Tuesday, January 12, 2016

साहित्य संमेलन कि दांभिकांची जत्रा?

"साहित्य संमेलनांकडून नेमके काय हवे?" हा प्रश्न खरे तर निरर्थक वाटावा अशी परिस्थिती गेल्या काही साहित्य संमेलनांमुळे निर्माण झाली आहे. साहित्यिक (साहित्यासंदर्भात...व्यक्तिगत नव्हे) वाद-विवाद, साहित्यसंकल्पनांबद्दल घनघोर चर्चा, सामाजिक प्रश्नांना साहित्यविश्वाशी जोडत चिंतनात्मक मंथन साहित्य संमेलनामुळे घडावे अशी अपेक्षा ठेवावी अशी आजकाल परिस्थिती उरलेली नाही. उलट साहित्यबाह्य कारणांनीच साहित्य संमेलने गाजत आली आहेत. साहित्य जाणीवा त्या वादांत वाहून गेलेल्या दिसत आहेत. तरीही मागची काही संमेलने सर्वच उमेदवारांच्या समजुतदारपणामुळे आतापर्यंत तरी कसल्याही चारित्र्यहननांच्या वादांच्या भोव-यात सापडलेले नाही हे नक्कीच अभिनंदनीय आहे. पण असे असले तरी ज्यासाठी साहित्य संमेलन भरवले जाते त्या साहित्याचे काय? एकुणातील साहित्यव्यवहार ज्याच्या पायावर उभा असतो त्या वाचकांचे काय? आणि जे संमेलनांचे अध्यक्ष होतात ते जर छद्मसाहित्यिक असतील, त्यांच्याच विचारांत/साहित्यात उंची खोली वगैरे नसेल तर मग त्याचेही काय? हे प्रश्न गंभीर आहेत. मला वाटते, यावर आपल्याला कोठेतरी तटस्थपणे विचार करायला हवा.
साहित्य संमेलन म्हणजे उत्सव अशी काहीतरी कल्पना आयोजकांपासून ते सहभागकर्त्यांची झालेली आहे. उत्सव म्हटला कि त्यात फारसा गंभीरपणा आणायची गरज नसते. पण उत्सव म्हणजे जत्राही नव्हे याचे भान आपल्याला आहे काय? साहित्याचा उत्सव साहित्याच्या किमान इतमामात तरी साजरा करावा कि नाही? कि हा काहींच्या (विशेषत: संयोजकांच्या) मिरवण्यासाठी आयोजित केलेला उत्सव आहे? कोठे संमेलनांच्याच अध्यक्षांना डावलले जाते तर कोठे मी अपमान सहन करणार नाही अशा फुकाच्या गर्जना आधीच एखादा नियोजित अध्यक्ष करतो. पण मुळात संमेलनाध्यक्षांची पत्रासच उरलेली नाही हे कोण पाहणार? त्याला अध्यक्षच जबाबदार नव्हेत काय? आदराने कोणाचेही शिर झुकेल अशी तपश्चर्या करत साहित्यात किंवा समीक्षेत किंवा सामाजिक विचारांत अशी कोणती भर अलीकडच्या (सदानंद मोरेंचा अपवाद वगळता) कोणत्या अध्यक्षाने घातली आहे हा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर देतांना खुद्द त्या त्या अध्यक्षाचीच पंचाईत होईल.
याचे कारण असे आहे कि मुळात या मंडळीला मुळात साहित्याशी घेणे नाही. त्यांची नाळच मुळात अहंभावी, मिरवू वृत्तीत दडलेली आहेत. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद म्हणजे जीवनगौरव पुरस्कारासारखाच त्यांना वाटू लागला आहे. त्यामुळे अध्यक्षपदी निवडून येण्यासाठी करावी लागणारी पण आवश्यक नसलेली लाचारी करायला यांना कसलीही शरम वाटत नाही. भले भले राजकारणी लाजतील असे राजकारण हे करु शकतात. त्यामुळ३ए त्यांना साहित्यविषयक आपल्या जाणीवा काय आहेत, भविष्यातील मराठी साहित्य, वैचारिकता यांना दिशा दाखवण्याचे जे काम आहे ते तर अस्पर्शीच राहते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद म्हणजे जीवनगौरव पुरस्कार नसून साहित्य-संस्कृतीच्या सर्व प्रवाहांना एका सूत्रात बांधत पुढील दिशादर्शक कार्य करण्यासाठी असते. साहित्य संमेलन हा केवळ उत्सव नसून व्यापक विचारमंथनाचे शिबीर आहे व ते वर्तमान व भविष्यातील साहित्यिक व साहित्यरसिकांसाठीचे एक उर्जाकेंद्र बनावे यासाठी प्रयत्न करायचा असतो हे यांना कधी समजणार? अध्यक्षपद हा केवळ सन्मान नसून जबाबदारी आहे याचे भान आताच्या आणि भविष्यातल्या अध्यक्षांना आणि संयोजकांना कधी येणार?
साहित्य संमेलनांबाबत केवळ वाचकच नव्हे तर अनेक मतदारच उदासीन असल्याचे चित्र दिसून आले आणि याचे कारण ज्यासाठी म्हणून संमेलन हवे तेच संमेलनात नेमके होत नाही असा त्यांचा आक्षेप आहे. यातील सर्वात चिंतीत करणारी बाब म्हणजे तरुणांना तर साहित्य संमेलनाचे कसलेही आकर्षन उरलेले दिसत नाही. एक तर त्यांच्या अभिव्यक्तीला पुरेसे अवकाश सम्मेलन उपलब्ध करून देवू शकलेले नाही. ते नसेल तर नसो पण किमान युवा साहित्यिकांच्या प्रेरणांना, नवनवीन साहित्य प्रवाहांना सामावून घेण्याचे व त्यावर व्यापक चर्चा घडवण्यातही संमेलन आजवर पुढाकार घेवू शकलेले नाही. साहित्य संमेलनातून काहीतरी दिशादर्शक प्रेरणा मिळाव्यात अशा लेखकांच्या अपेक्षा असतील तर त्यांना वावगे कसे म्हणता येईल? भविष्यातील प्रतिभांना जर आम्ही संमेलनातून अवकाश देवू शकत नसू, त्यांचे साहित्यिक विश्व विस्तारायला प्रोत्साहन देत नवी क्षितीजे देत नसू आणि तरुण लेखकच जर साहित्य संमेलनापासून काही मिळू शकण्याच्या स्थितीत नसतील तर ते तिकडे का फिरकतील?
ते जाऊद्या, मराठी साहित्यात काहीतरी भव्य दिव्य घडते आहे व आपण त्याशी जुळलो गेलो पाहिजे ही आत्मियतेची भावना निर्माण करण्यात आम्हाला अपयश येत असेल तर भविष्यात मराठीला वाचक राहील कि नाही हा प्रश्न उद्भवणारच! जागतिकीकरणाच्या लाटेनंतर परंपरागत संस्कृती आणि जागतीक संस्कृतीचे प्रवेशत असणारे वेगवान प्रवाह यांतील आंतरसंघर्षामुळे आपण सारेच एकार्थाने सांस्कृतीक पडझडीच्या कालखंडात येऊन ठेपलो आहोत. आजचा तरुण वर्ग मालिकांच्या वा जाहिरातींच्या कचकड्याच्या जीवनदर्शनाला संस्कृती समजू लागल्याने व त्याच वेळीस कठोर वास्तव अनुभवास येत असल्याने अस्वस्थ आहे. त्याला सांस्कृतिक व भावनिक आधार देवू शकेल असे साहित्य क्वचितच दिसते. दुसरीकडॆ सर्व समाजांमद्धे आज शिक्षणामुळे अभिव्यक्तीचीही आस बळावत आहे...पण तिला दिशा देवू शकेल आणि त्या अभिव्यक्तीला वैश्विक साहित्याचे रूप देवू शकेल असे सकारात्मक सांस्कृतीक व सामाजिक वातावरण आपल्यात आज तरी नाही. आपल्याला संस्कृतीचीच एकुणातच फेरमांडणी करावी लागनार आहे. पण यासाठी गंभीरपणे अखिल भारतीय म्हणवणा-या मुठभरांच्या संमेलनात जर गांभिर्याने कधी साधी चर्चाही होत नसेल तर काय करायचे?
आज आपण पाहतो कि सर्वशिक्षण अभियानामुळे शिक्षितांचे प्रमाण जवळपास सर्वच समाजघटकांत वाढू लागले आहे. या समाजांतील सर्जनशील प्रतिभा लिहू लागल्या आहेत, अभिव्यक्त होवू लागल्या आहेत. एका अर्थाने हे नवजागृतीचे वारे आहे. स्वागतार्ह आहे. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात सर्वच समाजघटकांच्या जगण्याचे संदर्भ बदलत असलेले आपल्याला ठळकपणे दिसते. त्यातून निर्माण होत असलेल्या आजवर अपरिचित असलेल्या समस्याही डोके वर काढू लागल्या आहेत. त्यांवर उत्तर शोधणे हे सर्वच प्रतिभाशालींचे काम आहे. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे नवप्रतिभांना जातीय अथवा वर्गीय चौकटीत न अडकावणे यासाठी संपुर्ण साहित्यविश्वानेच सजग रहायला हवे. परंतू आपण पाहतो कि दुर्दैवाने या दिशेने आजवर प्रयत्न झालेले नाहीत. त्यामुळे एकुणातील साहित्य विश्व (वैचारिक/तात्विक मतभेदांसहित) किमान साहित्यएकतेच्या मूल्यावर एकसूत्रात येणे शक्य झालेले नाही. उलट आज बहुतेक जाती/समाजांची स्वतंत्र साहित्य संमेलने भरत आहेत. शहर/प्रांतनिहाय साहित्य संमेलनांना प्रोत्साहन दिले पाहिजे हे खरे पण जातीय साहित्य संमेलने ही पुरोगामी महाराष्ट्राचे कोणते चित्र स्पष्ट करते?
मराठीत एके काळी उच्चभ्रू साहित्य, दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, आदिवासी साहित्य इ. अशी एक विभागणी नकळत का होईना पण झाली होती. एका अर्थाने साहित्य क्षेत्रातही वर्णव्यवस्थेने प्रवेश केल्याचे ते एक दर्शन होते. पण ही विभागणी पुढे धुसर होण्याऐवजी अधिक कठोर कप्पेबंद होत गेल्याचे विदारक चित्र आपल्याला दिसते. साहित्य हे निखळ साहित्य असून त्यात असे भेदाभेद करून मग त्याचे मूल्यमापण करू नये याबाबत अनेक साहित्यिक/समिक्षक आग्रही असतात. असे असले तरी प्रत्यक्षात ही विभागणी एकुणातच मराठी साहित्याला हानीकारक आहे याबाबत दुमत नसावे. त्या आधारावरच साहित्यिकाचा दर्जा ठरवणे हे तर अधिक हानीकारक आहे. पण यावर जी चर्चा साहित्य संमेलनांतील एखाद्यातरी चर्चासत्रांतून गंभीरपणे केली जायला हवी होती तशी झालेली नाही, हे दुर्दैव नव्हे काय?
बरे, हे येथेच थांबत नाही. साहित्यिकांची जात व प्रांतही अखिल भारतीय साहित्यसाहित्य संमेलनाच्या निवडणूकीत अनेकदा कळीचा मुद्दा बनत आले आहेत. हे मुद्दे जिंकतातच असे नसले तरी ते रेटले जातात हा सर्वांचाच अनुभव आहे. साहित्याला जात/धर्म/प्रांत नसेल तर साहित्यिकाला हे मुद्दे का लागू व्हावेत? परंतू ते अनेकदा फायद्याचेच जात असल्याने ते वापरले जातातच हेही एक दुर्दैवी वास्तव आहे. यातून साहित्याचे आणि अनेक साहित्यिकांचे एकुणात किती नुकसान होते याचा लेखाजोखा साहित्यिकांनीच मांडायला हवा. पण त्यासाठी जरा निरपेक्ष बनावे लागेल. ते आजच्या परिस्थितीत शक्य आहे कि नाही? मला वाटते शक्य आहे. हे फक्त निवडणुकीच्या संदर्भात नाही हे येथे लक्षात घेतले पाहिजे.
उदाहरणार्थ विदर्भातील लेखकांना पुणे सहजी जवळ करत नाही अशी वैदर्भियांची, मराठवाडियांची तसेच खानदेशी लेखकांचीही तक्रार असते. जे डोक्यावर घेतले गेले ते त्यांच्या अथक प्रयत्न आणि साहित्यनिष्ठेमुळे. पण अनेकजण प्रतिसादांच्या अभावी मधेच गळून पडतात ती संख्या मोठी आहे. त्यामुळे मराठी साहित्यविश्वाची एकुणातच हानी होतेय याकडे साहित्य संमेलनांनी लक्ष द्यायला हवे अशी मागणी असंख्य युवा-साहित्यिकांची आहे.
परप्रांतातील मराठी भाषक आणि लेखकांची समस्या तर याहून गंभीर आहे. १९३८ साली "मध्यभारतीय मराठी वाड:मय" या कै. कृष्णाजी गंगाधर कवचाळे यांच्या ग्रंथाला लिहिलेल्या प्रस्तावनेत कै. नरहर रहाळकरांनी म्हटले होते, "येथे नको असलेल्या अप्रिय गोष्टीचाही निर्देश करने काही कारणांमुळे आम्हास आवश्य वाटते. ती गोष्ट म्हणजे आपल्या धाकट्या मालव बंधूंविषयी ज्येष्ठ महाराष्ट्रीय बंधूंना वाटणारी अनास्था ही होय......इकडील साहित्यिकांची सदाच कुचंबणा होत राहून त्यांना आपला लेखनरुपी माल वाचकांपुढे मांडण्यास आपल्या ज्येष्ठ महाराष्टीय बंधूकडे धावावे लागते व त्यात अधिकत: निराशाच त्यांच्या पदरी येते." (संदर्भ: अनुबंध, मराठी साहित्य मंडळ, गुलबर्गा प्रकाशित त्रैमासिक-२०१२)
यातील खंत आजही दूर झालेली नाही. किंबहूना परिस्थिती अधिकच बिघडली आहे. परप्रांतांत मराठी भाषकांसाठी (गोवा अपवाद) एकाही मराठी साहित्य मंडळाचे सम्मृद्ध ग्रंथालय नाही. इमारतींची तर बाबच दुर्मिळ. बडोद्याला कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून येणारे फिरते पेटी ग्रंथालय सोडले तर काही सुविधा नाही. तीच बाब छत्तीसगढची. येथे भाड्याच्या खोलीत मराठी साहित्य परिषदेचा कारभार चालतो. गुलबर्ग्याच्या ग्रंथालयात ५०-६० ग्रंथ आहेत. खरे तर महाराष्ट्र ग्रंथ संचालनालय दरवर्षी ३-४०० ग्रंथांच्या जवळपास तेवढ्याच प्रती विकत घेऊन महाराष्ट्रातील ग्रंथालयांना वातते. त्यात परप्रांतीय ग्रंथालयांचाही समावेश करने अशक्य आहे काय? मराठी साहित्य संस्कृती मंडळामार्फत नवलेखकांना अनुदान देतांना परप्रांतीय मराठी लेखकांना प्राधान्यक्रमाने प्रथम पुस्तक प्रकाशनासाठी अनुदान देता येणे अशक्य आहे काय? ग्रंथालयांसाठी सुसज्ज इमारती देणेही अशक्य नाही. पण त्यासाठी मराठी भाषेच्या वृद्धीची तळमळ व कळकळ लागते. ती आजवर तरी दिसलेली नाही.
हे असे चित्र असेल तर मग परप्रांतांतील मराठी भाषकांच्या गळचेपीबद्दल काय बोलावे? गोव्याची राजभाषा मराठी व्हावी यासाठी गोवेकर मराठी बांधव संघर्ष करीत आहेत. पण त्याबाबत मराठी भाषक व महाराष्ट्र सरकार तर उदासीन आहेच, पण खुद्द अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनही उदासीन असावे हे मात्र अनाकलनीय व मराठीच्या एकुणातील विकासासाठी हानीकारक आहे. बेळगांव-निपाणीबाबत एवढी वर्ष नियमीत ठराव केले जातात....काय झाले त्यांचे?
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी गेली काही वर्षे प्रयत्न सुरु आहेत. प्रा. हरी नरके व भालचंद्र नेमाडे यांनी साहित्य अकादमीकडे नेटाने पाठपुरावा करून ती मान्यता मिळवून घेतली. पण पुढील सोपस्कार न झाल्याने तो मुद्दा अजुनही प्रलंबित आहे. खेदाची बाब ही कि गेल्या दोन-तीन साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांना ही बाब माहित असुनही एकानेही त्याबाबत जाहीर आवाज उठवला नाही. किंबहुना असा काही विषय आहे व त्याचे नेमके मराठीच्या दृष्टीने सांस्कृतिक महत्व काय हे त्यांच्या गांवीही नाही. त्यांच्याच गांवी नसेल तर सामान्य मराठी माणसाला तरी कसे त्याबाबत आवाज उठवावासा वाटणार? खरे तर यासाठी सर्वच साहित्यिकांनी जनांदोलन सुरु करायला हवे होते. पण ते तसे झालेले नाही. याचे कारण यांना साहित्याचीच आस्था नाही तर भाषेची काय असणार असा प्रश्न उपस्थित झाला तर दोष कोणाचा? आजवर जेवढय़ाही भाषांना अभिजाततेचा दर्जा मिळाला तो सर्व त्या-त्या भाषकांत आपल्या भाषेबद्दल एकमुखाने असलेल्या जिव्हाळ्यामुळे. परंतू महाराष्ट्र हे एकमेव कमनशिबी राज्य असावे जेथे मराठी भाषकच आपणच विकसित केलेल्या गैरसमजांना सबळ पुराव्यांच्या प्रकाशात सोडण्याऐवजी अडसर बनत आहेत. खरे तर सर्व राजकीय पक्ष-संघटनांनी यासाठी एकत्र यायला हवे…पण ते कसे होणार?
साहित्य-संस्कृतीचे जतन-वर्धन-विकसन हे प्रत्येक सुसंस्कृत समाजाचे कर्तव्य मानले जाते. साहित्य हे समाजमनाचा आरसा आहे असे समजले जाते. कोणता समाज नेमका कसा आहे हे समजाऊन घ्यायचे तर साहित्य व वाचनसंस्कृतीचेच मापदंड लावले जातात. या पार्श्वभूमीवर आपण एकूण मराठी साहित्य व वाचनसंस्कृतीचा विचार केला तर लक्षात येईल की आपली ही संस्कृती अत्यंत बाल्यावस्थेत आहे. तिची जी काही वाटचाल होत आहे ती खुरटलेली आणि रोगग्रस्त आहे. आज लेखकांपासून ते पार ग्रंथालयांपर्यंत असलेली साहित्य-संस्कृतीची साखळी नैतिक व आर्थिक भ्रष्टाचाराने पोखरलेली असल्याचेच सध्याचे चित्र आहे.
शंकर सारडांसारखे समीक्षक म्हणतात कि मराठी साहित्य एवढे समृद्ध व्हावे कि एक दिवस मराठी साहित्त्यिकाला नोबेल मिळावे! हा आशावाद सत्यात कधीच येवू शकणार नाही असे नाही,पण मग मराठी साहित्याचीच यत्ता काय यावर आधी विचार केला पाहिजे. मराठीतील आजतागायत गाजलेल्या कादंबर्या बव्हंशी ऐतिहासिक अथवा परकीय कल्पना चोरुन लिहिलेल्या आहेत हे वास्तव काय सांगते?
वाचन संस्कृतीची सुरुवात बालपणापासून होत असते. पाश्चात्य भाषांत बाल, किशोर, कुमार साहित्याची अत्यंत सृजनशील अशी विपुल प्रमाणात निर्मिती होत असते. त्यामुळे मुलांना लहान वयातच वाचनाची गोडी लागते. यात रहस्य, थरार, गूढ, अद्भुतरम्य अशा विविधरंगी साहित्याचा समावेश असल्याने व साहित्यिक दर्जाही उत्तम असल्याने मुलांना आपापल्या आवडीनुरुप विपूल साहित्य उपलब्ध असते.
याउलट अत्यंत केविलवाणे असे मराठीचे चित्र आहे. मुळात मुलांसाठी लिहिण्याचीच आपल्या साहित्त्यिकांना लाज वाटते. भा. रा. भागवतांचा अपवाद वगळला तर आजीवन बाल-किशोरांसाठी लिहिणारा लेखक नाही. पण आता तेही आउटडेटेड झाले आहे. जे आजकाल सहित्य प्रसिद्ध होते त्याची लायकी जवळपास शुन्यवत अशीच आहे. अपवादाने अधुन-मधुन एखाददुसरे चांगले पुस्तक येते खरे, पण एखाद-दुसर्या अपवादांनी बाल-किशोर मराठी वाचनाकडे वळण्याची शक्यता नाही. वाचनाची सवय लहानपणापासून लागली तर मुलांच्या मनोविश्वावर सकारात्मक परिणाम होतो याचे भान आपल्याला कधीच नव्हते. आजही नाही. प्रकाशक जी काही मुलांसाठीची म्हणवली जाणारी पुस्तके काढतात ती अक्षरशः कोणत्यातरी शासकीय योजनेत त्यांची वर्णी लावण्यासाठी. त्यामुळे दर्जाचा विचार व अपेक्षा करता येत नाही. ही पुस्तके शेवटी शाळांच्या कपाटांत वा गोदामांत सडणार आहेत हे जसे प्रकाशकांना माहित असते तसेच खरेदी करणार्या शासकीय अधिकार्यांनाही. त्यामुळे मुलांच्या आवडींचा, त्यांच्यातील वाचनसंस्कृतीचा विचार कोण आणि का करेल? ज्याचा हिस्सा त्याला मिळ्ण्याशी मतलब! जेथे बालसाहित्यात असा लेखक/ विक्रेता व ग्राहक यांच्या संगनमताने एवढा भ्रष्टाचार होतो त्यांच्या संस्कृतीबद्दल काय बोलावे?
वाचकांच्याही यत्ता असतात. बाल-किशोर साहित्याचा अभाव आहे, ठीक. पण मग पुढे तरी काय? ज्याला पहिलीतच यश नाही त्याने एकदम एम.ए. ला बसवावे…ज्याने आधी काही सकस असे वाचलेलेच नाही त्यांच्या हाती जी.ए. द्यावेत अशी अपेक्षा करता येत नाही. वाचनाची सवय लागायला वाचकाला आधी रंजक साहित्य हवे असते. तेही दर्जेदार असायला हवे. आपल्याकडे त्याचीही वानवा. रहस्यकथा, गुढकथा, भयकथा, थरारकथा, विनोदी साहित्य….आहे कोठे? जे आहे ते बव्हंशी रुपांतरीत अथवा अनुवादित…येथल्या मातीत जणु कसलेही रहस्यच नाही कि काय? अलीकडे मुरलीधर खैरनार यांची "शोध" ही स्वतंत्र ऐतिहासिक थरार कादंबरी कादंबरी प्रसिद्ध झाली होती. तिला वाचकांनी भरघोस प्रतिसादही दिला. पण दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. तत्पुर्वी मीही जवळपास २८ राजकीय, आंतरराष्ट्रीय व सांस्कृतिक थरारकादंब-या मराठीत लिहिल्या होत्या. वाचकांचा प्रतिसाद असला तरी समीक्षकांचा नाही. त्याउलट इंग्रजीतील माझ्या थरार कादंबरीवर जागतिक पातळीवर लिहिले तर गेलेच पण २६ विद्यापीठांतील ग्रंथालयांसहित व्हाईट हाउसमधील ग्रंथालयात तिला "दक्षीण आशियामधील दहशतवादाचा महत्वाचा ऐवज" म्हणून स्थान मिळाले. आपल्याच मराठीची अशी कद्रू वृत्ती का हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
परकीय कथावस्तुंवर आधारीत का होइना मराठीत एके काळी रंजक सहित्याची मोठी लाट होती. गो. ना. दातार ते शिरवळकर एवढा प्रवास मराठीने केला. लाखो लोकांना वाचक बनवले. वाचनालये गजबजु लागली ती याच लेखकांमुळे. हेच वाचक मग अधिक गंभीर साहित्याकडे वळाले.
पण मग ही परंपरा खंडितच झाली. मराठी समिक्षकांनी रंजक लेखकांना साफ नाकारले. रंजक लेखक हा साहित्यिकच नसतो हे म्हणतांना त्यांनी अगाथा ख्रिस्ती, रेमंड च्यंडलर, चेस, गार्डनर अशा असंख्य लेखकांना मात्र जगाने नुसते डोक्यावर घेतले नाही तर राष्ट्रीय पुरस्कारही दिले याकडे दुर्लक्ष केले. पण आपल्याकडे अशा रितीने हिणवून घेत मग रंजक लेखन करायला कोण पुढे येणार? स्वतंत्र प्रतिभेने नव्या काळाशी सुसंगत, अधिक व्यापक परिमाणे घेवून येणारे नवे रंजक पण अनुभवविश्वात भर घालणारे साहित्यिक मराठीने निर्माण केले नाहीत. मारिओ प्युझो, जेफ्री आर्चर, गफोरसीथ…छे. आमची मजल तेथवर गेलीच नाही. आम्ही अवलंबून राहिलो मग अनुवादांवर. मराठीतील जीही काही वाचन संस्कृती आहे ती थोडीफार या रंजक साहित्याच्या अनुवादांमुळे. मराठी साहित्त्यिकांचे योगदान त्यात अल्पांश आहे हे नाईलाजाने म्हणावे लागत नाही काय?
मराठी साहित्यिकांची (किती जणांना साहित्त्यिक म्हणायचे हा प्रश्नच आहे.) सर्वात मोठी समस्या ही आहे कि एक पुस्तक प्रकाशित होते न होते, त्याला पारितोषिक कसे मिळेल, त्यावर परिचय कसे येतील…मग त्यावर आधारित पुढचे डाव काय..फायदे काय यातच लेखक गुंतून पडत जातो. एकदा तर मी एका लेखकाची कादंबरीचे हस्तलिखित वाचलेलेही नसता मला सांगितले कि ही कादंबरी तुम्ही फक्त प्रकाशित करा, राज्य शासनाचा पुरक्कार मिळणारच आहे. तो एवढय़ा ठामपणे बोलत होता कि त्याने काहीतरी फिल्डींग लावलेलीच आहे याची मला खात्रीच पटली. मी ती कादंबरी नाकारली. अन्य प्रकाशकाने ती प्रसिद्ध केली. दुसर्या वर्षी त्याच्या कादंबरीला खरोखरच पारितोषिक मिळालेले होते. आपल्या साहित्त्यिक पुरस्कारांच्या या यत्तेवर कोणाही सुजाण वाचकाला शरम वाटायला हवी कारण बव्हंशी पुरस्कार हे अक्षरशः मॅनेज केलेलेच असतात याबाबत कोणीही शंका बाळगू नये. पुरस्कारप्राप्त पुस्तक वाचणे ही एक शिक्षाच बनून जाते आणि वाचक गंडवला जातो. लेखक 10 टक्के कोटय़ातील फ्लॅट मिळवायला पात्र ठरतो…काय वाचन संस्कृती वाढवणार?
तो कशाला आपली साहित्त्यिक म्हणूनची यत्ता वाढवायचा प्रयत्न करेल?
अशा कुपमंडूक साहित्त्यिकांकडून नोबेल विनर साहित्त्यिक निर्माण होईल कसा? वैश्विकतेला कवेत घेत मानवी जीवनाचे असंख्य पदर उलगडून दाखवत वाचकाला प्रगल्भ करणार्या कलाकृती निर्माण होतीलच कशा? तसे होणार नसेल तर वाचन संस्कृती बहरेलच कशी?
मराठीत गाजलेल्या (बव्हंशी गाजवल्या गेलेल्या) कृती या तुलनात्मक साहित्याच्या अंगाने पहायला गेले तर अजुनही प्राथमिक पातळीवर आहेत असे प्रसिद्ध तुलनाकार समीक्षक डॉ. आनंद पाटील म्हणतात हे खरेच आहे.
मुळात ज्या लेखकांना स्वतःच जीवनाला निधडय़ा छातीने सामोरे जाता येत नाही, अनुभवविश्वात भर घालता येत नाही ते साहित्यिक वाचकांना कोणते नवे जीवनदर्शन घडवणार आहेत? नेमाडेंसारखा साहित्यिकही जेथे आपली नीतिमत्ता प्रसंगी गहाण ठेवू शकतो तर इतरांची काय कथा? मग कशी मराठी भाषा समृद्ध होणार आहे? कसा वाचक समृद्ध होणार आहे? वाचक हा देशाचा नागरिक असतो. त्याच्या जडणघडणीत साहित्याने मोलाचा हातभार लावावा अशी अपेक्षा असते. परंतु आपले साहित्य एकूणातच त्याला दुबळ्या मानसिकतेच्या पोचट अनुभवविश्वातच अथवा इतिहास-पुराणकालीन तथाकथित गौरवगाथांतच गुंगवून ठेवू पाहत असेल तर सक्षम व समृद्ध नागरिक कसा घडणार? मराठी साहित्य कसे वैश्विक होणार?
थोडक्यात मराठीचे व मराठी साहित्यविश्वाशी निगडित असंख्य प्रश्न आहेत. ते चर्चेत आणने संबंधितांना खरे तर अडचणीचे ठरणारे नसून ते सतत चर्चेत ठेवले तर मराठीच्या एकुणातील संवर्धनासाठी उपयोगाचेच होईल. पण तसेही होतांना आपल्याला दिसत नाही. आजच्या प्रत्यक्ष समस्यांबाबत साहित्य संमेलनांची अशी उदासीनता असेल तर मग मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याबाबत मराठी साहित्य संमेलन काय भूमिका घेणार आहे? मराठीचा जागर देश-विदेशात व्हावा ही सर्व साहित्यप्रेमी मराठी भाषकांची वाजवी अपेक्षा आहे. पण जेथून चिंतनाचे आणि परिवर्तनाचे धुमरे फुटावेत ते साहित्य संमेलनच त्याबाबत उदासीन असेल तर साहित्य संमेलन म्हणजे तीन दिवसांची जत्रा आणि या संमेलनाचा अध्यक्ष म्हणजे तीन दिवसांचा गणपती ही जनधारणा नुसती ठळक होत जाणार नाही तर काय?
तसे होऊ नये. ते मराठी भाषेच्या, साहित्याच्या आणि समाज-स्पंदनांना जाणवून घेत अभिव्यक्त होत राहणा-या प्रतिभावंतांच्या हिताचे नाही. साहित्य संमेलन हे मुठभरांचे असते या भ्रमातून सर्वच मराठी रसिकांनी बाहेर यायला हवे आणि त्यात कालानुरुप बदल घडवण्यात हातभार लावला पाहिजे. हे खरेच "अखिल भारतीय" आणि "सर्व मराठी साहित्य-रसिकांचे चिंतन-शिबीर" व्हावे यासाठी हातभार लावला पाहिजे.
साहित्य व्यवहारांचे, सर्व प्रवाहांचे भान साहित्य संमेलनात ठेवले जायला हवे. सर्व साहित्यिक अंगे मराठीत ख-या अर्थाने कशी फुलारतील, नव्या प्रतिभा जोमाने कशा लिहित्या राहतील हे पहायला हवे. साहित्य संमेलनाचे तेच काम आहे आणि अध्यक्षाने आपल्या कार्यकाळात फक्त प्रकाशन समारंभांतील टाळ्याखाऊ व आत्मप्रौढीच्या भाषणांबाहेर जात अखिल समाजातच साहित्य चैतन्य निर्माण करायला हवे. ही अपेक्षा बाळगण्यात गैर ते काय?
नाहीतर साहित्य संमेलन ही एक "दांभिकांची जत्रा" ठरतच राहील व एक दिवस मराठ भाषकांच्या मनातून पार उतरेल याची खात्री बाळगावी!
(साहित्य संमेलनाच्या पार्श्वभुमीवर माझा "साहित्य संमेलन कि दांभिकांची जत्रा" हा लेख साहित्य चपराकमद्ध्ये प्रसिद्ध झाला आहे.)

No comments:

Post a Comment