - भो पंचम जॉर्ज अशा कविता असत - नंतर संपूर्ण व्याकरणही असे - तोच आणि तसाच रस्ता आमच्या कवितांचा आणि धड्याचा !
    श्रावण बाळ आणि - हा आई गे दीर्घ सोडूनी हाक - तो पडला जाउनि झोक -
    ये राजाच्या श्रावणी करुणा वाणी - डोळ्याला आले पाणी
    त्या ब्राह्मन्पुत्रा बघुनी - शोकाकुल झाला अवनी - - - -"
    अशी कविता होती - तसेच सतारीचे बोल सारखी सुंदर कविता होती -
    शिकवणारे ब्राह्मण असल्यामुळे शब्दोच्चार शुद्ध आणि स्पष्ट असत -
    पण आजकाल मुळातच कुठेतरी काहीतरी चुकते आहे असे वाटते !
    आरक्षणामुळे हे घडते का ? असे लिहिले तर अनेकांच्या कपाळाला आठ्या पडतात
    पण शेवटी शिकवण्याताला जिव्हाळा आतला असेच म्हणावेसे वाटते - त्यामुळे पेपर तपासण्याचे ओझे वाटू लागणारे शिक्षक निर्माण झाले -अभ्यासक्रम शेवटी शेवटी उरकला जाऊ लागला - शिक्षकाला शालेय शिस्तीतून बाहेर काढून , सेन्सस आणि निवडणुका यांचे ओझे दिले जाऊ लागले -
    मन लाऊन शिकवणे हे अशक्य होत गेले आणि नुसते मार्कांचे रकाने भरणारी प्रगती पुस्तके भरली जाऊ लागली
    लोकशाहीचा आपण उदो उदो करतो -
    परवाच आम्ही चीनला जाउन आलो -
    आपल्या सारखीच प्रचंड लोकसंख्या ! पण तिथले रस्ते पाहिले की मन अचंबित होते - भू संपादन आणि आवश्यक सेवांची निर्मिती यात चीन कितीतरी पुढे गेला आहे - आपण आजही भगवे आणि हिरवे - निळे झेंडे घेऊन नाचत आहोत - मान मोडून काम करण्याची आपली वृत्तीच नाही -
    आजही मराठी लेब्र्पेक्षा ठेकेदार ओरिसातील किंवा बंगाल बिहार राजस्थानी लेबर पसंत करतो त्याचे कारण काय असावे ?
    मराठी माणूस ? - आपण फक्त गर्दीच्या मागे धावतो का ?
    येथे जतीचे समर्थन करण्याचा उद्देश नाही पण शिकवण्याचे पिढ्यान पिढ्या वेड असलेला ब्राह्मण समाज हा दूर ठेवत कांबळे शेळके आणि निकाळजे वाघमारे ज्या वेळेस ग म भ न शिकवू लागले तेथेच आपण चूक केली का ? आपण काय चुकलो ? सत्य कटू असतेच पण ते मान्यही करायची तयारी नसेल तर काय करणार ?- डॉ आंबेडकर हेही शिक्षणाच्या आणि व्याकरणाच्या बाबतीत अगदी काटेकोर होते -

    ReplyDelete
  9. दुसरा विचार केला तर असे दिसते की जन्मजातच ब्राह्मण वर्गाला उच्चार आणि जिभेचे वळण यात संस्कृत मुळे थोडेसे झुकते माप दिले जाते त्याचा फायदा समाजाला मिळण्याची योजना खरेतर आखता आली असती , पण थोडासा ब्राह्मणद्वेष आड आला का ?
    तिसरा मुद्दा , हे लिहा वाचा यांचे निरीक्षण मराठी शालांचेच आहे का इंग्रजी शाळांचे आहे ? कारण आज सुशिक्षित उच्चवर्ग इंग्रजी शिक्षणाच्या माध्यमातून शिकत असतो - त्यांचा आपल्या मराठी शाळांच्या दर्जाविषयी भ्रमनिरास झाला आहे !शिक्षक हा पुढची पिढी घडवत असतो असे जर मानले तर मग ?
    सर्व सत्ता आज इतकी वर्षे सर्व धर्म समभाव मानणाऱ्या आणि जातिभेद न मानणाऱ्या काँग्रेस च्या हातात होती शिक्षणाचे आराखडे विषयांची निवड आणि आरक्षण हे सर्व त्यांच्या सत्तेचा परिपाक आहे सर्व महामंडळे त्यांच्या ताब्यात असताना त्यांना समाजाला वेगळे आदर्श शिक्षण का देता आले नाही
    पूर्वी इंग्रजांच्या काळात सुद्धा शाळा मंदिरातून किंवा एखाद्या सरदाराच्या वाड्यात भरत असत !चितळे मास्तर हे पु ल देशपांडे यांनी रंगवलेले चित्रण सर्वांगसुंदर आहे आणि बरेच काही सुचवणारे आहे -असे शिक्षक आता होत नाहीत हे सत्य आहे - ती पोट तिडीक आणि कळकळ कुठे आणि कशामुळे हरवली ? तुटपुंजा पगारात पोटाला चिमटा काढून शिकवणारे शिक्षक काळाच्या पडद्या आड गेले आणि संप करणारे आरक्षित शिक्षक आले -
    कधीतरी असे वाटू लागते की आपला देश कधीच सुधारणार नाही !
    एकूण जातीवार अवलोकन केले तर असे दिसते की
    ब्राह्मण जातीने आपले धोरण बदलले , मराठी माध्यमाची आरक्षणामुळे पडझड झाल्यावर त्यांनी इंग्रजी शाळांचा अवलंब केला -
    मराठी शिकवणारे आणि शिकणारे , आणि सरकारी शिक्षण धोरण आखणारे सर्वच बहुजन - त्यामुळे जे घडत आहे त्याला बहुजनाच जबाबदार आहेत हे उघड आहे !
    टिळक , आगरकर किंवा महात्मा फुले , यांनी प्रथम भाड्याच्या जागेत शाळा सुरु केल्या - आणि संस्कारांनी भरलेले मराठी आणि इंग्रजी शिक्षण दिले -
    त्यात ते कुठेह्ही कमी पडले नाहीत एक संस्था चालवताना त्यांनी अफाट त्याग केला - आज काय दिसते - शिक्षण हा राजरोस वात्मारिचा धंदा झाला आहे आणि वाटमारी करणारे कोण - नवले , पतंगराव कदम , डी वाय पाटील , असे एकाच पक्षाचे लोक - कुणी ज्ञानेशारांवर प्रेम दाखवत आपला विस्तार केला तर कुणी सत्तेच्या खुर्चीत बसून आपले किल्ले बांधले - टिळक आगरकर फुलेंची निष्ठा पार हद्दपार झाली - राज्य कोणाचे ? त्यांचेच !
    आता दोष कोणाला देणार ?
    सांगा लिहा वाचा - जरा स्पष्ट उत्तर दिले तर बरे होईल !
    आपण लेख अतिशय उत्तम लिहिला आहे - पण नेमके दोषावर बोट ठेवताना आपण कमी पडता !

    ReplyDelete

शेरशहा सुरी: एक कुशल प्रशासक

  शेरशहा सुरीने हुमायूनचा पराभव केला आणि त्याला भारताबाहेर हाकलले. दिल्लीत आता कोणी शासक उरला नसल्याने शेरशहाने स्वत:ला दिल्लीचा सम्राट घोषि...