Tuesday, November 7, 2017

कानोसा...बदलत्या समाजजाणिवांचा!


Image result for India 2025


आपण भारतीय मिथ्या इतिहासात रमणारे प्राणी आहोत. भारतात भविष्यकथन करणा-यांची रेलचेल असली तरी वास्तवदर्शी पायावर आम्ही उद्या कोठे असायला हवे आणि ते साध्य करण्यासाठी काय करायला हवे याबाबत मात्र आमचे विचारवंत मूक असतात. आर्थिक, सामाजिक व राजकीय ्प्रगती करायची तर आम्हाला ज्ञानात्मक बौद्धिक प्रगती आधी करावी लागेल व तीही कोणत्या प्रकारे आणि कशी करायची याचीही योजना आपल्याकडे आजही नाही. सरकारे येतात आणि जातात, पण मानवी समाज मात्र अखंड प्रवाही असतो. हा प्रवाह ध्येय ठरवून त्या दिशेने फार वेगाने गेला नाही तरी चालेल, संथपणे का होईना त्या दिशेने वाटचाल करेल यासाठी मात्र निश्चित धोरणे असावी लागतात. आपल्या देशातील नागरिकांच्या मानसिकता, क्षमता आणि त्यांचे स्वप्ने यांचे वास्तवदर्शी भान असावे लागते. ते आपल्याकडे आहे काय याचा विचार प्रर्त्येकजण स्वतंत्रपणे करू शकतो. २०२५ साली भारत कसा असेल आणि कोठे असायला हवा यावर जर विचार करायचा असेल तर प्रथम आपण आज कोठे उभे आहोत आणि जागतिक आव्हाने कोनती व ते कोणत्या दिशेने जाऊ पहात आहे यावरहे एक दृष्टीक्षेप टाकायला हवा.

भविष्याचे कुतुहल नाही असा माणुस क्वचित असेल. भविष्यासाठी तरतूदीही माणुस करतो ते संभाव्य व अनपेक्षीत अनिष्टांचा सामना करण्यासाठी. सरकारची अथवा व्यक्तीची अंदाजपत्रकेही एक प्रकारे भविष्याचीच आर्थिक वाटचाल ठरवत असतात. अंदाजपत्रके अथवा बजेट अनेकदा कोलमडतातही. कधी कधी ती अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वीही होतात. अंदाजपत्रक म्हणजे भविष्यातील एका कालखंडात नेमके काय व कसे साध्य करायचे याचा आराखडा व त्यासाठी केल्या गेलेल्या तरतुदी. बजेटचा कालावधी पुर्ण झाल्यानंतर आढावा घेण्याचीही पद्धत असतेच. आपल्याला काय साध्य करायचे होते आणि त्यातील किती खरोखर साध्य झाले, जे झाले नाही ते का झाले नाही याचे विश्लेषन यात अपेक्षित असते व त्यानुसार पुढचा मार्ग शोधला जातो. अर्थात ही अंदाजपत्रके केवळ आर्थिक असतात. सामाजिक, सांस्कृतीक भाकितांचा त्यात सहसा समावेश नसतो त्यामुळे त्याबाबत योजनाही नसते. पण मानवी समाजाने स्वत:च अशी उद्दिष्टे समोर ठेवत ती कशी साध्य करायची यावर उहापोह केला पाहिजे. 

हा मार्ग ब-यापैकी वास्तव असतो. म्हणजे त्याला आजच्या स्थितीचा एक बेस असतो.  हा बेस ठरवण्यासाठी वापरले जाणारे मानदंड नेहमी बरोबरच असतात असे नाही. आजची स्थिती ठरवण्याचे नेमके मानदंड काय असावेत यावर विद्वान नेहमीच चर्चा करत असतात, प्रसंगी वादही घालत असतात. सुधारणांना नेहमीच वाव असतो हेही खरे. अनेकदा अनपेक्षित आरिष्टे अशा पद्धतीने अवतरतात कि अंदाजपत्रकांना काही अर्थ राहत नाही. ही आरिष्टे निसर्गनिमित्त असतील, मानवनिर्मित असतील किंवा अंमलबजावणीतील भोंगळपणामुळेही असतील. अचानक होणारी युद्धे, दंगली, कोणा एका दुस-याच राष्ट्राची अर्थव्यवस्था एकाएकी कोसळणे यामुळेही व्यक्ती व सरकारांची अंदाजपत्रके कोसळू शकतात. मानवी समाजाचीही उद्दिष्टे साध्य होतीलच असे नाही. समाजातही ऐतिहासिक किंवा वर्तमान काळातील कारणांमुळे संघर्षांच्या स्थिती उद्भवत समाजप्रवाहाला वेगळेच वळण लागू शकते. सध्या अशा घटनांचा वेग वाढलेला आहे हे आपण सहज पाहू शकतो. नागरिक वास्तव प्रश्नांच्या सोडवणुकींपेक्षा अस्मितांच्या प्रश्नांत एकमेकांविरुद्ध उभे ठाकतात ही स्थिती गतीमान झालेली आहे. 

पण याचा अर्थ असा नसतो कि अंदाज बांधू नयेत. भविष्याचा वेध घेऊ नये. समग्र मानवजातीला अधिकाधिक स्वतंत्र, अर्थपुर्ण, निर्वैर आणि समाधानी जगण्याकडे जायचे असते. पण अधांतरी व ध्येय नसलेली स्वप्ने पाहून माणुस कोठेही कसा पोहोचेल? त्यासाठी वास्तवाचा पुरेसा आधार लागतोच. मानवजात आज कोठे आहे हे नेमके समजल्याखेरीज पुढची दिशा ठरवता येणे अशक्यच आहे हेही आपल्याला समजावून घ्यावे लागेल. 

येथे भविष्य म्हणजे एखाद्या ज्योतिषाने कुंडली मांडुन ग्रह-तारे एखाद्याच्या वा राष्ट्राच्या जीवनावर परिणाम करतील असले पोकळ भविष्य आपल्याला निश्चितच अभिप्रेत नाही. आपल्याला येथे येणा-या पुढच्या सात वर्षांत भारतीय नेमका कोठे असेल याची संभाव्य दिशा तपासणे हा आपला हेतू तर आहेच पण ध्येयांमद्ध्ये आणखी काही भर घालता येऊ शकते काय हे पाहणेही आपला हेतू असणार आहे. सात वर्षांत भारतीय किती पुढे गेलेला असेल यापेक्षा किमान २०५० सालासाठी तरी त्याने काय तयारी करायला हवी यावर विचार करणेही येथे अभिप्रेत आहे. मनुष्य समाजाने भुतकाळात अनेक ध्येये समोर ठेवली होतीच. मग ते तत्वज्ञ असतील, राजकीय धुरीण असतील अथवा शास्त्रज्ञ असतील. ती सर्व ध्येये अजुनही पुर्ण झाली असे म्हणता येणार नाही. अनेक तर आज विस्मरणात गेलेली आहेत. काही ध्येये अशीही होती कि अशी ध्येये कधीकाळी माणसाने ठरवली असतील हे आज खरे सुद्धा वाटणार नाही.

आज आपण एकविसाव्या शतकात आलो आहोत. अनेक क्षेत्रांत माणसाने अद्भुत अशी प्रगती केलेली आहे. असे असले तरी माणसासमोर हजारो वर्षांपुर्वी जे प्रश्न होते ते आजही नीटसे सुटले आहेत असे नाही. चुका सुधारत नव्या दुरुस्त्या तो अवश्य करत आला आहे, पण त्या दुरुस्त्यांनी प्रश्न सोडवले आहेत कि जटील केले आहेत हाही एक प्रश्नच आहे. खरे तर सामाजिक व म्हणुनच आर्थिक व राजकीय प्रश्न तर अधिकच जटिल बनलेले आपल्याला दिसतात. उदा. राज्यव्यवस्था नेमकी कशी असावी, अर्थव्यवस्थेचे नेमके प्रारूप कसे असावे, धर्माचे जीवनातील नेमके स्थान व आवश्यकता काय, राष्ट्रवादाची आवश्यकता आहे कि नाही, दहशतवादी प्रेरणा कोठून येतात, युद्धविहिन जागतिक व्यवस्था येऊ शकते काय, जातीसंस्थेचे अखेर काय होणार, गरीबीचे निर्मुलन शक्य आहे कि अशक्य, मानवी आरोग्याचे नेमके पुढे काय होणार, भविष्यात विविध क्षेत्रात कोणते नवे शोध लागून मानवी जीवन आमुलाग्र बदलू शकतील,  कला माध्यमांत अजुन कोणती नवी प्रारुपे येतील वगैरे असंख्य प्रश्न आज आपल्यासमोर आहेतच. यात भारतीय म्हणून आपण समस्या सोडवण्यासाठी काही ज्ञानात्मक, संशोधनात्मक भर घालण्यासाठी झटतो की या समस्या अजुन वाढवत नेत त्या जटिल व गुंतागुंतीच्या करत नेतो हा महत्वाचा प्रश्न आहे. मुळात आम्ही आमचे सामाजिक मानसशास्त्र सुदृढ करण्यासाठी नेमके काय प्रयत्न करणार आहोत यावरच आपली पुढची दिशा ठरणार आहे व याची सुरुवात केवळ आणि केवळ बौद्धिकतेच्या संरचनेपासून सुरु होते. आणि आपली नेमकी हीच सुरुवात अद्यापही झालेली नाही हे नाईलाजाने म्हणावे लागते. काही भारतियांनी जी बौद्धिक उंची गाठली ती स्वप्रेरणेने, क्वचितच तिला आपली शिक्षण अथवा सामाजिक व्यवस्थेने हातभार लावल्याचे चित्र आहे. 

बदलता समाज, शिक्षण आणि जाणीवा!

कोणताही समाज कोणत्या दिशेने जाणार आहे, तो भविष्यात कोठे आणि कसा असेल हे समजावून घ्यायचे असेल तर आजची पिढी नव्या पिढीला कशी घडवते हे आधी पहावे लागेल! पिढीमागून पिढी असा शृंखलाबद्ध प्रवास मानवी समाज करत असतो. आई-वडिल, शिक्षक आणि समाज हे नव्या पिढीवर काहीना काही संस्कार करणारे घटक असतात. समाजाची वर्तमान स्थिती नवागत नागरिकाच्या समग्र व्यक्तिमत्वावर परिणाम करत असते. समाजाच्या निराशा, स्वप्ने व जगण्याच्या प्रेरणा नकळतपणे या नवांगत नागरिकाच्याही प्रेरणा बनतात व तो त्याच परिप्रेक्षात व परिघात स्वप्न पहायला लागतो. आहे त्या समाजव्यवस्थेत अडथळ्यांवर मात करत ती स्वप्ने पुर्ण करण्याचे प्रयत्न करू लागतो. अमेरिकेतील मुलगा जी स्वप्ने पाहिल ती स्वप्ने भारतातील मध्यमवर्गातील मुलगा पाहीलच असे नाही. किंबहुना अशीही स्वप्ने असू शकतात याची तो कल्पनाही करू शकणार नाही. शेवटी व्यवस्था स्वप्नांना वावही देते आणि ती बंदिस्तही करते.

याकडे आपल्याला अत्यंत व्यापकपणे व अनेक अंगांनी पहावे लागेल. नवीन पिढी घडवणारा महत्वाचा घटक असतो व तो म्हणजे शिक्षण! विद्यार्थ्याला साक्षर बनवत विविध ज्ञानशाखांशी परिचय करून देत भविष्यात त्याला कोणत्यातरी एक आवडीच्या ज्ञानशाखेत नवी भर घालण्यासाठी अथवा एखादी नवीच ज्ञानशाखा स्वप्रतिभेने निर्माण करण्यासाठी त्याला तयार करणे म्हणजे शिक्षण!  शिक्षण म्हणजे जुलमाचा रामराम नसते. प्रत्येक विद्यार्थी स्वत:तच एक स्वतंत्र विश्व असते, व्यक्तिमत्व असते. बाह्य प्रभाव जेवढे व्यक्तिमत्व घडवायला कारण घडतात त्याहीपेक्षा त्याच्या आंतरिक प्रेरणा महत्वाच्या ठरतात. या आंतरिक प्रेरणा लहानपणी सुप्तावस्थेत असल्या तरी व्यवस्था अशी असावी लागते कि वाढत्या वयाबरोबर त्या प्रेरणांचे सुयोग्य प्रस्फुटन होत सामाजिक संरचनेत महत्वाची भर घालणारा नागरिक तयार व्हावा. 

पण आपण आजच्या आपल्या व्यवस्थेकडे पाहिले तर जे चित्र दिसते ते अत्यंत निराशाजनक आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. म्हणजे, आम्ही मुळात मुलांना शिक्षणच देत नाही तर विद्यार्थ्याला केवळ साक्षर बनवण्यापलीकडे व एक बौद्धिक श्रमिक बनवण्यापलीकडे काहीही विशेष साध्य करत नाही हे आपल्या लक्षात येईल. आमच्या द्रुष्टीने ’सब घोडे बारा टक्के’ या पद्धतीने ठराविक विषय लादत, सर्वात पास होणे बंधनकारक करत, ज्याला अधिक मार्क तो हुशार अशी धारणा बनवून बसलो आहोत.  थोडक्यात मार्क हाच आमचा गुणवत्तेचा एकमेव निकष आहे. मेरिट अथवा गुणवत्ताही आम्ही त्यावरच मोजतो. "९७% मिळूनही प्रवेश नाही आणि ’त्यांना’ ५०% ला प्रवेश..." अशा प्रकारच्या सामाजिक दुहीतही अडकतो. ही एक वंचना आहे हे मात्र आपण मुळात समजावून घेतलेलेच नाही. मुळात ९७% मिळाले म्हणून त्याचे गुणवत्ता जास्त आणि ४०% मिळाले म्हणुन गुणवत्ताच कमी असे ठरवण्याचे साधनच अस्तित्वात नाही. ही पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी करुन घेतलेली फसगत आहे. आणि आमची आजची संपुर्ण व्यवस्थाच या फसगतीवर उभी आहे. 

मुळात आपली शिक्षणव्यवस्था हीच मानवी प्रेरणांना विसंगत आहे. ’नैसर्गिक कल’ आणि त्यातच प्राविण्य मिळू देण्याच्या संध्या आम्ही नाकारलेल्या आहेत. थोडक्यात प्रगल्भ व्यक्तिमत्वाच्या भावी पिढ्या कशा घडणार नाहीत याचीच पुरेपूर काळजी आम्ही घेतली आहे. सर्वच प्रज्ञावंत होऊ शकत नाहीत हे सत्य मान्य केले तरी अशा बहुसंख्यांक विद्यार्थ्यांना जगण्याची कौशल्येसुद्धा शिकवण्यात आम्ही अजून खूप मागेच आहोत. पुन्हा वर आम्ही भावी विकासाच्या गप्पा मारतो ही तर मोठी विसंगती आहे. खरे म्हणजे आम्ही आमच्या शिक्षण पद्धतीतून मुलांना खुरटवणारी, संकुचित करणारी, त्यांचे कुतुहल व स्वप्ने छाटणारी, कौशल्याचा अभाव असणारी पिढी घडवत आहोत हे आमच्या लक्षात कधी आले नाही. या नव्या पिढ्याही मग तशाच पुढच्या साचेबंद पिढ्या घडवत जाणार यात शंका बाळगण्याचे कारण नाही.

आज आपण पाहिले तर जागतिक पहिल्या २०० विद्यापीठांत आमचे एकही विद्यापीठ नाही. कोणत्याही ज्ञानशाखेत नवी भर घालणारे विद्वान व शास्त्रज्ञ आम्ही घडवले नाहीत. विदेशात जाऊन जे भारतीय अगदी नोबेलप्राप्तही होऊ शकले त्यांची गणना यात करण्याचे कारण नाही. ते येथेच असते तर ते तसे घडू शकले नसते कारण आपली व्यवस्थाच मुळात प्रतिभेला फुलारू देणारी नाही हे कटू वास्तव त्यातुनच अधोरेखित होते. भारताचा नव्या जगात ज्ञान-विज्ञानक्षेत्रात नेमका वाटा काय हे पहायला गेले तर निराशाजनक चित्र सामोरे येते ते यामुळेच!

मग आम्ही आमची नवीन पिढी सबल, सक्षम व प्रज्ञावंत बनवू शकलो नाही तर आमचे भविष्यही तेवढेच मरगळलेले राहणार यात शंका नाही. आम्ही सर्व प्रश्नांवर आंदोलने करत आलेलो आहे. पण आमच्याच भवितव्याचा कळीचा प्रश्न जो आहे त्याबाबत मात्र आम्ही थंडगार आहोत. इंग्रजी माध्यमांच्या इंटरन्यशनल म्हणवणा-या शाळांत भरमसाठ पैसे भरून मुलाला प्रवेश मिळवला कि आपण कृतकृत्य झालो असेच सर्व पालकांना वाटते. मुलांनी कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा, कशात करियर करावे हेही एकुणातला "बाजार-ट्रेंड" पाहून ठरवले जाते. पण ज्याला हे सारे करायचंय त्यालाच मात्र नेमके विचारात घेतले जात नाही. मतामतांच्या गलबल्यात तो दुर्लक्षितच राहतो व शेवटी मिळेल ती वाट चालू लागतो. एका अर्थाने आम्ही परिस्थितीशरण पिढी बनवत आहोत हे आपल्या लक्षात येत नाही.

आपल्या व्यवस्थेतच दोष आहेत हे मान्य करू. हा दोष आमच्या विचार करण्याच्या पद्धतीतील भरकटलेल्या दिशेमुळे निर्माण झाला आहे हेही आपण स्विकारू. पण चुका कधी ना कधी दुरुस्त कराव्याच लागतात. एका रात्रीत व्यवस्था बदलत नाही हे मान्य केले तरी व्यवस्था बदलासाठी मानसिकता बनवणे व पुढाकार घेणारे काहीजण तरी पुढे येणे महत्वाचे असते. आणि येथे तर पुढाकार पालकांना घ्यावा लागणार आहे. पण त्यासाठी पालकांनाच शिक्षण म्हणजे नेमके काय याची जाण व भान देणे आवश्यक आहे. वर्तमानाचेच ते आव्हान आहे. 

जागतिकीकरणाकडे वाटचाल

आज आपण जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत आहोत. राष्ट्रवादही आपापले स्वरूप बदलतांना दिसत आहे त्यामुळे भविष्यातील जागतिकीकरण नेमके कसे असेल हेही आपल्याला अंदाजावे लागेल. जागतिक ज्ञान अशी संकल्पना असली तरी सर्वच ज्ञान जगातील सर्वांनाच उपलब्ध होऊ शकत नाही. अनेक राष्ट्रे आपापली ज्ञानात्मक गुपिते जपत असतात. त्याला आपण बौद्धिक  भांडवलशाही म्हणू शकतो व ती मक्तेदारीयुक्तच असणार यात शंका बाळगायचे कारण नाही. त्यामुळे इतरांनी ज्ञान विकसीत करावे व मग त्यापासून आपण शिकावे आणि बौद्धिक श्रमिक म्हणून पोटापाण्याला लागावे अशी योजना, आज आहे तशीच नजिकच्या भविष्यात असेलच असे नाही. खरे तर ज्ञानावर समस्त मानवजातीचा अधिकार हवा. पण तसे वास्तव नाही. आणि आपली सुरुवात तर ज्ञान म्हणजे काय या प्राथमिक स्तरावरच घुटमळते आहे. माहिती म्हणजे ज्ञान नव्हे हे अजून अगणित नागरिकांना तर माहितच नाही.  ते माहित नसेल तर भविष्यातील ज्ञान-क्रांतीच्या दिशा कोणत्या असतील हे नेमके कसे समजणार? त्या शोधण्यासाठी आम्ही भारतीय कसा प्रयत्न करणार? आजही उच्चविद्याभुषित या संदर्भात गोंधळलेले दिसतात. सामान्यांची मग काय गत असणार? 

भविष्यातील बुद्धीवाद हा आज आहे तसा राहणार नाही. भविष्यातील सामाजिक व आर्थिक आव्हानेही वेगळी असतील. त्याची प्रारुपे बदलतील. प्रश्नांचे गुंतवळे वेगळ्या स्वरुपात सामोरे येतील. किंबहुना जीवनशैलीच अत्यंत वेगळी बनलेली असेल. पण ती कशी असेल अत्घवा असावी हे ठरवण्याचीही शक्ती आम्ही प्रगल्भ पिढ्यांच्या अभावात घालवून बसलेलो असू. प्रगल्भ पिढी घडते ती बंधमुक्त शिक्षणातून. मानवी प्रेरणांना अवसर देणा-या खुल्या व्यवस्थेतून. आज आपल्याला सर्वप्रथम विचार करावा लागणार आहे तो शिक्षणाबाबत, तिच्या पद्धतीबाबत. कार्यक्षम अंमलबजावणीबाबत. पालक ते शिक्षक आणि सभोवतालची व्यवस्थाच सक्षम नवी पिढी बनवू शकते. आम्हाला केवळ साक्षर नकोत तर बौद्धिक झेपा घ्यायला निरंतर सज्ज अशा प्रगल्भ वाघांची पिढी घडवायची आहे. त्यातच आमच्या समाजाचे, राष्ट्राच उज्ज्वल भविष्य सामावलेले आहे हे आम्हाला लक्षात घ्यावे लागेल.

समाज कसा असणार हे समाजात बुद्धीवंत, प्रज्ञावंत किती अहेत व ते कोणत्या दिशेने विचार करतात यावर जेवढे अवलंबुन असते तेवढेच ते अन्य राष्ट्रे कोणत्या दिशेने प्रगती करत जातात यावरही अवलंबुन असते. परकीय प्रभावाने समाजाची दिशा ठरणे अनेकदा अडचणीचे असते कारण मुळात त्यांच्या प्रगतीचा मुलगाभा न समजताच अनुकरणातुन ही दिशा नाइलाजाने स्विकारावी लागत असते. आपल्याला तसे होणे परवडणारे नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

कृत्रीम बुद्धिमत्ता, यंत्रमानवीकरणची आव्हाने

प्रगत राष्ट्रांत सध्या जोरदार चर्चा चालु आहे ती श्रमिकांची व कनिष्ठ कार्यांसाठी लागणा-या कर्मचा-यांची जागा यंत्रमानवांनी घेणे कितपत संयुक्तिक व नैतिक आहे यावर. औषधी उत्पादन, शेतकी ते अनेक रसायनी उद्योगांत अवाढव्य कारखाने यंत्रमानवांच्या वापराला पसंती देतांना दिसून येतात. काहींनी त्यांचा वापर सुरुही केला आहे. त्यात आता भर पडली आहे ती म्हणजे "कृत्रीम बुद्धीमत्ता" (Artificial Intelligence) या वेगाने विकसित होत चाललेल्य संकल्पनेची. येथे मानवी मेंदुची जागाच संगणक कसे घेतील याचा प्रयत्न सुरु आहे. संगणक सध्या माहितीचे विश्लेशन करतो पण निर्णय घेत नाही. आवाज ऐकुन त्याचे भावात्मक विश्लेषन करत नाही. वासही घेऊ शकत नाही कि पर्यावरणीय बदलांना प्रतिसादही देत नाही. विचार करणे हे मानवाचे महत्वाचे वैशिष्ट्य. पण सध्याचे संगणक विचार करु शकत नाही. 

पण संगणकांनी तसे करावे...किंबहुना संगणकांनी मनुष्याचीच जागा घ्यावी यासाठी प्रयत्न होत आहेत. यासाठी पुंजयामिकीय संगणकप्रणाली (Quantum mechanic based system) बनवता येईल अशी संकल्पना मी १९९८ साली बेंगलोर येथे एका कार्यशाळेत मांडली होती. हे काम माझ्या हातून होऊ शकले नसले तरी आता जगात याही दिशेने प्रयत्न सुरु आहेत व त्याला कधी ना कधी यश मिळेल यातही शंका नाही. शिवाय मानवी मेंदू व संगणकीय चिप्स यांचा संकर करुनही अधिक प्रगत अर्धयंत्रमानव बनवता येईल काय या शक्यतेवर केवळ विज्ञानिकाच नव्हे तर शास्त्रज्ञही विचार करत आहेत. प्रयोग करत आहेत. म्हणजेच माणसाची जागा संगणक घेऊ लागतील अशी शक्यता येत्या ७-८ वर्षांत नाकारता येत नाही. 

समजा उद्या सर्वच उद्योगांनी यंत्रमानव वापरायला सुरुवात केली व पगारी नोकरांची गरजच संपवली तर काय हाहा:कार उडु शकतो याची आपण कल्पना करु शकतो. कृत्रीम बुद्धीमत्तेच्या मानवसदृष संगणक-मानवाची निर्मिती झालीच तर मग तर मनुष्याचीच गरज राहणार नाही कि काय अशीही भिती आहेच. या सर्वांत कायदा महत्वाचा रोल बजावत प्रायोगिक पातळीवर सोडले तर अन्यत्र असे घडू दिले जानार नाही हा आपला आशावाद आहे. रोबोटिक्सचा उपयोग आजच अनेक क्षेत्रांत करायला सुरुवात झाली आहे. उद्या ती लाट सर्वत्र  पसरायला वेळ लागणार नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर फ़ोक्सकोन (Foxconn) या जगातील अवाढव्य कंत्राटी उत्पादक कंपनीचे घेता येईल. चीनमद्ध्ये २०११ साली या कंपनीचे दहा लाख कर्मचारी होते. याच वर्षी कंपनीने दहा हजार रोबो बसवले व "यंत्रमानवीकरणाची" सुरुवात केली. आता दरवर्षी तीस हजार रोबो बसवले जात आहेत. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टेरी गौ म्हणतात कि हाच दर ते प्रतिवर्षी एक लाख रोबो एवढा वाढवनार आहेत. याचाच अर्थ दहा लाख कर्मचा-यांची गरजच राहणार नाही. अन्य कंपन्यांचीही हीच दिशा आहे. 

याचा अर्थ आम्हा भारतियांना आजच समजावून घ्यावा लागणार आहे. एकीकडे रोजगार कमी होतील हे जेवढे सत्य आहे तसेच दुसरीकडे या नव्या क्षेत्रांत मानवी रोजगारही वाढतील असा आशावाद अनेक अर्थतज्ञ करतात. कोणाचा आशावाद अथवा निराशावाद खरा ठरेल याचे भवितव्य वर्तवता येणे शक्य नसले तरे यंत्रमानव व कृत्रीम बुद्धीमत्ता ही आव्हाने आहेत हेही मात्र खरे.

वरील बाबतीत नैतिकतेचा सिद्धांत चर्चीला जातो. माणसाची जागा कृत्रिम श्रमकौशल्ये व कृत्रीम बुद्धीमत्तेला घेऊ देणे हे नैतिक होणार नाही कारण त्यामुळे माणसांचीच गरज संपेल  व हे नैतिक व मानवीय होणार नाही असा युक्तिवाद केला जातो. या युक्तिवादात नक्कीच तथ्य आहे. परंतू नैतिकतेचाच इतिहास पाहिला तर माणसाने आपल्या नीतितत्वांतही सोयीनुसार फरक केल्याचे आपल्या लक्षत येइल. संगणक क्रांती येण्याआधी भारतात तिला नैतिकतेच्याच पातळीवर विरोध करणारे, अगदी विद्यमान सरकारात असलेल्या पक्षासहित, अनेक होते हे आपल्याला माहितच आहे. पण नीतिमुल्ये बदलतात. कायदेही बदलतात. त्यामुळे भविष्यात कायद्यांचे अथवा नैतिक मुल्यांचे संरक्षण राहीलच असे नाही. ते वेळ येताच जाऊ शकते याचे भान आम्हाला असले पाहिजे. कोणतीही नीतिमुल्ये ही स्थिर नसतात. भविष्यातील मुल्ये काय असतील याबाबतही आपल्याला विचार करावा लागणार आहे. प्रवाहाबरोबर नुसते दैवगती समजत वहात रहायचे कि प्रवाहालाच दिशा देणारे व्हायचे हे आमच्याच हाती आहे.

शिवाय सारी कामे यंत्रांनी केली व माणसाला काही कामच राहिले नाही तर तो उत्पन्न मिळवणार कोठुन? जगणार कसा? तो बाजारातुन काय व कसे खरेदी करेल कारण खरेदी करायला उत्पन्न म्हणजेच क्रयशक्ती लागते. रोबोंना शारिरिक गरजाच नसल्याने तो काही केल्या "खरेदीदार" होणार नाही.  थोडक्यात संपुर्ण अर्थव्यवस्थाच कोलमडून पडेल. किंवा सर्व मानवी नागरिकांना फुकट वा अतिस्वस्त जीवनमान उपलब्ध करुन द्यावे लागेल. पण मग उद्योगांच्या नफेखोरीचे काय? नफ्याखेरीज ते कशाला उत्पादने करतील? किंवा असेही होईल कि रोबोटिक्सच्या वापरामुळे उत्पादनेच एवढी स्वस्त होतील कि अल्प रोजगारातही अथवा बेरोजगारांनाही सुखसमृद्ध जीवन जगता येईल अशी परिस्थिती निर्माण होईल. पण आपण एका अनिश्चित स्थितीकडे  वेगाने वाटच्घाल करत आहोत व नेमके त्याचेच भान आपल्याला नाही.

पुढारलेले विज्ञान व तंत्रज्ञान

अनेकदा असे म्हटले जाते कि आजकाल तंत्रज्ञानाचा वेग अचाट वाढला आहे. एक व्हर्जन येते न येते तोच त्याहीपेक्षा प्रगत व्हर्जन बाजारात हजरच असते. हे खरे आहे कि मानवी जीवनाला सुखद व्हावे यासाठी तंत्रज्ञाने नवनवीन संशोधन करत प्रगत होतात व त्यामुळे नवनवीन उत्पादने आपल्यासाठी आणत असतात. तंत्रज्ञानाचा वेग अधिक नसून ते शिकण्याचा आपला वेग कमी आहे हेही एक वास्तव आहे हे मात्र आम्ही विसरत असतो. शिवाय तंत्रज्ञानांची गरज कितपत आहे याचाही अंदाज आम्हाला कधीच येत नाही. कारण ते ठरवणारी साधने नेहमीच बाह्य असतात. आम्ही तंत्रज्ञान वापरू अथवा न वापरू, ती शिकण्यात आम्हाला रस असतो काय, तेवढी जिज्ञासा असते काय हा प्रश्न मात्र अवश्य असतो. कल्पक, जिज्ञासू , अभ्यासू व बौद्धिक मेहनत घेऊ शकणा-यांचीच फक्त भविष्यात गरज असेल काय हा प्रश्न आपल्यासमोर आजच उभा ठाकला आहे व तशी स्थिती निर्माण झालीच तर तिला कसे तोंड द्यायचे याचीही खबरबात आपल्याला नाही हे वास्तव आहे. आज जी स्मार्ट मशिन्स निर्माण होताहेत त्यांचा सरासरी आयक्यू १०० एवढा आहे. तंत्रज्ञानातील प्रगती याच वेगाने सुरु राहिली तर पुढील पंचविस वर्षात अमेरिकन नागरिकांच्या सरासरी आयक्यूच्या ९०% पेक्षा जास्त आयक्यू असणारी कृत्रीम बुद्धीमत्ता तयार होईल. म्हणजेच एकट्या अमेरिकेतील पाच कोटी रोजगार जातील असा तज्ञांचा होरा आहे. जगात काय होईल याची कल्पना केलेली बरी.

या स्मार्ट मशिन्स, म्हणजे कृत्रीम बुद्धीमत्ता असलेले यंत्र वा संगणक मानव काय काय करू शकतील? काही उदाहरणे आपण येथे अवश्य पाहुयात. श्रमिकांची जागा घेणे हा एक भाग झाला. तेथे अधिक बुद्धीमत्तेची गरज नसते. आजकाल फोकल्यंड वगैरे ब-यापैकी श्रमिकांची जागा घेतच आहेत व त्यामुळे रोजगार कमी होतोय असेही फारसे दिसत नाही. पण सध्या मुळात श्रमिकांचीच कमतरता जगभर भेडसावते आहे. त्यामुळे त्यांचा परिणाम न जाणवता उलट काम वेगाने होऊ लागले आहे असे एकीकडे चित्र आहे. पण ही झाली आजची अवस्था. मनुष्याची गरज असते नियंत्रण ठेवण्यासाठी व स्थिती पाहून त्वरित निर्णय घेण्यासाठी. 

पण आता तंत्रज्ञान फार पुढे जाते आहे. अगदी वैद्यकिय क्षेत्रातही कृत्रीम बुद्धीमत्ता वापरात येवू लागली आहे. उदाहरणार्थ जॉन्सन एंड जॉन्सन या कंपनीने २०१३ मध्येच सिड्यसिस मशीन बनवली आहे. आता कोणत्याही भूलतज्ञाची गरज राहणार नाही अशा पद्धतीने हे वैद्यकिय मशीन काम करते. रेडिओलोजीसारख्या अत्यंत तज्ञतेची गरज असलेल्या क्षेत्रातही संगणकीय कृत्रीम बुद्धीमत्ता डायग्नोसिस करण्यासाठी वापरता येईल असे संशोधन पुर्ण झाले आहे. मानसशास्त्रासारख्या क्षेत्रातही मानसिक समस्यांचे विश्लेशन नजिकच्याच काळात संगणक करू लागतील अशी चिन्हे आहेत. म्हणजे भविष्यात जनरल फिजिशियनची तर मुळीच गरज राहणार नाही अशी ही चिन्हे नाहीत काय?

खरे म्हणजे मानवी गरजांचा वेग भागवायला तंत्रज्ञान मागुन पळत असते. किंवा अनेक गरजा कृत्रीमरित्याच अशा उत्पन्न केल्या जातात कि सगळ्यांना ती जणू आपली नैसर्गिक गरजच आहे असे वाटून ते गरजापूर्ती करण्यासाठी नव्या साधनांमागे पळू लागतात. या भविष्यातील आपल्या गरजा काय असतील याचा आपल्याला मुळात अंदाजच नाही. आपल्याला मोबाईलची एवढी गरज असेल असे जर कोणी २५ वर्षांपुर्वी सांगितले असते तर आपण त्याला वेड्यात काढले असते. पण आज भिका-याचेही मोबाईलशिवाय चालत नाही हे वास्तव आहे. म्हणजे कोनत्या गरजा आपल्यात निर्माण केल्या जातील हे आपल्याला माहित नसते किंवा आपण त्यावर विचारही करत नाही. प्रवाहात येईल त्या लाटेवर स्वार व्हायचे तेवढे आपल्याला माहित असते, पण लाट निर्माण करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी जे वातावरण व बौद्धिक सामर्थ्य लागते ते आमच्यात आहे काय हा खरा प्रश्न आहे. ते नसेल तर आपल्या महान संस्कृती आणि परंपरांच्या वायफळ गप्पा हाकण्यात काही अर्थ नाही हे ओघाने आलेच. 

पेच : शिक्षण व गुणवत्तेचा

दुस-याच भागात मी म्हटल्याप्रमाणे मुळात आमची शिक्षण व्यवस्थाच इतकी बंदिस्त आणि आदिम आहे कि त्यापुढे गुरुकुलांतील शिक्षण बरे वाटावे. मुळात आमच्या शिक्षणपद्धतीला मुळात कसल्या शैक्षणिक तत्वज्ञानाचा आधार नाही. व्यावहारिक/जीवन स्पर्धेत अडकलेले पालक आपले अपत्य अमुकच का शिकावे तमुक का नाही या विचारांनी नव्हे तर आपले अपत्य काय शिकले तर त्याला व म्हणुन पालकांना भविष्यात व्यावहारिक फायदा होईल त्याचाच विचार करतात आणि शिक्षणपद्धती त्याला साथ देते. नव्हे त्या विचारसरण्यांना प्रोत्साहन देते. बरे, व्यावहारिक फायदा म्हणजे तरी काय? तर आज ज्या क्षेत्रात मागणी आहे त्यातच पोरा-पोरींना कसेबसे ढकलत त्यांना एकदाचे एखाद्या नोकरीला चिकटवायचे. हे झाले कि त्यांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटते. दशकापुर्वी आयटी क्षेत्रात मोठी मागणी होती म्हणून कोणीही त्या क्षेत्रात शिक्षण मिळवायला धडपडू लागले होते. फायदा झाला तो शिकवणा-या संस्थांचा. आज या क्षेत्रातील मागणी-पुरवठा पार बदलून गेला आहे हे जीवंत उदाहरण आहे. अनेक क्षेत्रांचे तसे झाले आहे. भविष्यातही असेच होईल. कारण बौद्धिक साधनसंपत्तीची जपणूक, वाढवणूक आणि त्यासाठी आवश्यक काटेर्कोर नियोजनच आपल्याकडे नाही. 

शिक्षणाचेही मुलभूत तत्वज्ञान असते याचा विसर सर्व व्यवस्थेला पडला आहे. त्यातुनच बनचुकेगिरी, बनवेगिरी व शैक्षणिक व्यभिचाराला उत आला आहे. आम्ही शिक्षणाच्या निमित्ताने शिक्षण देणा-यांना व्यभिचारी व्यापारी बनायला प्रोत्साहन देत पुढील पिढ्यांचे पंख छाटुन टाकण्याच्या उद्योगाला हातभार लावत आहोत हे पालकांच्या लक्षात येईल तो सुदिन! आम्हाला भविष्यातील आव्हानांचा वेध घेत त्या आव्हानांवर स्वार होणारी पिढी घडवायची आहे आणि त्याचा मार्ग आम्ही ही पिढी कशी घडवायला हातभार लावतो यावर अवलंबून आहे. 

शेतीचे बदलते स्वरुप

आमच्या आजच्या समस्या या वेगळ्याच आहेत. खरे तर आदिम स्तरावरच्या आहेत. कुपोषणाच्या आहेत. शेतीतील हाहा:काराच्या आहेत. शोषित-वंचितांच्या हातांना मुळात काय आणि कसे काम द्यावे याच्या आहेत. आमच्या समस्या जातीय आहेत आणि धार्मिकही आहेत. याच समस्यांनी आमचे जीवन एवढे व्यापले आहे की आम्ही आमच्याच कालांधारी गुंफेत रममाण होत हाती असली-नसलेली शस्त्रे परजत एकमेकांवर द्वेषाने तुटून पडलो आहोत. आरक्षण हेच आम्हाला आजही प्रगतीचे साधन वातते. पण जातसमस्या या वेगळ्या अर्थसमस्येत बदललेल्या आहेत आणि त्यावर नवे उत्तर शोधले पाहिजे हे आमच्या सामाजिक विचारवंतांच्या गांवीही नाही. प्रत्येक जातीत एक वेगळी स्तरीय संरचना झाली आहे आणि आपल्या "जातीय" हक्कांसाठी जे संघर्ष करतात ते आपल्याच जातीतील वंचितांबाबत मात्र कसलीही भुमिका घेत नाहीत. जातीनिर्मुलनाचे आव आनणारे चळवळे आपल्याच जातीतील पोटजातीही अद्याप हटवू शकलेले नाहीत. सर्वधर्मीय मुर्ख धर्ममार्तंड आणि त्यांचे उन्मादी अनुयायी कालबाह्य, जमीनीतच गाडून टाकण्याचीता असलेल्या धर्मग्रंथांतील येडचाप धर्माज्ञांना शिरिओधार्य मानत आजही अमानवी व्यवहार तर करतातच पण प्रसंगी हिंसकही होतात. आणि हे मतानुनयी शासन ते खपवुनही घेते. पुढील साताठ वर्षांत या स्थितीत बदल होण्याची सुतराम शक्यता नाही. प्रमाण तेवढे कमी-अधिक होऊ शकते एवढेच.

वंचितांची संख्या अधिक असणे हे अर्थव्यवस्थेचे अपयश आहे. आपण समाजवादी अर्थव्यवस्था अधिकृतपने स्विकारल्यामुळे नागरिकांना पुरेसे व्यवसाय स्वातंत्र्य नाही. शेतकरी व शेती तर कायद्यांच्या कचाट्यार्त बांधून ठेवली आहे. आपला संपत्तीचा अधिकार, व्यवसायाचे स्वातंत्र्य केवळ कागदावर असून प्रत्यक्षात व्यवसाय करु पाहणा-याला परवान्यांच्या चक्रात आजही एवढे अडकावले गेलेले आहे कि ९०% होतकरू व्यावसायिक पहिल्या किंवा दुस-या फेरीतच गारद होतात. आपले वित्तधोरण समाजानुकूल नसून ते फक्त नफ्यातच असलेल्या उद्योजकांना अनुकूल आहे. मग तो नफा केवळ कागदोपर्त्री असला तरी चालतो. तत्कालीक कारणांनी अडचणीत आलेल्या व्यवसायांना वित्तीय संस्था नुसत्याच वाळीत टाकत नाहीत तर वसुलीची सारी शस्त्रे उपसतात व पुन्हा सावरू शकणा-या उद्योगाला ठारच मारून टाकतात आणि याला आम्ही समाजवादी धोरणे म्हणतो! समाजवाद हा अल्पसंख्यांक भांदवलदारांच्या हितासाठी राबत असतो, जनसामान्यांच्या नाही हे आम्हाला सत्तर वर्ष उलटून गेली तरी समजलेले नाही. लघुत्तम ते मध्यम उद्योग वेगाने पुढे यावेत तरच आप्लल्या देशातील बेरोजगारीची गहन होत चाललेली समस्या सुटायला मदत होईल हे आमच्या गांवीही नाही.

५५% नागरिक शेतीवर अवलम्बून आहेत. हे नागरिक आर्थिक दृष्ट्या सबल होत नाहीत तोवर त्यांची क्रयशक्ती वाढून देशाची अर्थव्यवस्थाही भरभक्कम होणार नाही. जागतिकीकरणाचे लाभ उद्योगजगताला होत असले तरी शेती हे क्षेत्र मात्र एवढ्या बंधनांत आहे की जागतिकीकरण हे त्याला मात्र शापासारखे झाले आहे. म्हणजेच हे सरकार एका क्षेत्राबाबत थोडेफार उदार असले तरी मुलभूत क्षेत्राबाबत अनुदार आहे हे उघड आहे आणि ही समाजवाद निर्मित भिषण विषमता आहे. समाजवादाला तिलांजली देत आम्ही स्वतंत्रतावादी आर्थिक धोरणे स्विकारणार आहोत की नाही हा खरा प्रश्न आहे व याचा निकाल आम्हाला येत्या २०२५ पर्यंत तरी लावावाच लागेल. 

आर्थिक व सामाजिक प्रश्नांचा ताळमेळ

आर्थिक प्रश्न आणि सामाजिक प्रश्न यांचा निकटचा संबंध आहे हे समजावून घ्यायला हवे. दरीद्री लोक आपली जात हेच जगण्याचे शस्त्र बनवत इतरांचा द्वेष करू लागतात. किंबहुना वंचितता हे सामाजिक लढ्यांचे मुख्य भांदवल असते. हेच भांडवल साम्यवादी, नक्षलवादी वापरत आहेत व नव्या उद्रेकाच्या दिशेने देशाला नेत आहेत आणि हे पहात असुनही त्यावर  निरंतर सामाजिक चर्चेची आम्हाला गरजच भासत नाही यातच आमचा बौद्धिक सवंगपणा दिसून येतो. 

एकीकडे जग अत्याधुकतेकडून अतिअत्याधुनिकतेकडे वाटचाल करू पहात आहे. आमची वातचाल भविष्याकडे कमी व गतकालीन संघर्षांकडेच अधिक होत आहे. अर्थप्रेरणा विकसित करत त्यांना वाव देणारी व्यवस्था निर्माण करायची असेल तर आम्हाला आधी आमच्या ज्ञानप्रेरणा बदलाव्या लागतील हे आम्हाला समजाऊन घ्यावे लागेल. जगाच्या नुसत्या ज्ञानात भर घालण्याची कामगिरी आम्हाला करून चालणार नाही तर नव्या जगाला सुसंगत अर्थतत्वज्ञानही तयार करावे लागेल. ते उधार-उसणवारीने नव्हे तर स्वयंप्रेरणांनी. 

साताठ वर्ष हा इतिहासात फार छोटा टप्पा असला तरी असंभाव्य कार्येही अल्पकाळात जगात झालेली आहेत. पण आम्ही मनावर साठलेली जळमटे साफ करत स्वच्छ दृष्टीने जगाकडे पाहतो की नाही यावर हे अवलंबून आहे. येत्या साताठ वर्षांत एवढे जरी साध्य झाले तरच जगाच्या स्पर्धेत भारतीय माणूस सन्मानाने जगू शकेल अशी आशा आहे.

-संजय सोनवणी

(Published in "Gruhabandh deepavalee issue, 2017)

No comments:

Post a Comment

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...