Saturday, March 12, 2016

एक मृत्युंजयी महाकाव्य-राकेश पाटील'मी मृत्युंजय... मी संभाजी' ही संजय सोनवणी लिखित कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली. संभाजी हा विषयच मराठी जनमानसाला शेकडो वर्षे भुरळ घालणारा... मराठी माणसाच्या नसनसात चैतन्य, अंगार, अस्मिता फुलविणारा.  महाराष्ट्राच्या भावविश्वाला सतत आव्हान देणारा हा शिवाचा छावा, शंभूराजा साहित्यविश्वासहि तितकाच आव्हानात्मक ठरलाय. वा.सी.बेंद्रे, तिहासकारांनी हे आव्हान पेलून संभाजीचे धवल चरित्र साकारले. शिवाजी सावंत, विश्वास पाटील सारख्या कादंबरीकारांनी शंभूचरित्राला न्याय देण्याचा प्रयत्न केला. परंतु संभाजी हि व्यक्तिरेखा इतिहासात (आणि आजही) तितकीच रहस्यमय आणि आव्हानात्मक सिद्ध होऊन राहिलंय. 'मी मृत्युंजय... मी संभाजी' च्या माध्यमातून संजय सोनवणींनी ह्या आव्हानाला हात घालून शंभूचरित्राचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.

साधारण तीनचार वर्षे फेसबुकवर संभाजी ह्या विषयावर अनेक चर्चा घडल्या. स्वत: सोनवणी ह्यांनी संभाजीराजांच्या हत्येसंदर्भात '१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज' आणि 'संभाजी...मृत्युंजय पण हतबल!' असे दोन ब्लॉग लिहून रहस्यभेद करणारी भूमिका मांडली होती. त्यावर अत्यंत सखोल आणि वादग्रस्त चर्चासत्रांच्या अनेक फैरी फेसबुक आणि ब्लॉगवर आजवर घडून गेल्या...आणि अगदी अलीकडेहि ह्या विषयावर हिरहिरीने वाद-प्रतिवाद घडतच आहेत. शंभूचरित्र किती आव्हानात्मक आहे ह्याचा अंदाज त्यातून करता येईल. ह्या पार्श्वभूमीवर 'मी मृत्युंजय... मी संभाजी' हि कादंबरी शंभूराजांच्या वादळी व्यक्तिरेखेचा आणि रहस्यमय इतिहासाचा झंझावात पेलण्यात यशस्वी ठरेल काय?

लेखकाने कादंबरीची रचना पारंपारिक पद्धतीला फाटा देऊन काहीशी अभिनव स्वरुपात केली आहे. ऐतिहासिक कादंबरी असूनही लेखकाने कटाक्षाने फाफटपसारा टाळून केवळ १२८ पानांत एक वेगळी मांडणी केली आहे. संगमेश्वर इथे संभाजी राजांना मुघलांनी कैद केले इथपासून ते त्यांची हत्या ह्या सुमारे ४० दिवसांच्या प्रवासात कादंबरी आपल्यासमोर इतिहासाची पाने उलगडीत राहते. ह्या ४० दिवसाच्या  मृत्युमार्गावरून संभाजीचे भावविश्व उलगडून दाखविण्याचा लेखकाच्या संकल्पनेची दाद द्यायला हवी.

कादंबरीची सुरुवात होते ती संगमेश्वर इथे.  शंभूमहाराजांचा तळ पडलाय... शिर्क्यांना नमवून राजे रायगडाकडे निघालेत...हरबा देसायाच्या, अर्जोजी यादवाच्या वतनाचा निवडा करताहेत... सोबत कवी कलश आहेत... म्हलोजी-संताजी घोरपडे, खंडो बल्लाळ सारखे सहकारी आहेत... स्वराज्यातील निबिड अरण्यात दऱ्याखोऱ्यानी वेढलेले सुरक्षित असे संगमेश्वर... लेखकाने अत्यंत कौशल्याने त्या  क्षणचित्रांच्या माध्यमातून वाचकांना थेट संभाजीच्या छावणीत नेवून पोहोचवण्यात यश मिळवलंय. कादंबरी ह्या सुरुवातीच्या नाट्यमय रचनेनंतर थेट संभाजीराजांच्या संवादाकडे , मनोगताकडे वळते. ही क्षणचित्रे कादंबरीत अधिक वापरता आली असती आणि त्यातून कादंबरीची पारंपारिक रंजकता खुलवता आली असते असे नमूद करावेसे वाटते.

...आणि संगमेश्वरच्या तळावर अचानक पडलेली मोगली धाड...अकस्मात झालेली कैद...शेख निजाम संभाजी आणि कलश ह्यांना घेऊन तडक निघालाय. खुद्द स्वराज्यातील गड किल्ल्यांच्या, सह्याद्रीच्या घाटवाटांच्या साक्षीने मराठ्यांचा छत्रपती कैद होऊन मोघली तळाकडे निघालाय...हा प्रवास मृत्युच्या दिशेने ४० दिवसांचा... सुटकेची आशा, विश्वास ते असहाय..अगतिक हतबलता...संतापजनक, वेदनादायी फसगत ते साक्षात मृत्यूला आव्हान देणारा दुर्दम्य स्वाभिमान! संभाजीच्या ह्या काळालाही जिंकून जाणाऱ्या मृत्युंजयी प्रवासाची हि कहाणी.     .

कवी कलश ह्यांना उद्देशून संभाजी आपल्याशी संवाद शंभूराजे कलशाला उद्देशून वाचकाशी थेट संवाद साधतात. छत्रपती राजा स्वत:च आपल्या चरित्राचा आणि इतिहासातील घडामोडींचा लेखाजोखा मांडतो. इतिहासातील एकेक रहस्यावरून पडदा उलगडीत राहतो.   शिवरायांचे महनीय स्वराज्य, सत्तालोलुपांची कटकारस्थाने आणि स्वत:चे मनस्वी भावविश्व ह्यांचा इत्यंभूत धांडोळा शंभूराजे स्वत:च आपल्यासमोर सादर करतात. ह्या संवादात शेख निजाम येउन जातो... स्वत: औरंगजेब हजर होतो...संभाजीचा भूतकाळदेखील साक्षात उभा राहतो...

कादंबरी ऐतिहासिक घटनाक्रमावर आधारित अस्सल पुराव्यांशी बांधिलकी ठेवून आपल्यासमोर इतिहासाचे विश्लेषण करीत राहते, हे उल्लेखनीय. जेधे शकावली, फुतहाते आलमगिरी (ईश्वरदास नागर), मासिरे आलमगिरी (साकी मुस्तैदखान) ह्यांची उद्धृते अस्सल पुरावे म्हणून सातत्याने आपल्यासमोर येत राहतात. त्यातून कादंबरी वाचकाला अस्सल इतिहासाशी कायम सलग्न ठेवून वाटचाल करीत राहते. ह्या चाळीस दिवसांच्या मृत्युच्या दिशेने झालेल्या प्रवासात संभाजीराजे आधी आशावादातून हतबलतेकडे आणि मग कैदी असूनही साक्षात मृत्यूला आव्हान देत उभा ठाकलेल्या झुंझार योद्धयाच्या दुर्दम्य आत्मशक्तीने मृत्युंजय कसे सिद्ध झाले ते लेखकाने कौशल्याने लेखणीबद्ध केलंय. आजवर शोकांतिका म्हणून पाहीलेल्या ह्या कथानकाला  एका मृत्युंजयी महाकाव्याच्या रूपाने सादर करण्यात कादंबरी नक्कीच यशस्वी ठरलीय. संभाजीराजांच्या आयुष्यावर अनेक नाटके लिहिली गेली. अत्यंत विपर्यस्त अशी संभाजीची  व्यक्तिरेखा त्यातून प्रदर्शित झाली. हि कादंबरी स्वत:च एक महानाट्य आहे. रंगभूमीला आव्हान देणारा शंभूराजा ह्यातून नक्कीच साकार होईल!

एकीकडे रायगडावरील मुत्सद्द्यांची-घरभेद्यांची कारस्थाने ह्यात फसगत झालेला राजा संभाजी तर दुसरीकडे बादशाह औरंगजेब, दिलेरखान, शहजादा अकबर ह्यांच्या गोटात घुसून त्यांनाच मात देणारा दिल्लीच्या तख्ताला उलटवण्याची खेळी खेळणारा धुरंधर मुत्सद्दी शंभूराजा...एकीकडे मोगलांसह इंग्रज-पोर्तुगीज-सिद्दी अशा शत्रूंची टोळधाड एकदाच अंगावर घेणारा रणझुंझार योद्धा तर दुसरीकडे शाक्त-वैदिक अशा धर्मसत्तांच्या भोवऱ्यात अडकेला छत्रपती...असा इतिहासाच्या महत्वपूर्ण पण अस्पर्श पैलूंचा सारीपाट मांडून लेखकाने  शंभूराजाच्या झंझावाती आयुष्यातील चिरंतन द्वंद्वाचे रहस्य ह्या कादंबरीतून उजळून काढले आहे. शंभूराजांच्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेला उंचावणारी, सार्थ न्याय देणारी हि कादंबरी!

-राकेश पाटील

'मी मृत्युंजय... मी संभाजी'
लेखक: संजय सोनवणी
प्राजक्त प्रकाशन.

3 comments:

 1. भोसल्यांच्या संभाजीला मारण्यापेक्षा त्याला रोजगार हमी योजनेत नोकरीला ठेवायला हवे होते औरंगजेबाने , असे काहीब्राह्मण आजही म्हणतात आणि कवी कलश तर शैव धर्माचा ब्राह्मण त्याला सोडून द्यायला हवे होते,असेही काही दिव्य आहेत
  पण संजय हे छापणार नाही ,
  एकंदरीत ब्राह्मणांनी संभाजीच्या अखेरच्या काळात त्याचा घात केला हे निर्विवाद सत्य आहे ,आणि खरेतर संजय सरांनी ते स्पष्ट मांडायला हवे होते
  दोन्हीही परीक्षणे अभ्यासपूर्ण आहेत , एक शल्य मनात राहते , ते म्हणजे छ राजारामाच्या मार्गातून संभाजी दूर व्हावा असे अनेकाना वाटत होते का ? आणि एकुणातच ब्राह्मण वर्गाला सत्तेवर पकड वाढवत न्यायाची होती का ? असे अनेक प्रश्न मनात येतात . अजून १०० वर्षांनी या विषयाची दाखलाही घेतली जाइल का अशी भीती वाटते . आज देवगिरीचे यादव आपल्याला काहीच आकर्षित करत नाहीत ,तसे शिवाजी संभाजीचे होईल का ? कारण आपण छात्रापातीना काही ठराविक जातीच्या चौकटीत बंदिस्त करतो आहोत , आजकाल संभाजी ब्रिगेड ,छावा अशा संघटना हे पाप करत आहेत असे वाटते , छत्रपति हे हे विशाल व्यक्तिमत्व होते त्याना जातीच्या भिंतींमध्ये कोंडता कामा नये . इतकेच सांगावेसे वाटते .

  ReplyDelete
 2. एक मृत्युंजयी महाकाव्य ?????????????????????

  महाकाव्य की कादंबरी ???????????????????????

  श्रीपाद, अ'नगर

  ReplyDelete
 3. From where I can collect book in pune ? pls revert Asap thanks.

  ReplyDelete