Wednesday, January 13, 2016

मनुस्मृतीचा भुगोल

कोणता ग्रंथ कोणत्या भुभागात लिहिला गेला आणि त्या ग्रंथकर्त्याला कोणता भुगोल माहित होता यावरून अनेक महत्वाच्या बाबींचा उलगडा होतो. त्यात हा धर्माशी निगडित ग्रंथ असेल तर धर्मेतिहासाच्या दृष्टीने त्याचे महत्व अजुनच वाढते. मनुस्मृती हा ग्रंथ धर्माज्ञा, धर्मनियम आणि समाजव्यवहाराशी निगडित आहे. कोणताही धर्माज्ञा देणारा ग्रंथ या धर्माज्ञा अर्थातच आपला धर्म मानणा-या लोकांसाठी देणार हे उघड आहे. ज्या भागात हा धर्म प्रबळ अथवा उदयोन्मूख आहे त्या भागातील आपल्या धर्मियांसाठीच या आज्ञा विहित असतील हेही उघड आहे. आणि ग्रंथकर्त्याला ज्ञात असणारा भुगोल या परिप्रेक्षातच पहावा लागेल हेही तेवढेच सत्य आहे.

पुरातन काळात भुगोलाचे माणसाचे ज्ञान मुळात अल्प होते. राष्ट्र ही संकल्पना उदयाला आलेलीही नव्हती. माणसाला दुरच्या भुगोलाची माहिती त्याला भटक्यांकडून, प्रवाशांकडून अथवा व्यापा-यांकडून मिळायची आणि स्थानिक माणूस तिचे मिथकीकरण करत वापरायचा हे आपणास माहितच आहे. ग्रंथकर्ता आपले स्थान हे पृथ्वीचा मध्यबिंदू मानत असे. इजिप्शियन लोक मेंफिसलाच प्रुथ्वीचा केंद्रबिंदू मानत तर आर्यभट उज्जैनीला तसा मध्यबिंदू मानत असे. ते त्या काळातील भुगोलाच्या अज्ञानचा भाग म्हणून पाहता येते.

मनुस्मृती "हिंदू" धर्माचा धर्मनियमांचा सर्वात महत्वाचा ग्रंथ असल्याचा आपला समज असल्याने आपण आधी मनुस्मृतीचा भुगोल काय होता हे मनुस्मृतीच्याच आधाराने समजावून घेवूयात.

१) सरस्वती आणि दृषद्वती या देवनद्यांमधील भाग हा देवनिर्मित ब्रह्मावर्त म्हणून ओळखला जात असून हजारो पिढ्यांपासून येथील माणसांचे/ ऋषींचे वर्तन सर्वात सद्गुणी समजले जाते. (म. २.१७-१८)

२) ब्रह्मावर्तानंतर कुरू, मत्स्य, पांचाल आणि शौरसेन हे प्रदेश ब्रह्मर्षींचे म्हणून ओळखले जातात. (म. २.१९)

३) या प्रदेशात जन्मलेल्या ब्राह्मणापासून पृथ्वीवरील अन्यांनी शिकावे. (म. २.२०)

४) हिमवत आणि विंध्याच्या दरम्यान पसरलेला प्रदेश, प्रयागच्या पुर्वेकडे आणि विनशनाच्या पश्चिमेकडे पसरलेल्या प्रदेशाला मध्य देश म्हणतात. (म. २.२१)

५) पण या दोन पर्वतांच्या मधील प्रदेश (हिमवत आणि विंध्य) अणि पुर्व व पश्चिमेकडील समुद्र यामधील प्रदेशाला शहाणी माणसे आर्यावर्त म्हणतात. (म. २.२२)

६) असा प्रदेश जिथे  काळविटे मुक्तपणे विहार करतात तोच प्रदेश यज्ञासाठी (यज्ञिय देश) योग्य होय. जेथे नाहीत ते प्रदेश म्लेच्छांचे प्रदेश होत. (म. २.२३)

७) द्विजांनी फक्त हाच देश असून प्रयत्नपुर्वक तेथे रहावे. शूद्र मात्र कोठेही असू शकतात. (म. २.२४)

हे मनुस्मृतीत येणारे स्मृतीतील स्मृतिकर्त्याला ज्ञान असलेल्या भुगोलाचे वर्णन. यावरून खालील बाबी स्पष्ट होतात.

सरस्वती व दृषद्वती नद्यांच्या मधल्या भागात राहणारे लोक हे स्मृतीकर्त्याच्या दृष्टीने सर्वार्थाने आदर्श आहेत. सरस्वती व दृषद्वती या नद्यांना स्मृतीकर्ता देवनद्या म्हणतो तर यामधील भुभागाला तो देवाने निर्माण केलेला प्रदेश म्हणतो. या प्रदेशाला तो ब्रह्मावर्त असेही नांव देतो. त्यानंतर हा स्मृतीकर्ता "कुरू, मत्स्य, पांचाल आणि शौरसेन हे प्रदेश ब्रह्मर्षींचे म्हणून ओळखले जातात." असेही म्हणतो म्हणजे स्मृतीकर्त्याच्या दृष्टीने कुरु-मत्स्यादि प्रदेश हे ब्रह्मावर्ताच्या खालोखाल महत्वाचे आहेत. सरस्वती नदी हरक्सवैती या नांवाने आजही अफगाणिस्तानातून वाहते व तोच ब्रह्मावर्त होय, तर कुरु पांचाल भाग हा ब्रह्मर्षींचा भुभाग होय हे येथे लक्षात घ्यावे लागते.

यातील गंमत अशी कि घग्गर नदी म्हणजे सरस्वती मानली तर ही नदी कथित कुरु प्रदेशामधोमध वाहते. पांचाल-मत्स्य अधिक पुर्वेला आहे. खालील नकाशा पाहिला तर लक्षात येईल.

 


बरे भारतात सरस्वतीबरोबरच दृषद्वतीसारखी "देवनदी" वाहत होती याचा पुरावा नाही. घग्गर नदी गेली हजारो वर्ष मोसमी पावसावर अवलंबून असलेली नदी आहे हे पुरातत्वीय व भुगर्भीय शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. दृषद्वती नदी कोणती हे आजतागायत सिद्ध झालेले नाही.

माणुस लिहितांना स्मृतीरंजनामुळे गतकाळातील स्मृतींतील प्रदेश व तेथील लोक यांचे उदात्तीकरण करतो. ही मानवी प्रवृत्ती आहे. आपले पुर्वज हे देवसमान व ते राहत होते ते देवानेच बनवलेले प्रदेश अशी प्रवृत्ती या मनुस्मृतीतील श्लोकात दिसते. हा प्रदेश भारतातील नाही हे मनुच लगोलग पुढच्या श्लोकात सिद्ध करतो.

मनू म्हणतो, "ब्रह्मावर्तानंतर कुरू, मत्स्य, पांचाल आणि शौरसेन हे प्रदेश ब्रह्मर्षींचे म्हणून ओळखले जातात." (म. २.१९). घग्ग्गर नदी कुरु प्रदेशातुनच वाहते. पांचाल तर खूप पुर्वेला गेला. शौरसेनक हा मथुरेनजिकचा प्रदेश आहे तर मत्स्य प्रदेश कोणता याबाबत अजून विद्वानांत मतभेद आहेत. तो बहुदा राजस्थान असावा असा एक कयास आहे. असे म्हटले तरी घग्गर नदी कुरू प्रदेशातून वाहते व राजस्थानात जाते हे वास्तव आहे. दृषद्वती नदी कोणती याचा अता-पता नाही. सरस्वती व दृषद्वती नांवाच्या कोणत्याही नद्या भारतात अस्तित्वात नाहीत. किंबहुना स्मृतीकर्त्याने वैदिक लोक जेथून आले होते त्या भागातील नद्यांच्या प्रदेशात (दोआबात) राहणा-या आपल्या पुर्वजांचे स्मरण यातून ठेवले. कारण मनुस्मृती पुढे लगेच म्हणते, कि "ब्रह्मावर्तानंतर कुरू, मत्स्य, पांचाल आणि शौरसेन हे प्रदेश ब्रह्मर्षींचे म्हणून ओळखले जातात."  (म. २.१९)

कुरु हा वैदिक धर्मप्रसारकांचा दुसरा थांबा होता हे मी आधीच स्पष्ट केले आहे. "The Hymns of the Rigveda" या ग्रंथाच्या प्रस्तावनेत ग्रिफिथनेही हेच विधान केले आहे. मनुस्मृतीचा जोही कोणी ग्रंथकार होता (ते किमान तीन असावेत, पण याबद्दल पुढे) त्याचा मुळचा प्रदेश कुरु हाच असावा याचे पुरावे मनुस्मृतीच देते. पांचाल, मत्स्य व शौरसेनक प्रदेश हेही भौगोलिक दृष्ट्या निकट असल्याने त्याने त्यांचेही नांव घेतलेले आहे. हा भुगोल छोटा तर होताच पण तेथे फक्त वैदिक रहात नव्हते हेही मनुस्मृतीवरुनच स्पष्ट होते. किंबहुना वैदिकेतरांचा परिघ हा त्यांना ज्ञात असलेल्या भुभागांत विस्तृत होता हेही दिसते.

मनुस्मृतीत कीकट म्हणजे बिहारचा उल्लेख नाही. कीकट हा प्रदेश वैदिकांच्या दृष्टीने त्याज्ज्यच होता. पुर्वेचा व पश्चिमेचा उल्लेख होतो पण त्या विस्तृत प्रदेशातील एकाही राज्यनामाचा उल्लेख येत नाही. एवढेच नव्हे तर विंध्य पर्वताचा उल्लेख असला तरी त्याच्या अलीकडच्या प्रदेशांचाही भौगोलिक उल्लेख नाही. विंध्याच्या दक्षीणेकडे काय हे तर बहुदा ऐकिवातही नसल्याने तिकडील प्रदेशांचाही उल्लेख नाही.

वैदिकेतर लोक, म्हणजे म्लेंच्छ (शूद्र) त्यांना ज्ञात असलेल्या भुभागात प्रत्यक्ष व ऐकिवातले त्यांना माहित होतेच हेही स्पष्ट दिसते. किंबहुना वैदिकांचा स्मृतीकाळे प्रदेशातील उपप्रदेश हेच स्थान कसे होते हेही दिसते. "असा प्रदेश जिथे  काळविटे मुक्तपणे विहार करतात तोच प्रदेश यज्ञासाठी (यज्ञिय देश) योग्य होय. जेथे नाहीत ते प्रदेश म्लेच्छांचे प्रदेश होत." (म. २.२३)

काळविटे हिंडतात असे प्रदेश म्हणजे अरण्यमय वा कुरणांचा प्रदेश होय हे उघड आहे. वैदिक लोक ग्रामनिवासी होते हे ब्राह्मण ग्रंथांवरुनही दिसून येते. मनुस्मृतीतही ग्रामाचेच महत्व आहे. नागर संस्कृतीशी, जी म्लेंच्छ अथवा शूद्रांची होती, त्यांशी त्यांचा संपर्क तसाही कमीच असे. म्हणजेच ज्ञात भुगोलातही त्यांचे अस्तित्व तुरळक होते. इतर भागांत (धर्म वेगळा असल्याने) त्यांना कोणी यज्ञ करु देत नव्हते. (म्हणजेच तेथील लोक वैदिक धर्मानुयायी बनत नव्हते). त्यामुळे द्विजांनी आपला प्रांत सोडू नये असेही मनुस्मृती स्पष्ट करते.

येथे म्लेंच्छ आणि शूद्र या शबदामधील घोळ पाहू. म्लेंच्छ हा शब्द मेलुहा (किंवा मेलुखा) या शब्दाचा वैदिक अपभ्रंश कसा आहे हे बी.बी. लाल यांनी दाखवून दिलेले आहे. शूद्र या शब्दाची कोणत्याही भाषेत आजवर व्युत्पत्ती सापडलेली नसल्याने हा कशाचा अपभ्रंश आहे हे आपल्याला आजही माहित नाही. समजा वैदिक लोकांनी आपल्या भाषेत, वर्णव्यवस्थेत चवथा वर्ण म्हनून हे नांव दिले असते तर त्या शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थही त्या भाषेतच असायला पाहिजे, पण तसेही नाही. याचाच अर्थ म्लेंच्छ किंवा शूद्र हे वैदिक धर्मियांच्या कक्षेबाहेर होते. त्यामुळेच वैदिक लोक त्यांच्यापासून दूर रहायचा आटोकाट प्रयत्न करत असे दिसते.

आर्यावर्ताची वैदिकांची मनुस्मृतीतील व्याख्या ही आजच्या वैदिकवाद्यांच्या "अखंड हिंदुस्तान" च्या व्याख्येएवढीच बालीश होती हे मनुस्मृतीवरुनच दिसते. मनुस्मॄतीला विंध्याचा दक्षीणेकडील भुभाग माहित नाही. बिहार (कीकट) ते  पुर्वेकडील प्रदेश माहित नाहीत. जे माहित आहेत ते कुरु प्रांताच्या परिघातील. ते स्वाभाविक असले तरी मग प्रश्न निर्माण होतो तो असा कि:

एका मर्यादित प्रदेशात निर्माण झालेली, तेथीलच लोकांसाठी लिहिली गेलेली एक धर्मनियमावली सर्व देशातील माणसांची कशी? नंतर झाली असेल तर सर्वांचे (सर्वांचे हा शब्द लक्षात घ्या) धर्मांतर कधी आणि कसे झाले? आणि काही तोकड्या लोकांचे जरी झाले असेल तर इतरांचा धर्म स्वतंत्र होता आणि आहे असेच नाही कि काय?

वास्तव हे आहे कि मनुस्मृती ही समग्र हिंदुंसाठी नव्हती. असुही शकत नव्हती. ती केवळ वैदिकांसाठीची आचार-धर्म संहिता होती. हिंदुंनी तिचा बाऊ का म्हणून केला? 

7 comments:

  1. काही तुरळक शोक शोधून त्या आधारावर निष्कर्ष काढणे म्हणजे काय, मला तरी कळत नाही. समजा उद्या मी एक गोष्ट लिहिलली. त्यात भारत दिल्ली, हरियाना, पंजाब याचाच उल्लेख असेल. काही हजार वर्षांनी संजय सोनवणी लिहितील भारत म्हणजे दिल्ली हरियाना आणि पंजाब एवढेच ...

    ReplyDelete
  2. संजय सोनवणी ,
    आपण मनुस्मृतीबद्दल लेख लिहिला आहे तो अभ्यासपूर्ण आहे.अतिशय उत्तम आहे आणि खूप विचार मंथनातून ,चिंतनातून तो लिहिला आहे हे निर्विवाद आहे !
    मी ज्यावेळेस मुख्य चौकात उभा रहात काही लोकाना प्रश्न केले त्यावेळेस मात्र कोणीच याबाबतीत जाणकार दिसले नाहीत,सर्वांचा स्वर जानेभी दो यार असाच दिसला , काहीनितर चेष्टाच केली ,कोणत्या युगात वावरत आहात असा त्यांचा प्रश्न , अधिक खोलात जाउन विचारले तर का उगीच डोके खात आहात असा सूर दिसला ,मुळात हा मनू कोण आणि त्याने आपले भले केले का वाटोळे केले ? हाच त्याना पत्ता नाही,
    शेतकऱ्यांच्या आत्महत्या,पाणीप्रश्न,सुरळीत वहातुक,भ्रष्टाचार, स्वस्त आरोग्य योजना,कचरा प्रश्न याबद्दल त्यांनी प्रतिप्रश्न विचारले त्यावेळी मी मात्र निरुत्तर झालो .
    एकाने तर हा मनुचा प्रश्न पुढचे १०० वर्ष बासनात बांधून ठेवा आणि हे प्रश्न आधी सोडवा, कारण ते आमच्या जीवनाशी निगडीत आहेत असे खिजवले,
    संजय सर मी आपला चाहता आहे आणि मी निरुत्तर झालो की आपलीच आठवण काढणार !
    आजकाल आपल्या ब्लोगवर प्रतिक्रिया येणे खूपच कमी झाले आहे ,शेवटच्या ४ लिखाणावर तर हे अगदी स्पष्ट जाणवते
    वैदिक ब्राह्मण कोण आहेत या लेखाला प्रतिसाद चांगला असून प्रतिक्रिया चांगल्या अभ्यासपूर्ण आहेत , पण नंतर मात्र त्या रोडावल्या आहेत असे कशामुळे ?
    आपण म्हणता त्याप्रमाणे आपला ब्लोग लाखो लोक वाचतात , तसे फ़ोन आपणास येतात , पण मग आपण त्याना प्रतिक्रिया देण्यास उद्युक्त केले तर सर्वांनाच त्याचा लाभ घेता येईल आणि चर्चा अधिक सकस होतील .
    धन्यवाद .

    ReplyDelete
    Replies
    1. आगाशे सर, आपण आडवळनाने तर काही सरळ प्रश्न उपस्थित केले आहेत. पहिला प्रश्न मनुस्मृतीचा विचार आज प्रस्तूत आहे का हा. तो नाही असे समजु. मग शिवाजी महाराज, ते पार जुन्या काळातील अलेक्झांडरचे आक्रमण हेही विषय वर्तमानकालात अप्रस्तूत ठरतील. आज कोणी तलवारीने लढू शकत नाही किंवा गतकाळत जाऊन इतिहासही बदलवू शकत नाही. बरोबर आहे, मनुस्मृतीवर चर्चा अप्रस्तूत आहे. आपण खरे तर अभ्यासक्रमातून इतिहास हा विषयच काढुन टाकला पाहिजे. इतिहासाचा (भले तो धर्मेतिहास असो, राजकीय असो कि समाजेतिहास) काय घेणे देणे?

      यावर खरेच चिंतन पाहिजे. आपल्या शिक्षणमंत्री वेदोपनिषदे, गीता ते वैदिक विज्ञान वगैरे विषय अभ्यासक्रमात आणू पाहत आहेत हे खरे तर तुमच्या मताच्या विरोधात जाते. "मनुस्मृतीचा सामाजिक इतिहास" असाही विषय त्यांनी अभ्यासक्रमात आणला असावा हे बत्रांच्या अभ्यासक्रमावरून दिसते. या मंडळीला तुमचा अथवा तुमच्या मित्रांचा विरोध दिसत नाही. मला मात्र आहे. हे दुटप्पीपण नव्हे काय? आणि मी भाषाशास्त्र, अर्थशास्त्र, सामाजिक प्रश्न यावर (खरे तर सर्वाधिक माझे लेख याच विषयांवर आहेत) सतत लिहितो त्यावर मात्र दुर्लक्षाचे शिंतोडे ऊडवणे कितपत योग्य?

      खरा राग असा दिसतो कि मनुस्मृती हिंदुंसाठी मुळात नव्हतीच हे जे मी सिद्ध करु पाहत आहे याला तुमचा विरोध दिसतो. खरे तर तुम्हाला आनंद व्हायला हवा कारण याच स्मृतीमुळे ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाचे बीज होते व म्हणूनच तिचे होळी केली गेली. मी म्हणतो हिंदुंनी तिची होली करायची गरजच नव्हती कारण ना ती त्यंच्यासाठी लिहिली गेली ना कधी त्यांनी ती पाळली. मनुस्मृतीचे स्तोम मी संपवतोय...पण तुम्हाला कदाचित ते स्तोम हवे असेल कदाचित. असो. माझ्या बांधवांवर य स्मृतीने जो (अभ्यास न करता) विरोधी पगडा टाकला आहे तो सत्याच्या प्रकाशातच काढणे मला भाग आहे. ते काम न कंटाळत मी करेनच!

      राहिले माझ्या ब्लोगवरील प्रतिक्रियांचे. गेली काही वर्ष रिकामटेकड्या मनोविकृतांनी हा ब्लोग आपल्या कंडशमनाचा अड्डा बनवला होता हे आपणास माहितच आहे. विषयाला सोडून, विषयात भर न घालता, मनोविकृतीने पछाडून वाटेल त्या प्रतिक्रिया देत सुटत होते. मी लोकशाही मानत असल्याने विरोधही केला नव्हता. सर्व प्रतिक्रिया मी प्रसिद्ध होऊ देत होतो. त्याचा दुष्परिणाम असा कि सुज्ञ लोक प्रतिक्रिया न देता मला फोनवरुन प्रतिक्रिया देत राहिले. आप्पा-बाप्पा पासून ते अनेकांपर्यंत हाकलण्याचा सल्ला मला दिला जात होता. मी तो ऐकला नाही. आताही मी बव्हंशे प्रतिक्रिया प्रकाशित करतोच...ब-याच उडवाव्या लागतात कारण र्त्या शिवीगाळीने भरलेल्या असतात. माझा ब्लोग लोकप्रिय आहे हे विधान मी केलेले नाही. बहुदा या शिवराळांच्या प्रतिक्रिया वाचायलाच शिवराळ येथे भेटी देत असतील असे समजुयात. असो.

      तुमच्याबाबत आदर असल्याने हे सविस्तर उत्तर दिले. धन्यवाद. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!

      Delete
  3. सोनवणी सर , आपण अनावश्यकपणे बहुतेक मला पुराण मतांचे समर्थक समजत असाल तर तसे काहीही नाहीं.सध्याचे सरकार काय करत आहे तो माझा विषय नाही.सरड्याची धाव कुंपणा पर्यंत अशी या सरकारची प्रत्येक बाबतीत अवस्था आहे.त्यांचे प्रचंड हसे होत आहे - पुढील निवडणुकीत त्यांचे काय होणार ते सर्वांनाच माहित आहे.सत्ता हा समाज सुधारण्याचा मार्ग नाही.आणि ते ज्याला समाज सुधारणा किंवा संस्कार म्हणतात त्याची तर अजिबात गरजच नाही या समाजाला आणि देशाला ! कालबाह्य गोष्टी आहेत त्या ! माझ्या निरीक्षणानुसार कोणालाही जुन्या चुका परत परत उगाळत बसायची गरज वाटत नसावी . याची पक्की खात्री झाल्यावरच मी माझे निरीक्षण नोंदवले आहे. खेड्यातील जनतेबद्दल मी अनभिद्न्य आहे.
    कोणताही शहरी माणूस शहरालाच का चिकटून असतो , तर त्याला या जगडव्याळात तगून रहात आपली आणि आपल्या कुटुंबाची भौतिक प्रगती साधायची असते त्यासाठी तो आपली सर्व ताकद पणाला लावत असतो ,आजकाल तर उद्याचा भरोसा नाही ,अशावेळी त्याला "पुराणातली वांगी पुराणात" अशा वृत्तीने राहणे सोपे आणि सोयीचे ठरते.खरेतर हजारो वर्षापूर्वी कोण कसे चुकले हे आज तपासायला आणि बघायला कोणाला वेळ नाही आणि आस्थाही नाही . आणि त्या चुकांचे आपण आणि आपल्या अनेक पिढ्या बळी आहोत म्हणून आजच्या घडीला सवर्णांबद्दल रोष निर्माण करून मागासवर्गीयांची प्रगती आज कशी होईल ? वैदिक हे हिंदू नाहीत अशा चर्चांनी काय होणार आहे ?वैदिक हे हिंदू नाहीत असे पक्के मानले आणि त्यांनी घुसखोरी केली असे मानले तर काय होईल ?आपण हा कोणता खेळ मांडला आहे ?
    आजच्या भारताची अवस्था बघता , इथे कधीही चीन रशिया सारखी क्रांती होणार नाही , भांडवलदार वर्गाची पकड आता इथे पक्की झाली आहे .हे भांडवलदार कोणत्या जातकुळीचे आहेत ,त्याचा अभ्यास केला तर काय दिसते - तेही अभ्यासंण्यासारखे आहे.
    ग्रामराज्ये आणि सर्वोदय या कल्पना हजारो मैल मागे पडल्या आहेत . आदर्शवादातून आपण आत्ताकुठे जागे होत बाहेर पडत आहोत, काँग्रेस आणि भाजप अशी दोनच पक्षांची अस्तित्वे सहन केली जातील अशी एक आग्रही भांडवलदारी वृत्ती जोपासली जात आहे,यापुढे समाजवाद हा केवळ अशिक्षित समाजाला गाजर दाखवण्यासाठी वापरायचा शब्द राहणार आहे
    संजय सर ,
    आपण म्हणता त्याप्रमाणे एक जग एक देश अशी रचना होत जाताना दिसणार आहे . अशावेळी आपण ही जातपात आणि सामाजिक अन्यायाची जुनी भुते आपल्या डोक्यावर,सिंदबादच्या म्हाताऱ्या प्रमाणे किती काळ सांभाळणार आहोत ? आज ६० - ६५ वर्षे आरक्षणामुळे समाजात बराच फरक पडत आहे , सवर्ण आणि पुरोहितवर्गाने आपल्या भूमिका सैल केल्या आहेत . त्याचे श्रेय नक्कीच शाहू,फुले आणि आंबेडकर याना जाते ,पण आजकाल त्यांच्या नावाचे किती राजकारण होते आहे हेही आपणही बघत असाल ! रामदास आठवले हे त्याचे उत्तम उदाहरण आहे
    तुम्ही पूर्वीच्या लाल बावट्याचे सामर्थ्य कसे संपले किंवा संपवण्यात आले हे पाहिले आहेच , आज मागासवर्गाच्या चळवळीचे काय दयनीय स्वरूप झाले आहे हेही आपण बघत आहात . ,
    मग सर राहिले काय ? हा देश नुसत्या काँग्रेस किंवा संघाने उभारला नाही ,
    असे का झाले ?बारकाव्याने पाहिले तर बहुतेक शहरी मजदूर चळवळीत ब्राह्मण नेतृत्व आघाडीवर होते - हे काय सुचवते ? आपण आजही शैव वैदिक वगैरे वृथा वाद घेऊन तेच पाप करत आहात असे वाटते ," जुने जाउद्या मरणालागुनी जाळूनी किंवा पुरुनी टाका " अशा वृत्तीने सर्वांनी जुन्या गोष्टी बासनात गुंडाळून १०० वर्षे पोथ्या बंद कराव्यात अशा अर्थाने मी लिहिले होते , पण आपण मला सनातन वृत्तीचे लेबल लावण्याची घाई केलीत याचा खेद होतो !
    आपणास मकर संक्रांतीच्या शुभेच्छा !
    आपणही विचारांचे संक्रमण करुया आणि नव्या जोमाने कर्तृत्वाच्या गोष्टी करुया .

    ReplyDelete
  4. संजयजी कोणी काही बोलले तरी तुमचे सडेतोड लिखाण चालूच राहू द्यात. मनुस्मृतीची झिंग आपल्या डोक्यातून उतरलेली नाही. आजही दलितांच्या हत्या होतात स्त्रियांवर अमानुष अत्याचार होतात. काही लोक मोठे पिढीजात हुशार आहेत. आधी स्मृत्या पुराने लोकांच्या डोक्यात भरून लोकांना गंडवले तेच आता पुरोगामी आणि नास्तिक वगैरे टिळे लावून फिरत आहेत. पण ह्यात त्यांची लबाडी आहे. अगदी थोडी जरी संधी मिळाली तर हे लोक आरक्षण वगैरे बंद करायचा डाव करत असतात. त्यांना कसेही करून आपली झोळी भरलेलीच हवी असते. अजिबात लक्ष देऊ नका अजून समाजात इतका मोठा वर्ग आहे कि त्यांना पूर्वी आणि आत्ता कसे गंडवले जाते हेच कळत नाही. सर अगदी व्यवस्थित मर्मावर ठोका टाकलात आपण.

    ReplyDelete
  5. जुने ते जाऊ द्या काय अर्थ आहे. हे बरे आणि खरे वाटत असले तरी काही मंडळींचा हा स्वत्व त्यात स्वहित धर्म अर्थ व्यवहार यांचे संरक्षण साधले जात असल्याने जुने मुददे नव्याने नव्या पिढीपुढे मांडून सातत्याने ब्रेनवॉश होतोय. संजय सर किंवा आगाशे सर या दोघांनीही मांडलेल्या चिंतनामध्ये नक्कीच तथ्य आहे. पण गोबल्सचा प्रतिकार/प्रत्युत्तर करणे आवश्यकच आहे. तर चिंतनाच्या दिशेत त्या त्या वेळेप्रमाणे अनियमितता तसेच सात्यतही आढळून येत नसल्याने एकमेकांना विरोधाभास जाणवतो. बाकी अतिशय बॅलन्स्ड लेख. इंग्रजी थोडीफार वापरावीच लागते. कारण मराठीच्या लांबटपणावर उपाय म्हणून.

    ReplyDelete
  6. इतिहास हा वर्तमानाची मीमांसा करण्यासाठी व वर्तमानाला दिशा देण्यासाठी उपयोगात आणला जाउ शकत नाही काय? त्यामुळे जुने जुने जाऊ द्या मरणालागुनी, असे म्हणणे योग्य ठरेल काय?
    मनुस्मृती कोणासाठी लिहिल्या गेली हे महत्त्वाचे नसून ती कोणाला प्रभावित करते, हे अधिक महत्त्वाचे आहे. थोडक्यात तिचे सामाजिक कार्य हा आपल्या मिमांसेचा विषय असायला हवा.

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...