Sunday, December 17, 2017

...यांना विज्ञानाचे वावडे!


...यांना विज्ञानाचे वावडे!


भारतीय जनमानसावर रामाचे गारुड खूप मोठे आहे. जवळपास प्रत्येक खेड्यापाड्यात वनवासाच्या काळात राम-सीता येऊन गेलेले असतात. सीता न्हाण्याही असतात. महिलांच्या ओव्यांतूनही राम-सीता असतात. महात्मा गांधीही या गारुडापासून मुक्त नव्हते. ‘रामराज्य’ ही त्यांची त्यांची लाडकी संकल्पना. अर्थात ती व्यापक मानवतावादी आणि कल्याणकारी परिप्रेक्ष्यातील संकल्पना होती. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हेसुद्धा ‘राम’ प्रेमी. ही मंडळी पुनरुज्जीवनवादी असल्याने आणि विज्ञानाशी त्यांचा बहुधा दुरान्वयानेही संबंध येत नसल्याने त्यांनी रामाच्या जनमानसातील भावनेचा विध्वंसक राजकारणाशी संबंध जोडला.

गुजरात निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याच्या आदल्याच दिवशी अमेरिकेत सायन्स वाहिनीने उपग्रहीय चित्रे आणि अन्य ठिकाणांवरून जमा केलेल्या माहितीवरून बनवलेल्या रिपोर्टचा एक प्रोमो प्रसिद्ध केला आणि पुनरुज्जीवनवाद्यांना उकळ्या फुटल्या. तो झपाट्याने व्हायरलही झाला. या प्रोमोत भारत -श्रीलंकेला जोडणारा पूल नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे, असा दावा केला. भारतात हा प्रोमो व्हायरल झाला. स्मृती इराणींनी पूर्ण रिपोर्ट येण्याची वाटही न पाहता हा व्हिडिओ “जय श्रीराम’ म्हणत तो प्रोमो ट्विटही केला. त्यानंतर भाजपने लगोलग, यूपीए सरकारने “सेतुसमुद्रम’ प्रकल्पाचे समर्थन करताना सर्वोच्च न्यायालयात ‘कथित रामसेतू हा नैसर्गिक आहे, मानवनिर्मित नाही’ असे जे प्रतिज्ञापत्रक सादर केले होते त्याची आठवण काढत काँग्रेसवर “रामाचे अस्तित्व नाकारतात’ म्हणून टीकेचा भडिमारही सुरू झाला. थोडक्यात, रामाचे पुन्हा एकदा राजकारण केले गेले, ज्यात महत्त्वाच्या बाबींवर लक्ष देण्याची सामान्य रामप्रेमींनाही गरज वाटली नाही.

पहिली बाब म्हणजे नासाप्रमाणेच जगभरातील अनेक देशांचे हजारो उपग्रह पृथ्वीवरील दृश्ये टिपत असतात. उपग्रहातून मिळणाऱ्या चित्रातून पृथ्वीवर कोणत्या ठिकाणी काय असेल याचा अंदाज आला तरी त्यातून त्याची भूशास्त्रीय माहिती मिळत नाही. नासानेही असले दावे कधी केलेले नाहीत. त्यामुळे “नासा’ चे नाव घेतले म्हणजे लगोलग कोणतेही संशोधन (?) ब्रह्मवाक्याप्रमाणे सत्य असते असे काही मानायचे कारण नाही. पुरातन काळात भारतीय मुख्य भूमीशी श्रीलंकेचे बेट जोडले गेलेले होते, परंतू भूगर्भीय हालचाली आणि समुद्राची वाढलेली पातळी यामुळे तो भाग पाण्याखाली जात त्या भूभागाचे काही उंच अवशेष शेष राहिले. भारतीय प्रतिष्ठेची संस्था इस्रोनेही या भागात संशोधन करून ही नैसर्गिक, जवळपास १०३ प्रवाळ भिंतींनी बनलेली सरळ रांग असून त्याच्या तळाशी प्रवाळयुक्त रेती असल्याचे सांगितले होते. प्रवाळाश्म बनण्याची सातत्यपूर्ण प्रक्रिया आणि त्यात समुद्री लाटांमुळे होणारी सतत झीज यामुळे मूळची प्रवाळभिंत खंडित होत पाण्याखाली गेली. काही ठिकाणी या भिंतीची रुंदी साडेतीन किलोमीटर एवढी आहे. मानवनिर्मित पुलाची एखाद-दुसऱ्या का होईना ठिकाणी एवढी रुंदी कशी असू शकते? जिओलोजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने सर्व्हे करून ही खडकांची रांग सातशे अठरा हजार वर्षांपूर्वी पाण्यावर डोकावू लागली असावी तर तळची वाळू मात्र पाच -सहाशे वर्षांपूर्वी प्रवाहांसोबत वाहत आली आहे, असे मत कार्बन डेटिंग करून व्यक्त केले. शिवाय काही चौकोनी अश्म रचना या नैसर्गिक असतात व तशा त्या गुजरातच्या किनारपट्टीवर समुद्र तळाशी आढळलेल्या आहेत. अशा स्थितीत सायन्स वाहिनीचा दावा म्हणजे छद्मविज्ञानाचा आधार घेत स्वस्त प्रसिद्धी मिळवण्याचा प्रकार आहे हे उघड आहे.

नासा ही अमेरिकन अवकाश संशोधन संस्था आज जगात श्रेष्ठ मानली जाते. नासाचा हा दबदबा पाहून त्या नावाचा उपयोग करत काहीही ठोकून देणाऱ्यांची कमतरता जगात, विशेषत: भारतात, कमी नाही. फोर्ब्ज या प्रसिद्ध नियतकालिकाचाही असाच गैरवापर केला जातो. आपण गेला अनेक काळ संस्कृत ही संगणकासाठी उत्कृष्ट भाषा असून नासामध्ये त्यावर प्रयोग सुरू आहेत असे ऐकत आलो आहोत. या माहितीचा आधार काय तर म्हणे फोर्ब्जमधील १९८७ चा एक रिपोर्ट!

फोर्ब्जमध्ये वस्तुत: असला काही रिपोर्ट मुळात प्रसिद्धच झाला नव्हता. रिक ब्रिग्ज या नासामधील संशोधकाने एका निबंधात “मानवी भाषा या संगणकाच्या सध्याच्या कृत्रिम भाषांना पर्याय ठरू शकतील’, असे मत व्यक्त केले होते. त्याने या निबंधात संगणकीय आज्ञाप्रणालीसाठी “संस्कृत ही सर्वात चांगली भाषा आहे.’ असे कोठेही विधान केलेले नाही. असे असूनही पुनरुज्जीवनवादी गेला बराच काळ फोर्ब्ज आणि याच अहवालात नसलेल्या विधानांचा सोयिस्कर गैरवापर करत आले आहेत. स्मृती इराणींनी मनुष्यबळ विकास खात्याचा ताबा घेताच शिक्षणपद्धतीत नुसते संस्कृतच नव्हे तर वैदिक विज्ञान -तंत्रज्ञान आणण्याचे प्रयत्न केले होते हा इतिहास जुना नाही. संस्कृत ही जगातील एक उत्तम भाषा आहे व तिची सौंदर्यस्थानेही खूप आहेत हे मान्य केले तरी आज २००१ च्या जनगणनेनुसार भारतात केवळ १८,००० लोक संस्कृत बोलू शकतात हे वास्तव संस्कृतचे स्थान दाखवण्यास पुरेसे आहे. बोलीभाषा संगणकीय भाषेची अद्यापपर्यंत तरी जागा घेऊ शकलेल्या नाहीत!

तसेच सरस्वतीचे! उपग्रहीय छायाचित्रांतून घग्गर नदी एके काळी आता आहे त्यापेक्षा खूप मोठी असावी असे दर्शवणारी छायाचित्रे मिळाली. उपग्रहीय चित्र नदीचे नाव, वय किंवा भूगर्भीय माहिती देऊ शकत नाही. पण “हरवलेली सरस्वती सापडली’, “घग्गर नदी म्हणजेच वेदांतील सरस्वती’ असे दावे सुरू झाले. हजारो लेख तर सोडाच पण पुस्तकेही प्रसिद्ध होऊ लागली. आज त्याला एवढे मोठे वेडगळ स्वरूप मिळाले आहे की त्या भागात कोठे खोदले आणि चुकून पाणी लागले की तो हरवलेल्या सरस्वतीचा पुरावा म्हणून गवगवा करण्यात येतो. सरस्वती नदीच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. भूशास्त्रीय अभ्यासकांनी घग्गर नदीच्या पात्रात प्रदीर्घ संशोधन करत ही नदी ऋग्वेदातील सरस्वती असू शकत नाही असे सिद्ध केले तरी वैदिक धर्म इथलाच आणि सिंधू संस्कृतीही वैदिकांचीच निर्मिती हे सिद्ध करण्याच्या कैफात या शास्त्रीय संशोधनांकडे सरकारचे लक्ष जाण्याची शक्यता नाही. मुळात वैदिकांना अतिप्रिय असलेल्या सरस्वती नदीचे नाव विस्मरणात जाऊन नवे नाव घग्गर कसे पडले आणि ते वैदिकांनी कसे स्वीकारले याचे उत्तर मात्र ही पुनरुज्जीवनवादी मंडळी देत नाही!

असे असूनही वैदिक वर्चस्वतावाद लादण्यासाठी कधी राम, कधी संस्कृत तर कधी वैदिक विमानांचाही आधार घेतला जातो हे भारतीय नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे. कालिदासाच्या मेघदूतातील वर्णने विमानातून प्रवास केल्याखेरीज करता येणे शक्य नव्हते...म्हणजेच कालिदासालाही विमान उपलब्ध होते असेही दावे केले गेले. छद्मविज्ञानी मंडळीचे प्रसिद्धीलोलुप दावे एवढेच त्याचे स्वरूप नसून या पुनरुज्जीवन वादातून सांस्कृतिक संघर्ष पेटवण्याचे हे प्रयत्न आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. त्यासाठी भावनांना हात घालण्यासाठी, खोटा अहंकार वाढवण्यासाठी प्रसंगी धादांत असत्याचाही कसा वापर करून घेतला जातो हे लक्षात यावे.

बरे, भारतात पुरातनकाळी वैदिकांनी सर्व काही शोधले होते असे दावे करत असताना ही मंडळी आपल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ कधी इस्रो किंवा जीएसआयसारख्या प्रतिष्ठित भारतीय संस्थांचे संशोधनसमोर ठेवत नाहीत! नासा आणि फोर्ब्ज हीच काय ती जगातील त्यांची सूत्रे असतात. आणि विनोद म्हणजे ना फोर्ब्जने असले काही संशोधन प्रसिद्ध केलेले असते ना नासाने. याचाच अर्थ असा की संघ परिवाराला विज्ञानाचे वावडे व असत्याप्रति अनावर प्रेम आहे. सांस्कृतिक इतिहासात नवी संशोधने व्हावीत, जुने भ्रम दूर होत नवी वास्तवे कळावीत व तीही अंतिम न समजता पुढे संशोधन चालू ठेवावे ही खरी निरंतर ज्ञानप्रक्रिया असते. पण धादांत खोटा सांस्कृतिक इतिहास रचायचा प्रयत्न करीत एकाच गटाचे सांस्कृतिक तुष्टीकरण करत नेत अन्यांना मात्र सांस्कृतिक परावलंबी ठरवायचे प्रयत्न विज्ञानवादी असण्याची सुतराम शक्यता नाही. संघ परिवार या छद्मविज्ञानाद्वारे भावी पिढ्यांचे बुद्धिवादी/विज्ञानवादी होणे रोखत आहे.


(Published in Divya marathi, 18/12/2017)

1 comment:

  1. तो एका ब्लॉगवरील एक लेख होता , त्याला नासाचा रिपोर्ट म्हणता येत नव्हते , तरीही उत्साही लोकांनी ती हूल वायरल केली . सध्या ती पोस्ट गायब आहे .

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...