Sunday, April 23, 2017

राष्ट्र संकल्पनेनंतर पुढे काय?


राष्ट्र ही संकल्पना मानवी इतिहासातील महत्वाचा टप्पा आहे. त्यामागे आधीच्या व्यवस्था अव्यवस्त्य्हेत बदलल्या हे कारण महत्वाचे आहे. स्वातंत्र्य:समता:बंधुता या महनीय तत्वांची देणगी जगाला दिली ती फ्रेंचांनी. त्याला फ्रेंच राज्यक्रांतीची व प्रबोधनकाळाचीही पार्श्वभुमी होती. धर्मसत्ता आणि राजसत्तांतील युती व संघर्षही जगाने या काळात पाहिले. पोपने धर्मसत्ताच सर्वोपरी असून पोपचे आदेश न मानल्यास राजांनाही धर्मातुन काढुन टाकण्याचा अधिकार आहे असे दावे सुरु केले आणि संघर्ष सुरू झाला. त्यात पोपच्या पदासाठीच धर्मांतर्गत संघर्ष सुरु झाल्याने पोपही कमकुवत बनला याचा फायदा युरोपियन राज्यकर्त्यांनी उचलला. याच काळात सरंजामदारांचेही वर्चस्व जवळपास जगभर वाढल्याचे आपल्याला दिसते. सरंजामदारांशिवाय राज्यही करता येत नाही पण त्यांचे वर्चस्वही हटवता येत नाही अशा पेचात तत्कालीन राज्यव्यवस्था सापडल्याचे आपल्याला दिसते. सरंजामशाहीमुळे राज्यसत्ता दुर्बळ ठरु लागल्याने औद्योगिकरण व व्यापार यामुळे धनाढ्य बनलेल्या वर्गाला प्रबळ राज्यसत्तेची गरज भासू लागली होती. सरंजामशाहीच्या तसेच अनियंत्रित राजेशाहीच्या तत्वांनाही छेद देईल असे नवे तत्व या वर्गाला हवे होते.
अशा वेळीस राष्ट्रवादाचे तत्व पुढे आणले गेले. एक वंश, एक प्रदेश, एक धर्म, समान इतिहास, परंपरा आणि हितसंबंध या मुलतत्वांवर प्राथमिक राष्ट्रवाद अस्तित्वात आला. मध्ययुगाच्या अखेरीस युरोपच्या वेगवेगळ्या प्रदेशांत वरील तत्वांना सुसंगत ठरेल अशी परिस्थितीही होती. प्रादेशिक निष्ठा महत्वाच्या बनल्यामुळे मातृभुमी...पितृभुमी या उदात्त दृष्टीने आपल्या भौगोलिक प्रदेशाकडे पाहिले जावू लागले. यातुन समाजाचे अंतरंग व बहिरंगही बदलू लागले. त्यामुळे राष्ट्रवादावर उभारलेली, पण ईश्वरदत्त मानली गेलेली राजसत्ता राष्ट्रनिर्मिती करण्यात यशस्वी ठरली.
यातुन पुर्वी जी सातत्याने सीमा बदलत असनारी, प्रादेशिक अभिमानाचा विशेष जोर नसणारी व्यवस्था स्थिर होत विशिष्ट भौगोलिक सीमांतर्गतचे आपले भावनिक अधिष्ठाण असनारे राष्ट्र व त्याचा अनिवार अभिमान असा राष्ट्रवाद अस्तित्वात आला. पण सर्वच राष्ट्रे (युरोप) महत्वाकांक्षी असल्याने आंतरराष्ट्रीय कलहांचे रुप बदलले. आपापल्या राष्ट्रांचे सामर्थ्य वाढवण्यासाठी संघर्ष सुरु झाला. त्यासाठी इतर राष्ट्रांचे हितसंबंध धोक्यात आले तरी चालतील ही भावना प्रबळ झाली. परस्परांत युद्धे वाढु लागली. त्यामुळे राष्ट्रभावनाही प्रबळ होत गेल्या. युद्धात हार झाली कि सामर्थ्यवाढीचे उद्योग व पुन्हा सुडासाठी युद्धे असा क्रमच बनला. सत्ता संपादन, रक्षण आणि प्रादेशिक विस्तार ही राज्यांची प्रमूख वैशिष्ट्ये बनली.
यातुनच प्रजेचाही राज्यव्यवस्थेत वाटा असला पाहिजे या भावनेतून राजसत्तेचे एकहाती नियंत्रण कमी करत लोकशाहीची स्थापना अपरिहार्य वाटु लागली. शासन हे प्रजेचे प्रजेतर्फे चालवले जाणारे असावे, कारण राजा नव्हे तर प्रजा सार्वभौम आहे या तत्वाचा प्रभाव वाढत होता. इंग्लंडमद्धे अशा रीतीने लोकशाहीची स्थापना झाली. लोकशाहीसोबतच राज-सत्ता, हुकुमशाही सत्ता, लष्करी सत्ताही काही राष्ट्रांत होत्या वा तशा सत्ता आणण्याचे प्रयत्नही सुरु होते. उदा. नेपोलियनने फ्रांसमद्धे लष्करी सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला.
हे सारे होत असले तरी म्हणुन साम्राज्यवाद संपला असे नव्हे. माणसाला मानवी स्वातंत्र्याबद्दल अजून खूप शिकायचे होते. आजही शिकला आहे असे नाही. सम्राटांचा साम्राज्यवाद जावून आता राष्ट्रांचा साम्राज्यवाद सुरु झाला. औद्योगिक क्रांतीमुळे वाढणारे उत्पादन विकण्यासाठी नव्या बाजारपेठांची गरज होती तसेच आपल्या देशाला लागणारी स्वस्त साधनसामुग्रीही स्वस्तात व सातत्याने मिळवण्याची गरज होती. त्यातुन वसाहतवाद पुढे झेपावला. आफ्रिका, आशिया, अमेरिकादि खंडांवर यूरोपियनांनी कब्जा मिळवत वसाहतवादी साम्राज्ये स्थापन केली. अमेरिकेने पहिले स्वातंत्र्ययुद्ध छेडुन स्वातंत्र्य मिळवले व एक नवीनच राष्ट्र संकल्पनेचा पाया घातला.
पहिले महायुद्ध हे वर्चस्ववादाच्या भावनेने गाठलेल्या टोकाचे फळ होते. या युद्द्धानंतर स्वयंनिर्णयाच्या तत्वामुळे अनेक छोटे प्रदेश अस्मितेच्या बळावर राष्ट्र म्हणुन उदयाला आले. ही छोटी राष्ट्रे आर्थिक व लश्करी दृष्ट्या कमकुवत असल्याने यूरोपातील अंतर्गत संबंध तणावाचे बनू लागले. यातुन राष्ट्रवाद सौम्य न होता टोकाचा वाढत गेला. जर्मनीत नाझी तर इटलीत फ्यसिस्ट पक्षांची सरकारे केवळ अतिरेकी राष्ट्रवादाच्या परिणती होत्या. त्यात साम्यवादी सत्तांचाही उदय रशियाच्या रुपाने झाला होताच. शासनाची पद्धत कोणतीही असली तरी राष्ट्रवाद हाच त्यांच्या तत्वज्ञानाचा मुलभुत गाभा होता. त्यातुनच विनाशक दुसरे महायुद्धही घडले. जगाचा नकाशा बदलला. आजवर जागतीक घडामोडींपासून अलिप्त असनारे "स्वतंत्र जग" अमेरिका या युद्धात पडले व त्यातुनच एक बलाढ्य जागतीक सत्ता म्हणुन उदयाला आले. या युद्धातुन नवी राष्ट्रे निर्माण झाली. बव्हंशी स्वतंत्र होवून तर इस्राइलसारखी नवनिर्मिती म्हणुन.
हा सिलसिला पुढेही चालु राहिला. साम्यवादी जग विरुद्ध भांडवलशाहीवादी जग असा नवा संघर्ष सुरु झाला. त्यातुनहे अनेक राष्ट्रांचे विभाजन अथवा एकत्रीकरण करत अमेरिका व रशियाने जगाचा नकाशा स्थिर राहु न देण्याचा निर्धार केला. भारतानेही ७१च्या युद्धातुन बांगलादेशाची निर्मिती घडवली. पुढे सोव्हिएट रशियाही कोलमडला व पुन्हा अनेक राष्ट्रे स्वतंत्रपणे जगाच्या नकाशावर आली....
सर्वात महत्वाची बाब म्हणजे स्वतंत्र राष्ट्र म्हणुन उदयाला येण्याची आकांक्षा असणारे, त्यासाठी संघर्ष करणारे अनेक समाजगट जगात आजही आहेत. तज्ञ म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येक राज्य हे राष्ट्र राज्यच आहे असे नाही व त्याशी सहमत व्हावे लागते. लष्करी अथवा पोलिसी बळावर अशी स्वातंत्रे नाकारली जातात. एका अर्थाने प्रत्येक राष्ट्र हे आपल्या राज्यात समतेचे व स्वातंत्र्याचे मूलतत्व पाळतेच असा दावा करता येत नाही.
या राष्ट्रांच्या इतिहासावरुन स्पष्ट दिसते कि ब-याचशा राष्ट्राची सीमा ती राष्ट्रे म्हणुन स्थापन झाली तेंव्हापासुन तशीच राहिली आहे असे म्हणता येत नाही. आजही आखाती राष्ट्रांतील संघर्ष जागतिक तणावाचे कारण बनू पाहतो आहे. अंतर्गत संघर्ष नाही असे राष्ट्र आज अभावानेच भुतलावर असेल. कोणत्याही राष्ट्राची सीमा कायम राहिलेली नाही. विस्तारवादाचे धोरण कळीचे बनलेले आहे. आम्हाला "राष्ट्र" ही संकल्पना आज महनीय आहे असे वाटत असतांनाच हे लक्षात घेतले पाहिजे कि अद्याप मुळात राष्ट्र या संकल्पनेची सर्वमान्य व्याख्या नाही. राष्ट्र ही संकल्पना भावनिक आहे व या विविध संकल्पनांत होणा-या संघर्षामुळे जगातील प्रत्येक नागरिकाचे, म्हणजेच आपलेही होरपळून निघालेले आहे. राष्ट्र संकल्पनेला इसिससारख्या संघटनांनी धार्मिक मुलतत्ववादाची फोडणी दिल्याने हा राष्ट्रवाद राष्ट्रविनाशक बनतो आहे. जागतिक मुल्यांची व्याख्या करण्याचा व त्यानुसार जग चालवायचा आपल्यालाच अधिकार आहे या भावनेतून आज महासत्ता असणारे अमेरिका व रशिया वागत आहेत.
आम्ही राष्ट्र, राष्ट्रवाद व राष्ट्रभक्तीने प्रभावित असतो हे खरे असले तरी राष्ट्र म्हणजे काय याची आपली व्याख्या सुस्पष्ट नसते. अनेक जागतिक विद्वान आज राष्ट या संकल्पनेच्याच अपरिहार्यतेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. "राष्ट्र-राज्यांचे ऐतिहासिक कार्य संपले आहे..." असे काही विचारवंतांना का वाटते तेही समजावुन घ्यायला हवे. याचे कारण म्हणजे जग कोणत्यातरी नव्या व्यवस्थेकडे आज ना उद्या जाणारच आहे. त्या बदलांची दिशा काय असेल हे आम्हालाही समजून घ्यावे लागेल. उत्तमात उत्तम अशे भविष्यातील कोणती व्यवस्था असू शकते याची प्रारुपे आम्हालाही बनवावी लागतील. कारण जगात जेही होते त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आर्थिक व सामाजिक परिणाम आमच्यावरही होतच असतो.
त्यामुळे राष्ट्र संकल्पनेनंतर पुढे कोणती नवी संकल्पना येऊ शकते, ती अस्तित्वात येतांना कोणत्या अडचणी व संघर्ष उद्भवणार आहेत यावरही आपल्याला विचार करणे भाग आहे!
-संजय सोनवणी

1 comment:

  1. संजय सर , सुंदर !
    यामध्ये आढावा घेताना शतके आणि दशकांचे संदर्भ दिले असते तर अजून छान झाले असते . निदान पाचवे शतक, दहावे शतक,सोळावे शतक, असा तिकडचा आढावा घेताना , आपलाही संदर्भ मिळावा ही अपेक्षा !
    मौर्य सत्तेच्या आधी आपल्याकडे नंद राजवट होती , त्यापूर्वी काय ? ग्रामराज्ये होती का ? ग्रीक काळात होती तशी ? आणि म.गांधींना अपेक्षित होती तशी ?
    श्रीकृष्णाच्या काळात सुद्धा नंदाची महासत्ता आणि कृष्णाची ग्रामराज्ये असा लढा होता का ?
    भारतात भौगोलिक विस्तार हा पर्यायाने एका जातीची किंवा "एका समूहाची दुसऱ्यावर कुरघोडी" असा होता आणि एकंदरीत धार्मिक सहिष्णुता होती असे वाटते ते कितपत खरे असावे ?कारण अनेक राजवंश हिंदू असूनही इतर समांतर किंवा विरुद्ध धर्माच्या विस्ताराला फारसा विरोध करत नसावेत असे दिसते.मुसलमान येण्यापूर्वी इतिहासाला साक्षी ठेवून असे पुरावे देता येतात का - की हिंदू-वैदिक आणि जैन,बौद्ध यांनी दुसऱ्याची श्रद्धास्थाने नष्ट किंवा विद्रुप केली ? म्हणजे त्यातून एक अभ्यास करण्याचा भाग राहातो - तो असा - जरी वैदिक इराण-अफगाणिस्थानातून आले असले आणि शैव इथलेच असले तरी त्यांची सरमिसळ अगदी नैसर्गीक रीतीने झाली.
    आज मितीला काय दिसते , अगदी साधे सरळ पाहिले तर सामान्य माणूस , जसे विष्णू,लक्ष्मीला नमस्कार करतो तसाच शंकरालाही नमस्कार करतो - पुराणकथा आणि देवरुपांचा वंशविस्तार अशा रूपाने हा सर्व प्रकार एकरूप झाला आहे . मल्हार मार्तंड हे याचे उत्तम रूपक आहे !
    जितकी मुसलमानांची विध्वंसक नोंद इतिहासात दिसते , आपल्याच नव्हे तर इतर देशांच्या इतिहासातही अशी अनेक उदाहरणे आहेत , पण वैदिकांची मात्र अशी उदाहरणे किती देता येतात ?
    गुरुदेव दत्त ,मल्हारी मार्तंड , पांडुरंग , अशी अनेक रूपके आपल्याकडे कधी सर्वानाच आपलेसे करून गेली ते समजलेच नाही !या बाबतीत कोकणस्थ ब्राह्मणांचा वाटाशून्य आहे ,पण देशस्थ ब्राह्मण हे या जमिनीही पूर्वापार संबंधित असल्यामुळे बराच फरक दिसतो .
    अवतार या कल्पनेशी देशस्थ ब्रह्मन् एकजीव झालेला दिसतो , पण कोकणस्थ ब्राह्मण मात्र आपला परशुराम वयाने विष्णूचा अवतार म्हणून घुसवू बघतो याचीही टीकात्मक चारचा करावी लागते !
    खुर्ची , रथाचे चाक, घोडा , नांगराचा फाळ ,धनुष्य बाण अशी प्रगती करत करत ,कुरणांचा प्रदेश सोडून आणि चराऊ राने सोडून भारतात माणूस शेती करू लागल्यावर नंतरच शेती , आणि त्यावर आधारित उद्योग झाले असणार ! माणूस एका जागी थांबला आणि संस्कृती निर्माण झाली . जाती निर्माण झाल्या ,
    असो
    आपण यावर अधिक लिहावे हाच खरेतर इतके लिहायचा - आपले लिखाण वाचनीय असते हे मात्र नक्की !आज आप्पा बाप्पा आपल्यात नाहीत . त्यांनी यावर अजूनच लिहिले असते - विनोदी शैलीत ,

    ReplyDelete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...