Thursday, February 9, 2017

अक्षर ऐवज


No automatic alt text available.

मराठीत दरवर्षी हजाराच्या वर ललित पुस्तके प्रकाशित होत असतात. सर्व वाचकांपर्यंत पुस्तकांची माहिती पोहोचेल व वाचकांना आपल्या आवडीची पुस्तके वाचता येतील अशी माहिती मिळण्याचे सर्वव्यापी साधन आज मराठीत नाही. त्यामुळे अनेकदा उत्तमोत्तम पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचतच नाहीत. वृत्तपत्रांतून काही पुस्तकांबद्दल अत्यंत आत्मियतेने लिहिले जातेही. पण त्यालाही जागेअभावी मर्यादा येतात. सातत्याने नवनवीन पुस्तकांवर आस्वादकतेने लिहिणा-या समीक्षकांचा मराठीत असलेला दुष्काळ हेही एक कारण आहे. अनेकदा लेखकालाच टोपण नांवाने परिक्षण लिहून द्यायला सांगितले जाते, अशी अवस्था आहे.
वृत्तपत्रांत आले तरी ते विस्मरणातही लवकर जाते. डोक्युमेंटेशन होत नाही. म्हणजे २०१६ साली मराठीत दखलपात्र कोनती पुस्तके प्रकाशित झाली होती हे जर २०२५ साली कोणी अभ्यासकाने शोधायचे ठरवले तर त्याची दमछाक होईल हे नक्कीच.
अलीकडच्या काळात स्वत: पत्रकार/संपादक व प्रकाशकही असलेल्या घनश्याम पाटील यांनी "अक्षर ऐवज" या चोविस पुस्तकांवरील समीक्षालेखांच्या पुस्तकाने ही उणीव भरून काढण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. पुर्वी ज्येष्ठ समीक्षक शंकर सारडा सातत्याने मराठी पुस्तकांवर आत्मियतेने लिहित. त्यांच्य जवळपास १२ पुस्तकांचे प्रकाशन माझ्या पुष्प प्रकाशन संस्थेने केले होते. २००२ नंतर त्यात खंड पडला. सारडांचेही वय झाले. मधला काळ पुर्ण पोकळीचा होता. ही पोकळी भरून काढायला एक संपादक व त्यातही महत्वाचे म्हणजे प्रकाशक पुढे यावा ही कौतुकास्पद बाब आहे. कारण स्वप्रकाशन अथवा स्वलेखनापार जात इतर साहित्याची आत्मियतेने दखल घ्यायची उदारवृत्ती मराठीत अभावानेच आढळते.
पुस्तकांची दखल घेतांना पाटलांनी तथाकथित प्रस्थापित नांवांचा मोह टाळत नव्या-जुन्या पण साहित्यगुणांनी संपन्न पुस्तकांचाच विचार या पुस्तकात केला आहे. खरे तर आपलं महानगर या वृत्तपत्रात स्तंभासाठी केले गेलेले हे लेखन. ते निव्वळ परिचयात्मक स्वरुपाचे नाही. कलाकृतीतील बलस्थाने आणि दुबळेपण डोळस वाचकाच्या भुमिकेतून टिपत सकारात्मक दिशा देणारे हे लेखन आहे. ते पुस्तकरुपाने यावे व त्या निमित्ताने २०१६ सालचे एक डोक्युमेंटेशनही व्हावे ही आम्हा मित्रांची अपेक्षा होती. किंबहूना आग्रहच होता. हे पुस्तक शेवटी नुकतेच प्रकाशित झाले ही समाधानाची बाब आहे.
आपण इतिहासकालापासून डोक्युमेंटेशन बाबत अत्यंत गाफील राहिलो. त्याचीच फळे आपण ऐतिहासिक वादांच्या रुपात भोगतो आहोत हे एक वास्तव आहे. काळाच्या ओघात कोणते साहित्य टिकेल हे कोणी सांगू शकत नाही. जे टिकत नाही ते टाकावू होते असा आरोप जाणते कधीही करू शकत नाही. प्रत्येक कलाकृती ही त्या त्या काळचे अपत्य असते म्हणून त्या त्या काळाचे प्रतिबिंबही असते. त्यासाठी अशी पुस्तके मराठीत व्हायला हवीत. घनश्याम पाटलांनी हा क्रम भविष्यातही सुरु ठेवावा अशी अपेक्षा तर आहेच. इतरही साहित्यिकांनी हा कित्ता गिरवायला हरकत नाही. स्वत:च्याच पुस्तकांची तारीफ करवून घेण्यासाठी हिंडण्यापेक्षा इतरांच्याही पुस्तकांवर लिहावे, त्याची पुस्तके व्हावीत व मराठी साहित्याला एक शिस्तबद्ध डोक्युमेंटेशनचे स्वरुप द्यावे ही अपेक्षा.
"अक्षर ऐवज"
ले. घनश्याम पाटील
चपराक प्रकाशन
मो. ७०५७२९२०९२
मूल्य: रु. १००/- मात्र.

No comments:

Post a Comment

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...