Monday, June 22, 2015

भाषांचा उदय कधी झाला?

भाषांचा उदय कधी झाला हा प्रश्न जेवढ्या महत्वाचा आहे तेवढाच कशासाठी झाला हाही प्रश्न अनेकदा चर्चिला गेला आहे व तो वर्तमानातही मानसशास्त्र ते मानववंशशास्त्राच्या अंगाने चर्चेत असतो. भाषा हा मानवसमाजाच्या अस्तित्वाचा, सांस्कृतिक जीवनाचा, सातत्याने विकसित होत असणारा मोलाचा गाभा आहे हे नाकारता येणार नाही. किंबहुना भाषेच्या अस्तित्वाखेरीज मनुष्य हा पुरा-आदिम अवस्थेतच राहिला असता व कसलीही भौतीक प्रगती त्याला साध्य करता आली नसती, असेही म्हणता येऊ शकते. भाषेचा उदय कसा झाला असावा व त्याच्या प्रगतीचे टप्पे काय असावेत याबाबत सतराव्या शतकापासुनच तत्वद्न्य,  ते भाषाविद चर्चा करु लागले होते. त्यांच्यात एकमत न होता विवादच वाढु लागल्यानंतर १८६६ मद्धे लिंग्विस्टिक सोसायटी ओफ प्यरिसने या विवादावरच बंदी घालण्याइतपत मजल गाठली होती. असे असले तरी मानवी जिज्ञासा अपार असते. जगात आजमितीला ६८०९ (किंवा अधिक)  भाषा आहेत. काही भाषा मृत झाल्या असुन काही मृत होण्याच्या मार्गावर आहेत. जोवर ती भाषा बोलणारा मानवी समुदाय पुरेपुर नष्ट होत नाही तोवर अन्य भाषांचे कितीही आक्रमण झाले तरी मुळ भाषेचा गाभा त्या-त्या भाषेचे अनुयायी जपुन ठेवतात हेही एक वास्तव आहे. भाषा ही मानवी मनाची मुलभुत (Innate) गरज आहे असे मत सिग्मंड फ्राईड याने स्पष्ट नोंदवुन ठेवले आहे आणि त्यात अमान्य करण्यासारखे काही नाही. पण ही गरज का आहे आणि भाषा कशी निर्माण होते हा मानवी कुतुहलाचा पुरातन विषय आहे. माणसाला अन्य प्राणीजमातीपासून वेगळा करणारा एकच घटक म्हणजे माणसाला अवगत असलेली संभाषणाची (भाषेची) कला. किंबहुना ज्याला बोलता येते तोच माणूस असेही म्हटले जाते.

    भाषा देवांनी निर्माण केली व मानवाला शिकवली असे धर्मवादी पुरातन काळापासून सांगत आलेले आहेत. पृथ्वीतलावर पहिले संभाषण अडम व इव्हने केले व नोहाच्या नौकेच्या प्रवासाच्या अंतिम थांब्यानंतर टोवर ओफ बाबेल येथे नौकेतुन उतरतांना सर्व मानवांची भाषा एकच होती असे बायबल (जेनेसिस ११.१-९) मानते. पुढे लोकसंख्या वाढली तरी माणसाने सर्व पृथ्वी व्यापण्याचा देवाचा आदेश मानला नाही. त्यामुळे देवानेच हस्तक्षेप करुन भाषागट निर्माण केले व त्यानंतरच माणसाने पृथ्वी व्यापायला सुरुवात केली. (इसाया ४५.१८) थोडक्यात या मानवी गटांनी मुळच्याच भाषेला जगभर विविध रुपात नेले असा हा बायबलचा दावा. हे येथे विस्ताराने सांगायचे कारण म्हणजे याच "एकस्थाननिर्मिती"च्या बायबली मिथ्थकथेचा पगडा आजही पाश्चात्य भाषाशास्त्र ते भौतिकी शास्त्रावर आहे हे आपल्याला पुढे पहायचेच आहे.

    भाषेच्या निर्मितीबाबत जगातील सर्वच खंड आणि भाषात काही ना काही मिथकथा आहेतच, त्यावरुन माणसाला स्वत:लाच आपल्यातील भाषाकौशल्याबद्दल अनावर कुतुहल व ती दैवी देणगीच असल्याचा ठाम विश्वास दिसून येतो. पण यातुन माणसालाच भाषेचे वरदान का आणि अन्य प्राण्यांना का नाही याचे उत्तर मिळत नाही. आधुनिक काळातही भाषेच्या उत्पत्तीच्या संदर्भात अनेक सिद्धांत मांडले गेले आहेत. त्यांचा धावता आढावा येथे घेणे अनुचित ठरणार नाही.
    भाषेचा उगम व विकास हा क्रमशा: होत जात असून भाषेचा उदय एकाएकी झाला असे मानता येत नाही असे क्रमविकासवादी (Continuity theories)चे समर्थक मानत होते. भाषा आज आपण जशा पहातो-वापरतो त्या एवढ्या गुंतागुंतीच्या (Complex) असल्या तरीही त्याहीपेक्षा वाढलेल्या नवीन मानसिक गुंतागुंतीच्या अभिव्यक्तीला अनेकदा त्या पुरेसा न्याय न देना-या आहेत कि त्यांचा उगम एकाएकी झालेला असू शकत नाही असे त्यांचे एकुणातील मत आहे.
    स्टिव्हन पिंकर हा या मताचा खंदा पुरस्कर्ता होता. (२) त्याच्या मते जसा मानवी प्राण्याचा क्रमविकास झाला तशीच भाषाही क्रमश: विकसीत होत गेली. या सिद्धांताशी सहमत पण विभिन्न मते असणा-यांपैकी एका गटाचे मत होते कि भाषेचा उगम हा इतरांशी संवाद साधण्याच्या गरजेतुन निर्माण झाला नसुन आदिम स्व-अभिव्यक्तीच्या गरजेतुन निर्माण होत विकसीत होत गेली. असे असले तरी अभिव्यक्तीची अथवा संवादाची निकड मानवातच का याचे समाधानकराक उत्तर या सिद्धांतांनी मिळत नाही असे आक्षेपकांचे म्हणणे आहे.
    अगदी या क्रमविकाससिद्धांतालाही छेद देणारा पुढचा सिद्धात आला तो म्हणजे "क्रमखंडवादी" (Discontinuity Theory) सिद्धांत. या सिद्धांतवाद्यांच्या मते अन्य कोनत्याही प्राण्यात न आढळणा-या एकमेवद्वितीय अशा भाषानिर्मितीचे गुण मानवातच आढळत असल्याने ती बहुदा एकाएकी मानवी उत्क्रांतीच्या क्रमात कोणत्यातरी टप्प्यावर अचानकपणे अवतरली असावी असे या सिद्धांत्यांचे मत आहे.
    नोआम चोम्स्की हा क्रमखंडवादी सिद्धांताचा प्रमुख प्रसारक होता. परंतु त्याचा सिद्धांताला फारसे समर्थक लाभले नसले तरी एक लक्ष वर्षांच्या मानवी क्रमविकासात अचानक, बहुदा अपघाताने, भाषिक गुणांचा अचानक विस्फोट होत भाषा अवतरली असावी असे त्याचे मुख्य मत होते. (३) या मतामागे प्रामुख्याने मानवी गुणसुत्रांत होणारे काही अचानक बदल त्याने ग्रुहित धरले होते. मानवे शरीरातील, विशेषता: मेंदुतील जैवरसायनी बदलांमुळे भाषेचा उद्गम झाला अशा या सिद्धांताचा एकुणातील अर्थ आहे.
    अजून एक विचारप्रवाह आहे तो म्हणजे भाषा हा मानवी मनातील (मेंदुतील) मुलभुत गुणधर्म असून गुणसुत्रांनीच त्याची नैसर्गिक बांधणी मानवी मनात केली आहे व त्यामुळेच भाषेंचा जन्म झाला आहे. हे मत फारसे मान्य केले गेले नाही याचे कारण म्हणजे अंतत: वेगळे काही असे या सिद्धांतामुळे सिद्ध होत नाही.
    मी भाषेचा क्रमविकास हा कालौघात होत जातो या मताशी सहमत आहे. पण क्रमविकास मान्य केल्याने मुळात भाषाच का निर्माण होते याचे उत्तर मिळत नाही. याच सिद्धांत्यांचे म्हनने आहे कि एकतर संवाद साधण्यासाठी तरी भाषेची निर्मिती होते अथवा अभिव्यक्त होण्यासाठी. या सिद्धांत्यांनी अर्थातच चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीवाद मान्य केला आहे हे स्पष्टच आहे. एपपासुन पुरातन होमो, नियेंडरथल आणि मग आताच्या मानवाचे पुर्वज होमोसेपियन्स अशी या क्रमविकासाची रचना आहे. हा जैविक क्रमविकास आणि भाषेचा क्रमविकास यात फरक करावा लागेल. शिवाय डार्विनचा सिद्धांत सर्व कसोट्यांवर टिकत नाही हे उत्क्रांतीवादी मान्य करतात. त्या वादात येथे न जाता आपण भाषेच्या उगमावर लक्ष केंद्रित करुयात.
    भाषेच्या एकुणातील विकासात मानवाच्या ज्या प्रजाती जन्माला आल्या, म्हणजे पुरामानव ते होमोसेपियन्स, यात सर्व प्रजातींची भाषा एकदिश उत्क्रांत झाली असे मान्य करता येत नाही. प्रत्येक प्रजातीची काही ना काही, अगदी प्राथमिक का होईना भाषा असणे असंभाव्य नसले तरी एका प्रजातीचा मानव नष्ट होत दुसरी प्रजाती उत्पन्न झाली आहे. त्यामुळे एका प्रजातीच्या अंताबरोबरच तीही भाषा नष्ट झाली असणे स्वाभाविक आहे.
    असे असले तरी एका मुद्द्यावर प्रचंड विवाद आहे व तो म्हणजे निएंडरथल अणि होमोसेपियन्समद्ध्ये संकर होत आजचा मानव बनला कि निएंड्रथल मानव स्पर्धेत टिकाव न धरु शकल्याने नष्ट झाला?. पहिला सिद्धांत ग्राह्य मानल्यास होमो सेपियनने आपल्या पुर्वजांच्या भाषेतील गुणसुत्रे घेतली असतील असे मानावे लागेल. तसे असेल तर भाषेचा क्रमविकासही संकरातुन झाला असे मानावे लागेल. अर्थात यातील नेमके काय खरे हा वाद अद्याप सुरु आहे.
    दुसरे असे कि पृथ्वीतलावर पसरलेल्या मानवांची भाषा असली तरी त्यांत तंतोतंत म्हणता येईल असे साम्य नाही. एका अर्थाने प्रत्येक भाषा प्रादेशिक आहे. म्हणजे भाषेचा क्रमविकासही प्रादेशिक आहे असे म्हणता येईल. प्रादेशिक भुवैशिष्ट्यांमुळे मानवी संस्कृती व भाषा यावर नेमके कसे परिणाम होतात हे आपण पुढे पाहणारच आहोत. पण प्रादेशिक क्रमविकासात पुराऐतिहासिक कालात एखाद्या प्रदेशातील मानवी वस्त्या प्राकृतिक उत्पात, संसर्गजन्य रोगराया तसेच विनाशक लढायांमुळेही नष्ट झाल्या असण्याचे संकेत मिळतात. असे असेल तर अशा नष्ट होणा-या समुदायांच्या भाषेच भवितव्य काय, हाही प्रश्न निर्माण होतो. माणसाबरोबर भाषाही नष्ट होते असे नसून सांस्कृतिक अथवा जीवनशैलीतील बदलामुळेही जुन्या संस्कृतीतील अनेक शब्द बाद तरी होतात अथवा त्यांनाच नवा अर्थ दिला जातो. उदाहरण द्यायचे झाले तर जशी बैलगाडी शेतक-याच्या जीवनातून हद्दपार होऊ लागली आहे तसे बैलगाडीशी निगडित शंभरेक शब्द वापरातून बाद होत आहेत. माणसाने संस्कृति विकासाचा टप्पा तेंव्हाच गाठला जेंव्हा त्याने जुन्या संस्कृतीच्या अवशेषांवरच नव्या संस्कृत्यांची इमारत बांधली. त्यामुळे भाषेचा विकास एकदिश, सातत्यपुर्ण राहिला असावा कि खंडश: त्यात विकसन होत गेले असावे याबाबत आपण कसल्याही पुराव्याअभावी सांगू शकणार नाही.

    आधुनिक विज्ञान

    मानवी मेंदुतील "ब्रोका" हे केंद्र भाषेचे उत्पत्तीस्थान आहे असे आधुनिक विज्ञान मानते. या केंद्राला अपघाताने मार लागला तर माणसाच्या भाषिक क्षमतेत गडबड होते हे १८६१ साली लक्षात आल्याने या केंद्राला हा शोध लावणा-या पाल ब्रोकाचे नांव दिले गेले. पण लवकरच (१८७६ साली) कार्ल वेर्निक च्या लक्षात आले कि अजून एक मेंदुतील केंद्रक आहे तेथे आघात झाला तर भाषा समजण्याची आणि व्यक्त होण्याची क्षमता बिघडते. मेंदुच्या या विभागाला वेर्निक्स एरिया असे नांव दिले गेले. पुढे असे लक्षात आले कि भाषेच्या संदर्भात मेंदुतील अनेक विभाग परस्परावलंबी असुन प्रत्यक्ष बोलण्याची क्रिया व्हायला मेंदुचे अनेक भाग कार्यरत असतात. हे असे असले तरी भाषेची उत्पत्ती (अथवा ती शिकण्याची प्रक्रिया) नेमकी का व कशी होते हे अद्याप उलगडलेले नाही.
    नेओम चोम्स्की यांचे असे मत आहे कि मनुषाकडे जन्मत:च एक वैश्विक व्याकरण असते व यामुळेच मुल अल्पवयातच भाषेचे गुंतागुंतीचे स्वरुप समजुन घेत बोलु लागते. त्याच्या या सिद्धांताला बळ देणारा पुरावा निकाराग्वातील मांग्वा येथील बधीरांसाठी असलेल्या शाळेतुन मिळाला. येथे १९७९ साली जवळपास पाचशे मुकबधीर विद्यार्थी दाखल होते. त्यांना कोणतीही प्रस्थापित खाणा-खुनांची भाषा शिकवली गेली नव्हती. पण काही वर्षांतच या विद्यार्थ्यांनी स्वतंत्रपणे खाना-खुनांची भाषा विकसीत केल्याचे आढळून आले. शाळेत दाखल होणारे नवे लहान विद्यार्थी त्या चिन्हभाषेला सुधरवत नेत आहेत असेही निरिक्षण नोंदवले गेले. डिसेंबर १९९५ च्या सायंटिफ़िक अमेरिकनच्या अंकात ही माहिती प्रसिद्ध झाली. पण यामुळेही माणसाला संवादासाठी कोणत्या ना कोणत्या भाषेची गरज भासते, तो ती उपजत कौशल्याने विकसीतही करतो हे समजले तरी ही उपजतता कोठून येते याचे उत्तर मिळत नाही. भाषेचा उगम हे रहस्यच बनुन राहते ते यामुळेच.
    अलीकडेच टेकुमेश फिच यांनी "मातृभाषा" सिद्धांत डार्विनच्या नाते-निवड सिद्धांताचा आधार घेत मांडला होता. या सिद्धांतानुसार आई आणि मुल यांच्यातील संवादाच्या निकडीतुन भाषेचा उदय जाला असावा.  हीच पद्धत निकटच्या नातेवाईकांसाठीही वापरली गेल्याने भाषेच विस्तारही झाला असावा असे हा सिद्धांत सुचवतो. अर्थात या सिद्धांतावरही आक्शेप घेतले गेले. कारण अपत्याशी संवाद अन्य प्राणीजगतही साधायचा प्रयत्न करतेच, पण त्यातून भाषेचा उगम झालेला नाही.
    आपण भाषेची काही लक्षणे सहजपणे पाहु शकतो. माणसाच्या स्वरयंत्रात गुंतागुंतीचे ध्वनी निर्माण करण्याची क्षमता आहे जी अन्य प्राण्यांत नाही. ध्वनी काढतांना तो ज्यात उपजत नाद असेल असेच शब्द निर्माण करतो. तो त्या शब्दांना/ध्वनीक्रमाला अर्थप्रदान करतो. अर्थात तो (आपापल्या समुहात तरी) सातत्य ठेवतो. शब्दांना व्यापक अर्थ प्रदान करण्यासाठी व्याकरणबद्ध वाक्यात त्यांची रचना करतो. समुहातील ऐकणा-याला काय उच्चारले गेले आहे हे समजते. दुसरे महत्वाचे म्हणजे भाषा ही विकासशील राहते.

    विचार आणि भाषा

    विचार आणि भाषा यांचे निकटचे नाते आहे. मनुष्य विचार करतो हाही गुणधर्म माणसाला अन्य प्राणीसृष्टीपासून विलग करतो. भाषा हे विचारांचे वहन करण्याचे माध्यम आहे असे म्हटले तरी वावगे होणार नाही. पण येथे प्रश्न निर्माण होईल कि विचार करायला भाषेची गरज आहे काय आणि हाच खरे तर अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. मुळात मनुष्य विचार करतो म्हणजे काय करतो? विचार आधी मनुष्यप्राण्यात अवतरला कि मन? मन नेमके काय असते? विचाराचा विचार होऊ शकतो काय? खरे आहे. प्रश्न अनंत आहेत आणि खरे तर या प्रश्नांची अंतिम उत्तरे अजुन मिळालेली नाहीत. पण एक बाब अत्यंत स्पष्ट आहे ती ही कि विचारांना भाषेची गरज नसते. किंबहुना भाषेत बद्ध होऊ शकणारे विचार हे नेहमीच अत्यल्प असतात. भाषा ही नेहमीच तोकडी असते. विचार नाही. त्यामुळे भाषेत बद्ध न होऊ शकणारे, भाषेची पुरेशी प्रगल्भता न येणा-यांचे विचार हे जगासाठी नेहमीच अनुपलब्ध राहतात. पण म्हणून विचार नसतात असे नाही. भाषेचा जन्म नैसर्गिक उपजत जाणीवांतून होत असला तरी भाषा ही कृत्रीम अवस्था आहे हे अअपल्या सहज लक्षात येईल. ती कृत्रीम असल्यानेच भाषांत वैविध्य दिसून येते. ती कृत्रीम असल्याने सर्वच विचार/भावना/मनोवस्थांना भाषा शब्द देण्यात कमी पडते. त्यामुळेच भाषांत नवीन शब्दांची भर सातत्याने पडत आली असल्याचे आपल्याला दिसेल. त्यामुळे भाषेची निकड ही उपजत जाणीवांतून होत असली तरी भाषा मात्र कृत्रीम निर्मित्या होत हे आपल्या सहज लक्षात येईल.
    मनुष्य विचार करतो हे जेवढे खरे आहे तेवढेच खरे हेही आहे कि माणसाच्या विचारक्षमतेतही उत्क्रांती होत राहिलेली आहे. ही उत्क्रांती कधी एकरेषीय तर कधी बहुरेषीय झाल्याचे आपल्याला आढळेल. माणसाला स्वरयंत्र असल्याने गुंतागुंतीचे आवाज तो काढू शकतो. निसर्गातील अन्य आवाजांची प्रयत्नपुर्वक नक्कल करु शकतो. शब्द माणसाने निसर्गातुन नक्कलेच्या द्वारे घेतले कि त्याच्या स्व-अभिव्यक्तीच्या तसेच संवादाच्या निकडीतुन स्वनिर्मित बनले हे आपण आज निश्चयाने सांगू शकणार नाही. असे असले तरी विचार आणि भाषा यात निकटचे नाते आहे हे आपल्या लक्षात येईल.
    निसर्गातील प्राणी-पक्षांच्या आवाजांची नक्कल करत त्याने त्या त्या प्राण्यांची ओळख तसेच स्वर काढण्याच्या प्रयत्नांतून इतरांनाही पटवली असली तरी केवळ नक्कलेत भाषेचा उदय शोधणे धाडसी आहे. स्वत:ची अभिव्यक्ती, संवादाची गरज यातून त्याने स्वतंत्रपणेही अनेक शब्दांना जन्म दिला असणे स्वाभाविक आहे. शब्दांना आधी जन्म मिळला कि अर्थासोबतच शब्द निर्माण झाले या प्रश्नाचे उत्तर जटिल आहे. अमुक  एक शब्दाला अमुक अर्थ आहे वा द्यावा हे इतरांना कसे सांगितले गेले असेल हाही विवाद्य प्रश्न आहे. हातवारे करत आणि शब्द सतत उच्चारत  अमुकला अमुक म्हणायचे अशी सवय लावत एकेका टोळीने व संपर्कात आलेल्या अनेक टोळ्यांनी ठरवले असू शकते.
    भाषेचे केंद्र मेंदुतच असते असे ब्रोका केंद्रकावरुन दिसते. तसे असले तर भाषा स्वयंभू आहेत असे म्हणावे लागेल. पण मानवी प्रवासात तसे असल्याचे दिसत नाही. भाषा स्वयंभु नसून माणसाने ती प्रयत्नपुर्वकच विकसीत केली असे म्हणावे लागेल. क्रमविकास आणि क्रमखंडविकास सिद्धांत परस्परावलंबी असून कधी भाषेचा क्रमविकास सलग तर कधी खंडितपणे झाला असणे स्वाभाविक मानावे लागेल.
    माणसामद्धे भाषेची/बोलण्याची क्षमता एक लक्ष वर्ष जुनी आहे असे चोम्स्की म्हणतो. अलीकडेच अगदी निएंडरथल मानवातही गुंतागुंतीचे ध्वनी निर्माण करता येण्याची क्षमता होती हे पुरातन सांगाड्यांच्या/जीवाष्मांच्या परिक्षणाअंती सिद्ध करण्यात आले आहे.  अर्थात आधुनिक मानवाचा पुर्वज होमो सेपियनने पुर्वीच्या मानवसदृष्य प्रजातींची जागा घेतली. या मानवाचे स्वरयंत्र आजच्या एवढेच विकसीत होते काय हे मात्र तपासुन पहायला कोठलाही पुरावा उपलब्ध नाही. वेगवेगळ्या ध्वनींची निकड पण ते ध्वनी काढण्याची क्षमता नसतांना स्वरयंत्रातच झालेली उत्क्रांती ही एक संभाव्य संकल्पना आहे. तिलाही तसा पुरेसा पुरावा उपलब्ध नाही.
    असे असले तरी आपण भाषेच्या उद्गम व विकासाबाबत खालील बाबी मान्य करु शकतो. वेगवेगळ्या भागांत व वेगवेगळ्या मानवी समुहांत आधी स्वतंत्रपणे तर नंतर सामुहिकपणे भाषांचा विकास आदान-प्रदानाच्या माध्यमातुनच होत गेला गेही अनेक पुराव्यांनिशी आपण पुढे पाहणारच आहोत.

    जीवनव्यवहारांची गुंतागुंत आणि भाषा

    आदिमकाळी, म्हणजे जवळपास अडीच लाख वर्षांपुर्वी, होमो सेपियन हा आजच्या मानवाचा पुर्वज पृथ्वीतलावर विकसीत झाला. त्याचे अस्तित्व त्याने बनवलेल्या अश्म-हत्यारांमुळे आणि त्याच्या जीवाष्मांतुन मिळते. अर्थात या काळाबाबतही अत्यंत विवाद आहेत. आउट ओफ आफ्रिका सिद्धांत सध्या लोकप्रिय असला तरी तो सर्वमान्य नाही. मीही या "एकस्थाननिर्मिती" सिद्धांताशी सहमत नाही.  असे असले तरी जेनेटिक दृष्ट्या सर्वच मानवप्रजाती ही एकजिनसी आहे याबाबत मात्र जवळपास एकमत आहे. असे होण्यासाठी एकस्थाननिर्मिती व त्यांचे विस्थापन आवश्यक नाही. असो.
    विचार, जीवनव्यवहार आणी भाषा यांचा नेमका काय परस्परसंबंध आहे हे आपण येथे थोडक्यात पाहू.
    आदिम काळी माणसाचे जीवन हे अन्य प्राणीप्रजातींशी, निसर्गाशी आणि अन्य मानवी टोळ्यांशी स्पर्धा व संघर्ष करण्याने गजबजलेले असणार हे उघड आहे. माणसाला निसर्गाने अन्य प्राण्यंना दिलीत तशी नैसर्गिक साधने दिलेली नाहीत. पण त्यावरही मात करता येईल अशे विचारशक्ती माणसाला मिळालेली आहे.
    माणसाने आदिम काळीच दगडी, हाडांची (नि लाकडीही) हत्यारे बनवायला सुरुवात केली ती संरक्षणासाठी तसेच मांस खरवडून काढण्यासाठी.  ही हत्यारे बनवायला हवीत हे त्याला समजणे, इतरांना सांगणे, त्यांना कार्यप्रवण करणे आणि त्यांचा वापर अधिक कुशलतेने कसा करायचा हे ठरवणे यासाठी त्याने काही ध्वनी, खानाखुना याचा उपयोग केला असणे स्वाभाविक आहे. त्यासाठी नैसर्गिक ध्वनींचीही नक्कल केली असणार. त्याचबरोबर टोळीमधील अंतर्गत व्यवहार, स्त्रीयांचे आगळेपण, अपत्यजन्म, त्याचे रडणे आणि त्याची निरर्थक वाटणारे पण सामान्य आवाज व त्याही आवाजाची नक्कल हेही अपरिहार्य आहे. आद्य पा, बा, मा, मम इत्यादि ध्वनींनाच नंतर विकास करत त्या त्या ध्वनींना मातृ-पितृ व अन्य नातेनिदर्शक व्यापक अर्थ दिला जाणे स्वाभाविक आहे. याला आपण मानसशास्त्रात वापरली जाणारी Babble थियरी म्हणू शकतो.
    येथे हे लक्षात घ्यायला हवे कि अनेक ध्वनी मानवी जीवनात अत्यंत प्राथमिक आहेत तसेच ते वैश्विकही आहेत. प्राथमिक शब्द हे निकडीच्या गरजेतुन बनत जात त्यांची संख्या वाढायला शेकडो पिढ्या गेल्या असणे स्वाभाविक आहे. विविध ध्वनींना जोडून शब्द बनतो. पण हे ज्ञान होत असे अनेक पण सुसंगत ध्वनी जोडत आद्य शब्द बनले असले पाहिजेत.
    थोडक्यात समतालीय ध्वनी हे आद्य शब्दांचे निर्माते ठरले असल्यास आश्चर्य वाटणार नाही. किंबहुना जगातील आद्य वाद्मय, ते धार्मिक असले तरी, काव्यात आहे हे विशेष आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आद्य टोळी धर्मात यात्वात्मक क्रिया करण्यासाठी काही ध्वनी मुद्दाम निर्माण गुढतेचा आभास देण्यासाठीचा वापर झाला असणार. ध्वनी व ध्वनींचा शृंखलाबद्ध ताल्बद्ध आवाजात काहीतरी शक्ती असली पाहिजे असे त्या आदिम काळात माणसाला वाटले असणे नवलाचे नाही.
    म्हणजे आदिशब्द हे जीवनव्यवहार, जीवनाला व्यापून उरलेले भय व त्या भयावर मात करण्यासठीच्या उत्कटतेतुन निर्माण झालेली निकडही भाषेच्या आद्य संज्ञाप्रवाहाला उत्तेजन देणारी ठरली असेल. आजही अनेक मंत्र निरर्थक असले तरी तांत्रिक साधनांत वापरले जातात ते त्यांच्या विशिष्ट ध्वनींमुळे. किंवा विशिष्ट ध्वनींच्या क्रमातुन अर्थपुर्ण शब्दही असेच निर्माण होत गेले आहेत हे आपण पुरातन धार्मिक वाड्मय पाहिले तरी लक्षात येईल. त्यामुळे कधी ध्वनीशृंखलेतुन शब्द आधी व अर्थ नंतर तर कधी मनात अर्थ आधी व त्याला व्यक्त करण्यासाठी शब्द नंतर ही निरंतर प्रक्रिया भाषानिर्मितीस सहाय्यक झालेली दिसते.
    जगभरचे मानव हे एकविध रसायनातुन बनले असल्याने माणसाच्या मुलभूत विचारप्रक्रियेत एक साम्य आपल्याला आढळून येईल. त्यामुळे शब्दांतील अर्थवाहीपणा संक्रमित करणे हे तितकेसे अवघड गेले असेल असे वाटत नाही.
    म्हणजेच भाषा ही एका अर्थाने सार्वजनिक विकसन झालेली मानवी निर्मिती आहे असे आपण म्हणू शकतो. पण ही निर्मिती होत असतांना टोळीअंतर्गत जशी विकसने होत गेली तशीच ती भिन्न टोळ्यांमद्ध्येही नक्कल, उसणवा-या, देवघेव यातुनही (जशी आजही होते) तशीच पुरातन काळीही झाली असणे स्वाभाविक आहे.
    पुरातन मानव हा अन्न व शिकारीच्या शोधात भटकत असे. हे भटकणे रातंदिन नसून जोवर उपलब्ध परिसरात पुरेसे अन्न मिळते तोवर मुक्काम त्याच परिसरात असे. पुरेसे अन्न जमा झाले कि रिकामा वेळही भरपुर असे. थोडक्यत जीवनात फारशी गुंतागुंत नव्हती, पण नैसर्गिक प्रकोप, अचानक होणारे वन्य प्राण्यांचे हल्ले यामुळे भयग्रस्तही होते. याच काळात कधीतरी माणसाने, अदृष्य असलेल्या, सुष्ट शक्ती आणि दुष्ट शक्ती अशी विभागणी केली. त्या शक्तींना नांवे देता येईल एवढी भाषेने प्राथमिक अवस्था गाठलेली होती. आद्य, धुसर का होईना पण मिथ्थकथा या काळात विकसीत झाल्या असतील. नृत्य-गायनाचे ओबडधोबड प्रयोगही होत असतील. इसपु ५०-४०,००० मद्ध्ये युरोपात तसेच अन्यत्रही एकाएकी झालेले सांस्कृतिक परिवर्तन दिसते. या काळात दफने अत्यंत शिस्तबद्ध होऊ लागली. अलंकारांची, मृद्भांड्यांची निर्मितीही होऊ लागली. म्हणजेच सौंदर्याच्या आदिम कल्पना व मृत्युनंतरचे जीवनविषयक आदिम् विचार प्रकट होऊ लागले असे म्हणता येईल. अल्तामिरा ते भीमबेटकातील गुहाचित्रेही जवळपास याच काळात चितारायला सुरुवात झाली. या काळातील भाषा माणसाला शिस्तबद्ध अभिव्यक्त करता येण्याइतपत ब-यापैकी प्रगत झाली होती असे म्हणता येते. शिवाय चित्रांतुनच पुढे लिप्यांचा विकास झाला असेही आपण लिप्यांच्या इतिहासावरुन पाहू शकतो. या काळात तत्कालीन मनुष्य जवळपास आधुनिक मानवाप्रमाणे वर्तन तर करत होताच, पण भाषा, नृत्य, संगीतादि कलांचाही तो उत्कर्ष घडवीत होता असे साधारणपणे मानले जाते. गुहाचित्रे ही त्याचा पुरावा आहेत.
    अर्थात भाषेचा विकास प्रत्येक टोळीत सर्वस्वी स्वतंत्रपणे झाला असे मात्र दिसत नाही. आदिमानवाचा अन्य टोळ्यांशी येणा-या संपर्कांतुन नव्या शब्दांची अथवा पर्यायी शब्दांची देवाण-घेवाण, त्यातुन पुन्हा नवीन शोध यातुन आद्य भाषा विकसीत होत राहिली. देवाण-घेवाण फक्त भाषांची नव्हे तर धर्मकल्पना, मिथके तसेच जीवनोपयोगी शोध यांचीही होत होती. त्या शोधांत पुढे स्वतंत्रपणे भरही घातली जात होती. त्या शोधांना ज्या टोळीने शोध लावला त्यानेच नांव दिले असणार हे उघड आहे. त्याच नांवाला अपब्रष्ट वा संस्कारित करुन ते नांव पसरत गेले असे आपल्याला दिसते.
    मानवाला लागलेला सर्वात आदिम व त्याची जीवनपद्धती बदलवणारा शोध म्हणून अग्नीकडे पाहिले जाते. अग्नी हा आताचा संस्कारित शब्द आहे. आद्यकाळी उच्चारसुलभ असे जोडाक्षरविरहित आणि किमान व्याकरण असणारी भाषा असणार हे उघड आहे. आजही अस्तित्वात असलेल्या आदिवासे भाषांत हे वैशिष्ट्य शेष आहे. जीवनाची गुंतागुंत जेवढी अधिक होत जाते तसतशी भाषा गुंतागुंतीची व अर्थस्पष्टतेसाठी व्याकरणनिबद्ध होऊ लागते. भाषांचा विकास आणि मानवी व्यवहारांतील व्यामिश्रता याचा निकटचा संबंध आहे तो यामुळेच. ही व्याकरणनिबद्धता व शब्दांचे विकसित स्वरुप गेल्या काही हजार वर्षांतील आहे. विशेषत: शेतीचा शोध लागल्यानंतर मानवी जीवनात जे आमुलाग्र बदल झाले त्याने भाषांवर प्रचंड प्रभाव टाकला असे म्हणता येते.
    असे असले तरी अनेक आदिम शब्द कालौघात रुपांतरे होत का होईना पण टिकून राहिले असे म्हणता येते. आपण अग्नीचा विचार करत होतो. अग्नीचा शोध पुरातन आहे. त्याला आदिमानवाने अग्नीसदृष्ग्यच नांव दिले जे आजही टिकून आहे.
    उदा.  a-ak-ni-iš (आक्निस) भाषा - मितान्नी , प्रदेश - उत्तर सिरिया आणि दक्षीण-पुर्व अनातोलिया,
             ignis (इग्निस) - भाषा ल्यटिन, प्रदेश - इटली
      Ogon (ऒगोन) भाषा- स्लाविक , प्रदेश- पुर्व युरोप
         ugnus (ऊग्नुस) लिथुआनियन, प्रदेश लिथुआनिया
Ugnis (उग्निस)

    वरील सारे शब्द प्राक्रुत अग्गी व संस्कृत अग्नीशी साधर्म्य दर्शवतात. मध्य आशिया व त्याला निकटच्या सीमा प्रदेशात अग्नीशी साम्यदर्शक शब्द पसरलेले आहेत असे आपल्या लक्षात येईल. हीच बाब पितृ, मातृ, भ्राता, देव, असूर इत्यादि शब्दांची. या शब्दांना समांतर शब्द याच प्रदेशात हे शब्द आदिम काळातच जन्माला आले असावेत. अर्थात त्यांची मुळ रुपे अजून थोडी वेगळी असतील. उच्चारही वेगवेगळे होत असतील. या शब्दांची निर्मिती सर्वप्रथम अमुकच प्रदेशात व तमुकच टोळीत झाली असे मात्र आपण म्हणू शकत नाही. भाषाविदांनी अशा साम्यांच्या आधारावर भाषागट कल्पिले आहेत. त्यावर आपण जरी नंतर चर्चा करणार असलो तरी येथे एक बाब लक्षात घ्यायला हवी व ती ही कि भुगोल आणि भाषागट यांत निकटचे साम्य आहे. असे असले तरी अनेक भाषाविदांना "भाषागट" ही संकल्पनाच मान्य नाही. अनेक पुराशब्द वेगवेगळ्या भाषागटांतही समान आलेले दिसतात. एवढेच नव्हे तर अनेक समान शब्दांचा अर्थ मात्र अत्यंत वेगळा अथवा विरुद्धार्थी असल्याचेही आपल्याला दिसते. असे का होते हेही आपण पुढे समजावून घेणारच आहोत.
    आधीचे शब्द उच्चारसुलभ, शक्यतो जोडाक्षरविरहित अणि किमान व्याकरणाने जोडत वाक्यात सामील होत होते. प्राकृत भाषांत आणि जगभरच्या अनेक आदिवासी भाषांत हे प्रकर्षाने दिसुन येते. टोळीजीवनातील निमभटका मानव जसा स्थिर झाला, तसा त्याच्या भाषेची निकड बदलेल्या व व्यामिश्र होऊ लागलेल्या जीवनव्यवहारांमुळे वाढत गेली. त्यातुनच त्याने शब्द वाढवत नेले. आहे त्या शब्दांचे विविधांगी वापर सुरु केले अथवा त्यांच्यात काही वर्णांची भर घालत नवे शब्द तयार केले. शेतीशी निगडित शब्द याच काळात वाढू लागले. राज्यव्यवस्था, मग ती गणसंस्था असो कि राजसंस्था, त्याशी, व्यापाराशी, सैन्य आणि युद्धे याशी, नगररचना आणि त्याशी निगडित सामग्रशी संबंधित व तसेच गुंतागुंतीच्या होऊ लागलेल्या धर्म व तत्वप्रणालीशी संबंधीत शब्द व त्यांन अधिक अर्थवाही करण्यासाठी व्याकरण या गरजा भासणे स्वाभाविक होते. हे सारे माणसाने सर्वस्वी स्वतंत्रपणे केले असे नाही तर देवाण-घेवाणसुद्धा केली. यातुनच भाषांचा विकास होत गेला.
    थोडक्यात भाषांचा उगम माणसाच्या नैसर्गिक अभिव्यक्तीच्या गरजेतुन व त्याला असलेल्या स्वरयंत्राच्या उपलब्धतेतुन झाला. तो बोलु लागला. त्याचे बोलणे परिणत भाषेत हजारो वर्षांच्या प्रवाहातून झाले.
    भाषेचा उगम हा एकाकी (आयसोलेटेड) नसून सामुहिक आहे. मनुष्य विचार करतो, बाह्य घटनंना प्रतिसाद देतो आणि व्यक्तही होतो. भाषा ही व्यक्त होण्याचे माध्यम आहे हे माणसाच्या अत्यंत आरंभकाळीच लक्षत आले व अनावर कुतुहलातून त्याने त्या क्षमतेला विस्तारित करत नेले म्हणून भाषा निर्माण झाली असे आपण म्हणू शकतो. नुसत्या नक्कलेच्या प्रवृत्तीतुन विविध ध्वनी निर्माण करण्याची क्षमता वाढली असली तरी त्यातून भाषेचा उदय झालेला नाही, तर नक्कलेची प्रवृत्ती त्याला सहाय्यकारी घटक ठरला एवढेच आपण म्हणू शकतो. माणसाची विचार करण्याची क्षमता भाषेच्या उगमाला मुख्य कारण ठरली व सामुदायिकपणे त्याने भाषा विकसित केली असे आपल्याला म्हणता येईल.
    असे असले तरी गेल्या तीन-चारशे वर्षांपासून एका भाषेने अन्य भाषांवर प्रभाव टाकत मुळ भाषा नष्ट केल्या असे दावे केले जात आहेत. यात इंडो-युरोपियन भाषागट सिद्धांताचे युरोपियन जन्मदाते जबाबदार आहेत. या सिद्धांताने भाषिक कमी, सांस्कृतिक प्रश्न अधिक उपस्थित केले आहेत. एका विशिष्ट स्थानावर पुरा-इंडो-युरोपियन भाषा बोलणारा मानवी समूह टोळ्याटोळ्यांनी भारत ते युरोप असा पसरला आणि त्यामुळे या भाषेचा प्रचार-प्रसार झाला असे या सिद्धांताचे थोडक्यात म्हणने आहे. या सिद्धांतात तथ्य आहे काय हेही आपल्याला तपासून पहायला हवे.

No comments:

Post a Comment