Sunday, February 7, 2016

वैदिक आणि हिंदू : दोन धर्म!



हिंदू धर्म हा वैदिक धर्मातुनच विकसित झाला व नंतरच्या काळात पौराणिक धर्म व वैदिक धर्म यांचे मिश्रण होत आजचा हिंदू धर्म बनला असे साधारणपणे मानले जाते. आजच्या हिंदू धर्मावरील वैदिक वर्चस्व ठळकपणे नजरेत भरण्यासारखे आहे कारण सर्वसामान्य (त्रैवर्णिक वगळता) लोक जो धर्म पाळतत तो कोठल्याही बाबतीत वैदिक नाही. एवढेच नव्हे तर त्यांना वेदांचा/वेदोक्त संस्कारांचा अधिकार नाही. एकच धर्म असता तर अशी अवस्था आली नसती हे उघड आहे. त्यमुळे पौराणिक व वैदिक धर्माचे" संम्मिश्रण झाले या म्हणण्यातही काही अर्थ राहत नाही.

वैदिक धर्म म्हणजे काय हे आपण आधी पाहू. वेदांनाच एकमेव अंतिम मुलस्त्रोत मानत, यज्ञादि कर्मकांडांद्वारे धर्मकृत्ये करत, वेदधरित स्मृती आणि ब्राह्मण ग्रंथांना धर्मग्रंथ मानत त्यातील तरतुदींप्रमाणे जगणे म्हणजे वैदिक धर्म. या धर्मातील लोकांना सोळा वैदिक संस्कारांचा धार्मिक आधार असून आता पुरुषांनाच उपनयनाचा अधिकार आहे. वैदिक धर्म भारतात सनपुर्व १२०० ते १००० या काळात दक्षीण अफगाणिस्तानातून धर्मप्रचारकांच्या माध्यमतून आला. कुरु-पंचाल प्रदेशात त्यांन राजाश्रयही मिळाला. तेथुन पुढे अत्यंत सावकाश हा धर्म देशभर काही लोकांत प्रवेशला. पण सर्वव्यापी रुप या धर्माला कधी आले नाही.

तरीही अनेक विद्वान हा च्धर्म मुळचा भारतातीलच असे सिद्ध करूह्न लोकांचा ब्युद्धीभेद करण्याचा प्रयत्न करत असतात. पण आपल्याला या बाबींचा तथ्यपुर्वक विचार केला पाहिजे. भारतीय संस्कृतीचा, त्यात जन्माला आलेल्या धर्मांचा संगतवार अभ्यास करतांना प्रादेशिकता, कालानुक्रमता आणि तत्कालीन परिस्थित्या यांचा विचार करावा लागतो. उदाहरणार्थ वैदिक धर्माची स्थापना मुळात कोठे झाली? ते वैदिक धर्म स्थापन करण्याआधी ते लोक कोणत्या धर्माचे होते? या धर्माच्या स्थापनेत भाग घेणारे कोनकोणत्या टोळ्यांचे होते?

आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे वेदपुर्व काळात भारतीय लोक कोणता धर्म पाळत होते? भारतातील आजही कोणता धर्म दैनंदिन जीवनात पाळतात? वैदिक धर्मीयांनी एतद्देशियांना पराजित करून आपली सम्स्कृती व भाषा लादली हा दावा खरा आहे काय?

या प्रश्नांना न भिडता, त्यांची समाधानकारक उत्तरे न शोधता कधीही कोठलाही ग्रंथ उचलून व त्यातील उद्घृते फेकून पाळामुळांबद्दल संभ्रम निर्माण करण्याच्या प्रक्रियेतून कोणालाही कसलेही तथ्यप्रधान उत्तर मिळणार नाही हे उघड आहे. उदा. वैदिक आर्य भारतात बाहेरुन आले असा एक मतप्रवाह अहे. ते आक्रमक म्हणून आले कि स्थलांतरीत म्हणून आले याबद्दल मतभेद आहेत.  असे असले तरी आजचा विचारप्रवाह स्थलांतरीत म्हणून आले याकडे झुकतो. याविरुद्धचा प्रवाह आहे तो म्हणतो कि वैदिक आर्य हे भारतातीलच असून ते स्थलांतरे/आक्रमणे याद्वारे भारताबाहेर इराणमार्गे युरोपात पसरले. तिसरा मतप्रवाह माझा असून वैदिक धर्म अवेस्त्याचा समकालीन असून दक्षीण अफगाणिस्तानात निर्माण झाला व धर्मप्रसाराच्या मार्गे भारतात आला.

हा धर्म भारतातील नाही याची प्रमाणे थोडक्यात अशी:

१) सिंधू किंवा उत्तरसिंधुकालीन नगरे तसेच समाजजीवनाचे कसलेही चित्रण ऋग्वेदात नाही.
२) ऋग्वैदिक संस्कृती ही पशुपालकांची संस्कृती असून स्थिर, नागरी व कृषीप्रधान नाही.
३) ऋग्वेदात येणारा भुगोल हा दक्षीण अफगाणिस्तान हा आहे तर अवेस्त्याचा भुगोल उत्तर अफगाणिस्तान आहे.
४) दोन्ही धर्मांत व भाषेतही विलक्षण साम्य आहे.
५) दोन्ही धर्मग्रंथात एकमेकांच्या धर्मात असलेल्या व्य्क्ती व संघर्ष हुबेहुब आले आहेत, अर्थात शत्रुत्वाच्या भावनेने. उदा. ऋग्वैदिक नोढस गौतम अवेस्त्यात येतो तर अवेस्त्याचे झरथुस्ट्र, विश्तास्प, अरिजास्प आदि ऋग्वेदात येतात. पुरु-पौरु हे दोन्ही ग्रंथांत येतात.
६) त्या भुभागातील दास-दस्यु हे अवैदिक समाज अवेस्त्यातही येतात. जर वैदिक धर्म भारतात स्थापन झाला असा आग्रहच धरायचा असेल तर अवेस्त्याचा पारशी धर्मही भारतातच स्थापन झाला असे मान्य करावे लागेल, आणि ते वास्तव नाही.
७)ऋग्वेदात उल्लेखिलेल्या बहुतेक जमाती पश्चिमोत्तर भारत व अफगाणिस्तानासहित इराण व तुर्कमेनिस्तानातील आहेत व त्या आजही अस्तित्वात आहेत. उदा. तुर्वश (तुर प्रांतातील तुराणी/तुर्क ), पख्त (पख्तुन), भलानस (बोलन खिंडीतील लोक), दास-दस्यु (अफगाणिस्तानातील लोक), पर्शू (पर्शियन लोक), गांधारी (गांधार प्रांतातील लोक), पार्थव (पार्थियन लोक), अलिन (काफिरीस्तानातील लोक.) ही अशी अनेक उदाहरणे देता येतील. ही जमातनामे अवेस्त्यातही येतात!

थोडक्यात अवेस्त्याचा काळ तोच ऋग्वेदाचा काळ. त्यामुळे ऋग्वेदाचा काळ जितका मागे नेला जाईल तितकाच अवेस्त्याचाही काळ मागे न्यावा लागेल हे उघड आहे. परंतू अन्य समकालीन संस्कृत्या, उदा. ग्रीक, इजिप्शियन, मितान्नी, अस्सिरियन वगैरे या दोहोंचा काळ सनपुर्व १५०० पलीकडे जावू देत नाहीत हेही वास्तव लक्षात घ्यावे लागते.

वैदिक धर्म भारतात येण्याआधी सिंधू खोरे ते दक्षीण या विस्तीर्ण भागात शैव धर्म मोठ्या प्रमाणावर पसरला होता. याचे प्रत्यक्ष पुरावे उपलब्ध असून शिवलिंगे, मातृदेवता, सप्तमातृका यांच्या प्रतिमा तर मिळतातच पण भारतियांना आजही पूज्य असलेल्या वृषभाच्या मुद्राही मोठ्या प्रमाणात मिळतात. शिवलिंगासमोर आताही नंदी असतो. बैलपोळा भारतभर वेगवेगळ्या नांवांनी साजरा तर होतोच पण ५२ शक्तीपीठे आणि गांवोगांवी असलेल्या देवीपंदिरांतुन वेदपुर्व धर्म आजही पाळला जातो हे आपल्या लक्षात सहज येईल.

असे समजा, वैदिक आक्रमक असते आणि येथील लोकांना पराजित केले असते तर सर्वप्रथम त्यांनी येथील देवतांना (धर्माला) नष्ट केले असते. स्वत:ची इंद्र, वरुण, नासत्य, मित्र इ. वैदिक देवता येथील लोकांवर लादल्या असत्या. त्यांची मंदिरे बनवली असती. पण तसे झालेले नाही. याचाच अर्थ वैदिक जिंकले नव्हते. त्यांने त्यांचा धर्मप्रचार केला. येथीलच अनेक लोक धर्मांतरित होऊन त्यांच्या धर्मात गेले. घुर्ये म्हणतात कि भारतातील साडेपाचशे ब्राह्मण जातींपैकी किमान साडेतिनशे या मुळच्या वैदिक नाहीत, त्यांची गोत्रेही वैदिक नाहीत. याचा अर्थ समजावून घ्यायला हवा.

बरे, डा. रा. ना. दांडेकर म्हणतात, "शैवप्रधान धर्मधारा हीच मुळची असून वैदिक धर्माचा उदय ही मध्योद्गत घटना असून आजच्या हिंदू धर्मावर तिचा विशेष प्रभाव नाही."

वरील विधानावरून दोन बाबी स्पष्ट होतात. पहिली म्हणजे वैदिक व शैवप्रधान धर्म हे दोन वेगळे स्वतंत्र धर्म आहेत हे वैदिक विद्वानांनाही मान्य आहे. दुसरे म्हणजे, आजही आमचा धर्म वेदपुर्व काळापासुनचा शैवप्रधान धर्म आहे व तो आम्ही पाळतो. असो. आपल्याला अजून थोडे खोलात जायला हवे.

हिंदू शब्दाची आजतागायत व्याख्या झालेली नाही हे आपणास माहितच आहे. काय कारणे असावित? अव्याख्यित असा हा जगाततील एकमेव धर्म आहे याचे खरे कारण वैदिक आणि शैवप्रधान जनसामान्यांचा धर्म एकच मानला गेल्याने ही स्थिती आली. याचा अर्थ व्याख्या करण्याचे प्रयत्न झालेच नाहीत असा नाही.

खालील व्याख्या मी श्री. ज.स.करंदीकर, श्री. दा.न. शिखरे, पं. महादेवशास्त्री दिवेकर व डा. रा. ना. दांडेकर यांच्या विवेचनातुन घेतल्या आहेत.

१. "ज्याचे आईबाप हिंदू असतील तो हिंदु."
या व्याख्येतील त्रुटी अशी कि अहिंदू माता-पित्यांच्या संततीला हिंदु करुन घेतले तर ती त्याला लागु होत नाही.

२. हिंदुस्तानात जन्म झाला तो हिंदू.
या व्याख्येत परदेशात जन्म झालेल्या हिंदुंना बाहेर टाकले जाते तर ज्या मुस्लिम अथव अन्य धर्मियाचा जन्म हिन्दुस्थानात झाला आहे त्यांनाही हिंदू मानावे लागते.

३. जातीभेद मानतो तो हिंदू.
असे मानल्यास लिंगायतादी जातीभेद न मानणारे संप्रदाय अहिंदु ठरतात. एवढेच नव्हे तर ही व्याख्या जातीभेदाला गंभीर रुप देते.

४. जो हिंदु कायदा मानतो तो हिंदु.
काही विद्वान ही व्याख्या मानतात. पण दत्तक, वारसा, विवाह याबाबतीत हिंदु कायदा संदिग्ध आहे. शिवाय हिंदू कोड बिल हे बौद्ध व जैन धर्मियांनाही लागु असल्याने तेही हिंदू ठरतील, पण ते वास्तव नाही.

५. सावरकरांची व्याख्या:
"आसिंधुसिंधुपर्यंता यस्य भारतभुमिका
पित्रुभू: पुण्यभुश्चैव स वै हिंदुरेते स्म्रुत:

अर्थात सिंधु नदीपासुन समुद्रापर्यंत पसरलेली ही भारत्भूमी ज्याला वाडवडीलांची भूमी आणि पुण्यभुमी वाटते तो हिंदू होय.

ही व्याख्या प्रादेशिक आहे आणि भावनिक आहे. राष्ट्रवादासाठी ती योग्य असली तरी ती धर्माचे दिग्दर्शन करत नाही.

६. लो. टिळक यांची व्याख्या अशी आहे:
प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु साधनानाननेकता
उपास्यानामनियमं एतद्धर्मस्य लक्षणम

अर्थात: वेदांविषयी प्रामाण्यबुद्धी, साधनांची अनेकता आणि उपास्य नेमके कोण असावे याविषयी निश्चित नियम नसने, हे हिंदु धर्माचे लक्षण होय.

श्री. दा. न. शिखरे टिळकांच्या या व्याख्येवर आक्षेप घेतात ते असे: "वेदप्रामाण्य मान्य नसलेला चार्वाकापासून ते संतांपर्यंत एक अवाढव्य प्रवाह आहे तो या व्याख्येप्रमाणे हिंदू ठरत नाही. एवढेच नव्हे तर स्त्रीया आणि शुद्रांना मुळात वेदांचा अधिकारच नाहे. याखेरीज महत्वाचा प्रश्न असा कि वेदांच्या पुर्वीही हिंदु धर्म आस्तित्वात होताच कि! शिवाय "श्रुती-स्म्रुती-पुराणोक्त अशीही व्याख्या करता येत नाही कारण श्रुती अनेक असून त्यात खुपच मतभिन्नता आहे. पुराणांतील मतभेदांबाबत तर बोलायलाच नको. तसेच कोणते आचार आवश्यक आहेत हेही लोकमान्यांनी स्पष्ट केलेले नाहीत. त्यामुळे अव्याख्येयता हीच हिंदु धर्माची व्याख्या आहे असे म्हटले तर त्याचा व्यवहारात काही उपयोग होत नाही." ("सर्वश्रेष्ठ हिंदू धर्म": श्री. दा.न.शिखरे)

याचाच अर्थ असा कि वेद व स्मृती या केवळ त्रैवर्णिकांसाठी असल्याने ते वैदिक होते. हिंदू (अथवा शैव) असुच शकत नव्हते. शूद्र हे नांव वैदिक धर्मबाह्य असे घ्यायचे आहे. मुस्लिमांद्साठी इतर धर्मीय जसे काफिर तसेच अवैदिक (वेदपुर्व) लोक हे त्यांच्या दृष्टीने शूद्र. वेगळ्या धर्माचे लोक. या दोहोंना एकत्र केले तर हिंदू शब्दाची व्याख्या कशी होनार? समजा ज्यू आणि इस्लाम एकाच धर्माचे कोणी गृहित धरून व्याख्या करायला गेला तर तोही फसणारच कि नाही?

केवळ याच मुळे हिंदू शब्दाची सर्वमान्य व्याख्या झालेली नाही. जोवर वैदिक धर्म वेगळा आहे, त्यचे आचार-विचार व कर्मकांड वेगळे आहे हे आपण समजावून घेत नाही तोवर हा गोंधळ संपणार नाही.

आता वेद हे हिंदू धर्माचे मुलस्त्रोत अथवा धर्मग्रंथ होऊ शकत नाहीत त्याचीही तपासणी केली पाहिजे. ती खालीलप्रमाणे-

१) वैदिक धर्मग्रंथांत (हिंदू नव्हे) इंद्र, वरुण, नासत्य, मित्र, इत्यादि जवळपास ६४५ देवता आहेत. यात एकही अन्य हिंदू पुजतात ती देवता नाही. यजुर्वेदात तर "न तस्य प्रतिमा अस्ति" म्हणत मुर्ती/प्रतिमापुजेचा निषेध तर केलाच आहे. (यजु. ३२.३) पण ऋग्वेद ७.२१.५ आणि १०.९९.३ मद्ध्ये शिवाची "शिस्नदेव" म्हणून निर्भत्सना केली असून लिंगपुजकांचा केवढा द्वेष वेदरचैते करत असत याचे स्पष्ट दिग्दर्शन होते. विनायक गणपतीला वैदिक लोक तर विघ्नकर्ता मानत असत, विघ्नहर्ता नव्हे हे तर सर्वविदित आहे. म्हणजे ज्या देवता हिंदू भजतात, त्यांचा निर्देशच मुळात वेदांमद्ध्ये अवमानात्मक येतो ते ग्रंथ अर्थातच हिंदुंचे धर्मग्रंथ असू शकत नाहीत.

२) शिवाला यज्ञाचा विध्वंसक मानले जाते. यज्ञांत शिवाला हवि दिला जात नाही. शैव अथवा शैवप्रधान मुर्तीपुजक लिगरुपाने शिव-शक्ती पुजा करतात, यज्ञ हा शैवांचा अर्थात हिंदुंचा कर्मकांडाचा भाग नाही. रुद्र आणि शिव यांचा काडीएवढाही संबंध नाही हे मी अन्यत्र दाखवून दिलेलेच आहे.

३) वेद अथवा वैदिक समाजरचना ही पुरुषसत्ता प्रधान असून वेदांत फक्त अदिती, रात्री, पृथ्वी, सरस्वती व उषस याच स्त्रीदेवता आहेत. अदिती (देवतांची माता) सोडली तर बाकी नदी व निसर्गातील घटनांच्या स्त्रैण प्रतिनिधी आहेत. हिंदू शैवप्रधान धर्मात मात्र शिव व शक्ती हे नेहमीच युग्म स्वरुपात समतेने पुजले जातात.

४) शिवपुजा सिंधू पुर्व काळापासून प्रचलित असून वेदरचना ही अत्यंत उत्तरकालीन आहे. त्यात शिवप्रधानता नसल्याने ते हिंदू धर्माचे अंग होऊ शकत नाहीत. वेदरचना भारतात झालेली नाही. एतद्देशियांचा धर्म हा वैदिक धर्मापेक्षा सर्वस्वी वेगळा असल्याचे हेच कारण आहे. त्यामुळे वैदिक साहित्य हे हिम्दू धर्माचा स्त्रोत नाहीत.

५) वैदिक लोकांत जानवे घालण्याची प्रथा नव्हती. पुर्वी फक्त यज्ञप्रसंगी यज्ञोपवित (जानवे) घालण्याची प्रथा होती. परंतू हा धर्म भारतात आल्यानंतर या धर्माच्या लोकांनी अन्य धर्मियांपासून आपले वेगळेपण दाखवण्यासाठी जानवे नित्य घालण्यास सुरुवात केली. (The Indian Encyclopaedia, Volume 1, edited by Subodh Kapoor)

६) वैदिक आचार व तत्वज्ञान सर्वस्वी वेगळे असून त्या धर्माबाहेर जे लोक होते त्यांना ते शूद्र म्हणत. त्यांना वेदाधिकार असण्याचे कारण नव्हते व नाही कारण त्यांचा धर्म सर्वस्वी स्वतंत्र होता. त्यांचे स्वत:चे पुरोहित होते व आहेत, जे आज मागे ढकलले गेले आहेत...उदा गुरव. कारण पोटर्थी वैदिकांनी बव्हंशी देवतांचे अपहरण केले अथवा स्वसमाधानासाठी त्यांना वैदिक देवतांशी जुळवायचा अयशस्वी प्रयत्न केला. शक्तीला अदितीशी तर शिवाला रुद्राशी, विठ्ठल-बालाजीला (जे शैव होते) त्यांना वैदिक विष्णुशी जुळवायचे प्रयत्न केवळ पोटार्थी कारणासाठी होते, एकधर्मीय होते म्हणून नाही.

७) वेदांशी हिंदुंचा कधी संबंधच आला नसल्याने वैदिक धर्म म्हणजे हिंदू हे कोनालाही मान्य होण्याचे कारण नाही.

८) वैदिक स्मृत्या या वैदिक धर्मापुरत्या मर्यादित होत्या. अन्यांनी त्या पाळल्याचे एकही उदाहरण नाही. शिशुनाग, नंद, मौर्य, सातवाहन ते हरीहर-बुक्क हे सारे  सम्राट शूद्र होते. वैदिक धर्मनियमांनुसार शुद्रांना राजेपण तर सोडाच...संपत्तीसंचय करण्याचाही अधिकार नाही. (पहा - मनुस्मृती)

९) वेदांतील एकही देवता हिंदू (शैव) व्यक्ती पुजत नाही, त्यांची मंदिरेही नाहीत. वेदांतिल त्या देवता वैदिक धर्मियांच्याच होत्या त्यामुळे हिंदुंना त्या पुज्य वाटण्याचे काही कारण नाही.

१०) वैदिक मंत्र त्रैवर्णिकांसाठी तर पुराणोक्त शुद्रांसाठी अशी वाटणी पुरातन काळापासुन होतीच. पुराणकाळ नंतरचा नसून "पुराण" या शब्दातच पुरातनता निहित आहे. पौराणिक मंत्र हे सर्वस्वी आजही ज्या देवता हिंदू पुजतात त्यांबाबत असून वैदिक मंत्र हे वैदिक देवतांचे असतात. ही विभाजनी सरळ सरळ दर्शवते कि शुद्रांचा धर्म वेगळा होता व आहे तर वैदिकांचा वेगळा आहे.

११) पुराणे ही वेदपुर्व काळातील सूतांनी व मागधांनी (शूद्रांनी) केलेली साहित्यरचना होती ज्यात इतिहास व शैवप्रधान देवतांचे माहात्म्य सांगितलेले असे. नंतरच्या काळात (गुप्तकाळात) पुराणांत वैदिकांनी अनेक प्रक्षेप करत वेदमाहात्म्य व ब्राह्मण माहात्म्य घुसवले. असे असले तरी देवतांचे मुळचे शिवस्वरुप बदलता आले नाही. पण काही वैदिक देवतांनाही प्रतिष्ठा देण्यासाठी वायुपुराण, विष्णूपुराण इत्यादि लिहिले. असे असले तरी शैव धर्माचा पगडा काढता येत नाहे असे पाहून राक, कृष्णादी या वेदपुर्व धर्म पाळणा-या महनीय व्यक्तींना विष्णुचे अवतार बनवले. एवढेच नाही तर विठ्ठल-तिरुपती आदि मुळच्या शैव दैवतांचेही अपहरण करत त्यांना वैष्णव चरित्र बहाल केले. भारतात मुळच्या विष्णुची विष्णुस्वरुपातील सार्वजनिक मंदिरे खुपच कमी आहेत. खुद्द पुण्यात एकही नाही. यावरून सत्य काय हे समजून येईल.

वरील अल्प विवेचन पाहता वेद हे हिंदु धर्मियांचे ना मुलस्त्रोत आहेत ना धर्मग्रंथ आहेत. ते वैदिकांचे धर्मग्रंथ असून त्यांच्याशी व ते प्रमाण मानणा-यांशी हिंदुंचा संबंध नाही. वेदांमद्ध्ये हिंदुंना उपयुक्त असे काहीएक नसून उलट हा जन्माधारित विषमतेचे तत्वज्ञान मांडणारे ग्रंथ आहेत हे पुरुषसुक्तावरुनच स्पष्ट दिसते. विषमतेच्या तत्वज्ञानाच्या प्रभावात हिंदुही ती उच्चनीचता व जातीभेद पाळु लागले हा त्यांचा दोष असून वैदिक आपला  प्रभाव राजाश्रय व धनाश्रय या जोरावर निर्माण करण्यात त्यामुळेच यशस्वी झाले असे म्हणने क्रमप्राप्त आहे.

असे असले तरी दोन धर्म स्वतंत्र आहेत याचे भान वैदिकांना असते. नसते ते हिंदुंना. हिंदू अधिक सहिष्णू असल्याने वैदिकांचे फावले व त्यांनी स्थितीचा गैरफायदा घेतला असे आपल्याला इतिहासकाळापासून दिसते. आजही हिंदुत्ववादी संघटना छुपेपणे वैदिकत्वाचाच प्रसार करत असतात. हिंदुत्वाचा नाही.

उदाहरणार्थ सिंधू संस्कृती ही भारतीय व शैवधर्मप्रधान आहे हे उत्खननांत सापडलेल्या अगणित पुराव्यांवरून सिद्ध झालेले आहे. दुसरे असे कि घग्गर नदी ही कोणत्याहे स्थितीत वैदिक सरस्वती असू शकत नाही याचा निर्वाला भुगर्भशास्त्रज्ञ ते पुरातत्वविदांनी अनेक परिक्षणे करत दिली आहे. असे असले तरी घग्गर म्हणजेच सरस्वती नदी असा प्रचार गेली तिसेक वर्ष चालू आहे. याचे कारण म्हणजे सिंधू संस्कृतीही "वैदिक" होती, वैदिकांनीच ती निर्माण केली असे सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न करायचा आहे. जागतिक पातळीवरचे तज्ञ हे मान्य करत नाहीत हेही महत्वाचे आहे. समजा हे खरे हिंदुत्ववादी असते, हिंदु धर्माची पुरातनता त्यांना सिद्ध करायची असती तर त्यांनी सिंधू संस्कृतीला "हिंदू" संस्कृती म्हटले असते, किंवा गेलाबाजार "भारतीय" संस्कृती म्हटले असते.

पण प्रत्यक्षात संघवादी लोक तिला "वैदिक" संस्कृती म्हणतात. इतरांनीही तसेच म्हणावे असा आग्रह धरतात. याचे कारण म्हणजे मुलत हे लोक हिंदू नाहीत. त्यांचा धर्म वेगळा आहे.  श्रीकांत तलगेरींसारखे संघाचे विद्वान तर "वैदिक आर्य" हे सिंधू संस्कृतीचे नुसते निर्मातेच नव्हेत तर त्यांनी पार युरोपपर्यंत जात वैदिक संस्कृती व भाषा पसरवली असे सांगतात. प्रत्यक्षात वेदांत शिव, पार्वती (शक्ती), गणेश, वगैरे हिंदू देवतांचे (जी सिंधू संस्कृतीत प्रत्यक्ष सापडली आहेत) नांव तर सोडा, वर्णनही येत नाही. मग ती संस्कृती वैदिक कशी? हा सारा प्रयत्न हिंदुंपेक्षा आम्ही वरचढ आहोत, संस्कृतीचे मुळ निर्माते आहोत असे सिद्ध करण्यासाठी. याला मिथ्या वर्चस्वतावाद म्हणतात. वैदिक हे हिंदू नव्हेत हे ते वारंवार स्वत:च सिद्ध करत असतांना आम्ही खरे मुळचे वेदपुर्व हिंदू मात्र तो कावा समजावून घेत नाही हे आमचे दुर्दैव.

खरे तर वैदिक धर्मीय हिंदू धर्मातून बाहेर काढले जात नाही, (म्हणजे त्यांना हिंदू मानणे थांबवत नाही) तोवर हिंदुंचे मानसिक व धार्मिक कल्याण होणार नाही. हे लोक वैदिक वर्चस्व निर्माण करत हिंदुंचा न्य़ुनगंड वाढवत राहतील आणि आम्हाला वर्चस्वतावादी जसे बनायचे नाहे तसेच कोणाच्या वर्चस्वतावादाखाली दबत न्युनगंडही जोपासायचा नाही.

हेच हिंदुंचे खरे स्वातंत्र्य आहे!

8 comments:

  1. इराणी लोक स्वताला आर्यन मानतात. तुम्ही म्हणता त्या प्रमाणे अवेस्ता चे सुद्धा संदर्भ लागत आहेत. लेख नेहमीप्रमाणे सुंदरच !

    http://www.iranchamber.com/people/articles/aryan_people_origins.php

    Cheers,
    Niraj.

    ReplyDelete
  2. सुंदर माहिती.
    प्रत्येकाने धर्माची चिकित्सा करणे गरजेचे आहे,आणि धर्मात असणारी थेरडेशाही बंद पाडली पाहिजे.

    ReplyDelete
  3. घुर्ये यांनी दिलेल्या संदर्भाप्रमाणे भारतातील साडेपाचशे ब्राह्मण जातींपैकी किमान साडेतिनशे या मुळच्या वैदिक नाहीत, त्यांची गोत्रेही वैदिक नाहीत.
    तुम्ही असे म्हणता कि शैव धर्माचे स्वत:चे पुरोहित होते व , जे आज मागे ढकलले गेले आहेत...उदा गुरव. तुमच्या मतानुसार, येथीलच अनेक लोक धर्मांतरित होऊन त्यांच्या धर्मात गेले म्हणजे ते येथील मूळ धर्माचे असावेत . (तुमच्या म्हण्याप्रमाणे शैव) .
    तुमच्या वैदिक ब्राम्हण कोण होते या लेखानुसार येथील काही लोक वैदिक ब्राम्हण झाले ते त्यांना समाजात मिळणाऱ्या प्रतिष्ठेसाठी. तुम्ही असे म्हणता कि वैदिकांनी पोटार्थी इथल्या देवता स्वीकारल्या.मग असेही होऊ शकते कि मिळणाऱ्या प्रतिष्ठेच्या हव्यासापायी इथल्या मुळच्या पुरोहितांनी वैदिक उपासना पद्धत स्विकारली . आणि ते स्वत: वैदिक बनले. हि शक्यता तुम्ही का गृहीत धरत नाही याचे आश्चर्य वाटते.

    ReplyDelete
  4. अभ्यासपूर्ण लेख आहे ,अतिशय आनंद झाला ! त्यामुळे काही प्रथा आणि परंपरा याबद्दल अजून जाणून घ्यावे असे वाटते.संजय सर त्याबद्दल आपण खुलासा कराल का ?जसे आपण म्हणता की जानवे घालण्याची प्रथा नव्हती तसेच मंगळसूत्र आणि कुंकू लावण्याची प्रथा वैदिक आहे का शैव आहे? लग्नविधी,तसेच पिंडश्राद्ध हे कशावर आधारित आहेत ? कारण आज समाजात ज्या अनेक प्रथा आणि परंपरा आहेत त्यात शैव धर्माचा वाटा किती आणि वैदिक प्रभाव किती ?
    असे वाटते की हि जी बेमालूम सरमिसळ झाली आहे ती समजून घेतली तर अनेक प्रश्न उभे राहतात . वैदिक आणि शैव परंपरा सोडून अजूनही काही परंपरा होत्या का ? माणूस मेल्यावरचे विधी कोठून आले ? सोयर सुतक या कल्पना कोठून आल्या ?आज समाजात दिसणारे जादूटोणा प्रकार शैव का वैदिक ?महाभारत आणि रामायण हे शैवांचे इतिहास मानायचे का वैदिकांचे ?कारण रावण हा शिवभक्त आहे श्रीराम हासुद्धा रामेश्वराची पूजा करून पुढे जातो - म्हणजे काय ? चाकाचा शोध म्हणजेच रथाचा उपयोग रामायण महाभारत काळात होत होता का ? रामायण आणि महाभारतात अवेस्ताचा उल्लेख का नाही ?गांधार आणि कुरु पांचाल यांचा भौगोलिक उल्लेख आहे पण ते सर्व वैदिक मानले गेले आहेत का ?असे अनेक प्रश्न मनात येतात.
    महत्वाचे म्हणजे आपला जो दावा आहे की महाभारत हे रामायणाच्या आधी घडले ते तर अवेस्ता आणि झरतृष्ट यांचा विचार करता कसे काय सामावून किंवा पडताळून पहायचे ते समजत नाही . आपण यावर काही मौलिक प्रकाश टाकाल का ?

    ReplyDelete
  5. संजय सर , नमस्कार ,
    आपण फार चांगला प्रयत्न करत आहात . अभिनंदन .
    त्यातून निर्माण होणारे काही प्रश्न श्री देशपांडे आणि श्री सुचित यांनी मांडले आहेत ते विचार करायला लावणारे आहेत.पूर्वीचा भारत हा अफगानिस्तान पासून श्रीलंका आणि ब्रह्मदेश असा पसरला होता , कारण रामायणात शत्रुघ्न बहुतेक ब्रह्मदेशात गेला होता असे काहीसे वाचल्याचे आठवते .(नक्की खात्री नाही) पण म्हणजे रामायण काळात रथ होते का ? आणि वैदिकाना घोडे आणि इतर जनावरे पाळायची कला प्राप्त होती का ?
    आजही काही राजकीय कारणामुळे,अत्याचारामुळे अनेक नागरिक आपल्या देशाच्या सीमा ओलांडून दुसऱ्या देशात प्रवेश करत असतात.तसाच प्रकार तथाकथित वैदिकांच्या बाबतीत घडला असेल का ? वैदिक जर मूर्तीपूजा मानतच नव्हते , तर मूर्तिपूजेचे नियम उपनियम कोणी बनवले ?
    एखाद्या टोळीची किंवा मानव समूहाची सर्व समावेशक अशी विचारसरणी असू शकते आणि त्यातूनच वैदिक शैव संकर होत जाण्याची अघटीत घटना घडली असावी का ? कारण वैदिकांनी किंवा शैवानी कधी एकमेकांच्या कत्तली केल्याचे कुठेही निदान माझ्या वाचनात आलेले नाही.
    वैदिक इथे आले त्याना इथे एक प्रस्थापित (शैव ) धर्म भेटला आणि त्यात ते सामावून गेले.शैव लोकांवर त्यांनी आपली मते लादली असे वाटत नाही कारण वैदिक हे फिरस्ते असल्यामुळे त्याना या प्रदेशाने एका जागी वस्ती करण्याचा मोहही पाडला असेल आणि त्यावेळी आपले स्वत्व जपण्यासाठी त्यांनी काही कायदे सदृश नियम त्यांच्या साठी केले असतील आणि कदाचित विचार आचारांच्या देवाण घेवाणीत वैदिकांची मते,शैवांनी क्रमाक्रमाने अंगिकारली असतील असे वाटू लागते .तसेच वैदिकानीही शैवांच्या देवता अंगीकारल्या असणार !
    संजय सर ,आपला अधिकार मोठा आहे , आपण या दोन संस्कृतींचे एकत्रीकरण होत असताना नेमके काय घडले असेल ते पाहिले तर असे वाटते की शैवाना वैदिकांवर आपले विचार लादणे का जमले नाही ?शैवांकडे सैन्य नव्हते का ? युद्ध सामुग्री नव्हती का ? रथ घोडे भाले धनुष्य बाण नव्हते का ?असाही विचार मनात येतो !
    वैदिकांनी इतक्या सहजपणे आपली यज्ञसंस्था कशी काय भारतीय भूमीत रुजवली ?इथल्या राजे रजवाड्यांना नवोदित वैदिक समाज रचनेची इतकी भुरळ कशी पडली हे एक न उलगडणारे कोडेच आहे .वैदिकांची जर रामायण महाभारत हि काव्ये असतील तर मग शैवांची महाकाव्ये कोणती ?

    आजही ख्रिश्चन धार्मापुर्विचा ज्यू धर्म आहेच तसे भारतीय भूमीत का घडले नाही ? गेली तीनेक हजार वर्षे वैदिक संस्कृतीचा पगडा या भूमीत आहे .जैन आणि बौद्ध धार्मियांची लोकसंख्या अत्यंत नगण्य आहे.पण गमतीचा भाग म्हणजे वैदिकांचा मुख्य वर्ग जो ब्राह्मण तो मात्र नवे मार्ग चोखाळत सीमापार आणि समुद्रापार जाउन प्रगतीची नवी क्षितिजे आत्मसात करत आहे .तो वैश्य कर्म करत आहे क्षत्रिय कर्मे करत आहे हे पण अभ्यासण्यासारखे आहे
    कालबाह्य झालेल्या गोष्टींबद्दल किती चार्वती चर्वण करायचे ?ऋग्वेद आणि रामायण महाभारत श्रुती स्मृती पुराणे हि अजिबात आपल्या सर्वांच्या रोजच्या जीवनावर प्रभाव टाकत नाहीयेत हे सत्य आहे.आजची समस्या आहे अंधश्रद्धा आणि जादूटोणा - त्याचा निषेध झाला पाहिजे ,
    अवेस्तात अनेक गोष्टी आहेत पण टाटा गोदरेज हे काही त्याच गोष्टी उगाळत बसले नाहीत त्यांनी नव्या भारताची मुहूर्तमेढ रोवली,तीच गोष्ट ब्राह्मण वर्गाची म्हणता येईल . त्यांनी कालानुरूप बदल घडवत नव्या प्रगतीच्या वाटा स्वीकारल्या आहेत . तरीही हे सर्व कसे घडले हे कुतूहल मात्र संपत नाही हे विशेष !
    आपण अतिशय चिकाटीने अभ्यास करत आहात ते मात्र कौतुकास्पद आहे . पुन्हा एकदा अभिनंदन !मी विचारलेल्या काही प्रश्नाना आपण उत्तर द्याल हि आशा धरतो !

    ReplyDelete
  6. http://sanjaysonawani.blogspot.in/2016/01/blog-post_4.html

    या लिंकवर आपल्या शंकांची काही उत्तरे मिळतील. काही प्रश्न आहेत ज्यावर मी लिहित आहे. पुर्ण झाल्यावर येथे प्रकाशित करेनच. सर्वांचे मन:पुर्वक धन्यवाद.

    ReplyDelete
  7. सर उत्तम लेख आहे, विषय फार मोठा पण थोडक्यात भरपूर मोठी माहिती दिली आहे, शैव धर्माच्या हिताच्या दृष्टीने काही महत्वाचे वाटते ते असे,
    १) पुराण हे हिंदू धर्माचे मूळ असल्याने त्यात केलेली घाल घुसड वेगळी करून खऱ्या कथांचे महत्व समजून घेणे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे.
    २) वैदिक आत्ताच्या काळात फिनिक्स पक्षी वगैरे बनून उडाले व सातासमुद्रापार गेले वगैरे म्हणून हिंदू धर्मात न्यूनगंड तयार करणारे काही महाभाग आहेत तेव्हा त्यांच्या ह्या काव्याला समजून घेवून हिंदू-शैव लोकांचे पूर्वी काय स्टेटस होते तर ते इतरजण व शुद्र होते त्यांना शिकण्याचा संपत्ती जमा करण्याचा अधिकार नव्हता, पण गेल्या ६० वर्षात इतरजणांनी भरपूर प्रगती केलेली आहे हे डोळे मिटून दुध पिणाऱ्या वैदिकांना अजिबात दिसत नाही. उलट त्यांना आतून त्याची फार सल आहे म्हणून सावधान!
    ३) जैन, बुद्ध इत्यादी धर्म आज मोठे नसले तरी ते पूर्वी प्रगल्भ धर्म होते. शैव धर्माच्या मुळाशी त्यांची बीजे आहेत. सिंधू उत्खननात सापडलेले योगी पुरुष नग्न होते हे जैन दिगंबर पंथाशी जुळतात. वृषभदेव आणि सिंधुतले वृषभ चिन्ह ह्यात काहीतरी योग असावा. असे वाटते प्रकाश टाकावा.
    ४) विष्णू हा वैदिक देव नाही, पण तरीही शिवाला स्पर्धा तयार करण्यासाठी वैष्णव विचार घुसडण्यात आला असे वाटते, हे नेमके वेदातला रुद्र-पुरुष वापरून कसे हिंदुंवर लादले गेले, शिवाय त्यांना वेदातला "वे" सुद्धा कळून दिला नाही हे कसे काय करवले ह्याचा शोध आवश्यक आहे.
    ५) मूर्तिपूजक आणि भंजक ह्यातील वाद मिटून ते एकत्र होतात हे आजच्या हिंदू-मुस्लिम वादावरून अजिबात सुसंगत नाही, तेव्हा वैदिक लोकांनी काही वेगळ्या क्र्लुप्त्या करून शैव धर्मात घुसखोरी केली असे वाटते. असे काम मुस्लिम लोक करीत नाहीत पण पारशी (आफ्गानातील लोक) करू शकले ह्याची कारणे काय असावीत?
    ६) शेवटी प्राकृत भाषेतून संस्कृत भाषा उद्भवली असे नवीन संशोधन आहे, मग सिंधू भाषेचे आकलन प्राकृत वरून होऊ शकेल असा शोध घ्यावासा वाटतोय आपण मार्गदर्शन केले तर फारच उत्तम!
    लेख बऱ्याच लोकांना चपराक लावणारा आहे, पण ते आता सातासमुद्रापार सुखी आहेत त्यांचा विचार करून आपण का व्यक्त व्हायचे नाही? शिवाय ते दुहेरी बोलतात. म्हणतात जुनी मढी का उकरता? आधी ते उकरतात ते वैदिक पर्यंत आणि आपण जास्त खोल गेलो कि दुखाया लागते. मग लागू देत की..

    ReplyDelete
  8. संजय सर, नवीन माहिती मिळाली.पण मला एक प्रश्न पडला आहे, तो असा की ब्रहदेवाला वैदिक,जैन व बौद्ध हे मानतात ;मग हे एकाच धर्माचे मानावे का? आणि दुसरा असा की दत्तगुरू, जे तिन्ही देवांचे प्रतीक आहेत, ह्यांना मानणारे असे म्हणतात की हेच खरे परमात्मा आहेत.साधारणत: ह्यांना विष्णूंचा अवतार मानतात पण काही मंदिरात दत्तगुरुंना शिवाचा अवतार मानतात.तर प्रश्न असा आहे की दत्तगुरुंचा उल्लेख शैव धर्मात येतो का?

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...