Thursday, September 28, 2017

वैदिक विमानांवर आरूढ होणारे शिक्षण!


वैदिक विमानांवर आरूढ होणारे शिक्षण!


मानव संसाधन मंत्र्यांचे काम हे असते की, देशातील बौद्धिक व कौशल्यांनी सक्षम विद्यार्थी घडवता येतील या दिशेने एकुणातील शिक्षण व्यवस्था नेणे व भविष्यातील सर्व प्रकारची आव्हाने पेलण्यासाठी त्यांना सक्षम बनवणे. याऐवजी आमचे मंत्री मात्र जे सिद्धच झालेले नाही अथवा सिद्ध होण्याचीही शक्यता नाही अशा गोष्टी शिक्षणक्रमात आणण्याचे सूतोवाच करतात आणि विद्यार्थ्यांना पुढे जायला प्रेरित करण्याऐवजी मिथ्या ज्ञानात रममाण व्हायला सांगतात.

केंद्रात मोदी सरकार सत्तेत आले तेव्हापासून आपले मानव संसाधन खाते हे देशाच्या एकूण बौद्धिक व कौशल्य संपदेत भर घालण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याऐवजी आपला वैदिक अजेंडा रेटण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना रा. स्व. संघाच्या विद्याभारतीतील शिक्षण पद्धतीतील काही तज्ज्ञ प्रत्यक्ष भेटले होते. त्यांनी भारतीय संस्कृती, इतिहास, विज्ञान, तत्त्वज्ञान वगैरेतील भारतीयांचं योगदान अभ्यासक्रमात असायला हवं यासाठी मोदींना आपला कार्यक्रम दिला. त्यानंतर काही दिवसांत मानव संसाधन खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर स्मृती इराणी यांनी काय केलं असेल तर अभ्यासक्रमात वेद-उपनिषदं, प्राचीन विज्ञान, सामाजिकशास्त्र, तत्त्वज्ञान, व्याकरण आणि भाषा यातील योगदान समाविष्ट करण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली व तसे निर्देश अधिकाऱ्यांना दिलेही. अर्थात, यावर प्रचंड वादळ उठले व हा वैदिक कार्यक्रम थोडा मागे टाकावा लागला. दरम्यान, दस्तुरखुद्द मोदींनीच पुरातन काळात भारतात प्लास्टिक सर्जरी व जनुकीयशास्त्राचे तंत्र कसे प्रगत होते हे गणपती व कर्णाचे उदाहरण देऊन मुंबईत एका भाषणात सांगितलेे. जगभर हसू झालेली ही माहिती त्यांना अर्थात दीनानाथ बात्रांच्या इतिहासाच्या पुस्तकांतून मिळाली असावी!

स्मृती इराणी यांच्यानंतरचे आताचे मानव संसाधनमंत्री सत्यपाल सिंग यांनी तीच री ओढत नुकतेच इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसमोर भाषण देताना म्हटले की विमानाचे पहिले यशस्वी उड्डाण राइट बंधूंनी नव्हे, तर त्यांच्याही आठ वर्षे आधी शिवकर बापूजी तळपदे यांनी केले होते व हा इतिहास आता आयआयटीच्या विद्यार्थ्यांना शिकवला पाहिजे! रामायणातील पुष्पक विमानाबद्दलही ते भरभरून बोलले. एकंदरीत संघप्रभावाखालील या सरकारच्या एकुणातीलच बौद्धिक क्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह उभ्या करणाऱ्या या बाबींकडे आपण अत्यंत गांभीर्याने पाहिले पाहिजे. पण आपण आधी त्यांच्या दाव्यातील तथ्यही तपासून पाहूयात.

भारतच नव्हे, तर चिनी, बॅबिलोनियन, ग्रीक व इजिप्शियन पुराणकथांतही विमानांचे उल्लेख येतात. रामायणातील पुष्पक विमान सर्वांना माहीतच आहे. आकाशात पक्ष्याप्रमाणे उडता यावे ही माणसाची पुरातन आकांक्षा त्याच्या पुराणकथांतून येते. ती खरोखरीच अस्तित्वात होती हे जगातील कोणताही देश समजत नाही. समरांगन सूत्रधार या भोजाच्या (११ वे शतक) ग्रंथात वास्तुशास्त्र, विहिरी/बारव कसे बांधावेत हे वर्णन करताना लाकडापासून ते पाऱ्याचा उपयोग करत पाणी/जमीन व आकाशात प्रचलित होईल अशा विमानांचा उल्लेख येतो, पण त्यात कसलीही तांत्रिक माहिती येत नाही. तो एक कल्पनाविलास आहे हे उघड आहे. ज्या ग्रंथाबद्दल फारच चर्चा असते ते ‘वैमानिकशास्त्र’ हे पुस्तक पुरातन नसून १९१८ ते १९२३ या काळात दाक्षिणात्य विद्वान सुब्बराया शास्त्री यांनी लिहिले. याच काळात ‘बृहदविमानशास्त्र’ हे पुस्तक ब्रह्ममुनी पारिव्राजक यांनी लिहिले, पण प्रसिद्ध झाले १९५९ मध्ये. सुब्बराया शास्त्रींनी त्यांच्या पुस्तकात दावा केलाय की ऋषी भारद्वाजांनी त्यांना प्रत्यक्ष दर्शन देऊन विमानशास्त्राचे ज्ञान दिले. या ग्रंथावर आधारित (कसे ते माहीत नाही. कारण पुस्तकच मुळात फार नंतर लिहिले गेले.) अथवा ऋग्वेदातील काही ऋचांवर आधारित १८९५ मध्ये शिवकर बापू तळपदेंनी ‘मरुत्सखा’ नामक विमान बनवून दादर चौपाटीवर उड्डाणाचे प्रात्यक्षिक सादर केले व त्याला टिळकही उपस्थित होते असे दावे केले गेले. पण या दाव्यांना पुष्टी देईल असा कोणताही पुरावा नाही. खुद्द ‘केसरी’तही असले कोणतेही वृत्त प्रसिद्ध झालेले नव्हते.

१९७४ मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या (बंगळुरू) डॉ. एच. एस. मुकुंदा व अन्य तीन शास्त्रज्ञांनी या दोन्ही ग्रंथांचे अध्ययन करून आपली निरीक्षणे ‘सायंटिफिक ओपिनियन’च्या अंकात नोंदवली. त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटले की विमानोड्डाणासाठी आवश्यक असलेल्या अनेक ज्ञानशाखांपैकी कशाचेही दर्शन यात दिसून येत नाही. विमानासाठी जी भौमितिक रचना या पुस्तकांत गृहीत धरण्यात आली आहे ती विमान प्रचालनासाठी वापरता येणे अशक्य आहे. शिवाय विमानाची डायमेन्शन्स गोंधळाची व वारंवार बदलणारी आहेत. त्यात सातत्य नाही. विमानाचे प्रचालन व नेव्हिगेशन कसे होणार हेही या पुस्तकांत उल्लेखले गेलेले नाही. प्रत्यक्ष उड्डाणासाठी विमानाचे वजन जसे हवे त्यापेक्षा हे कितीतरी पट जड असल्याने प्रत्यक्ष प्रयोग करून प्रात्यक्षिक घेता येणार नाही. डायमेन्शन्स देताना विती, अंगुली अशी अशास्त्रीय परिमाणे वापरली आहेत. त्यांचा प्रत्यक्ष उपयोग नाही आणि दोन्ही ग्रंथ संस्कृतात असले तरी त्यांची भाषा अर्वाचीन आहे. वैदिक संस्कृतशी त्या भाषेचा संबंध नाही. या विषयातील तज्ज्ञ जे. बी. हेअर म्हणतात, या दोन्ही पुस्तकांत असे काहीही नाही जे ज्युल्स व्हर्न आपल्या विज्ञानिकांत सांगत नव्हता. एका काल्पनिकेपलीकडे त्याला महत्त्व देता येत नाही. ही दोन्ही पुस्तके राइट बंधूंच्या प्रत्यक्ष विमानोड्डानानंतर लिहिली गेलेली आहेत. तळपदेंच्या प्रयोगाचे पुरावे उपलब्ध नाहीत.

विमानाबद्दल हे वास्तव असताना व प्लास्टिक सर्जरी व जनुकीय शास्त्रांबद्दलची मोदींची विधाने सरळ सरळ हास्यास्पद असताना हे विज्ञान म्हणून विद्यार्थ्यांना शिकवायचा नुसता विचार करणेही आपल्या शिक्षण पद्धतीला धोकेदायक आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. सारे आधुनिक विज्ञान वेदांमध्ये होते असे अशास्त्रीय पण वैदिक अहंकार सुखावणारे विधान मानव संसाधन मंत्र्यांनी करावे हे दुर्दैवी आहे. आज भारतातील एकही विद्यापीठ जागतिक दर्जाच्या दोनशे विद्यापीठांत नाही. आपण जागतिक ज्ञानात, मग ते उपयुक्ततावादी असो की निखळ सैद्धांतिक पातळीवर, कोणतीही भर घातलेली नाही. आम्ही सॉफ्टवेअरमध्ये स्वत:ला अग्रेसर समजतो, पण आमच्या देशातील कोणीही आजतागायत एकही स्वतंत्र प्रणाली बनवू शकलेले नाही. कारण आमची शिक्षण व्यवस्था, जी आज केवळ बेरोजगार निर्मितीचे अवाढव्य कारखाने बनलेली आहे.

मानव संसाधनमंत्र्यांचे काम हे असते की, देशतील एकुणातील बौद्धिक व कौशल्यांनी सक्षम विद्यार्थी घडवता येतील या दिशेने एकुणातील शिक्षण व्यवस्था नेणे व भविष्यातील सर्व प्रकारची आव्हाने पेलण्यासाठी त्यांना सक्षम बनवणे. याऐवजी आमचे मंत्री मात्र जे सिद्धच झालेले नाही अथवा सिद्ध होण्याचीही शक्यता नाही अशा गोष्टी शिक्षणक्रमात आणण्याचे सूतोवाच करतात. भारतात पुरातन काळी ज्ञान होतेच असा दावा असेल तर ते विज्ञानाच्या कसोटीवर तपासून घ्यायला वेगळी यंत्रणा असायला एक वेळ हरकत नाही. भारतात ज्ञानशून्य लोक राहत होते असेही कोणी म्हणत नाही. पण जे काही ज्ञान होते ते बीजरूपात अथवा संकल्पना स्वरूपात होते, त्याचा जो पुढचा तार्किक विकास व्हायला हवा होता तो न झाल्याने आज ते कुचकामी आहे हे समजत नसेल तर मंत्र्यांच्या बौद्धिक पातळीवर शंका घेणे स्वाभाविक आहे.

आपल्यापुढे भावी पिढी विज्ञाननिष्ठ होत जागतिक ज्ञानात भर घालू शकेल इतकी सक्षम करणे हे आव्हान आहे. बेरोजगारीचा विस्फोट पाहता आपल्याला ताज्या दमाचे नवे लघु ते महाकाय उद्योग उभे करण्याची क्षमता व प्रेरणा असलेले उद्योजक/व्यावसायिकही निर्माण करायचे आहेत. आपले समाजविज्ञान आजही थोडे थोडके नव्हे, तर पन्नास-साठ वर्षे मागे रेंगाळते आहे. त्यामुळे आपल्याला अजूनही अनेक सामाजिक प्रश्नांवरची उत्तरे सापडलेली नाहीत. आपल्याला नवप्रेरणांनी भारलेली पिढी घडवायची तर ती आधुनिक शिक्षणातूनच घडू शकते. आजचे शिक्षण पद्धती दोषांनी परिपूर्ण आहेच, पण ती बदलायची म्हणून दीनानाथ बात्राप्रणीत करून चालणार नाही. शिक्षण पद्धतीला आकलनाधारित करत ती जागतिक दर्जाच्या आधुनिक शिक्षणमूल्यांनाही पुढे नेणारी असावी लागेल. हे जमत नसेल तर मानव संसाधनमंत्र्यांनी पुढच्या पिढ्यांना किमान मध्ययुगात न्यायचा प्रयत्न करू नये!

1 comment:

  1. खुपच माहीतीपुर्ण..धन्यवाद सर.

    ReplyDelete

अमेरिकन शेतीचे भविष्य आणि आपण!

  २०५० पर्यंत ,  वाढत्या जागतिक लोकसंख्येला पोसण्यासाठी शेतीत व शेतीउत्पादनपद्धतीत काय बदल करावे लागतील यावर जगभरच्या प्रगत राष्ट्रांत नुसते...