Monday, December 21, 2015

देव हवा कि नको?

पण काही लोकांना रक्तपात सुंदर वाटतो. अनेकांना देव किंवा अल्ला, आकाशातील बाप वा यह्वे रक्तपाताच्या घटना घडवून आणु शकतील अथवा तशी स्थिती उत्पन्न करतील म्हणून प्रिय वाटतात...जास्तच पुजनीय व विश्वसनीय वाटतात. देव विरुद्ध अल्ला किंवा यह्वे विरुद्ध अल्ला-देव वगैरे लढे तेच तय करुन ठेवतात. कोण एकमात्र आणि कोण एकमेव श्रेष्ठ हे यांचे एकमात्र श्रेष्ठ देव ठरवत नाहीत तर त्यांनीच म्हणे बनवलेली ही निष्प्राण प्रजा ठरवनार!

पण कोण श्रेष्ठ? कोणाचा मान्य देव श्रेष्ठ? ते एकमेव असतील तर एकमेव देवांतही बहुदेवतावाद आणनारे, म्हणजे हा देव श्रेष्ठ कि तो, महामुर्ख नव्हे काय? आणि जे बहुदेवता मानतात ते मरणाचे अधिकारी कसे? आणि हे ठरवणारे तुम्ही कोण? तुमच्या अल्ला, आकाशातील बाप, यह्वे, इंद्र, शिव वगैरेंना जर त्यांच्यात नेमके कोण खरे आणि एकमेव हे ठरवता येत नसेल तर ते ठरवणारे तुम्ही कोण? कोणत्या पुस्तकात लिहिले असेल तर ते कोणी लिहिले? आकाशातला बाप अथवा अल्ला अथवा परमेश्वर माणसाच्या हृदयावर माणुसकीचे अजरामर संगीत लिहित असतो...तो भाकड पुस्तके लिहित बसत नाही. कोणा एका माणसाला तो आपला संदेष्टा अथवा प्रेषीत बनवायला महामुर्खही नाही. मुर्ख माणसे असू शकतात....असलाच कोठे तर...तो परमेश्वर तरी नक्कीच मुर्ख नाही!

असली तर सारी माणसेच त्या परमेश्वराचे संदेष्टे आहेत. प्रत्येक माणूस हा प्रेषित आहे. प्रत्येक माणूस हा परमेश्वरही आहे. त्याचे जीवनगाणे आणि अनावर संघर्ष हेच ईश्वरी गीत आहे.

आणि सर्वांचे मिळून जे महागीत होते तेच खरे विश्वगीत आहे.

पण आमचे गीत नाही. पण आमचे सुस्वर संगीत नाही. पण मग आमचा कोणी ईश्वरही नाही. तुम्हा बेवकुफांना रानटी रान मोकळे द्यायला त्याला वेड लागलेले नाही. त्याने जे न लिहिता लिहिलेच आहे ते पुन्हा कोणा माणसाच्या (प्रेषित-अवतार वगैरे) माध्यमातून त्याने सांगितले हे मानणे जेवढा मुर्खपणा आहे त्यापेक्षा अधिक गाढवपणा त्या माध्यमालाही दैवत्व देण्यात आहे.

रक्तपात सुंदर वाटतो काहींना कारण त्यांना ईश्वराचे गीत माहित नसते. अमुकला मी मानतो आणि तोच खरा, तू ज्याला मानतो तो खोटा असे जो कोणताही धर्मग्रंथ सांगतो आणि त्यासाठी रक्तपाताचे आदेश देतो तो धर्म नसून अधर्म आहे. असे सांगणारे धर्मग्रंथ ईश्वराचाच घोर अवमान करत असतात. खरा देव आणि खोटे देव अशी वाटणी स्वार्थी माणसाला सोयीची असली तरी मुळात देव खराही नाही आणि खोटाही नाही. रक्तपात, द्वेष, लुटालुट इत्यादि अधम भावना बाळगणा-यांना देव असू कसा शकतो? असे सांगणरे "प्रेषित" अथवा "अवतार" अस्तित्वातच कसे येऊ शकतात? ते काही खरे नाही.

जगातले सारे धर्मग्रंथ प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रक्तपातच शिकवतात ते धर्मासाठी नव्हे तर राजकारणासाठी. वर्चस्व निर्माण करण्यासाठी. परमेश्वराची संकल्पना या अमानवीपणासाठी नाही. संघर्ष धर्माचा नाही. संघर्ष यह्वे-अल्ला-आकाशातला बाप-देव यांच्यात नाही. तुम्ही नांवे तुमच्या सुमार बुद्धीने वेगवेगळी दिली असतील...पण ते एकच...एकाच मानवी अद्भूत संकल्पनेचे तरल पातळीवर वावरणारे रूप आहे!

संघर्ष हा कोणाचे वर्चस्व कोणत्या मानवी गटावर असणार यासाठी आहे. त्यासाठी हे पापी देवांनाही वेठीला धरतात. देवांनाच शस्त्र म्हणून वापरतात.

त्यांना रक्तपात सुंदर वाटतो. माणसे तडफडत मरतांना पाहतांना त्यांना आनंद वाटतो. खुनशीपणात त्यांना ओर्गाझम झाल्याचा विकृत आभास मिळतो. हे किंवा ते तोडण्यात त्यांना उन्माद चढतो. स्त्रीयांवर बलात्कार करण्यात या हिजड्यांचे पौरुष उफाळल्यागत विझते. माणसे जिंकतात...माणसे हरतात. माणसे बलात्कार करतात...माणसे बलात्कारित होतात...

आणि यांचे देव-अल्ला-आकाशातील बाप-यहवे वगैरे जेवढेही देव असतील तेही तेवढेच बलात्कारित होतात आणि तेही बलात्कारी होतात!

आम्हीच आमच्या देवांवर बलात्कार करतो किंवा त्यांना बलात्कारी करतो.

ईश्वर-अल्ला-यहवे वगैरे सुंदर संकल्पनांची निघृण विटंबना करतो....

आम्ही माणसातल्या माणसाची विटंबना करतो!

आम्हाला देव हवा कि नको हा प्रश्न उरत नसून देवांनाच आम्ही हवे आहोत कि नकोत हा प्रश्न विचारायला हवा!

No comments:

Post a Comment

जनानखान्यांचे अद्भुत विश्व!

  जनानखाना, ज्याला अंत:पूर, राणीवसा किंवा हरम असेही म्हटले जाते त्याबाबत समाजामध्ये अनेक समजुती प्रचलित आहेत. शत्रूच्या जिंकलेल्या स्त्रीय...