Wednesday, April 12, 2017

सवर्ण-उच्चवर्णीय?

उच्चवर्णीय, सवर्ण यासारखे शब्द वापरणे म्हणजे वैदिक असल्याचे अथवा वैदिकवाद मान्य असल्याचे लक्षण होय. हिंदुंमध्ये कधीही वर्णव्यवस्था नव्हती. वैदिक धर्म येथे आल्यावर हिंदुंच्या तत्कालीन आगमशास्त्रांनीही वर्णव्यवस्थेचा समूळ विरोध केला आहे. कोणी उच्च व कोणी खालचे ही सामाजिक मांडणी विघातक असून या शब्दांवर पुर्ण बहिष्कार घातला पाहिजे.

एकोणिसाव्या शतकातेल विद्वानांनी वैदिक समाजव्यवस्था म्हणजेच भारतीय समाजव्यवस्था असे चुकीचे गृहितक धरुन आपापल्या सामाजिक तत्वज्ञानाची मांडणी केली. हिंदू व वैदिक या स्पष्ट दोन समाजधारा आहेत हे त्यांना माहित नव्हते असे नाही. आर्य-अनार्य, अभिजन-बहुजन, वेदोक्त-पुराणोक्त वगैरे धार्मिक भेद त्यांच्या समोर होतेच. दोन धर्मांच्या दोन व्यवस्था आहेत हे त्यांने लक्षात घ्यायला हवे होते. 

ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद यातुन निर्माण केला गेला खरा पण स्वत:ला क्षत्रीय/वैश्य मानणारे अथवा असलेले अनेक समाजघटक वैदिक किंवा वैदिकवादी असुन त्यांचे वर्तनही वैदिक वर्चस्ववादाला साजेशे असले तरी ते "ब्राह्मणेतर" म्हणवत या चळवळीच्या मुळावर आले हा इतिहास आहे. हिंदुंचे खरे नुकसान ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादामुळे झाले व वैदिक वर्चस्ववाद मात्र सामाजिक जीवनातून तसुभरही हलला नाही. 

माध्यमांनी सवर्ण-उच्चवर्णीय वगैरे शब्द सातत्याने वापरत वैदिकवादालाच खतपाणी घातले. सर्व सामाजिक चळवळी या शब्दाशी येऊन धडकल्या. यातुन आपण आपल्याला वैदिक समाजव्यवस्थाच मान्य असल्याचे दाखवत जातो आहोत याचे भान आले नाही.

जाती म्हणजे पारंपारिक व्यवसाय. सर्वांचेच सामाजिक व सांस्कृतिक योगदान बरोबरीचे असल्याने कोणी जन्माने उच्च अथवा नीच असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. व्यवसायांमधे आर्थिक चढौतार येतात. आज पारंपारिक व्यवसाय जवळपास संपले आहेत. त्या अर्थाने जातीही संपत चालल्या आहेत. जातीव्यवस्थेच्या उद्गमाबाबत गोंधळ घातला गेल्याने व तिची नाळ कारण नसतांना मनुस्मृतीशी घातली गेल्याने द्वेष वाढला असला तरी जातीव्यवस्थेचे काल्पनिक गारुड संपले मात्र नाही.  सर्व जाती समान असुन सर्वांनाच त्यांच्या व्यवसायाएवढाच पुरातन इतिहास आहे हे मी "जातिसंस्थेचा इतिहास" या पुस्तकातून सप्रमाण दाखवून दिलेले आहे. हा इतिहास निश्चितच गौरवशाली असल्याने कोणीही अकारण अथवा वैदिकवादी म्हणतात म्हणून हीण मानणे हे अनैतिहासिक व अधार्मिक आहे ही आदिम हिंदू परिषदेची अधिकृत भुमिका आहे. 

वैदिक धर्म भारतात आला. सुरुवातीला या धर्माला विशेष कोणे राजाश्रय दिला नाही. गुप्त राजवटीने या धर्माला मूक्त राजाश्रय दिला व वैदिक तत्वज्ञान समाजात झपाट्याने पसरू लागले. तत्कालीन आगमिक पंडितांनी या वैदिक वर्णव्यवस्थेचा खंदा विरोध केला. दहाव्या शतकापर्यंत हिंदू आगमिकांनी वैदिकांचा वारू रोखून धरला. वैदिक पुन्हा मुलतत्ववादी बनले व निबंधकाळात स्मृत्यांची नव्याने रचना करत, विविध राजांचा आसरा मिळवत आपली धर्मतत्वे समाजाच्या गळी उतरवायचा प्रयत्न केला हा इतिहास आहे. हिंदु आपली मुळची समतेची परंपरा विसरत गेले व उच्च-नीचतेचे भ्रम जोपासू लागले. याला मुळ कारण भारताची झालेली आर्थिक अवनती होती. जगण्याचा संघर्ष बिकट झाला होता. संतही या वर्ण-जाणीवांनी प्रभावित झालेले होते. दहाव्या शतकापुर्वी असले चित्र आपल्याला दिसून येत नाही.

त्यामुळे आता तरी वैदिक मुलतत्वांना हिंदू धर्मातून हटवत हिंदुंचा मुळचा समतेचा मार्ग चालावा लागेल!

-संजय सोनवणी

6 comments:

  1. ..हा फुले-आंबेडकरवाद नोहे!

    आज समाजाला जातिसंस्थेच्या अरिष्टाने ग्रासले आहे. जाती-धर्म विद्वेषातून या अरिष्टाची सोडवणूक होणार नाही. महात्मा फुले (११ एप्रिल) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल) यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या नावाने वंशवादी विखार पसरविण्याचा जो प्रयत्न होत आहे, त्याची चिकित्सा करणारे टिपण..
    महाराष्ट्रदेशी सध्या प्रभुत्वशाली शेतकरी जातीतील काही चलाख अभिजनांद्वारे ब्राह्मणविद्वेषाचे नवे वाण पेरले जात आहे. या वाणाच्या गुणावगुणांची चिकित्सा न करता हाच फुले-आंबेडकरवाद आहे, असा गैरसमजही काही ‘मूलनिवासी’ मंडळी पसरवीत आहेत. महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानाचा गाभा हा जातिसंस्थानिर्मूलन व स्त्रीमुक्तीशी निगडित असल्यामुळे या सर्वोत्तम गुरुशिष्यांचा लढा हा मूलत: समतावादी तत्त्वज्ञानावर आधारित आहे. या समतावादी तत्त्वज्ञानाचे विरोधक, मग ते कोणाही जाती-धर्माचे का असेनात, हे फुले-आंबेडकरवादाचे खरे विरोधक आहेत.

    PART-1

    ReplyDelete
  2. आजच्या महाराष्ट्रातील प्रभुत्वशाली शेतकरी समाजाच्या जागृतीला व थोडय़ाफार प्रगतीला महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीची पाश्र्वभूमी आहे. २० व्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्रात हिरिरीने लढविल्या गेलेल्या ‘वेदोक्त की पुराणोक्त’ या सुप्रसिद्ध(?) वादात कोल्हापूर संस्थानचे शाहूजी राजे व राष्ट्रीय सभेचे लोकमान्य टिळक यांनी परस्परविरोधी भूमिका घेतल्यामुळे महाराष्ट्रात ‘ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर’ हा जातिसंघर्ष विघातक परिमाणांसह उफाळून आला. इतिहास असे सांगतो की, महात्मा फुले यांच्या शिक्षणविषयक क्रांतिकार्यात अनेक विवेकशील ब्राह्मणांनी सहभाग दिला होता. आपल्या अखंड प्रेरणादायी आयुष्यात फुले दाम्पत्याने पार पाडलेले एकमेव असे ‘जातीय’ कार्य म्हणजे ब्राह्मण जातीतील वाट चुकलेल्या विधवा महिलांसाठी प्रसूतिगृह चालवून त्यांच्यासह नवजात बाळांची माता-पित्याच्या वात्सल्याने देखभाल करणे हेच होय. तेथीलच एका ब्राह्मण विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन त्याला त्या काळी वैद्यकीय शिक्षण देऊन व प्लेगच्या रुग्णांची सेवा करण्याइतपत सुसंस्कारित करणाऱ्या या परम करुणाशील महामानवांना ब्राह्मणविरोधक ठरविणारे जातीय हितसंबंधात यथेच्छ बरबटून सत्यापलाप करीत आहेत. ब्राह्मण विधवांच्या केशवपनाच्या विरोधात न्हाव्यांचा संप घडवून आणणारे, टिळकांना जामीन देण्यासाठी पुढाकार घेणारे व त्यांचा सत्कार करण्याचा मोठेपणा दाखविणाऱ्या ‘सत्यशोधक’ महात्मा फुले यांना जातीयवादी ब्राह्मण आजही समजावून घेऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर आज ब्राह्मणेतरांच्या भीतीपोटी असुरक्षित वातावरणात जगण्याची पाळी आली आहे. अशा कडव्या ब्राह्मण्यग्रस्तांनी, १९४७ साली मिळालेल्या राजकीय स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधानाच्या आधारे सामाजिक समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला असता तर आज त्यांच्यासह समस्त भारतीयांना सुखाने मोकळा श्वास घेता आला असता. त्याऐवजी आपल्या क्षुद्र स्वार्थासाठी या मंडळींनी धार्मिक मूलतत्त्ववादाचे भूत उभे केले आहे. या भुताला बाटलीबंद कसे करायचे, याचे मंत्रतंत्र वेद/ धर्मशास्त्र/ पुराणांत अर्थातच नसल्यामुळे अनेक ब्राह्मणेतरांना डोक्यावर घेऊन मिरविण्याची पाळी या कर्मठ ब्राह्मणांवर आली आहे. त्यातून ‘ब्राह्मण हेच सर्वश्रेष्ठ’ या अहंगंडाचे (खरे तर न्यूनगंडाचे) पार मातेरे झाले आहे. गाढवासह ब्रह्मचर्यही गेलेल्या अशा ब्राह्मणवादी ब्राह्मणांच्या अपयशातून सत्यशोधक वारसा लाभलेले प्रभुत्वशाली शेतकरी जातीतील जातीयवादी काही शिकणार नसतील तर ते महात्मा फुले यांचा वारसा चालविण्यास सक्षम नाहीत, असेच म्हटले पाहिजे.

    PART-2

    ReplyDelete
  3. स्वातंत्र्यानंतर साधारणत: एक तपाच्या कालावधीत राष्ट्रीय सभेला ब्राह्मण-ब्राह्मणेतर या दोन समाजांत राज्यस्तरापुरते एक सत्तासंतुलन राखण्यात यश आले. धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक व प्रशासकीय सत्ता ब्राह्मणांकडे व ग्रामीण भागातील आर्थिक-लोकशाहीयुक्त अवकाश प्रभुत्वशाली शेतकरी जातीकडे असे हे सत्तासंतुलन होते. न्या. रानडे यांनी इतिहासकाळात राष्ट्रीय स्तरावर वर्णिलेली ही ब्राह्मण व लष्करी जातींची युती लोकशाही युगात राज्यस्तरावर अवतीर्ण झाली खरी, परंतु तथागत सम्यक संबुद्धप्रणीत ‘अनित्यता’ सिद्धांतानुसार ही परिस्थिती कायम राहणे शक्य नव्हते. ओबीसींच्या मंडल अहवालानंतर, भारतीय संविधानाच्या आधारे ५२ टक्के ओबीसी समाजाला २७ टक्के प्रतिनिधित्व मिळाल्यामुळे, विशेषत: १९९० नंतर हे सत्तासंतुलन बिघडले. त्याचा परिणाम म्हणून ब्राह्मण समाजावर कुरघोडी करण्यासाठी हे ब्राह्मणविद्वेषाचे हत्यार देशपातळीवर पुढे आले आहे. प्रभुत्वशाली शेतकरी जातींना वेगळ्या आरक्षणाची मागणीदेखील यानंतरच्या काळात रेटली गेली, हेसुद्धा लक्षणीय आहे.
    प्रभुत्वशाली शेतकरी जातींमधील चलाख अभिजनांद्वारे वेगाने पुढे आलेल्या या ब्राह्मणविद्वेषाचे वैशिष्टय़ म्हणजे या सत्तासंतुलनाच्या काळातील आपल्या ब्राह्मण्यग्रस्त भूमिकेबद्दल चकार शब्दही न काढणे तसेच वर्तमान काळात प्रभुत्वशाली शेतकरी जातींकडून केल्या गेलेल्या अन्याय-अत्याचाराबद्दल वरकरणी मौन बाळगणे, एवढेच नव्हे तर असे अन्याय, अत्याचार करणाऱ्यांचे समर्थन करणे, वेळप्रसंगी त्यांना मदतीचा हातही देणे! यावरून त्यांच्या ब्राह्मणविद्वेषाचा पाया डावपेचात्मक असल्याचे सिद्ध होते. सांप्रतच्या ब्राह्मणविद्वेषाचे हे समाजविघातक वैशिष्टय़ विचारात न घेता अध्र्या हळकुंडाने पिवळे झालेले मूलनिवासीवादी हर्षोत्साहित झाले आहेत. वास्तविक तथागत सम्यक संबुद्धप्रणीत ‘कार्यकारणभाव’ विचारात घेतला असता तर प्रभुत्वशाली शेतकरी जातीमधून उगम पावलेल्या या ब्राह्मणविद्वेषाची कारणमीमांसा अगदी सहज उलगडता आली असती. एवढाही सारासार विवेक नसणाऱ्या या मंडळींना फुले-आंबेडकरवाद हे जातधर्मविरहित तत्त्वज्ञान आहे, याची गंधवार्ताही असण्याची शक्यता नाही. दक्षिणेकडे तामिळनाडूमध्ये पेरियार यांच्या कर्मभूमीत त्यांना मानणाऱ्या संघटनांचे वर्चस्व असूनही तेथे अनुसूचित जाती-जमातींवरील अन्याय-अत्याचाराला पायबंद बसलेला नाही आणि उत्तर प्रदेश, बिहार, हरयाणासारख्या राज्यांत यादव-जाट अशा ‘मूलनिवासी’ समूहांचे प्राबल्य असूनही तेथील ‘मूलनिवासी’ ओबीसी व अनुसूचित जातींच्या हालअपेष्टांना पारावर राहिलेला नाही. उघडय़ा डोळ्यांना दिसणारी ही उदाहरणे वंशवादाचे रातांधळेपण स्वीकारलेल्यांना कशी काय दिसणार? हल्ली हल्ली मराठा मोर्चाच्या निमित्ताने अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यास केलेला विरोध व नाशिकसारख्या जिल्ह्य़ात झालेल्या दंगली यातून हे मूलनिवासी पाखंड काहीसे भानावर आल्याचे दिसते.

    PART-3

    ReplyDelete
  4. कर्मठ ब्राह्मण व मूलनिवासी पाखंड या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पहिल्याचे म्हणणे असे आहे की, आम्ही कोणी तरी वेगळे असून इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत. मूलनिवासीवादी नेमके याच वेगळेपणाच्या हव्यासाला वंशवादी साच्यात रूपांतरित करीत आहेत. बेरोजगारी, शैक्षणिक व आरोग्यविषयक दुरवस्था यांचे बळी ठरलेल्या सर्वजातधर्मीय सामान्य भारतीय जनतेच्या सुखदु:खांशी या दोघांना काहीही देणेघेणे नाही. जीवनसंघर्षांत उरस्फोट करणाऱ्या सामान्य जनतेला एकमेकांविषयी भीती दाखवून ते आपल्या अमानुष महत्त्वाकांक्षा पूर्ण करायला निघाले आहेत. त्याची परिणती अंतिमत: हिंसक विनाशात होणार आहे.
    हा विनाश टाळण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर आणि गोखले, आगरकर, रानडे तसेच टिळक, चिपळूणकर, सावरकरांच्या महाराष्ट्राला आज हे समजून घेण्याची गरज आहे की, मुळात ‘जात म्हणजे काही तरी वेगळे, उच्च, शुद्ध वगैरे वगैरे’ या संकल्पनेला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. इतिहासाचार्य राजवाडे यांनी लिहिलेला ‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’ वाचला तरी वर्णशुद्धीच्या संकल्पनेतील फोलपणा समजून येतो. मानव प्रजातीचा (‘स्पीशीज’चा) जन्म सुमारे २५ लाख वर्षांपूर्वीचा असून साधारणपणे मागील ६०-७० हजार वर्षांपासून या प्रजातींमध्ये कोणतीही जैविक उत्क्रांती झालेली नाही. त्यामुळे जीवशास्त्रीयदृष्टय़ा पृथ्वीतलावरील सारे मानव समान असून त्यांच्यातील वरपांगी दिसणारे भेद हे बाह्य़ भौतिक परिस्थितीमुळे निर्माण झाले आहेत. ‘पंजाबातील ब्राह्मणांचे साधम्र्य तामिळनाडूच्या ब्राह्मणापेक्षा खुद्द पंजाबमधील चर्मकाराशी अधिक आहे,’ असे डॉ. आंबेडकर सांगतात.

    PART-4

    ReplyDelete
  5. मानव प्रजातीचा पृथ्वीतलावरील इतिहास हा जसा इतर प्राण्यांच्या व पर्यावरणाच्या विनाशाचा आहे तसाच तो उन्नत मानवीय मूल्यांच्या विकासाचादेखील आहे. आपल्या भारत देशाला तर या मानवीय मूल्यांची दीर्घ परंपरा लाभलेली आहे. बळीराजा, सीता, शंबूक, द्रौपदी, एकलव्य या मिथक पात्रांतून दृग्गोचर होणारी मानवी मूल्ये खरेच प्रेरणादायी आहेत. इतिहास काळात महावीर, बुद्ध व त्यांच्या भिख्खू संघाचा ज्ञानमय वारसा, चंद्रगुप्त, अशोक, कनिष्क अशा सम्राटांचे शौर्य, मध्ययुगीन नामदेव, नानकांचे डोळे दिपविणारे कार्य, चक्रधर, चोखा, तुकोबाचे बलिदान, बदअलम करणाऱ्या रांझ्याच्या पाटलाला शिक्षा देणारे शिवराय ही व यांसारखी आणखी कित्येक उदाहरणे या मातीच्या सर्जनशीलतेची ग्वाही देत आहेत. अशा पवित्र भूमीला आज जातिसंस्थेच्या अरिष्टाने ग्रासले आहे. जातीधर्मविद्वेषातून या अरिष्टाची सोडवणूक होणार नाही, ही काळ्या दगडावरील रेघ आहे. या पावन भूमीने विकसित केलेल्या उन्नत मानवीय मूल्यांची कास धरून संविधानाच्या आधारे या अरिष्टाची विधायक सोडवणूक कशी करता येईल, यावर मोकळेपणाने चर्चा होण्याची गरज आहे. देशहिताला प्राधान्य दिल्यास या जातधर्मनिरपेक्ष वैचारिक सुसंवादातून सर्व भारतीयांचे भले करणारी पुढील दिशा नक्कीच सापडेल. महात्मा फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकर या युगपुरुषांनाही नेमके हेच अभिप्रेत आहे !
    शुद्धोदन आहेर
    ahersd26@gmail.com

    PART-5

    THE END

    ReplyDelete
  6. मुळात जात ही बालवयातच मुलांच्या मनात पालकांकडून नातेवाईक व इतरांकडून म्हणजे शाळेच्या दाखल्यावरही ठेवून पेरली जाते. त्यामुळे स्वजातीबाबत रुढी परंपरा देव धर्म पध्दती या माध्यमातून श्रेष्ठत्वाचा अहंगड पालक व सभोवतालची संपर्कात येणाऱ्या लोकांकडून कधी जलद किंवा टप्प्याटप्प्याने घेतला जातो. त्यामुळे आपण हे आहोत ते लोक ते आहेत असा बालीश पणा चालू होतो. तो वर्षानुवर्षे पिढयान पिढया सुरु आहे. मुलगी जन्माला येण्याबाबत तर मी पहिल्यांदा अनुभवले की मला मुलगी झाली तर अरेरे काही हरकत नाही असे समजावणीच्या सुरात सभोवतालची माणसे मला सांगू लागली. मला अचंबाच वाटला की एवढे वर्ष शिकून सवरणारी माणसे काय शिकली तर केवळ पैसा कमविणे का केवळ कारकुनी नोकऱ्या मिळविणे व स्वत: मिरवणे मग त्यात पुरुषच नव्हे तर बायकाही आल्या. मग कळू लागले की, जात किंवा लिंग भेद युक्त मानसिकता ही अंगवळणी पडलेली खोड/सवय जाण्यासाठी केवळ शालेय जीवनातूनच या सर्व गोष्टींचे निरर्थकपण सातत्याने संस्कारित करत रहावे लागेल. बाकी तर बाहेर व्यवहारात तर ॲडजस्टमेंटच करत असतो. आपण पण कुटुंबात एखाद्याला स्थान देणे नात्यात समायोजन करणे प्रत्येकाला पचत नाही. पण आता हळूहळू सवयीने मन तयार व्हायला लागले आहे. विज्ञानाची प्रगती असो वा जाणीवांचे आदान प्रदान यातून माणूस म्हणून जगतांना या गोष्टी दुय्यम होऊन पुढील पिढयांतून हे बऱ्याच प्रमाणात कमी होईल अशी आशा आहे. मात्र ही समुहाच्या मानसिकतेत अत्यंत सौम्यपणे तर कधी तातडीने हे परिवर्तनाचे मानसिक बदल घडत राहतील. ही मनोवैज्ञानिक अवस्था तशी सावकाश धुसर कधी ठळक सुरु असेल. कटटरतेची मनोरुग्णता किंवा अर्ध मनोरुग्णता ही यासाठी आव्हान ठरत आलेली आहे. मग त्यात स्वत्व पैसा प्रतिष्ठा सत्ता श्रेष्ठत्व तृष्णा हेवेदावे थोडक्यात इगो हे व इतर घटकही सांगता येतील. वास्तविक शालेय स्तरावर सम्यक जडणघडणीसाठी मनोवैज्ञानिकांनी जास्त काम करणे आवश्यक ठरेल. तसे योग, आनापान किंवा इतर साधना व अर्थव्यवहाराच्या टिप्स व स्मार्टनेस व फिटनेस तंत्र तर असेलच. प्रामाणिक प्रयत्न केला तर हे लवकर शक्य आहे. याचे उत्तर Negative नाही.

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...