Saturday, July 15, 2017

"अंगविज्जा" - कुशाणकालीन समाजव्यवस्थेवर लख्ख प्रकाश!


Inline image 5



आजच्या मराठीच्या उगमस्त्रोतांचा विचार करतांना भाषाविदांनी आजवर माहाराष्ट्री प्राकृतातील शिलालेख व हाल सातवाहनाच्या गाथा सप्तशतीला मानाचे स्थान दिलेले आहे. पण कुशाण काळातील पहिल्या ते दुस-या शतकादरम्यान अज्ञात लेखकाकडून लिहिल्या गेलेल्या साठ अध्यायी "अंगविज्जा" (अंगविद्या) या माहाराष्ट्री प्राकृतातील गद्य ग्रंथाकडे कसे दुर्लक्ष केले हे समजत नाही. हा ग्रंथ जैन धर्मियांनी लिहिला असल्याने व तो अंगलक्षणांरून भविष्यकथन करणारा ग्रंथ वाटल्याने त्याकडे दुर्लक्ष झाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्या काळातील समाजजीवनाची एवढी इत्यंभूत माहिती देणारा अन्य कोणताही ग्रंथ आज अस्तित्वात नाही. आजच्या मराठीचा स्त्रोत म्हणूनही या ग्रंथाचे मोल अपरंपार आहे. या ग्रंथामुळे आपला समाजेतिहास नव्याने उलगडतो आणि अनेक कुटप्रश्नांवर प्रकाश टाकतो हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. या ग्रंथातील भविष्यकथनाला वगळत आपण या ग्रंथात दिसणा-या समाज/धर्म जीवनाची चर्चा करणे अधिक योग्य व उद्बोधक राहील.

हा ग्रंथ इसवी सनाच्या पहिल्या ते दुस-या शतकादरम्यान लिहिला गेला आहे याचे पुरावे ग्रंथातच आहेत. कुशाणकालीन समाज-संस्कृती, नाणी, नांवे आणि देवता या ग्रंथात ठायीठायी आलेल्या आहेत. दक्षीणेत तेंव्हा सातवाहनांची सत्ता होती. माहाराष्ट्री प्राकृत त्या काळात उत्कृष्ठ ग्रांथिक भाषा मानली जात असल्याने हा ग्रंथ उत्तरेत रचला गेला असला तरी लेखकाने ग्रंथभाषा म्हणून याच भाषेची निवड केली. अर्थात त्यावर स्वाभाविकपणे काही शब्दकळांवर अर्ध-मागधीची पुसटशी छाया आलेली आहे. असे असले तरी या ग्रंथातील असंख्य शब्द मराठीत आजही वापरले जातात. उदाहणार्थ कुद्दली (कुदळ), छुरी (सुरी) थाळा, तट्टक (ताट) इत्यादि आजही वापरात असलेले शब्द तर आहेतच पण "कारूकम्म" (कारुकर्म) हा तेंव्हाचा व्यवसायाधिष्ठित शब्द आजही "कारू" जातसमुहासाठी वापरला जातो.

अंगविज्जावरून प्रतीत होणारी सर्वात महत्वाची बाब म्हणजे जन्माधारित जातीव्यवस्था कुशाणकाळापर्यंतही जन्माला आलेली नव्हती. ग्रंथकार असंख्य व्यवसायांची कोशाप्रमाणे जंत्रीच देतो, पण त्यांना "जात" हा शब्द कोठेही वापरत नाही. जातिसंस्थेच्या अभ्यासकांनी याची नोंद घेतली पाहिजे. अंगविज्जेत "गृहपती" या संज्ञेने हिंदू धरातील (वैदिक ज्यांना शुद्र म्हणत त्या) प्रतिष्ठितांची ओळख मिळते. दिक्षा अथवा संन्यास घेतलेल्या बौद्धांना मुंडक म्हणत तर जैनांना समन (श्रमण) म्हणत. तिसरा धर्म म्हणजे आर्य. या आर्य धर्मात (आज ज्याला आपण वैदिक धर्म म्हणतो) ब्राह्मण, क्षत्रीय व वैश्य यांचा समावेश होता. चवथा मोठा धर्म-समूह म्हणजे म्लेंच्छ. या म्लेंच्छात ग्रंथकाराने शूद्र, यवन, शक, कुशाण, क्षत्रपादि लोकांचे धर्म सामाविष्ट केलेले आहेत. थोडक्यात जे वैदिक अथवा श्रमण. मुंडक नाहीत त्यांना शूद्र अथवा म्लेंच्छ संबोधायची तेंव्हाचीही परंपरा होती. पतंजलीच्या महाभाष्यातही अगदी हीच मांडणी आहे. एवढेच नव्हे तर मनुस्मृतीही काही ठिकाणी म्लेंच्छांतर्गत जे वैदिक नाहीत त्या सर्वांचा समावेश करते. म्हणजेच वैदिक धर्म हा बौद्ध, जैन व शुद्रांच्या धर्मापेक्षा वेगळा व स्वतंत्र होता याचा वेगळा स्वतंत्र पुरावा "अंगविज्जा" देतो. म्लेंच्छ या शब्दाने दचकून जायचे कारण नाही, म्लेंच्छ हा शब्द मुळच्या मेलुहा अथवा मेलुक्खा या शब्दाचा वैदिक भाषेतील अपभ्रंश आहे हे ए. एच. दानी व बी. के. थापर यांनी दाखवून दिले आहे. मेलुहा हे भारताचेच प्राचीन नांव होय.

त्या काळात देवतांमध्ये शिव, उमा. वैश्रवण (यक्षाधिपती कुबेर), यक्ष, गंधर्व, वासुदेव, संकर्षण, स्कंद, कुमार, विशाख इत्यादिंची जनसामान्य पूजा करत असे. त्यांची मंदिरेही असत. तीर्थंकरांची मंदिरे बनण्याची मात्र सुरुवात झालेली दिसत नाही. गिरिपूजा हे एक जैनांचे तत्कालीन महत्वाचे अंग दिसते. त्यांचे गिरिमह नामक सणही असत व त्यात सर्वच भाग घेत असे अंगविज्जावरुन दिसते.  काही लोक इंद्र, वरूण, यम यांचीही उपासना करीत, पण ही वैदिक दैवते तोवर दुय्यम झालेली दिसतात. आज जशी ग्रामदैवते आहेत तसेच नगरांचेही यापैकीच एखादे नगरदैवत असे. काही पारशी व ग्रीक देवतांचीही पूजा कुशाण राजवटीमुळे सुरु झालेली दिसते. अनाहिता (पारशी), ऐरादित्ती (अफ्रोडायटी-ग्रीक देवता) यात नांव घेण्यासारख्या आहेत. कनिष्काच्या राबटक शिलालेखातील अभिवादनात इंद्र-वरुणादि अशी एकही वैदिक दैवते येत नाहीत पण उमा, कुमार, विशाख ही नांवे तर येतातच पण कुशाणांच्या बव्हंशी नाण्यांवर नंदीसहितची शिवप्रतिमाही आहे. काही नाण्यांवर बुद्धाच्याही प्रतीमा आहेत. यावरून वैदिक धर्माला कनिष्काने राजाश्रय दिला नव्हता असे दिसते. अंगविज्जातही यज्ञाचे येणारे अगदीच तुरळक उल्लेख पाहता हा धर्म तेंव्हा अत्यंत मर्यादित लोकांत सीमित होता समाजावर त्याचा विशेष प्रभावही नव्हता असे दिसते.

तत्कालीन लोक अनेक उत्सवही साजरे करीत. त्यांची माहिती देत असतांनाच शिवमह व रुद्रमह हे उत्सव इंद्रमहाप्रमानेच स्वतंत्र रित्या साजरे केले जात. याचाच अर्थ असा की वैदिक रुद्र व हिंदू शिव ही वेगळी दैवते आहेत याचे तत्कालीन समाजाला भान होते. गुप्तकाळात पुराणांनी रुद्र व शिवाचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. वस्तुता: ही दोन दैवते दोन वेगळ्या धर्माची आहेत. त्या काळात मातृकांचीही पूजा होत होती. महत्वाचे म्हणजे असूर-असूरकन्या, राक्षस-राक्षसी, यक्ष-यक्षीणी, नाग-नागीण, गिरीदेवता यांचीही पूजा होत असे. धनिक व्यापा-यांत वैश्रवणाची पूजा चालत असे. दिवाळीत नंतरही दिर्घकाळ लक्ष्मीपूजन नव्हे तर वैश्रवण (कुबेर) पूजनच होत असे तर दिवाळीला यक्षरात्री म्हणत असत. यक्ष, असूर, राक्षस, नाग आदि प्राचीन संस्कृतीचे पुजनाच्या रुपात लोकांकडून आदरात्मक भान ठेवले गेल्याचे दिसते. वैदिकेतर सर्व धर्मात या दैवतांना कमी-अधिक प्रमाणात महत्वाचे स्थान दिल्याचे दिसते. असूर, पिशाच्च, नाग आदिंना देवयोनीत गणले गेलेले आहे. त्यांच्यावर आधारित व्यक्तीनामेही ठेवली जात. पुराणांनी नंतर जरी असूर, राक्षसादिंना बदनाम केले असले तरी कुशाणकाळात तशी स्थिती नव्हती.  अंगविज्जा लेखनाचा काळ हा पुराणे लिहायला सुरुवात होण्याआधीचा असल्याने असूर-राक्षसांची प्रतिमा जनमानसात पुर्वी चांगलीच होती हे त्यांना देवतारुपात भजले जात असल्याने सिद्ध होते.

तत्कालीन व्यक्तीनांवेही प्राकृतातच आहेत. नांवांचे संस्कृतकरण झालेले नसल्याने अंगविज्जात आलेली व्यक्तीनामे हीच प्रत्यक्ष व्यवहारातीलही नामे होती असे प्रस्तावनेतच श्री. वासुदेवशरण अग्रवाल म्हणतात आणि ते योग्यही आहे. व्यावहारिक नांव प्राकृतात वा अन्य कोणत्याही भाषेत लिहितांना किमान त्यांचे मूळ रूप कोणी बदलत नाही. त्यामुळेच अग्गीमिताचे संस्कृतकरण अग्नीमित्र असे आपण करतो ते चुकीचे आहे. अग्गीमित हेच नांव व्यवहारातील होते व त्याचा तसाच वापर केला पाहिजे. उलट नंतरच्या काळात प्राकृत मूळ नांवांचे संस्कृतकरण केल्याने खूप घोळ झालेले आहेत. सातवाहन नांवाचे संस्कृतीकरण केल्याने शालिवाहन शकाचा काय गोंधळ झाला आहे हे आपण पहातच आहोत. अंगविज्जाच्या ग्रंथकर्त्याने त्याच्या काळातील व्यवहारात असलेल्या व्यक्तीनामांचे सुची दिली आहे व ती समाजेतिहासाच्या अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त आहे. कुशाणकालीन शिलालेखांतही काही नावे तशीच्या तशीच मिळतात हेही येथे उल्लेखनीय आहे. याचे कारण म्हणजे या काळात संस्कृत भाषा प्राकृतातून विकसित होत असली तरी जनमानसात तिला अजून प्रवेश मिळायचा होता. संस्कृतचा परिपोष झाला तो गुप्तकाळात. त्याआधी संस्कृत भाषेचे अस्तित्व असल्याचे कसलेही पुरावे मिळत नाहीत.

कुशाणकालीन नाण्यांबद्दल "अंगविज्जा" अत्यंत महत्वाची माहिती पुरवतो. कुशाणांच्या काही नाण्यांवर नना देवीची प्रतिमा असल्याने त्यांना नाणक म्हणत. आज आपण त्यालाच नाणे म्हणतो. त्या काळात कार्षापण चलनाला "पुराण" म्हणू लागले होते. कुशाणाधिपती हुविष्काच्या पुण्यशाला लेखात ११०० पुराण नाण्यांची देणगी दिल्याचा उल्लेख आहे.  कुशाणांनी प्रचलित केलेले दीनारही तेंव्हा चलनात होते. या दीनारांचा उल्लेख मनुस्मृतीतही येतो. छोट्या नाण्यांना मासक, अर्धमासक, ररय मासक म्हणत असत असेही दिसते. चलनाची विविधता पाहता हा काळ आर्थिक दृष्ट्या सुबत्तेचा होता. वस्त्र, अलंकार, मद्याचे अनेक प्रकार, पानगृहे, व्यापारी नौकांची वर्णने यावरूनही त्या सुबत्तेची कल्पना येते. अंगविज्जाने दिलेल्या नौकांचे काही प्रकार पेरीप्लसच्या  (सन ७८) प्रवासवर्णनातही येतात. नौकांची ही नांवे नंतरच्या काळात दिसून येत नसल्यामुळे अंगविज्जाचे लेखन कुशाणकाळातच झाले या निष्कर्षाला अधिक बळ मिळते.   

अंगविज्जात येणारा समाज हा मनमोकळा आहे. स्त्रीयांचे स्थान समाजात उच्चीचेच होते. समाज श्रेणींच्या माध्यमातून आपापले व्यवसाय चालवतांना दिसतो. पेयपानाबद्दलही विधीनिषेध नव्हते. गाथा सप्तशतीतही असाच मोकळा ढाकळा समाज आपल्याला दिसतो. बौद्ध धर्मही या काळत सुस्थापित होता हे स्तुपांच्या वर्णनावरून दिसते. हा राजकीय ग्रंथ नसल्याने समाजव्यवस्थेची भरपूर माहिती या ग्रंथात येत असली तरी राजव्यवस्थेबाबत माहिती येत नाही. असे असले तरी समाजावर फारशी राजबंधने नव्हती. नागरिक जेवढ्या प्रकारांच्या वाहनांचा उपयोग करत त्यांचीच संख्या पाहिली तर एकंदरीत समाज संपन्न होता याची साक्ष पटते.

अंगविज्जा हा जैन धर्मियाने लिहिलेला ग्रंथ असुनही त्याने विषयाच्या अनुषंगाने सगळ्यांच्याच स्थितीची चर्चा केली आहे. या ग्रंथाचा हेतू धर्मप्रचार नव्हता. आरंभीच्या अध्यायात सिद्ध व जिनांना अभिवादन करण्याशिवाय ग्रंथकाराने कोठेही जैन धर्माचा पुरस्कार येत नाही. खरे तर अंगविद्या शास्त्राला जैन व बौद्धांनी त्याज्जच मानले. तरीही अत्यंत आकर्षणातून हा ग्रंथ लिहिला गेला असल्याने अन्य जैन, बौद्ध व वैदिक ग्रंथांत जो धार्मिक अभिनिवेष दिसतो त्याचा स्पर्शही या ग्रंथाला झालेला नाही. हा या विषयावरील टिकून राहिलेला एकमेव ग्रंथ. प्राकृत टेक्स्ट सोसायटीने १९५७ साली मुनी पुण्यविजय तथा श्री आत्मारामजी महाराज यांनी या ग्रंथाच्या अनेक हस्तलिखित प्रती मिळवत तो प्रसिद्ध केला. हा ग्रंथ त्र्ययस्थाने लिहिलेला असल्याने यातील माहिती ही ऐतिहासिक सत्याजवळ जाणारी आहे. आपला इतिहास नव्याने संशोधित करण्याची केवढी गरज आहे हे हाच ग्रंथ दाखवून देतो. त्यासाठी सर्वच प्राकृत भाषांतील पुरातन ग्रंथ मिळवत त्याचे तटस्थ परिशिलन केले पाहिजे एवढे भान जरी "अंगविज्जा"मुळे आले तरी पुरेसे आहे.

-संजय सोनवणी

(Published in Dainik Pudhari)
(१४ जुलै २०१७)

3 comments:

  1. संजय सर , चांगला लेख आहे , त्यातून काही प्रश्न उद्भवतात . त्यांची उत्तरे तुम्ही देणार नाही हे माहीत असूनही ते प्रश्न विचारावेत असे वाटते !
    आजही संपूर्ण हिंदुस्थानात ब्राह्मणांचे प्रमाण ५ % आहे असे दिसते !त्याकाळात आर्य ( वैदिक )यांचे प्रमाणही कमी होते आणि जैन,बौद्ध आणि म्लेंच्छ जास्त होते . मला जाणून घेण्याची आवड आहे की नेमके असे काय घडले असावे की ज्यामुळे जैन आणि बौद्धांची पीछेहाट झाली आणि ५%ब्राह्मण वर्गाने जो सत्तेचतबा घेतला तो पार पेशवाई बुडे पर्यंत ??? त्या काळात संस्कृतीही लोकाश्रीत नव्हते - आणि राजाश्रयही नव्हता - म्हणजे प्राक्रुतातुन संस्कृताकडे कदाचित प्रवास चालू होता ( ? )
    इसवी १ले ते २ रे शतक कुशाणांचे मानले आणि जैन आणि बुद्ध इसपू ५५० -६५० मानले तर , काय अभ्यासता येते ?महावीर आणि बुद्ध काळात इसपु ७०० मध्ये संस्कृत नव्हते ( ? ), राजसत्तेतही मान्य नव्हते ,
    झरत्रुष्ट्र इसपु १७०० मानले आणि ऋग्वेदिक संस्कृतीही इसपु १५०० मानले तर अजूनच गोंधळ होतो . कुशाण काळात पारशी देवता आणि ग्रीक देवता होत्या पण वैदिक देव उल्लेखित नव्हते असे आपण म्हणता . ऋग्वेद होता , बौद्ध आणि जैन धर्मही होता त्यांच्या देवदेवता होत्या पण वैदिक देवता नव्हत्या - म्हणजे काय ?महाभारताच्या लेखनाचा काळ आपण कोणता धरता ?
    इसपु १५०० असे आपणच म्हणता ???आणि रामायणाची आपली ऐतिहासिक भूमिका विचित्रच आहे - हे सगळे पाहता हा गोंधळ वाढतच जातो आहे . इतके प्रचंड संस्कृत लेखन रामायण आणि महाभारत - इसपु नक्कीच झाले असणार आणि कनिष्काच्या काळात तर असणारच !!!
    ५ % ब्राह्मण वर्गाने इतर सर्व समाजावर राजाश्रय नसताना काय मोहिनी टाकत बौद्ध आणि जैन धर्माची पीछेहाट केली तो इतिहास आपण सांगावा असे मनापासून वाटते !

    ReplyDelete
  2. Sanskritization and plagarigm

    ReplyDelete
  3. जय सर -
    अनॉनिमस असे तुटक का लिहितात ?
    त्यांनी काय लिहिले आहे त्याचा काहीच अर्थबोध होत नाही आणि plagarigm असा शब्दच नाही . उगीच उसने अवसान आणून कशाला इंग्लिश भाषेची फजिती करायची ?आणि नेमके काय प्रतिक्रियात्मक लिहिले आहे तेही समजत नाही .
    हा ब्लॉग आणि संजय सरांचे लिखाण अतिशय सुंदर होते आहे . त्यात टीका करण्यासारखे सुद्धा बरेच असते , पण टीका काय केली ते तरी सर्वाना समजले पाहिजे ,म्हणजे त्यावर प्रतिवाद करता येतो . अनानीमास यांना विनंती की त्यांनी सविस्तर खुलासेवार लिहावे .
    अगदीच स्वैर विचार केला तर plagiarism wchich means litarary theft असा साधारण अर्थ होतो . जर तसा अर्थ अभिप्रेत असेल तर संदर्भासहीत लिहिणे जास्त उचित होईल असे सुचवावेसे वाटते .
    अनानीमास याला उत्तर देण्याची तत्परता दाखवतील का ?

    ReplyDelete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...