Monday, November 6, 2017

रियल इस्टेट आणि म्युच्युअल फंड



स्थावर मालमत्ता, म्हणजेच रियल इस्टेट हा अनेक गुंतवणुकदारांसाठी परवलीचा शब्द बनून बसला आहे. एकतर स्थावर मालमत्ता ही डोळ्यांनी दिसते व तिच्या प्रत्यक्ष अस्तित्वामुळे एक वेगळेच मानसिक सूख मिळते. रियल इस्टेट आपल्या नियंत्रणाखाली आहे ही सुखद भावना आपल्या मनावर अधिराज्य गाजवत असते. शिवाय अनेक भागांत अथवा शहरांत रियल इस्टेटच्या किंमती अत्यंत वेगाने वाढल्याचाही अनुभव असतो. रियल इस्टेटच्या किंमती अत्यंत वेगाने कोसळलेल्या कोणी पाहिल्या नाहीत. त्यामुळे सामान्य लोकांच्या दृष्टीने ही गुंतवणूक अत्यंत आकर्षक मानली जाते. अगदी सामान्य माणसंही आपला दोन गुंठयांचा का होईना जमीनीचा तुकडा असावा यासाठी धडपड करतांना आपण पहात असतो. जर कोणी रियल इस्टेटमध्ये आजवर गुंतवणूक केली नसेल तर ती केवळ त्यासाठी आवश्यक लाखोंमध्ये लागणारी रक्कम जवळ नसल्यामुळे. पण हे स्वप्न अनेकजण बाळगून असतात हे खरे आहे.

पण यामध्ये असलेली जोखिमही आपल्याला पहायला हवी. एक तर स्थावर मालमत्तेचे भाव सर्वत्र सारख्याच प्रमाणात वाढत नसतात हे एक वास्तव आहे. स्थावर मालमत्ता खरेदी करतांना आपण ती कोठे घेतो आहे हाच नव्हे तर कायदेशीर किचकट बाबींचेही पुरेसे ज्ञान आवश्यक असते. जमीन खरेदी करतांना तर गुंतवणुकदाराला फारच सावध रहावे लागते. गैर कॄषी कामासाठी (Non-agriculture) जमीन घेतांना त्यातही अनेक उपप्रकार पडतात. ते सर्वच गुंतवणूकदाराला माहित असतात असे नाही. या क्षेत्रात एजंटांचा एवढा सुळसुळाट झाला आहे की त्यामुळे प्रामाणिक कोण व अप्रामाणिक कोण हे समजणे कठीण होऊन बसते. एकच जमीन अनेकांना विकणे ते जमीनीसंदर्भातील आधीच मालकांत सुरु असलेल्या कोर्ट केसेस अथवा तीवरील कर्जाबाबत माहिती न देता दिशाभूल करणे हे प्रकार सर्रास होत असतात. आपण रियल एस्टेट फोरमवर जाऊन एजंटांच्या कारनाम्यांबद्दलच्या तक्रारी वाचल्या तर किती अकल्पनीय पद्धतीने फसवणुकी केल्या जातात हे आपल्या लक्षात येईल. (संदर्भ- https://www.indianrealestateforum.com) यात छोट्या गुंतवणुकदारांचे आर्थिक नुकसान तर होतेच पण मनस्ताप व कोर्ट-कचे-यांत पैसा व वेळ जातो तो वेगळाच! त्यामुळे स्थावर मालमत्ता घेतांना डोळ्यांत तेल घालून दक्ष तर रहावे लागतेच पण त्यासाठी वकीलांवर वेगळा खर्चही करावा लागतो.

एवढेही करुन योग्य स्थावर मालमत्ता मिळालीच तरी ती विकण्यासाठी द्यावा लागणारा वेळ हा एक महत्वाचा भाग राहतोच. रोकड तरलतेच्या बाबतीत स्थावर मालमत्ता ही नक्कीच आदर्श गुंतवणूक नाही. मालमत्ता जोवर आपल्या नांवावर आहे तोवर देखभालीचा खर्च आपल्याला करावा लागतो तो वेगळाच. एवढे करुनही मालमत्तेची अपेक्षित किंमत आणि प्रत्यक्ष व्यवहाराच्या वेळी मिळणारी किंमत यातही तफावत असते. विशेष करून शेतजमीनीत गुंतवणूक करणा-यांना या अडचणीचा सामना करावा लागतो. उदाहणार्थ चाकणजवळ विमानतळ होणार या बातमीने त्या भागातील जमीनींचे भाव अचानक खूप वाढले होते. पण अनेक वर्ष भिजत घोंगडे पडल्यावर हा विमानतळ अन्यत्र हलवला गेला. त्यामुळे विमानतळ झाल्याने अजून भाव वाढतील या आशेने चढ्या भावाने ज्यांनी त्या भागात जमीनी अथवा सदनिकांत गुंतवणूक केली होती त्यांचे आर्थिक नुकसान झाले. सर्वसामान्य गुंतवणूकदारांना असे नुकसान सोसणे परवडत नाही हे उघड आहे.

तुलना करता आपल्या लक्षात येईल की स्थावर मालमत्तेतील गुंतवणूकीला म्युचुअल फंड हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. रियल इस्टेट या क्षेत्रातच गुंतवणूकी करणारे काही फंडही आहेत. त्यांच्याकडे तज्ञांची व लिगल फोर्सची वानवा नसल्याने कायदेशिर किचकट बाबी ते अधिक चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतात. असेही विशिष्ट क्षेत्राला वाहिलेले फंड आपल्याला एक पर्याय देत असतात. त्याच वेळेस आपण आधी जेवढ्या प्रकारचे म्युचुअल फंड या मालिकेत पाहिले त्यातील कोणताही सुरक्षित वाटणा-या फंडातही आपण विभागुण गुंतवणूक करू शकता. यात रोकडतरलता हा भाग अबाधित तर राहतोच पण वर विषद केलेल्या अनेक कटकटी वाचतात. हवी तेंव्हा गुंतवणूक करता येणे व हवी तेंव्हा लाभासहित काढून घेता येणे ही सुविधा तुम्हाला रियल इस्टेटचा पर्याय देत नाही. 


राहण्यासाठी घर घेणे ही आपण जीवनावश्यक बाब मानतो. त्यासाठी जवळ पुरेशी रक्कम नसेल तर कर्जही काढतो. पण अनेकदा कर्ज काढण्यासाठी जो मार्जिन मनी (गुंतवणुकीतील स्वत:चा हिस्सा) जवळ नसल्याने स्वत:साठी घर घेण्याचा कार्यक्रमही पुढे पुढे ढकलावा लागतो. आपण नोकरदार असाल किंवा छोटे व्यावसायिक असाल तर सुरुवातीपासुनच म्युच्युअल फंडांच्या पद्धतशीर गुंतवणूक योजनेत (SIP) दरमहा किंवा टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करत गेलात तर विशिष्ट कालावधीत मार्जिन मनी उभा करण्यास आपल्याला मदतच होऊ शकते व आपले घराचे स्वप्न साकार होऊ शकते. थोडक्यात म्युच्युअल फंड ही तुलनेने आपल्या सर्व गरजांची पुर्तता करू शकतात हे आपल्या लक्षात येईल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या
https://www.reliancemutual.com/campaigns/RMFContest/index.html

(वैधानिक सूचना: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणतीही गुंतवणूक करतांना योजनेशी संबंधीत कागदपत्रे काळजीपुर्वक पहावीत व मगच गुंतवणुकीचा स्वजबाबदारीवर निर्णय घ्यावा.)

1 comment:

  1. Ajun ek mudda garajechya veli paisa ubha karna mutual funds chi units vikun sahaj karta yeto. malmatta viktana ek tar 10L chi garaj asli tari 50L chi purna malmatta vikavi lagu shakte. Dusra mhanje teva 50L javal asnara manus milna pan avaghad aste.

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...