Friday, October 6, 2017

चला म्युच्युअल फंडांच्या विश्वात!



सर्वसामान्य माणसापुढे मुख्य प्रश्न असतो तो मिळकतीमधील शिल्लक नेमकी कोठे गुंतवावी हा. आपल्याकडे अर्थ-शिक्षणाची तशी वानवाच असल्याने अनेकदा सुशिक्षितांना सुद्धा गुंतवणुकींच्या बाबतीत गोंधळात पडायला होते. त्यामुळे शक्यतो गुंतवणुकीचे पारंपारिकच मार्गच वापरले जातात. कधी कधी महागाईचा निर्देशांक ज्या प्रमाणात वाढतो त्याही प्रमाणात परताव्यांत वाढ झाल्याने काही वेळा अशा गुंतवणुकी तोट्यातच जातांना दिसतात. रिकरिंग, फिक्स डिपॉ्झिट, सोने, अलंकार, स्थावर मालमत्ता इत्यादि पारंपारिक गुंतवणुकीचे मार्ग सर्वसाधारणपणे मोठ्या चलनात आहेत. परंतू आधुनिक काळात गुंतवणुकीचे म्युचुअल फंडांसारखे अनेक नवे मार्ग उघडलेले आहेत तेही गुंतवणुकीचे चांगले पर्याय आहेत हे सहसा सामान्य लोकांना माहित नसते.

किंबहुना एक ठरावीक जाणकार वर्ग सोडला तर गुंतवणुकीच्या अधिक किफायतशीर असू शकणा-या गुंतवणुकांच्या नव्या मार्गांपासून सर्वसामान्य माणुस आजही कोसो दुरच असल्याचे चित्र आपल्याला दिसते. खरे तर आहे त्या संपत्तीत भरच पडत रहावी, संपत्तीतून संपत्ती निर्माण व्हावी, त्यात वाढ व्हावी आपली उद्दिष्टे पुर्ण व्हावीत हेच गुंतवणुकीचे मूख्य हेतू असतात. आज अमेरिका, युरोपादि राष्ट्रांत अगदी शेतकरी, पगारदार ते लहान-मोठे व्यावसायिक म्युच्युअल फंड हाच मार्ग आपल्या गुंतवणुकीसाठी वापरतात. अमेरिकेतील म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक ट्रिलियन डॉलर्सपेक्षा अधिक आहे.1 म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत होणारी वाढ ही अन्य गुंतवणूक पर्यायांपेक्षा दिर्घकाळात अधिक वेगवान असू शकते. याचे कारण म्हणजे येथे सामुहिक गुंतवणुक करुन तज्ञ मंडळीच्या देखरेखीखाली गुंतवणुकीचे नियंत्रण, क्षेत्रनिहाय विभाजन कोणत्या गुंतवणुकीतून कधी बाहेर पडायचे हे म्युच्युअल फंड कंपनीवर सोपवले गेले असते. थोडक्यात आपल्या पैशाचे व्यवस्थापन आपण कुशल तज्ञांहाती सोपवलेले असते आणि नेमकी यामुळेच संपत्तीची अधिक वाढ होण्याची अधिक शक्यता निर्माण होते.

सामान्य माणूस शेयर बाजार, म्युच्युअल फंड हे शब्द ऐकले तरी गोंधळून जातो. खरे तर हे केवळ माहिती नसल्याने अर्थनिरक्षरतेने होते. गुंतवणुकदाराने नेहमीच सर्व पर्यायांची माहिती ठेवली पाहिजे, पण ती नेमकी कशी मिळवायची हा एक प्रश्न असतो. खरे तर देशात आपल्याच भारत सरकारने १९६३ मध्ये सर्वप्रथम म्युच्युअल फंड उभारला होता त्याचे नांव युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया. त्यानंतर अनेक सरकारी बँकांनीही म्युच्युअल फंड सुरु केले. उदारीकरणाच्या धोरणानंतर खाजगी क्षेत्रानेही यात पाय रोवल्यामुळे म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढत राहिली. असे असले तरी भारत यात अद्यापही, अगदी काही आशियायी राष्ट्रांपेक्षाही खूप मागे आहे, याचे कारण म्हणजे सर्वसामान्यांपर्यंत म्युच्युअल फंड पोहोचलेच नाहीत. म्युच्युअल फंडाची सुरुवात इंग्लंडमध्ये १८६८ साली तर अमेरिकेत १९२४ मध्ये झाली आणि आज सामान्य गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीचा हा एक पर्याय मानला जातो.  पण आपल्याकडे ही फक्त ठरावीक अर्थसाक्षरांचीच मक्तेदारी राहिली आहे. आपणही या गुंतवणुक-क्रांतीत सहभाग घेत आपली बचत अत्यंत किफायतशीरपणे गुंतवत राहू शकतो, बँकांमद्ध्ये असते तेवढीच रोकड-तरलता ठेवू शकतो...म्हणजेच हवे तेंव्हा आपण गुंतवणुक काढुनही घेऊ शकतो हे मात्र लोकांपर्यंत पोहोचले नाही. त्यामुळे एकुणातील नागरिकांच्या संपत्तीतही विशेष भर पडली नाही.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक कशी करावी यावर आपण पुढील लेखांत चर्चा करुच. पण येथे लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे सामान्य गुंतवणूकदारांसाठी व्यक्तीगत गुंतवणुकीपेक्षा तज्ञांच्या देखरेखीखालील सामुहिक गुंतवणूक नेहमीच किफायतशिर असते. गुंतवणूकी कोणत्या क्षेत्रात केल्या जाणार हे प्रत्येक फंडाच्या योजनेसोबत दिलेलेच असते त्यामुळे कोणत्या योजनेत गुंतवणूक करावी याचीही निवड करता येते. असे म्हणतात की जसे सारी अंडी एकाच टोकरीत ठेवण्यापेक्षा विभागून ठेवावीत म्हणजे जोखीम कमी होते तसेच म्युच्युअल फंडांतही करता येते. म्युचुअल फं आपल्याला विविध योजनांद्वारे गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध करून देतात. आपण त्या सर्वांची माहिती घेत आपणास योग्य वाटणारे पर्याय निवडू शकता.

आपल्या हातात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची म्हणजे खूप मोठी रक्कम आपल्याकडे असली पाहिजे हाही एक गैरसमज आहे. खरे तर गुंतवणुकदार किमान पाचशे रुपये आणि त्याच्या पटीत कितीही गुंतवणूक यात करू शकतो. रिकरिंग खात्याप्रमाणे दरमहा म्युच्युअल फंडांच्या सिप (Systematic Investment Plan) मध्ये ठरावीक पैसे भरुनही गुंतवणूक करू शकता. पारंपारिक गुंतवणुकीला हा एक मोठा पर्याय आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे लागणार आहे.

भारतीयांना नियमित गुंतवणुकीची सवय लागावी यासाठी सध्या रिलायंस म्युच्युअल फंडाद्वारे प्रत्येक महिन्यातील ७ तारीख देशभर "म्युच्युअल फंड दिवस" म्हणून साजरा केला जात आहे व त्याला लाभणारा जनसामान्यांचा पाठिंबा लक्षणीय आहे. या दिवशी रिलायंस म्युच्युअल फंडाद्वारे अनेक गुंतवणुकदार साक्षरता कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमांत आपणही आपला सहभाग नोंदवत गुंतवणूक तज्ञांचे मार्गदर्शन मिळवू शकता तसेच तुमच्या सर्व प्रश्नांची थेट उत्तरेही मिळवू शकता. यासाठी अधिक जाणण्यासाठी कृपया खालील लिंकला भेट द्या.


आपली संपत्ती वाढत रहावी ही कामना प्रत्येकजण करतो पण त्यासाठी योग्य माहितीपुर्ण निर्णयही घ्यावे लागतात. आपण म्युच्युअल फंडाबाबत जाणून घ्या. आपले काही प्रश्न असतील तर ते अवश्य विचारा.

2. “Growth of the Asset Management Business in Asia”, Lakyara, Vol. 85, Pub.- Nomura Research Institute Ltd.
https://www.nri.com/global/opinion/lakyara/2010/pdf/lkr201085.pdf
3. The Rise of Mutual Funds: An Insider's View, By Matthew P. Fink

(वैधानिक सूचना: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणतीही गुंतवणूक करतांना योजनेशी संबंधीत कागदपत्रे काळजीपुर्वक पहावीत व मगच गुंतवणुकीचा स्वजबाबदारीवर निर्णय घ्यावा.)

1 comment:

  1. I have read that the Mutual Funds schemes will be consolidated as per SEBI orders. What implications it have if I invest now in some scheme and if that scheme is merged with a single scheme? Kindly reply because I am confused and my CA doesnt know the damn. - Raviraj Kanande

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...