Monday, February 15, 2016

भारतीय असहिष्णुता



भारतात आजच्या आधुनिक परिभाषेतील लिबरल (स्वतंत्रतावादी) सहिष्णुता अस्तितवात होती असे धाडसी विधान करता येत नाही. भारतातही धर्म, पंथ यांत रक्तरंजित संघर्ष झालेले आहेत. हा इतिहास सनपुर्व सहाव्या शतकापासुनचा ज्ञात इतिहास आहे. गौतम बुद्धाचे धर्मस्थापना ते आरंभीचा प्रचार या काळात त्यांनाही वैदिकांच्या हिंसक विरोधाला सामोरे जावे लागल्याचे आपल्याला दिसते. गुप्तकाळापासून वैदिकि धर्माने उचल घ्यायला सुरुवात केली ते दहशतवादाचे सर्व  नियम पाळत. शैव-वैष्णव यांच्यातील संघर्षही रक्तरंजितच होता. अन्य जातीयांवर, विशेष्त: अस्पृष्यांवर जी अमानवी बंधने टाकली गेली ती असहिष्णुतेच्याच अनुदार प्रवृत्तीतून हेही आपण पाहू शकतो. इतिहासातील कोणत्याही राजाने सहिष्णुतेचे धोरण राबवले नसल्याने या कर्मात त्यांचाही सक्रिय सहभाग होता असेही म्हणावे लागते...मग राजे कोणीही असोत. म्हणजेच भारतात धर्मसत्ता व राजसत्ता परस्परांवर कुरघोड्या करण्याचेही प्रयत्न करत जनतेवर मात्र आपली वर्चस्वाची, सत्तेची मिठी बळकट करत राहिले, त्यात यशस्वीही झाले असे म्हणावे लागते. भारतीय सहिष्णुता ही हिंसक असहिष्णुतेसोबतच वैचारिक व सामाजिक जीवनातही असहिष्णुता राहिलेली आहे. भारताचा स्वर्णकाळ वगैरे गौरवगाथा ठीक वाटल्या तरी प्रत्यक्षात भारतात सहिष्णुतेचे स्वर्णयुग होते असे म्हणता येत नाही. इस्लामकाळ या असहिष्णुतेत भर घालणाराच होता. सहिष्णुतेची जी उदाहरणे दिसतात त्यात खरोखर सर्वधर्म समभावाच्या जाणीवा किती आणि राजकीय तडजोडी किती हे अभ्यासले तर उत्तरे सहिष्णुतेच्या विरोधात जातात. असो. जागतिक इतिहासच बव्हंशी असहिष्नू जाणीवांचा इतिहास असल्याले तो कोळसा फार उगालण्यात अर्थ नाही.

लोकशाहीची मुल्ये, स्वातंत्र्य-समता-बंधुता ही उदात्त मुल्ये आपल्याला युरोपाने, विशेषकरून फ्रेंच राज्यक्रांतीने दिली. अनिर्बंध राजसत्ता, आर्थिक मक्तेदा-या आणि धार्मिक दास्याच्या विरोधातील एकुणातील उद्रेकातून महान प्रबोधनकारी विचारवंत-तत्वज्ञांनी नव्या स्वतंत्रतावादी समाजजीवनाचे तत्वज्ञान जन्माला घातले. ते प्रत्यक्षात सर्वस्वी आजही अंमलात आणता आले नसले तरी किमान त्या दिशेने जागतिक मानवी समुदायांची वाटचाल सुरु झाली. हे त्यांचे मानवजातीवरील कधी न फिटणारे ऋण होय. आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाचा पायाही त्यातुनच घातला गेला.

भारतात गांधीजींच्या नेतृत्वाखाली सर्व भारतियांचा "अहिंसा" व  "सत्याग्रह" या उदात्त तत्वज्ञानावर स्वातंत्र्य लढा सुरु असता या तत्वज्ञानाला छेद देणा-या मुस्लिम लीग, हिंदू महासभा व  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटना-पक्षांचा उदय झाला. रा.स्व. संघ भारतातील आजही जीवितच नव्हे तर सतत वाढत असलेली संघटना आहे.

या संघटनेने पुरस्कृत केलेला भाजप हा आज एकहाती बहुमत घेऊन सत्तेत आलेला पक्ष आहे. गुजरात नरसंहाराचा कलंक आजही पुर्णतया पुसला गेलेला नाही. हा पक्ष सत्तेवर आल्यानंतर लगोलग चर्च टार्गेट केल्या गेल्या. शिक्षण पद्धतीत वैदिक विज्ञान आणण्यापासून ते भग्वद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथ बनवण्याचे कार्यक्रम घोषित करण्यात आले. गोमांस बंदीवर भर देवून हे थांबले नाही तर  केवळ घरात गोमांस आहे या संशयाने अखलाख या मुस्लिमाला झुंडीने निर्दयपणे ठार मारले. नंतर इतर अनेकांवर तसे प्रयोग झाले. मोदीविरोध हा राष्ट्रविरोध असेच वातावरण अंध भक्तांकरवी बनवत मोदींवरील सभ्य चिकित्सा, टीका करणा-यांवर झुंडीने शाब्दिक हल्ले सुरु झाले. हे येथेच थांबले नाही तर  हा पक्ष सत्तेवर आल्यानंतर  दोन विचारवंतांच्या हत्या झाल्या. तत्पुर्वी एक घडली होती पण ती कोणी केली असावी याबाबतचे जनमत घेतले तर जनमताच्या संशयाची सुई हिंदुत्ववादी (पक्षी वैदिकवादी) गोटांकडे वळते.

असहिष्णुतेचे पहिले कारस्थान हे विरोधी विचार दडपण्याकडे झुकते. त्यासाठी ते हवे ते मार्ग चोखाळु शकतात. या असहिष्णुतेमुळे अनेक साहित्यिक-कलावंतांनी आपापले पुरस्कार परत केले. हा निषेधाचा सौम्य मार्ग होता. पण  त्यांनाही प्रचंड बदनाम करण्याची मोहिम आखली गेली. हे येथेच थांबले नाही. पुरोगामीत्वाची खिल्ली उडवत पुरोगामी व सेक्युलर या शब्दांची खालच्या पातळीवर खिल्ली उडवण्याची टुम निघाली जी आजही जोरात आहे.

हे सर्व काय आहे?

मुळात संघ तत्वज्ञानाचा पाया "असहिष्णुता" हा आहे. यासाठी संघाने मुस्लिम द्वेष करत तथाकथित हिंदू संघटन उभे करायला सुरुवात केली.  १९५६ मद्धे प्रसिद्ध पत्रकार डी. एफ. कारक यांनी गोळवलकारांबाबत (व संघाच्या बाबत) जे विधान केले होते ते असे: "Golwalkar was a guru of hate, whose life's malevolent work was — as Jawaharlal Nehru so memorably put it — to make India into a "Hindu Pakistan". That project has not succeeded yet, and may it never succeed either."  यत संघाचा उद्देश विषद होतो. मुस्लिम द्वेष करत  हिंदू संघटन उभे केले कि मुस्लिमांचे शिर्कान करता येईल हा होरा. बाबरी मशिदीचे पतन हा योगायोग वा खरे रामप्रेम होते असे नाही. रामाला केंद्रबिंदू बनवत गतकाळातील नसलेल्या अस्मिता जपण्याचा तो प्रयत्न होता. परिणामी मुस्लिमांचाही संघटित दहशतवाद सुरु झाला. मुस्लिमांची ही प्रति-असहिष्णुता होती हे खरे. त्यामुळे संघवाद्यांना "आम्हीच बरोबर होतो" हा प्रचार करायला संधी मिळाली हे विसरता येत नाही.

याची मुळे गोळवलकर गुरुजींच्या मुलभूत तत्वज्ञानात आहेत. हिटलरच्या फ्यसिस्ट विचारांचे ते अनुयायी होते.  "To keep up the purity of the Race and its culture, Germany shocked the world by her purging the country of the Semitic Races - the Jews. Race pride at its highest has been manifested here. Germany has also shown how well nigh impossible it is for Races and cultures, having differences going to the root, to be assimilated into one united whole, a good lesson for us in Hindusthan to learn and profit by. Ever since that evil day, when Moslems first landed in Hindustan, right up to the present moment, the Hindu Nation has been gallantly fighting on to take on these despoilers. The Race Spirit has been awakening." हे त्यांचेच विधान आहे. यात हिटलर प्रेम, वांशिक अहंकार जसा डोकावतो तसाच वंश (मुस्लिम) विद्वेशही. हे विचार सहिष्णू आहेत असे कोण म्हणेल?

बरे संघाला असहिष्णू म्हणावे तर त्यांना प्रतिक्रिया म्हणून उभ्या राहिलेल्या पुरोगामी म्हणवणा-या संघटनांचे काय हाही प्रश्न येथे महत्वाचा आहे. संभाजी ब्रिगेड व बामसेफसारख्या संघटना शाहु-फुले-आंबेडकरवादी म्हणवतात. पण या संघटनांचे तत्वज्ञान काय तर ब्राह्मण द्वेष. ब्राह्मणांचे कत्तल केली पाहिजे, ते विदेशी असल्याने त्यांची हकालपट्टी केली पाहिजे अशी लेखने, वक्तव्ये सातत्याने ही मंडळी करत आली आहे. ब्राह्मण हटवले कि जणूकाही रातोरात त्यांची मुक्ती व ऐहिक कल्याण होणार आहे कि काय? या लोकांना फुले-आंबेडकर समजले तरी आहेत काय? संघ इतिहासाची जेवढी मोडतोड करतो त्याहीपेक्षा अधिक तोडफोड ही मंडळी करतात. खरे म्हणजे संघ आणि या तथाकथित पुरोगामी संघटनांच्या तत्वज्ञानात काहीएक मुलभूत फरक नाही हे सहजच कोणाच्याही लक्षात येईल. असहिष्णूतेचे उत्तर प्रति-असहिष्णुता नसते हे भारतातील काही कट्टरवादी मुस्लिम आणि काही बहुजनीय संघटनांच्या लक्षात येत नसेल तर "सहिष्णू भारत" कसा बनणार हा यक्षप्रश्न सुज्ञ आणि ताततम्याने सामाजिक विचार करणा-या लोकांसमोर उभा राहिला असल्यास नवल नाही.

असहिष्णूंची असहिष्णुंच्या विरोधात चाललेली ही साठमारी आहे, आणि यात शांतपणे जीवन जगू इच्छिणा-यांची ससेहोलपट होते हे या मंडळीला कळणे शक्य नाही. थोडक्यात मानवी स्वातंत्र्य संकुचित केले जात आहे.

आणि याला काही केल्या आपण सहिष्णू देश म्हणू शकत नाही.

तो आपल्याला बनवावा लागेल.

सर्वप्रथम अशा सर्व द्वेषमुलक संघटना, पक्ष व व्यक्ती या विरुद्ध सुबुद्ध लोकांना ठामपणे उभे रहावे लागेल. आम्हाला आमची मुले ते पतवंडे व त्याहीपुढील पिढ्या मुक्त वातावरणात वाढवायच्या आहेत कि द्वेषाने, हिंसेने भरलेल्या जहरी, जगण्याची कसलीही शाश्वती नसलेल्या वातावरणात सडू द्यायच्या आहेत याचा निर्णय आताच घ्यावा लागणार आहे. असहिष्णुतेच्या तत्वज्ञानाचा पाया मिथ्या वर्चस्ववादात आहे. कोण कोणावर कशी सत्ता (आणि कसल्याही प्रकारे) गाजवू शकतो हे सिद्ध करण्यासाठी आहे. नव-याची बायकोवर व आईबापाची मुलांवर प्रेमविरहित वर्चस्व गाजवण्याची इच्छा जेथे जन्माला येते तेथेच माणसाच्या असहिष्णुतेचा प्रवास सुरु होतो. अनिर्बंध आकांक्षांतुन खोटेपणा, हिंस्त्रता, द्वेष इत्यादिचा आधार घेत असहिष्णूता टोक गाठत जाते व अंतता: अमानवी बनते. आम्हाला जर आमचे भवितव्य असे अमानवी बनवायचे नसेल तर आताच सावध होणे आवश्यक आहे.

आधुनिक तंत्रज्ञानांनी माणूस शहाणा होईल असा जो विद्वानांचा होरा होता तो आम्हीच धुळीला मिळवला आहे. ही साधने ज्ञानप्राप्तीसाठी, आपली वैचारिक क्षमता वाढवण्यासाठे न वापरता आम्ही बव्हंशी त्यांचा उपयोग उथळपणासाठी व अधिक विद्वेषाचे फुत्कार सोडण्यासाठी वापरत आहोत. आणि हे आमच्या एकुणातील असल्या-नसलेल्या बौद्धिकतेचे, विचारशीलतेचे, सृजनशीलतेचे अध:पतन आहे. एवढे अध:पतीत झाल्यावर तरी जरा उर्ध्वरेषेकडॆ प्रवास व्हावा अशी प्रार्थना करणे तरी आपल्या हातात आहे.

द्वेषमुलक, असहिष्णू विचारक संघटनांची कमी नाही. या निराशाजनक स्थितीत मला एकच अढळ धृवतारा दिसतो. महात्मा गांधी. मानवतेचे, सहिष्णूतेचे, सौहार्दमय सहजीवनाचे तत्वज्ञानच सांगितले असे नव्हे तर ते प्रत्यक्ष जगण्याचे उदाहरण घालून दिलेला हा या धरतीतलावरील एकमेव महामानव. त्याच्या तत्वज्ञानात भर घालत ते पुढे नेणे हीच आजची सहिष्णुता आहे. तुम्ही त्यासाठी गांधीजींना मानायलाच हवे ही अट नाही.

8 comments:

  1. संजय सर ,
    आपण उत्तम रीतीने असहिष्णुता या विषयावर लिहिले आहे त्याबद्दल अभिनंदन !
    पहिला परिच्छेद मूळ विचारांचा इतिहास थोडक्यात सांगत विचारांचे गांभीर्य मांडतो.
    पाचव्या परिच्छेदा पर्यंत आपण वैदिक आणि भाजप यांना दोषी ठरवत अतिशय हुशारीने न्यायनिवाडा केला आहेआणि पुढचे काम सोपे करताना आपण दिशा ठरवून घेत पुढचे पाउल कसे टाकायचे तेही ठरवायचा घाट घातला आहे .त्यामुळे ५ ते ८ परिच्छेद संपवताना आपण आपल्या तर्काप्रमाणे संघ आणि गोळवलकर यांना यथेच्छ बदनाम केले आहे.
    पुरातन भारताचा विचार करताना मुस्लिम काळापर्यंत एका पद्धतीने विचार करत आणि त्यानंतर एका भीषण वृत्तीची दाखल घेत आपण विश्लेषण करायला हवे होते .
    मुस्लिम पूर्व काळात सर्व अनाचार आणि अपकृत्ये फक्त वैदिकानीच केली असे आपण ठाम सांगू शकता का ?
    सर्वात महत्वाचे म्हणजे वैदिक जर इतके अनाचारी होते आणि बौद्ध अगदी सोज्वळ होते तर एकदम बौद्ध धर्म का रोडावला ?वैदिकाना राजाश्रय मिळाला तो का ?अशा अनेक शंका मनात येतात . आणि मग अशा वेळी शैव काय करत होते ? ते सर्वात थोर आणि महान !
    वैदिक इसपु १५००-१००० आणि बौद्ध इसपु ५०० असे मानले तर त्याकाळात शैव काय करत होते , त्यांनी निधडे पणे वैदिकाना का रोखले नाही ?
    मलातर वाटते की आपली एखादी फार मोठी गैरसमजूत आपल्याला असे विचार मांडायला उद्युक्त करत असावी. तो पडदा दूर करणे कठीण नाही ,पण इतिहासाची मांडणी अमुक एका प्रकारे करण्याचा आपला हट्ट शैव वैदिक आणि बौद्ध हे प्रश्न अधिकच अवघड करते आहे.
    यावर अजून कितीतरी लिहिता येईल पण याला प्रतिवाद करत उत्तर देण्याची या ब्लोगाची धाटणी आता ठराविक संचाची झाली आहे . कोणीतरी अनानिमास अर्वाच्यपणे काहीतरी लिहित , आपण नामानिराळे रहात असा काहीतरी प्रतिवाद करता कि मूळ विषयाबद्दल निरोगी चर्चेची दारेच बंद होतात , पूर्वी आप्पा बाप्पा यांच्या बाबतीत तर असे वारंवार घडत असे , आप्पा गेले आणि सगळे संपले !लिहा वाचा आणि डॉ शर्माही बंद झाले , मी भारतीय यानितर लिहिणेच थांबवले आहे य़ला दैवदुर्विलास नाहीतर काय म्हणावे ?

    ReplyDelete
  2. लेख उत्तम आहे, एकदोन शंका अशा आहेत कि,
    संघ राजकारणात आधीपासूनच होता, तेव्हा २०१० च्या व त्याआधीही निवडणुकीत भाजपचा सपशेल पराभव झाला होता. तेव्हा सध्याचे भाजपचे यश हे संघामुळे आहे हे म्हणणे चुकीचे वाटते. कॉंग्रेसचा भ्रष्ट आणि नाकर्तेपणा, मोदींनी घेतलेली भरारी हे विजयाचे कारण आहे. हिंदुत्व हा मुद्दा कळीचा बनला गेला तेव्हा हा बदल घडला. सामान्य मतदार मोठा हुशार असतो तो महत्वाचे मुद्दे विचारात घेऊन मतदान करतो. वैदिक शिक्षण, गोमांस वगैरे इतके कळीचे मुद्दे नसल्याने मोदीही ते सोयीस्करपणे संघ आदि कडे सोपवून देतात.
    दलितांना मागास ठेवण्याची नक्की कारणे फार मोठ्या काळात (सुमारे १००० ते २००० वर्षे) काय आहेत हे कुठेच स्पष्ट होत नाही. त्यांनी काही चुका केलत्या का? कि ते एक सेवक व सिस्टिमला मदत करणारे (प्रत्यक्ष जबाबदार नसलेले) म्हणून दुर्लक्षित ठेवले गेले? याचाही उलगडा होत नाही.

    ReplyDelete
  3. संजय सरांच्या लेखनातला नेमका दोष कोणता ?
    ते नेहमी वैदिकाना दोषी ठरवण्याच्या खटपटीत असतात . त्यांची लेखांची मांडणी अशा काही टप्प्यांनी फुलात जाते की आपोआप त्या लेखाचा परिपाक वैदिकाना दोषी आणि शिवणा शुद्ध ठरवण्यात होतो . खरेतर वैदिक आणि भारतीय भूमीवर त्यांच्यामुळे जी सांस्कृतिक उलथापालथ झाली असे संजय सर म्हणतात त्यावेळी वैदिक पूर्व शैव लोक काय करत होते ?
    मला अगदी बाळबोध शंका अशी आहे की ,
    वैदिक आले आणि इथल्या मातीत आपले विचार आचार घेऊन मिसळून गेले का प्रत्यक्ष इथे त्यांनी भारतीयाना राजकीय गुलाम बनवून आपला वैदिक धर्म स्वीकारायला लावला ? तसे काही पुरावे आहेत का ? इथल्या लोकांचे वैदिक धर्मात धर्मांतर होताना मुलाचे वैदिक हे उच्च वर्णाचे आणि धर्मांतरित हे कमी दर्जाचे असा प्रकार झाला का ? युरोपात जशी गुलाम विक्री झाली तशी इथे वैदिकांकडून पराभूतांची विक्री झाली का ?मुळात वैदिक आणि शैव यांच्यात लढा झाला का ?त्याच्या रक्तरंजित कथा इतिहासात आहेत का ?
    मुस्लिमांनी आपली मंदिरे पाडून तिथे मशिदी उभारल्या ? खरेतर संजय सरांनी यावर संशोधन करून हीपण वैदिकांची आगपाखड आहे आणि खरेतर मुस्लिमांनी मंदिरे पाडलीच नाहीत , शैव मंदिरे वैदिकानीच पाडली असा जावैशोध अजून कसा काय लावला नाही ? कारण अफझलखानाचे उदादात्तीकरण चालू झालेच आहे ,

    ReplyDelete
  4. संजय सोनवणी सराना नम्रतापूर्वक नमस्कार ,
    आपले लिखाण आणि पाटसकर साहेबांची प्रतिक्रिया आणि आगाशे यांचे म्हणणे -पाहीली ,
    दलित कसे निर्माण झाले हा एक जटील प्रश्न आहे . वैदिकांनी जर शैवांचा पराभव केला असेल
    तर त्याना दलित बनवले गेले असेल का ?
    पण मग आज शैवांची संख्या वैदिकांपेक्षा कितीतरी आहे .(?) आज प्रत्येक हिंदू कुटुंबात शंकर पुजला जातो आणि विष्णूही पुजला जातो हे कसे काय ? महाशिवरात्र आणि महा एकादशी सारख्याच आदराने पाळली जाते.
    आपण म्हणता की शिव आणि शक्ती ही खरी भारतीय दैवते आहेत आणि वैदिकांची दैवते स्वतः वैदिकही पुजत नाहीत हे अगदी खरे आहे त्याचा अर्थच वैदिकांनी आपल्या श्रद्धा आणि परंपरा बदलल्या आहेत . हे चांगलेच झाले असे मानले तर ? तुमची अडचण ही आहे की वैदिकांनी त्यांचे धर्मग्रंथ पूर्णतः मोडीत काढले नाहीत , "ते पण आणि हे पण " असे करत त्यांनी सरमिसळ झालेल्या हिंदू नावाच्या धर्मात (?)आपले पारडे जड ठेवले आहे - असेच ना ?
    आता दुसरा मुद्दा , खेडेगावातून ज्या जीवघेण्या प्रथा आहेत ,नरबळी पासून कोंबडी आणि बोकड असे बळी देण्याच्या प्रथा आहेत त्यास ब्राह्मण किंवा वैदिक जबाबदार आहेत का ? वैदिक हेच मुळात वैदिक राहिलेले नाहीत ,त्यांच्यातल्या पुरोहितांनी हिंदू धर्माच्या रचनेत आपलीही काही प्रकरणे घुसवली आहेत असेच ना ? - ते तर सगळीकडे होतच असते ,भारतीय संगीतातच बघा , मुस्लिम आणि हिंदू घराणी एक झाली आणि भारतीय संगीत बनले त्यात कोणाचा वाटा कसा आणि किती हे कसे सांगता येईल ? येईल पण ते संशोधनाच्या भाषेत असेल जनसामान्याना त्यात रस नाही . आता तर वेगाने पश्चिमी संगीत अभिजात संगीतावर आक्रमण करत आहे ,नृत्याचीही तीच गत आहे. तबला हाच मुळी सिने संगीतातून बाहेर फेकला जात आहे . कॉर्ड सिस्टीम अंगिकारली जात आहे .भजने ओव्या भोंडले तमाशा पोवाडे अशा पारंपारिक गोष्टी इतिहासजमा होत आहेत .
    अजून २०-३० वर्षांनी काय चित्र असेल ? माराठी भाषेची काय गत असेल ?
    त्या काळात वैदिक आणि शैव वाद कोणाला कळेल तरी का ? एक नवीन घुसळण होऊन दर पिढीत नवीन कल्पना आणि विचार पुढे येत असतात हे तरी कितपत खरे आहे ?
    जिथे खरे रेनसन्स घडलेच नाही तिथे काय आमुलाग्र बदल होणार ?
    कुणी म्हणते आपण सुमेरियन आहोत,कुणी म्हणते आपण अफगाणिस्तानातून आलो, कुणी म्हणते आपण इथलेच ,तरुण रक्ताला नुकते घडलेले हिंदू मुस्लिम मतभेद इतकेच फारफार तर आपले वाटतात आणि वैदिक शैव असल्या गोष्टी विनोदी वाटतात , कारण लहानपणापासून त्याने वटपौर्णिमा नागपंचमी गुडीपाडवा रामनवमी गोपाळकाला दसरा दिवाळी होळी सर्व पाहिले असते अनुभवलेले असते आणि हजारो वर्षांचे रेकोर्ड काढून तुम्ही जर तरुणाईला सांगत बसलात की हे वैदिक आहे आणि हे शैव आहे तर तरुणाई काय म्हणेल ? त्याना देशाच्या फाळणीचा हिशोब माहित असतो , त्याचा जाब ते विचारतात ,
    या देशाला खारे धार्मिक नेतृत्व मिळाले होते का ? वासुदेव श्रीकृष्ण , आद्य शंकराचार्य ,रामकृष्ण परमहंस ,बाबासाहेब आंबेडकर ,काय विचार दिले त्यांनी आपल्याला ? सगळे परिस्थितीजन्य होते का ? खरे तत्वज्ञान किती आणि परिस्थितीसापेक्ष रुढी सापेक्ष किती ? याचा अभ्यास संजय सर तुम्ही आमच्या समोर ठेवला पाहिजे
    धन्यवाद !

    ReplyDelete
  5. संजय सरांचे उत्तर खास करुन संघ आणि त्या विचारसणीच्या लोकांना दिसते. कारण या विचारसरणीत हटट तसेच जुन्या गतवैभवाची मांडणी दिसते. त्यापेक्षा गंभीर सामाजिक समस्या सोडविण्याचा प्रयत्न फारसा दिसत नाही. सध्याच्या दिवसांत त्यात बदल होत असला तरी मुळ गाभा मात्र स्वत्वाचा आहेच. मग त्यावर हिंदुत्वाचे आवरण किंवा इतर काही असो. पण इतरही धर्माचा कटटरपणा मग तो प्रार्थना राहणीमान एकेश्वरवादाचा हटट (मग मुळ ते मध्य आशियातील पर्यावरणपूरक आहार राहणीमान किंवा सुरक्षितेची कारणे असो)किंवा भारतीय उपखंडातील काहींचा अतिरेकी शाकाहाराचा पिसाट हटट /आग्रह हे शेवटी मानवी जीवन क्रमातील विविध अडसर आहे. समत्वाची शिकवणही याच उपखंडातून जगाला दिलेली आहे. मग त्यात येथील सत्यान्वेषी विचार प्रवणता मग ती प्रत्येक ज्ञानी त्यात संयमी वैदिक असो जैन, बौध्द इस्लामीक किंवा इतर या सर्वांनी जागतिक सामंजस्यही universal wisdom जगाला दिलेले आहे. आता गांधीजींना काँग्रेस सोडून कोणीही हायजॅक केले नाही. काही वर्षापूर्वीच तर काँग्रेसनेही सोडले आहे. ते पाहता संजय सरांनी affordable व्यक्तीची निवड केली आहे. पण मुस्लीमांच्या दृष्टीने ते गांधीही हिंदू विचारसणीच्या प्रतिकांचे आधार घेत प्रबोधन करत असल्याने स्वातंत्रयपूर्व काळातील विचारभेद कायम राहणार आहेत. किंवा राजकीयदृष्टया स्थानिक/देशपातळीवरही फायदेशीर राहणार आहेत. असो. यापलिकडेही समाजातील हुंडा, शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, जेएनयुतील बिघडवलेले काश्मिरी युवक, सण चालीरितींचे सद्यस्थितीतील बाजारीकरण किंवा त्याचे जगण्याचे साधन, बागायतदार मध्यम शेतकऱ्यांचे राजकीय लॉबिंग त्यांची समांतर इकॉनॉमी, इन्कमटॅक्स, व्यापाराची असुरक्षितता, आणखी बरेच विषयावरही संजय सरांनी सहिष्णुता/असहिष्णुता समजावून सांगतांना मार्मिक भाष्य /उपाय शोधून दाखविण्याचा प्रयत्न सुरु ठेवलाच पाहिजे. जेणेकरुन आपले सर्व वैचारीक सहमत किंवा असहमत असणारे आपआपल्या विचार मार्गाने या सर्व परिस्थितीवर आवश्यक प्रश्नोत्तरे होवून सामंजस्याने उपायासाठी सहमत होतील यात शंका मात्र नाहीच. कारण प्रत्येक असहमत व्यक्ती आपल्या विचारप्रश्नाप्रमाणे प्रति विचार करुन सर्व बाजू तपासण्याचा प्रयत्न करणारच. लेख उत्तम आहे पण प्रोजेक्टेड नको. अभय वांद्रे,मुंबई

    ReplyDelete
  6. अभय पवार सर ,
    आपण लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !
    आपली प्रतिक्रिया अगदी अंतर्मुख करणारी आहे . जितक्या विविध कल्पना मांडल्या जातील तितकी ही चर्चा रुंदावत जाइल आणि सर्वांनाच त्याचा फायदा होईल . मुख्य इच्छा आहे ती म्हणजे सर्वंकष चर्चा झाली पाहिजे आणि ती जर उणीदुणी न काढता झाली तर सोन्याहून पिवळे !किंवा दुधात साखर !
    संजय सरांचा ब्लोग चा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे , आपण सर्वांनी त्यात सहभाग घेत त्याचे चळवळीत रुपांतर करावे असा त्यांचा आग्रह असतो आणि त्यातून ते कधीकधी पूर्वग्रह दुषित मनाने लिखाणात गुरफटले जातात-असा धोका वारंवार निर्माण होतो हेही टाळता कसे येईल ते आपण सर्वांनी पाहिले पाहिजे !
    पुन्हा एकदा धन्यवाद .

    ReplyDelete
  7. सर ,
    उद्या शिवजयंती .
    आपल्याकडून काहीतरी शिव छत्रपति बद्दल वाचायला मिळेल अशी आशा !

    ReplyDelete
  8. संजयसर, हिंदू समजल्या जाणाऱ्या या बहुसंख्य बहुभाषी बहुआयामी समाज गटामध्ये इतर धर्मियांबाबत सहिष्णुता किंवा समत्वाचा भाव त्या इतर कटटर धर्मियांपेक्षा अधिकच जाणवतो. प्रत्येक धर्मातल्या कटटर असहिष्णू लोकांबददल सर्वांचे समानच मत असणार. परंतू दलित, मुस्लीम तसेच स्त्री वर्ग याबाबतच्या वागण्या व्यवहारासंबंधी त्यानुषंगाने निर्माण होणाऱ्या प्रश्नांना सामुदायिक स्वरुपाची अनुकंपा अवाजवी मिळते. वास्तविक त्याबाबत दोष हा व्यक्तीगत असो वा इतर स्वरुपाचा हेच मात्र कायदयाने सिध्द होत असते. परंतू या प्रकरणांत सामुहिक अन्यायाचे स्त्रोम/अवडंबर फारच माजविले जाते. तो अमुक आहे म्हणून असे बघू नका इतका ढोबळ प्रतिवाद /प्रघात मांडला जातो. तो गुन्हेगार आहे का, यावर मात्र हे समानतावादी हे दुसरे मतच मांडू देत नाहीत.किंवा चिकित्सा परिक्षणाला तयारच होत नाही असेही आढळून आले आहे. अहो आज जातीच्या कटटरतेपेक्षा धर्मिक वेडेपणा जास्त संहारक ठरू लागलेला आढळून येतो. कारण लग्न पध्दती तसेच महत्वाचे जीवनावश्यक व्यवहार यात सुप्त भेदभाव इथपर्यंत जात आपली कक्षा बाळगून आहे. परंतू धार्मिैक कटटरतेचे तसेच नाही त्याचे वैश्विक परिणाम दिसत आहे. आपला धर्म हजार वर्षांपुर्वी लॉक झाला आहे.आपला सांस्कृतिक विकासही टोळीप्रवणतेमुळे लढाईमुळे खुंटला आहे तसेच त्याबाहेरही जगात काही वास्तववादी/विज्ञानवादी विचार प्रचलित आपल्यातही होते. मध्यपूर्व आशियापेक्षाही विकसनशील संस्कृती भारतात होती किंवा प्रचलित आहे. यासंबधी समत्वाचे विचार करायला बाल्यअवस्थेपासूनचे सुदैव भारतातील सर्व धर्ममार्गात आहेत.याशी संबधित याची नोंद घ्यायला तयारच नाहीत. एक बरे की, हिंदुत्वाच्या रेटयामुळे राज्य घटनेचे समत्वाचे अधिष्ठान आधार भारतात भक्कम आहे. मग त्यात समाजातील बदल तातडीने किंवा हळहूळ स्वीकारण्याची मात्र खात्रीची ताकद या समाजात निर्माण झाली आहे. बाकीतरांना यापुर्वीतर लोकशाही, राज्यघटना समानतेचे अधिकार धार्मिक अधिकार याबाबत काही घेणेदेणे नव्हते. किंवा त्यापर्यंत त्यांना आपआपल्या माणसांकडून जाऊच दिले गेले नाही. जाणीवही होऊ दिली नाही. एकेकाळच्या समत्वेच्या किंवा माणूसकीच्या शांततेच्या तसेच उत्तम संशोधनाबाबत प्रसिध्द असणाऱ्या अलबैरोनी, इब्नबतुता अनेक अशा स्कॉलरसह पुरस्कार करणाऱ्या पण नंतर लॉक करण्यात आलेल्या इस्लामला या भारतीय उपखंडातील समत्वाची चांगल्या जीवनसरणीची, संशोधनांची खुल्या वैचारिक सामंजस्याच्या संस्कृतीची अभिसरण होण्यास अत्यंत मदतच झालेली आहे.संजय सरांकडून चिकित्सा मात्र वैदिकच नाहीतर संबधित हिंदू इस्लामिक ईसाई किंवा इतर या सर्वांचीच करुन त्यापध्दतीने मार्गदर्शन देण्याची आवश्यकता आता निर्माण झाली आहे.

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...