आमचे सामाजिक मानसशास्त्र गेला बराच काळ बिघडत चालले आहे. समाजात विकृत मानसिकतेचे लोक असतात पण त्यांच्या विकृतीच्या अभिव्यक्तीवर दबाव टाकणारे नैतिक, विचारी आणि कायद्याचे घटक प्रभावी असले तर अशी विकृत माणसे, भयाने का होईना, आपली विकृती मानसिक पातळीवरच ठेवतात...कृतीमधुन सहसा अभिव्यक्त करत नाहीत. किंबहुना अभिव्यक्त न होणे त्यांना भाग पडते.
पण अलीकडे दबाव-घटक क्षीण होत चालल्याचे चित्र आहे. त्याची परिणती मनोविकृतीच्या उद्रेकात होते...निर्भया प्रकरणात जशी होते तशी ती नितीन आगे, कोपर्डी, अखलाख ते आता मोहम्मद अफ़्रजुल प्रकरणातही होते. मनोविकृतांना कोणतीही कारणे पुरतात. धर्मांधता, जातीयता ही सोपी कारणे जोपासुन आपले द्वेषाचे केंद्रबिंदू ठरवणे सोपे जाते. संधी मिळताच त्याची अभिव्यक्तीही होते. स्त्री आणि दुर्बळ व्यक्तीघटक या अभिव्यक्तीचे बळी असतात. आता बळींची यादी वाढत चालली आहे कारण धर्म-अहंकार आणि पुरुषी अहंभाव वाढेल असेच वातावरण आहे असे नव्हे तर ते खुप काळ आपल्या समाजाने जोपासले आहे. आता समाज-नैतिक जाणीवांचे, सामाजिक भानाचे आणि कायद्याचे उध्वस्त होत चाललेले गड अशा घटनांना अवकाश देत आहेत. बिघडलेल्या सामाजिक मानसशास्त्राची ही अपरिहार्य परिणती आहे.
अशा विकृतांना पाठिंबा देणारे, गतकाळातील सोयीची उदाहरणे देत, त्यांच्या कृतींचे समर्थन करु पाहणारे ती निंदनीय कृती करणारे जेवढे मनोविकृत असतात तेवढेच मनोविकृत हेही उघड अथवा छुपे समर्थक असतात आणि संधी मिळाली तर तेही असे कृत्य करु शकतात हे लक्षात ठेवले पाहिजे. सर्व नराधम घटनांतील अशा समर्थकांची मानसिकता आताच तपासली पाहिजे. तिचा निषेध केला पाहिजे. कायद्याचे नि:पक्षपाती राज्य पुन्हा प्रस्थापित झाले पाहिजे. सामाजिक जाणीवांनी नवा सौहार्दमय आकार घेतला पाहिजे.
अन्यथा अशा घटना एका मागोमाग एक,. कोणाच्या ना कोणाच्या बाबतीत होतच आल्या आहेत...पुढेही होत राहतील. बळी कोण आहे हे पाहुन आताचे समर्थक निषेधाच्या बाजुला जातील किंवा आताचे निषेध करणारे समर्थकाच्या भुमिकेत जातील. सामाजिक विकृत मानसिकतेचे उद्रेक थांबणार नाहीत!
No comments:
Post a Comment