Wednesday, January 14, 2015

बाजार-बुणगे आणि सदाशिवराव भाऊ

सदाशिवराव भाऊवरचा सर्वच इतिहासकारांनी (संजय क्षीरसागर वगळता) नि कादंबरीकारांनी केलेला गंभीर आरोप म्हणजे बाजार-बुणगे आणि यात्रेकरुंचे अंगावर लादुन घेतलेले ओझे. केवळ यामुळे मंदावलेली सैन्याची वाटचाल. पानिपती त्यांच्या सुरक्षेसाठी अडकुन पडण्याची नामुष्की व त्यातुनच ओढवलेली उपासमारी. म्हणून पानिपतच्या पराजयाचे हेही एक कारण.

दीर्घकालीन व लांब अंतराची युद्धे बाजार-बुणग्यांशिवाय मुळात होऊच शकत नाही. त्यासाठी आधी बाजार-बुणगे म्हणजे नेमके काय हे समजावून घ्यायला पाहिजे.

बाजार म्हणजे: सैन्याला लागणारे खाद्यपदार्थ, कपडे, वस्तू, धान्य वगैरे विकणारा वर्ग.

बुणगे म्हणजे: बिगरलढवैय्ये पण सैन्यास सेवा पुरवण्यासाठे आवश्यक असलेला वर्ग.

सैन्याला अनेक सेवा लागतात. १) सैनिकांचे हिशोब ठेवणारे कारकुन. २) तंबू, तोफा, दारुगोळा, अन्न-धान्य वाहून नेणारे गाडीवान. ३) तलवारी-ढाली यांची मरम्मत व अन्य कामांसाठी लागणारे लोहार/सुतार/पाणके-पखालवाले/शिंपी वगैरे. ४) तंबु उभारणारे/खंदक खोदणारे. ५) घोड्यांचा खरारा करणे, पाणी दाखवणे इ. सेवा करणारे. ६) वैदू, ७) करमणुकीसाठी शाहीर, तमासगीर वगैरे. ८) जखमी/मृत सैनिकांना युद्धभुमीवरुन हलवणारे. ९) दळण दळणारे-दळणा-या. १०) या व्यतिरिक्त जोतिषि आलेच! यात अजुनही अनेक सेवा आहेत.

इंग्रजी कवायती सैन्यात अठराव्या शतकात एका सैनिकामागे ३ बुणगे असे प्रमाण असे, त्यात बाजार धरलेला नाही. पानिपत युद्धात, हेच प्रमाण गृहित धरले तरी ८०,००० सैन्यामागे ३ बुणगे गृहित धरले तर ते होतात २,४०,०००. म्हणजे सारे मिळुन झाले ३ लाख वीस हजार.  भाऊच्या तळावरही दोन-अडीच लाख बुणगे होते असे इतिहासकार म्हणतात. या प्रमाणाला अचाट कसे म्हणता येईल? बुणग्यांखेरीज युद्धे अशक्यप्राय आहेत हे वरील बुणग्यांची कामे पाहत सहज लक्षात येईल.

मग भाऊला फुकाचा दोष देणा-या इतिहासकारांची मती कोठे गेली होती? इतिहासकार आणि कादंबरीकार काय फक्त भाऊलाच (आणि होळकरांना) झोडपायलाच जन्माला आले होते कि काय?

बाजार-बुणगे हा शब्द आपण उपहासाने वापरतो...पण ते सैन्याचेच अपरिहार्य भाग होते. भाऊबरोबर ५-६ हजार यात्रेकरु होते आणि पानिपतपर्यंत पोहोचेपर्यंत त्यातील निम्म्याहुन अधिक आपापल्या तीर्थयात्रा करत विखुरले होते. त्यामुळे यात्रेकरुंवर विशेष दोष टाकता येत नाही.

11 comments:

  1. पानिपतची पाहिली लढाई.....

    हे युद्ध बाबर व इब्राहीम लोदी यांमध्ये दिल्लीच्या तक्ताकरिता २१ एप्रिल १५२६ मध्ये झाले. उत्तर भारतात मुसलमानी राजवट सुरू जाल्यापासून बाबरपर्यंत जे सुलतान झाले ते बहुतेक अफगाण होते, मोगल नव्हते. धर्माने हे सर्व एक असले, तरी राज्यतृष्णेत एक नव्हते, खल्जी, तुघलक, सय्यद आणि लोदी या वंशांतील सर्व सुलतान भारतात आपले राज्य कायम टिकावे या प्रयत्नात होते. यामुळे मोगलांच्या भारतावर होणार्‍या स्वार्‍यांना हे सुलतान सतत विरोध करीत आले. बाबर, तुर्क व मोगल या दोन रक्तांचा वाररसदार होता. त्याने अफगाणिस्तान व मध्य आशिया या दोन प्रदेशांत आपले राज्य स्थिर करण्याचा प्रयत्न केला; पण त्यात त्यास म्हणावे तसे यश आले नाही. म्हणून त्याने आपले लक्ष भारताकडे वळविले. भारतात आपले राज्य स्थिर करण्याच्या उद्देशाने त्याने भारतावर पाच-सात स्वार्‍या केल्या. त्या सर्व स्वार्‍यांत त्यास उणे अधिक यश मिळत गेले. यामुळे भारतात राज्य स्थापण्याचा त्याने पक्का निश्चय केला. त्याची शेवटची स्वारी याच हेतूने झाली होती. त्या वेळी भारतात लोदी घराण्यातील इब्राहीमचे राज्य चालू होते. या इब्राहीम लोदीला काही प्रतिस्पर्धी होते. त्यांपैकी एक त्याचा चुलता आलमखान लोदी व दुसरा पंजाबचा सुभेदार दौलतखान लोदी. या दोघांनीही बाबरास पत्र लिहून कळविले, की ‘आम्हास गादीवर बसविण्यास मदत केली, तर लोदी राजवटीच्या ताब्यात असलेल्या प्रदेशांपैकी काही प्रदेश आपणास देऊ व आपली अधिसत्ता मानू’. बाबर आपल्या हेतूच्या पूर्तीसाठी अशा संधीची वाटच पहात होता. ही पत्रे जाताच त्याने भारतावर स्वारी करण्याचे ठरवले. तो आपले सैन्य घेऊन भारतात आला. या वेळी दौलतखान व त्याच्या एक मुलगा दिलावरखान यांमध्ये वितुष्ट येऊन तो बाबरास मिळाला होता. बाबर भारतात आला असे पाहून इब्राहीमखान लोदी हा त्याच्याशी लढाई देण्याची तयारी करू लागला. बाबर तोपर्यंत पानिपतच्या जवळ पोहोचला होता; देव्हा इब्राहीम लोदी हाही पानिपतजवळ बाबाराशी लढाई करण्याच्या उद्देशाने आला. दोघांचे सैन्य पानिपतजवळ तळ देऊन राहिले. सु. आठ दिवस किरकोळ चकमकीशिवाय लढाई अशी झाली नाही; पण २१ एप्रिल १५२६ रोजी दोघांची पानिपतच्या मैदानावर मोठी लढाई झाली. या लढाईत इब्राहीमखानाच्या बाजूस एक लाख शिफाई होते, तर बाबारकडे सु. २५ हजार लोक होते असे म्हणतात; पण बाबराने या लढाईत आपल्या सैन्याची अशा रीतीने मांडणी केली की, लढाई सुरू होताच बाबरच्या सैन्याने इब्रहीमच्या सैन्याला पाठीमागून जाऊन घेरले. यामुळे इब्राहीम लोदीच्या सैन्यात गोंधळ उडाला. इब्राहीम शौर्याने लढला, तरी तो मारला गेला. पुढे त्याच्या सैन्याचा सर्वस्वी नाश होऊन बाबरास जय मिळाला. अशा तर्‍हेने जय मिळविल्यावर बाबरने दिल्लीस जाऊन राज्य विस्तृत करण्याचा प्रयत्न केला. एवंच आलमखान व दौलतखान दोघांच्याही तोंडांस पाने पुसली गेली.

    ReplyDelete
  2. पानिपतची दुसरी लढाई.....

    हे युद्ध एका बाजूस अकबर व त्याचा पालक बैरामखान व दुसर्‍या बाजूस हेमू (हीमू) यांमध्ये दिल्लीच्या गादीसाठी ५ नोव्हेंबर १५५६ रोजी झाले. बाबरनंतर हुमायून उत्तर भारतात राज्य करीत असता शेरशाह सूरीच्या पुढे त्याचे काही एक न चालून त्याला राणात आश्रय घ्यावा लागला; पण तेथे तो स्वस्थ बसला नव्हता. त्याचे लक्ष भारतातील घडामोडींवर होते. १५५४ मध्ये शेरशाहचा मुलगा इस्लामशाह वारल्यानंतर त्याच्या वारसांत गादीविषयी भांडण सुरू झाले. या भांडणात सूरवंशाची राज्ययंत्रणा ढिली झाली आहे असे पाहून हुमायून अफगाणिस्तानमार्गे हिंदुस्थानात आला व त्याने १५५५ मध्ये दिल्ली सर केली; पण तेथे त्याचा जम बसण्यापूर्वीच तो मरण पावला. यामुळे सूरवंशातील एक वारस मुहम्मद आदिल (१५५४-५६) याने उचल खाल्ली व त्याने चुनार येथे आपले लहानसे राज्य स्थापन केले. त्या वेळी त्याच्या सहाय्यकांतील हेमू नावाचा एक कर्तबगार हिंदू महत्पदावर चढला होता. त्याने दिल्ली हस्तगत केली तेव्हा त्यास वाटले की, आता आपण राजा झालो. त्याने आपल्या नावाची नाणीही पाडली होती, असे म्हणतात. या वेळी अकबर व त्याचा पालक बैरामखान जलंदर येथे असता त्यांस ही बातमी लागली; तेव्हा ते दिल्ली जिंकण्याच्या उद्देशाने पानिपतजवळ आले. हेमूस ही बातमी समजताच तोही आपल्या सैन्यासह पानिपतजवळ आला. हेमूपाशी १,५०० हत्ती व १ लाख सैन्य होते अशी वदंता आहे. अकबराजवळ त्या वेळी फक्त २० हजार सैन्य होते. अशा स्थितीत पानिपतच्या मैदानावर ५ नोव्हेंबर १५५६ रोजी दोन्ही सैन्यांची गाठ पडली. हेमू फार त्वेषाने लढला. अकबराचा पराभवच व्हावयाचा; पण हेमूच्या डोळ्यास एक बाण लागला व तो पकडला गेला. अकबराने त्याचा शिरच्छेद केला. अकबराने ही लढाई जिंकली.

    ReplyDelete
  3. पानिपतची तिसरी लढाई.....

    १४ जानेवरी १७६१ रोजी मराठे व अफगाण यांत झालेले युद्ध. अठराव्या शतकाच्या आरंभी औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दक्षिण प्रायः निर्वेध झाली. त्यानंतर उत्तरेस दिल्ली दरबारात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित करावयाचे हे मराठी राज्याचे जण सूत्रच होऊन बसले. ‘चलो दिल्ली’ या सूत्रानुसार पहिल्या बाजीराव पेशव्याने नर्मदा ओलांडून गुजरात, माळवा, बुंदेलखंड या भागांत संचार केला. त्याने व त्याच्या फौजांनी मोगली राजधानी दिल्ली गाठली. दक्षिणच्या सहा सुभ्यांची सुखत्यारी मागून तो स्वस्थ बसला नाही. त्याने नर्मदा ते चंबळपर्यंतच्या मुलखाची मागणी केली. १७४१ मध्ये या जहागिरीच्या सनदा बाळाजी बाजीराव पेशव्यास मिळाल्या. पुढील दहा वर्षांत राजस्थान, आग्रा, गंगा-यमुनेचा दुआब आणि बंगाल येथील राजकारणात मराठ्यांनी प्रवेश मिळविला.

    अशा रीतीने मराठे मोगल बादशाहीची सूत्रे हातात घेत असता, त्यांना एक नवाच जबरदस्त शत्रू निर्माण झाला. हमदशाह अबदाली १७४८ पासून हिंदुस्थानवर स्वार्‍या करू लागला होता. त्याने १७५१ च्या अखेरीस लाहोरपर्यंत येऊन पंजाबचा काही भाग बळकाविला. आता हा राजधानीवर येतो की काय, या भीतीने बादशाहाने त्याचा प्रतिकार करण्याचे वजीरास सुचविले आणि वजीराने १७५२ च्या मार्च पहिन्यात मराठे सरदारांशी करारनामा केला. त्यांच्यावर संपूर्ण बादशाहीचे संरक्षण सोपविले गेले.

    अबदालीन १७५७ मध्ये खुद्द राजधानीच गाठली. दिल्ली, आग्रा, मथुरा, वृंदावर लुटून अपार संपत्ती त्याने मिळविली आणि पंजाबात आपले अधिकारी नेमले. त्याची पाठ फिरते न फिरते तोच राघोबाचे हाताखाली मराठ्यांच्या फौजा चालून येऊन त्यांनी अबदालीची ठाणी उठविली आणि बादशाहाच्या वतीने पंजाबचा बंदोबस्त आरंभिला; पण अबदाली स्वस्थ बसणारा नव्हता. १७५९ च्या नोव्हेंबरात मोठ्या फौजेनिशी तो पंजाबात घुसला आणि मराठ्यांची ठाणी त्याने हस्तगत केली. रोहिल्यांना घेऊन दिल्लीनजीक शिंद्यांच्या फौजेस त्याने गाठले. या लढाईत दत्ताजी शिंदे गारद झाला आणि शिंद्यांच्या फौजेने रणातून पळ काढला. मल्हारराव होळकर मदतीस धाऊन आले; पण आता वेळ निघून गेली होती. होळकरांचा गनिमी कावा अबदालीपुढे कुचकामी ठरला.

    पेशव्यांकडे बातमीदारांची पत्रे येऊ लागली की, वेळ आणीबाणीची आली आहे; हिंदुस्थानातील आपला अंमल उठला, अबदाली दिल्लीस येऊन पोहोचला आणि त्याने पंजाब, दिल्ली प्रदेश व्यापला. दुआब, आग्रा व राजस्थानातील सर्व राजेरजवाड्यांकडे त्याचे वकील रवाना झाले. आतापर्यंत केलेली सर्व कमाई फुकट गेली. रोहिले अबदालीस सामील झाले. शिंदे-होळकरांचा पाडाव झाल्यापासून आपल्या फौजांनी घीर सोडला आहे आणि शत्रूला गर्व चढला आहे. उत्तरेत जी बिकट समस्या निर्माण झाली, त्यांची चर्चा करण्याकरिता पेशव्याने आपल्या सरदारांना बोलाविले. एक आठवडामर ऊहापोह होऊन असे ठरले की, सदाशिवरावभाऊने उत्तरेत जाऊन शत्रूचा परिहार करावा. तेरा हजार निवडक हुजरात, बारा हजार सरदारांची फौज, इब्राहीमखान गारदीने तयार केलेले पाश्चात्त्य पद्धतीने लढणारे आठ हजार पायदळ आणि जंगी तोफखाना घेऊन १६ मार्च १७६० रोजी भाऊ विश्वासरावासह उत्तरेची वाट चालू लागला. १२ एप्रिलला विश्वासरावासह त्याने नर्मदा ओलांडली आणि उत्तरेतील हिंदू, राजपूत, जाट, बुंदेले तसेच राजेरजवाडे आणि मुसलमान नबाब, अमीर-उमराव या सर्वांना बादशाहीच्या रक्षणार्थ एकत्र येण्याचे आवाहन केले.

    दिल्ली दरबारात मराठ्यांना अनुकूल असा एक पक्ष होता. मराठ्यांच्या मदतीने बादशाही चालवावी असे या पक्षाचे मत होते. पण मराठ्यांच्या उत्तरेतील राजकारणामुळे तसेच राजपूत, जाट यांच्या भांडणांत पडल्यामुळे दिल्ली दरबारात मराठ्यांना विरोध वाढला व द्वेषप्रेरित होऊन निजाम, जयपूरचा माधोसिंग, जोधपूरचा बिजेसिंग, नजीबखान व त्याचा गुरुतुल्य सहकारी शाह वलीउल्लाह यांनी अबदालीने मराठ्यांची खोड मोडावी, म्हणून त्यास निमंत्रण दिले. मराठ्यांशी सहकार्य करण्यास कोणी पढे येईना. राजस्थान, बुंदेलखंड येथील राजे, नजीब सोडून रोहिल्यांपैकी इतर सरदार व अयोध्येचा शुजाउद्दौला आपल्या साह्यास येतील, अशी खोटी आशा भाऊस वाटत होती; पण सर्व फोल ठरले, त्याला एकाकी शत्रूला तोंड द्यावे लागले. परख्या अबदालीला एतद्देशीय मदतनीस मिळाले; पण अबदाली काही झाले तरी येथे राहणार नसल्याने शेवटी आपणच सत्ताधारी होऊ, उलट मराठे सत्ताधारी झाल्यास आपणावर बंधने येतील, या विचाराने भाऊच्या मदतीस कोणी धाऊन आले नाहीत.

    ReplyDelete
  4. वाटेत जमीनदारांचे दंगे व अकाली पाऊस, या कारणाने चंबळ नदी ओलांडून आग्र्यास पोहोचण्यास भाऊच्या फौजेस तीन-साडेतीन महिने लागले. आग्र्याच्या दक्षिणेस १८ जूनला शिंदे-होळकरांच्या भेटी झाल्या. भाऊचा पहिला बेत आग्र्याजवळ यमुनापार करून अंतर्वेदीत उतरून शत्रूस गाठावयीचा होता; पण पाऊसकाळ लवकर सुरू झाला आणि यमुना दुथडी भरून चालली. बोटींचा पूल बांधून नदी ओलांडावयाचा विचार भाऊस सोडून द्यावा लागला. १४ जुलैस फौजा आग्र्यास पोहोचल्या. २१ तारखेस एक तुकडी राजधानी दिल्ली काबीज करण्याकरिता निघाली. २ ऑगस्टला राजधानीचे शहर मराठ्यांच्या ताब्यात आले.

    दोन्ही फौजांमध्ये यमुना भरून चालली होती व ती अडीच-तीन महिने उतरण्याचा संभव नव्हता. तेव्हा वाटघाटीने काही निकाल लागतो की काय, हे पाहण्याकरिता बोलणी सुरू झाली; पण ती निष्फळ ठरली. शुजाउद्दौलाच्या मार्फतीने सूचना आली की, बिहारमध्ये जाऊन बसलेला दुसर्‍या आलमगीराचा पुत्र शाह आलम यास गादीवर बसवावे आणि आपणास वजीर नेमून दिल्लीचा कारभार चालवावा. अबदाली आणि मराठे या दोघांनी आपआपल्या देशांत परत जावे. शुजा या वेळी अबदालीस सामील होऊन, शत्रूच्या छावणीत दाखलही झाला होता. त्याने सुचविलेल्या अटीस अबदालीची कितपत संमती होती, हे कळण्याचा मार्ग नव्हता. अबदाली हिंतुस्थानात येऊन जवळ-जवळ आठ महिने झाले होते. नजीब हा त्याचा मुख्य सहाय्यक आणि मराठ्यांविरुद्ध उभारलेल्या कारस्थानाचा मुख्य सूत्रधार होता. नजीबाच्या संमतीशिवाय आता तह होतो कसचा; पण कदाचित शत्रुपक्षात फाटाफुट झाल्यास पहावे याकरिता भाऊने शुजाशी बोलणी चालू ठेवली. या वाटाघाटीतून निष्पन्न तर काही झाले नाही, उलट आपापसांतील वैमनस्यामुळे आणि स्वार्थामुळे जाटांच्या सर्व मागण्या मराठ्यांनी मान्य केल्या तरी, वजीर, गाझीउद्दीन आणि सुरजमल जाट भाऊस येऊन मिळाले नाहीत. जाटाने या संघर्षातून अंग काढून ध्यावे, हा त्याचा कृतघ्नपणाच होता. ग्वाल्हेर, भरतपूर, आग्रा हा जाटांचा मुलूख. ज्या प्रदेशांत मोहीम चालवावयाची, तेथील जमीनदारांचे साह्य मराठ्यांना आवश्यक होते.

    अयोध्येच्या शुजाबद्दल भाऊस मोठी आशा वाटत होती. शुजास आपल्या बाजूस वळवून घेण्याबद्दल त्याने गोविंदपंत बुंदेल्यास पुनःपुन्हा लिहिले; पण भाऊंच्या पत्रांचा उपयोग न होता शुजा अबदालीस सामील झाला. रोहिले सरदार, नजीब आधीच त्यास मिळाले होते, याउलट एकही हिंदू राजा, राजपूत, जाट, बुंदेल भाऊस सामील न होता प्रकरणाचा निकाल कसा लागतो याची वाट पहात बसले. सर्व हिंदुस्थान एक होऊन पठाणांस विरोध करावा, या भाऊच्या हाकेस साथ मिळेना. अबदालीस पंजाब देऊन हे प्रकरण मिटविणे शक्य होते; पण पंजाब राखण्याची तर पेशव्याची आज्ञा. कोणत्या तरी एका पक्षाने माघार घेतल्याशिवाय अंतिम निर्णय लागावा तरी कसा? तहाच्या वाटाघाटी निष्फळ ठरल्या, तेव्हा युद्धाच्या दृष्टीने भाऊच्या हालचाली सुरू झाल्या.

    ReplyDelete
  5. दिल्ली घेतल्याने मराठ्यांचा दरारा वाढला खरा; पण वास्तविक काही फायदा त्यांच्या पदरात पडला नाही. थोडी कुचंबणाच झाली. गेली दोन-चार वर्षे चाललेल्या दोन्ही फौजांच्या हालचालीत राजधानी आणि भोवतालचा प्रदेश अगदी धुऊन निघाला होता; दंग्यामुळे साल मजकूरचा ऐवज येईना; संस्थानिक खंडणी देईनात; सावकार परागंदा झाले; कर्ज मिळेनासे झाले आणि इकडे भाऊचा खर्च तर बेसुमार वाढला. मोहीम सुरू झाल्यापासून दहा महिन्यांत पाऊण कोटीपर्यंत खर्च झाला आणि भाऊच्या हाती जेमतेम बावीस लाखंपर्यंत रक्कम येऊन पोहोचली.

    वाटाघाटीतून काही निष्पन्न होईना आणि नदीचे पाणी उतरण्यास अद्याप महिना होता. फौजेची तर आबाळ होत चालली. ही कोंडी फोडावयाची कशी याचा विचार करता, दिल्लीपासून १२० किमी. उत्तरेस, यमुनेच्या पश्चिम किनार्‍यावर असलेल्या अबदालीच्या कुंजपुरा ठाण्यावर हल्ला करण्याचे भाऊने ठरविले. कुंजपुरा लष्करी दृष्ट्या महत्त्वाचे ठाणे होते. अफगाण फौजांच्या उपयोगासाठी कुंजपुर्‍याच्या किल्ल्यात दहा हजार खंडी धान्य, चार-पाच हजार घोडी, दारूगोळा इ. सामग्री साठविण्यात आली होती. ८ ऑक्टोबर रोजी मराठी फौजांनी दिल्ली सोडली. १७ तारखेस इब्राहीमखानाच्या तोफांच्या मार्‍याने किल्ल्याच्या तटास खिंडार पाडले व त्यातून मराठी फौज आत घुसली. तेथे झालेल्या धुमश्चक्रीत मोमीनखान व किल्लेदार नजाबतखान आणि चार हजार रोहिले मारले गेले. ठाण्यांतील सर्व सामग्री मराठ्यांच्या ताब्यात आली. विशेषतः धान्याची कोठारे हातात आल्यामुळे मराठी फौजेचा हुरूप वाढला. दुसर्‍या दिवशी मराठा छावणीत दसरा मोठ्या थाटाने साजरा करण्यात आला. तथापि शत्रुच्या कारवाया चालूच होत्या.

    पीछाडीस शत्रू नदी ओलांडण्याचा प्रयत्न करील, असा अंदाज भाऊस आला नव्हता असे नाही; पण पुरामुळे तो एवढ्या लवकर नदी पार करील असे वाटले नाही. पण अबदाली काही सामान्य शत्रू नव्हता. मराठे उत्तरेकडे गेले, त्यांनी आपले मोक्याचे भक्कम ठाणे काबीज केले. काही न करात हे स्वस्थपणे पाहणारा तो नव्हता. नदी पार करावयाचे त्याने ठरविले. बागपताजवळ त्याने एक उतार शोधून काढला आणि २३ ऑक्टोबरपासून त्याचे अफगण सैन्या महाप्रयासाने दुआबातून नदीच्या पश्चिम किनार्‍यावर उतरू लागले. या ठिकाणी शत्रूस अटकाव करण्याकरता मराठ्यांची चौकीसुद्धा नव्हती. नदीचे जोराचे वाहते पाणी, चिखल, दलदल यास न जुमानता व सु. १,५०० सैनिक गमावून तीन दिवसांत सर्व सैन्य उतरून यमुनेच्या पश्चिम तीरास आले आणि त्याने मराठ्यांचा दक्षिणेत जाण्याचा रस्ता रोखला. भाऊचे पायापासून दळणवळण तुटले. अबदालीने मराठ्यांवर मात केली.

    ReplyDelete
  6. शत्रूने बागपतानजीक नदी ओलांडली, ही खबर कुरुक्षेत्राच्या मार्गावर असलेल्या भाऊस २५ ऑक्टोबरला मिळाली. २८ ऑक्टोबर रोजी दोन्ही फौजांच्या आघाडीची चकमक होऊन दोन्ही फौजा मागे सरल्या. पानिपत गावाभोवती तोफखाना पसरून भाऊने छावणी केली. अबदालीने त्याच्या दक्षिणेस ५-७ किमी. वर आपला मुक्काम ठोकला.

    पानिपतनजीक भोवताली मराठी फौजा उतरून खंदक खणून सभोवती आराबा पसरून राहिल्या. पठाणांशी सामना करण्याकरिता जंगी तोफखाना घेऊन भाऊ हिंदुस्थानात आला होता. शत्रूच्या रोखाने तोफा लावून, भोवती खंदक खणून त्यांत यमुनेच्या कालव्याचे पाणी सोडण्यात आले. किल्ल्यागत छावणी बंदिस्त करून भाऊ शत्रूच्या हल्ल्याची वाट पाहत राहिला. आपल्या तटबंदीच्या आत राहून तोफांच्या मार्‍याने शत्रूचा धुव्वा उडवून देऊ, अशी योजना भाऊने आखली. पुढून हल्ला आल्यास आपला तोफखाना शत्रूचा चांगला समाचार घेईल, अशी भाऊची खात्री होती. शत्रूची रसद तोडण्याची आणि दुआबातील त्याच्या मुलखांत दंगल माजविण्याची कामगिरी भाऊने गोविंदपंत बुंदेले, कोपाळराव बर्वे यांजकडे सोपविली. आपण आपल्या बंदिस्त छावणीत दोन-तीन महिने सहज निभवून नेऊ, तोपर्यंत पुण्याहून आणखी फौज आपल्या मदतीस येऊन दिल्लीच्या बाजूने पाठणांस शाह देईल, असाही त्याचा अंदाज असावा; पण भाऊच्या या योजना फोल ठरल्या.

    अबदाली मोठा अनुभावी आणि कुशल सेनानी होता. त्याने आपली फौज थोडी मागे घेतला आणि परिस्थितीचे निरीक्षण चालविले. सुरुवातीला त्याच्या फौजेत रसदेची व्यवस्था नव्हती; त्यामुळे साहजिकच धान्याची महर्गता वाढली. गिलच्यांच्या लष्करातील वा बातम्या भाऊकडे येत होत्या. त्याचा अर्थ त्याने वेगळाच केला. १ नोव्हेंबर रोजी भाऊने गोविंदपंतास लिहिले, ‘फार आवळून चालतात, काही लांबवू देत नाहीत. चाळीस-पन्नास कोस धावतात ते नाही. दाणा दोनअडीच शेर गिलच्यांच्या लष्करात आहे. हिंमत फार आहे. यास गिळणार’. सेनापतीची ही आत्मविश्वासाची भावना इतरांच्या पत्रांतही व्यक्त होते. मराठी फौजेत असलेला कृष्ण जोशी यासंबंधी आपल्या भावास तपशीलवार लिहितो. या पत्रात दोन्ही बाजूंकडील एकूण परिस्थितीचे सम्यक दर्शन घडते.

    दोन्ही फौजांची दृष्टादृष्ट झाल्यापासून गोळागोळी व लहानसहान चकमकी रोज होत. त्यांतील दोन लढाया तर अधिक रंगल्या. एकीत दुराणीचे पाच-सातशे लोक जखमी व ठार झाले आणि शे-दिडशे घोडी मराठ्यांच्या हाती लागली. पंधरा दिवसांनी दुसरी लढाई झाली. नेहमीप्रमाणे संध्याकाळी पुढे काढलेल्या तोफा बरोबर घेऊन मराठी फौजेची तुकडी छावणीत परत चालली होती. इतक्यात नजीबखानाकडील पाच-सात हजार रोहिले या तुकडीवर अचानक चालून आले. रोहिल्यांच्या बंदुकांच्या मार्‍यापुढे या तुकडीला माघार ध्यावी लागली. पळणार्‍या राऊतांना थोपविण्याकरिता पुढे झालेल्या बलवंतराव मेहेंदळे यास शत्रूकडील एक गोळी लागून तो घोड्याखाली आला व मरण पावला. बलवंतराव केवळ भाऊचा उजवा हात, त्याच्या मृत्यूने साहजिकच मराठी लष्करात निराशेची छाया पसरली.

    ReplyDelete
  7. मेहेंदळ्याच्या मृत्यूने या मोहिमेस एक अनिष्ट कलाटणी दिली असे म्हटले पाहिजे. या वेळेपर्यंत मराठी फौजांचे मनोधैर्य कायम होते; पण आता ते खजले. शत्रू आपल्या गोटात येऊन शिरतो आणि बलवंतरावासारखा मातबर सरदार कामास येतो, हे पाहून या फौजांनी धास्त खाल्ली. बाहेर कोणी पडेनासे झाले. इतक्यात दहा-बारा दिवसांत गोविंदपंत बुंदेल्याच्या तुकडीची वाताहात झाल्याची खबर आली. कुंजपुरा शत्रूने परत घेतला. कर्णाल, पतियाळा बाजूने येणारी रसद तुटली. शत्रूच्या वेढ्याचे पाश मराठी फौजांभोवती घट्ट होऊ लागले. वेढलेल्या मराठी फौजांभोवती दुराणीने रात्रंदिवस गस्त सुरू केली. जनावरांचे हाल होऊ लागले. काही जमा करण्याकरता एका रात्री काही पेंढारी जवळच्या रानात गेले असता गिलच्याने त्यांना कापून काढले. दिल्लीहून खजिना रवाना झाला, तोही मधल्यामधे गारद झाला. बाहेरील जगाशी संबंध पार तुटला व सर्व लोकांची उपासमार होण्याची वेळ आली.

    मग तमाम लोक भाऊसाहेब यांचे डेर्‍यास जाऊन अर्ज केला की, ‘भाऊसाहेब आम्हास रणांत मारावे, परंतु अन्नाविण मारू नये’. भाऊने ही कठीण परिस्थिती ओळखली. शत्रू वाट धरून बसलेला, छावणीत रहावे तर सैन्याचे हाल वाढत जाणार, त्यापेक्षा युद्धाने सोक्षमोक्ष लावून घेतला पाहिजे, मारावे किंवा मरावे हा सिद्धांत करवून मनसवा ठरविला.

    बुधवार, पौष शुद्ध अष्टमी (१४ जानेवरी १७६१) रोजी मराठी फौजा पानिपतची छावणी सोडून बाहेर पडल्या. इब्राहीमखान गार्दीने मसलत सुचविली होती की, ‘गोल किंवा बुरुज बांधून, मध्ये बुणगे घालावे, भोवताली तोफखाना वाटून द्यावा, चहुंकडून चार सरदार मातबर देऊन जिकडील तिकडे बाजू वाटून द्यावी. कोस-दोन कोस लढत भिडत दिल्लीस जाऊन पोहोचावे’; पण आयत्या वेळी रात्री हा मनसबा केला होता तो राहिला.

    लढाई करण्याचे ठरवून भाऊसाहेब बुणगे पाठीमागे घालून पुढे तोफखाना देऊन मजबुतीने चालून गेले. सकाळी नऊ वाजता युद्धास तोंड लागले. इब्राहीमखान गार्दीच्या कवायती तुकड्यांनी समोरील रोहिल्यांचा खुर्दा उडविला, तसेच मध्यभागी असलेल्या हुजरातीच्या फौजेने पराक्रमाची शर्थ केली आणि दुराणीच्या फौजेचा मोड केला; पण दुपारी एक वाजल्यानंतर पारडे फिरले. अबदालीने रण सोडून पळालेल्या शिपायांना परत लढाईस पाठविले आणि आपल्या शिलकी सैन्यानिशी आणि शुतरनालांसह चालून जाऊन मराठी फौजांना घेरले. मराठी सैन्याची वाताहात झाली. विश्वासराव, भाऊसाहेब, यशवंतराव पवार, जनकोजी शिंदे, समशेर बहादुर, इब्राहीमखान गार्दी इ. नामांकित मंडळी कामास आली. ‘दोन मोती गळाले, दहा-वीस अशफी आणी रुपया, तांब्याच्या नाण्यांची तर गणती नाही’ अशा मजकुराचे सावकारी पत्र पेशव्यास २४ जानेवरी रोजी मिळाले. पन्नास हजार लढाऊ लोकांपैकी जेमतेम आठ-दहा हजार जिवानिशी सुटून आले. हजारे बिनलढाऊ लोकांची गिलच्यांनी कत्तल केली आणि हजारो गुलाम करून नेले. तोफखाना, हत्ती, घोडे, बाजार, सर्व लुटले गेले.

    ReplyDelete
  8. पानिपतचे युद्ध हे मराठी इतिहासातील एक शोकांतिका होय. सर्व हिंदुस्थानचे राजकारण पुण्याहून चालवावयाचे हे मराठेशाहीचे धोरण सु. अर्धे शतक यशस्वी ठरले. या धोरणाची पूर्तता होम्याचा समय आला असता, एकाएकी वादळ निर्माण होऊन इमारत जमीनदोस्त व्हावी, तद्वत अबदाली-रोहिले यांची युती होऊन, मराठ्यांच्या साम्राज्यास्थापनेवर जबरदस्त आघात झाला. पानिपत येथील पराभवाने मराठेशाहीची एक कर्ती पिढी नाहीशी झाली. पुत्र, बंधू आणि मित्र यांच्या वियोगाने विव्हल होऊन पेशवा मरण पावला. अटकेपर्यंत फडकलेला मराठ्यांचा भगवा झेंडा चंबळ नदीवर जेमतेम स्थिरावला. दक्षिणेत निजाम-हैदर यांनी डोकी लक ताञसीय उत्तरेस राजस्थान, बुंदेलखंड, माळवा येथील राजेरजवाडे व लहान मोठ्या जमीनदारांनी मराठ्यांविरुद्ध दंगे सुरू केले. पराठेशाहीचा दरारा नाहीसा झाला. पानिपतनंतर पन्नास-साठ वर्षे मराठी राज्य अस्तित्वात होते; पण त्याचे आक्रमक धोरण जाऊन ते बचावाचे होऊन बसले. प्रयत्न करूनही त्यांना दिल्लीस पूर्वीसारखा जम बसविता आला नाही.
    .......................................................................................................................

    ReplyDelete
  9. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  10. सदाशिवराव भाऊ.....
    सदाशिवराव भाऊ यांचा जन्म पुण्याजवळील सासवड येथे झाला. पहिला बाजीरावाचा भाऊ चिमाजी अप्पा हे भाऊंचे वडील. त्यांच्या आईचे नाव रखमाबाई होते. रखमाबाईचा बाळंतपणातील आजाराने मृत्यू झाला. तसेच भाऊ सुमारे १० वर्षांचे असताना चिमाजी अप्पांचाही मृत्यू झाला. आजी राधाबाई यांनी भाऊंचा पुढे सांभाळ केला. भाऊ प्रारंभी नागपूरच्या भोसल्यांच्या सेवेत होते. नंतर ते नानासाहेब पेशव्यांचे दिवाण बनले. पानिपतावर मराठा सैन्याचे नेतृत्व करण्यास भाऊ असमर्थ होते, असे अनेक इतिहासकार मानतात. तथापि, मला हे पटत नाही. भाऊंनी मराठा साम्राज्याची उत्तम सेवा केली. १७४६ मध्ये भाऊंनी कर्नाटकात मुलुखगिरी केली. त्यांनी उदगीर घेऊन निजामाची कंबर तोडली. अलाऊद्दीन खिलजीने दौलताबादचा देवगिरी किल्ला घेतल्यानंतर मराठ्यांना तो कधीच परत घेता आला नव्हता. सदाशिव भाऊने देवगिरी जिंकून इतिहास घडविला. तेच भाऊ पानपतावर यश मिळवू शकले नाही. त्याला अनेक कारणे होती.

    भाऊंच्या चुका

    उत्तरेतून मदत मिळाली नाही, तरी मराठे पानिपताची लढाई सहज जिंकले असते. परंत तसे झाले नाही. भाऊंच्या काही चुका त्याला कारणीभूत होत्या. या लढाईत भाऊंनी मराठ्यांचे प्रसिद्ध गनिमी कावा हे युद्धतंत्र बाजूला ठेवले. तसेच भाऊंनी बिगरसैनिक लवाजमा सोबत घेतला होता. कुटुंब कबिलाही होताच. मराठा सैन्याबद्दल त्याकाळी महाराष्ट्रात इतका विश्वास होता की, मराठे हरतील असा विचारसुद्धा कोणी करीत नसे. त्यामुळे लोक बिनधास्तपणे सैन्यासोबत जात. उत्तरेत जाऊन तीर्थ यात्रा करीत. मुलुख पाहत qहडत. भाऊंच्या सैन्यासोबतही असे लोक होते. त्यांची संख्या प्रचंड होती. न. र. फाटक यांनी या लव्याजम्याला बाजारबुणगे म्हटले आहे. मराठा सैन्याची अध्र्यापेक्षा जास्त रसद या बाजारबुणग्यांनीच फस्त केली. भाऊंच्या सैन्याला पानपतावर उपासमारीचा सामना करावा लागला. महाराष्ट्र खूप दूर होता. उपासमारीने मरणे वा लढणे हे दोनच पर्याय भाऊंसमोर होते. त्यांनी लढण्याचा पर्याय निवडला. त्या आधी बाजारबुणग्यांना महाराष्ट्रात सुरक्षित परत पाठविण्यासाठी मराठा सैन्याची बरीच शक्ती खर्च झाली.
    भाऊंच्यासोबत जनकोजी शिन्दे आणि इब्राहीम खान गारदी होते. १४ जानेवारी १७६१ रोजी लढाईला तोंड फुटले. दुपारपर्यंत मराठे वरचढ होते. अब्दालीची ४५ हजारांची फौज पाठीला पाय लावून पळाली. दुपार ढळल्यानंतर सूर्य मराठ्यांच्या तोंडावर आला. तसेच अब्दालीने स्वत:च्या संरक्षणासाठी राखीव ठेवलेले सैन्य अचानक मैदान उतरविले. अब्दालीने हा शेवटचा डाव खेळला होता. तो फसला असता तर त्याचा मृत्यू अटळ होता. परंतु, त्याचे नशीब चांगले होते. यश मिळत आहे, असे पाहून मराठे जल्लोषाच्या तयारीत असतानाच अब्दालीच्या ५०० वेगवान घोडेस्वारांनी विद्यूत वेगाने हल्ला चढविला. मराठ्यांची दाणादाण उडाली.
    भाऊंचे शीर कलम करण्याचा आदेश अब्दालीने सैनिकांना दिला. यावेळी भाऊंनी झटापट केली. त्यात त्यांच्या गळ्यातील जानवे खाली पडले. ते घेण्यासाठी भाऊ धडपडू लागले. तेव्हा अब्दालीने विचारले : ‘ हा धागा कशाचा आहे. त्यावर भाऊ म्हणाले : ‘ही माझ्या धर्माची निशाणी आहे. अब्दाली हसला. त्याने जमिनीवर लोळणारे जानवे उचलले. याच धाग्याने याचा मृत्यू होऊ दे, असा आदेश त्याने सैनिकांना दिला. सैनिकांनी भाऊंचे जानवे भाऊंच्या गळ्याभोवती आवळले आणि त्यांचा जीव घेतला.
    भाऊंची धीन्ड

    अब्दालीचे बहुतांश सैन्य खलास झाले होते. अगदी थोडेसे लोक उरले होते. युद्ध जिंकूनही त्याला काहीच उपयोग नव्हता. कारण ज्या सैन्याच्या बळावर त्याने अफगाण साम्राज्य उभे केले होते. ते सर्व नामशेष झाले होते. त्यामुळे तो प्रचंड निराश झाला. संतापला. त्याने मेलेल्या भाऊंचे शिर कलम करून धीन्ड काढण्याचे आदेश दिले. भाऊंचे शीर कापण्यात आले. ज्या जानव्याने त्यांचा गळा आवळण्यात आला होता, त्यालाच त्यांचे शिर बांधून एका भाल्याला लटकावण्यात आले. सर्व शिबिरभर फिरवून नंतर ते मृतदेहांच्या ढिगा-यांत फेकून देण्यात आले. तिस-या दिवशी भाऊंचा बिनमुंडक्याचा मृतदेह देहांच्या ढिगा-यात सापडला. चौथ्या दिवशी मुंडके सापडले.
    अफगाणी साम्राज्याचा खातमा

    पानितपत युद्धाने नुसती अब्दालीचीच नव्हे, तर अफगाणी साम्राज्याची कंबर मोडली. अब्दालीचे साम्राज्य हे अफगाणचे शेवटचे साम्राज्य ठरले. पानिपतचे युद्ध जिंकल्यानंतर अब्दाली दिल्लीवर चालून येण्याऐवजी परत निघून गेला. कारण त्याच्याजवळ पुढे लढायला सैन्यच उरले नव्हते. पानिपत युद्धाची मध्यपूर्वेतील आक्रमक टोळ्यांनी प्रचंड धसका घेतला. त्यानंतर वायव्येच्या बाजूने भारतावर एकही आक्रमण झाले नाही. सुमारे पावणे दोनशे वर्षांनतर इंग्रजांनी व्यापाराच्या नावाखाली भारत ताब्यात घेतला.
    ........................................................................................................................

    ReplyDelete
  11. मित्रांनो,
    वर म्हटले गेले आहे की एकाला 3 या प्रमाणात सहायक लागत असत... बरोबर आहे. पण ते खड्या शिपायांना दारू गोळा देणे, तलवारी- ढाली, अन्य शस्त्रास्त्रे, घोडे , व अन्य घोडे हत्ती उंट, बैलगाड्या वाल्या जनावरांना तयार करून वेळे वर रणांगणात पोहोचवणे अदि कामे करायला लागत . सध्या हवाईदलातील याच रेशो एका ला 8 -10 तर काही विमांनांच्या करिता एकाला 20 सहायक हातभार लावणारे असावे लागतात. असे मानले जाते. प्रत्यक्ष रणांगणावर बुणगे आले नसले तरी विविध धार्मिक व अन्य युद्धाला निरुपयोगी मंडळींचा सुळसुळाट व त्यांचे प्रस्थ फार जड झाले होते असे खुद्द सदाशिवरावांनी म्हटले होते. ....

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...