Saturday, January 30, 2016

माणसाचा शाश्वत धर्म




ज्यालाही शारिरिक अथवा मानसिक किंवा लैंगिक हिंसेत रस असतो त्यांच्या मेंदुतील रसायनांत काहीतरी मुलभूत गडबड असते. असे लोक प्रत्यक्षात अशी हिंसा करतात किंवा स्वत:ला शक्य नसते तेंव्हा अशी कृत्ये करणा-या लोकांचे छुपे किंवा उघड समर्थक असतात. व्यक्तिगत हिंसा शक्य नसते तेथे झूंड करून हिंसा करतात. हिटलर केवढा क्रूर होता हे माहित असुनही त्याचे समर्थक जगभर कमी नाहीत. भारतातही आहेत. Polpot येथल्या लोकांपर्यंत अजून नीट पोचला नाही अन्यथा त्याचेही समर्थक येथे भराभर पैदा झाले असते. Sadist लोकांचा हा मानसिक छंद असतो आणि त्यांना खरे तर मानसोपचाराची गरज असते. भारतात आज अशा अनेक मानसोपचार केंद्रांची गरज आहे.
मनुष्याच्या अमानवीपणाला मनुष्यच वाचवू शकतो. किंबहुना आजवर माणसाची जी काही अंशता: का होईना प्रगती झाली आहे त्या मागे माणसाच्या मनात असलेल्या जन्मजात माणुसकीच्या समाजोपयोगी भावना आहेत. ती अनंत चुकांतुन अडखळत झालेली आहे. आम्ही चुका कमी करायच्या कि वाढवायच्या हाच काय तो प्रश्न आहे. मानवता राहणारच आहे. कालच्या संस्कृत्या आज नव्या रुपात का होईना साकारतच अहेत आणि उद्याही त्या कोणत्या ना कोणत्या, पण मानवतेच्या उदात्त मुल्यांच्या पायावरच उभ्या असणार आहेत.
विध्वंसकता, क्रुरता, माणसांना माणसांनीच मारण्यात विकृत आनंद शोधणा-यांचेही सहास्तित्व राहणारच आहे. खरे म्हणजे मानवी सहजीवनाच्या उपजत प्रेरणांना पुरातन काळापासून या केमिकल लोच्या झालेल्या झुंडींनी अडथळेच आणायचा प्रयत्न केला आहे. हिंसक लोकांना आदर्श मानणारे भविष्यातील हिंसक नेत्यांच्या उदयाचा पाया घातलेक्ला आहे हेही एक वास्तव आहे. माणसांना गुलाम करण्याची, स्त्रीयांना गुलाम करण्याचे भावना ही याच हिंसक मानसिकतेची परिणती आहे.
पण तरीही जीवन फुलते. तरीही प्रेमाच्या आणाभाका होतात. तरीही अजरामर मैत्रीचे बंध जुळतात. तरीही माणूस क्षमा करतो. तरीही माणसाच्या काळजात करुणेचे कोंभ फुटतात. तरीही "हे विश्वची माझे घर" अशा उदात्त भावना माणसाच्या अंतर्गर्भातून येतात. खांद्यावरून क्रुस वाहणारा म्रूत्युकडे वाट चालणारा येशू येतो तसाच सा-या मानवजातीच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहणारा गांधीही येतो. बुद्ध येतो तसाच महावीरही येतो. ते येतात कारण माणसाच्या मनातच मानवता आहे हे त्यांना माहित असते. त्यावरची अमानुषतेची पुटे काढण्यासाठीच काय ते आलेले असतात. ते माणसाला काहीच माणसाला माहित नसलेले नवे सांगत नाहीत. पण ते माणसाला माहित असलेले केवळ जगून दाखवतात, एवढेच!
चांगुलपणा व सौहार्दमय सहजीवन हा माणसाचा शाश्वत धर्म आहे. यत अडथळा आणत आपल्या असामाजिक भावनांना प्राबल्य देवू पाहणारे हे अधर्मी होत. हिंसेचे तत्वज्ञान हे मानवतेचे तत्वज्ञान असू शकत नाही. हिंसेचे परिप्रेक्ष न समजणे हे मानवता न समजल्याचे लक्षण आहे. मानवी प्रेरणा न समजल्याचे लक्षण आहे. असे लोक नेहमीच हरतात. गांधी आज मारुनही जीवंत असेल तर तो विजय मानवी सत्प्रेरणांचा आहे. हिंसक प्रेरणांचा नव्हे. आजही बुद्ध-महावीर-येशुची करुणामयता जीवंत असेल तर तो मानवतेचाच विजय आहे. हिटलर-पोलपोट-गोडसे भलेही काही लोकांना ग्रेट वाटो...त्यांचा पराजय त्यांच्याच विकृत नियतीने कधीच केला आहे. त्यांना भवितव्य नाही.
शेवटी ज्ञानोबा म्हनतात तेच खरे...
"खळांची व्यंकटी सांडो l तया सत्कर्मी रती वाढो l
भूतां परस्परें पडो l मैत्र जीवाचें l"
आम्ही वैश्विक मित्र व्हायचे कि द्वेष्टे हे आम्हीच ठरवायचे आहे.
आणि मानवता, शांती आणि अहिंसा नेहमीच, अनेकदा हरल्यासारखी वाटूनही, जिंकते!
बापू, विनम्र अभिवादन!

3 comments:

  1. सोनावणे सरांच्या ब्लोग्चा मी नियमित वाचक आहे त्यांचा वाचकवर्ग कमी कमी होतो आहे का ?त्यांनी एकूण जानेवारीत ९ विचार मांडले त्यातील २ वैदिक आणि माणू बद्दल होते त्याला सर्वात जास्त प्रतिसाद होता , साहित्य संमेलनाबाबत किरकोळ आणि काही वेळा तर २, ७ ८ नासा आणि दोनदा तर शून्य प्रतिसाद आहे . म्हणजे कोणीच काहीच दाखल घेत नाही , हे पाहून वाईट वाटते . संजय सोनावणे हे चांगले लिहितात , पण असे का होत असावे ?
    साधारणपणे जनतेला वैदिक , ब्राह्मण इत्यादी लेखात जास्त इंटरेस्ट आहे असे दिसते,
    आता १९ फेब्रुवारीला छत्रपति शिवरायांची जयंती आली आहे त्यानिमित्त सरांनी लेख लिहावा असे सुचवावेसे वाटते .
    आजकाल जातीनुसार नेत्यांची वाटणी झाली आहे असे चित्र दिसते . परंतु संजय सर अतिशय निर्मळपणे लिहित असतात हे त्यांनी बाबासाहेब पुरंधारे यांच्या निमित्ताने सिद्ध केले आहेच . सर पुन्हा एकदा अनेक विषय हाताळत हे वर्ष आमच्या वाचकांसाठी समृद्ध करतील अशी आशा करतो . सर नम्र अभिवादन !

    ReplyDelete
  2. सव्यसाची कादंबरी चा पुढचा भाग कोणता आहे ? ?

    ReplyDelete
  3. उत्तम लेख, हिंसा-अहिंसा ह्यांचा मानव-सापेक्ष अभ्यास ह्या विषयासाठी आवश्यक आहे. मानव हा मिश्राहारी आहे, त्याच्या दैनंदिन गरजांसाठी (आहार-निद्रा-मैथुन) साठी त्याला जेव्हा हिंसा करावी लागते तेव्हा तो हिंसक बनतो. जर ह्याच गरजा हिंसा न करता प्राप्त झाल्या तर तो हिंसा करणार नाही. आपल्या देशात बी-बिया पासून खाल्लेले पदार्थ हेसुद्धा हिंसा ठरू शकतात कारण इतर पर्याय उपलब्ध आहेत. पण ज्या भूमीत मांसाशिवाय काहीही मिळत नाही ते लोक अहिंसेचे चोचले करू शकत नाहीत. अशावेळी गोमांस खाणे चांगले कि वाईट हा वाद सुरु होतो. स्त्री प्राप्त करण्याचा प्रकारही तसाच, जिथे पुरुषाला स्वतः जगायचे वांदे तो स्त्रीला कशाला जागवेल? वेळ पडल्यास तिला बाहेरून पळवून आणून प्राप्त करेल.
    सरतेशेवटी हिंसा-अहिंसा हे निसर्गदत्त गुणदोष आहेत. माणसाचे जीन्स जसे इकडून तिकडे फिरत जातात तसे हे गुणही बहुतेक फिरत असावेत, नाहीतर आपल्या देशात हिंसा होण्याची सुतराम शक्यता नाही. जैन, शैव धर्म, बौद्ध असेच हिंसा विरहित धर्म होते असे वाटते. जशी माती तसा माणूस. असेच आहे का? कि वेगळे काही?

    ReplyDelete

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...