Sunday, July 16, 2017

उद्ध्वस्त मोसूलचा धडा!

उद्ध्वस्त मोसूलचा धडा!

इसिस (इस्लामिक स्टेट्स) या दहशतवादी संघटनेने सिरिया व इराकमध्ये जो दहशतवादाचा विस्फोट घडवला तो समस्त मानवजातीला काळिमा फासणारा होता यात शंका बाळगायचे कारण नाही. २०११ पासून या संघटनेने निर्माण केलेल्या हिंसक संघर्षात दोन लाखांहून अधिक नागरिक ठार झालेले आहेत. इसिसच्या दहशतवाद्यांनी हाती पडलेल्या सिरियन/इराकी नागरिकांसह परकीय नागरिक व पत्रकारांची ज्या नृशंस पद्धतीने हत्या केली आहे ती “सैतानी’ या शब्दातच वर्णन करता येईल. पुरातन स्थळांचा इसिसने केलेला विध्वंस अमानवीयच होता. मध्यपूर्वेतील राष्ट्रांपर्यंत मर्यादित असलेला इसिसचा दहशतवाद युरोपच्याच भूमीवर जाऊन पोहोचेल याची कोणी कल्पनाही केली नव्हती. चार्ली हेब्दो मासिकातील व्यंगचित्रांचा बदला घेण्यासाठी हा दहशतवाद फ्रान्समध्ये घुसला. ब्रुसेल्स या बेल्जियमच्या राजधानीत विमानतळ आणि मेट्रो स्टेशनवर झालेल्या दहशतवादी स्फोटांत तीसहून अधिक ठार झाले. युरोपमध्ये आयसिसचे नेटवर्क किती पसरले आहे याचा अंदाज या अनपेक्षित हल्ल्यामुळे आला.

इसिसच्या दहशतवाद्यांनी असिरियन संस्कृतीच्या काळापासून प्रसिद्ध असलेले इराकमधील दुसऱ्या क्रमांकावर असलेले मोसूल शहर इराकी सैन्याला हुसकावून २०१४ मध्ये ताब्यात घेतले होते. मोसूलला राजधानी बनवत इराकचा जवळपास अर्धा हिस्सा इसिसने व्यापला. मोसूलमधील अल नुरी मशिदीतूनच इसिसचा सर्वेसर्वा अल बगदादी याने इस्लामी खिलाफतीची घोषणा केली होती. धार्मिक पोलिसांनी तेव्हापासून मोसूल व त्या शहराच्या परिसरात धुमाकूळ घातला होता. संगीत ऐकणे या साध्या बाबीसाठी नागरिकांचा छळ करत त्यांना ठार मारले होते. या कालावधीत इंटरनेट व फोन वापरायलाही मोसूलमधील नागरिकांना बंदी होती. गैरइस्लामियांना अत्यंत क्रूर वागणूक दिली जात होती. इसिसने या शहराला जवळपास आपली राजधानी बनवत एक जागतिक धोका बनायला सुरुवात केल्याने मोसूल पुन्हा ताब्यात घेणे इराकसाठी अत्यावश्यक बनले होते. अमेरिकन सैनिकांच्या सहकार्याने सुमारे २२ हजार इराकी सैन्याने मोसूल पुन्हा ताब्यात घेण्यासाठी युद्ध सुरू केले. गेले काही महिने यासाठी घमासान युद्ध होत होते. हवाई हल्लेही केले गेले. हरतच चाललेल्या इसिसने शेवटी आत्मघातकी प्रतिहल्लेही केले. पण शेवटी मोसूलवर विजय मिळवण्यात इराकी सैन्याला यश मिळाले. गेल्याच आठवड्यात इराकचे पंतप्रधान हैदर अल-अबादी मोसूलमध्ये आले व इसिसवरील विजय घोषित केला.

पण या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यासारखी स्थिती नव्हती. प्राचीन वारसा सांगणाऱ्या मोसूल शहराचा पूर्ण विध्वंस झाला आहे. जवळपास साडेआठ लाख नागरिक शहर सोडून गेले आहेत. मृतांचा आकडा अजून जाहीर झाला नसला तरी ती संख्या लाखाच्या आसपास जाऊ शकते. जेथे नजर जाईल तेथे उद्ध्वस्त घरे आणि रस्त्यांवर डबरांचे ढीग आहेत. ज्या अल नुरा मशिदीतून अल बगदादीने खिलाफतीची घोषणा केली होती ती या खिलाफतीचे प्रतीक असलेली मशीदही जमीनदोस्त झाली आहे. लेनिनग्राडची द्वितीय विश्वयुद्धात जशी दयनीय अवस्था झाली होती त्यापेक्षा भयंकर अवस्था आज मोसूलची आहे. युद्ध कधीच रम्य नसते. मोसूलचा ताबा मिळाला असला तरी इसिसचे अजूनही अंडरग्राउंड असलेले काही आत्मघातकी गट कधीही हल्ला करू शकतात म्हणून आसपासच्या गावांनाही इसिसमुक्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. हा विजय महत्त्वाचा यासाठी आहे की सैतानी आकांक्षांनी प्रेरित एकापाठोपाठ नृशंस कृत्ये जगभर करणाऱ्या इसिसला सर्वात मोठा झटका मिळाला आहे.

पण इसिसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त झाला असला तरी अजून अबू बक्र अल बगदादी व त्याचे नेटवर्क जिवंत आहे. त्याची पोहोच अद्यापही जगातील इस्लामी मूलतत्त्ववाद्यांपर्यंत आहे. अल नुरा मशिदीचा विध्वंस म्हणजे बगदादीच्या खिलाफतीचा विध्वंस असे मानण्यात येत असले तरी बगदादीमध्ये नवीन दहशतवादी केंद्रे उभी करण्याची शक्ती आणि तसे तत्त्वज्ञानही असल्याचे मान्य करावे लागते. इस्लामिक राज्याची स्थापना हे ध्येय बाळगणारे व त्या ध्येयासाठी जीव धोक्यात घालू पाहणारे मुस्लिम युवक दुर्दैवाने कमी नाहीत. दीर्घकाळ मोठ्या प्रदेशावर प्रत्यक्ष राज्य चालवल्यामुळे अल कायदासारख्या कसलाही भूभाग ताब्यात नसलेल्या दहशतवाद्यांपेक्षा इसिसचा दबदबा पुढेही राहील असा अभ्यासकांचा कयास आहे. मोसूलमधील पीछेहाटीनंतर काही काळ इसिसकडे येणारा भरतीचा ओघ जरी कमी झाला तरी तो पूर्ण थांबणार नाही. याचे कारण म्हणजे मोसूल पडले असले तरी अद्याप ताल अफार, हौज्जासारखी काही शहरे आणि अनबारसारखे विभाग अजून इसिसच्या ताब्यात आहेत. सिरियामधील युफ्राटिस नदीचे बरेचसे खोरे अजूनही इसिसच्याच नियंत्रणात आहे. मोसूलमधील इसिसचे अनेक बडे दहशतवादी पळून तेथे आश्रयाला गेले असण्याची शक्यता आहे. मोसूलमधील विजयामुळे जरी इराकी सैन्याला मोठे यश आले असले तरी हे सर्व इसिसव्याप्त प्रांत ताब्यात घ्यावे लागतील. शिवाय इसिसने लिबिया, इजिप्त, येमेन, अफगाणिस्तानातही आपले जे तळ बनवले आहेत तेही उद्ध्वस्त करावे लागतील. त्याशिवाय इसिसवरील विजय पूर्ण झाला आहे असे म्हणता येणार नाही. जगावरील इसिसचे सैतानी सावट अजूनही गेलेले नाही.

जगासमोरचा विशेषत: युरोपसमोरचा सर्वात मोठा धोका इसिसचा आहे. युरोपमध्ये एखादे फार मोठे दहशतवादी कृत्य करण्याची त्यांच्याकडून शक्यता आहे. मोसूलमधील कंबरडे मोडणारे अपयश इसिस सहजी पचवणे शक्य नाही. इसिसची रानटी पद्धत पाहता अन्यत्र हिंसाचाराची राळ उठवून देत आपली शक्ती यत्किंचितही कमी झालेली नाही हे दाखवण्याचा इसिसचा प्रयत्न असेल. भारतालाही इसिसच्या या संभाव्य संकटाची दखल घेत त्याला रोखण्याची व्यवस्था करावी लागेल. बगदादी कोठे आश्रय घेतो हे गुप्तचर यंत्रणांना अद्याप तरी माहीत नाही.

ओसामा बिन लादेनप्रमाणे त्याला शोधून ठार मारायची कितीही इच्छा गुप्तचर यंत्रणांची असली व एकदा तसा प्रयत्नही केला गेला असला तरी अद्यापही त्यात यश आलेले नाही. पण प्रश्न येथे केवळ बगदादीचा नसून ज्या विचारसरणीची इमारत रचत, नव-खिलाफतीचे आकर्षण दाखवत त्याने जो प्रभाव निर्माण केला आहे तो कसा हटवायचा हा मुख्य प्रश्न आहे व त्याला पाश्चात्त्य राष्ट्रांकडे किंवा इराक-सिरियाकडेही उत्तर आहे असे दिसत नाही. मोसूलचे ध्वस्त अवशेष व त्यात काही न समजणारी खेळणारी लहानगी मुले, बहिणींचे सांत्वन करणारे आईबाप, गमावलेले भाऊ, कसेबसे जिवंत असलेले जगण्याच्या शोधात किडूकमिडूक सोबत घेऊन मोसूल सोडणारे अभागी सामान्य नागरिक हे दृश्य पाहून तरी कोणाला करुणेचा पान्हा फुटेल अशी आशा बाळगली तरी दहशतवादी हिंसक मनोवृत्तीकडून तशी अपेक्षा करता येत नाही. इसिसने दहशतवाद केला. त्यांना जवळपास तसेच उत्तर मिळाले आहे. पुढेही हा संघर्ष कदाचित असाच चालू राहील. आंतरराष्ट्रीय मुस्लिम समुदायाला यापासून धडा घेत इसिस व तत्सम प्रवृत्तींना एकटे पाडण्याशिवाय गत्यंतर नाही.

कडव्या इस्लामवादाचे इसिस हे जागतिक प्रतीक बनले आहे. सर्वच मुस्लिमांकडे पाहण्याचा दृष्टिकोन इसिसने दूषित केला. स्थलांतरित झालेलेही मुस्लिमच होते, पण त्यांच्यातही इसिसच्या दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याने त्यांना आसरा देणाऱ्या राष्ट्रांची पंचाईत तर केलीच, पण स्थलांतरितांनाही स्थानिकांच्या द्वेषाचे कारण बनावे लागले. आपल्या देशात परतायचे त्यांचे स्वप्न इसिसचा समूळ बीमोड कधी होतो यावर अवलंबून आहे. इराक-सिरियाचे पुढचे लक्ष्य इसिसचे नेटवर्क समूळ उखडणे हेच असेल व ते लवकर साध्य व्हावे ही अपेक्षा! दहशतवाद्यांचा कधी ना कधी खात्मा होतोच, पण त्यासाठी काय किंमत मोजावी लागते हे मोसूलचे उद्ध्वस्त अवशेष पाहिल्याखेरीज समजणार नाही याचीही दखल सर्व धर्मांतील मूलतत्त्ववाद्यांनी घेतली पाहिजे. हा त्यांच्यासाठीही धडा आहे

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...