Friday, June 5, 2015

त्यात स्त्रीयाच अग्रगामी असतील !


Image result for mother goddesses indus


जगाने आजवर असंख्य व्यवस्था पाहिलेल्या आहेत. एके काळी पृथ्वीतलावर, अगदी भारतातही स्त्रीसत्ताकता होती अशीही काही मते आहेत. कोम्रेड शरद पाटील या सत्ताकतेची ऐतिहासिकता, प्रसंगी पुराकथांतून व शब्दांतून हवा तसा अन्वयार्थ काढतही मांडणी करत आले होते. स्त्रीसत्ताकता म्हणजे स्त्रीयांचे राज्य. स्त्रीमहत्ता आणि शासन ते कुटुंबपद्धतीत, वारसाहक्कासहितचे स्त्रीयांचे अधिकार अंतिम. ग्रीक मिथककथांतही अशी स्त्रीराज्यांची उदाहरणे येतात. अमेझोन स्त्रीयांचे असे एक राज्य होते असे पुराकथेवरुन दिसते. Troy युद्धातही या स्त्रीयांनी भाग घेतला होता असे हिसियड म्हणतो. स्त्रीसत्ताकतेकडून पुरुषसत्तेकडे मानवाने कृष्री संस्कृतीच्या उदयानंतर लगोलग वाटचाल केली असेही दिसते. शरद पाटील ज्या काळाबद्दल बोलतात, म्हणजे मध्य वैदिक आणि उत्तर वैदिक, (यजुर्वेद काळ ते ब्राह्मणकाळ) हा काळ फार फार नंतरचा असल्याने आद्य वैदिक काळ (ऋग्वेदकाळ) हा  मुळात भारतातील नसल्याने भारतीय संस्कृतीत ते संदर्भ अनाठायी आहेत. वैदिक काळ हा इसपू १५०० च्या पलीकडे जात नाही तर सिंधू संस्कृतीचा काळ हा इसपू ३१०० ते इसपू १७०० एवढा आहे. वैदिक ग्रंथांत गणमाता अथवा स्त्रीसत्ताकता शोधत भारतीय इतिहासाची मांडनी करणे निरर्थक होऊन जाते ते त्यामुळेच.मातूदेवतांची पूजा ऋग्वेदापेक्षाही प्राचीन आहे. ऋग्वेदकालात जगभरच पुरुष देवतांना महत्व यायला सुरुवात झालेली होती. त्यामुळे वैदिक साहित्य हे जागतिक संस्कृतीच्या प्रवासात खूप उत्तरकाळात लिहिले गेले आहे हे स्पष्ट होते.

पण खरोखर ज्या अर्थाने स्त्रीसत्ता म्हटली जाते तशी ती अस्तित्वात होती काय हा कळीचा प्रश्न आहे. स्त्रीसत्ता आणि मातृपुजक समाज यात फरक केला पाहिजे. मातृपुजा ही वैश्विक घटना आहे जी आजही पाळली जाते. जननी म्हणून निर्माती आणि म्हणून देवतासदृष अशा स्वरुपात योनीपुजेच्या रुपात मात्रूपुजा सर्वात आधी अवतरली हे वास्तव आहे. आद्य मानवी समाज मातृपुजक होते यात वाद नाही. पण ऐहिक सत्ता स्त्रीयांचीच असे हे काहींचे मत मात्र विवादास्पद आहे कारण त्याला आधार नाही. ज्या ज्या संस्कृतीत
मातृपुजेचे अवशेष सापडले आहेत त्यावरुन त्या समाजांत स्त्रीसत्ताकता वा स्त्रीवर्चस्व होते असे म्हणता येणार नाही असे आता अनेक पुरातत्वविद म्हणतात. मातृपुजा होणे म्हणजे मात्रुसत्ताकता असणे असा अर्थ होत नाही. दोन विभिन्न बाबी असून ऐहिकता आणि गुढगर्भमय रहस्यात्मकतेपोटी होणारी पुजा यात फरक करावा लागतो.  पुजा ज्याची केली जाते ती प्रतिकात्मक बनते, ऐहिक पातळीवर ज्याची प्रतीक म्हनून पुजा केली जाते त्या प्रतीकांच्या जीवंत अस्तित्वांना तेवढेच महत्वाचे स्थान दिले जातेच असे नाही. टोळी जीवनात जोवर शिकार आणि अन्नसंकलन हाच उपजिविकेचा मोठा धंदा होता त्या काळात स्त्रीया अडचणीचे काळ वगळता पुरुषांच्या बरोबरीने या कामांत सहभाग असे. स्त्रीयांवरची सामुदायिक मालकी त्यात निहितच होती. टोळीयुद्धे होत त्यात पुरुष शक्यतो मारले जात तर स्त्रीयांना मात्र गुलाम केले जात असे. गुलाम स्त्रीयांपासुन झालेली मुले ही टोळीचीच संपत्ती असल्याने त्यांना स्वातंत्र्य मिळत असले तरी स्त्रीया या टोळीवृद्धीसाठी गुलाम केल्या जात, व त्या भोगदासी व दुय्यमच असत, हे वास्तव लपत नाही.

स्त्रीसत्ता हा काही विद्वानांना आदर्श संकल्पना वाटली तरी प्रत्यक्षात ती तशी नव्हती. याचा अर्थ असा नव्हे कि स्त्रीया या कधी राज्ञीपदी विराजमान होत सत्ताधारी झाल्या नाहीत. ते अपवाद आहेतच व तेही अपवादात्मक स्थितीतील. आणि अशा स्थितीतही ज्याला स्त्रीसत्ता असे संबोधले जाते तशी व्यवस्था नसे हे वास्तव लक्षात घेतले पाहिजे.

शेतीचा शोध माणसाला इसपू १२००० वर्षांपुर्वी लागला असे पुरातत्वीय पुराव्यांवरुन दिसते. इराणमधील झार्गोस पर्वतराजीतील ठिकाण एवढे जुने आहे. प्रत्यक्षात याहीपुर्वी दोनेक हजार वर्ष शेतीचा शोध लागला असावा. शेतीने मानवी जीवनशैलीत आमुलाग्र बदल घडवला. पहिला बदल म्हणजे आजवर भुमीवरील व्यक्तिगत मालकीहक्काचा जो विषयच नव्हता तो आला. प्रत्येकाने आपल्याला सोयीची व उपजावू जमीन आपल्या मालकीखाली आणण्याचा प्रयत्न केला. यातुनच सामुदायिक मालकीहक्काची संकल्पना हटत व्यक्तिगत मालकीहक्काची संकल्पना आली. जमीनीवर हक्क...म्हणजे जमीनीत जो बीज पेरतो त्याचा हक्क. 

आणि स्त्रीयांत बीज पेरणारा पुरुषच आहे हे भान आल्याने शेतीवरील मालकी जशी तशीच स्त्री/स्त्रीयांवरील मालकीही पुरुषाचीच ही भावना पक्की होत गेल्याने क्रमश: स्त्रीयांचे स्थान संकुचित होत गेले. यात वैवाहिक नीतिसंबंधांची मात्र संकल्पना नसल्याने स्त्रीयांचे बहुविध संबंध जसे टोळी जीवनात होते तसेच चालुही राहिले. पण त्यापासुन होणारी संतती मात्र ज्याची ती स्त्री आहे त्याचीच मानली जात असे. यातुनच बहुपतीकत्व ही संकल्पनाही समांतरपणे विकसीत होत गेली. मुळात एकपत्नीत्व/एकपतीत्व कधी नव्हतेच त्यामुळे बहुपतीकत्वातही कसलाही अडसर नव्हता. फक्त अनेकांशी व कोणाशीही स्वैर संबंध ठेवण्यापेक्षा मर्यादित व भोगता येतील एवढ्याच स्त्री-पुरुषांपुरती ही संकल्पना रुढ होत गेली.

एकपतीत्व अथवा एकपत्नीत्व क्रमशा: मानवी समाजांना व्यापत गेले ते नैतिक/भावनिक अथवा धार्मिक भावनांनी नव्हे तर संपत्तीवरील वारसा भावनेने हे येथे लक्षात घ्यायला हवे. शेतीमुळे माणूस स्थिर झाला. मानवी संस्कृतीला अवाढव्य आयाम लाभू लागले. ग्रामसंस्कृतीकडून उद्योग-व्यापार व अन्य कुशल उत्पादनांमुळे भरभराट आली पण त्याच वेळीस समांतरपणे लोकसंख्येचा विस्फोटही होऊ लागला. सिंधू खो-यातीलच लोकसंख्या इसपु ७००० मद्ध्ये सुमारे पाच लक्ष होती ती इसपू २२०० पर्यंत जवळपास पन्नास लक्ष एवढी झाली असा पुरातत्ववेत्त्यांनी एकूण व्याप्ती पाहून अंदाज केला आहे.. टोळीजीवनात अपंग/निर्बलांना स्थानच नव्हते त्यामुळे ती अपत्ये सरळ मारली जात. शिवाय युद्धे सततची असल्याने त्यात लोक मरत ती वेगळीच. स्थिर संस्कृतीत मात्र ही संख्या फोफावत गेली. अपंग अथवा निर्बल वाटणारेही या संस्कृतीत कला-कौशल्यांच्याही विस्फोटामुळे उपयुक्तच ठरत होते. ओझे बनत नव्हते.

अशा परिस्थितीत एका व्यक्तीच्या सांपत्तीक अधिकारांचे वितरण त्याच्या मरणानंतर कसे हेही प्रश्न निर्माण होऊ लागले व यातुनच औरस व अनौरस अशी विभागणी सुरु झाली. औरस आणि अनौरस ठरवायचे म्हणजे पुन्हा नव्या व्यवस्थेची गरज होती. विधीवत विवाह ही त्यातून काढली गेलेली वाट होती. ऐहिक जीवनाची सोय धर्माद्वारे लावण्याचा व राजसत्तेलाही ती गरजेची वाटल्याने राजकीय मान्यतेचा महामार्ग यातुन काढला गेला.

आधीच्या विभागणीत अनौरसांची (स्त्रीच्या बाजुने असो कि पुरुषाच्या) संख्याच अधिकची असल्यामुळे संपत्तीचे विभाजन औरसांना अधिक आणि अनौरसांना कमी अथवा वंचित ठेवण्याचे धोरण असणे स्वाभाविक होते. त्यामुळे स्त्रीच्या यारापासुन झालेले, स्वपुरुषापासून झालेले आणि पुरुषाला अन्य स्त्रीयांपासून झालेले व त्या स्त्रीयांना अन्य पुरुषांपासून झालेले अशा संततीला कोणते ऐहिक वारसा अधिकार द्यायचे हे जे प्रश्न व असे काही गोंधळ होते जे शमने एरवी अशक्य होते ते विवाहसंस्थेच्या नव्या राजस्विकृत नियमांनी साधायचा प्रयत्न झाला.

याचाच अर्थ असा कि विवाहसंस्थेचा जन्म दैवी अथवा धार्मिक कारणंत नसून व्यावहारिक कारणांत आहे. कृषी व तदनुषंगिक उत्पादन व व्यापार व्यवस्थेची ही अपरिहार्य गरज होती. भावनिकता वगैरे भाव त्याला माणसाने कृत्रीमपणे चिकटवले. यातुन बहुपती व्यवस्थेचाही नायनाट झाला. बहुपत्नीकत्व मात्र पुरुषाने कायम ठेवले. ही त्याची नव्या व्यवस्थेतून आलेली मानसिकता होती.

वरील प्रवास पाहिला तर लक्षात येईल कि बहुपतीकत्व (एकपुरुषत्व) अथवा एकपत्नीत्व (एकस्त्रीत्व) कधीच नैसर्गिक नव्हते तर ती मानवी समाजाची बदलत्या समाजव्यवस्थेतील अपरिहार्यता होती. तिचा अनिर्बंध वापर (व्यवस्थेतील गैरव्यवस्था म्हनून) पुरुषांनी केला तसाच स्त्रीयांनीही. पुरुशांनी विवाहबाह्य संबंध निर्माण केले कारण तसे संबंध निर्माण करायला तयार स्त्रीयांची उपलब्धता होतीच. युद्धात जिंकून आलेल्या स्त्रीया रजवाडे-सरदार अथवा पराक्रमी सैनिकांना मिळत  तर सामान्य पण धन बाळगुन असलेल्यांना गणिका अथवा रक्षेच्या रुपाने. हे अन्याय्य होते कारण तशी सोय युद्धात जिंकलेल्या पुरुषांच्या बाबतीत नव्हती. पण त्यंचीही लैंगिक भूक भागवायची साधने होतीच त्यामुळे स्त्री-पुरुष-व्यवहार हा तारतम्याने पहावा लागतो व यात पुरुषी सत्ता ही नेहमीच स्त्रीयांच्या बाबतीत आपमतलबी राहिली आहे हेही पाहता येते.

तुम्ही म्हणाल, "एक जग: एक राष्ट्र" या संकल्पनेत ही चर्चा कशाला?

उत्तर सोपे आणि अत्यंत साधे आहे. आपण आज आधुनिक म्हणवणारी राष्ट्रभावना जपतो ती जर वैश्विक व्हायची अएल तर स्त्रीयांचे स्थान काय होते, काय आहे आणि काय असायला हवे याची चर्चाही तेवढीच गरजेची आहे. भारतातील स्त्रीवाद हा पाश्चात्य स्त्रीवादाची जवळपास पडछाया आहे. पुरुषविरहित जगाची स्वप्ने काही अमेरिकन स्त्रीवादी विचारवंतीनी पाहत आहेत. त्यातला अतिरेक बाजुला ठेवला तरी पुरुषी अतिरेक त्यामुळे क्षम्य होत नाही.

वैश्विक राष्ट्र हवे असेल तर स्त्रीयांचे स्थान हा सर्वाधिक कळीचा मुद्दा बनतो तो त्यामुळेच.

किंबहुना ही क्रांती जर कोणी कधी करु शकले, म्हणजे एक जग: एक राष्ट्र" तर त्यात स्त्रीयाच अग्रगामी असतील असे मला वाटते.

बाकी पुढील भागात.

No comments:

Post a Comment

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...