Wednesday, March 23, 2016

....अन्यथा आयसिसचा दहशतवाद....




आयसिस (इस्लामिक स्टेट्स) या दहशतवादी संघटनेने सिरिया व इराकमध्ये जो दहशतवादाचा विस्फोट घडवला आहे तो समस्त मानवजातीला काळीमा फासणारा आहे यात शंका बाळगायचे कारण नाही. २०११ पासून या संघटनेने निर्माण केलेल्या हिंसक संघर्षात दोन लाखाहुन अधिक ठार झालेले आहेत.आयसिसच्या दहशतवाद्यांनी हाती पडलेल्या सिरियन/इराकी नागरिकांसह परकीय नागरिक व पत्रकारांची ज्या नृशंस पद्धतीने हत्या केली आहे ती "सैतानी" या शब्दातच वर्णन करता येईल. परंतू हा मध्यपुर्वेतील राष्ट्रांपर्यंत मर्यादित असलेला मामला उरोपच्याच भुमीवर जावून पोहोचेन याची कोणी कल्पनाही केली नव्हती. चार्ली हेब्दो मासिकातील व्यंगचित्रांच्या बदल्यासाठी हा आतंकवाद फ्रांसमद्ध्ये घुसला. नुकताच ब्रुसेल्स या बेल्जियमच्या राजधानीत विमानतळ आणि मेट्रो स्टेशनवर झालेल्या दहशतवादी स्फोटांत तीसहून अधिक ठार झाले. युरोपमध्ये आयसिसचे नेटवर्क किती पसरले आहे याचा अंदाज या अनपेक्षित हल्ल्यामुळे येतो.

प्यरिस हल्ल्यातील एक संशयित दहशतवादी सालह अब्देस्लाम गेल्या शुक्रवारी ब्रुसेल्स येथे पकडला गेला होता. त्यानंतर लगोलग झालेला हा हल्ला या अटकेचा सुड घेण्यासाठी व एक माणुस अटक झाल्याने आमचे अस्तित्व संपत नाही हे दाखवण्यासाठी केला गेला असे मत व्यक्त केले जाते आहे. आयसिसने या हल्ल्याची जबाबदारी जरा उशीराने स्विकारली. त्यामुळे हा हल्ला आयसिसच्या हेडक्वार्टरवरुन नियोजित केला गेला नसून आयसिसच्याच युरोपमधील शिस्तीने विखुरलेल्या स्वतंत्र गटांनी केला असावा असेही मत माध्यमे व्यक्त करीत आहेत.

ही स्थिती अमान्य करण्याचे काहीच कारण नाही. युरोपभर आयसिस पसरली आहे, त्यांना नवेनवे नवखलिफातच्या स्वप्नांनी भारावलेले तरुण रिक्रुट्स जगभरातुन मिळत आहेत. युरोपमद्ध्ये एकीकडे सिरियन स्थलांतरितांबद्दल रोषही आहे तर दुसरीकडे मानवतावादी भावनेने त्यांना आश्रय द्यावा असाही मतप्रवाह जोरदार आहे. या स्थलांतरितांत दहशतवादीही मिसळून गेले असतील तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.  २०१२ ते २०१५ या काळात एकट्या बेल्जियममधून किमान ४०० लोक आयसिस नियंत्रित इराक व सिरियात स्थलांतरील झाले होते. त्यातील 117 लोक परत आले ते केवळ बेल्जियमला युरोपातील आयसिसचे केंद्र बनवण्यासाठी असे मानले जाते.

याचाच अर्थ आयसिसने युरोपमद्ध्ये भकम पाय रोवले आहेत. आताचा ब्रुसेल्सवरील हल्ला हा तुलनेने छोटा असला तरी आम्ही केंव्हाही, कधीही आणि युरोपभर्तात कोठेही दहशतवादी कारवाया करु शकतो हा इशारा म्हणजे आताचा हल्ला आहे. या हल्ल्यांमुळे युरोप युनियनची एकी भंग पावत चाललेली आहे व ती उध्वस्त व्हवी असच आयसिसचा कट दिसतो.

येथे एक बाब लक्षत घ्यायला हवी व ती म्हणजे ओसामा बिन लादेनचे भूत आता आयसिसच्या मानगुटीवर बसलेले आहे. जगभरचे विद्वान या दहशतवादासाठी इस्लाम धर्म व कुराणला जबाबदार धरण्यात मग्न आहेत व या दहशतवादाचे विश्लेशनही तसेच केले जात आहे. खरे तर युरोपियन व अमेरिकन ख्रिस्त्यांनी आणि इझ्राईल स्थापन झाल्या दिवसांपासून ज्युंनी अरब राष्ट्रंत जी विशिष्ट भुराजकीय परिस्थिती निर्माण केली ती य दहशतवादाला अधिक जबाबदार आहे. धर्म कोणताही असता तरी लढाऊ अरबांनी आपली प्रतिक्रिया अशीच दिले असती.

युरोपिय जग सतराव्या शतकापासून सेमेटिक गटाशेची आपली सांस्कृतिक नाळ तोडण्यच्या प्रयत्नात होते. त्यातुनच आर्य वंशवाद फोफावला व सेमेटिक व अन्य वंश हिणकस ठरवण्यात आले. येशू ख्रिस्त आर्य ठरवण्याचेही हिरीरीने प्रयत्न झाले. हिटलरने ज्युंविरोधात क्रुरकर्म्याची भुमिका निभावल्याने आर्य वंश हा शब्द बदनाम झाला. पण युरोपियन विद्वानांने त्यावर आर्य-भाषा-गट सिद्धांताच्या मध्यमातुन तोच सिद्धांत जीवंत ठेवला. त्यामुळे अरबी जगतालाही ते शत्रु बनवणार हे उघड होते. मध्यपुर्वेतील मुबलक तेल याने आधी त्यांचे स्वार्थी लक्ष वेधले असले तरी अरब जगतात राजकीय व सामरिक लुडबुडींचा इतिहास जुना आहे.  सद्दाम हुसेनवर  रासायनिक अस्त्रे आहेत असा धादांत खोटा आरोप करत त्याच्यावर युद्ध लादत, खुनशी फाशी देणारे अमेरिकन व युरोपियन जग व त्यांचा अनुनय करणारे त्याबद्दल मूग गिळून असतात. इझ्रएलचे आतंकवाद नुसते खपवुन घेतले जात नाही तर अश दहशतवाद्यांना चक्क शंततेचे नोबेल दिले जाते. यचा रोष उफाळून येणार नाही असे नाही. लादेनने चक्क अमेरिकेतील ट्विन टोवरवर हल्ला चढवून या रोषाची चुणूक दाखवली.

आता आयसिसच्या रुपात भस्मासूर पुढे ठाकला आहे. हा दहशतवास्द अक्षम्य आहे यात शंका नाही. पण म्हणून युरोप-अमेरिकन "आर्यन" वर्चस्वतावादी विचारांनी भारावलेल्या जगताने अरबांविरुद्ध वारंवार आर्थिक व सामरिक दहशतवाद करावा, राजरोस दरोडे घालावेत व ते केवळ आपल्या बलाढ्य ताकदीच्या जोरावर खपवून न्यावेत हेही योग्य आहे असे कोण म्हणेल? तालिबान, ओसामा ही भुते अमेरिकेच्या पापातुन उभे रहिले होते. आयसिसचे भूत ही त्याचे पुढची आवृत्ती आहे. आयसिसने आजवर जवळपास वीस देशांत ७५ दहशतवादी हल्ले चढवले आहेत. सध्या युरोपची भुमी हिट लिस्टवर आहे. उद्या ती अमेरिकाही असू शकेल. आयसिसमद्ध्ये समील व्हायला जाणारे काही इस्लामी भारतीय धर्मांधही आहेतच. कुराणचे तत्वज्ञान दहशतवादी कुशलतेने वापरुन घेतात. दहशतवादी तत्वज्ञानच काढायचे तर कोणर्त्याही धर्मग्रंथातून काढता येते. उद्देश मात्र तो असला पाहिजे.

आयसिस दहशतवादी आहे. कुराण हा त्यांचा आधार आहे. अरबी लोक टोळी जीवनातुन वाढलेले. तो बेदरकारपणा त्यांच्यात पुरेपूर आहे. सरळ युद्धात आपण युरोपियन राष्ट्रांशी अथवा अमेरिकेशी कालत्रयी जिंकू शकत नाही हे त्यांना माहित असल्याने त्यांनी हा दहशतवादी मार्ग निवडला आहे. त्यासाठी व्यापक इस्लामिक स्टेटची स्थापना, नवी खिलाफत ही त्यांची गरज आहे.

कोणी बनवली ही गरज? त्यांच्यावर अन्याय करणारे, युद्धे लादणारे कोण होते? मला वाटते, ब्रुसेल्समद्ध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करतांना यावरही विचारी जागतिक समुदायाने विचार करत उत्तर शोधले पाहिजे. अन्यथा अयसिसचा दहशतवाद संपुर्ण युरोपला पोळून काढल्याखेरीज राहणार नाही.

1 comment:

  1. ISIS दहशतवाद हा मानवतावादाला लागलेला एक फार मोठा कलंक आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...