Saturday, July 15, 2017

बौद्धिकतेच्या नाशाच्या दिशेने...


Inline image 1




सजीव उत्क्रांती होत होत आजच्या अवस्थेला पोहोचले असे चार्ल्स डार्विनचा सिद्धांत मानतो. उत्क्रांतीचा नियम खरा की खोटा, प्राण्यांमध्ये झालेले बदल क्रमश: विकसीत झाले की आधीचे प्राणी नष्ट होत त्याच मूळ रसायनात बदल करत निसर्गानेच सर्वस्वी नवे सुधारीत जीव तयार केले या वादात जायचे आपल्याला कारण नाही. पण जेंव्हा आपण मानवी समुदायाचा विचार करतो तेंव्हा मानसीक/वैचारीक उत्क्रांती होत माणूस तंत्रज्ञान व सामाजिक विचारांच्या नव्या बदलांना स्विकारत त्यांना सरावत जातो असे मानले जाते. याला ’सामाजिक उत्क्रांतीवाद’ म्हणता येईल. कोणताही वाद जसा आदर्श स्थितीबाबत बोलत असतो तसाच हाही वाद आहे असे क्षणभर वाटू शकते. याचे महत्वाचे कारण म्हणजे मुळात हा सामाजिक उत्क्रांतीवाद आंतरीक आहे की बाह्य यावरच विवाद होऊ शकतो. 

माणसाचे बाह्य जग व रुप प्रचंड बदलले आहे हे आपल्याला मान्य करावेच लागेल. तो नवीन तंत्रज्ञानाच्या घोड्यावर स्वार होत भविष्याकडे धाव घेत आहे आणि लवकरच ग्रहमालांपर्यंत त्याच्या वसतीची मजल जाईल अशी चिन्हेही दिसत आहेत. जगातील एकुणातील संपत्तीची वाढही अत्यंत वेगाने होत असून नवनवीन तंत्रज्ञानांच्या शोधांमुळे मानसाचे जीवन जेवढे बदलेल तेवढ्याच वेगाने त्याच्या एकुणातील संपत्तीतही भर पडेल हेही उघड आहे. परंतू आपण आंतरिक उत्क्रांतीचे चित्र पाहिले तर आपल्याला माणसात काही गुणात्मक फरक पडल्याचे दिसून येणार नाही. उलट तंत्रज्ञानांमुळे मुठभर बुद्धीवंत अमाप जनतेला उथळ-बुद्धी बनवण्याच्या प्रयत्नांत असल्याचे आपल्याला दिसून येईल. म्हणजे हे हेतुपुरस्सर होते आहे असे नाही, पण एकुणातील परिणाम मात्र तसाच आहे. याला कोणी बौद्धिक भांडवलशाही म्हणू शकेल. पण साधनसंपत्तीचे फेरवाटप करा, आर्थिक भांडवलशहा नष्ट करा असे साम्यवादी जसे ओरडू शकतात तसे बौद्धिक फेरवाटप करा असे ते म्हणू शकत नाहीत. साधनसंपत्ती ही वस्तुरुप असते की बुद्धीरुप याचा निर्णय बव्हंशी माणसं करू शकत नाहीत यातच मानवी बुद्धीचा पराभव आहे की काय याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. परंतू बौद्धिक भांडवलशाहीही अस्तित्वात आहे व तीच आजच्या जगाचे एकतर्फी नियंत्रण करते आहे हेही आपल्याला लक्षात घ्यावे लागेल. 

म्हणजेच, आमची सामाजिक उत्क्रांती ही बव्हंशी बाह्य आहे. बाह्य घटकांना भला-बुरा प्रतिसाद देण्याइतपतच आमचे अंतरंग बदलले आहे. पण मुलभूत बुद्धीचे काय, तिच्या उत्क्रांतीचे काय आणि या उत्क्रांतीशिवाय आम्ही आमचे सामाजिक जीवन कसे बदलणार याचा विचार आम्ही क्वचितच करत असतो. त्यामुळेच आमचे भविष्यही अनिश्चित बनून जाते व येणा-या प्रत्येक लाटेवर स्वार व्हायची सवय लागते ती यामुळेच. आम्हाला काय उपयुक्त आहे आणि काय नाही हे ठरवण्यासाठी बाह्य फोर्सेस लागतात. मग त्या अगदी दैनंदिन जगण्याच्या वस्तू असोत की आमचे राजकीय-सामाजिक विचार. आम्ही त्या परिघातच आमचे विचारविश्व मर्यादित करतो (किंवा बाह्य फोर्स ते मर्यादित करतात.) आणि या मर्यादितपणाला आम्ही उत्क्रांती म्हणू शकत नाही. गेल्या शतकाच्या आरंभापासून माणुस बदलेल अशी जी तत्वज्ञांना आशा होती ती सर्वच जागतिक समुदायाने खोटी ठरवली आहे ती यामुळेच!

किंबहुना अत्यंत अभिनव तत्वज्ञान, विज्ञान किंवा आर्थिक वा राजकीय विचारांचे सृजन आम्ही करू शकलेलो नाहीत. जे काही झाले आहे ते फार पुर्वीच झाले आहे. आता आम्ही त्याच विचारांना नवी थिगळं लावत वा अनेक विचारांचे मिश्रण करत नव्याचा आव आणत सिद्धांत मांडत आहोत. जगात एकरुपता हवी. जागतिक मानव एक राष्ट्रीयत्वाच्या छत्रछायेखाली यावा हे खरे, पण विचारधारांच्या अप्रगल्भ बजबजपुरीमुळे व त्यांच्यातील सत्ताकारणांच्या संघर्षामुळे आहे तेच समाज व राष्ट्रे आज वैचारिक दृष्ट्या विचित्र विभाजली गेलेली आहेत. हा अर्धवट संघर्ष एवढ्या विकोपाला गेला आहे की आपल्याला नेमके काय हवे आहे, भविष्यातील जग आम्हाला नेमके कसे घडवायचे आहे याचा विचारही लूप्त झालेला दिसतो कारण आमचा सार्वत्रिक बौद्धिक -हास झालेला आहे. आज आम्ही वापरतो ती पोटभरू बुद्धी आहे. कोणाचे कौशल्य यात अधिक तर कोणाचे कमी एवढाच काय तो फरक आहे. परंतू मानवी संस्कृतीच्या विकासाचे बाह्य साधनसंपत्ती हे एकमात्र लक्षण नाही याचे भान आम्ही हरपून बसायला लागलो आहोत. यातच आमची सामाजिक उत्क्रांती की अधोगती हे आम्हालाच शोधायचे आहे.

भारतियांसमोरील आव्हाने अधिक बिकट आहेत. आजचे जग हे विषमतेने ग्रस्त आहे. ही विषमता नुसती आर्थिक नाही तर बौद्धिकही आहे. खरे तर प्रत्येक व्यक्तीला निसर्गानेच स्वतंत्र अशा बौद्धिक प्रेरणा दिलेल्या असतात. परंतू आमच्या बाह्य जगाची संरचनाच अशी आहे की ती नैसर्गिक बुद्धीमत्तेला नष्ट करत नेत एका कृत्रीमतेच्या चक्रव्यूहात अडकावते. या कृत्रीमतेचा सोस एवढा आहे की तीच आम्हाला नैसर्गिक प्रेरणा वाटू लागते. आणि या कृत्रीमतेच्या अनैसर्गिक सोसात बुद्धीमत्तेचेही मापदंड बदलत जात त्यात विषमता निर्माण होत जाणे स्वाभाविकच म्हणावे लागेल. अशा स्थितीत रास्त सामाजिक व्यवस्थेचा जन्म होण्यासाठी, त्यासाठी उचित राजकीय व आर्थिक व्यवस्था असण्यासाठी जी उत्क्रांती अभिप्रेत आहे ती होणे कसे शक्य आहे?

आम्हा भारतियांसमोर आजच्या व्यवस्थेत अनंत आव्हाने आहेत. ते जातीपातींपासून सुरू होत आर्थिक विषमतेशी येऊन ठेपतात. आमची लोकशाही ही जनांची लोकशाही नसून सरंजामदारांची लोकशाही आहे. पण ती बदलावी व खरी लोकशाही आणावी असे लोकांनाच वाटत नाही. जात हे अनेकांना उन्नतीचे साधन वाटते तर काहींना विपन्नावस्थेचे कारण वाटते. उन्नती हा मानवी स्वातंत्र्याशी निगडित असूनही आम्हीच अनेक पारतंत्र्ये स्वत:हून ओढवली आहेत, आणि गंमत म्हणजे ती पारतंत्र्ये आहेत हेच आम्हाला मान्य नाही. आमचे धार्मिक संघर्ष तर कोणत्याही धर्माने लाजेने खाली मान घालावेत असे बनले आहेत. विचारवंतांनी हा गतीरोध नष्ट करत समाजाला मूक्त प्रवाह बनवण्यासाठी प्रेरणा द्यायची तर तेही या संघर्षांची व्याप्ती वाढवण्यात हातभार लावत आहेत. दुसरी गंमत म्हणजे आम्हा भारतियांना मुळात अर्थविचारच नाही. सैद्धांतिक प्रेरणाच नाहीत. आमची उत्क्रांती दहाव्या शतकात जी थांबली ती आजही त्या थांब्यापाशी अडखळलेली आहे. बौद्धिक क्रांतीच्या चर्चा होण्याऐवजी विद्रोही तरुण साधन-संपत्तीच्या फेरवाटपाबाबत अधिक चर्चा करतात. बाकीचे आहे त्या भ्रष्ट व्यवस्थेचे फायदे कसे उचलता येतील या स्पर्धेत पडतात. ज्यांना जमत नाही ते आपल्या नशिबाला दोष देत जगण्याच्या स्पर्धेत हाती येईल ते मिळवत कसेबसे जगतात. आमची व्यवस्था ही नवयुगातील नवनवे वंचित निर्माण करत एकमेकांना शोषणाचे नवे मार्ग वापरते. अशा स्थितीत आम्ही जगाशी स्पर्धा करू शकत नाही. नव्या जगाच्या निर्मितीचे नेतृत्व करू शकत नाही. आजची बौद्धिक भांडवलशाहीही आमच्या आकलनात नाही त्यामुळे तसे भांडवलदार निर्माण करायची क्षमताही आमच्यात नाही. 

आणि या सर्वांचे मूळ कारण म्हणजे आम्ही आमच्या मानसिकतेला आव्हान देत नवे न्याय्य राष्ट्र घडवण्याच्या प्रेरणा देणारे नवे विचारवैभव निर्माण केले नाही. तसा प्रयत्नही होत नाही. मागे चर्चा केल्याप्रमाणे या सर्व अध:पाताची सुरुवात आमच्या शिक्षणव्यवस्थेपासून सुरु होते आणि भ्रष्ट समाजात विलीन होते. मग आमची नीतिमुल्येही भ्रष्टच राहणार हे वेगळे सांगायची गरज नाही. आमच्याच पुर्वसुरीच्या उसण्या तत्वज्ञानांना बासणात बांधत जोवर आम्ही नवतत्वज्ञान बनवत बौद्धिक क्रांतीचे, म्हणजेच मनुष्यक्रांतीचे ध्येय प्रामाणिकपणे जोपासत नाही तोवर आमच्या अवस्थेत बदल होण्याची सुतराम शक्यता नाही. सामाजिक उत्क्रांती झाली तर यातुनच साध्य होईल! अन्यथा जो काही बौद्धिक -हास झालाच आहे तो आम्हाला नित्यनेमाने रसातळाला नेत राहील एवढेच! मानवी स्वातंत्र्यच नैसर्गिक प्रज्ञेचे/बौद्धिकतेचे स्फोट घडवू शकते आणि आपल्याला तेच आधी मिळवावे लागेल. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी ते अत्यंत आवश्यक आहे.  आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी ते अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा प्राचीन संस्कृत्यांचे अवशेष आज कष्टाने शोधावे लागतात तसेच आमच्याही आजच्या संस्कृतीचे होईल!   

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...