Friday, March 11, 2016

मी मृत्युंजय ..... मी संभाजी :- संजय सोनवणी



 श्री. संजय सोनवणी यांची छ. संभाजी राजांच्या अखेरच्या दिवसांवर आधारित ' मी मृत्युंजय .... मी संभाजी ' हि कादंबरी वाचली. शिवपुत्र संभाजीच्या जीवनावर तशा कित्येक कादंबरीकारांनी कादंबऱ्या रचल्या आहेत परंतु त्या सर्वांत जनमानसावर अधिराज्य गाजवलं ते श्री. शिवाजी सावंत यांच्या ' छावा ' ने ! सावंतांनी ज्या काळात संभाजीवर कादंबरी लिहिली त्या काळात जनमानसात संभाजीची वेगळीच प्रतिमा होती. महापराक्रमी बापाने महत्प्रयासाने कमावलेलं राज्य विध्वंसणारा व्यसनी, बदफैली संभाजी असं जे मराठी बखरकारांनी संभाजीचं चित्र लोकांसमोर पेश केलं होतं त्याला प्रथम सावंतांनी तडा दिला. त्यानंतर कित्येकांनी हि वाट चोखाळली परंतु त्यांपैकी कोणालाच सावंतांच्या ' छावा ' ची सर आली नाही.
या पार्श्वभूमीवर श्री. सोनवणी यांनी संभाजीवर आधारित कादंबरी लेखनाचा प्रयत्न केला आहे. परंतु सावंत आणि सोनवणी यांच्यातील मुलभूत फरक असा कि, सावंतांनी संभाजीचे संपूर्ण जीवन कादंबरीद्वारे उलगडण्याचा यत्न केला तर सोनवणींनी फक्त संभाजीचे अखेरचे दिवस आपल्या लेखनाकरता निवडले.
एक राजा, एक छत्रपती क्षणात शत्रूसैन्याच्या हाती लागतो. तिथून त्याची फरफट होत जाते. कैदेत असताना मार्गाने क्षणाक्षणाला त्याला प्रतीक्षा असते, शत्रूच्या तावडीतून आपणांस सोडवण्याकरता येणाऱ्या इमानी, निष्ठावंत सैनिकांची. सरदारांची. परंतु त्याची हि आशा उलटणाऱ्या क्षणांबरोबर हळूहळू मावळू लागते. असहाय्य, एकाकी परिस्थितीत संकटाने ग्रासलेल्या मनुष्याच्या भावविश्वाचा शोध घेण्याचा सोनवणींनी प्रयत्न केलाय. यापूर्वी श्री. ना. सं. इनामदारांनी छ. शिवाजी महाराजांवरील आधारित ' राजेश्री ' कादंबरीत छत्रपतींमधील व्यक्तीच्या भावजीवनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. दोन्ही कादंबऱ्या तसेच कादंबरीकारांची तुलना केव्हाही अनाठायी असली तरी तुलनात्मकदृष्ट्या पाहिले असता इतिहासाला दंतकथा, आख्यायिकांद्वारे जे विकृत वळण लागते, ते टाळण्याच्या बाबतीत सोनवणी यशस्वी झाले आहेत. इनामदारांची भूमिका नेहमीच कादंबरीकाराची राहिल्याने अनेकदा त्यांनी दंतकथा, आख्यायिकांचा मुक्तहस्ते वापर केला आहे. परंतु संधी असूनही सोनवणींनी हा मोह टाळून शक्य तितका इतिहासाशी प्रामाणिक राहण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे !
या कादंबरीतील मुख्य पात्र संभाजी जरी असलं तरी कथानक पुढे नेण्याकरता मुकर्रबखान, औरंगजेब, रहुल्लाखान प्रत्यक्षरित्या पुढे येतात तर कवि कलश हा अप्रत्यक्षपणे वावरत असतो. फक्त एकाच क्षणी तो दृश्यमान होतो व ते देखील धिंड निघतेसमयी !
औरंगजेबाच्या दरबारात कलशासह संभाजीला हजर केले जाते व संभाजी तिथे बादशाहला उद्देशून दुरुत्तरे करतो अशा आशयची वर्णने ऐतिहासिक कागदपत्रांत तसेच अनेक ऐतिहासिक कथा - कादंबऱ्यांत वाचायला मिळतात. परंतु त्यामागील राजकीय पार्श्वभूमी फक्त याच कादंबरीत वाचायला मिळते.
औरंगजेब संभाजीसोबत या तऱ्हेने का वागला, संभाजी - कलशाने त्याचा उपहास का केला याची सकारण कारणमीमांसा संभाजीच्या स्वतःशीच चाललेल्या संवादातून व दरबारातील प्रसंगातून केली जाते. माझ्या मते, इतिहासाचे संदर्भ ग्रंथ वाचनाचा कंटाळा करणाऱ्या व कादंबरीत इतिहास शोधणाऱ्या वाचकांसाठी हि कादंबरी उपयुक्त ठरेल. परंतु छ. संभाजीराजांच्या अखेरच्या दिवसांतील जीवनावर प्रकाश टाकणं हाच या कादंबरीचा प्रधान हेतू आहे का ? याचे उत्तर निर्विवादपणे होकारार्थी वा नकारार्थी देता येत नाही.
कधी कधी स्वतःलाच पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा वा जीवनात अनुभवलेल्या प्रसंगांना एखाद्या मिथकाच्या वा ऐतिहासिक घटना / व्यक्तिरेखेच्या माध्यमातून शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये इतिहास व जीवनातील अनुभव यांची यथायोग्य सांगड घातली गेली तरच त्यातून उत्तम कलाकृती सादर होते. याचे सर्वांच्या परिचयाचे उदाहरण म्हणजे इयान फ्लेमिंगचा ' जेम्स बाँड '.
जेम्स बाँड नावाचं मिथक फ्लेमिंगने जन्माला घालत आपल्या अनुभवांची त्यांस जोड देऊन ते पात्र इतकं जिवंत केलं कि, या नावाचा ब्रिटीश गुप्तहेर अस्तित्वात असलाच पाहिजे यावर लोकांची श्रद्धा बसली. इथं सोनवणींच्या समोर ऐतिहासिक पुरुष संभाजी आहे. ज्याने नऊ वर्षं सत्ता उपभोगलीय. ज्याकरता त्याला आप्तांचा, स्वकीयांचा, शत्रूंचा सतत सामना करावा लागला. जन्माप्रमाणे मृत्यू अटळ आहे. परंतु सदोदित मरणाच्या छायेत असूनही मृत्यूला न जुमानता निधड्या छातीने तोंड देणाऱ्या संभाजीची अखेर नेमकी कशी झाली असेल ?
हा प्रश्न गेली अनेक वर्षं, दशकं, शतकं तमाम महाराष्ट्रीयन माणसांच्या मनात एकदा तरी डोकावला असेल. संभाजी धीरोदात्तपणे मृत्यूला सामोरा गेला हे ऐतिहासिक सत्य आहे परंतु त्याचा हा मृत्यूपर्यंतचा प्रवास व तत्पूर्वी कैदेतील उलाघाल टिपण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. यामध्ये अर्थातच श्री. शिवाजी सावंतांचे नाव येणे क्रमप्राप्त आहे. परंतु सावंतांच्या तुलनेने श्री. सोनवणी याबाबतीत कमालीचे यशस्वी ठरले आहेत. याला प्रामुख्याने कारणीभूत त्यांची विशिष्ट लेखनशैली असली तरी काळाची निवड, पात्रांची अतिमर्यादित संख्या हे दुय्यम घटक देखील तितकेच सहाय्यक ठरतात.
सबंध कादंबरीत संभाजी कलशासोबत बोलत आहे. परंतु त्याची खरोखर कलशासोबत चर्चा सुरु आहे का ? याचे उत्तर ठामपणे नकारार्थी वा होकारार्थी देता येत नाही. कलश हे एक निमित्त आहे. त्याच्या माध्यमातून स्वतःच्या मनात उद्भवणाऱ्या नाना शंकांना, प्रश्नांना तोंड फोडण्याचे काम संभाजी करतो. संभाजीचा हा संवाद लांबलचक, अखंड असला तरी तो कुठेही कंटाळवाणा होत नाही. कारण त्यात जसा इतिहास व तत्कालीन राजकारणाचा संदर्भ आहे त्याचप्रमाणे मानवी आशे - निराशेचे गडद प्रतिबिंबही आहे.
शत्रूने कैद केलेल्या संभाजीला हरघडी असं वाटतं कि, आता माझी माणसं येतील व मला सोडवतील. संकटातून मुक्त होण्यासाठी त्याच्या मनाची होणारी अधीरता त्यातून ध्वनित होते व त्या अधीरतेसोबत वाचकालाही उत्कंठा लागून राहते कि, कोणत्याही क्षणी ' हर हर महादेव ' चा जयघोष होऊन संभाजीचे निष्ठावंत सैनिक त्याच्या सुटकेसाठी जीवावर उदार होऊन शत्रूवर हल्ला करतील. बादशाही छावणीत जाईपर्यंत हा आशे - निराशेचा खेळ चालत राहतो. या खेळात इतिहासातील संभाजी व वास्तव जीवनात प्रत्येक व्यक्तीत असलेला संभाजी यांची बेमालूमपणे सांगड घालण्यात सोनवणी यशस्वी झाले आहेत.
ज्यावेळी मनुष्य संकटांनी ग्रासतो व त्याचे आप्तही त्याला वाऱ्यावर सोडून देतात, त्यावेळी त्याच्या मनाची होणारी उलघाल कोणी अनुभवली नाही ? परंतु आपल्या प्रमाणेच अशीच किंबहुना याहून मोठी, भयंकर अशी परिस्थिती संभाजी भोसले नामक तरुणावर ओढवली होती. त्यावेळी त्याने त्या स्थितीला कशा प्रकारे तोंड दिले हे शब्दबद्ध करत असताना वाचकाच्या मनावर निराशेचे सावट पडू न देण्याचीही सोनवणी खबरदारी घेतात. संभाजीचा मृत्यू अटळ आहे. त्याची वेदना, त्याचे हाल अटळ आहेत. परंतु त्याचा स्वीकार करत असताना त्याची लढाऊ वृत्ती दाखवताना सोनवणी वाचकाच्याही मनातली जिद्द, लढाऊ वृत्ती कुठेतरी जागृत करतात. हेच माझ्या मते त्यांचे तसेच या कादंबरीचे मोठे यश आहे.
आजवर संभाजीच्या अखेरीवर जितक्या कादंबऱ्या वाचल्या त्यात कुठेही असा अनुभव आला नाही. आली फक्त ती बेचैनी, उदासीनता, निराशा. या पार्श्वभूमीवर सोनवणींचे यश नाकारता येत नाही.
कलाकृती, मग ती ऐतिहासिक असो वा सामाजिक. ती शोकात्मक वा सुखात्मक बनवण्याचे स्वातंत्र्य लेखकाकडे असते. परंतु एका शोकांतिकेला सकारात्मक पद्धतीने देखील वाचकांसमोर मांडता येऊ शकते हा चमत्कार मी तरी प्रथमच पाहिला आहे.
-संजय क्षीरसागर

पुस्तकाचे नाव :- मी मृत्युंजय ... मी संभाजी 
लेखक :- श्री. संजय सोनवणी
प्रकाशक :- जालिंदर चांदगुडे, प्राजक्त प्रकाशन, पुणे
किंमत :- १४० रु.

6 comments:

  1. भोसल्यांच्या संभाजीला मारण्यापेक्षा त्याला रोजगार हमी योजनेत नोकरीला ठेवायला हवे होते औरंगजेबाने , असे काहीजण म्हणतात आणि कवी कलश तर शैव धर्माचा ब्राह्मण त्याला सोडून द्यायला हवे होते ,
    पण संजय हे छापणार नाही ,

    ReplyDelete
  2. शहाजी राजे आणि छ शिवाजी महाराज यांची जशी तुलना होऊ शकत नाही तशीच छ शिवाजी आणि संभाजी यांची तुलना होऊ शकत नाही . उगाच संभाजीला महान आणि उद्दात्त करून त्याची किंग साईझ इमेज बनवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. आजकाल प्रत्येक चित्रपट आणि नाटक यांचे जसे प्रमोशन होते तसाच हा प्रकार संजय सर करत आहेत
    कवी कलश हा तर पक्का वैदिक ब्राह्मण होता - तो शैव असेल तर फारच बात गंभीर आहे .
    शिव स्कंद वायू अग्नी पुराणे ही शैव पुराणे आहेत आणि ती वैदिक काळात रचली गेली ?संहिता या शैव तत्वावर आधारित आहेत.
    कुठूनतरी संजय सराना वाद वाढवण्याची न हौस आहे आणि जमे तर वैदिकाना झोडपण्याचे त्यांचे ब्रिद आहे. त्यामुळे त्यांचे हे चाले चालू राहणार !
    शिवाजी महाराज हे धूर्त राजकारणी होते आणि संभाजी हा कलुषा ब्राह्मणाच्या आहारी गेला होता आणि त्यामुळे काळूशाने त्यांचा घात केला असेच इतिहास सांगतो .

    ReplyDelete
    Replies
    1. कादंबरीचे परीक्षण न वाचता आपण एका ठराविक विचारसरणीच्या दृष्टीकोनातून प्रतिक्रिया दिलेली आहे याचे वाईट वाटते. विषयात संभाजीला कोणी पकडून दिले किवा त्याचे पूर्वायुष्य ह्यांचा काहीही संबंध नाही. हे वाचलेत तर बरे होईल.

      Delete
  3. पाटसकर आणि पाटणकर,
    उपरोधिक प्रतिसाद देण्यापेक्षा मुद्याचं काय ते लिहा,ही विनंती.शैव आणि वैदिक याचा उल्लेख तरी आहे का लेखामध्ये?
    बाकि, संजयजी पुस्तक घेवून नक्कीच वाचेन.

    ReplyDelete
  4. कवी कलश पक्का शाक्तपंथी होता असे विश्वास पाटलांच्या 'संभाजी' मध्ये लिहले आहे.
    त्यामुळे वैदिक आणि शैव हा मुद्दा गौण आहे.
    शैव आणि शाक्त यांचं चांगलं जमत असावं.
    म्हणून संभाजीराजे आणि कलश्याची मैत्री जिवासखाची होती.
    शाक्तपंथी जारणमरण,जादूटोणा वगैरे करत असले तरी वैष्णवांपेक्षा(वैदिक) चांगले होते.
    म्हणजे दांभिक नव्हते.
    शिवरायांनीसुद्धा वैदिकांचा दांभिकपणा ओळखून शाक्तपंथी निलगीरी स्वामींकडून दुसरा राज्याभिषेक करवून घेतला होता.

    ReplyDelete
  5. छत्रपति शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार करणारे छत्रपति संभाजी.

    महाराष्ट्राचे पाहिले युवराज आणि या महाराष्ट्राचे दुसरे छत्रपति.

    शिवाजी महाराजांसाराखेच प्रचंड पराक्रमी आणि चारित्र्यवान होते.

    संभाजीराजांचा जन्म १४ मे इ.स. १६५७ रोजी झाला. जन्मस्थान: किल्ले पुरंदर, पुणे.

    संभाजीराजांच्या आईचे, सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले.

    त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ नावाची स्त्री त्यांची दूध आई बनली.

    संभाजीचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाई यांनी केला.

    सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई, सोयराबाई यांनीदेखील त्यांच्यावर खूप माया केली.

    अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते.

    शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले.

    राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले.

    मोंगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले.

    धर्मवीर नव्हे कर्मवीर छत्रपति संभाजी महाराज !!!!!

    उत्तम काळे

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...