Friday, February 10, 2017

वैदिकांचा सिंधू संस्कृतीशी संबंधच काय?

सिंधु-घग्गर खो-यांत झालेल्या उत्खननांत असंख्य लिप्यांकित व चिन्हांकित मुद्रा सापडलेल्या आहेत. ढोलावीरा येथे तर गांवाचा नामफलकही सापडलेला आहे. सिंधू लिपी वाचण्याचे आजवर अनेक प्रयत्न झाले आहेत. ती वाचल्याचे दावेही अनेकांनी केले आहेत. आर्य आक्रमण सिद्धांत मान्य असणा-यांनी या लिपीत द्रविड भाषा असल्याचा अंदाज बांधून ही लिपी उलगडायचा प्रयत्न केला. आक्रमक आर्यांनी सिंधू संस्कृतीच्या द्रविड लोकांना दक्षीणेत हुसकावले असे हा आर्य आक्रमण सिद्धांत मानतो. या सिद्धांताचा मोठा प्रभाव अजुनही खूप विद्वानांवर आहे. शिवाय ऋग्वेदात काही द्रविडियन शब्द उधारीत आले असल्याचाही एक दावा असल्याने हे खरे वाटणे स्वाभाविक होते. अस्को पारपोला व इरावथम महादेवन यांनी सिंधू मुद्रांवरील लिपी-चिन्हांत द्रवीड पुराकथा शोधण्याचा अनेक काळ प्रयत्न केला. त्यांची यावर काही पुस्तकेही आहेत. अर्थात त्यांचेही मत सर्वमान्य झालेले नाही.

वैदिकवादी विद्वानही या कार्यात मागे राहिले नाही. सिंधु-घग्गर संस्कृती ही वैदिक आर्यांचीच निर्मिती अशी त्यांची एकुणात मांडणी असल्याने त्यांनी त्यात नुसती वैदिक संस्कृत शोधली नाही तर ती लिपी वाचल्याचे दावेही केले. एन. एस. राजाराम व एन. झा यांनी असा दावा करत एक ग्रंथही लिहिला. त्यात त्यांनी २००० मुद्रांचे वाचन केल्याचे दाखवत काहीर मुद्रांवर वैदिक राजा सुदास, यदु, पुरु, कुत्स, राम आदींचा तसेच षडागमांचाही उल्लेख आहे तर बहुसंख्य मुद्रांवर नद्यांचे तर काही ऐहिक सामान्य उल्लेख आहेत असा दावा केला. याच ग्रंथात लेखकद्वयाने सिंधू संस्कृतीला घोडा माहित होता हे दाखवण्यासाठी एका बैलाचे चिन्ह असलेल्या मुद्रेच्या छायाचित्रावर संगणकीय छेडछाड (forgery) केली. ही बनावटगिरी करण्याचे कारण म्हणजे सिंधू संस्कृतीत घोडा असलयाचा एकही पुरावा नव्हता आणि वैदिक आर्यांचे संपुर्ण जीवन तर घोड्यांभोवती फिरते!  त्यामुळे सिंधू संस्कृतीत घोड्याचे अस्तित्व होते हे दाखवण्याची त्यांना निकड होती.

हे दावे वृत्तपत्रांत व पुस्तक (The Deciphered Indus Script-1999) प्रसिद्ध झाल्यावर जगभर खळबळ उडाली. कारण या शोधाने सिंधू संस्कृतीचा इतिहास नव्याने लिहिणे भाग होते. जगातील एका प्राचीन संस्कृतीची लिपी वाचणे हे असामान्य कार्य होते यात शंका नाही. पण राजाराम आणि झा यांचे दुर्दैव. हार्वर्डचे इंडोलोजिस्ट मायकेल विट्झेल आणि त्यांचे सहयोगी स्टीव्ह फार्मर यांनी झा व राजाराम यांची बदमाशी फ्रंटलाईनमद्ध्ये (आक्टोबर २०००) लेख लिहून उजेडात आनली. या लेखात त्यांनी वैदिकवाद्यांच्या बनावटगिरीवर कठोर टीका केली. राजाराम व झा यांनी मुळच्या तुटलेल्या अर्धवट एकशिंगी बैलाच्या मुद्रेला संगनकीय आधार घेत पुर्ण केले व तो बैल घोडा असल्याचे कसे दाखवले आहे हे त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध केले. (http://www.frontline.in/static/html/fl1720/17200040.htm या लिंकवर हा लेख उपलब्ध आहे.) यामुळे भारतीय विद्वत्तेची जगभर लाज निघाली.

हे येथेच थांबले नाही. एक निवृत्त पुरातत्ववेत्ते एम. व्ही. कृष्णराव यांनीही ही लिपी वाचल्याचा दावा केला. हा दावा विलक्षण होता. ते म्हणाले कि राम हा अयोद्ध्येत जन्मला नसून हरियाणात जन्मला, त्याने ब्यबीलोनवर स्वारी केली आणि हम्मुराबीला युद्धात हरवत त्याला ठार मारले. हम्मुराबी म्हणजेच रावण असा त्यांचा सिंधू मुद्रा वाचून (?) केलेला. या दाव्यांनी वैदिकवाद्यांना क्षणीक आनंद होत असला तरी यामुळे विद्वत्तेची लाज निघते, भारतीयांबाबत अविश्वसनीयता वाढीला लागते याचे भान नाही हे दुर्दैव होय.

मालती शेंडगे यांनी मात्र सर्वस्वी वेगळा सिद्धांत मांडला आहे. त्यांच्या मते सिंधू संस्कृती ही असूर संस्कृती होती. असिरियन ही पुरातन असूर सम्स्कृती असल्याने या संस्कृतीचे लोकच येथे येवून सिंधु संस्कृतीची निर्मिती केली असावी. त्यामुळे सिंधू मुद्रांवरील लिपीतुन व्यक्त होणारी भाषा ही अक्काडियन असली पाहिजे. (The Language of the Harappans: From Akkadian to Sanskrit By Malati J. Shendge)

स्टीव्ह फार्मर यांनी लिपी वाचल्याचा दावा केला नसला तरे त्यांनीही आपले मत व्यक्त केले. त्यांच्या मते सिंधू मुद्रांवर कोनतीही भाषानिदर्शक लिपी नसून ती धर्मिक, राजकीय कार्यासाठीची स्मृतीचिन्हे आहेत. संगणकाच्या मदतीनेही सिंधू लिपी उलगडायचा प्रयत्न झाला असून अद्याप त्यात कोनालाहे यश आले नाहे कारण कोणताही द्वैभाषिक लेख अद्याप मिळालेला नाही. शिवाय सिंधू मुद्रांवरील अक्षरेही कमी आहेत. आजवर स्वतंत्र असतील अशी ४१७ चिन्हे नोंदली गेलेली आहेत. पण एका मुद्रेवर किमान एक तर अधिकाधिक २६ चिन्हे आहेत. सरासरी एका मुद्रेवर पाच चिन्हे भरतात. चिन्हांची अल्पसंख्या असल्याने कोणते चिन्ह कोणता ध्वनी निर्देशित करते हे अद्याप समजलेले नाही त्यामुले स्वभाविकपणे भाषाही समजलेली नाही.

ही चिन्हलिपी अथवा चित्रलिपी हा भारतियांचा स्वतंत्र शोध होता कि ती कोठून तरी आयात झाली व सुधारित स्वरुपात वापरली गेली यावरही खूप खल झालेला आहे. परंतू इजिप्शियन अथवा चीनी चित्रलिपी किंवासुमेरियन चिन्हलिपीशीचे साधर्म्य अत्यंत वरवरचे असून सिंधू लिपी ही या मातीतुनच निर्माण झाली असे राज पृथी म्हणतात.

आर्य आक्रमण अथवा आर्यांचे भारतात आगमण हा सिद्धांत खरा जरी मानला तरी सिंधू संस्कृतीशी त्यांचा संबंध निर्माता म्हणून नाही हे अगणित पुराव्यांच्या आधारे सिद्ध होते. किंबहुना वैदिक आर्य हे सिंधू संस्कृतीतील जवळपास सर्वच बाबींशी अपरिचित होते असेच म्हणावे लागते. त्यासाठी आपण खालील महत्वाच्या बाबींचा व्बिचार करु.

१. डा. रा. ना. दांडेकर स्पष्टपणे म्हणतात कि सिंधु संस्कृतीचा धर्म हा मुर्ती/प्रतिमा पुजकांचा होता. लिंगपुजा, मातृपूजा ह या धर्माचा गाभा होता जो आजही हिंदू धर्माचा महत्वाचा भाग आहे. याउलट वैदिक धर्मियांचे आहे. ऋग्वेद अथवा कोनत्याही वैदिक साहित्यात प्रतिमा, मातृदेवतापुजेचा साधा उल्लेखही तर नाहीच पण प्रतिमापुजक व लिंगपुजेचा निषेधच केलेला आहे. (पहा,. ऋ. ७.२१.५, १०.९९.३ व यजुर्वेद ३२.३)

२.  वैदिक संस्कृतीही यज्ञ केंद्रित संस्कृती होती. कोणत्याही सिंधू मुद्रेवर यज्ञ अथवा त्याशी निगडित प्रतीके कोरलेली नाहीत.

३. वैदिक साहित्यात (ऋग्वेदात) वैदिक लोक कोठल्या दुरवरच्या प्रदेशांशी समुद्रमार्गे व्यापार करत असल्याचे कसलेही उल्लेख नाहीत. किंबहुना व्यापाराशी निगडित संज्ञाही ऋग्वेदात येत नाहीत. सिंधू संस्कृतीचे लोक मेसोपोटेमिया, इराण आदि सुदुर प्रदेशांशी समुद्र व खुष्कीच्या मार्गाने व्यापार करत होते याचे अगणित व सलग पुरावे उपलब्ध आहेत.

४. वैदिक लोक हे प्राधान्याने पशुपालक होते. ऋग्वेदात पशुधन वाढण्यासाठी अगणित प्रार्थना आहेत. त्यांना शेती माहित होती पण ती अत्यंत प्राथमिक पद्धतीची होती. नांगर या शब्दाला प्रतिशब्दही वैदिक भाषेत नाही. "नांगल" ह शब्द त्यांनी नांगरासाठी नंतर वापरलेला आहे जो प्राकृत भाषांमधून उसणा घेतलेला आहे. सिंधू-घग्गर संस्कृती मात्र शेती व व्यापारप्रधान होती. शेतीसाठी नद्यांवर बांध घालुन कालव्याने पाणी पुरवठा करण्याचे तंत्रही त्यांनी साधले होते. या कशाचाहे उल्लेख ऋग्वेदात येत नाही. येतो तो बांध फोडल्याचा, बांधल्याचा नाही.

५. ऋग्वेदात भाजलेल्या वीटांचा, वीटांनी बनवलेल्या रस्त्यांचा व घरांचा उल्लेख येत नाही. वैदिक साहित्यात भाजलेल्या वीटांचा उल्लेख सर्वप्रथम येतो तो यजुर्वेदात, तोही केवळ यज्ञवेदीसाठीच्या वीटांचा. नंतरच्या ब्राह्मणग्रंथांत मात्र वीटांचे उल्लेख विपूल असले तरी वैदिकांनी ग्रामांतच राहण्याचा आग्रह दिसतो. प्रसिद्ध इतिहासकार रामशरण शर्मा म्हणतात, "विशिष्ट आकारात भाजलेल्या वीटा हे हरप्पा सम्स्कृतीचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे जे कोणाही ताम्रयुगीन संस्कृतीला अभिमानास्पद वाटले असते. पण ऋग्वेदात बांधकाम साहित्य म्हणून ही वीटच माहित नाही असे दिसते." ब्रिटिश पुरातवविद सर मोर्टिमर व्हीलर म्हणतात, "उच्च तंत्र वापरुन बनवलेल्या धान्याच्या भव्य कोठ्या या त्या काळात अतुलनीय तंत्रज्ञानाचा प्रगत नमुना आहे. पण वैदिक लोक हे शहर-निवासी नसल्याने त्यांना अशा कोठ्यांची आवश्यकताच नव्हती." यावर रामशरण शर्मा म्हणतात कि मुळात ऋग्वेदात अशा धान्य कोठ्यांना शब्दच नाही. थोदक्यात वैदिक लोक सिंधू संस्कृतीचे निर्माते अथवा भाग जरी असते तर ऋग्वेदातुन या बाबी नोंदल्य गेल्या असत्या. पण तसे वास्तव नाही.

सिंधु संस्कृतीत सर्वजनिक स्नानगृहे तसेच सांडपाणी व्यवस्थापनही वास्तुरचनेचे जगातील श्रेष्ठ नमुने मानले जातात. त्यांचाहे उल्लेख अर्थातच ऋग्वेदात नाही.

६. वैदिक संस्कृती ही अश्वकेंद्री आहे. अश्वाच्या अर्चनेसाठी साठी एक सुक्त लिहिले गेलेले आहे (ऋ. १.१७१) अश्वमेध हा त्यांचा प्रिय यज्ञ आहे. रथ तर त्यांचे सर्वात प्रिय वाहन. अनेक व्यक्तीनामे अश्व व रथावरुन ठेवली गेलेली आहेत. असे असता सिंधू मुद्रांवर अश्व अथवा रथ याचे कोठेही चित्रण नाही. अश्व सिंधू संस्कृतीला माहित होता परंतू ते कृषीकेंद्रित असल्याने त्यांचे जीवब्न वृषभ केंद्री होते व वृषभांच्या असंख्य प्रतिमा मुद्रांवर तर मिलतातच पण खेळण्यांतही मृत्तिकेचे बैल असत.

७. सिंधू संस्कृती प्रसिद्ध आहे हे तेथील ताम्र व मिश्र धातुंच्या वस्तुंच्या, विविध अलंकारांच्या निर्मितीसाठी.  ऋग्वेदात अशी उत्पादन केंद्रे असल्याचे कोठेही दिग्दर्शन नाही.

८. सिंधू मुद्रांवर एकशृंगी प्राण्याच्या अनेक प्रतिमा मिळाल्या आहेत. या मिथिकल प्राण्याचे सिंधूजनांच्या भावविश्वात काहीतरे स्थान निश्चित होते अन्यथा त्याला तेवढे स्थान मिळाले नसते हे उघड आहे. हा प्राणी गेंडा असावा, युनिकोर्न नव्हे, असा तर्क काही वैदिकवादी देतात. पहिली बाब म्हणजे गेंडा ह प्राणी सडपातळ नसतो. आणि रामशरण शर्मा म्हनतात, गेंडा किंवा खड्ग ही संज्ञा गेंड्यासाठी अथवा एकशिंगी प्राण्यासाठी नंतरच्या सम्स्कृतमद्ध्ये वापरली जाते, परंतू ऋग्वेदात या प्राण्याचा अथवा या तदनिदर्शक सज्ञांचा उल्लेख नाही. वैदिक लोक सिंधू संस्कृतीचे थोडातरी अंश असते तर सिंधुजनांच्य भावविश्वातील हा गुढ प्राणी ऋग्वेदात आला असता, पण तसे झालेले दिसत नाही.

९. ऋग्वेदावरुन कळते कि वैदिक आर्य ही एक युद्धायमान जमात होती. टोळी जीवनात हे स्वाभाविकच म्हणता येईल. ऋग्वेदात विविध शस्त्रे, चिलखते यांचे वर्णन सातत्याने येते तसेच युद्धांचेही येते. निर्विवाद बाब अशी आहे कि सिंधू संस्कृती ही शांतताप्रधान होती. सिंधू संस्कृतीत शस्त्रास्त्रे अथवा चिलखतांचे साठे अत्यंत कमी प्रमाणत मिळुन आले आहेत. एवड्घेच नव्हे तर युद्धायमान लोकांचा देवही युद्धप्रेरक असतो. वैदिकांनी तो देव इंद्रात पाहिला. परंतू सिंधु लोकांचा देव मात्र सुफलतेशी (सर्जनाशी)  निगडित आहे. शस्त्रास्त्रे घेतलेल्या एकाही देवतेचे अथवा माणसाचे चित्रण सिंधू मुद्रांवर मिळत नाही.

१०.  वैदिक लोक सातत्याने धनाभिलाषेने पिडित दिसतात. पशुधन हेच त्यांचे महत्वाचे धन आहे. ऋग्वेदातील बव्हंशी प्रार्त्थना या पशुधनाच्या सम्मृद्धीसाठी  आहेत. याउलट सिंधू संस्कृती ही कृषी-व्यापारकेंद्री व धनाढ्य संस्कृती होती. ते चित्रण मात्र ऋग्वेदात नाही. त्यामुळेही वैदिकांचा सिंधू संस्कृतीशी काहे संबंध असल्याचे दिसत नाही.

११. सिंधू संस्कृतेचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तेथे सापडलेल्या असंख्य मुद्रा व त्यावरील लिपी. या मुद्रांचा उल्लेख ऋग्वेदात तर नाहीच पण लिहिणे व लिपी यासाठी ऋग्वेदात कोणता शब्दच नाही. याचे कारण असे कि पुढेही खूप काळ वैदिक लोक लिपीपासून अनभिज्ञ होते.

१२. सिंधू संस्कृतीला बंदरे (लोथलसारखी कृत्रीम बंदरेही) माहित होती. परंतू अशा कोणत्याही प्रकारच्या बंदरांचा उल्लेख ऋग्वेदात नाही. किंबहुना त्यांना समुद्र तरी माहित होता का यावर विद्वानांत विवाद आहे. ऋग्वेदात समुद्र हा शब्द मोठ्या जलाशयांना उद्देशुन वापरला आहे हे काही ऋचांवरुन स्पष्ट होते.

१३. ऋग्वेदात दास-दस्युंची पुरे इंद्राने उध्वस्त केल्याचे अनेक वर्णने येतात. यावरून सिंधू संस्कृतेचा नाश आर्यांनीच केला असला पाहिजे असा एक मतप्रवाह पुर्वी होता. सिंधू संस्कृतेत सापडलेल्या उध्वस्त शहरे त्यांना या सिद्धांतासाठी कामाला आली. हा ढिसूळ पुरावा घेऊन एवढा मोठा सिद्धांत मांडणे हा अविचारच होता कारण पाच लाख चरस किलोमीटर परिसरातील यच्चयावत खेडी आणि शहरे एकाच वेळीस उध्वस्त करणे हे आर्यांना शक्यच नव्हते. असो. महत्वाचा पुरावा आपल्याला ऋग्वेदच देतो. जे शहरे इंद्राने उध्वस्त केली असे म्हटले आहे ती :"अश्मनमयी" ( ऋ. ४.३०.२०) किंवा "आयसी" (ऋ. २.२०.८, ४.२६.३) होती म्हणजेच पाषाणांची अथवा धातुची (धातुसारख्या कठीण पाषाणांची) होती. सिंधू संस्कृतीतील घरे अथवा तटबंद्या भाजक्या वीटांच्या होत्या, पाषाणांच्व्ह्या नाही. उलट अफगाणिस्तानात सापडलेल्या ब्यक्ट्रिया-मार्जिआना आर्किओलोजिकल कोम्प्लेक्स म्हणून ओळखल्या जाणा-या ऋग्वेदकालीन संस्कृतीत सापडलेली घरे पाषाणांची आहेत. ऋग्वेद बहुदा त्या पुरांबाबत बोलत असावा. सिंधू नगरांबद्दल नक्कीच नाही. शिवाय दास-दस्यू हा अफगाणुइस्तानातीलच समाज होय. त्याबदल सविस्तर पुढे.

१४. सिंधू संस्कृतीचे लोक सुती वस्त्रे विणत, रंगवत व वापरतही. त्यांची निर्यातही केली जात असे. ऋग्वेदाला मात्र कापूस माहित नाही व अर्थातच सुती वस्त्रेही. वैदिक लोक लोकरीपासून बनवलेली वस्त्रे वापरत असत.

वरील मुद्द्यांवरून एक बाब स्पष्ट होते ती ही कि वैदिक लोकांचा सिंधू संस्कृतीशी दुरान्वयानेही संबंध नव्हता. त्यामुळे वैदिक भाषा सिंधूजनांची भाषा असणे शक्य नाही. स्वाभाविकच तेथील मुद्रांवर वैदिक भाषा शोधण्याचा प्रयत्न चुकीच्या दिशेला नेतो. अर्थात असे असले तरी वैदिक संशोधक गप्प बसले नाही. ऋग्वेदात सिंधू संस्कृतीच्या एकाही महत्वाच्या वैशिष्ट्याचा मागमुस नाही हे लक्षात आल्यावर (किंवा इतर विद्वानांनी आणून दिल्यावर) त्यांनी ऋग्वेदाचाच काळ सिंधूपुर्व असल्याचा नवा "शोध" पुढे आणला. या नव्या शोधानुसार ऋग्वेदाचा काळ हा इसपू ३१०० किंवा त्याही पुर्वीचा ठरवण्याचा घाट घातला गेला. या प्रयत्नांत एस. कल्यानरमण, श्रीकांत तलागेरी हे भारतीय तर निकोलस कझानास हे ग्रीक पुरातत्वविद आघाडीवर आहेत. ऋग्वेदरचना पुर्ण झाल्यानंतर वैदिकांनी सिंधू संस्कृती उभारणी सुरु केली असा त्याचा मतितार्थ होतो. हा दावा दुर्लक्ष करता येण्यासारखा असला तरी बुद्धीभेद कसा केला जातो हे पाहण्यासाठी याही दाव्याचा परामर्श घ्यायचा प्रयत्न करुयात.

घोडा आणि आ-यांचे रथ यामुळे आर्य युद्धकौशल्यात आघाडीला पोहोचले, त्यांची गती वाढली व त्यामुळेच ते अनेक प्रदेश काबीज करू शकले असा दावा आर्य आक्रमक सिद्धांतकांकडून नेहमी केला जातो. किंबहुना आर्यांचे (किंवा आर्य-भाषकांचे) मुलस्थान हे घोडा आणि आ-यांच्या रथांच्या दफनस्थळांशीच निगडित राहिलाय व त्यांच्या आक्रमणाचे मार्गही त्याच आधारावर रेखाटले गेलेले आहेत. या रथांना मायकेल विट्झेल "वैदिक ट्यंक" म्हणतो व या धडाडत्या बेगवान रथांच्या आवाजानेच हरप्पा निवासी कसे घाबरुन गेले असतील याचे काल्पनिक वर्णन करतो. आर्य सिद्धांत काय आहे, त्यात कितपत तथ्य आहे ते आपण पुढे पाहुच, पण येथे हे मान्य केलेच्घ पाहिजे कि वैदिकांच्या जीवनात अश्व आणि रथांचे महत्व मोठे होते.

प्रश्न असा होता कि सिंधुजनांना अश्व माहित होता कि नाही हा. बैलगाड्यांचे प्रतिकात्मक अवशेष मिळाले असले तरी रथ म्हणता येईल अशा वाहनांचे मात्र अवशेष मिळाले नाहीत. जे अवशेष मिलालेत ते इसपू पंधराव्या शतकानंतरचे आहेत. अश्व म्हणावा तर तोही सिंधुजनांच्या जीवनपद्धतीत त्याचे महत्व दिसत नाही. असते तर मुद्रांवर त्याचेही चित्रण मिळाले असते. असे असले तरी त्यांना अश्वच माहित नव्हता हेही विधान करता येत नाही. उत्खननांत घोड्याचे अवशेष मिळाले आहेत. फक्त ते वेगळ्या प्रजातीचे आहेत. (पहा एडविन ब्रायंट) शिवाय सिंधूजन हे हाडाचे व्यापारी होते. सिंधू परिसरात घोड्यांची पैदास होत नसली तरी ते सुदूर व्यापार करत असल्याने घोडे असलेल्या मानवी समौदायांच्या संपर्कात होतेच. त्यांनी घोडे, गरज असती तर, आयातही केले असते. भारत मोगल काळापर्यंत (आणि रेससाठी आजही) तसाही घोड्यांचा आयातदार देश आहे हे आपल्याला माहितच आहे.

पण सिंधू मुद्रांवर पुर्ण व अवशेषांत घोड्यांचा बव्हंशी अभाव वैदिकवाद्यांना खटकत होता. एन. एस. राजाराम व झा यांनी त्यासाठी घोड्याची एक बनावट मुद्रा बनवली हे आपण या प्रकरणात पाहिलेच आहे. निकोलस कझानास यांनी “Rigveda is pre-Harappan” (June 2006) हा लेख लिहून ऋग्वेद हरप्पापुर्व आहे हे सिद्ध करण्यासाठी अनेक दावे केले. अन्य विद्वानांचे बव्हंशी हेच मत असल्याने आपण या लेखातील मुद्द्यांचच परामर्श घेऊयात.

पहिली बाब म्हणजे कझानास मान्य करतात कि सिंधू संस्कृतीची कोणतीही वैशिष्ट्ये ऋग्वेदात दिसत नाहीत. खरे तर याचा अर्थ मुळात ऋग्वेद रचना येथे झालीच नाही असा अर्थ घेण्याऐवजी त्यांनी "ऋग्वेद ही भारतातीलच, पण हरप्पापुर्व रचना आहे असा घेतला. संघवादी बहुतेक संशोधकांना हा दावा मान्य आहे कारभ्ण सिंधू संस्कृती ही वैदिक आर्यांचीच निर्मिती होय हे त्यांना सिद्ध करायचेय.

कझानास म्हनतात ऋग्वेदिक आर्यांना वास्तव जीवनातला रथ माहितच नव्हता. त्यांचे प्रत्यक्ष माहित असलेले, वापरले जाणारे वाहन जे होते ती बैलगाडी होती. या बैलगाड्यांची चाके भरीव असून आ-यांच्या चाकांचा शोध त्यांना लागलाच नव्हता! ऋग्वेदात येनारा "अर" हा शब्द एकतर ऋग्वेदातील नंतरची भेसळ आहे किंवा "अर" शब्दाने आरे नव्हे तर काही वेगळेच, म्हणजे भरीव चाकाचा एखादा भाग, म्हणायचे असेल. रथांची वर्णने एकतर काल्पनिक आहेत किंवा रथ या शब्दाने वैदिक आर्यांना "बैलगाडी"च सुचवायची आहे.

येथे कझानास आक्खा ऋग्वेद उलटापालट करत आहेत हे उघड आहे. ऋग्वेदात वेगवान रथ, आ-यांची हलकी चाके व घोड्यांचे विपूल उल्लेख आहेत. मुळत ऋग्वेद "रथ" आणि "अनस" यात फरक करतो. अनस म्हणजे गाडी. ऋग्वैदिक रथ सुमेरियन, इजिप्शियन अथवा अंड्रोनोवो संस्कृतीच्याच रथांसारखे दिसत असतील असे नाही. ऋग्वेदात दोन चाकांच्या रथाबरोबरच अश्विनींच्या तीन चाकांच्या रथाचाही उल्लेख आहे. (ऋ. १.२०.३) आ-यांचे रथ आर्यांनी शोधले असा दावा आर्य निर्गमन सिंद्धांतक करत असतात. इसपू २००० मधील आ-यांच्या चाकांच्या रथांची अश्वांसहितची दफने अम्ड्रोनोवो संस्कृय्तीत सापदली आहेत. रथांचा इतर संस्कृत्यांतील प्रसार हा यानंतरच किंवा समांतर झाला असेल. ऋग्वेद हरप्पापुर्व ठरवायचा व वैदिकांना रथ माहित होते असेही मान्य करायचे तर मग सिंधू संस्कृतीवर मालकी संगता येत नाही, केवळ म्हणून वैदिक रथ म्हणजे भरीव चाकांच्या साध्या गाड्या होत्या असे म्हणने भाग आहे. पण समस्या ही आहे कि मग हे रथ (म्हणजे गाड्या) वेगवान कशा होणार व युद्धात वेगवान हालचाली करायला कोठून कामी येणार? तेंव्हा वैदिकांना ऋग्वेदकाळात रथ अथवा आ-यांची चाके माहित नव्हती हे विधान अत्यंत धाडसी आहे हे उघड आहे. आ-यांची चाके सिंधू संस्कृतीलाही माहित असल्याचे पुरावे मिळालेत, पण ते इसपू २६०० ते इसपू १९०० या काळातील आहेत. म्हणजे सिंधू संस्कृतीच्या समृद्धीच्य काळातील आहेत. तत्पुर्वीचे किंवा समांतर काळातील अनेक पुरावे हे भरीव चाकांचेच आहेत. त्यामुळे ही बाब ऋग्वेद हरप्पापुर्व व भारतीय ठरू शकत नाही.

ऋग्वेदाला नागरी जीवन माहित नाही, भाजलेल्या वीट माहित नाहीत, कापूस माहित नाही वगैरे कझानास मान्य करतात, पण हे कारण ते ऋग्वेद हरप्पापुर्व आहे हे सिद्ध करण्यासाठी देतात. "पूर" म्हणजे वास्तवातील नगर हेही ते अमान्य करतात. ते म्हणतात "पूर" म्हणजे नगरच असा अर्थ घेता येत नाही,. ते चक्क म्हणतात कि “This is a very general misconception. In the RV pur never means anything other than an occult, magical, esoteric defense or stronghold which is not created nor ever destroyed by humans.” (ऋग्वेदातील पुर याचा अर्थ कधीही "नगर" असा होत नाही तर माणसांनी न बंधलेली गूढ संरक्श्ढनात्मक काल्पनिक बांधकामे आहेत.)

आता समजा वैदिकांना शहरे माहितच नव्हती याचा अर्थ मुळात ते हरप्पापुर्व होते हे कशावरुन? नागरी संस्कृत्या असलेल्या आणि ग्रामजीवन जगणा-या संस्कृत्या एकाच काळात समांतर असू शकतात. वैदिक लोक हे ग्रामांत (विश) राहणे ब्राह्मणकाळापर्यंत पसंत करत व नागरी निवास टाळत असे निरिक्षण तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी वैदिक संस्कृतीचा इतिहास मद्धे नोंदवले आहे. ऋग्वेदकाळार्तही वैदिक लोक खेड्यांतच राहत असत. पण त्यांना नगरे माहित नव्हती हे विधान पुराव्यांनीच खोडले जाते. वैदिकांना शंभर द्वारे असलेल्या तटबंदीचे पुरही माहित होते जे इंद्राने उध्वस्त केले. (ऋ. १०.९९.३). अशा अनेक पुरांचे वर्णन ठायीठायी ऋग्वेदात मिळते. ही वर्णने काल्पनिक नाहीत. किंबहुना ऋग्वैदिकांचा संघर्ष हा शहरवासियांशी होता हे स्पष्ट आहे. विश म्हनजे खेडे व पुर म्हणजे नगर हा फरक वैदिकांना समजत होता. त्यामुळे वैदिकांना पुरे माहितच नव्हती व ती काहीतरी काल्पनिक बाब होती म्हणून एवतेव ऋग्वेद हरप्पापुर्व आहे  हा दावा टिकत नाही.

कझानास म्हणतात कि इसपू १९०० मद्ध्ये हरप्पन लोकांनी शहरी वस्त्या सोडायला सुरुवात केली. जर वैदिक आर्य आक्रमक असते तर त्यांनी उध्वस्त नगरांचे उल्लेख केले असते. बरोबर आहे. पण ते जर सिंधू संस्कृतीचे भाग असते, तर एवढी मोठे संस्कृती उभारली जात असल्याचेही वर्णन वैदिक साहित्यात आले असते. एव्हढेच नव्हे इसपू १९०० च्या आसपास पर्जन्यमान कमी झाल्याने, व्यापार थांबल्याने झालेल्या उत्पाताचे वर्णन तर येणे अपरिहार्य होते. थोडक्यात सिंधू संस्कृतीचे उत्थान व पतनाचा आलेख ऋग्वेदानंतरच्या वैदिक साहित्यात नक्कीच डोकावला असता कारण उत्थान ही जशी असामान्य बाब होती तसेच पतनही वेदनाकारक होते. एका संपन्न वैभवशाली संस्कृतीतेल जीवन उभारत नंतरची विपन्नावस्थेकडील वाटचाल, तो संघर्ष आणि वेदना याचे साधे प्रतिबिंबही वैदिक साहित्यात उमटत नाही. थोडक्यात वैदिक लोक सिंधू संस्कृतीचे कधीच भाग नव्हते.

ऋग्वेदाला हरप्पापुर्व ठरवण्याचे अजून एक कारण आहे. ते म्हणजे तसे केले कि ऋग्वेदाचा सध्याचा जो मान्य काळ आहे, इसपू १५००, तो अजून दिड हजार वर्षांनी मागे नेत ऋग्वेदाची प्राचीनता सिद्ध करता येत होती. सिंधू संस्कृतीचे जनकत्वही घेण्याचा प्रयत्न यातून होत आहे. पण आपण वरील पुराव्यांचे विश्लेशन केले असता हा प्रयत्य्न म्हणजे पुराव्यांची मोडतोड करत, जे ऋग्वेदात नाही ते ऋग्वेदावर थोपवत एक बनावट सिद्धांत जन्माला घालायचा आहे...राजाराम ब झा यांनी सिंधू मुद्राच बनावट बनवण्याचा घाट घातला तसा.

असो. वरील बाबी लक्षात घेता जर्व वैदिकांचा संबंधच सिंधू संस्कृतीशी नाही तर तेथील मुद्रांवर असलेली भाषाहे वैदिक संस्कृत असू शकत नाही हे उघड आहे. ऋग्वेदात जसे सिंधू संस्कृतीचे एकही वैशिष्ट्य दृगोचर होत नाही तसेच सिंधू संस्कृतीतही वैदिक संस्कृतीचा लवलेशही आढळून येत नाही. हीच बाब आर्य आक्रमण सिद्धांतालाही लागू होते हेही लक्षात ठेवायला पाहिजे. ऋग्वेदात किंवा इतर वैदिक साहित्यात अशा व्यापक आक्रम्नणचा अथवा स्थलांतराचा कोठेही उल्लेख नाही. सिंधू संस्कृती आक्रमक आर्यांनी नष्ट केली हा सिद्धांत कधीच कालबाह्य झालेला आहे. सिंधू संस्कृती नष्ट झाली नाही तर बदलत्या स्थितीशी जुळवून घेत पुढेही वाटचाल करतच राहिली. आक्रमण अथवा व्यापक स्थलांतर झालेच नसल्याने एतद्देशियांवर भाषा अथवा संस्कृती लादण्याचाही प्रश्न येत नाही. मग सिंधू संस्कृतीची भाषा काय असू शकेल याचा आपल्याला अत्यंत नव्या दृष्टीकोणातून विचार करावा लागणार आहे.

No comments:

Post a Comment