Saturday, January 16, 2016

संमेलनाध्यक्षांची साहित्यिक यत्ता कोणती?


***संजय सोनवणी****
मराठी साहित्यात चैतन्य सळसळेल असे वातावरण निर्माण व्हावे हे संमेलनाचे खरे कार्य होय. अध्यक्ष या चैतन्याचा केंद्रबिंदू असला पाहिजे. त्याने तमाम साहित्यिकांना आणि वाचकांना साहित्याकडे पाहण्याची नवदृष्टी दिली पाहिजे. साहित्याची इयत्ता कशी उंचावेल, नवविचारांना कसे धुमारे फुटतील हे त्याचे कार्य असते. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हा जीवन गौरव पुरस्कार नव्हे, तर जबाबदारीचे कार्य आहे याचे भान असले पाहिजे. परंतु गेल्या काही दशकांत हे झाल्याचे दिसत नाही.
नियोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीसांच्या पंतप्रधानांबाबतच्या एकेरी आणि अवमानजनक वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील सांस्कृतिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठी साहित्य संस्कृती, मराठी भाषेच्या संदर्भातील अनेक प्रश्न, ओस पडत चाललेल्या मराठी माध्यमाच्या शाळा, साहित्यासमोरील आधुनिक काळातील आव्हाने वगैरे मराठी साहित्य संस्कृतीशी निगडित प्रश्नांची चर्चा न होता सगळीच चर्चा साहित्यबाह्य विषयावर घसरल्याचे चित्र आहे.
डॉ. आनंद यादव हे महाबळेश्वर येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले असता, त्यांच्या 'संतसूर्य तुकाराम' या कादंबरीमुळे प्रचंड वादळ उठले होते. त्यांना ती कादंबरी तर मागे घ्यावी लागलीच, वारकऱ्यांची माफीही मागितली, तरीही ते महाबळेश्वरला जाऊन अध्यक्षीय भाषण देऊ शकले नव्हते. अध्यक्षाविना संमेलन भरवायची नामुश्की साहित्य महामंडळावर ओढवली होती. तरीही तो एक साहित्यिक वाद होता. संतांचे चारित्र्यहनन झाले की नाही, साहित्यिकांनी आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे की नाही याभोवती तो वाद केंद्रित होता. या वादाचा निर्णय न्यायालयानेच केल्याने हा विषय बंद पडला असला, तरी साहित्य संमेलनाच्या परंपरेला गालबोट लागलेच होते, हे विसरता येणार नाही.
सबनीसांची बाब मात्र पूर्णतः वेगळी आहे. ते भारत-पाक संबंध अथवा आंतरराष्ट्रीय राजकारणाचे कोणत्याही प्रकारचे भाष्यकार अथवा अभ्यासक नाहीत. त्यांनी या दिवाळीत किस्त्रीममध्ये पंतप्रधान मोदींवर एक मोठा लेख लिहिला व त्यांच्या 'पंचशील' धोरणाचे भरभरून कौतुक केले, एवढेच काय ते त्यांचे या संदर्भातील लेखन. गोध्रा अथवा त्यानंतर उसळलेल्या गुजरातमधील हिंस्र दंग्यांबाबत त्यांनी समर्थन अथवा विरोधाचे त्या वेळेस कधी वक्तव्य केलेले नाही, लिहिण्याची बाब तर दूरच. पंतप्रधानांनी 25 डिसेंबरला अचानक पाकिस्तानात उतरत नवाज शरीफ यांची भेट घेतली. या भेटीचा तपशील अद्याप उघड केला गेलेला नाही. या संदर्भात पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून अचानक पंतप्रधानांवर हल्ला होऊ शकत होता (जे शक्यच नव्हते) अशी भीती सबनीसांना वाटून ते काळजीने बोलले असतील, असा तर्कही एकवेळ करायला हरकत नाही. किंबहुना नरेंद्र मोदी यांच्यावर व त्यांच्या सरकारच्या धोरणांवर टीका, चिकित्सा अथवा स्तुती करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहेच. परंतु, तसे करत असताना आपण कोणती भाषा वापरतो याचे भान ठेवणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्यही आहे. त्यात सबनीस हे आता केवळ एक व्यक्ती नसून तमाम मराठी साहित्यिकांचे व साहित्य रसिकांचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांची जबाबदारी मोठी होती. पण त्यांनी अत्यंत सवंगपणे, एकेरी भाषेत कोणते मोदी मान्य, कोणते अमान्य व 'पाकिस्तानात कशाला मरायला गेले?' ते 'जगभर बोंबलत हिंडतात' अशी विधाने केली. ते मराठवाडयासारख्या ग्रामीण भागातून आल्याने त्यांनी अशा भाषेत वक्तव्ये केली, हे लंगडे समर्थन येथे कामाला येत नाही. ते साहित्यिक आहेत आणि भाषा म्हणजे काय हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे.
यानंतर वादळ उठले. भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलने केली, संमेलन उधळायच्या धमक्या दिल्या व या प्रश्नाला राजकीय स्वरूप आल्याचे दिसू लागले, जे चुकीचेच होते. कायदेतज्ज्ञ संजीव पुनाळेकर यांनी त्यांना टि्वटरवरून सकाळी फिरायला जायचा सल्ला दिल्याने, त्यात खुनाची छुपी धमकी ध्वनित होत असल्याने, त्यावरही वादंग उठले. फोनवरून काही भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांना हातपाय तोडण्याच्या धमक्या दिल्याने त्यांच्याविरुध्दही गुन्हे दाखल झाले. सध्या सबनीसांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. या बाबी टाळायला हव्या होत्या. सहिष्णुतेचा प्रश्न आज ऐरणीवर आहे, त्यात तेल ओतायचे काम करत हिंस्रता दाखवण्याची यत्किंचितही आवश्यकता नव्हती. सबनीस जेवढे चूक होते, त्यापेक्षा ही गंभीर चूक आहे याची नोंद भाजपा नेत्यांनी घेतली पाहिजे.
या सगळया बाबींचा साहित्य संस्कृतीशी काडीइतकाही संबंध नाही हे उघड आहे. किंबहुना आमची साहित्य संस्कृती व राजकीय संस्कृतीही रसातळाला पोहोचली असल्याचे चित्र यातून निर्माण झाले आणि हीच बाब नेमकी चिंता करण्यासारखी आहे. किंबहुना साहित्य संमेलन आणि साहित्य याचा काही संबंध उरला आहे की नाही, हाच प्रश्न आपल्याला पडावा व अशी संमेलने यापुढे असावीत की नसावीत यावरही गंभीर चिंतन करणे गरजेचे झाले आहे.
संमेलनाध्यक्षांची साहित्यिक यत्ता कोणती, हा प्रश्न यंदा तर प्रकर्षाने सामोरा आला. राजेंद्र बनहट्टी संमेलनाध्यक्ष झाले होते, त्या वेळीही हा प्रश्न उद्भवला होताच. सुमार दर्जाचे पण हजारभर मतदारांपैकी पाचेकशे मतदार ताब्यात घेतले की कोणीही अध्यक्ष होऊ  शकतो, हे वास्तव आहे. घटक संस्थाच यात महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणजे कोणाला मत द्यायचे याचे मतदारांनाही स्वातंत्र्य असतेच असे नाही. साहित्य संमेलने ही हळूहळू साहित्य संमेलनाच्या अध्यक्षासाठी नव्हे, तर आयोजक, संस्थाप्रमुखांना मिरवण्याची एक सुवर्णसंधी म्हणून साजरी केली जात आहेत, असेही चित्र आपल्याला दिसेल. साहित्यिक खुजे होत जातात, आयोजक मात्र बलाढय बनत जातात.. की मुळातच साहित्यिक खुजे आहेत म्हणून असे होते?
स्वतंत्र विचार, भाषा-संस्कृती याबाबत नवी दिशा देण्याची हिंमत व प्रतिभा, नवप्रतिभांना प्रोत्साहन देत त्यांच्यातूनही भविष्यातील उंचीचे साहित्यिक घडवता येण्यासाठीचे तत्त्वज्ञान देता येऊ शकणारे साहित्यिक सध्या किती? हा खरा प्रश्न आहे. खरे म्हणजे सर्व खुजी टेकाडे आहेत व त्या टेकाडांमध्ये कोण 

अधिक उंचीचे, अशा स्पर्धा लागल्या आहेत. प्रत्येक साहित्यिक, विचारवंत, समीक्षक हा कोणत्या ना कोणत्या कंपूत सामील आहे. हे कंपू कोणत्या ना कोणत्या राजकीय नेत्यांशी 'जुळवून' आहेत. तात्पुरते लाभ, पदे, मंडळांवरील नियुक्त्या यासाठी ते आपली प्रतिभा अधिक खर्च करतात. 'यंदा मला अध्यक्ष होऊ द्या... पुढच्या वर्षी मी तुला पाठिंबा देतो' या व्यावहारिक तडजोडी बिनदिक्कतपणे केल्या जातात. महामंडळाच्या घटक संस्थांच्या - बिनडोक, असाहित्यिक असले, तरी - प्रभावी व्यक्तींशी लाचारपणे संबंध वाढवले जातात. मतदार नवलेखकांचे साहित्य भिकार असले, तरी त्यांना स्तुतीच्या भाराखाली गुदमरवले जाते. त्यात परखड समीक्षा नसतेच. अशा परिस्थितीत नवसाहित्यिक कसा घडणार?
साहित्यिकांची ही प्रवृत्ती का बनते आहे? खरे म्हणजे अपवाद वगळता मराठी साहित्य ही खरेच सुमारांची जत्रा बनली आहे. आंतरराष्ट्रीय सोडा, राष्ट्रीय पातळीवरही मराठी लेखक अभावानेच तळपले आहेत. यांची साहित्य दृष्टी वैश्विक नाही. यांच्या जीवनप्रेरणा मुक्त नाहीत. मानवी दु:खाचा, त्याच्या अविरत संघर्षाचा तळगर्भ पकडत त्यातून वैश्विक कलाकृती निर्माण करण्याची प्रतिभा त्यांच्या ठायी नाही. राजकारण व समाजकारण यावर प्रखर भाष्य करत समाजाला नवी दिशा, विचार व तत्त्वज्ञान देता येईल, अशी मुळात यांच्यात क्षमताच नाही. त्यामुळे समाजमनावर या साहित्यिकांचा कसलाही प्रभाव नाही. किंबहुना त्यांना हे साहित्यिक/समीक्षकच माहीत नाहीत. माहीत करून घ्यायची गरजही वाटत नाही. 'कोण हे श्रीपाल सबनीस?' हा प्रश्न निवडीनंतर वाचकांनीच उपस्थित केला, यातून ही बाब अधोरेखित व्हावी.
साहित्य संमेलनाचे जे अध:पतन होत चालले आहे, त्याचे मूळ साहित्यिकांच्याच अध:पतनात आहे हे आपल्याला लक्षात घ्यावे लागेल. आडातच नाही, तर पोहऱ्यात येणार कोठून? आणि उथळांकडून तुम्ही कोणत्या अपेक्षा बाळगणार आहात?

मराठी साहित्यात चैतन्य सळसळेल असे वातावरण निर्माण व्हावे हे संमेलनाचे खरे कार्य होय. अध्यक्ष या चैतन्याचा केंद्रबिंदू असला पाहिजे. त्याने तमाम साहित्यिकांना आणि वाचकांना साहित्याकडे पाहण्याची नवदृष्टी दिली पाहिजे. साहित्याची इयत्ता कशी उंचावेल, नवविचारांना कसे धुमारे फुटतील हे त्याचे कार्य असते. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हा जीवन गौरव पुरस्कार नव्हे, तर जबाबदारीचे कार्य आहे याचे भान असले पाहिजे. परंतु गेल्या काही दशकांत हे झाल्याचे दिसत नाही. संमेलने उत्सवीही न राहता बाजारू बनली आहेत. आता बाजारूपणात सवंगता घुसल्याने यापेक्षा अधिक अध:पतन ते काय होणार, हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
खरे तर असल्या अध्यक्षांमुळे नाउमेद व्हायचे कारण नाही. खंद्या, लिहित्या आणि भव्य-दिव्यतेचा सोस असणाऱ्या साहित्यिकांनी एकवटायला हवे. भले ते मूठभर असतील. त्यांनाच आता साहित्य संमेलनांना दिशा देण्याचे, निवडणूक पध्दतीत सुधारणा घडवून आणण्याचे आव्हान स्वीकारावे लागेल. सामान्य वाचकसुध्दा मतदार कसा बनेल हेही पाहावे लागेल. सध्याचे मतदार आणि त्यांची कालबाह्य मतदान पध्दत बदलत सर्वांना ऑनलाईन मते देता आली पाहिजेत, तरच साहित्य संमेलन खरोखर लोकांचे बनेल. हजारभर मुखंडांचे व त्यांच्यावर अनिर्बंध सत्ता गाजवणाऱ्या असाहित्यिक प्रवृत्तींचे उच्चाटन त्याखेरीज होणार नाही.
त्यामुळे संमेलन नको म्हणण्यापेक्षा संमेलनाची सर्वच कार्यपध्दती आमूलाग्र बदलावी. ते होत नाही, तोवर साहित्य संमेलन न घेतले तरी काही बिघडणार नाही; कारण मुळात अशी संमेलने काही देतच नसतील, तर ती भरवून तरी काय उपयोग?


2 comments:

  1. संजयजी चित्रपट, कला, साहित्य ह्या क्षेत्रात वंश परंपरागत मुजोरी वाढली आहे, त्यामुळे आत्ताचे साहित्य चित्रपट तर बेचव झालेलेच आहेत. पण वेगळ्या धाटणीचे कोणी काही करायला गेल्यास त्याला अश्लील, मागास, धर्मविरोधी हे शिक्के मारून हे तथाकथित लोक जोर लावून बाद करायचा प्रयत्न करतात. अशाने आपले कलाक्षेत्र मागास राहत आहे आणि असे नामधारी अध्यक्ष साहित्य संमेलनाला भेटतात. म्हणे शरद पवारांनी संमेलनात भाषण केले. मोठ्ठा विनोद आहे हा. शरद पवार क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष, शेतकरी नेते आणि इकडे साहित्य मंडळात भाषण हि ठोकतात. अरे इतर लोकांसाठी काहीतरी जागा ठेवा ना. का सगळेच तुम्हाला आणि तुमच्या पिल्ल्यांना पाहिजे?

    ReplyDelete
  2. http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/sahitya-sammelan/articleshow/50618192.cms

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...