Saturday, February 18, 2017

शिक्षणाची मालकी विद्यार्थ्याकडे!


Image result for education in future


भविष्यात शिक्षणपद्धती कोणती वळणे घेत आहे हे पाहणे येथे महत्वाचे आहे. म्हणजे आपण आज कोठे आहोत आणि आपल्याला त्या दिशेने विचार करण्याची आजच आवश्यकता का आहे हे आपल्याला समजणार नाही. जोपर्यंत विचारप्रक्रिया सुरू होत नाही तोवर कृतीचीही शक्यता नाही हे उघड आहे.

आज जगभर जी शिक्षण पद्धती आहे तीत क्लासरुम्स, ग्रंथालये, प्रयोगशाला, अभ्यासक्रम, परिक्षा, ग्रेड्स वगैरेंचा समावेश असतोच. यातील दर्जा कमीअधिक असेल, पण मुलभूत संरचना अशाच प्रकारची असते हे आपल्या लक्षात येईल. आपण यातही दोन-तीन दशके मागे आहोत हा भाग आहेच. पण भविष्यात शाळाच राहणार नाहीत अशी व्यवस्था येवू पाहते आहे. याचे कारण म्हणजे, शाळा कितीही चांगली असली तरी विद्यार्थ्याची मानसिकता एका साच्यातील कशी बनेल हे सध्याची शिक्षण व्यवस्था पाहते. मानवी स्वातंत्र्याचा यात संकोच होतो अशी चिंता नीतिविद करत असतात. काही अंशी ते खरेही आहे.

भविष्यातील शिक्षण हे वेगवेगळ्या वेळेत, वेगवेगळ्या ठिकाणी व वेगवेगळ्या माध्यमांतुन उपलब्ध असेल. म्हणजे शाळेत जायची गरजच असणार नाही. परिक्षा कधी द्यायची याचेही बंधन विद्यार्थ्यावर असनार नाही. तो आपला अभ्यासक्रम स्वत:च तयार करेल. म्हणजे कोणत्या विषयात आपल्याला प्राविण्य मिळवायचे आहे आणि कोठवर हे स्वातंत्र्य प्रत्येक विद्यर्थ्याला असेल. थियरी व प्रात्यक्षिके हे सर्व विद्यार्थी खुल्या जगात शिकेल. यामुळे विद्यार्थ्याची आकलन शक्ती व स्वनिर्मित अभ्यासक्रम असल्याने त्यात तज्ञ व्हायची आस अधिक वाढेल असे शैक्षणिक मानसशास्त्र सांगते. थोडक्यात ठराविक शिक्षक व ठराविक अब्यासक्रम या जोखडातून विद्यार्थ्याची मुक्तता होईल.

ही एक प्रकारे स्व-शिक्षण प्रक्रिया असेल. इंटरनेटमुळे विद्यार्थ्याचे शिक्षक राज्यात, देशात वा जगभरात कोठेही असू शकतील. ते कितीही असू शकतील. विद्यार्थी इंटरनेटच्या माध्यमातून शिक्षकांच्या संपर्कात राहत त्याच्या अडचणी अधिक सुकरतेने सोडवू शकेल. स्व-शिक्षण प्रक्रियेत अमुकच कालात अमूक साध्य झालेच पाहिजे हा घोषा नसल्याने जोवर आकलन नाही तोवर विद्यार्थी परिक्षा देणार नाही. सामान्य कुवतीच्या विद्यार्थ्यासाठी जसे हे उपयुक्त ठरेल तसेच असामान्य बुद्धीमत्तेच्या विद्यार्थ्याला कमी कालात अधिकाधिक प्रगती करत पुढच्या पाय-या ओलांडणे सोपे जाईल. थोडक्यात या पद्धतीत व्यक्तिगत प्रेरणा व कुवतीच्या मुल्यांकनाला महत्व येत विद्यार्थी हा जास्त स्पर्धात्मक होत बौद्धिक व म्हणुनच ऐहिक प्रगती साधण्यास सक्षम होईल.

यात आपल्याला कोनती शिक्षण पद्धती जास्त योग्य आहे हे ठरवता येणे विद्यार्थ्यालाच शक्य असल्याने तो आपल्या निवडीप्रमाणे शिक्षणपद्धती ठरवू शकेल. तसे निवडीचे असंख्य पर्याय त्याला शिक्षणाचेच जागतिकीकरण झाल्याने सहज उपलब्ध होतील. तंत्रज्ञानातील भविष्यातेल आघाडीमुळे भाषा हाही प्रश्न महत्वाचा राहणार नाही. अगदी झुलू भाषिक प्राध्यापकही चक्क मराठीत शिकवत असेल. किंबा येथील कोणी प्राध्यापक एकाच वेळेस सर्व जागतिक भाषांत शिकवू शकेल. थोडक्यात भाषा हा अडचणीचा विषय राहणार नाही. अमूक भाषा आलीच पाहिजे तरच प्रगती होते या समजातून तसेही जग हळुहळु बाहेर पडत आहे. 

अभ्यासक्रम स्वत: विद्यार्थ्यानेच ठरवणे हा या शिक्षण पद्धतीतील कळीचा मुद्दा असेल. आपल्याला काय शिकायचे आहे हे निश्चित करुन विद्यार्थी आपापला अभ्यासक्रम ठरवू शकतील. कोणती साधने वापरायची हेही तोच ठरवेल. कोणत्या स्कुल/कोलेजच्या त्या विषयातील online परिक्षा द्यायच्या हेही तोच ठरवू शकेल. विद्यार्थ्यांच्या मुल्यांकणाची पद्धत हीच मुलात विद्यार्थ्याला विशिष्ट विषयाचे कितपत आकलन झाले आहे यावरुनच होणार असल्याने ख-या अर्थाने सुबुद्ध विद्यार्थी यातून घडू शकतील.

आता जग हीच शाळा बनल्याने जेथे आवश्यक आहे तेथे फिल्डवर्क करत विद्यार्थ्याला प्रत्यक्षानुभव घेणेही सोपे जाईल. उदाहरनार्थ इंजिनियर अथवा ब्यंकर ज्याला व्हायचे आहे तो कारखान्यांत किंवा ब्यंकांत जाऊन प्रात्यक्षिके घेऊ शकेल. तशा तरतुदी सरकारे करतील अशी अपेक्षा या शिक्षणपद्धतीत आहे. चांगल्या शालेत अथवा विद्यालयात प्रवेश हा आज एक मोठा प्रश्न बनला आहे. अनेक शाखांचे शिक्षण देणारी विद्यालये आपल्या परिसरांत असतातच असे नाही. असली तरे प्रवेशाचे क्रायटेरिया असे असतात कि अनेकांना त्यापासून मुकावे लागते. या नच्व्या शिक्षण पद्धतीत या अडचणी राहणार नाहीत. 

गणित ही एक आवश्यक बाब मानली जाते. अनेक विद्यार्थ्यांचे गणिताशी शत्रुत्व असते. पण भविष्यात तसे होनार नाही. कारण गणित येते कि नाही हा प्रश्नच उरणार नसून गणिती क्रिया संगणकावर करून जी आकडेवारी समोर येते तिचे सांखिकीय विश्लेशन करण्याची क्षमता असणे हेच महत्वाचे मानले जाईल. अनावश्यक, सहजी उपलब्ध असणा-या गोष्टे शिकण्यात वेळ घालवण्यापेक्षा बुद्धीपुर्वक विश्लेशन करण्याची क्षमता भविष्यात महत्वाची मानली जाईल. आजही आहे. पण आज विश्लेशनकर्त्यांची वानवा आहे हे आपण पाहतोच. हीच बाब विज्ञानालाही लागू पडते. किंबहुना आजच्या शिक्षण पद्धतीमुळे व करियरबाबतच्या भ्रामक संकल्पनांमुळे आपण अनेक शास्त्र शाखांतील विद्वानांना मुकत आहोत हे आपल्या लक्षातही येत नाही. 

आज विद्यार्थी परिक्षांसाठी राब राब राबतात. पाठांतरे करत बसतात. क्लासेस लावतात. पण परिक्षा झाली कि दुस-या दिवशी सर्व विसरून जातात हा केवळ भारतीयच नव्हे तर जागतिक अनुभव आहे. शाला-कोलेजात शिकलेले किती विषय त्याच्या भावी जीवनात कामाला येतात हा तर एक फार मोठा गहन प्रश्न आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला त्याच्याच आवडीच्या क्षेत्रात त्यालाच त्याचा अभ्यासक्रम तयार करू देत स्पर्धात्मक गुणवत्ता तपासण्याच्घी संधी द्यावी असा जोरकस मतप्रवाह येतो आहे. विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता तपासण्याचे परिक्षा (प्रश्नोत्तरे) हे योग्य माध्यम नाही असे आता बहुतेक शिक्षण तज्ञ म्हणत आहेत. परिक्षांमुळे विद्यार्थी जेंव्हा प्रत्यक्ष नोकरीला लागतो अथवा व्यवसायात जातो तेंव्हा त्या कामाला लायक आहे कि नाही हे आताची परिक्षा पद्धत ठरवू शकत नाही अथवा भविष्यही वर्तवू शकत नाही. क्षमता व परिक्षेतील मार्क यांची सांगड घालणे अवैज्ञानिक आहे यात शंका असण्याचे कारण नाही. पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष ज्ञान हा भविष्यातील शिक्षणाचा मुलमंत्र बनणार आहे. 

शिक्षण फुकट कि विकत, सरकारी कि खाजगी हा प्रश्न मुळात दुय्यम असून शिक्षण कसे दिले जाते व गुणांकणासाठी कोणती पद्धत वापरली जाते हे अधिक महत्वाचे आहे. बाकीचे मुद्दे व्यावहारिक असून ते सरकारने व समाजाने सोडवायचे आहेत. वर आपण भविष्यातील शिक्षण पद्धती कशी असेल हे पाहिले. अजुनहे काही मुद्दे आहेत ते आपण नंतर पाहुच. पण येथे सांगायचा मुद्दा हा कि शिक्षणाची मालकी पुढे सरकार अथवा शिक्षण संस्थांकडे राहणार नसून चक्क विद्यार्थ्याकडेच जाणार आहे. आणि हे होणे सुसंस्कृत समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला सुबुद्ध पिढ्या घडवायच्या असतील तर शिक्षणातील विद्यार्थ्याचे स्वातंत्र्य नाकारण्यात फार मोठी चूक होईल. यात अनेक उपप्रश्नही उपस्थित केले जातील याची मला कल्पना आहे. त्यांचाही परामर्श आपण पुढील लेखांत घेत राहू! येर्थे थोडक्यात सांगायचे म्हणजे शिक्षणाची मालकीच पुर्ण बदलत विद्यार्थ्याकडे नेणे हे अत्यावश्यक पहिले पाऊल आहे. 

-संजय सोनवणी
९८६०९९१२०५

(Published in dainik Sanchar, Indradhanu supplement)

3 comments:

  1. खूपच छान व उपयुक्त लेख आहे सर...

    ReplyDelete
  2. शांतीनिकेतन विश्व् भारती असे प्रयोग इथे भारतात झाले आहेत अतिशय तरल विचार असलेले रवींद्रनाथ स्वतः या संस्थेत लक्ष घालत असत पण आज अशा संस्थेला जागतिक स्तरावर काय मान आहे ?
    आजही हार्वर्ड आणि केम्ब्रिज ऑक्सफर्ड यांना आज जगात जो मान आहे तो कशालाच नाही .
    शिक्षण म्हणजे काय ? या कल्पना वेळोवेळी बदलत गेल्या आहेत टिळक आगरकर काळात राष्ट्रीय शिक्षण महत्वाचे होते . त्यापूर्वी इंग्रजांना कारकूनांचे तांडे निर्माण करायचे होते , स्वातंत्र्यानंतर ब्यांका एलआयसी आणि सरकारी मध्यमवर्ग यासाठी बीकॉम बीए लाट होती . एक ठरावीक वर्ग आर्थिक दृष्ट्या स्थिरस्थावर झाल्याशिवाय नवीन शैक्षणिक प्रयोग करू शकणार नाही - धजावणार नाही !
    आपण म्हणता तशी लक्झरी अजूनतरी भारताला परवडणारी नाही !!!
    आज आपण एका जागतिक स्पर्धेत आहोत अशावेळी जगाला हवे असलेले मनुष्यबळ पुरवणे हाच आपला मुख्य उद्योग आहे , तिथे असले प्रयोग करायला आपल्याकडे वेळ नाही , इंग्रजी शिक्षण हे आपल्या समाजाचे मुख्य अंग आहे . इतर देश झपाट्याने इंग्रजी शिकून आपल्याला या स्पर्धेत मागे टाकू बघत आहेत .
    आज आपली ओळख उच्चं शिक्षित मनुष्यबळ असलेला देश अशीच आहे डॉक्टर आयटी सेवा ,विज्ञान संशोधन ,
    विमानसेवा ,बॅंक ,उद्योग ,न्यायशास्त्र अशा अनेक शाखात आपण जगात प्रगतीवर आहोत . अशावेळी असे प्रयोग करणे आपल्याला परवडणार आहे का ?
    हा लेख म्हणजे रिकामा न्हावी आणि भिंतीला तुमड्या लावी असा प्रकार वाटतो . सत्याशी याचा यत्किंचितही संबंध नाही !

    ReplyDelete
  3. Agashe.. kadak pratikriya..bolati band

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...