भविष्यातील काही शोध
आणि आव्हाने!
प्रगत राष्ट्रांत
सध्या जोरदार चर्चा चालु आहे ती श्रमिकांची व कनिष्ठ कार्यांसाठी लागणा-या
कर्मचा-यांची जागा यंत्रमानवांनी घेणे कितपत संयुक्तिक व नैतिक आहे यावर. औषधी
उत्पादन, शेतकी ते अनेक रसायनी उद्योगांत
अवाढव्य कारखाने यंत्रमानवांच्या वापराला पसंती देतांना दिसून येतात. काहींनी
त्यांचा वापर सुरुही केला आहे. त्यात आता भर पडली आहे ती म्हणजे "कृत्रीम
बुद्धीमत्ता" (Artificial
Intelligence) या वेगाने विकसित होत चाललेल्य
संकल्पनेची. येथे मानवी मेंदुची जागाच संगणक कसे घेतील याचा प्रयत्न सुरु आहे.
संगणक सध्या माहितीचे विश्लेशन करतो पण निर्णय घेत नाही. आवाज ऐकुन त्याचे
भावात्मक विश्लेषन करत नाही. वासही घेऊ शकत नाही कि पर्यावरणीय बदलांना प्रतिसादही
देत नाही. विचार करणे हे मानवाचे महत्वाचे वैशिष्ट्य. पण सध्याचे संगणक विचार करु
शकत नाही.
पण संगणकांनी तसे
करावे...किंबहुना संगणकांनी मनुष्याचीच जागा घ्यावी यासाठी प्रयत्न होत आहेत. त्याच्यात
अगदी भाव-भावनाही असाव्यात व विवेकी
अभियुक्तीही असावी असे प्रयत्न वेगाने सुरु आहेत. सध्याचे संगणक या कामासाठी
पुरेसे सक्षम नाहीत.
पण यासाठी
पुंजयामिकीय संगणकप्रणाली (Quantum
mechanic based system) बनवता येईल अशी
संकल्पना मी १९९८ साली बेंगलोर येथे एका कार्यशाळेत मांडली होती. हे काम माझ्या
हातून होऊ शकले नसले तरी आता जगात याही दिशेने प्रयत्न सुरु आहेत व त्याला नजीकच्या
भविष्यात यश मिळेल यातही शंका नाही. सध्या ३६ क्युबिट क्षमतेचे क्वांटम संगणक
बनवता येऊ शकतील अशी प्रगती झाले आहे. हे संगणक वास्तवात आले तर आज आपण कल्पनाही
करू शकत नाही अशा अद्भुत क्षमता असतील. त्या व मोबाईल प्रणालीत काय संभाव्य बदल
होतील आणि मानवी जग पूर्णतया कसे बदलून जाईल याचे वर्णन मी माझ्या “भविष्य नावाचा
इतिहास” या कादंबरीत केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता मग “कृत्रिम” राहणारच नाही.
मानवजातीला एक प्रबळ प्रतिस्पर्धी येऊ शकेल पण त्याच्यावर विवेकी नियंत्रण कसे
ठेवायचे याचाही विचार आतापासूनच करावा लागेल.
शिवाय मानवी मेंदू
व संगणकीय चिप्स यांचा संकर करुनही अधिक प्रगत अर्धयंत्रमानव बनवता येईल काय या
शक्यतेवर केवळ विज्ञानिकाच नव्हे तर शास्त्रज्ञही विचार करत आहेत. प्रयोग करत
आहेत. म्हणजेच माणसाची जागा संगणक व सध्याच्या विशिष्ट कामाच्या हेतूने बनवलेल्या
रोबोपेक्षा हे यंत्रमानव म्हणजे प्रतीमानवच होतील. त्यातून फ्रांकेस्टैनसारखी
विघातकताही जन्माला येऊ शकेल. त्यात साध्याच कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग अनेक
राष्ट्रे सामरिक हेतूसाठी आजच करु लागले आहेत. चीन यंत्रमानवांचे सैन्य खडे
करण्याचा प्रयत्न करत आहे. जर अतिप्रगत बुद्धीमत्तेचे यंत्रमानव सैनिक म्हणूनही
वापरात आले तर जगात काय हाहाक्कार माजेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही.
उद्योगांत साध्याच
विशिष्ट कामासाठी निर्माण केलेले यंत्रमानव वापरात येउ लागले आहेत. ते सध्या कुशल
कामगारापेक्षाही अनेक पटीने उत्पादन कार्य करतात. मानवी कामगारांसारख्या समस्या
त्याला नसतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अत्यंत उच्च दर्जाचे उत्पादन होऊ शकते. समजा
उद्या सर्वच उद्योगांनी यंत्रमानव वापरायला सुरुवात केली व पगारी कामगारांची गरजच
संपवली तर काय हाहा:कार उडु शकतो याची आपण कल्पना करु शकतो. त्यात बुद्धीमान मानवसदृष
संगणक-मानवाची निर्मिती झालीच तर मग तर मनुष्याचीच गरज राहणार नाही कि काय अशीही
भिती आहेच. रोबोटिक्सचा उपयोग आजच अनेक क्षेत्रांत करायला सुरुवात झाली आहे. उद्या
ती लाट सर्वत्र पसरायला वेळ लागणार नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर फ़ोक्सकोन
(Foxconn) या जगातील अवाढव्य कंत्राटी उत्पादक
कंपनीचे घेता येईल. चीनमद्ध्ये २०११ साली या कंपनीचे दहा लाख कर्मचारी होते. याच
वर्षी कंपनीने दहा हजार रोबो बसवले व "यंत्रमानवीकरणाची" सुरुवात केली.
आता दरवर्षी तीस हजार रोबो बसवले जात आहेत. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टेरी
गौ म्हणतात कि हाच दर ते प्रतिवर्षी एक लाख रोबो एवढा वाढवनार आहेत. याचाच अर्थ
दहा लाख कर्मचा-यांची गरजच राहणार नाही. अन्य कंपन्यांचीही हीच दिशा आहे. सध्याच कृत्रिम बुद्धीमात्तेनेच असंख्य नोकर्या जाऊ लागल्या आहेत. त्यात
बुद्धीमान यंत्रमानवांचीही भर पडली तर मानवी जग कोलमडून पडेल अशी भीती विद्वान
व्यक्त करतात पण प्रत्यक्षात मात्र त्याचा प्रभाव पडत नाही.
याचा अर्थ आम्हा
भारतियांना आजच समजावून घ्यावा लागणार आहे. एकीकडे रोजगार कमी होतील हे जेवढे सत्य
आहे तसेच दुसरीकडे या नव्या क्षेत्रांत मानवी रोजगारही वाढतील असा आशावाद अनेक अर्थतज्ञ करतात. कोणाचा आशावाद अथवा निराशावाद खरा
ठरेल याचे भवितव्य वर्तवता येणे शक्य नसले तरी बुद्धीमान यंत्रमानव व अतिप्रगत कृत्रीम
बुद्धीमत्ता ही आव्हाने बनणार आहेत हेही खरे.
वरील बाबतीत
नैतिकतेचा सिद्धांत चर्चीला जातो. माणसाची जागा प्रगत कृत्रिम श्रमकौशल्ये व
कृत्रीम बुद्धीमत्तेला घेऊ देणे हे नैतिक होणार नाही कारण त्यामुळे माणसांचीच गरज
संपेल व हे नैतिक व मानवीय होणार नाही असा युक्तिवाद केला जातो. या
युक्तिवादात नक्कीच तथ्य आहे. परंतू नैतिकतेचाच इतिहास पाहिला तर माणसाने आपल्या
नीतितत्वांतही सोयीनुसार फरक केल्याचे आपल्या लक्षत येइल. संगणक क्रांती येण्याआधी
भारतात तिला नैतिकतेच्याच पातळीवर विरोध करणारे, अगदी विद्यमान सरकारात असलेल्या
पक्षासहित, अनेक होते हे आपल्याला माहितच आहे. पण
नीतिमुल्ये बदलतात. कायदेही बदलतात. त्यामुळे भविष्यात कायद्यांचे अथवा नैतिक
मुल्यांचे संरक्षण राहीलच असे नाही. ते वेळ येताच जाऊ शकते याचे भान आम्हाला असले
पाहिजे. कोणतीही नीतिमुल्ये ही स्थिर नसतात. भविष्यातील मुल्ये काय असतील याबाबत
अंदाज बांधले जात असले तरी ते सत्यात उतरतात असे नाही.
त्यात सुक्ष्माणु
(Nano) तंत्रज्ञान आज प्रगतीपथावर आहे. ते असेच प्रगत होत गेले तर धुळीच्या कणापेक्षा
सूक्ष्म असलेले बुद्धीमान सुक्ष्माणुसुद्धा विकसित होतील. तेही मानवी जगाचा चेहरा
मोहरा बदलून टाकण्यात सक्षम असेल. ज्या राष्ट्राच्या हाती हे तंत्रज्ञान लागेल ते
सर्व जगावर अधिसत्ता निर्माण करेल. राष्ट्रा-राष्ट्रातील संघर्ष वेगळे पण भयावह
रूप धारण करतील. हे येऊ घालणारे (आणि आजही वापरात येऊ लागलेले) प्रगत तंत्रज्ञान क्वांटम
तंत्रज्ञानाच्या हातात हात घालून आले तर मानवजातीसमोरची आव्हाने अजूनच वाढतील. मानवी हातांना वा बुद्धीला वावच राहिला नाही तर सारेच्या सारे
बेरोजगार होतील आणि सारी अर्थव्यवस्था ढासळून पडेल. असे होऊ नये यासाठी काही
पर्याय निर्माण होतील काय याचा वेध आपण पुढील लेखात घेऊ.
-संजय सोनवणी
No comments:
Post a Comment