Saturday, April 9, 2016

क्यलिफोर्निया...मराठवाडा आणि दुष्काळ! (आटलेल्या नद्या-क्यलिफोर्निया)

क्यलिफोर्निया या अमेरिकेतील राज्यात गेली चार वर्ष भिषण दुष्काळ पडलेला आहे. जानेवारी २०१५ मद्ध्येच क्यलिफोर्नियाच्या गव्हर्नरांना दुष्काळी आणिबाणी जाहीर करावी लागली एवढी भिषण स्थिती सलग दुष्काळाने निर्माण झालेली आहे. ओसंडुन वाहणा-या नद्या प्रचंड आक्रसलेल्या आहेत. धरणांतील जलसाठेही सुकले आहेत. भूजलपातळी खालावल्याने खाजगी विहिरींनीही तळ गाठलेला आहे. यंदाही स्थिती उत्साहवर्धक नाही. खरे म्हणजे क्यलिफोर्निया हे अमेरिकेतीलच नव्हे तर जगातील महत्वाचे शेतमाल-फळफळावळ उत्पादक राज्य आहे. आपणही कोकणचा क्यलिफोर्निया करु अशी स्वप्न पाहत होतो हे आठवत असेलच. आज तोच क्यलिफोर्निया भकास-ओसाड झाला आहे. प्यायच्या पाण्याचेही वांधे आहेत. थोडक्यात क्यलिफोर्नियाचा मराठवाडा झाला आहे. वन्य जीवनावरही या दुष्काळाने भयानक परिणाम केलेला आहे. क्यलिफोर्नियातील हा गेल्या चारशे वर्षातील सर्वात जीवघेणा दुष्काळ आहे असे तज्ञ म्हणतात. यंदाही दुष्काळ संपेलच याची आशा हवामानतज्ञांना नाही.

दुष्काळाशी संघर्ष करण्यासाठी अमेरिका काय मार्ग वापरत आहे हे पाहणे आपल्यालाही प्रबोधक ठरेल. त्यातील काही मार्ग आपल्याकडे आपल्या भौगोलिक व पर्यावरणीय स्थितीमुळे उपयुक्त नाहीत. पण जे मार्ग आपण अनुसरू शकतो ते पाहुयात. १) सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करून ते शेतीयोग्य बनवणे. क्यलिफोर्नियात मोठ्या प्रमाणावर सांडपाणी प्रक्रिया करुन समुद्रात सोडण्यात येत होते, ते आता समुद्रात सोडून न देता शेतीकडे वळवण्यात येत आहे. आम्ही मुळात सांडपाण्यावर प्रक्रियाच करत नाही किंवा केली तरी ती तोंडदेखली असते. शेतीसाठी त्याच्व्हा वापर तर दूरची गोष्ट झाली. आपल्याला नदी-नाल्यांत सोडले जाणारे सांडपाणी शुद्धीकरण करावेच लागणार आहे.

२) पीकपद्धतीत बदल : कोणत्या प्रकारच्या पीकांना किती पाणी लागते याचा अभ्यास करून पाणीपिऊ पीके बंद करण्याचा अथवा क्षेत्रबंदीचा निर्णय. ज्यांना ही पीके घ्यायचीच आहेत त्यांच्यावर अवाढव्य जलकर लावण्यात आला आहे. क्यलिफोर्निया राज्य हे बदामांचे मोठे उत्पादक आहे. ही झाडे क्यलिफोर्नियातील उपलब्ध पाण्यापैकी १०% पाणी पितात. अशी काही इतर अनेक पीके आहेत. सर्वच पीकांचे नीट नियोजन करणे, काही पीके घेणे बंद करत पर्यायी पीकांकडे जाण्याचे त्यांनी नियोजन केले आहे. नागरिकांनीही आपल्या खाद्य सवयीही बदलाव्यात यासाठी प्रबोधन केले जात आहे.

आपल्याकडे हे करावेच लागणार आहे. ७०% पाणी पिणा-या उसाबाबतच आमची भुमिका धड नाही. उसाला पर्याय असुनही ते वापरले जात नाहीत. द्राक्षे, मोसंबी ईत्यदिबद्दल तर भुमिकाच नाही. आम्हाला प्रत्येक विभाग, त्यातील पाण्याची एकंदरीत उपलब्धता याचा शास्त्रीय अंदाज घेतच पीकनियोजन करावे लागणार आहे.

३) हवेतील बाष्पापासून पाणी मिळवणे, कृत्रीम पाऊस पाडणे हेही उपाय केले जातात पण ते तितकेसे यशस्वी ठरलेले नाहीत. उघड्या क्यनालमधून पाणी नेण्यापेक्षा बंद पाईपलाईनचा वापर करण्याचे प्रमाण मात्र वाढवण्यात येत आहे.

४) बाटलीबंद पाणी देणा-या कंपन्यांविरुद्ध कठोर उपाययोजना. नेस्लेसारखी क्यलिफोर्नियातील सर्वात अवाढव्य कंपनी आहे व तिच्या अनिर्बंध पाणीवापरावर (म्हणजेच पाणीचोरीवर) कोणी पुर्वी लक्ष देत नव्हते. आता मात्र कायद्याचा बडगा कठोर करण्यात आला आहे. बाटलीबंद पाण्यावरच निर्बंध आणले गेले आहेत.

विशेष म्हणजे नेस्लेनेही या निर्बंधांचे स्वागतच केले असून आम्ही मर्यादेत राहून आमच्या प्लांट्समद्धे पाण्याचे वाया जाण्याचे प्रमाण किमन मर्यादेत राहू असे लेखी अभिवचन सरकारला दिलेले आहे. असे असले तरी नेस्लेचे राज्यातील सर्व प्लांट बंद करावेत यासाठी जनमताचा रेटा वाढत आहे.

आपल्याकडेही अशा निर्बंधांची तातडीने गरज आहे. आणि जनतेचा दबाव काय असतो हे आम्हाला अशा कामांत समजत नाही. आमची आंदोलने राजकीय हेतुंनीच प्रभावित असतात नि म्हणूनच आमचे खरे प्रश्न सुटत नाहीत.

५)  घरगुती व घरबागेसाठी पाण्याच्या वापरावर निर्बंध, प्रतिमाणसी किती ग्यलन पाणी पुरवले जाईल याचा निश्चित आराखडा व त्याप्रमाणेच पुरवठा.

६) क्यलिफ़ोर्निया वाटर बोर्डाचा सर्वात महत्वाचा नागरिकांना सल्ला म्हणजे थेब थेंब पाणी वाचवा. पाण्याबाबतची आपली जीवनशैली प्रत्येकाने बदलावी यासाठी विशेष अभियान राबवले जात आहे.

या सा-या प्रयत्नांमुळे २३.९% पाणी वाचवता आले (ध्येयापेक्षा फक्त १.१% मागे पडले) जे साठ लाख नागरिकांना वर्षभर पुरू शकते.

अमेरिका हे जगातील सर्वात तंत्रप्रगत राष्ट्र आहे. दुष्काळावर मात करण्याचे मार्ग म्हणजे उपलब्ध पाणी काटकसरीने वापरणे, सांडपाणी पुन्हा वापरात आणने हेच उपाय त्यांनाही महत्वाचे वाटतात. पाणी कृत्रीमरित्या तयार करता येत नाही. आम्ही आमच्या जीवनदायी पाण्याची बेपर्वा उधळपट्टी करण्यात मशगूल आहोत. क्यलिफोर्नियासारख्या अमेरिकेतील शेतीप्रगत राज्याला आज पाण्यानेच विकलांग केले आहे. पाणी काटकसरीने वापरायची बुद्धी त्यांना फार लवकर झाली. आमच्याकडे आजवर दुष्काळाच्या एवढ्या रांगा लागून गेल्यात पण आम्हाला पाण्याचे महत्व अजुनही समजलेले नाही.

आमचे कामच असे असते कि तहान लागली कि विहिर शोधायची. नियोजनाची गरजच मराठवाड्यात उरलेली नाही कारण नियोजनासाठी किती पाणी उपलब्ध आहे आणि त्याचे नेटके वितरण कसे करायचे हेच माहित नाही. ट्यंकर पाणी विकतात. ते कोठून पाणी आणतात? कोणते स्त्रोत वापरतात? तेथील साठ्यांची काय अवस्था आहे? त्या पाण्याच्या शुद्धीबाबत काही खात्री आहे काय? काही नाही.

क्यलिफोर्नियासारख्या जगातील सर्वात शेतीसधन राज्याची आजची अवस्था केविलवाणी आहे हे खरे, पण त्यांनी त्यावर कठोर उपाययोजनाही सुरु केल्या आहेत. दुष्काळ आमच्या पाचवीला पुजलेला असुनही आमचे डोळे अद्यापही उघडलेले नाहीत. क्यलिफोर्नियासारखा सलग दुष्काळ आमच्या वाट्याला आला तर महाराष्ट्र ओस पडेल याची खात्री बाळगा. सावध व्हा. स्वत: पाणी नियंत्रणात तर वापराच पण व्यापक जलधोरण असलेच पाहिजे व ते पाणीमाफिया, उसमाफियांच्या कचाट्यात जाणार नाही याची काळजी घ्या. पाण्यचा गैरवापर करणारे खरे देशद्रोही आहेत हेही लक्षात घ्या.

यंदाचा मान्सून तरी चांगला जाईल या आशेवर बसणे मुर्खपणाचे आहे. पावसाळा चांगला जाओ कि वाईट...आम्हाला जणू दुष्काळच आहे असे समजत पाण्याचे नियोजन करावे लागेत तरच दुष्काळी वर्षेही आम्ही धडपणे निभाऊन नेवू शकू व आमचे जल-भविष्य सुखकर राहील.


1 comment:

  1. राजकारण / समाजकारण करणारे मुळात सुविद्य हि नाही सुसंकृत हवेत तर देशाच्या- प्रदेशाच्या विकासाला गती मिळते

    ReplyDelete