Monday, May 23, 2016

किन्नरांचे बंड!



अलीकडेच महिलांनी संघर्ष करून त्यांना बंदी असलेल्या शनी शिंगणापुरमद्ध्ये चौथ-यावर जाण्याचा अधिकार मिळवला. याच आंदोलनाचे नेतृत्व करणा-या तृप्ती देसाई यांनी महिलांना बंदी घातलेल्या हाजी अली दर्ग्यातही प्रवेश केला. प्रश्न देवा-धर्माचा नव्हता तर लिंगभेदामुळे निर्माण केल्या गेलेल्या विषमतेविरुद्ध आवाज उठवण्याचा होता. आपले समतेचे अधिकार मिळवायचा होता. काही विजय मिळाले म्हणून हा समतेचा पुर्ण यशस्वी झाला असे म्हणता येणार नाही, कारंण अद्याप खूप अशा जागा आहेत जेथे जातीभेद, लिंगभेद कोणत्या ना कोणत्या बहाण्याने निरलसपणे राबवला जातो. धर्माच्या पुरुषी आणि जातीय सोयीने व्याख्या केल्या जातात. त्याला आव्हान दिले कि परंपरांकडे वा थातूर मातूर बनावट मिथकांकडे बोट दाखवले जाते. पण म्हणून जुन्या काळात अज्ञानामुळे चालल्या तशाच्या तशा प्रथा आधुनिक काळात चालू शकत नाही. वेडगळ प्रथांविरुद्ध बंड होतेच!

या शतकातले सर्वात मोठे बंड म्हणून तृतीयपंथीयांनी स्वत:चा "किन्नर आखाडा" स्थापन करुन उज्जैन येथील कुंभमेळ्यात २२ जुलै रोजी सुरू होणा-या शाही स्नानात भाग घेण्याची जी घोषणा केली आहे या घटनेकडे पहावे लागेल. या आखाड्याच्या उपक्रमाचे नेत्रूत्व  किन्नर नेता लक्ष्मीनारायण त्रिपाठी करत आहेत. २२ राज्यातील किन्नरांनी एकत्र येवून उज्जैन येथे या आखाड्याची स्थापना केली. या आखाड्याने स्वत:च ध्वजही निश्चित केला आहे.

पण सनातनी विरोधाखेरीज आपल्याकडे काही होते काय? अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महंत नरेंद्र गिरी यांनी किन्नर आखाड्याला मान्यता द्यायचेच नाकारले. लक्ष्मीनारायण त्रिपाठी त्यांची प्रतिक्रिया बोलकी आहे. ते म्हणाले, "हे कोण आमची मान्यता नाकारणारे? नरेंद्र गिरींनी संबंध नसलेल्या गोष्टींत लक्ष घालू नये. आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त तपस्वी आहोत! सिंहस्थात आमची स्नानव्यवस्था केली गेली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने ती करू!"

किन्नरांना आपल्या व्यवस्थेत अत्यंत दुय्यम स्थान आहे. त्यांचे मानवाधिकार हिरावले जातात. किंबहुना त्यांना मानवी व्यवस्थेत स्थानच नाही. अशा स्थितीत त्यांनी एकत्र येत आपले धार्मिक अधिकार मिळवण्यासाठी धाडसी पाऊल उचलावे, धर्माच्या ठेकेदारांना खुले आव्हान द्यावे हे एक बंडच आहे आणि त्याचे स्वागत करायला हवे.

याचा अर्थ असा नव्हे कि कुंभ म्हणजे काही अद्वितीय घटना आहे. ती तशी मानली जात असली तरी ती आजकालच्या माध्यमांतील अचाट प्रसिद्धीमुळे. मुळात हा पुरातन उत्सव नाही. एवढेच नव्हे तर तो धार्मिक उत्सव असल्याचेही जुने पुरावे मिळत नाहीत. रामायण-महाभारत या उत्सवाचा उल्लेख करत नाहीत. ह्यु-एन-त्संग याने सातव्या शतकात झालेल्या नाशिक येथील कुंभ मेळ्याचे वर्णन करुन ठेवले आहे. पुराणांतरी येणारी कुंभमेळा माहात्म्ये ही गुप्तकाळानंतरची, वैदिक माहात्म्य वढल्यानंतरची आहेत. वैदिक धर्माला राजाश्रय देणारे गुप्तच होते हा इतिहास आहे. एक वैदिक पुराकथा...कि अमृतमंथनानंतर झालेल्या अमृतकुंभाच्या मालकीवरुन झालेल्या देवासूर युद्धात विष्णुने मोहिनीरुप घेऊन कुंभ पळवला, तेंव्हा त्यातुन चार थेंब चार ठिकाणी नद्यांत पडले म्हणून त्या नद्या व स्थळे अतिपवित्र मानली जातात. त्या नद्या म्हणजे नाशिकची गोदावरी, प्रयाग येथील त्रिवेणी संगम, उज्जैनी येथील क्षिप्रा आणि हरिद्वार येथील गंगा. या प्रत्येक ठिकाणी कुंभमेळा दर तीन वर्षांनी क्रमाने भरतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणाची पाळी दर बारा वर्षांनी येते. यातही अर्धकुंभमेळा, महाकुंभमेळा व पुर्ण कुंभमेळा हे फरक आहेतच. महाकुंभमेळा दर १४४ वर्षांनंतर येतो तर दर बारा वर्षांनी येणारा पुर्ण कुंभमेळा फक्त प्रयाग येथेच भरतो.

अवैदिक परंपरेत सामुहिक स्नानांनाही वैदिक काळापुर्वीही धार्मिक/सांस्कृतिक महत्व होते हे आपल्याला सिंधू संस्कृतीत सापडलेल्या सार्वजनिक अवाढव्य स्नानगृहांवरुन दिसते. तेथे खाजगी घरांतील स्नानगृहे घराघरातही सापडलेली आहेत. घरात स्नानगृहे असतांनाही सार्वजनिक स्नानगृहेही असावीत याचा अर्थ त्यांचा संबंध धार्मिक कृत्यांशी असावा असे अनुमान करता येवू शकते.  सिंधुपुजनाचा "चाली हो" उत्सवही त्या प्रदेशातील नदीबाबतच्या कृतज्ञतेशी जोडता येतो. ब्रह्मपुत्रेचीही अशीच पुजा करण्याची पद्धत आहे. नद्यांचा आणि मानवी संस्कृतीचा निकटचा संबंध असल्याने कृतज्ञतेपोटी नदीतील स्थान आणि तिची पुजा याला महत्व आले असल्यास नवल नाही.

परंतू कुंभमेळा हा वेगळाच, तुलनेने अर्वाचीन प्रकार आहे. वैदिक धर्मसाहित्यातही या उत्सवाबाबत मौन अहे. शिवाय यात फक्त चार नद्यांना महत्व आहे. कुंभमेळ्याचा संबंध ग्रह-सुर्य व राशींशी निगडित आहे. उदाहरणार्थ नाशिक येथील कुंभमेळा सुर्य आणि गुरु सिंह राशीत असतील तेंव्हा भरतो. ही खगोलीय घटना आहे व ती नियमित येते. पण मुळात भारतियांना राशी ग्रीकांकडून मिळाल्या असे मानले जात असल्याने कुंभ मेळ्याची सुरुवात भारतियांचा संबंध ग्रीकांशी आल्यानंतर झाली असण्याची शक्यता आहे. किंवा पुरातन नदीमाहात्म्याला ग्रह-राशींशी जोडत त्याची उदात्तता वाढवली गेली असल्याचीही शक्यता आहे. असे असले तरी कुंभमेळ्याची परंपरा फार पुरातन नाही.

कुंभमेळ्यात देशभरातुन नागा साधुंसह विविध पंथोपपंथांचे साधु-साध्व्या, योगी येत असल्याने याचे धार्मिक महत्व वाढले आहे हे सहज लक्षात येईल. अन्य कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात एवढ्या संख्येने साधु-साध्व्या येत नाहीत. त्यामुळेच कुंभमेळ्याला दर्शन पर्वणी असेही मानले जाते. हा कोणत्या धर्म परंपरेचा भाग असे शोधले तर पदरी निराशाच येते. कुंभमेळ्याची सुरुवात वैष्णव परंपरेतुन सुरु झाली असावी असे अमृतमंथनाच्या पुराकथेतुन दिसत असले तरी कुंभमेळ्यात शैव व वैष्णव आखाडेही बरोबरीने सहभाग घेतात असे दिसते. यात शैव आखाड्यांची संख्या अधिक आहे.. एका अर्थाने हा उत्सव धार्मिक नसून सांस्कृतिक आहे हे उघड आहे.

हा उत्सव सांस्कृतिक म्हणा कि धार्मिक, पण लोकोत्सव असून नदी-जलाशयांप्रती कृतज्ञता दाखवण्याची ही एक पर्वणी आहे. नद्यांवर सर्वांचाच बरोबरीचा अधिकार आहे. याचा धर्माशी खरे तर काही संबंध नाही. नद्यांना घाण करत त्याच नद्यत डुबक्या मारु पाहणारे सर्वात अधिक असांस्कृतिक आहेत हेही येथे नमूद केलेच पाहिजे. पण तो एकूणातील सामाजिक संस्कृतीचा प्रश्न झाला त्यात आपण नापासच होणार हे बेगळे सांगायची गरज नाही. पण त्याहून मोठे असंस्कृती म्हणजे आपल्या समाजाच्या मनात साठलेली विषमतेची, लिंग व जातीभेदाची घाण.

आपण नद्या स्वच्छ करू शकू कि नाही हे माहित नाही. पण मनातील ही घाण तरी काढायला आपण आपल्याच आत्मडोहात डुबक्या मारुन पाहणार आहोत काय?

लक्ष्मीनारायण त्रिपाठी आणि त्यांचे सहकारी यांनी बंडाचा एक झेंडा फडकावला आहे. तृतीयपंथियांना कशाला हवेत धार्मिक अधिकार? असे अशिष्ट प्रश्न आताच विचारले जात आहेत. विविध आखाड्यांचे महंत आणि अखिल भारतीय आखाडा परिषदेचे नरेंद्र गिरी किन्नर आखाड्याला मान्यताच नाही असे म्हणत आहेत तर लक्ष्मीनारायण त्रिपाठी साहसाने म्हणतात, तुम्ही कोण आम्हाला मान्यता देणारे?

आणि हे खरेच आहे. हे कोण मान्यता देणारे? हे कोण धर्म आणि संस्कृती ठरवणारे? धर्माला अथवा संस्कृतीला नाकारुन धर्म बदलवता येत नाही. तृप्ती देसाईंनाही हे वावदूक सल्ले दिले जातच होते कि, बाई, शनीच नाकारा कि! प्रश्न शनी अथवा हाजी अली नाकारणे अथवा स्विकारणे असा नव्हताच. प्रश्न एखाद्या ठिकाणी, स्वतंत्र भारतात, महिला आहे म्हणून प्रवेश नाकारण्याचा कोणाला अधिकारच काय?

किन्नरांचा प्रश्न असाच आहे. तो आत्मभानाचा आणि आपले अस्तित्व मानवी पातळीवरच आहे हे दर्शवण्याचा आहे. त्यासाठी चक्क "किन्नर आखाडा" स्थापन करत धार्मिक समतेच्या पायावर "आम्हालाही शाही स्नानाचा अधिकार आहे" हे सर्वांना बजावून सांगण्याचे अलोट धैर्य किन्नरांनी, विशेषता: त्यांचे लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी दाखवले ही एक समतेच्या मार्गावरील एक ऐतिहासिक घटना आहे हे मान्य केलेच पाहिजे. किन्नरांच्या पाठीशी मानवतेच्या पातळीवर, समतेच्या पातळीवर सर्वांनी उभे राहिलेच पाहिजे.

किन्नर आखाड्याच्या शाही स्नानास शुभेच्छा!

1 comment:

  1. इतरत्र आपण म्हणता कि पुराण हेच अवैदिकांचे खरे साहित्य आहे, मग समुद्र मंथन पुराणातूनच आलेले आहे, शिवाय सिंधू लोकांची स्नानगृहे ह्यांचा आपल्या कुंभ मेळ्याशी काहीतरी संबंध आहेच. उष्ण दिवसात गाई, म्हशी, हत्ती हे पाण्यात डुंबतात हे पुरातन नैसर्गिक सत्य आहे त्याला वैदिक अवैदिक असा शिक्का लावणे चुकीचे वाटते. गुरु सिंह ह्या अग्नितत्वाच्या राशीला असताना उष्णता फार वाढते पाऊस कमी असतो म्हणून हे वर्ष धार्मिक विधीसाठी राखून ठेवले आहे. शिवाय सिंधू लोकांचे व्यापारी संबंध हे ग्रीक लोकांशी होतेच तेव्हाच ज्योतिष्य शास्त्राची देवाण घेवाण झालेली असू शकते. सिंधू लोक हे प्रगल्भ होते व विशेष म्हणजे शेतकरी होते म्हणजे त्यांना ऋतू नक्षत्र, पाऊस काल ह्यांची उत्तम माहिती असणारच, ज्योतीष्य शास्त्र हे ग्रीक वा वैदिकांनी दिले हे पटत नाही. असे असते तर आपल्याकडील शेतकरी मे महिन्यात पेरणी करून पावसाची वाट बघत बसला असता. आपल्या शेतकऱ्याने निदान महिन्याची नावे व त्यांची कालगणना तरी शिकलेली असणारच. नाहीतर शेती अशक्य आहे. निश्चितच आपले पूर्वज इतके अल्पबुद्धी नव्हते!

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...