Wednesday, December 16, 2015

परमेश्वर ही संकल्पना.....



ईश्वर आहे कि नाही हा वादाचा विषय नसून विविध व्यक्तींना ईश्वर म्हणजे नेमके काय अभिप्रेत असते हा खरा विषय आहे. बुद्धीवादी पातळीवर सदय असलेला, प्रार्थनांनी खूष होणारा, न केल्यास कोपणारा "भावनिक" परमेश्वर अस्तित्वात असणे शक्य नाही. तसा ईश्वर मानल्यास त्याला अतिमानवी रूप देणे सहज शक्य होते. मानवासारख्याच, पण अचाट लीला तो सहज करू शकतो. मानवासारखेच त्यालाही राग-लोभ असू शकतात. पुराकथा पाहिल्या तर त्यातील बव्हंशी सामान्यांचा देव हा असाच असतो. फार आध्यात्मिक झाले तर सर्व सृष्टीचा निर्माता, सर्व चराचरात भरलेला तरीही दशांगुळे व्यापून उरलेला अचिंत्य असा पण अंतिम मोक्षदाता असा परमेश्वर अस्तित्वात तात्विक पातळीवर येतो. असाही परमेश्वर अस्तित्वात असू शकेल अशी कल्पना करणे श्रद्धीय बुद्धीवादी मनुष्याला संयुक्तिक असले तरी ते तार्किक बुद्धीवादी पातळीवर ते मान्य करता येत नाही.

परंतू भावनात्मक पातळीवर, जी वास्तवच असते, अशा परमेश्वराचे अस्तित्व असणे, त्याचा आधार वाटणे अस्वाभाविक आहे काय? मनुष्य हा मुळात भावनिक प्राणी आहे आणि भावनिक विश्व हे वास्तव रखरखीत विश्वापेक्षा वेगळे व तरल असते. त्यात देव/ईश्वर असू शकतो. माणसं त्याला सखा-सवंगडी मानत, आपल्या संकटांचा भार त्याच्यावर टाकत वाट दाखवण्याची अथवा संकटमूक्त करण्याची अपेक्षा बाळगत आपल्या जीवनातील अनिश्चिततेला भावगम्य स्थिरता देवू पाहतात. हे मानवी भावनिक स्वभावाला साजेशेच आहे. शेवटी मनुष्याला स्वत: तो मनुष्यच वाट दाखवतो, पण त्या प्रेरणा ईश्वरविषयक जाणीवांतून अधिक टोकदार होतात हे सामान्य मानसशास्त्र आहे. संकटांशी झुंजतांना काहीतरी अलौकिक सोबत आहे ही जाणीव माणसाला बळ देवू शकते. ते वास्तवात नसले तरी भावनिक पातळीवर ते अस्तित्व प्रबळ असते म्हणून ते भावनेपुरते ते सत्यही असते.

प्रेम हीसुद्धा मग एक अमूर्त व सिद्ध न होऊ शकणारी गोष्ट आहे. पण प्रेमभावनेच्या बळावर मनुष्य अशक्यप्राय कार्ये करू शकतो हे सिद्ध झालेले आहे. "प्रेम" खोटे आहे असे म्हणने प्रेमभंग झालेल्यांसाठी म्हणणे ठीक असले तरी कशाचा तरी भंग झाला असेल तर ते वास्तव का नसेल? प्रेमभावना आणि ईश्वरविषयकच्या भावनेत साम्य आहे हे लक्षात घ्यायला हवे.

पण ईश्वर आहे कि नाही हा खरा वादाचा विषय नसून विविध व्यक्तींना ईश्वर म्हणजे नेमके काय अभिप्रेत असते हा खरा विषय आहे. प्रत्येकाचा ईश्वर वेगळा. संकल्पना वेगळी. खरे तर जेवढी माणसे तेवढे ईश्वर. त्याच्याकडून अपेक्षाही वेगवेगळ्या. अशा स्थितीत ईश्वर ही संकल्पना एका व्याख्येत बसवता येणे हेही अशक्य आहे असे आपल्या लक्षात येईल!

ईश्वर नाकारणे नाकारणा-यांसाठी ठीक आहे. पण ते नेमके काय नाकारत आहेत हे त्यांनी आधी स्पष्ट केले पाहिजे! मानवी मानसिकता सबल करण्यात ईश्वराविषयकची संकल्पना उपयुक्त ठरली आहे. धर्मांधांनी, ईश्वर संकल्पनेचा स्वार्थासाठी उपयोग करून घेत लोकांचे शोषण करणारे व करू दिले जाणारे हे निश्चितच दंडार्ह आहेत हे खरे. पण म्हणून संकल्पनेलाच कसे उध्वस्त करता येईल? प्रेम ही संकल्पना असंख्यदा दुरुपयोगिली जाते म्हणून प्रेमच नको अथवा ती खोटी आहे असे भावनामय माणूस कसे म्हणू शकेल? किंबहुना भावनायुक्त माणसाची ती अपरिहार्य निकड बनते. मग संकल्पनेला नांव काहीही दिले तरी काही फरक पडत नाही.

मुळात ईश्वर या संकल्पनेचा उगम अखिल मानवाच्या असुरक्षिततेच्या, अनिश्चिततेच्या आणि भयभीततेच्या पुराआदिम जाणीवांच्या विस्फोटातून निर्माण झाली आहे. किंबहुना आपल्या भयभीत मनाला सुरक्षेचे एक कवच म्हणून ती त्याने विकसीत केली आहे. माणसाचा ईश्वर म्हणजे स्वत:च्या काळोखावर/संकटांवर मात करणारा त्याच्याच मानसिकतेचा एक घटक. त्या घटकाला माणूस स्वत:पेक्षा वेगळा व श्रेष्ठ-शक्तीशाली मानतो. जीवनातील अनाकलनीय सृष्ट-दूष्ट घटना या त्याच्याच इच्छेमुळे होतात असेही तो मानतो. माणुस जितका असुरक्षीत होत जातो तितकीच ईश्वराची गरज त्याला जास्त भासते.

आदिम काळात मनुष्य जितका असुरक्षित होता किंबहुना तितकाच असुरक्षीत आजही आहे. न्याय/कायदेव्यवस्था/प्रशासन त्याला अजुनही पुरेशी सुरक्षा देवू शकलेली नाही. आर्थिक असुरक्षितता आणि अनिश्चितता तर त्याला सदैव ग्रासून असते. कोणताही निर्णय अंतिम परिणाम काय देईल हेही परिणाम दिसेपर्यंत त्याला सांगता येत नाही. त्याचे असे गणितही नाही कारण परिणामावर परिणाम करणा-या अनंत घटकांच्या परस्पर संबंधंचे भाकीत करणे जवळपास अशक्य होऊन जाते. हे जे काही अनाकलनीय आहे त्याचे निराकरण माणुस करू शकत नाही.

मानवी जीवनात वास्तवापलीकडेही वास्तवे असतात. कल्पनांपलीकडेही कल्पना असतात. मानवी शरीर गणिती-भौतिकी नियमांनी जावू शकते पण गणीतही शेवटी मानवनिर्मितच असते. मानवी आकलनाबाहेरही गणित उरतेच. नाहीतर त्यातही नवी संशोधने होत नवी प्रमेये मांडली गेली नसती. माणसाला समजलेले भौतिक विश्वही मानवी मर्यादेच्या आतच असते. आपण निरपेक्ष असू शकत नाही म्हणूणच आपण सापेक्षतेच्या चौकटीत वैश्विक नियम बांधतो. पण विश्व मानवी नियमांना बांधील असतेच असे नाही. म्हणून प्रश्न अनंत व उत्तरे थोडी अशी अवस्था असतेच. एक उत्तर सापडले कि त्यावरही नवीन प्रश्न निर्माण होतात. ते सोडवायला माणुस अजून धावतो. किंबहुना ही धाव अजरामर आहे.

माणसाच्या या अजरामर कुतुहलाला व ते शमवण्यासाठी केलेल्या, करीत असलेल्या धडपडीला त्रिवार सलाम. मानवी विचारांच्याही चौकटी तोडता येतील तेंव्हाच वैश्विक सत्ये सापडू शकतील. तोवर त्यांना आपण केवळ "मानवी सत्ये" (जी अनिश्चित आहेत) म्हणू शकतो. त्यांना अंतिम सत्य म्हणता येणार नाही. विज्ञानातही अनेक मित्या, अनेक विश्वे, कृष्णविवरे, धनात्मक गुरुत्वाकर्षण अशा अनेक कल्पना विश्वाचे कोडे उलगडण्यासाठी वापरल्या गेल्या आहेत. गणित सोडवण्यासाठे क्षणभर तरी ही गृहितके खरीच धरावी लागतात. ही आपली मर्यादा आहे. अज्ञानाच्या गहन कुहरात आपण आहोत आणि आपण प्रकाशाच्या शोधात आहोत.

हा शोध कशावर तरी श्रद्धा असल्याखेरीज कसा पुर्ण होईल? परमेश्वर हीसुद्धा एक संकल्पनाच आहे. जीवनाचा एक निराकार मानसिक आधार शोधणारी संकल्पना. म्हणून जेवढ्या व्यक्ती तेवढे ईश्वर.  निरपेक्ष स्थितीत ईश्वराचे मुळात अस्तित्वच नाही. ते वास्तव असू शकत नाही. तरीही ती जोवर माणसाला उपयुक्त आहे किंवा तिला सक्षम पर्याय मिळत नाही तोवर ईश्वरवादी सामान्य माणसांना "देवभोळे", "भोळसट", "अंधश्रद्ध" वगैरे म्हणत हीणवायचा काय अधिकार आहे? जोवर कोणाच्याही श्रद्धा स्वत:च्या व इतरांच्याही शरिरीक/मानसिक किंवा आर्थिक हानीचे कारण होत नाही तोवर त्या अंधश्रद्धा कशा?

ईश्वराची गरज जीवनातील अनिश्चिततेमुळे आहे. असुरक्षिततेमुळे आहे. आणि लोकांना उद्याची शाश्वती देता येईल अशी व्यवस्था आपण जोवर  आणत नाही तोवर लोकांचे देवभोळेपण जाईल ही आपली अंधश्रद्धा आहे. असुरक्षिततेचे प्रमाण आणि ईश्वरी अस्तित्वाची तीव्रता यात असा हा अन्योन्य संबंध आहे.

6 comments:

  1. शेवटी काय वाघ म्हटले तरी मारतोच आणि वाघोबा म्हटल तरी मरण किंवा त्याबाबतची अनिश्चितता अपरिहार्यच आहे (एका वाक्यात टेन्शन म्हणू) शेवटी आस्तिक काय नास्तीक काय जीवनाचे वास्तव तो आपआपल्यापरीने अनुभवतच असतो. पण ईश्वर मानन किंवा न मानणाऱ्यांसाठी केवळ यांत्रिक/तांत्रिक/तार्किक विश्लेषणांबरोबरच deep Humanitarian Values किंवा नैसर्गिक मूल्यांचे ‍िवष्लेशण सतत शोधणे मानवी मनाचे दैनंदिन विचार व्यवहार ज्यात सुख दु:ख जाणीवा एकमेकांची किंमत/विविधांगी विकास /निराशा नकारात्मकता असफल वाटणे या अशा अनेक वैशिष्टयांवर ईश्वर विरहित मात करतांना नैसर्गिक तथ्यांचे वेळोवेळी भान /जाण ठेवणारे प्रशिक्षण त्याची मानवी /नैसर्गिक जीवना वारंवार निर्माण होणाऱ्या संकटातून/समस्यांची/ताणांची पडताळणी व समज घडवणारी धीर देणारी स्वयंअध्ययनाची यंत्रणा शोधावी लागेल किंवा त्याबाबत लोकायत किंवा माझ्यासाठी आता उत्तर शोधण्यासाठी नव्याने जैन किंवा बौध्द धर्माच्या जुन्या नाही प्रागतिक विचारधारेतून विचार /अनुभव घेण्यास काहीही हरकत नाही. जी जाणीवेवर आधारित वरील मुल्यांची वारंवार चिकित्सा करण्यास कुठलाही प्रतिबंध करत नाहीत.जी प्रत्यक्ष ज्ञान करुणा तसेच दु:खा /तणावाबाबतची तटस्थता याबाबतचे भावनिक व्यवस्थापन /किंवा वास्तव स्वीकारण्यास भक्ती वगळता ध्यान, मनाचा जागेपणाबाबत नैसर्गिक मोकळेपणाचा अनुभव घेण्याबाबत मार्गदर्शन करु शकतील.पण मानवी जीवन कुठलेही कृत्रिम धर्म मुक्त/देवमुक्त मोकळा श्वास घेणारे आहे. ते गरजेपुरताच देवाचा वापर करतात. नंतर विसरतात. शेवटी हा मानवी प्रयत्नच आहे.

    ReplyDelete
  2. Buddhism is the answer of all question

    ReplyDelete
  3. दिनेश निकुंभ सर ,
    आपण म्हणता तसे ,बौद्ध धर्म हेच जर एकमेव उत्तर असेल तर १२५ कोटी लोकसंख्येत धर्मनिहाय लेटेस्ट सेन्सस प्रमाणे फक्त ८६ लाखच बौद्ध कसे ?इतर लोक अजून बौद्ध धर्म का स्वीकारत नाहीत ?
    आपल्या समारंभात निळा रंग गुलाला ऐवजी का उधळीत नाहीत ?
    १२४ + कोटी लोकांना बौद्ध धर्म नकोसा वाटतो असे का ?
    बुद्धकाळात जे बौद्ध झाले त्यांची संख्या गणिताने कितीतरी कोटी असायला हवी होती ,तसेही दिसत नाही,मग त्याकाळच्या बौद्धांनी परत धर्मांतर केले का , ते कुठे गेले ?

    ReplyDelete
  4. in this situation 'black hole' most powerful books :)

    ReplyDelete
  5. वास्तविक देव / ईश्वर / परमेश्वर मानणे हि जगातील सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे. दिनेश जे म्हणत आहेत ते १००% बरोबर आहे. खरेतर बौद्ध हा मुळीच धर्म नाही, तर ती एक जीवन जगण्याची कला/पद्धती आहे, म्हणूनच धर्म म्हणण्या ऐवजी त्याला धम्म असे म्हटले जाते. हेच त्याचे इतर धर्मांपासूनचे वेगळेपण आहे, ना स्वर्ग, ना नरक, ना ईश्वर यांवर विश्वास तरीही प्रचंड मानववाद-माणसा बद्दलचा कळवळा, माणसाला दुःख मुक्त करणे हाच मूळ उद्देश. माणूस आणि माणसाचे माणसाशी असलेले या जगातील नाते हाच बौद्ध धम्माचा केंद्रबिंदू आहे. काळाच्या ओघात हा धम्म जरी भारतातून नष्ट झाल्यासारखे चित्र जरी निर्माण झालेले असले तरी भारतीय संस्कृतीवर या धम्माचा अजूनही मोठा पगडा आहे. सध्या भारतातील बहुतांश संप्रदाय (उदा. नाथपंथी, वारकरी, भागवत इ.) हे बौद्ध धम्माच्या चालीरीतीनुसारच चालत आहेत. हा धम्म भारतातून नामशेष झाल्यासारखे जरी वाटत असले तरी प्रत्येक भारतीयांच्या मनात कोणत्यानाकोणत्या रूपाने घर करून राहिलेला आहे, हे विसरून चालणार नाही. एकेकाळी बहुतांश भारत हा बौद्धमयच होता. आपले पूर्वज हे बौद्ध धम्माचेच होते तद्वत अनेक कारणांमुळे (राजाश्रय संपला, तत्वे इतर धर्मियांनी आत्मसात केली, काही धर्मांध राजांकडून भिक्खूचे मुंडके आणून देणाऱ्यास मोठी इनामे ठेवण्यात आली, इस्लामी आक्रमणे, भिक्खूंना इतर देशांमध्ये जाणे भाग पडले इ.) हा धम्म लोप पावला असे वरकरणी दिसत असले तरी तो आपल्या मध्ये कायमस्वरूपी राहणार आहे हे मात्र नक्की.

    ReplyDelete
  6. बौद्धांच्या कोणत्या चालीरीती आपण स्वीकारल्या आहेत, हे समजावून सांगितल्यास बरे होईल!

    अरुण पंत.

    ReplyDelete

जनानखान्यांचे अद्भुत विश्व!

  जनानखाना, ज्याला अंत:पूर, राणीवसा किंवा हरम असेही म्हटले जाते त्याबाबत समाजामध्ये अनेक समजुती प्रचलित आहेत. शत्रूच्या जिंकलेल्या स्त्रीय...